कोल्हापुरी

कृष्ण'करी'

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाऊंड (साधारण १ किलो) मटण

१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा लिंबाचा रस
मीठ

सुके वाटण
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
१ चमचा तीळ
१ चमचा खसखस
१ चमचा बडीशेप
१ छोटा चमचा काळे मिरे
२-३ लवंगा
२-३ लाल मिरच्या
छोटा दालचिनीचा तुकडा
२ चमचे सुके खोबरे

ओले वाटण
१ मध्यम कांदा उभा चिरुन
अर्धी वाटी कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
१ इन्च आले

फोडणी
१ लहान कांदा बारीक चिरुन
२ तमालपत्रे
हिंग
तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

- म्हणजे 'काळे मटण'. नवीन नाव दिलंय. स्मित
- मटण धुवून त्याला हळद, मीठ, तिखट, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस लावून ठेवावे.
- सुक्या वाटणाचे सगळे जिन्नस थोडे तेल टाकून खरपूस, खमंग भाजून घ्यावेत आणि वाटावेत. हे वाटण तसे सुकेच असते आणि काळपट दिसते. यातला १ चमचा वाटण मटणाला चोळून ठेवावे. अर्धा तास तरी ठेवावे.
- ओल्या वाटणाचा कांदा तेलावर रंग बदलेपर्यंत परतावा, त्यातच मग कोथिंबीर, आले, लसूण घालून परतावे. मग थोडे पाणी घालून वाटावे.
- पातेल्यात किंवा स्टीलच्या कुकरमध्ये तेल तापवून हिंग, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकावा. परतून घ्यावा आणि मग मॅरिनेट केलेले मटण टाकून भाजून घ्यावे. मटण सगळ्या बाजूने भाजले जावे इतपत परतावे. मग उरलेला कोरडा मसाला घालून पुन्हा परतावे.
- आवश्यकतेनुसार मीठ-तिखट घालावे.
- ओले वाटण घालून मिसळून घ्यावे आणि अगदी आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवावे, फार पातळ करु नये. याला अंगाबरोबरच दाट रस्सा असतो.

mutton2_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४
अधिक टिपा: 

ही पारंपारिक रेसिपी आहे. कोल्हापुरात मिळते ते काळे मटण अगदी असेच असते का कल्पना नाही. मी हा पदार्थ बाहेर कधी खाल्ला नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

पांढरा रस्सा

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित)
२ मध्यम आकाराचे कांदे
१०-१२ काळे मिरे
७-८ लवंगा
३-४ दालचिनीचे तुकडे (१ इन्च लांबीचे)
३-४ तमालपत्र
१ चमचा उभे कापलेले आले.(julienne cut)

चिकन/मटणाच्या तुकड्यांना लावण्यासाठी वाटण-
२ इन्च लांबीच्या आल्याचा तुकडा
५-६ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
२ मोठे चमचे - दही
मीठ

रश्श्याचे वाटण-
१ लहान वाटी - सुके खोबरे
२ मोठे चमचे - खसखस
१ मोठा चमचा - पांढरे तीळ
७-८ वेलच्या
१/२ वाटी - काजू
१ मोठा चमचा - लाल सुक्या मिरच्यांच्या बिया

इतर
मीठ
५-६ कप पाणी
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा तूप

क्रमवार पाककृती: 

-चिकन किंवा मटणाचे तुकडे धुवून त्याला मीठ आणि वाटलेले आले-लसूण आणि दही लावून किमान अर्धा तास मुरू द्यावे.

-रश्श्याच्या वाटणसाठी सुके खोबरे, तीळ, खसखस थोडे भाजून घेऊन त्यात वेलची, काजू, सुक्या मिरच्यांची बी घालून वाटून घ्यावे. हे वाटण बारीक व्हायला हवे. बाकीचे जिन्नस आधी कमी पाण्यात वाटून मग त्यात काजू घालून पुन्हा वाटले तरी चालेल.

- कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. पातेल्यात तेल, तूप टाकून त्यावर मिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र टाकून मग कांदा आणि उभे कापलेले आले टाकावे व परतून घ्यावे.

- मग मॅरिनेट केलेले चिकन वा मटणाचे तुकडे टाकून नीट सवताळून घ्यावे. त्यात पाणी टाकावे. तुकडे बुडून वर २-३ इन्च पाणी राहिले पाहिजे. मंद आचेवर शिजवावे.

- चिकन्/मटण शिजल्यावर रश्श्याचे वाटण घालून चांगली उकळी आणावी. दाट वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीप्रमाणे मीठ घालावे.

हा रस्सा नुसता प्यायला चांगला लागतो. साध्या भातावरही घेता येतो.

paandhara.jpg

प्रकाशचित्र - अनिलभाई.

