इये मायबोलीचिये नगरी

Submitted by मामी on 22 March, 2011 - 06:39

या या मंडळी. नमस्कार बरं का. आपलं या मायबोलीनगरीत मनःपूर्वक स्वागत आहे. नगरीत नविन दिसताय जणु? चला तर मग एक फेरी मारून येऊया. काय म्हणता? अगदी नविन दिसतेय ही मायबोलीनगरी? अहं मुळीच नाही. मायबोलीनगरी वसवून बरीच वर्षं झालीत पण ही नेहेमीच अशी ताजी टवटवीत दिसत असते. तिचे प्रजाजनच तिला सतत घासून पुसून चकाचक ठेवत असतात ना. या तर असे या बाजूनं....

हा बघा स्वागत कक्ष. इथे नविनच प्रजाजन झालेले, बावचळलेले मेंबरलोकं दोनेक दिवस घुटमळतात. काय पुगु वगैरे मिळाला तर घेतात आणि मग सराईतासारखे नगरीत उंडारायला निघतात. त्यामुळे इथे जास्त रेंगाळायचं काम नाही.

ही समोरच आहे ती आमच्या नगरीतली फुलबाग. कित्ती कित्ती विविध प्रकारची फुलं उमललेत ना? एकूणातच इथल्या लोकांना फुलांची भारी आवड आहे बघा. ही बाग इतकी छान दिसतेय कारण झाडाफुलांचे मित्र म्हणजेच या बागेचे माळीबुवा - झाडबाबा - खास जगभर फिरून ही फुलं इथे आणून लावतात. शिवाय इतरही दिग्गज निसर्गप्रेमी 'जागू'रुकतेने आमच्या मायबोलीच्या निसर्गाची 'साधना' करत असतात. केव्हाही दमलात तर इथे या आणि मन प्रसन्न करा.

ही बघा आजूबाजूला पसरलेली लांबलचक अशी जी भिंत दिसतेय ना, ती आहे मायबोलीवरच्या प्रचिंनी बनवलेली भिंत. आता असं म्हणतात की चंद्रावरून पृथ्वीवर पूर्वी मानवनिर्मित वास्तु अशी केवळ चीनची भिंतच दिसायची. आता मात्र त्याहूनही ठळकपणे ही भिंत दिसते. पण कायैकी, मायबोलीवर चिकित्सक लोकं खुप असल्याने, ते असल्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. या प्रचि-भिंतीबद्दल असलेल्या दंतकथेची प्रचिती घ्यावी म्हणून आता ते प्रचि-जीना बनवताहेत. जो इथून थेट चंद्रावर पोहोचेल आणि तिथून डायरेक्ट प्रचि-भिंतीचा व्ह्यू मिळेल. अंहं .... हा अजिबात अ‍ॅम्बिशस प्रोजेक्ट नाहीये. आमच्या माबोवरच्या प्रचिंत रोज पडणारी भर बघितलीत ना, तर हा दूरवर जाणारा जिना दूर नाही. Happy

आमच्या या नगरीत तुम्हाला जागोजागी काव्य-भोजनालयं दिसतील. भुक लागली तर खुशाल एखाद्या टपरीत घुसा. बाहेरच काव्यपाणपोई असेल. त्यात असलेल्या दोन नळांतून भरपूर पाणी मिळण्याची सोय आहे. एका नळातून शीतल आई-जल तर दुसर्‍यातून गरम प्रेम-जल अखंड वाहत असते. आतमध्ये डोकावलात तर अनेक आचारी मोठ्यामोठ्या कढयातून विविध पदार्थांचे घाणे काढताना दिसतील. हवे ते घ्या - खुसखुशीत काव्यचकल्या, बालकाव्याच्या पाकातल्या पुर्‍या, मुक्तछंदाची कडक कडबोळी, गजल-मिसळ (ही शेराच्या मापात मिळते. त्यावर हवी तर त्या त्या आठवड्याची ताजी तर्री मारून घ्या), विडंबन-कारल्याचे (तुपात तळलेले आणि साखरेत घोळलेले) काप ... असे काय काय. काही मित्र-आचारी एकमेकांच्या पक्वानांवर मुक्त हस्ताने प्रतिसादाच्या गोग्गोड बुंदिकळ्या पेरत फिरत असलेले दिसतील.

