डेझर्ट

शाही ब्रेड पुडिंग

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

शिळा हाला(challah) किंवा ब्रिओश ( Brioche) ब्रेड
६ अंडी
अर्धा कप साखर
अर्धा कप मास्कारपोने चीझ,
दूध,
बदामाचे काप
बदामाचा इसेंस ( ऐच्छिक )

क्रमवार पाककृती: 

एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.

एक दिवसाचा शिळा ब्रिओश किंवा हाला ब्रेड (किंवा अंडं घातलेला कुठलाही गोडसर ब्रेड ) च्या अर्धा इंच जाडीच्या स्लाइसेस कराव्यात.

एका भांड्यात ६ अंडी , अर्धा कप मस्कारपोने चीझ( किंवा साधं सॉफ्टन केलेलं क्रीम चीझ ) २ -३ टे स्पून साखर एकत्र फेटावं. २टिस्पून व्हनिला इसेंस किंवा आल्मंड इसेंस घालावा. त्यात हळू हळू अर्धा कप दूध घालून फेटावं. ब्रेडच्या स्लाइसेस एकेक करून या मिश्रणात २-३ बुडवून मग तळाशी कॅरमेल लावलेल्या भांडयात रचाव्या . उभ्या, रेडियल टायर सारख्या दिसतील अशा रचल्या तर छान दिसते हे पुडिंग. मग उरलेलं दुध, अंड्याचं मिश्रण या स्लाइसेसवर ओतून , प्लास्टिक रॅप लावून हे भांडं फ्रीझ मधे १०-१२ तास ठेवावं.
नंतर ३२५ डिग्री फॅ वर १५-२० मिनिटे बेक करावं
मग यावर थोडे बदामाचे पातळ काप भुरभुर्वून परत १५ ते वीस मिनिटे बेक करावं.

ओव्हन मधून काढल्यावर कडांना सुरी फिरवून घ्यावी अन मग एका प्लेट वर हे भांडं उपडं करावं. ( हे करताना सांभाळून, ओव्हन मिटस घालावे व हे काम सिंकपाशी करावे ).
सर्व्ह करताना पाय च्या करतो तशा स्लाइसेस कापून सर्व्ह करावे

प्रत्येक स्लाइस वर थोडे थोडे फ्रेश व्हिप्पड क्रीम घालून खावे .

वाढणी/प्रमाण: 
६-८ लोकांकरता
अधिक टिपा: 

ह्याची सर्व तयारी आधी करुन ठेउन पाहुणे आल्यावर शेवटचं बेकिंग केलं तर आयत्यावेळि फारशी धडपड न करता गरम गरम स्वीट डिश सर्व्ह करता येते.
ब्रंचला कोणी येणार असतील तर आदल्या रात्री सगळी तयारी करायची.

माहितीचा स्रोत: 
इकडून तिकडून वाचून अन स्वतःचे प्रयोग

तिरामिसु (Tiramisu)

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ अंडी (पांढरा आणि पिवळा भाग वेगवेगळा करुन घेणे)
१/२ कप/११० ग्रॅम साखर.
८ औंस/२२५ ग्रॅम मस्करपोने चीज
१ मोठा मग तयार espresso coffee (साखर किंवा दूध न घालता).
२ टेबलस्पून Cognac किंवा Brandy (ऐच्छिक), काही जण रम वापरतात.
२०-२५ लेडीफिंगर बिस्कीटे किंवा १ पाकीट
२ टेबलस्पून कोको पावडर (वरुन सजवायला)

क्रमवार पाककृती: 

खर तर तिरामिसुची कृती फार सोपी आहे थोडक्यात सांगायचे तर कॉफीत बुडवलेली बिस्किटे आणि क्रीम यांचे एकावर एक आपल्याला हवे तेवढे थर दिले की झाले तिरामिसु तयार.. ह्याच्यापलीकडे का..ही नाही. पण असे सांगीतले तर लोकांना खर वाटत नाही, एवढा छान पदार्थ असा कसा पटकन होईल असे म्हटल्यावर काय करणार म्हणून ही घ्या कृती अगदी सविस्तर. स्मित

१. एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पिवळा भाग, सगळी साखर, Cognac आणि १/२ टेबलस्पून तयार कॉफी एकत्र करा. नंतर हँड मिक्सरने ते चांगले २-३ मिनीट फेटून घ्या.