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ लोकांसाठी
अधिक टिपा: 

- मटण /चिकन कुकरमध्येही शिजवून घेता येते.
- हा रस्सा अति तिखट नसतो. आवडत असल्यास मिरचीच्या बी चे प्रमाण वाढवू शकता, तसेच हिरव्या मिरच्या उभ्या शिरुन टाकता येतात.
- थोडे पाणी आणि थोडा चिकन ब्रॉथही घालता येईल.
-'मराठा दरबार पांढरा रस्सा मसाला' मिळतो. मी वापरुन पाहिलेला नाही.
- याच्या शाकाहारी प्रकारात (बटाटे, फ्लावर, दुधी इ. घालता येते (म्हणे!))

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोल्हापुरी

कोल्हापुरी पेशल शब्दकोष

0

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

भरलेली कोंबडी

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ कोंबडी
१ मोठा चमचा आले - लसूण पेस्ट
अर्धा कप दही
१ वाटी ओले खोबरे
२ चमचे तीळ + १ मोठा चमचा खसखस (भाजून पूड करावी)

(२ कांदे,
५ - ६ मिरच्या,
१ इन्च आल्याचा तुकडा,
१० - १२ लसूण पाकळ्या,
१ जुडी कोथिंबीर) हे सर्व बारीक चिरून घ्यावे.

अर्धा कप काजूचे तुकडे
पाव कप बेदाणे,
२ मोठे चमचे तिखट
अर्धा चमचा हळद
१ चमचा गरम मसाला पावडर
अर्धा वाटी सुके खोबरे
१ कप तेल / तूप
२ लिंबांचा रस
मीठ.

क्रमवार पाककृती: 

कोंबडीची स्किन काढून कोंबडी स्वच्छ धुवावी. नंतर आले लसूण पेस्ट, मीठ आणि दही लावून अर्धा तास तरी ठेवावे.

सुके खोबरे भाजून घेऊन गरम मसाला घालून बारीक वाटावे. हे वाटण कोंबडीच्या आतल्या भागाला लावावे.

पातेल्यात तूप / तेल गरम करून त्यात ओले खोबरे, खसखस + तीळ पूड, बारीक चिरलेला कांदा, लिंबूरस, काजू, मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, बेदाणे, हळद, मीठ घालून चांगले परतावे. हा मसाला थंड झाल्यावर कोंबडीत भरावा. मसाला बाहेर पडू नये म्हणून दोरा बांधावा.

शेवटी तूप / तेल गरम करून बाहेरच्या बाजूने कोंबडीला लावावे. ओव्हन मधे ठेवून ४०० डिग्री वर ४५ मिनिटे ते १ तास बेक करावी. जाड बुडाच्या पातेल्यात गॅस वर सुद्धा भाजता येईल.
वाढताना सुरीने चकत्या करून कांदा, टोमॅटो चकत्या आणि लिंबाच्या फोडी बरोबर द्यावी.

वाढणी/प्रमाण: 
एक मध्यम कोंबडी चार लोकांना पुरेल. :)
अधिक टिपा: 

भरण्यापूर्वी कोंबडी पूर्ण thaw केली पाहिजे. फ्रीजर मधे असेल तर बाहेर काढून साधारण रुम टेम्प ला आल्यावर फ्रीज मधे ( फ्रीजर नाही) ठेवावी. मग भरण्यापूर्वी पुन्हा बाहेर काढावी. खूप थंड असेल तर स्किन काढायलाही त्रास पडतो. कोंबडीच्या आकारावर पण वेळ कमीजास्त होऊ शकतो. roasting chicken मोठी असते. fry करायची मिळते ती जरा लहान असते.

जेवायच्या २ तास आधी oven मधे ठेवली तर वेळेवर व्हायला हरकत नाही. फार आधीही ठेवू नये नाहीतर थंड होते.

या पदार्थाबरोबर पांढरा रस्सा(मटण किंवा चिकन) आणि जीरा पुलाव हा मेनू लोकांना आवडतो.

kombadi.jpg

Thanksgiving Style करायची असेल तर स्टफिन्ग वेगळ्या प्रकारे करता येते. कांदा, आले, लसूण हे सगळे बारीक चिरुन ब्रेडचा चुरा किंवा unseasoned croutons, काळी द्राक्षे, मिरे किंवा थोडे लाल तिखट हे थोड्या तेलावर परतून मिक्स करुन भरायचे. कोंबडी marinate करताना फक्त लिंबूरस, मीठ, गरम मसाला, हळद हे वापरायचे. बेक करताना बाजूने लाल बटाटे, कांदे, सफरचंदाचे तुकडे लावायचे.

माहितीचा स्रोत: 
व्हई. :) (वही. यात बरेच वर्षांपासून कुणी सांगितलेल्या, वाचून लिहून ठेवलेल्या अश्या रेसिपीज आहेत.)