इथल्या आचार्‍यांना अर्थशास्त्राची ओळख नसल्याने बरेचदा मागणीपेक्षा पुरवठा जास्त अशी स्थिती असते. मग काही आचारी कधी जोराजोरात कढयांवर झारे आपटून, कधी तळणीच्या गरम तेलाचे शिंतोडे दुसर्‍यावर उडवून, कधी पूर्वीच्या बड्या साहित्यबल्लवाचार्यांच्या नावानं भारी गोंगाट करून आपल्याकडे गिर्‍हाईक खेचून घेण्याचा प्रयत्न करतात. चालायचंच 'आचारी तेवढ्या प्रकृती' हेच खरं! मात्र या भोजनालयांनी मायबोलीला एक प्रकारचं सौंदर्य बहाल केलंय आणि कित्येकांची भूकही भागवलेय, माहितेय?

असेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या नगरीतले सु'लेख' रस्ते. काही सरळसोट तर काही भावूक वळणांचे, काही लांबलचक, मोकळेढाकळे तर काही आडवाटा, काही खडबडीत तर काही चकवे. विविध प्रकारचे लेख, कथा, ललित यांचे पार बांधलेल्या या रस्त्यांवरून एकदा का चालायला सुरवात केलीत ना, की थांबूच नये असे वाटते. कधीकधी मुख्य रस्त्यांना फुटलेल्या उपशाखाही भारी 'इंटरेस्टिंग' असतात. कळेलच तुम्हाला एकदा इथे रुळलात की.

मायबोलीनगरीचे नागरीक जगभर हिंडत असतात आणि त्या त्या ठिकाणची रसभरीत प्रवासवर्णनं इथे सांगत असतात. काही काही ठिकाणं तर त्यांच्या खासच आवडीची. म्हणूनच इथे एक कोकणाचा सेट कायमस्वरूपी बनवून ठेवलाय. तशीच इतर जिव्हाळ्याची ठिकाणं - आंबोली घाट, गड आणि किल्ले, समुद्र, सुर्यास्त, सुर्योदय, चंद्र, धबधबे असे सगळे यशस्वी कलाकार इथे आहेत. आणि हे सगळे कशा स्वरूपात आहेत असं वाटतय? बरोब्बर! प्रचिस्वरूपात. मनात आलं की टाका एक चक्कर. आहे की नाही आळशी लोकांची सोय?

ही आमची प्रयोगशाळा. इथे मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि ज्ञी, 'पोटावर प्रयोगाचे' अनेक प्रयोग यशस्वीरित्या करत असतात. बरेचदा घरच्यांच्या पोटावर प्रयोग करून झाले की, मग ती साग्रसंगित (म्हणजे प्रचिंसहीत) कृती इतरांच्या 'गळी' उतरवण्याकरता इथे टाकतात. बरेच मासे त्यांच्या गळाला लागतातही. आतातर पाककृती कडे एक कलाकृती म्हणून बघण्याची नवी नजर इथे जन्माला येत आहे. नव्याचे स्वागत आमच्या मायबोलीत!

इथे नगरीचे स्वतःचे इस्पितळही आहे बरं का! शरीर आणि मनाला होणारे सर्व त्रास, होऊ नयेत म्हणून उपाय, झाले तर त्यावर उपचार या सर्वांकरता स्वयंसेवक वैद्यांची आणि मानसोपचार तज्ज्ञांची टोळी इथे सतत कार्यरत असते. दिसला पेशंट की दे सल्ले - तेही फुकटचे हं! अगदी निरपेक्ष वृत्तीने हे काम चालू असते.

हे मायबोलीचं बालसंगोपन केंद्र. हे म्हणजे जणु माबो-नेक्स्टजनरेशनचं इन्क्युबेटर आहे. नविन पिढीची प्रकृती आणि संस्कृती टिकवण्याकरता इथे खास कष्ट घेतले जातात. इंग्रजी माध्यमात शिकत असलेल्या आपल्या पाल्याला मराठीला 'face' करताना, तोंडाला फेस येऊ नये अशी इच्छा असेल तर इथे आवर्जून भेट द्याच.

