माझ्या कविता

तुझं नसणं

Submitted by namra on 5 August, 2020 - 07:44

तुझ्या असण्याने ही जर पोकळी भरली नाही,
तर आता तुझ्या नसण्याने ही फरक पडत नाही.

पाहिलेल स्वप्न मी माझं आपलंसं कोणीतरी असावं,
पण आता कुणाच्या नसल्यानं मनंही हळहळत नाही.

प्रेम तर खूप केलं जिवापाड तुझ्यावर,
पण कुठं चुकलं तेच कळत नाही.

नकळत संपत गेला जिव्हाळा,
ते प्रेम आता कुठेच नजरेत भरत नाही.

तुझं येणं म्हणजेही एक अनोळखी भिती दाटते,
आता माझं मनही तुला ओळख दाखवत नाही.

खुश आहेस माझ्याशिवाय तूझे डोळे बोलून जातात,
पण आता मी जगावं की मरावं तेच कळत नाही.

शब्दखुणा: 

* माणूस *

Submitted by स्वप्न वेडी on 16 April, 2014 - 12:28

* माणूस *
जगण्याचं दळण हे माणूस कसा दळतो आहे
भविष्याची चिंता करीत वर्तमानाला जाळतो आहे ..

माझं माझं करीत स्वप्नांना छळतो आहे
स्वार्थाचा पोशिंदा परमार्थाला टाळतो आहे ..

वेळचे भान सावरीत घड्याळापरी पळतो आहे
भावनांची लक्तरे होऊन चिपाडा सारखा वाळतो आहे ..

नात्यांच्या सैल बंधात नाईलाजाने रुळतो आहे
वाट जुनीच नव्याने असा कसा वळतो आहे ..

घर नावाच्या भिंतीत उगाच तो फुलतो आहे
दगड विटांच्या फुलांना स्वप्नात माळतो आहे ..

हिशोब हिरव्या कागदांचा फक्त सगळ्यांना कळतो आहे
माय -बाप गेले भुकेने तरी जीव कुठे कळवळतो आहे ?

सटवाईचा हिशोब जीवघेणा मग सहजच जुळतो आहे

शब्दखुणा: 

रात्र काळीभोर

Submitted by स्वप्न वेडी on 16 April, 2014 - 12:22

रात्र काळीभोर तुझ्या डोळ्यात साठलेली ,
आणि वर पापण्यांची दारे, तू अगदी घट्ट मिटलेली....

अलगद उघड म्हंटल तू पापण्याची झालर तर ,
त्यावर तुझ्या नजरेची मशाल पेटलेली ....

सोबतीस असावी म्हणून मी रात्र थांबवलेली ,
तर तुझ्या ओठांवर अबोलीची लाली थाटलेली .....

वारयाची झुळक पण तुझ्या सुगंधात न्हाता ,
खट्याळपने,केसांची बट तू हवेवर लोटलेली ....

मी दूर जाता तू नकळत मला खेटलेली,
आणि अशा कित्येक आठवणीत मी “जिंदगी” काटलेली ....!
अलका डी भोसले (स्वपन वेडी )

शब्दखुणा: 

कलंदर

Submitted by समीर चव्हाण on 8 April, 2013 - 08:17

नंगे फकीर आहोत अम्ही, नंगे फकीर

मसणवटीचा आलो भाळी टिळा लावुनी
असा एक गुंता नाही मन ज्यात गुंतले
आग लावली जिंदगीस किड्यामुंग्यांच्या
अवदसेस टाकावे तैसे तिला टाकले

व्याप-ताप, मद-मोहपाश तोडून निघालो
अज्ञाताच्या गावामधुनी प्रवास अमुचा
असेल अमुच्याहुनी कलंदर कुणी खिवैय्या
नाव शोधण्याचा त्याची हा प्रयास अमुचा

नंगे फकीर आहोत अम्ही, नंगे फकीर

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

आनंद

Submitted by समीर चव्हाण on 2 April, 2013 - 07:23

संशयाचं भूत वसकन अंगावर येताना,
चार चिमुकले जीव भेदरून जाताना
पाहिलयं मी.
तशी जुनीच आठवण
काल-परवासारखी डोळ्यांपुढे तरळताना,
पाहतोय मी
संशयाचं भूत वसकन अंगावर येताना...

