चिकनचे (कोंबडी) प्रकार

चिकन लहसूण (बिहारी पद्धतीने)

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/२ कि. चिकन, १/२ कि. कांदा, मोहरीचे तेल, ५-६लसणाच्या कुड्या, १ इंच आले, हळद, मीठ,

हिरव्या मिर्च्या २-३, चिकन मसाला, गरम मसाला, २ लसूण सोलून

क्रमवार पाककृती: 

प्रथन चिकन स्वच्छ धुवून घ्या व त्याला १ चमचा हळद आणि थोडे मोहरीचे तेल चोळून घ्या. सर्व कांदा उभा चिरून घ्या. मिरचीचे लहान-लहान तुकडे करून घ्या आणि आले-लसूणाची पेस्ट करून घ्या.

DSCN6274.JPG

आता कढईत तेल गरम करून घ्या व त्या तेलात लसूण तळून घ्या. (हे काम फार काळजीने करावे. लसूण टाकल्यानंतर तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. अस्मादिकांचा एकदा हात भाजल्यापासून मोठया ताटाचा उपयोग ढालीसारखा करतो. स्मित )

DSCN6280.JPG

लसूण काढल्यानंतर तेलात मिरचीचे तुकडे आणि कांदा टाका. ८-१० मिनिटे कांदा परता व त्यातच
चिकन व तळलेला लसूण टाका. कढईला खाली न लागेल अशा बेताने हे मिश्रण परतत राहा.

DSCN6282.JPG

१० मिनिटांनंतर चवीनुसार मीठ घाला. त्यामध्ये आता आले-लसुणाची पेस्ट, चिकन मसाला, गरम मसाला व अर्धा ग्लास पाणी टाका.
जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढे पाणी टाकून १५-२० मिनिटांपर्यंत शिजवत राहा.

DSCN6292.JPG

DSCN6293.JPG

ह्या सगळ्या मिश्रणाचा अर्क लसणात उतरतो आणि लसणाला अफलातून टेस्ट येते.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांना पुरेल
अधिक टिपा: 

१.चिकनचे पीस मध्यम आकाराचेच घ्यावेत अगदी लहान असू नयेत.
२. फार ग्रेव्ही ठेऊ नये. (अंगापुरता रस्सा ठेवा. फिदीफिदी )

माहितीचा स्रोत: 
कंपनीमधील बिहारी मित्र

चिकन कालिमिरी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१/४ किलो चिकन
७-८ लसुणाच्या पाकळ्या
२-३ चमचे कसुरी मेथी
१२-१५ काळीमिरी भरड केलेली (शक्यतो मिरी आयत्यावेळी क्रश करुन घ्या. विकतच्या क्रश्ड मिरी वापरु नका)
२-३ चमचे तेल
जिरं
मीठ

क्रमवार पाककृती: 

१. चिकन व्यवस्थित ४-५ वेळा पाण्याने स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. एका कढईमध्ये तेल घाला.
३. तेल गरम झाल्यावर जीरं घाला, जीरं तडतडलं की त्यात ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या घाला.
४. मग चिकन घालुन हलवुन घ्या. शेवटी चवीप्रमाणे मीठ, काळीमिरी आणि कसुरी मेथी घाला.
झाकण ठेवुन कमी आचेवर चिकन शिजु द्या. अधुन मधुन हलवत रहा.
चिकन शिजलं की गॅस बंद करा.