२. आता वरच्या मिश्रणात सगळे मस्करपोने चीज टाकुन हँड मिक्सरने ३-५ मिनीटे फेटा. सगळे मिश्रण एकजीव व्हायला हवे (until consistency is smooth). हे भांडे बाजुला ठेवुन द्या.

३. आता दुसर्‍या एका मोठ्या भांड्यात अंड्यांचा पांढरा भाग आणि चिमुटभर साखर टाका आणि हँड मिक्सरने भरपुर फेटा. त्याचा मस्त पांढरा फेस (stiff peaks) व्हायला हवा. भांडे उलटे केले तरी हा फेस खाली पडणार नाही इतक्या वेळ फेटावे. माझा मिक्सर खूप पॉवरफुल नाहीये त्यामुळे मी १२-१४ मिनीटे फेटते. तुम्हाला कदाचित यापेक्षा जास्त किंवा कमी वेळ लागेल तुमच्या मिक्सरच्या क्षमतेप्रमाणे.

४. आता हा फेटलेला अंड्याचा पांढरा भाग हलक्या हाताने लाकडी चमचा वापरून दुसर्‍या (मस्करपोने असलेल्या भांड्यात) मिश्रणात मिसळा. मिसळतांना फोल्डींग मेथड वापरावी. हे अगदी हलक्या हाताने करावे.

५. आता एका पसरट भांड्यात/ताटलीत सगळी कॉफी ओतावी. कॉफी अगदी कडक गरम असू नये, कोमट किंवा त्यापेक्षा थोडी जास्त गरम असावी.

६. एक चौकोनी काचेचा कॅसरोल किंवा ज्या भांड्यात तिरामीसु करायचय ते भांडे घ्यावे. नंतर एक एक करुन लेडीफिंगर्स
आडवी धरुन कॉफीत बुडवावीत. बिस्कीट पूर्ण बुडायला हवे. ही बिस्कीटे फार नाजूक असतात त्यामुळे झटकन बाहेर काढावीत आणि लगेच कॅसरोलच्या तळाशी ठेवावीत. एका शेजारी एक असा बिस्किटांचा एक थर तयार झाला की त्यावर भांड्यातले अर्धे मिश्रण हलक्या हाताने ओतावे आणि ते लाकडी चमच्याने सगळीकडे सारखे पसरवावे (दुसरा थर).

७. आता परत त्या मिश्रणाच्या थरावर वर कॉफीत बुडवलेल्या बिस्किटांचा थर द्यावा (तिसरा थर). बिस्कीटे अगदी शेजारी शेजारी चिटकून ठेवावीत थर लावतांना आणि मग त्या थरावर उरलेले सगळे मिश्रण ओतावे (चौथा थर). काहीजण यावर बिस्कीटांचा अजून एक थर (पाचवा) पण देतात आणि त्यावर परत क्रीमचा (सहावा) पण माझ्याकडचे भांडे एवढे खोल नाही त्यामुळे मी एकुण चारच थर देते. तिरामिसु करतांना सगळ्यात खालचा थर नेहमी लेडीफिंगर बिस्कीटांचा तर सगळ्यात वरचा थर नेहमी क्रीमचा असावा

८. आता कॅसरोल किमान ४-५ तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा. सर्व्ह करायच्या आधी चाळणीने त्यावर कोको पावडर टाकायची आणि मग सगळ्यांना तिरमिसु सर्व्ह करायचे. माझ्याकडे आत्ता फोटो नाहीये पुढच्यावेळी केले की काढेन आणि टाकेन.