हे जंगल कसलं म्हणून विचारताय? नाही हो पावणे, ही तर आहे काळजीपूर्वक जोपासलेली घनदाट वृक्षराजी. या असे फाटक उघडून आत जाऊ या. इथल्या बर्‍याचश्या वॄक्षांच्या तळाशी समाजाच्या तळागाळातले घटक खताकरता घातले आहेत. त्यावर या वॄक्षांची क्रमाक्रमाने जोपासना केली आहे. त्यामुळे प्रत्येक वॄक्ष कसा २०-२५ मजली उंच झालाय ना! या वॄक्षांवर काही कावळ्यांनी कायमस्वरूपी वसाहत केलेली आहे. इथे कधी बाहेरचे डोमकावळे येतात आणि मग खडाजंगी चालू होते. त्यावेळी प्रजाजनांचे मस्त मनोरंजन होते. आणि हे बघा इथे. या जंगलामध्ये एक मंदिर बांधलय आणि त्यात एक रोपटं लावलंय. हे रोपटं बराच गाजावाजा करून लावलंय पण तेव्हापासून एवढंच आहे, वाढतच नाही. त्यावर जी फळं दिसतायत ना, त्यातली जी 'परिपक्व' झाली ती गळून पडून मंदिराबाहेर केव्हाच गेली. देवाजीची करणी अन काय!

नागरीकांच्या सांस्कृतिक, साहित्यिक, बौध्दिक आणि इतर (यात पान, तंबाखु, विडीकाडी, चा-पाणी आणि अर्थातच खमंग आणि चुरचुरीत खबरी आणि गॉसिप्स इ. सर्व येते) देवाणघेवाणीकरता अनेक चावड्या स्थापन केल्या गेल्या आहेत. चावड्यांवरची नेहमीची उठबस असणारी मंडळी सहसा आपल्या चावडीशी निष्ठावंत असतात. कधी कधी या चावड्यांवर 'आंतर-चावडीय शरसंधान' या क्रीडाप्रकाराची प्रॅक्टिसही केली जाते. भारी पार्ट्या होतात इथे रोज. कायकाय नवनविन पदार्थ बनत असतात, सुंदर-सुंदर कपातून सजवून चहा-कॉफी प्यायली जाते. बरोबर धुंवाधार काव्यचारोळ्या पेरलेली मिठाई असते. जगभरच्या आणि नगरीतल्या सगळ्या बातम्या इथे आणून टाकण्यात येतात आणि त्यांचा काथ्याकूट करण्याचा महत्वाचा कुटिरोद्योग इथे भरभराटीस आलेला दिसेल. इथेच आकड्यांच्या देवाणघेवाणीची मोठी बाजारपेठही आहे.

आमचे हौशी मायबोलीकर कुठेना कुठे काहीना काही निमित्ताने भेटण्याचेही प्रसंग योजित असतात बरं का. आणि ही टवाळ टाळकी टोळक्यांनी 'एके वेळी एके ठिकाणी' भेटून भारी दंगा करतात. मात्र वाडा नावाच्या चावडीवरची मंडळी, काही अगम्य कारणास्तव 'अनेक वेळ पण एकाच ठिकाणी' भेटतात. या गटगंच्या मीठमसाला लावलेल्या बातम्या पुढे अनेक दिवस चर्चेत राहतात.

समस्त मायबोलीकरांचा लाडका गणपतीबाप्पा मोठ्या थाटामाटात नगरीत येतो ना त्या भारलेल्या दिवसांत स्पर्धा, गाणी-गोष्टी, आणि मजेमजेचे खेळ यांची नुसती धमाल असते हं. दिवाळीत तर खमंग आणि खुसखुशीत दिवाळी अंकाचा फराळ दिग्गज मायबोलीकर स्वतः खपून इतरांकरता तयार करतात. इतरही अनेकविध उपक्रम आमच्या नगरीत सुरूच असतात - महिला दिन, मराठी भाषा दिन आणि काय न काय!

