लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७

Submitted by केदार on 26 September, 2014 - 06:39

कैलास परिक्रमा

९ जुलै - दार्चन ते देरापूक ७ बस + १२ किमी ट्रेक
१० जुलै - देरापूक ते झुंझूइपू १९ किमी ट्रेक
११ जुलै - झुंझूइपू ते परत दार्चन - ५ ट्रेक + ५ बस. ( आणि नंतर सामान घेऊन कुगू कडे रवाना )

आजच्या दिवशी कैलास परिक्रमेला सुरूवात होणार होती. आम्हा सर्वांना ज्याचे त्याचे पोर्टर पोनी मिळणार होते. पोनी पोर्टर लोकं १० वाजायच्या आसपास येतात, त्यामुळे इथे आधी येऊन फायदा नव्हता. म्हणून बर्‍यापैकी उशीरा निघालो. आम्ही सगळे तिथे आलेल्या एका व्हॉल्वो मध्ये बसून परिक्रमेची सुरूवात जिथे होते त्या ठिकाणी पोचलो. ते ठिकाण दार्चन पासून फारतर ५ किमी होते. त्या ठिकाणाचे नाव यमद्वार ! प्रत्येकाचे पोनी पोर्टर अलॉट झाले आणि आम्ही परिक्रमेसाठी निघालो.

कैलासाविषयी थोडे.

कैलास पर्वत हा संबंध एकच दगड आहे. मोनोलिथिक ! २२००० + फूट उंचीचा एकच सलग पर्वत हे देखील एक आश्चर्यच ! कैलास पर्वताला माणणारे चार धर्म ह्या जगात अस्तित्वात आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि तिबेटी बॉन रिलिजन.

हिंदू धर्माप्रमाणे कैलास पर्वत हा Axis Mundi आहे. शंकराची राहण्याची जागा, पृथ्वीचा मेरू दंड, स्वर्ग आणि पृथ्वी ह्या दोघांना जोडणारी जागा. ह्या पर्वताला काही जण तो मेरू पर्वत आहे असेही म्हणतात.

जैन धर्माप्रमाणे पहिले तीर्थंकर ऋषभांचे इथेच महानिर्वाण झाले. अष्टपाद ह्या ठिकाणी ( हे कैलास पासून खूपच जवळ आहे, आणि इनर कोरा मध्ये मोडते) जैन मंदीर देखील आहे. इथे आम्हाला जाता आले नाही कारण चीन सरकारने त्या रूटवर जायला मनाई केली. जैन धर्माप्र्माणे देखील हाच पर्वत मेरू पर्वत.

बौद्ध धर्माप्रमाणे कैलासाला गौतम बुद्धाने पण भेट दिली आहे. आम्ही दार्चनला हॉटेल मध्ये उतरल्यावर त्यांनी एक पुस्तक भेट म्हणून दिले होते. तितक्या गडबडीत मी ते पुस्तक बर्‍यापैकी वाचून काढले होते. त्यात मलरिबा आणि बॉन चुंग मध्ये कैलासवर जाण्याची चढाओढ लागते ( हे दोघे बौद्ध व बॉन रिलीजन चे माँक / सेनापती होते)
तर बौद्ध मताप्रमाणे तेथील लोकल धर्म बॉन धर्माचा सेनापती नारो बॉन चुंग आणि बौद्ध सेनापती / लामा मलारिबा ह्यांच्यात तेंव्हा तुंबळ युद्ध झाले आणि बौद्ध धर्माचा जय झाला. आणि तेंव्हापासून बौद्ध धर्म तिबेट मध्ये बॉन पेक्षा महत्त्वाचा मानला जाऊ लागला व त्याला फॉलोअर्स मिळाले.

भगवान बुद्ध ५ व्या शतकात कैलासला भेट देऊन गेले असे बौद्ध धर्मात मानले जाते. (अर्थात ते तेंव्हा नव्हते) आणि बौद्ध धर्म तिबेट मध्ये साधारण ६ व्या शतकानंतर आला. पण वरील युद्धानंतर (१२ वे शतक) बौद्ध धर्मच जास्त रुजला.