वाढणी/प्रमाण: 
४-६ लोकांना किंवा खाल तसे.
अधिक टिपा: 

१. लेडीफिंगर्स आणि मस्करपोने चीज शक्य असेल तर इटालिअन ब्रँडचेच वापरावे. इटालीयन ग्रोसरीच्या दुकानात मिळते. लेडीफिंगर हे बिस्किटाच्या प्रकाराचे नाव आहे ब्रँडचे नाही. मी होल फुड्स मधून लेडीफिंगर्स आणले होते ३६५ की अश्याच कुठल्यातरी ब्रँडचे, अजिबात आवडले नाही.
२. एस्प्रेसो कॉफी करणे शक्य नसेल तर साधी काळी कॉफी वापरता येईल पण चवीत फरक पडतो.
३. काही जण लेडीफिंगर्स ऐवजी पाउंड केकच्या पातळ चौकोनी चकत्या वापरतात. चवीतला बदल मला फारसा आवडला नाही म्हणून मी लेडीफिंगर्सच वापरते.
४. मी वापरलेला कप मेजरींग कप होता.
५. पार्टीसाठी करतांना हा प्रकार मी आदल्या दिवशीच करुन फ्रीज मध्ये ठवते, जितका जास्त वेळ तो फ्रीज मध्ये रहातो तितकी चव चांगली येते.
६. अंड्याचा पांढरा भाग १२-१४ मिनीटे फेटणे हा भाग कधी कधी कंटाळवाणा होवू शकतो तो नवर्‍याला किंवा दुसर्‍या कोणालातरी करायला द्यावा स्मित. माझ्यामते तिरामिसु इतकी सोपी आणि हमखास यशस्वी होणारी कुठलीच कृती नाही.

माहितीचा स्रोत: 
इटालीयन रुममेट

बव्हेरियन ब्लू

लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप कमी फॅटचे दूध
१/४ कप फॅट फ्री दुधाची पावडर (carnation चालेल)
१ पॅक फ्रोजन ब्लूबेरीज (१६ oz चे १ पॅक, रूम टेम्परेचरला आणून ठेवावे.)
१/२ कप साखर ( + १ चमचा साखर)
चिमूटभर मीठ
१ कप फॅट फ्री Sour क्रीम
१ पॅकेट unflavored gelatin
१/४ कप थंड पाणी
थोड्या ताज्या ब्लूबेरीज

क्रमवार पाककृती: 

दूध आणि दुधाची पावडर एकत्र करुन whisk ने नीट मिसळून ते मिश्रण अर्ध्या तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.

पॅकेटमधल्या ब्लूबेरीज, साखर, मीठ एका भांड्यात घालून भांडे मध्यम ते मंद विस्तवावर ठेवावे. साखर विरघळून आणि मिश्रण आटून ब्लूबेरीज मॅश करता येऊ लागेपर्यंत गरम करावे. साधारण १५ ते २० मिनिटे लागतील. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. मग त्यात अर्धा कप sour क्रीम मिसळावे.

१/४ कप पाणी थोडे कोमट करुन त्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.

थंड झालेले दुधाचे मिश्रण फ्रीजरमधून काढून घुसळावे. electric mixer वापरला तर सोपे पडेल. साधारण केकच्या फ्रॉस्टिन्गसारखे दिसू लागले की १ चमचा साखर आणि जिलेटीन घालून घुसळावे. मग हे ब्लूबेरीच्या मिश्रणात ओतून हळूहळू एकत्र करावे.

नंतर हे मिश्रण बोल किंवा ग्लासमध्ये ओतून सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. साधारण २ तास लागतील. एकाच भांड्यात ओतून सेट केले तरी चालेल. वरुन प्लास्टिक wrap किंवा झाकण ठेवावे.

खायला देताना वरुन चमचाभर sour क्रीम आणि थोड्या ताज्या ब्लूबेरीज घालून द्यावे.

bb1.jpg

वाढणी/प्रमाण: 
वरील प्रमाणात ५-६ बोल होतील.
अधिक टिपा: 

हाच पदार्थ स्ट्रॉबेरीज वगैरे बाकी berries वापरुनही करता येईल.

माहितीचा स्रोत: 
रिडर्स डायजेस्ट चे 'रेसिपीज फॉर हेल्दी हार्ट' पुस्तक.