मटणाचे प्रकार

लँब विंदालू (Lamb Vindaloo)

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

लँब विंदालू ही गोमंतकीय-पोर्तुगीज पाककृती आहे. सहसा ही पाककृती पोर्क वापरून केली जाते, पण इथे मी लँब वापरून केलेली आहे.

१.५ पौंड लँब (बारीक अथवा मोठे तुकडे)
१५-२० तांबड्या मिरच्या
१/३ कप विनेगर
१/२ टीस्पून जिरे
१०-१२ लवंग
१०-१२ मिरी
२ वेलची
१/२ टीस्पून मोहरी
५-६ पाकळे लसुण
इन्चभर आले
१ मध्यम आकाराची दालचिनी
१/४ कप किसलेला नारळ अथवा खोबरे
२ टीस्पून टोमाटो पेस्ट
१/२ मध्यम आकाराचा कांदा
१/२ टीस्पून हळद
२ तमालपत्र
३ टीस्पून तेल
१/३ कप फेणि किंव्हा रेड वाईन.
चवीनुसार मीठ

क्रमवार पाककृती: 

१. लँबचे छोठे अथवा मोठे तुकडे करून घेवून त्यांना मीठ आणि हळद लावून घेणे. हे मिश्रण फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवून देणे.
२. मिरच्या, लवंग, मिरी, वेलची, मोहरी, जिरे, दालचिनि, आले, लसुण आणि नारळ, विनेगर मध्ये भिजवून, मिक्सर मध्ये वाटून घेणे. अधिक विनेगर घालू नये. गरज लागल्यास वाटताना थोडे गरम पाणी वापरावे.
३. वाटण चांगले ल्यांबच्या तुकड्याना लावून घेणे, ३-४ तास फ्रीज मध्ये ठेवून देणे.
४. एका पसरट किव्हा तत्सम मंद आन्चेवर्ती शिज्वण्यायुक्त भांडे घ्यावे आणि त्यात तेल गरम करावे आणि तमालपत्र, बारीक चिरलेला कांद्याची फोडणी टाकावी (थोडा तांबूस रंग येई पर्यंत).
५. म्यारीनेत केलेला ल्यांब त्याच्यात टाकावा, हे मिश्रण ल्यांबला पाणी सुटेपर्यंत शिजवावे.
६. एक कप गरम पाणी घालावे.
७. गरम आन्चेवर्ती १० मिनिटे शिजवावे, उकळी आल्यानंतर मंद आचेवर्ती ३० मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. मध्ये मध्ये ढवळत राहावे.
८. लँब जरा मंदच शिजवावा, घाई करू नये.
९. फेणि किंव्हा रेड वाईन आणि टोमाटो पेस्ट घालणे.
१०. मिश्रण आणखी २५ मिनिटे शिजवून घ्यावे, हलकेच ढवळत राहणे.
११.लँब शिजल्यावर, मीठ घालावे.
१२. ग्रेवी थोडी दाटच असावी , पाणीदार नसावी.
१३. शेवटी पाहिजे असल्यास चिमुटभर साखर टाकावी.
विंदालू , नान, भात किंव्हा पाव (रोल्स) सोबत खावू शकतो.

वाढणी/प्रमाण: 
५-६ लोकांसाठी पुरेल.
माहितीचा स्रोत: 
पारंपारिक गोमंतकीय प्रकार, आणि माझे प्रयोग.

कृष्ण'करी'

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाऊंड (साधारण १ किलो) मटण

१ चमचा आले-लसूण पेस्ट
१ चमचा हळद
१ चमचा तिखट
१ चमचा लिंबाचा रस
मीठ

सुके वाटण
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
१ चमचा तीळ
१ चमचा खसखस
१ चमचा बडीशेप
१ छोटा चमचा काळे मिरे
२-३ लवंगा
२-३ लाल मिरच्या
छोटा दालचिनीचा तुकडा
२ चमचे सुके खोबरे

ओले वाटण
१ मध्यम कांदा उभा चिरुन
अर्धी वाटी कोथिंबीर
३-४ लसूण पाकळ्या
१ इन्च आले

फोडणी
१ लहान कांदा बारीक चिरुन
२ तमालपत्रे
हिंग
तेल
पाणी

क्रमवार पाककृती: 