बॉन धर्माबद्दल वर लिहिलेच आहे. बॉन धर्म पाळणारे लोकं कैलासाची उलटी परिक्रमा करतात.

तर असा हा कैलास पर्वत. जगातल्या चार धर्माचे आकर्षण आहे.

खालील फोटो बघा. त्यात एक गंमत दिसेल.

Mt.Kailash.JPG

आपण हिंदू धर्मात कैलासाला लिंग रूपात पुजतो आणि ते स्त्री पुरूष समागमाचे प्रतिक आहे असे मानतो. पण वरील फोटो पाहिल्यावर मला मात्र वेगळे वाटले. तुम्हाला जाणवले का? की एरिअल चित्राप्र्माणे खुद्द कैलास पर्वत हा शिवलिंगासहीत आहे. नीट लक्ष द्या, तुम्हाला कैलास आणि लिंग एकत्र दिसते. म्हणजेच आपल्यापैकी काही लोकांना कैलास पर्वत (लिंगासहीत) माहिती होता. आणि त्यामुळेच आपण लिंग स्वरूपात पूजा करतो असे माझे मत झाले आहे. ते लिंग आणि आज कोणालाही गुगल अर्थ वरून दिसणारा पर्वत हा योगायोग आहे ह्यावर माझा विश्वास नाही.

प्लिज नोट : हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे विमान होते आणि त्यातून बघून त्यांनी लिंग काढले असे लिहित नाही तर ही माहिती हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना होती असे लिहितोय. अन्यथा हा योगायोग केवळ दुर्मीळच नाही का?

कैलास परिक्रमा मार्ग !

parikrama_map.jpg

कोरा म्हणजे परिक्रमा. त्याचे दोन प्रकार आऊटर कोरा आणि इनर कोरा आम्ही आऊटर कोरा केली. इनर कोरा खूप अवघड आहे. आणि चिनी सरकार इनरसाठी भारतीय MEA ला परवानगी देत नाही.

तिबेटी बौद्ध धर्मशात्राप्रमाणे ज्यानी १२ आउटर कोरा केले आहेत तेच फक्त इनर कोराला पात्र होतात. १२ परिक्र्मांमध्ये कैलास तुमची परीक्षा घेतो आणि मग इनर कोराला तुम्हाला पात्र ठरवतो असे तिथे अनेकांनी सांगीतलं. पण वेट! जी लोकं महाकुंभाच्या वेळी एक आउटर कोरा करतात, त्यांची एक परिक्रमा म्हणजेच १२ आणि ते इनर कोराला पात्र होतात. आणि २०१४ साली तिबेटीयन महाकुंभ होता. आणि आम्ही त्यावेळीच परिक्रमा केली ! त्यामुळे इनर कोराला आम्ही तिबेटी बौद्ध धर्म शास्त्राप्रमाणे पात्र झालो आहोत !!

तर कमिंग बॅक टू टॉपिक - आम्ही यमद्वार म्हणजेच तारपोचेला ट्रेक सुरूवात करून ४९०९ मिटर्सवरील देरापुक ह्या गावापर्यंत आज जाणार होतो हे अंतर साधारण १२ किमी आहे. दुसरे दिवशी मग डोल्मा करून झुंझूंइपू ह्या गावी राहणार आणि मग तिथून दार्चन.

यात्रेची सुरूवात यमद्वारा पासून होते.

ते मंदीर म्हणजेच यमद्वार. तिथून प्रवेश करून मग परिक्रमा सुरू करायची. यमद्वार आणि कैलास !

हर हर महादेव !

हिंदू असो की बौद्ध आणि भारतीय असा की चीनी, तिबेटी, जॅपनीज. तिथे सर्व लोकं दिसतात. कारण चारही धर्मात कैलासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि का नसावे? माणसाला जीवन देणारे पाणी. कैलासवरून चार मोठ्या नद्या उगम पावतात. सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज आणि कर्णाली.

परिक्रमा मार्ग !

ह्या ज्या इतक्या पताका दिसत आहेत, त्या महाकुंभ असल्यामुळेच !

