लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा !
एकेक श्वास घेणे देखील नकोसे झाले होते, शरीरातील ताकद पूर्ण नाहीशी झाली होती. अजून डोल्मा पास (उंची ५६००+ मिटर्स डोल्मा हे तारा देवीचे तिबेटी नाव आहे.) यायला निदान एक किमी तरी होते. साधारण मी ५२०० मिटर्स उंची वर असेन अजून ४०० मिटर्स वर चढायचे होते ! माझे पाय पूर्ण लाकडासारखे झाले होते. एकेक पाऊल उचलायला त्रास होत होता. पण मन मात्र थांबू देत नव्हते. अजून एक किमी झाले की पुढे उतारच लागेल, चल गड्या आता चाल एक किमी, फक्त एक किमी मग उतार लागेल असे मन वारंवार सांगत होते. थांबू नकोस, चालत राहा !