समर्पिता

Submitted by पुरंदरे शशांक on 24 October, 2010 - 04:17

समर्पिता

बाण लागता हरिचरणाला मोरपिसाचा रंग उडाला
घननीळ फिका फिका जाहला मुरली -शेला बाजूस पडला
चाहूल येता अस्ताची त्या नेत्र पाकळ्या मिटू लागल्या

मिटण्यापूर्वी कमललोचने
स्पर्शाने हळू कुरवाळुनिया
मुरलीला बोले नन्दलाला

सर्वांहून तू पूर्ण वेगळी तुझ्यासारखी तूच आगळी
स्वर माझे दाखविण्याची तू न्यारी किमया केली

अंतरात रिक्त होउन
ओठींची झुळुक झेलुन
अंगुली स्पर्श घेउन
निजसर्वस्व समर्पून सूर दिले तू जगताला

ज्या सुरात वेडी राधा, कुब्जाही ज्यात निमाली
गोकुळ्ही जेथे वेडे, स्वरमुग्ध दशा ती उरली

विसावलीस करात माझ्या दिधलीस आजवरी साथ
परि वाटे प्रिय सखी तू
होऊन समर्पण संकेत
तू रहावेस येथेच ....सखी तू रहावेस येथेच

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नमस्कार - "मनाचा मालक"
अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद.
शशांक