शिवाय आमच्या नगरीत खास माबो-स्पेशल असा 'चंपी महोत्सव' अधून मधून उत्स्फुर्तपणे साजरा केला जातो. कोणाच्यातरी सारवलेल्या अंगणात किंवा गावठाणांतून अचानक या चंपी महोत्सवाची सुरुवात होते. सहसा कोणी दोन माबोकर वस्तरे पारजत एकमेकांची बिनपाण्यानं करायला घेतात ... शब्द लगेच सर्वदूर पसरतो .... त्यांचे त्यांचे खरे-खोटे पाठीराखे आपापली शस्त्रे सावरत धावून येतात ... पडघम वाजू लागतात आणि महोत्सव रंगात येतो. माबोवर या चंपी महोत्सवाला 'बाफ पेटला' अशी लाडिक संज्ञा आहे. या पेटलेल्या बाफाचे आकडे आप्तजनात आवर्जून वाटले जातात. मटक्याचा आकडा जसा त्या त्या दिवसाकरता महत्त्वाचा असतो ना, तसंच या आकड्यांनाही त्या दिवशी जोरात मागणी असते. आणि एकदा का हा आकडा 'फुटला' की तो बाफ भरभरून वाहू लागतो. कधी कधी तर इतका पूर लोटतो की नगरीचे दैनंदिन व्यवस्थापन करणार्‍यांना हस्तक्षेप करून बाफाचा कायमचा बंदोबस्त करावा लागतो.

तर अशी ही आमची मायबोली. एकमेकांची सुखदु:ख वाटून घेणारी, बसल्याजागी जगाचे दर्शन घडवणारी, हसतहसत रडवणारी, आणि भांडता-भांडता गळ्यात गळे घालणारी! इथे तुम्हाला समविचारी मित्र-मैत्रिणी भेटतात, अनेकविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्ती जवळून दिसतात आणि मग बघता-बघता आपण या नगरीचा एक कायम नागरीक बनून जातोच.

काय म्हणता मग? आता रोज येणार ना?

त.टि. : चंपी महोत्सव यातील 'चंपी' हा खास बिनपाण्याने करण्याच्या उद्योगाशी निगडीत शब्द आहे. त्याचा मायबोलीवरील आयडीशी संबंध नाही याची कृपया नोंद घ्यावी. सॉरी खरेखुरे/र्‍या चंपी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

_/\_

मायबोलीवरच्या अनेक गोष्टींचा खुसखुशीत परामर्श ......
...... लेख मस्त जमलाय.

"तर अशी ही आमची मायबोली. एकमेकांची सुखदु:ख वाटून घेणारी, बसल्याजागी जगाचे दर्शन घडवणारी, हसतहसत रडवणारी, आणि भांडता-भांडता गळ्यात गळे घालणारी! इथे तुम्हाला समविचारी मित्र-मैत्रिणी भेटतात, अनेकविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेल्या व्यक्ती जवळून दिसतात आणि मग बघता-बघता आपण या नगरीचा एक कायम नागरीक बनून जातोच."

...... हे अगदी पटण्यासारखं

मामी तुम्हाला साष्टांग नमस्कार
तुम्ही मायबोलीची ओळख वेगळ्या शैलीत (मामीशैली) करुन दिलीत.

>>आता रोज येणार ना ? ....... हो हो

मामी............ जम्या एकदम........

मस्त गोफण फिरवलीये एकदम...... ज्याला "खडा" लागला त्याला लागला. Proud

बाकी, मामीने तो "खडा" मार्‍याच नही...... Wink

'आंतरचावडीय शरसंधान' ही सज्ञा वाचून हसू आले.

ते सोडुन एकदाही हसू आले नाही. हा बहुधा मायबोलीवरील आंतरसदस्यीय वैरांमुळे झालेल्या प्रिज्युडाईस्ड दृष्टिकोनाचा परिणाम असावा असे ठामपणे मांडण्यासाठी काही अड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.

'आंतरसदस्यीय आंतरजालीय तात्कालीन व प्रासंगीक वैरे' हा विभाग मुद्दाम कव्हर केला गेला नाही यात कल्पकता जाणवली.

