पावसाआधी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 October, 2010 - 07:08

पावसाआधी

काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा
कपाळभर भरलेल्या काळजीच्या रेघा

विहीरींचे पाणी केंव्हाच सरले
रिकामे हंडे गावभर फिरले

दूरवर आभाळात काळसर ढग
निचरून काढतात निराशेचे मळभ

निबर चैत्रपालवी वार्‍यावर झुळकती
मनामनात पावसाची आशा तरळती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

“काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा
कपाळभर भरलेल्या काळजीच्या रेघा”
छान !

नमस्कार मुक्तेश्वर,
'रिकामे हंडे गावभर फिरले'
सर्व विहीरींचे पाणी संपल्यामुळे पाण्यासाठी सर्व मंडळी (विशेषतः स्त्रिया) रिकामे हंडे घेऊन जागोजाग फिरत होती.
आपल्या निर्मळ, मोकळ्या स्वभावाचे दर्शनच या प्रश्नातून झाले.
धन्यवाद.
शशांक

नमस्कार उल्हासकाका,
तुम्ही आवर्जून प्रतिक्रिया देता याकरता औपचारिक आभाराचा भार देत नाही.
तुमच्या कायम ॠणातच रहायला आवडेल.
शशांक

<< काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा
कपाळभर भरलेल्या काळजीच्या रेघा >>
मलापण ह्या ओळी जास्त आवडल्या.

पहिल्या दोन ओळी खास....

"निचरून" हा नविन शब्दप्रयोग पण आवडला...... Happy

शुभेच्छा.....

आशयाच्या दृष्टीने खूपच अशक्त कवीता आहे. मांडलेल्या विषयाला पुर्ण आणि स्पष्ट न्याय न देता ती सुरू होते व संपतेही.

दूरवर आभाळात काळसर ढग
निचरून काढते निराशेचे मळभ

ते ढग की ती ढग? ढग निराशेचे मळभ निचरून काढतात? की निचरून कढते?

काळ्याभोर जमिनीवर उभ्याआडव्या भेगा>>>> दुष्काळ पडलेला असतो.

विहीरींचे पाणी केंव्हाच सरले>>>> कुठेच पाणी राहिलेले नसते.

दूरवर आभाळात काळसर ढग >>> एवढ्यात ढग दिसतात. जनसामांन्यांची काळजी कमी होते.

निबर चैत्रपालवी वार्‍यावर झुळकती>>> भेगाळलेल्या सुकलेल्या जमीनीवर अचानक जादूने चैत्रपालवी उगवते आणि ती झुळकूही लागते. आणि ती बघून आता पालवी आलीच आहे तर पाऊसही येणारच अशी आशा शेवटच्या ओळीत तरळते.

मनामनात पावसाची आशा तरळती.

पामरासी हाची अर्थू सापडीला... काव्योत्पादकानी क्रोधास जाणेचे करू नये. अर्थ चुकिचा असल्यास तो तसा चुकिचा का लिहीला गेला असेल????? ||विचारी मना तूच शोधून पाही||

चैत्रपालवीस 'निबर' असे का म्हटले आहे ते कळले नाही.
बाकी, हणमंतरावांना पडलेला प्रश्न मलाही पडला.
'निचरून काढतात' असे हवे .
पहिल्या दोन ओळी मात्र भन्नाट आहेत.
लिहीत रहा.

-चैतन्य

नमस्कार विचारी मनु, शिंदे, भुंगा, चैतन्य,
तुम्ही सर्व मंडळी कविता नुसती वाचून सोडत नाही तर सुधारणेची गरज असेल तर तेही सुचवता, आवडली तर तसा प्रतिसाद व न आवडली तर मोकळेपणे तेही सांगता. जाणकार रसिकाचेच हे लक्षण आहे असे मला वाटते. - मला या सर्व गोष्टींची खूप गरज वाटते - एखादा कवी चांगला घडवला जावा याकरता.
मा बो वर सविस्तर चर्चा करता येते हेही विशेषच म्हणावे लागेल.
विचारी मनु नी केलेले विवरण एकदम मान्य. - त्यांचे विशेष आभार.
शिंदेंनी दाखवलेली चूक मान्य - दुरुस्त केली आहे. -एखादी कविता का आवडावी किंवा न आवडावी - सापेक्ष गोष्ट समजतो.
निबर चैत्र पालवी - सुरवातीला कोवळी असलेली पालवी आता निबर झाली - चैत्र संपून ज्येष्ठ संपत आल्याचे द्योतक - अजून पावसाला सुरवात नाही - कोवळीक निबर झाली - जनमानसात सुद्धा असेच असते - आशा कधी मरत नाही - निबरपणे तगूनच असते - जिवंत असते - पावसाला कितीही उशीर झाला तरी तो पुढे येणारच अशी आशा तरळतच रहाते.
मला वाटते येवढे खूप झाले - तरीही अजून कोणाला काही शंका असल्यास चर्चा करायला आवडेल.
सर्वांचे मनापासून आभार.

शशांक, मित्रा तुझ्या भावना छान आहेत. पण व्यक्त करण्यासाठी जे माध्यम आहे ना ते शब्द फार सशक्त आणि रूतून राहणारे हवेत. विशेषतः अशा मोठ्या विषयासाठी. त्यामुळे व्यक्त करण्याची फार घाई न करता शब्दांसाठी, कवितेच्या फॉर्मसाठी मनाचा तळ पूर्ण समाधान होईपर्यंत शोधत जावे. आपोआप तृप्तीचा आनंद देणारी तुझी कविता उमटेल.
येथील जाणकार मंडळींकडून बरेच काही शिकायला मिळते.
पुलेशु.

कविता छान आहे पण जरा अपुर्‍ण वाट्ते.... भावनान्च्या आणखी ३-४ ओळी उतरल्यास उत्त्म...

पाउस या वीषयावर कवीता लिह्ल्या बद्द्ल आभार..........