इये मायबोलीचिये नगरी
या या मंडळी. नमस्कार बरं का. आपलं या मायबोलीनगरीत मनःपूर्वक स्वागत आहे. नगरीत नविन दिसताय जणु? चला तर मग एक फेरी मारून येऊया. काय म्हणता? अगदी नविन दिसतेय ही मायबोलीनगरी? अहं मुळीच नाही. मायबोलीनगरी वसवून बरीच वर्षं झालीत पण ही नेहेमीच अशी ताजी टवटवीत दिसत असते. तिचे प्रजाजनच तिला सतत घासून पुसून चकाचक ठेवत असतात ना. या तर असे या बाजूनं....
हा बघा स्वागत कक्ष. इथे नविनच प्रजाजन झालेले, बावचळलेले मेंबरलोकं दोनेक दिवस घुटमळतात. काय पुगु वगैरे मिळाला तर घेतात आणि मग सराईतासारखे नगरीत उंडारायला निघतात. त्यामुळे इथे जास्त रेंगाळायचं काम नाही.