हा फोटो;

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे २ माणसे
अधिक टिपा: 

१. हा प्रकार कोरडा होतो. पोळीबरोबर मस्त लागतं.
२. चिकन शिजत असतांना कसुरीमेथी, काळीमिरी, आणि लसणाचा एकत्रित असा एकदम मस्त घमघमाट सुटतो घरभर.
३. बोनलेस चिकन इतकं चांगलं लागत नाही ह्या रेसिपीमध्ये. म्हणुन शक्यतो बोन्स सकट चिकन घ्या.
४. चिकन खुप जास्त शिजलं की ते अगदी रबरासारखं लागतं. म्हणुन चिकन शिजलं की लगेचच गॅस बंद करा.
५. आवडीप्रमाणे काळीमिरी, कसुरीमेथी आणि लसणाचं प्रमाण कमी जास्त करु शकता.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई

व्हेरिएशन ऑन अ थीम : आर्रोझ कॉन पोयो आल एस्तिलो इन्दियो

लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

चिकन चे मध्यम तुकडे २ पाउंड
एक मध्यम कांदा बारीक चिरुन
लसूण दोन पाकळ्या बारीक चिरून
आले अर्धा इंच बारीक चिरून
एक मध्यम टॉमेटो बारीक चिरून
हिरव्या मिरच्या १-२ उभ्या चिरुन
कोथिंबीर ४-६ काड्या
पुदिन्याची पाने ४-६
मीठ, हळद, तिखट,
मालवणी मसाला / दगडू तेली मसाला / शानचा बिर्यानी मसाला / गरम मसाला यापैकी एक - २ टेबलस्पून
एक कप भाज्या ( फरसबी, बटाटा, फ्लावर, गाजर, वाटाणे, फुग्या मिरच्या )
दोन वाट्या तांदूळ ( मी बासमति वापरते, पण कुठलाही बारीक , लोंग ग्रेन तांदूळ मस्त लागतो )

क्रमवार पाककृती: 

चिकनच्या तुकड्यांना हळद तिखट मीठ लावून ठेवा.
ओव्हन ४०० डि फॅ ला तापत ठेवा.
एका ओव्हन प्रूफ भांड्यात कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची , भाज्या पसरवा. त्यावर थोडे मीठ शिंपडा. त्यावर चिकनचे तुकडे पसरवा. त्यावर आपल्या आवडीचा मसाला शिंपडा. कोथिंबीर, पुदिना ची पाने हातानेच तोडून शिंपडा. पाहिजे तर थोडा साबूत गरम मसाला ( लवंग दालचिनी वेलची मिरे ) पण घालू शकता.
त्यावर दोन वाट्या धुतलेले तांदूळ पसरवा. त्यावर चार वाटी पाणी अगदी हलक्या हाताने ओता.
वरुन फॉइलने गच्च झाकून ४०० डि व ३५ ते चाळीस मिनिटे बेक करा

वाढणी/प्रमाण: 
३ ते चार.
अधिक टिपा: 

बेक करायच्या अगोदर थोडे लोणी पण घातले तर खमंग स्वाद येतो.
Arroz Con Pollo ही दक्षिण अमेरिकेतल्या बर्‍याच देशातली प्रसिद्ध डिश आहे. तांदूळ अन चिकन वगळता त्यांचे साहित्य अगदी वेगळे असते.
म्हणून ही डिश Arroz Con Pollo इन इंडियन स्टाइल .

माहितीचा स्रोत: 
Arroz Con Pollo च्या रेसिपीवर केलेले प्रयोग.

बटर चिकन ( जुन्या मायबोलीमधील कृती)

लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

१.बोनलेस चिकन १ कि.
२. क्रीम छोटी अर्धी वाटी भरून.
३. गरम मसाला २ टी.स्पू.
४. जिरे पूड, धने पूड प्रत्येकी १ टी.स्पू.
५. कसूरी मेथी १ टे.स्पू.
६. मीठ चवीनुसार.
७. हळद छोटा चमचाभर.
८. कोथिंबीर सजावटीसाठी.

ग्रेव्हीसाठी साहित्य:- १. मध्यम आकाराचे कांदे ५
२. आलं लसूण पेस्ट २ टे.स्पू.
३. टोमॅटो प्युरी १ वाटी भरून.( ह्याने ग्रेव्हीला सुंदर रंग येतो, ह्या ऐवजी ताज्या टोमॅटोची प्युरी करून वापरता येईल.)
४. तूप ३ टे.स्पू.
५. काजू १२- १५
६. खसखस १ टी.स्पू.
७. तिखट चवीनुसार.
८. केशर ८- १० काड्या.
९. काळे मिरे ८- १०.