- म्हणजे 'काळे मटण'. नवीन नाव दिलंय. स्मित
- मटण धुवून त्याला हळद, मीठ, तिखट, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस लावून ठेवावे.
- सुक्या वाटणाचे सगळे जिन्नस थोडे तेल टाकून खरपूस, खमंग भाजून घ्यावेत आणि वाटावेत. हे वाटण तसे सुकेच असते आणि काळपट दिसते. यातला १ चमचा वाटण मटणाला चोळून ठेवावे. अर्धा तास तरी ठेवावे.
- ओल्या वाटणाचा कांदा तेलावर रंग बदलेपर्यंत परतावा, त्यातच मग कोथिंबीर, आले, लसूण घालून परतावे. मग थोडे पाणी घालून वाटावे.
- पातेल्यात किंवा स्टीलच्या कुकरमध्ये तेल तापवून हिंग, तमालपत्र आणि बारीक चिरलेला कांदा टाकावा. परतून घ्यावा आणि मग मॅरिनेट केलेले मटण टाकून भाजून घ्यावे. मटण सगळ्या बाजूने भाजले जावे इतपत परतावे. मग उरलेला कोरडा मसाला घालून पुन्हा परतावे.
- आवश्यकतेनुसार मीठ-तिखट घालावे.
- ओले वाटण घालून मिसळून घ्यावे आणि अगदी आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवावे, फार पातळ करु नये. याला अंगाबरोबरच दाट रस्सा असतो.

mutton2_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४
अधिक टिपा: 

ही पारंपारिक रेसिपी आहे. कोल्हापुरात मिळते ते काळे मटण अगदी असेच असते का कल्पना नाही. मी हा पदार्थ बाहेर कधी खाल्ला नाही.

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक

झटपट मटण

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पाऊण किलो मटण, मीठ चवीपुरते, व्हिनेगर, मालवणी मसाला (मी मालवणी आहे हा मसाला घरीच बनवला आहे ), आल लसून पेस्ट, कांदा, कढीपत्ता, सुख खोबर.

क्रमवार पाककृती: 

१) मटण साफ करून धुवून घ्यायचं नंतर त्याला दही, आल लसून पेस्ट, मालवणी मसाला (नसेल तर तुमच्याकडे असेल तो वापरावा ), व्हिनेगर, मीठ लाऊन अर्धा तास ठेऊन द्यायचं. नंतर कांदा, सुख खोबर भाजून वाटण कराव.

२) पातेल्यात किवा कुकर मटण शिजवण्यासाठी उपयोग करावा. प्रथम कांदा आणि कडीपत्ता याची फोडणी करावी मग ते मटण फोडणीत घालून ते परतावे नंतर त्याला झाकण ठेवून एक वाफ काढावी. वाफ आल्यानंतर त्यात आपण तयार केलेलं कांद्या खोबऱ्याच वाटण घालाव. त्यानंतर आपल्याला जाड किवा पातळ हव तेवढ पाणी ओताव.

३) वरील कृती झाल्यावर त्यात पुन्हा मीठ टाकावे. कुकरला झाकण लावून तीन ते चार शिट्या कराव्यात. अशा तर्हेने झाल झटापट मटण तयार.

वाढणी/प्रमाण: 
मटण सध्या महाग झाल असल्यामुळे सगळी मासाहारी मंडळी आता कोबडी कडे वळली आहेत. त्यामुळे आता जाड सर बनवून खात नाहीत. वरती सांगितल्या प्रमाणे वाटप टाकत असतानाच किती माणस आहेत त्यावरून पाणी टाकाव.
अधिक टिपा: 

माझा हा पहिलाच प्रयत्न आहे इथे पाककृती टाकण्याचा तरी यात कोणालाही अधिक माहित हवी असल्यास नक्की विचार मी नक्की तुमची मदत करीन. या पाककृती मध्ये तुम्हाला काही आजून टाकाव वाटत असेल तर नक्की सांगा.