वरील फोटोत अगदी डावीकडे (लोअर पार्ट) जे दोन पर्वत दिसत आहेत त्यापैकी एक नंदी पर्वत! हा पर्वत देखील नंदीसारखाच आहे !

परिक्रमा करताना कैलासाच्या आजूबाजूच्या पर्वतातून काहींना प्राणी दिसतात. बहुतेकांना एका हत्तीची प्रतिमा दिसतेच.

वरच्या ह्या फोटोत नंदी पर्वत व्यवस्थित दिसेल.

माझ्यासमोर चालणारी ट्रेकर !

नंदीपर्वत खूप वेळ दिसतो, त्या बाजूनचे जायचे असते, पण तो येत नाही. आल्यावर परत तिथून कैलासचे दर्शन होते. पण ढगांमुळे तो तेवढा नीट दिसला नाही.

हा पूर्ण रस्ता तसा फ्लॅट आहे. पण जोरदार उन्हामुळे त्रास होतो. मजल दरमजल करत आम्ही कॅम्पवर आलो.

आम्ही सर्व जेंव्हा कॅम्प वर आलो तेंव्हा खूप थकलो होतो. दिनेश बन्सल आणि भीम माझ्यासोबत होते, पराग घोडे अ‍ॅलॉटमेंट मुळे मागे थांबला होतो. थकल्यामुळे त्या दोघांनीही चरण स्पर्श कॅन्सल असे घोषीत केले. श्याम आधीच आला होता, तो त्या पाठी पर्यंत गेला. तेथे चीनी पोलिस होते, त्यांनी श्यामला परत पाठवले. श्याम देखील म्हणाला की तिथे जाता येणार नाही.

मी देखील खूप थकलो होतो पण कैलास दर्शनाने शक्ती परत संचारली आणि परत एकदा ट्राय करण्यासाठी श्याम, बन्सल मी आणि भीम निघालो.

आम्ही एक पहाड चढलो आणि तेथून दिसणारे दृष्य मंत्रमुग्ध करणारे होते.

एक्स्ट्रा वाईड अँगल

हे जे दोन पर्वत दिसत आहेत, त्यापैकी एक अवलोकितेश्वर आणि दुसरा वज्रपाणी ! हे दोघे आणि मंजूश्री असा तिसरा पर्वत म्हणजे बौद्ध धर्मातील तीन बोधिसत्व ! हे तीन पर्वत कैलासाचे रक्षण करतात अशी बौद्ध धर्मात समजूत आहे.

हिंदू धर्मीय परिक्र्मा करताना ॐ नमः शिवाय ! असे म्हणतात तर बौद्ध धर्मीय ॐ मणिपद्मे हूं,असा जप करतात. ह्यातील मनी म्हणजे "कौस्तुभ मनी" तला मनी आणि पद्म म्हणजे कमळ!

खालील चित्रात दोन माणसं दिसत आहेत. कैलास - स्केल टू ह्युमन बॉडी.

वरील चित्रात एक छोटी निळी पाटी दिसतेय. त्या पुढे जायला चीन सरकारने मनाई केली आहे. तो बोर्ड वॉर्निंगचा आहे.

बट सॉरी चीन, यू गॉट व्हायोलेटर.

चरण स्पर्शाकडे जाताना - चरणस्पर्श म्हणजे एक मोठी स्नो वॉल आहे. ती कैलासाला टच करते असे म्हणले जाते. तिला हात लावला की चरणस्पर्श !

ते जे छोटे ग्लेशियर दिसतेय, ते खरेतर खूप मोठे होते. आम्ही चढत चढत निघालो. सुरूवात मी केली, माझ्यामागे आमचा कंपू आणि पार्वते व आणखी दोघे निघाले.

दगडातून चालत आम्ही वर जात होतो.

त्या ठिपक्यातल्या ग्लेशियर पाशी आम्ही सर्व एकत्र पोचलो.

इथपर्यंत आल्यावर बन्सलजींना खूप त्रास व्हायला लागला. ते चालू शकत नव्हते. श्याम आणि भीम माझ्या समोर २० एक फूट होते. त्यांना मी हाक मारली, श्याम त्याच्या स्वभावानुसार, " अबे केदार, तू पिछे कैसे बे, आजा इधर, मजा आ रहा है" असे न वळताच म्हणाला.