क्रमवार पाककृती: 

१. बोनलेस चिकनचे तुकडे करून घेऊन त्याला आले लसूण पेस्ट, हळद आणि मीठ लावून २४ तास मॅरिनेट करावे.

२. ग्रील १८०° पर्यंत तापवून त्यात चिकन भाजून घ्यावे. वरून तांबूस रंग आला की ऍल्युमिनियम फ़ॉईल ने झाकून आणखी थोडावेळ भाजावे.

३.काजू गरम पाण्यात भिजवून ठेवावेत आणि केशराच्या काड्या गरम दुधात घालून ठेवाव्यात.

४. पातेल्यात तूप गरम करून खसखस, मिरे भाजून घ्यावे व बाजुला काढून ठेवावे. नंतर आले लसूण पेस्ट घालून चिरलेले कांदे घालून परतावे. कांदे तांबूस व्हायला पाहिजेत.

५. हे मिश्रण थंड झाले की त्यात मिरे, खसखस घालून वाटून घ्यावे.

६. पातेल्यात पुन्हा तूप गरम करून वाटलेले मिश्रण, टोमॅटो प्युरी, तिखट, गरम मसाला घालून उकळावे.

७. काजू वाटून त्याची पेस्ट ग्रेव्हीमध्ये घालावी. केशराच्या काड्या थोड्या चुरडून ग्रेव्हीत घालाव्यात.आवश्यकतेनुसार पाणी घालावे.

८. त्यात भाजलेले चिकन घालून आणखी १० मिनीटे उकळावे.

९. चवीनुसार मीठ घालावे. सर्वात शेवटी क्रीम घालावे आणि कसूरी मेथी चुरडून घालावी. (क्रीम घातल्यावर उकळू नये, त्यामुळे त्यातील तुपाचा अंश वेगळा होतो.)

१०. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि उभा चिरलेला कांदा घालावा.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून आहे :) .
अधिक टिपा: 

१. मूळ कृतीमध्ये लेग पीसेस लिहिले आहेत पण मी नेहमी बोनलेस चिकनच वापरते .

माहितीचा स्रोत: 
सुधा मायदेवांचे लाजवाब सीरीजमधल्या " चिकन " पुस्तकातून साभार आणि स्वतःचे प्रयोग

चिकन मोगलाई

लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

१. चिकन - १ १/२ किलो - तुकडे करून ( पुस्तकातील प्रमाण जसेच्या तसे दिले आहे )
२. ६ हिरव्या मिरच्या
३. २० लसणांच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे
४. १ १/२ टी.स्पू . बारीक चिरलेलं आलं
५. १ टी. स्पू . गरम मसाला
६. १ १/२ कप घुसळलेलं दही
७. १ टी.स्पू. हळद
८. २ टी.स्पू . लाल मिरची पूड
९. १० लवंगा .
१०. १२ काळे मिरे .
११. १ दालचिनीचा तुकडा - अंदाजे १ ईंच
१२. १० हिरव्या वेलचीचे दाणे
१३. १५ सोललेले बदाम
१४. १ टी.स्पू . जिरे
१५. २ टी.स्पू. धने
१६. २ टे.स्पू . तूप
१७. ४ मोठे कांदे - बारीक चिरलेले
१८. २ मोठ्या टोमॅटोचा रस
१९. १ टी.स्पू. साखर
२०. अर्धा कप तेल
२१. पाऊण कप पाणी
२२. १ टी.स्पू . कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून
२३. मीठ चवीनुसार
२४. गार्निशिंगसाठी - बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रमवार पाककृती: 

१. हिरवी मिरची , १० लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा आले ह्याची पेस्ट करावी .