माहितीचा स्रोत: 
रविवारी उशिरा उठल्यामुळे आई झटपट अशा प्रकारचे मटण बनवते. काही प्रती मी खाली टाकत आहे

मटण बिर्याणी

लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

दोन ते अडीच पाउंड मटण

वाटण क्रमांक १

-६-७ पाकळ्या ( अमेरिकेत मिळणार्‍या , जाड्या पाकळ्या ) लसूण + इंचभर आले एकत्र वाटून
-३ टेबलस्पून दही
-अर्धा टी स्पून हळद
-२ टीस्पून मीठ

वाटण २
-१५-१६ सुक्या मिरच्या -मी ब्याडगी मिरच्या वापरते - या फारशा तिखट नसतात
-८ काळे मिरे , ८ लवंगा
-अर्धा मध्यम कांदा
-६-७ पाकळ्या लसूण
-१ इंच आले
-१टेबलस्पून खसखस
-१ छोटा तुकडा दगडफूल
-चिमूटभर शहाजिरे
-एक टेबलस्पून धणे
-एक टीस्पून जिरे
-चण्या एवढा जायफळाचा तुकडा
-१ तेजपान
-२ इंचाचा दालचिनिचा तुकडा
-६ हिरव्या वेलची
-असल्यास ४-६ तुकडे जावित्री.

चार मध्यम कांदे बारीक चिरून
२-३ प्लम टॉमेटो बारीक चिरून
कोथिंबीर बारीक चिरुन अर्धा कप ( किंवा एक वाटी )

तीन मध्यम कांदे उभे पातळ चिरून.
पुदिन्याची पाने - जुलिएन करून अर्धा कप
दहा बारा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून, बिया काढून परत एकदम बारीक जुलिएन्स करून
आल्याचे दीड इंचाचे दोन तकडे, साले काढून , जुलिएन करुन

तेल्,बटर , तूप
दोन -तीन चिमटी केशर मावे मधून १० सेकंद गरम करुन चुरडून मग दोन टेस्पून दुधात भिजवून

अर्धा वाटी काजू तुपात तळून

भातासाठी
तासभर आधी ६ कप बासमती तांदूळ धुवून निथळून ठेवलेला
बटर १-२ टेबलस्पून
मीठ
६ वेलची , ६ लवंगा, दोन -तीन दालचिनीचे तुकडे - इंचभराचे, ६ मिरे, दोन तेजपानं

क्रमवार पाककृती: 

मटणाचे तुकडे स्वच्छ धूउन, त्याला वाटण क्रमांक १ लावून फ्रिज बाहेर तासभर किंवा फ्रीजमधे १०-१२ तास पर्यंत ठेवावे ( बिर्याणी करते वेळी बाकी तयारी सुरु करताना फ्रीजमधून काढून ठेवावे. परतून घ्यायच्यावेळेस मटण रुम टेम्प ला असावे शक्यतो. )

वाटण क्रमांक दोन मधले पदार्थ एकत्र बारीक वाटावे. थोडे थोडेच पाणी घालावे. अगदी पातळ वाटण होऊ नये.

सहा कप तांदळात ९ कप पाणी घालून राइस कूकरमधे भात केल्यास पूर्ण शिजायच्या दोन डिग्री अलिकडेच राइस कूकर बंद होतो. राइस कूकर नसल्यास तुमच्या आवडत्या पद्धतीने भात ७५-८०% शिजवून घ्या . शिजतानाच साबुत गरम मसाला, बटर व मीठ घाला. शिजलेला भात एका पसरट भांड्यात / परातीत मोकळा करून ठेवा.

