नवीन

मस्ती

Submitted by पुरंदरे शशांक on 1 November, 2010 - 03:23

मस्ती

सभोवताल ऊन्हानं सारवलेलं
एक झाड आपल्याच सावलीत मस्तपणे विसावलेलं

माणसांच्या बेभान गर्दीत ........ आपलं नितळपण सांभाळलेलं
पाना-काट्यांच्या मधेच .........नाजूक फूल फुललेलं

नादाच्या कोलाहलात ............. आपला सूर गवसलेलं
व्यवहारी रुक्ष जगात .............. कोवळं माणूसपण जपलेलं

लाटांच्या तांडवात ............... एक लाकूड तरलेलं
जंगल वणवा आसपास .......... एक घरटं बचावलेलं

दाद देणारं असो नसो ........... एक गाणं रंगलेलं
एक झाड आपल्याच सावलीत मस्तपणे विसावलेलं

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रितेपण

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2010 - 07:22

रितेपण

पडक्या भिंती उरल्या नुसत्या
दरवाजे निखळून गेले
छप्पर जरी का नावापुरते
जागोजाग उसवलेले

संपून गेले घरपण अवघे
रितेरितेपण भरले ते
उदास वारा कोंदून राही
साकळले क्षण जेथ तिथे

संगीत- गाणे विरून गेले
विराणी ना कुणी आळवते
बेतालाचा अंमल सगळा
भकासपण वस्तीस असे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पावसाआधी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2010 - 07:08

पावसाआधी

काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा
कपाळभर भरलेल्या काळजीच्या रेघा

विहीरींचे पाणी केंव्हाच सरले
रिकामे हंडे गावभर फिरले

दूरवर आभाळात काळसर ढग
निचरून काढतात निराशेचे मळभ

निबर चैत्रपालवी वार्‍यावर झुळकती
मनामनात पावसाची आशा तरळती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

समर्पिता

Submitted by पुरंदरे शशांक on 24 October, 2010 - 04:17

समर्पिता

बाण लागता हरिचरणाला मोरपिसाचा रंग उडाला
घननीळ फिका फिका जाहला मुरली -शेला बाजूस पडला
चाहूल येता अस्ताची त्या नेत्र पाकळ्या मिटू लागल्या

मिटण्यापूर्वी कमललोचने
स्पर्शाने हळू कुरवाळुनिया
मुरलीला बोले नन्दलाला

सर्वांहून तू पूर्ण वेगळी तुझ्यासारखी तूच आगळी
स्वर माझे दाखविण्याची तू न्यारी किमया केली

अंतरात रिक्त होउन
ओठींची झुळुक झेलुन
अंगुली स्पर्श घेउन
निजसर्वस्व समर्पून सूर दिले तू जगताला

ज्या सुरात वेडी राधा, कुब्जाही ज्यात निमाली
गोकुळ्ही जेथे वेडे, स्वरमुग्ध दशा ती उरली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - नवीन