२. गरम मसाला पूड , थोडे मीठ , हळद , दही , लाल मिरची पूड एकत्र कालवून चिकनला लावून १/२ तासभर मुरत ठेवावे .

३. तवा गरम करून त्यावर लवंगा , मिरे , दालचिनी , वेलची , जिरे , धने , बदाम भाजून त्यात उरलेलं आलं आणि लसूण घालून पेस्ट करून घ्यावी .

४. पातेल्यात थोडे तेल तापवून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा .

५. कांदा काढून घेऊन त्यातच चिकनचे तुकडे मॅरिनेशनसकट परतून घेऊन काढून ठेवावेत .

६. त्याच तेलात वाटलेला मसाला परतावा . मग त्यात टोमॅटोचा रस ( मी प्युरी वापरते ) , मीठ घालून ढवळावे . आता परतलेलं चिकन घालून , थोडं पाणी गरम करून , साखर ( होय साखरच ) आणि कॉर्नफ्लोअर घालून शिजवावे .

७. चिकन शिजले की कोथिंबीर घालून सर्व्ह करावे .

८. तंदूरी रोटी किंवा बटर नान बरोबर हे चिकन अफलातून लागते .

DSC_0015_1.jpg

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यांवर अवलंबून आहे :) .
अधिक टिपा: 

१. शाकाहारी लोकांनी ह्यात स्वतःला हव्या त्या भाज्या घालून ही डिश करून बघावी . मी कधीही करून बघितली नाही स्मित .

२. पाककृतीत चिकन फक्त १/२ तास मॅरिनेट करायचे लिहिले असले तरी मी स्वतः कमीतकमी ४ - ५ तास तरी चिकन मॅरिनेट करते .

३. पुस्तकाच्या प्रास्ताविकातच सौ . सुधा मायदेव ह्यांनी साखर वापरल्याने मांसाहारी पदार्थाची चव न बिघडता पदार्थाचा उग्रपणा कमी होतो आणि लज्जत वाढते असे नमूद केले आहे . ते अगदी खरे आहे हे ह्या पद्धतीने चिकन केल्यावर जाणवते . तरीपण कोणाला नको असेल तर साखर घालू नये .

माहितीचा स्रोत: 
सुधा मायदेव ह्यांच्या लाजवाब सीरिज मधल्या " चिकन " ह्या पुस्तकातून साभार

ग्रिल्ड चिकन विथ मार्साला सॉस

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४ बोनलेस स्किनलेस चिकन ब्रेस्ट
५-६ लसूण पाकळ्या
मीरपूड
मीठ
इटालियन सिझनिंग (ओरेगानो, थाईम, पापरीका, ओनिअन पावडर, गार्लिक पावडर यांचे मिश्रण. यात आवडत असल्यास रोझमेरी घालू शकता)
१ कप स्लाईसड मश्रूम्स
२ चमचे मैदा
मीट टेंडरायजर (ऐच्छिक)
२ टे. स्पून बटर
२/३ कप मर्साला वाईन
२ टे. स्पून बाल्सामिक विनेगर (ऐच्छिक)
२/३ कप चिकन स्टॉक

क्रमवार पाककृती: 