पण बन्सलजी मला यार, प्लिज बैठ यार, मुझे अब खडा रहा नही जा रहा है, अशी विनवणी करू लागले, मला समोर जायचे होते, पण बन्सलजींना पण त्रास होत होता म्हणून एक मन थांब असेही म्हणू लागले.

मी ते ग्लेशियर पार करून पुढे गेलो.

पुढे निघालो तर कैलास अजून लांब गेला. Happy

बन्सलजी परत हाका मारू लागले. भीम आणि श्याम मग पुढे गेले आणि मी परत त्यांच्यापाशी येऊन थांबण्याचा निर्णय घेतला. तिथे बन्सलजींना धाप लागली होती. हा अल्टिट्युड कॅम्प पेक्षा निदान १- १२०० फुट उंचीवर होता त्यामुळे ऑक्सिजनचा त्रास कदाचित बन्सलजींना झाला असावा. ते खाली आल्यावर ढाराढूर झोपी गेले ते एकदम २ अडीच तास मृतप्रायच होते. आमच्या ग्रूप पैकी श्याम आणि भीम मात्र तिथे त्या स्नो वॉल पर्यंत जाऊन आले. मी मात्र पाव / अर्धा किमी अलिकडेच परत ग्लेशियर पाशी, जिथे बन्सल बसले होते तिथे येऊन बसलो.

दुसरे दिवशी सकाळी आजचा आणि ट्रीप मधील शेवटचा अवघड टप्पा होता. डोल्मा ला. ला म्हणजे पास. काही जण म्हणाले की आपण गोल्डन कैलास पाहून निघू. (सकाळी उन्ह आल्यावर तो गोल्डन दिसतो) पण नेमके त्या दिवशी ढगाळ वातावरण होते.

थांबून काही फायदा नसल्यामुळे आम्ही पुढे निघालो. डोल्माबद्दल् खूप ऐकले होते. डोल्मा पास हा ५६३६ फुट ( १८५०० फुटांवर आहे). सरळ उंच खडी चढाई असल्यामुळे चढायला प्रचंड त्रास होतो. माझ्या पहिल्या भागात मी डोल्मा बद्दल लिहिले आहे. त्यामुळे इथे ते लिहिणे स्किप करून फोटो देतो.

चढताना दिसलेले गोल्डन पिक्स

आणि हा गोल्डन होणारा कैलास.

पण तो पाहू शकलो नाही !

आजचा रस्ता ! डोल्माची चढाई ही संपूर्ण उभी आणि खडकाळ आहे. भल्या भल्यांची वाट लागते.

चढताना माझा संपूर्ण शक्तीपात झाला, तेंव्हा मला दुरवर एक शिखर दिसू लागले. आणि तो होता कैलास ! त्यामुळे इन्स्टंट पावर मिळाली आणि मी पुढे निघालो.

अन्य काही शिखर

खालून लोकं चढत होती.

खडकाळ वाट !

हे जे कोपर्‍यातले म्हातारे गृहस्थ दिसत आहेत त्यांच्याबद्दलच मी भाग एक मध्ये लिहिले. ते जर चढत आहेत तर मी चढायलाच हवे ! हर हर महादेव !

अ‍ॅन्ड दीस इज इट ! टॉप ऑफ द वल्ड !

महाकुंभामुळे तिथे गर्दी होती.

जय तारा देवी. (डोल्मा म्हणजे तारा)

तिथे फार तर १० मिनिटे मी आणि भीम बसलो आणि खाली उतरायला सुरू केली. पहिल्या १०० मिटर नंतरच गौरी कुंड दिसते.

गौरी कुंडाचे पाणी एमराल्ड ग्रीन दिसते. निळे नाही. इथे गौरी येऊन स्थान करत असे असे म्हणले जाते. हे देखील मानसरओवरासारखेच पवित्र पाणी. मग काय? सगळ्यांनी इथले पाणी घेतले. गौरीकुंडात उतरणे खूप त्रासदायक आहे. १२०० फुट ऊभा उतार, मग मी माझ्या पोर्टरला ४० RMB दिले आणि तिलाच भीम आणि माझ्यासाठी पाणी आणायला सांगीतलं. श्याम मात्र उतरला होता !