जाड बुडाच्या पातेल्यात किंवा प्रेशर पॅन मधे (सढळ हाताने घातलेले ) तेल गरम करुन त्यात एक तेजपान, २-३ लवंगा, एक तुकडा दालचिनी घालून बारीक चिरलेले तीन कांदे घालून परतून घ्या . कांदा गुलाबी झाला की त्यावर मॅरिनेट केलेल्या मटणातले तुकडे घालून प्रखर आचेवर परतून घ्या.( सगळे मॅरिनेड भर्र्कन ओतू नका. तुकडे नीट सगळीकडून ब्राउन झाले पाहिजेत. मॅरिनेड घातले तर तुकडे ब्राउन होणार नाहीत. दह्याचे पाणी पाणी सुटते त्यात ते तुकडे उकळले जातील )

तुकडे नीट ब्राउन झाले की वाटण क्रमांक दोनचा मसाला घालून ४-५ मिनिटे परता. मग उरलेले मॅरिनेड घालून मिनिटभर परता. मग वाटी भर गरम पाणी घालून प्रेशर पॅन च्या तीन शिट्या व अजून ५ मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्या. जाड बुडाचे पातेले असेल तर झाकण ठेवून मध्यम आचेवर ४० एक मिनिटे लागतिल. मधून मधून लागेल तसे गरम पाणी घालत रहा.

मटण शिजले ( किंवा पॅनचे प्रेशर उतरले ) की त्यात बारीक चिरलेले टॉमेटो, अर्धी कोथिंबीर घालून मध्यम आचेवर शिजू द्या.

कढईत तेल + तूप गरम करुन त्यात ३ बारीक उभे चिरलेले कांदे डार्क ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या . तेलात अर्धा चमचा साखर घातल्यास सुरेख कॅरमेल रंग येतो .
आता ओव्हन २०० -२५० डिग्री प्रीहीट करत ठेवा.

फॉइल ट्रे किंवा ओव्हन सेफ भांड्यामधे तळाला थोडे बटरचे तुकडे घाला.
त्यावर तळलेला कांदा घाला, त्यावर मटणाचे तुकडे व रस्सा पसरून घाला. त्यावर परत थोडा तळलेला कांदा, आलं, मिरची, पुदिनाचे जुलिएन पसरून घ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्यावर एक भाताचा थर घाला. थोडे बटरचे तुकडे घाला. परत थोडा कांदा, उरलेले मटण, पुदिना-मिरची-आले- कोथिंबीर घाला . उरलेला भात घाला. शेवटी तळलेला कांदा घाला . ( पाहिजे असल्यास तुपात त़ळलेले काजू घाला ) . केशराचे दूध सगळीकडे व्यवस्थित शिंपडा.

फॉईलने घट्ट झाकून ओव्हन मधे ६०-७० मिनिटे, २०० डिग्रीवर शिजवल्यावर बिर्याणी तयार!

वाढणी/प्रमाण: 
६-८ जणांसाठी
अधिक टिपा: 

भरपूर वेळखाऊ रेसिपी आहे.
लसूण पाकळ्या इथे जाडजूड असतात. भारतातल्या पाकळ्या बहुतेक एकास तीन लागतील.
मी इथले लाल कांदे वापरते -ते पण बर्‍यापैकी मोठे असतात .

जुन्या मायबोलीत इंग्रजीत टाकलेली. तीच थोडी सुधारुन इथे आणलीये.
ओव्हनची क्षमता वेगवेगळी असू शकते त्यानुसार टेम्परेचर अन वेळ अ‍ॅडजस्ट करावी. ६०-७० मिनिटांनतर फॉइल अलगद उचलून चेक करू शकता.

माहितीचा स्रोत: 
अनेक प्रयोग करून शेवटी मनासारखी जमलेली रेसिपी

मटणाचा रस्सा

लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण (२ ते ३ पाऊंड, थोडी हाडे- नळ्या असाव्यात.)
तिखट
मीठ
हळद

पहिले वाटण-
१ वाटी कोथिंबीर
१ इन्च आले
१ मिरची
१ छोटा लसणाचा गड्डा
१ चमचा बडीशेप
१ छोटा कांदा (कच्चाच)
थोडी पुदिन्याची पाने (आवडत असल्यास)
२ चमचे लिंबाचा रस किंवा दही.