१. चिकन आडवं मधून कापून ओपन करून हातोड्यानं मारून पातळ (thin) करूण घ्या.
२. चिकनला दोन्ही बाजूने मीठ, मीरपूड, मीट टेंडरायजर, इटालियन सिझनिंग लावून १५-२० मिनीटे बाजूला ठेवा.
३. मैद्यात मीठ, इटालियन सिझनिंग घालून नीट मिक्स करून घ्या.
३. ग्रिलींग पॅनमधे १ टे. स्पून बटर घ्या
४. चिकन मैद्यात दोन्ही बाजूने घोळवून (जास्तीचे पीठ झटकून घेउन) पॅनमधे टाका.
५. दोन्ही बाजूने ग्रिल करून घ्या. प्रत्येक बाजू साधारण ३ मिनीटे.
६. झालेले चिकन एका प्लेट मधे काढून वरून त्याला नीट फॉईल लावून ठेवा. म्हणजे चिकन ड्राय, गार होणार नाही.
७. त्याच पॅन मधे उरलेले बटर घेऊन त्यात लसूण पाकळ्या ठेचून टाका. थोडं सिझनिंगपण टाका.
८. मश्रूम्स घाला. त्यातच चिकनला लावलेला मैदा एक चमचा टाका.
९. नीट हलवून मश्रूम्स मऊ झाले की मर्साला वाईन घाला.
१०. वाईन थोडी आटली की चिकन स्टॉक घालून एक उकळी येउ द्या.
१२. चव बघून मीठ घाला.
११. बाल्सामिक विनीगर घालून नीट हलवून चिकन परत पॅन मधे घाला. नीट मिक्स करून २-३ मिनीटे शिजू द्या.
लगेच सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
२-३ लोकांसाठी
अधिक टिपा: 

१. आवडत असल्यास वरून बाल्सामिक विनीगर आणि मध यांचे मिश्रण drizzle करू शकता. किंचीत गोडसर चव येते. बरोबर पास्ता, गार्लिक मॅश्ड पोटॅटो, सॅलड द्या. चिकन करताना मार्साला सॉस थोडा जास्त केला तर पास्त्याबरोबरपण घेता येईल.
२. ताजे हर्बज असतील चव अजून खुलते.
३. ग्रिल पॅन नसेल तर साध्या पॅनमधे केले तरी चालेल.

IMG_0083.jpg

तंदुर चिकन

लागणारा वेळ: 
५ तास
लागणारे जिन्नस: 

चिकन लेग पिस गरजे नुसार लागतील तेवढे.

मॅरीनेड करण्या साठी :
घट्ट दही (अंदाजे दोन लेग पिस साठी १ चमचा)
लिंबु रस
आल, लसुण, पुदीना पेस्ट
मिठ
लाल तिखट
गरम मसाला

रंग हवा असल्यास तंदुर कलर किंवा कश्मिरी मिरची पावडर.

तळण्यासाठी
बटर किंवा तेल

सजावटीसाठी
कांद्याच्या रिंग, कोथिंबीर, लिंबाच्या फोडी.

क्रमवार पाककृती: 

चिकन लेग पिस ला दोन्ही बाजुनी सुरीने तिन चार तिरक्या चिरा पाडा. मॅरीनेड करण्याचे साहित्य चिकनला लावा व तिन ते चार तास मुरत ठेवा (फ्रिजमध्ये सकाळी ठेउन संध्याकाळी केले तरी चालेल). मुरल्यावर तेल लावलेल्या काचेच्या ट्रे मध्ये किंवा मायक्रोवेव्ह नॉनस्टीक तव्या मध्ये पिसेस ठेवा. वरुन पातळ केलेले बटर सोडा. ट्रे हाय रॅकवर ठेवा.

कॉम्बीनेशन (मायक्रोवेव्ह पॉवर ५०% + कन्व्हेक्शन २१० डिग्री) वर ८-१० मिनिटे चिकन ब्राउन होईपर्यंत ठेवा. ट्रे बाहेर काढा. सुरीने टोचुन पाहा. शिजलेले असेलच मग पिसेस उलटे करुन दुसर्‍या ट्रे मध्ये ठेवा कारण चिकनचे पाणी ट्रेमध्ये साठलेले असते. जर दुसरा ट्रे नसेल तर ते पाणी काढुन टाका. पिसेस उलटे करुन वरुन परत बटर सोडा. पॅन हाय रॅक वर ठेवा व ६-७ मिनीटे वरुन ब्राउन होईपर्यंत ग्रिल करा. झाली तयार तंदुरी. जर पेशन्स असतील तर आता पिसेस डिश मध्ये काढा. वरुन कोथिंबीर घाला, कांद्याच्या रिंग्ज व लिंबाच्या फोडी बरोबर सर्व्ह करा.