तीन किमीची उभी उतरण आम्ही अनेकदा घसरून पार पाडली आणि खाली आलो. तिथे भीमाला उलटी झाली. ( हे वर्णन मी भाग १ मध्ये (टीजर) लिहिले आहे).

आता पायी १२ किमी चालायचे होते.

तिबेटी यात्रींचा जत्था ! त्या गाणं देखील म्हणत होत्या. साधारण तीन एक किमी आम्ही सोबत होतो.

दिनेश, भीम आणि मी इतके थकलो होतो की बोलताही येत नव्हते. एके ठिकाणी पाणी मिळाले. ते प्याल्यावर हुशारी आली आणि आम्ही कॅम्प गाठला. कॅम्पवर पोचल्यावर भीम आणि दिनेश फ्लॅट झाले.

रानडे म्हणाले चल नदीवर जाऊ. मग रानडे, पराग, श्याम अन मी नदीवर पोचलो. तितक्या थंडगार पाण्यात आम्ही अंघोळ उरकली. पाण्यात पाय ठेवून बसल्यामुळे पाय गारठले, पण तरतरी आली.

संध्याकाळी कधीतरी सर्व पोचले. आम्ही तो पर्यंत आमचा पोस्ट ट्रेक रेग्युलर कार्यक्रम म्हणजे गप्पा मारत होतो.

उद्या केवळ पाच किमी चालायचे होते आणि नंतर मग बस मध्ये बसून दार्चन अन तिथून कुगू. मानसरोवर ! त्यामुळे उद्याचा कारभार सोपा होता.

कैलास परिक्रमा ऑलमोस्ट संपल्यामुळे (केवळ ५ किमी बाकी) तसे सुनेसुने वाटायला सुरूवात झाली आणि घरची आठवणही येऊ लागली !

लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७
लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार खूप सुन्दर माहिती. पराग आणी तुम्ही खरच अवघड टप्पा गाठलात

. गम्मत सान्गायची तर आम्हाला इन्ग्लिश शिकवणार्‍या ख्रिश्चन टिचर होत्या. त्याच एकदा एकदा वर्गात सान्गत होत्या की शिवलिन्ग हे स्त्रीपुरुषाचे प्रतीक आहे. बरेच जण अवाक! त्याना खूप माहिती होती. आणी आमच्या वर्गात त्या वेळी २५ मुला-मुलीन्मध्ये २ ख्रिश्चन सोडुन बाकी सारे विद्यार्थी-विद्यार्थिनी हिन्दु आणी मुस्लिम.

फार नयन रम्य दिसतेय सर्व.

इथे गौरी येऊन स्थान करत असे असे म्हणले जाते.
==> तुम्हांला इथे गौरी येऊन स्नान करत असे असे म्हणले जाते.

असे अपेक्षित आहे का?

सुंदर प्रचि आणि सुंदर वर्णन. डोल्मा चॅलेंजिंग दिस तोय

पण मला ते शिखर म्हणजे शिवलिंग वगैरे काही दिसले नाही! डोंगरासारखा डोंगर वाटला >>

मै केवळ ते शिखर नको पाहू. त्या शिखराची पिंड आहे आणि त्या खालचा तो खोलगट भाग पाहिला तर ते शिवलिंग वाटते. की मलाच तसे दिसतेय / भास होतोय? मे बी अजून नीट गुगल अर्थचे पिक्चर देता आले असते

गौरी येऊन स्नान करत असे असे म्हणले जाते. >> हो स्नानच अपेक्षित आहे. ती लिहितानाची चूक आहे.