दुसरे वाटण-
१ नारळ खवणून खोबरे तव्यावर भाजून घ्यावे
२ कांदे उभे पातळ चिरुन तव्यावर तेल टाकून तळून
३-४ लसूण पाकळ्या
२ चमचे खसखस भाजून
दालचिनी
४-५ लवंगा
४-५ वेलदोडे

फोडणी-
१ मध्यम कांदा चिरुन
खडा गरम मसाला (२-३ लवंगा, दालचिनीचा तुकडा, १ छोटा चमचा काळे मिरे, एक मसाला वेलची)
तमालपत्र
हिंग

तेल/तूप

क्रमवार पाककृती: 

-मटणाला हळद आणि मीठ लावून थोडावेळ ठेवून मग धुवून घ्यावे.

-पहिल्या वाटणासाठी दिलेले जिन्नस बारीक वाटून घ्यावेत. मटणाला मीठ, हळद, चमचाभर तिखट आणि पहिले वाटण लावून अर्धा तास मुरत ठेवावे.

mutton1.jpg

- जाड बुडाच्या पातेल्यात तेल किंवा तूप घालून तापल्यावर हिंग, खडा मसाला, तमालपत्र टाकून मग चिरलेला कांदा टाकून परतावे. मटणाचा रंग बदलू लागला की २ वाट्या पाणी घालून झाकण ठेवावे.

- मटण थोडे शिजल्यानंतर दुसरे वाटण घालावे, आवडीनुसार अजून तिखट, प्रमाणात मीठ घालावे. वाटीभर पाणी घालून आणि उकळी आणावी, नंतर मटण पूर्ण शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवावे. मटण पूर्ण शिजवून घेऊन दुसरे वाटण घातले तरी चालते पण घातल्यावर पुन्हा नीट उकळी आणावी. रस्सा अति दाट किंवा पातळ नको. त्याप्रमाणे पाणी वापरावे.

mutton2.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

- ही आमची नेहमीची मटण रश्श्याची रेसिपी आहे.

- फोडणी स्टीलच्या कुकरमध्ये केली आणि दुसरे वाटण घातल्यावर कुकरचे झाकण लावून प्रेशरसह मटण शिजवता येते. मटण चांगल्या प्रतीचे, जून नसेल तर पातेल्यात ३०-४५ मिनिटे लागतील. कुकरमध्ये मोठ्या आचेवर १ शिटी झाल्यावर आच कमी करुन पूर्ण प्रेशर येऊ द्यावे. मग शिटी होऊ न देता गॅस बंद करावा आणि पूर्ण वाफ गेल्यावरच कुकर उघडावा. मटण शिजले की नाही ते एखादा हाडासहित असलेल्या तुकड्यावरुन समजेल. मांस हाडापासून सहज वेगळे झाले, तुकडा मोडता आला की ते शिजले असे समजावे. मटण रुम टेम्प. ला असेल, किमान अर्धा तास तरी मॅरिनेट केले असेल तर लवकर शिजते.

- वाढताना बरोबर कांदा टोंमॅटोची दही घातलेली कोशिंबीर द्यावी.

- यासाठी भात करताना तेलावर खडा गरम मसाला घालून तांदूळ परतून आणि मटण शिजताना काढलेले थोडे पाणी घालून शिजवला तर छान लागतो.

-एका नारळाऐवजी, अर्धा नारळ आणि २ टोमॅटो ब्लांच करुन किंवा नुसते चिरुन फोडणीत घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
आई

मटण बिर्याणी

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
अर्धा किलो बासमती तांदूळ
दीड वाटी तूप
अर्धा किलो कांदे
४-५ दालचिनीच्या काड्या
१ वाटी दही
४-५ वेलच्या
दोन चमचे जीरे
एक चमचा मिरी
१५-२० लसूण पाकळ्या
१ इन्च आले
थोडी कोथिंबीर
७-८ लवंगा
४-५ तमालपत्रे
२ चमचे हळद
१ मोठा चमचा गरम मसाला पावडर
३ चमचे तिखट
मीठ
केशर
थोडे दूध
काजू, बदाम, बेदाणे आवडीनुसार
पाणी

क्रमवार पाककृती: 