आम्ही मोठे झालो, नावारुपाला आलो
आतातरी बोलशील, सगळी भडास काढशील
ह्या आशेवर कधी विचारलं नाही
किंबहुना आम्हाला बोलवलं नाही.
तू बोलली नाहीस, आम्हाला बोलवलं नाही,
तू पिरगळली गेलीस, मोडली नाहीस
आम्ही भेदरत गेलो, गुरगुरलो नाही.
जास्तीतजास्त काळीज पिळवटुन रडलो असेल
दोनेक मिनिटं
तुलासुध्दा बरं वाटलं असेल
दोनेक मिनिटंच.

आता परिस्थिती सुधरलीय,
आणि त्याचं डोकंही.
मात्र कधीकधी पाहतो त्या भूताच्या नजरा

शब्दखुणा: 

ड्रामा

Submitted by समीर चव्हाण on 29 March, 2013 - 05:37

ह्या भूमिकांतून वावरण्याचा खरोखरच वीट आलाय
कधी मन रिझविणा-या विदुषकाच्या भूमिकेत
तर कधी बिनबुडाच्या बघ्याच्या
खपलंच तर विवेकाच्या आसनावर बसून सर्वज्ञाच्या
नाही तर कामाचा आळस सिग्रेटून कामचुकाराच्या

आयुष्य एक मोठा ड्रामा
आपण अवतरलो धक्का मिळालेल्या बहुरुप्याप्रमाणे
स्वतःला सावरतो ना तोच उठला पडदा
आणि सुरू होते एक अंतहीन फरफट
एक विनंती त्याला की अर्ध्यातच मोडून काढ हा डाव
इथे पडदा पडेस्तोवर कोणाला धीर

समीर चव्हाण

शब्दखुणा: 

काळ

Submitted by समीर चव्हाण on 26 February, 2013 - 04:06

काळ मोठा तीमारदार आहे
प्रत्येक नाइलाजाचा इलाज
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

आजवर बरच हसं झालं
गम्मत उडवली गेली
कधी वाईट वाटलं नाही असं नाही
पण सोपी पळवाटही नव्हती

काही होते जिवाभावाचे
बोट धरून शिकवणारे
बाळा, तात्या आला नाही, तात्या आले

शब्दखुणा: 

माझ्या कविता-४: तेंव्हा आणि आता

Submitted by डॉ अशोक on 20 December, 2010 - 03:25

तेंव्हा आणि आता

तेंव्हा होती तमन्ना, सर्फरोशीची
आणि होती इच्छा, शत्रूच्या बाहूतली ताकद आजमावण्याची
आज आहे इच्छा, दोस्तांच्या विश्वासघाताची
आणि जागतेय तमन्ना, गृह युद्धाची!

तेंव्हा गायलं स्तोत्र,
अधमांच्या रक्तानं रंगलेल्या
सृजनानी पूजलेल्या , स्वतंत्रतेचं
आज आहे स्वातंत्र्य, अधमांना
सृजनांच्या रक्तानं रंगण्याचं !

तेंव्हा पाहिलं स्वप्न
रात्रीच्या गर्भातल्या उष:कालाचं
आज आहे सावट
उष:कालीच आलेल्या
काळरात्रीचं !

-अशोक

गुलमोहर: 

माझ्या कविता-२: आता गझल कशाला?

Submitted by डॉ अशोक on 9 December, 2010 - 10:13

आता गझल कशाला?

साठीस दोन बाकी, अंगास कंप आला
त्या गत यौवनाची, चर्चा आता कशाला?

नजरेस साद असता, प्रतिसाद नाही आला
अंगाई गात असता, मग प्रेम गीते कशाला?

आषाढ श्रावणांचा ना स्पर्श अंगी झाला
ग्रीष्मातल्या दुपारी, मग मेघ-चर्चा कशाला?

मैफिल संपलेली, अस्तास सूर्य आला
नि:शब्द ओठ असता, आता गझल कशाला?

-अशोक

गुलमोहर: 
Subscribe to RSS - माझ्या कविता