सर्वांना धन्यवाद. Happy

मस्त मस्त .. आता नविन नविन विशेषणं सुचत नाहीत .. अतीव गुढ आणि सुंदर .. Happy

डोल्मा पास सगळ्यात कठिण टप्पा दिसतोय .. आईला विचारते तिचा अनुभव काय ते .. तीने पुर्वी सगळं वर्णन केलं होतं पण आता तुमचे सगळे भाग वाचून जसा संदर्भ लागतोय तसा तेव्हा लागला नाही .. त्याबद्दल स्पेशल धन्यवाद! Happy

>> मग मी माझ्या पोर्टरला ४० RMB दिले आणि तिलाच भीम आणि माझ्यासाठी पाणी आणायला सांगीतलं

तुझा पोर्टर होता की तुझी पोर्टर? Happy मुद्दाम खात्री करून घेतेय कारण चक्क तू गेला नाहीस पण "ती"ने पाणी आणून दिलं तर ही "ती" एकदम जोरदार हां .. Happy

केदार
खुप सुंदर चालु आहे मालिका. संपुर्ण झाल्यावर वाचणार होते पण रहवले नाही.
फोटो अप्रतिम आणि वर्णन देखिल क्रमवार.
आता तु KK झालास त्याबद्दल अभिनंदन!
केशव कलसी नाही कैलासी केदार!

>>>
तिथे भीमाला उलटी झाली. ( हे वर्णन मी भाग १ मध्ये (टीजर) लिहिले आहे).
>>
ते पुर्ण टीजर पण छान होते! प्रथम मला वाटले इतक्या मोठ्या प्रवासाचा एवढाच लेख की काय!

आई ग्गं! कसली अफाट आहे ही वाट !!

अनवट वाटा धुंडाळून अत्यंत अवघड असे भूप्रदेश पादाक्रांत करण्याची मानवाची इच्छा ... त्याला काय म्हणावं!

ही वाट, हा रूट ज्यानं प्रथम घेतला, तो कोण असेल? तेव्हा त्याला, त्याच्या सोबत असलेल्या इतरांना (असलेच तर) काय वाटलं असेल? - असे काहीबाही विचार मनात आले.

फारच जगावेगळी अनुभूती असणार ही!

मनापासून सर्वांना परत धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या दर भागात प्रतिक्रिया वाचल्यावर मला लिहायला स्फुरन मिळतंय.

सशल, हो "तीच" हा तीचा फोटो. (बाजूला माझी बॅग) तिचा मुलगा देखील सोबत होता. आणि नवरा देखील कुणाचा तरी पोर्टर होता.

डोल्मा चढताना ती सोबत होती. दोनदा तीने मला हातही दिला. आणि एक दोनदा बसतोस का असे तिबेटी भाषेत विचारले. ती देहबोली तिथे कळाली. एकदा डोल्मा उतरताना मी घसरणार, तितक्यात परत दंडाला धरले. डोल्मा उतरणे, चढण्यापेक्षा जास्त भयानक आहे. तिकडून जे चढून येतात, त्यांना तो चढ सोपा आहे पण भुसभुशीत मातीत उतरणे म्हणजे डेंजरच.

भीमाने अन मी एकदा विचार केला की जाऊ. पण जाणे सोपे होते, परत तेवढे १००० फुट वर चढून येऊन परत येणे अन डोल्मा ही उतरायचा होता. मग आम्ही कॅन्सल केले. आणि कॅन्सल केले ते बरे झाले. नाही तर भीमाला खूप त्रास झाला असता. तसेही उतरल्यावर तो मॅगी खाईपर्यंत मरगळलेला होता. तिथून लवकर उतरल्यामुळे AMS कमी झाला. लवकर लोअर अल्टिट्युडला उतरणे हाच तिथे उपाय असतो.

फारच जगावेगळी अनुभूती असणार ही!
>>

खरंय !

पण जर दुसर्‍यांदा गेलो तर मात्र मी तिकडेही उतरेन. आज विचार केल्यावर उतरता आले असते असे वाटते, पण तेंव्हा वाट लागली होती हे ही खरेच.

हाही भाग आणि फोटो अप्रतिम.
गौरीकुंड मस्तच. काही काही फोटो पाहताना काझा-मनालीचा (स्पिती) चंद्रा नदीच्या बाजुने जाणारा प्रवास आठवतोय. Happy

(फक्त ते जरा फोटोची बॉर्डर कमी कर ना. आधीच्या भागात कुणीतर सांगितल होतं बहुतेक)

Pages