- तांदूळ धुवून निथळत ठेवावेत.
- आले, जीरे, लसूण वाटावे आणि ते मोडून घेतलेल्या दह्यात मिसळून दही थोडे घुसळून घ्यावे.
- खड्या गरम मसाल्यापैकी थोडे मिरे, ३-४ लवंगा, थोडी दालचिनी कुटून घ्यावी.
- हे दही, कुटलेला मसाला मटणाला चोळून मटण १ ते दीड तास झाकून ठेवावे. (रात्रभर ठेवले तर चांगलेच.)
- थोड्या दुधात केशर भिजवावे.
- कांदा पातळ कापून घ्यावा, जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तूप तापवून त्यात लाल होईपर्यंत परतावा मग काढून घ्यावा.
- त्याच तुपात लवंग, दालचिनी, तमालपत्रे, वेलची थोडी ठेचून घालावी. कांद्याचा अर्धा भाग घालून परतावे.
- मग त्यात मटण, मिरचीपूड, गरम मसाला घालून मिसळावे आणि सतत परतत रहावे.
- मटण तांबूस रंगाचे होऊन खमंग वास सुटला की मटण जरासे बुडेल इतपत पाणी घालावे, मीठ घालावे व मंद आचेवर ठेवावे.

- निथळून कोरडे झालेले अर्धे तांदूळ मटणाला वाफ आली की मटणावर पसरावेत. संपूर्ण मटण झाकले गेले पाहिजे.
- तांदळावर उरलेला अर्धा कांदा आणि मिरे घालवेत व राहिलेले तांदूळ पसरावेत. (याला केशराचा रंग लावता येतो किंवा २ ऐवजी ३ थर करता येतील. एका भागाला कोथिंबीर वाटून ती हिरव्या रंगासाठी लावता येईल.)
- वरुन दुधात भिजवलेले केशर दुधासह आणि उरलेले तूप घालावे.
- थोडे पाणी घालून शिजू द्यावे.
- वरुन घट्ट बसणारे झाकण लावून कडा कणकेने चिकटवून घ्याव्यात.
- भात पूर्ण शिजला की काढावे. तांदूळ धुवून ठेवल्याने आणि मटणाचे पाणी, थोडे वरुन घातलेले पाणी यामुळे शिजतो. एरवी भात शिजवताना घालतात तेवढे पाणी घालू नये. बिर्याणीबरोबर मटणाचा रस्साही केला जातो तेव्हा रश्श्यासाठी शिजवलेल्या मटणाचा स्टॉक पाण्याऐवजी वापरतात. तांदळाऐवजी अर्धवट, मोकळा शिजलेला भात करुन मग रंग लावून थर देता येतात.
- सगळे मटण भांड्याच्या तळाशी आहे. भांडे पुरेसे जाड नसल्यास तव्यावर ठेवा. किंवा सुरुवातीला थेट आणि नंतर तवा आधी तापवून घेऊन त्यावर मंद आचेवर ठेवता येईल. अंदाजे १ ते दीड तास लागेल. थर दिल्यानंतर भात अर्धवट शिजवून घेतला असेल तर मटण शिजायला ४० मिनिटे पुरे होतील.
- वरुन तळलेला कांदा, कोथिंबीर, तुपात परतलेला सुका मेवा, उकडलेली अंडी लावून सजवावे.
- वाढताना बिर्याणी न हलवता एका बाजूने झारा तळापर्यंत नेऊन बिर्याणी वाढायला काढावी.
- सोबत लिंबू, दही कांदा द्यावा.

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे ६ - ८ जणांसाठी
अधिक टिपा: 

हा प्रकार पहिल्यांदाच करताना व्यवस्थित जमेल असे नाही. पण एकदा केल्यावर अंदाज येतो. खालचे शिजलेले मटण खरपूस आणि बर्‍यापैकी सुके असते, म्हणजे पाण्याचा अंश नसतो, तुपाचा असतो. डोळा मारा

माहितीचा स्रोत: 
आई

पांढरा रस्सा

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ किलो किंवा २-३ पाऊंड - मटण किंवा चिकन (हाडांसहित)
२ मध्यम आकाराचे कांदे
१०-१२ काळे मिरे
७-८ लवंगा
३-४ दालचिनीचे तुकडे (१ इन्च लांबीचे)
३-४ तमालपत्र
१ चमचा उभे कापलेले आले.(julienne cut)