वाढणी/प्रमाण: 
कितिही अपुरेच
अधिक टिपा: 

वरिल रेसिपी मायक्रोवेव्ह मधिल आहे. जर मावे नसेल तुम्ही निखार्‍यावर किंवा तव्यात तेल टाकुन फ्राय करु शकतात.
मॅरीनेड करताना कसुरी मेथिही टाकता येते.

माहितीचा स्रोत: 
पुस्तकी ज्ञान.

फ्राईड चिकन अ‍ॅपेटायझर

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१)चिकन बाईट साईझ तुकडे करून ( ग्रोसरी स्टोअर मधे बरेचदा थिनली स्लाईस्ड चिकन ब्रेस्ट मिळतात ते सोपे पडतात पटकन तुकडे करून घ्यायला.) साधारण १ पाउंड
२)तळणी साठी तेल

मॅरिनेशन साठी
१) आलं,लसूण, मिरची,कोथिंबीर पेस्ट
२)मीठ
३)मीरपूड
४) १ अंडं
५) कॉर्नफ्लोअर
६)शानचा तंदूरी चिकन मसाला १ छोटा चमचा
७)तिखट १ टीस्पून
सॉस साठी
१)टोमॅटो केचप १ टेबलस्पून
२)सोय सॉस १ टीस्पून
३)हॉट सॉस १ टीस्पून
४)बारीक चिरलेले आलं, लसूण, हिरवी मिरची
५)स्प्रिंग ओनियन ४-५
६)कांदा १ छोटा बारीक चिरून
७)भोपळी मिरची बारीक चिरून २ टेबलस्पून
८)चवी प्रमाणे मीठ मीरपूड

क्रमवार पाककृती: 

१) प्रथम चिकन साफ करून त्याचे बाईट साईझ तुकडे करून घ्यावेत.
२) चिकनला मीठ,मिरपूड,(आलं+लसूण्+मिरची+कोथिंबीर) पेस्ट लावून मुरवावं.
३) करायला घेते वेळी ह्या चिकन मधे एक अंडं फेटून घालावं. गरजे प्रमाणे कॉर्नफ्लोअर्,तिखट,शानचा तंदूरी चिकन मसाला घालावा.
४)आता हे तुकडे तेलात तळून घ्यावेत.
५)सर्व तुकडे तळून झाल्यावर एका पातेल्यात थोडे तेल तापवावे.
६)आलं,लसूण,मिरची, पातीचा कांदा, कांदा,भोपळी मिरची असे क्रमा क्रमाने परतावे.
७)त्यात टोमॅटो केचप, सोय सॉस, हॉट सॉस, मीठ,मीरपूड घालावे. सर्वात शेवटी तळलेले चिकन मिक्स करावे.

234 copy.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

चिकन मुरवल्या नंतर लागणारा वेळ साधारण ३० मिनिटे. चिकन मी शक्यतो ओव्हरनाईट मॅरिनेट करते. थंडीच्या दिवसात हे चिकन आणी जोडीला स्वीट कोर्न सूप, हाक्का नूडल्स आणी व्हेज स्टरफ्राय असा मस्त मेनू होतो.

माहितीचा स्रोत: 
आमच्या ईथे "बांबू गार्डन" नावाचं ईंडो चायनीज रेस्टॉरंट आहे. तिथे "चिकन लात माय के" अशा अजब नावाची एक अफलातून डिश मिळते. ती डिश नजरे समोर ठेऊन आणी अर्थातच थोडी मदत अंतरजालाचीही.