काही सदस्यांचे 'लेखक' म्हणून अस्तित्व केवळ 'मायबोलीबाबत'चे लेखन करण्याइतकेच सीमित असते हे दर्शवणारा विभाग मुशाफिरांना दाखवलाच नाही हे ओबामाला मुंबईतून नेताना धारावी टाळून नेण्यासारखे वाटले.

वरील प्रतिसादातील एकही विधान अवांतर नाही असे माझे मत आहे.

पुढील लेखनास शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

मामी, फक्त कोळून प्यायलंस आणि पाजलंस सुद्धा !
सुंदर लिखाण जे घडतय आणि बिघडतयं ते सुद्धा मस्त मांडलंस.
निवडक दहामधे असं काहितरी असावं.

बावचळलेले मेंबरलोकं दोनेक दिवस घुटमळतात. काय पुगु वगैरे मिळाला तर घेतात आणि मग सराईतासारखे नगरीत उंडारायला निघतात.

ही बाग इतकी छान दिसतेय कारण झाडाफुलांचे मित्र म्हणजेच या बागेचे माळीबुवा - झाडबाबा - खास जगभर फिरून ही फुलं इथे आणून लावतात. शिवाय इतरही दिग्गज निसर्गप्रेमी 'जागू'रुकतेने आमच्या मायबोलीच्या निसर्गाची 'साधना' करत असतात.

काही मित्र-आचारी एकमेकांच्या पक्वानांवर मुक्त हस्ताने प्रतिसादाच्या गोग्गोड बुंदिकळ्या पेरत फिरत असलेले दिसतील.

देवाणघेवाणीकरता अनेक चावड्या स्थापन केल्या गेल्या आहेत. चावड्यांवरची नेहमीची उठबस असणारी मंडळी सहसा आपल्या चावडीशी निष्ठावंत असतात. कधी कधी या चावड्यांवर 'आंतर-चावडीय शरसंधान' या क्रीडाप्रकाराची प्रॅक्टिसही केली जाते. भारी पार्ट्या होतात इथे रोज. कायकाय नवनविन पदार्थ बनत असतात, सुंदर-सुंदर कपातून सजवून चहा-कॉफी प्यायली जाते. बरोबर धुंवाधार काव्यचारोळ्या पेरलेली मिठाई असते. जगभरच्या आणि नगरीतल्या सगळ्या बातम्या इथे आणून टाकण्यात येतात आणि त्यांचा काथ्याकूट करण्याचा महत्वाचा कुटिरोद्योग इथे भरभराटीस आलेला दिसेल. इथेच आकड्यांच्या देवाणघेवाणीची मोठी बाजारपेठही आहे.

माबोवर या चंपी महोत्सवाला 'बाफ पेटला' अशी लाडिक संज्ञा आहे. या पेटलेल्या बाफाचे आकडे आप्तजनात आवर्जून वाटले जातात. मटक्याचा आकडा जसा त्या त्या दिवसाकरता महत्त्वाचा असतो ना, तसंच या आकड्यांनाही त्या दिवशी जोरात मागणी असते. आणि एकदा का हा आकडा 'फुटला' की तो बाफ भरभरून वाहू लागतो. कधी कधी तर इतका पूर लोटतो की नगरीचे दैनंदिन व्यवस्थापन करणार्‍यांना हस्तक्षेप करून बाफाचा कायमचा बंदोबस्त करावा लागतो.

वरील परिच्छेद फार्फार आवडले......

एकूण कुणास न दुखावता किंवा हा विषय वादग्रस्त न करता खुसखुशीत अंगाने मोठ्या कौशल्याने मामींनी हा विषय फुलवला आहे......

आवडला... अभिनंदन Happy

Biggrin

मामी, मस्तच!!!! नेहमीप्रमाणेच अत्यंत क्रिएटिव्ह लेखन आहे. तुमच्या माबोभ्यासाला माझा सलाम!!! ___/\___ Happy

पहिल्यांदाच कोणाला विशेष न दुखावणारे, निखळ मनोरंजन करणारे लेखन तुमच्या हातून घडले आहे. असेच छान छान लिहित रहा.

माबो या विषयावरील तुमच्या पु.ले.स माझ्या शुभेच्छा!!!

Pages