चिकन/मटणाच्या तुकड्यांना लावण्यासाठी वाटण-
२ इन्च लांबीच्या आल्याचा तुकडा
५-६ लसूण पाकळ्या (ऐच्छिक)
२ मोठे चमचे - दही
मीठ

रश्श्याचे वाटण-
१ लहान वाटी - सुके खोबरे
२ मोठे चमचे - खसखस
१ मोठा चमचा - पांढरे तीळ
७-८ वेलच्या
१/२ वाटी - काजू
१ मोठा चमचा - लाल सुक्या मिरच्यांच्या बिया

इतर
मीठ
५-६ कप पाणी
१ मोठा चमचा तेल
१ मोठा चमचा तूप

क्रमवार पाककृती: 

-चिकन किंवा मटणाचे तुकडे धुवून त्याला मीठ आणि वाटलेले आले-लसूण आणि दही लावून किमान अर्धा तास मुरू द्यावे.

-रश्श्याच्या वाटणसाठी सुके खोबरे, तीळ, खसखस थोडे भाजून घेऊन त्यात वेलची, काजू, सुक्या मिरच्यांची बी घालून वाटून घ्यावे. हे वाटण बारीक व्हायला हवे. बाकीचे जिन्नस आधी कमी पाण्यात वाटून मग त्यात काजू घालून पुन्हा वाटले तरी चालेल.

- कांदे उभे पातळ चिरुन घ्यावेत. पातेल्यात तेल, तूप टाकून त्यावर मिरे, लवंगा, दालचिनी, तमालपत्र टाकून मग कांदा आणि उभे कापलेले आले टाकावे व परतून घ्यावे.

- मग मॅरिनेट केलेले चिकन वा मटणाचे तुकडे टाकून नीट सवताळून घ्यावे. त्यात पाणी टाकावे. तुकडे बुडून वर २-३ इन्च पाणी राहिले पाहिजे. मंद आचेवर शिजवावे.

- चिकन्/मटण शिजल्यावर रश्श्याचे वाटण घालून चांगली उकळी आणावी. दाट वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीप्रमाणे मीठ घालावे.

हा रस्सा नुसता प्यायला चांगला लागतो. साध्या भातावरही घेता येतो.

paandhara.jpg

प्रकाशचित्र - अनिलभाई.

वाढणी/प्रमाण: 
६ ते ८ लोकांसाठी
अधिक टिपा: 

- मटण /चिकन कुकरमध्येही शिजवून घेता येते.
- हा रस्सा अति तिखट नसतो. आवडत असल्यास मिरचीच्या बी चे प्रमाण वाढवू शकता, तसेच हिरव्या मिरच्या उभ्या शिरुन टाकता येतात.
- थोडे पाणी आणि थोडा चिकन ब्रॉथही घालता येईल.
-'मराठा दरबार पांढरा रस्सा मसाला' मिळतो. मी वापरुन पाहिलेला नाही.
- याच्या शाकाहारी प्रकारात (बटाटे, फ्लावर, दुधी इ. घालता येते (म्हणे!))

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक कोल्हापुरी

चमचमीत मटण

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२ पाँड बकर्‍याचे मटणाची मध्यम आकाराची फोडं करून(शोल्डर मागायचा व थोडासा लेग मागायचा),

ओले वाटणः
१ मध्यम कांदा कसाही चिरलेला,
१ अक्खी गड्डा लसूणाच्या पाकळ्या सोललेल्या,
३ चमचे आल्याचे तुकडे,
हे किंचीत तेल घेवून छान परतून ब्रॉउन झाले की एकदम बारीक वाटायचे.

खडा मसाला:
४ काळमिरी दाणे(दोनच घ्या कारण नंतर फोडणीत पण येणार बाकीचे दोन),
केसर दोन चिमटी(सगळ्यात शेवटी टाकून गॅस बंद करायचा),
२ दालचीने छोटीच काड्या,(दोनच घ्या कारण नंतर फोडणीत पण येणार बाकीचा एक),
साध्या वेलची दाणे,
१ छोटा चमचे बडीशेप,
१ छोटा चमचा जीरे,
१ छोटा चमचा धणे,
वरील सर्व भाजून बारीक वाटून घ्यायचे. ताजा वाटलेला मसाला एकदम खमंग लागतो. ज्यास्त वेळ नाही लागत वाटले तरी.
त्यात कश्मीरी मिरची पूड मिक्स करायची व तयार ठेवायची.