लेमन चिकन

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक किलो चिकन, २ मोठ्ठ्या लसणाच्या गड्ड्या, एक मोठ्ठा आल्याचा तुकडा, ४-५ हिरव्या मिरच्या, १ अमुल बटरची वडी, मीठ, मिर्‍याची पुड, एक लिंबु

क्रमवार पाककृती: 

एका कढईमध्ये अमुल बटर तापवून घ्यावे. त्यात ओबडधोबड वाटलेले आलं-लसुण आणि हिरवी मिरची घालून परतावे. लसूण, हिरवी मिरची व आल्याचे वाटण अंदाजे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त असावे आणि त्याची पेस्ट न करता अर्धवट ठेचून बटर मध्ये परतावे. एखाद्या मिनिटानंतर त्यात चिकन चे तुकडे घालावेत. चिकन परतावे. चवीप्रमाणे मीठ अन मिरेपुड घालावी. परतत राहवे. २-३ मिनिटांनी त्यावर लिंबु पिळावे. चिकन शिजेपर्यंत मधून अधून परतत रहावे
चिकनचे तुकडे छोटे असावेत . याप्रकारामध्ये बोनलेस चिकन पन वापरले तर चालू शकेल.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर अवलंबून. परवाच साडेतिन किलो चिकन १० जणांनी संपवलं, जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणून. :)
अधिक टिपा: 

हे चिकन गरम गरम खायला छान लागते. थंड झाल्यावर बटर आळल्यामूळे चव चांगली लागत नाही.
चिकन संपल्यावरही खाली भरपुर बटर अन थोडा आलं लसणाचा मसाला उरतो. त्यात केलेला भात अप्रतिम लागतो. स्मित
मी आज चिकन ऐवजी बटण मश्रुम वापरुन भाजी केली होती. मस्त लागली.

माहितीचा स्रोत: 
दीर अन जाऊबाई

चिकन करी

लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चिकन - पाव किलो, बोन्ससकट आणि हलाल मिट असेल तर उत्तम.
कांदा - ३ मध्यम आकाराचे, बारीक चिरुन.
लसणाच्या पाकळ्या - ८-१०.
आलं - १/२ इंच.
सुकं खोबरं - ३ मोठे चमचे.
प्रत्येकी २/३ लवंगा, काळी मिरी
१/२ इंच दालचिनीचा तुकडा.
गरम मसाला - २ चमचे.
लाल तिखट - २ चमचे.
काजुची पेस्ट - २ चमचे.
जीरे, तेल, हळद, मीठ - अंदाजाने लागेल तसं.
कोथिंबीर - आवडीनुसार.

ऐच्छिक जिन्नस:
टोमॅटो - १ लहान, अगदी बारीक चिरुन.

क्रमवार पाककृती: 

वाटण :-
१. पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या.
२. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा.
३. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन कलरचं होई पर्यंत परतुन घ्या.
४. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन खुप बारीक वाटण करुन घ्या.

मुख्य कृती :-
१. चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं.
२. कुकरमध्ये २ चमचे तेल टाकुन ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या खुप बारीक चिरुन घालाव्यात.
३. लसुण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं.
४. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं.
५. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं.
६. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते मिनिट्भर परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.
७. कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होवु द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल.
८. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला.
९. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या.
१०. ह्यात कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला.
११. चवी प्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.
१२. उकळी आल्यावर अजुन १०-१२ मिनिटं मंद आचेवर उकळु घ्या.

मी केलेल्या करीचा फोटो.
Chicken.JPG

वाढणी/प्रमाण: 
अंदाजे २-३ लोकांसाठी होईल.
अधिक टिपा: 

१. माझ्या कुकरमध्ये जनरली ३ शिट्ट्यांमध्ये चिकन शिजतं.
२. चिकनचं सुप खुप टेस्टी होतं, लहान मुलांना द्यायला खुप चांगलं.
३. तिखट आणि गरम मसाल्याचं प्रमाण आवडीप्रमाणे बदलु शकता. मी शक्यतो कमी तिखट आणि कमी मसालेदार करते.

माहितीचा स्रोत: 
आई