फोडणी:
१ एकदम लहान चमचा तेल मिश्र तूप्(हवेच तर तूप, तसेही तेल कमी घ्या कारण मटणाचे तेल सुटते नंतर)
१ कांदा लांब पातळ कापलेला,
वरचा खडा मसाला(अर्धाच घ्यायचा),
२ -३ पाने तेजपत्ता,
१ मसाला वेलची,

शोभेला:(हे मात्र मटण शिजत आले की टाकायचे),
आले पातळ लांब काप किसलेले,
१ मूठ धूवून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ बुचका पुदीना बारीक चिरलेला(वास छान येतो ह्याने),
२ मोठे चमचे लिंबू रस,

क्रमवार पाककृती: 

mutton1.jpg

------------------------------------------------------------------------------

मी राईस कूकर ज्याचे भांडे नॉन्स्टीक आहे ते वापरते, तेल कमी लागते. तसेच बघावे लागत नाही.
आधी मटणाला हळद लावून झाली की वाटलेला खडा मसाला लावून मुरवायचे १ तास.

कृती:
१) त्या राईस कूकरमध्ये वरील फोडणीचे सामान टाकायचे त्याच क्रमाने. म्हणजे कांदा परतला की कोरडा मसाला असे.जरासा खमंग वास आला की आता मटण मस्त परतायचे. पाणी अजिबात टाकायचे नाही. मग झाकण ठेवायचे.
२)मग वाटलेले वाटण टाकायचे. राईस कूकरची आच 'कूकींग' वर सेट करायची.
३)१५ एक मिनीटाने मग पुन्हा परतून किंचीत १ मध्यम आकाराचा कप उकळलेले पाणी टाकून ढवळून बंद करायचे. राईस कूकरमधून दिसते जर पाणी कमी होवून आटलेच असेल तर पुन्हा सेटींग मग 'वार्म' वर ठेवावे पण शेवटी शेवटी पाणी टाकून बेचव होइल. मग आधीच सुरुवातीला कपात वाटल्यास पाणी घालावे ज्यास्त. पुन्हा सेटींग 'कूकींग' वर ठेवावे.
४)आत सव्वा तास तरी शांत शिजू द्यायचे. वाटलेच तर मध्ये चेक करावे.
५)शिजत आले वाटले(खमंग वास सुटतो.) की वरचे शोभेचे पदार्थ टाकून वार्म वर सेट करायचे वा आणखी २० मिनीटे ठेवायचे. जवळ जवळ दिड तासात मस्त मटण तयार.

वाढणी/प्रमाण: 
चार लोकांना पुरते
अधिक टिपा: 

१) बरोबर अफगाणी ब्रेड मस्त लागतो.
२)मी तिखट कमी खाते तेव्हा तुम्हाला ज्यास्त तिखट हवेच असेल तर काळमिरी,रोजचे लाल तिखट वगैरे वाढवू शकता. पण खरे तर हे नुसते फ्लेवरफुल बरे वाटते. नाहीतर उगाच ज्यास्त काळमिरी, लाल मसाला टाकून जाळ होतो.
३) रोजचे दही, टोमॅटो का खोबरे नसल्याने बरे वाटते मला.
३)ह्याच पद्ध्तीने चिकन मस्त लागते.
४)अफगाणी लोक तर अश्या मटणा चिकन बरोबर दही खातात.
५) हा खडा मसाला , तेल व लिंबू रस मटणाला लावून वूड ग्रील तरी झकास लागते. चिकनला सुद्धा तोच मसाला मस्त लागतो.

माहितीचा स्रोत: 
हि खरे तर अशीच पद्ध्तीने आई बनवायची मग एका कश्मीरी मैत्रीणीकडून केसर व बडीशेप टाकायला लागली. छान लागते चव.