नवीन

कवितेचे दान.....

Submitted by पुरंदरे शशांक on 5 October, 2011 - 06:20

कवितेचे दान.....

वेडा वेडा पाऊस वेड्या वेड्या मनात
नभाची गाणी इवल्या इवल्या फुलात

मेघांची दाटी पश्चिम क्षितीजात
अंकुरते बीज धरती उदरात

पिसात चोच पाखराची रात
उडण्याची स्वप्नं नव्याने भरात

विहरतो वारा गोड गाणी गात
हिरवी हिरवी पात लवलवते तालात

झुंजुमुंजु झालं दूर डोंगरात
लख्ख उजाडलं नितळ मनात

समई ज्योत शांत देवघरात
प्रार्थना उमटे खोल अंतरात

शब्दांचे मोती मन शिंपल्यात
कवितेचे दान रित्या पदरात....

गुलमोहर: 

चिमूताई, कावळेदादा..

Submitted by पुरंदरे शशांक on 27 September, 2011 - 02:54

चिमूताई...

चिमूताई चिमूताई किती हा चिवचिवाट
खात नाही दाणेबिणे सतत आपला बडबडाट

सारख्या गप्पा मारता बाई, मैत्रिणींशी कशा
आई कशी म्हणत नाही - चला, अभ्यासाला बसा.....

कावळेदादा..

काळा काळा कावळा
खरवडतो सदा गळा

रंग जरी काळाशार
दिसतो तरी तजेलदार

वाकडी मान करुन करुन
बघतात काय कोण जाणे

पोळी ब्रेड केक दाणे
पळवतात हुशारीने

गुलमोहर: 

पुण्याच्या आसपासची गवतफुले....

Submitted by शांकली on 26 September, 2011 - 13:16

पुण्याच्या आसपासची गवतफुले....

१] दुरंगी शेवरा

ab 006.jpg

२] सोफुबिया

ab 010.jpg

३] केशरी उन्हाळी

photo 047.jpg

४]

ab 050.jpg

५] म्हाळुंगी

ab 063.jpg

गुलमोहर: 

मुंगीताई..

Submitted by पुरंदरे शशांक on 16 September, 2011 - 06:52

मुंगीताई..

मुंगीताई , मुंगीताई
तुरुतुरु धावता घाई
पाय कसे दुखत नाही
मज्जा भारी वाटे बाई

शिस्तीत कशा चालता तुम्ही
रांग कधीच मोडत नाही

समोर येता दुसरी ताई
कानगोष्टी करुन जाई

रॅकवर उंच ठेवले जरी
नाव डब्यावर नसले तरी

शोधून काढता केक - खारी
मला गंमत वाटते भारी

उंच स्टुलावर चढते तोच
आईची एकदम जाते झोप

धडपड सारी माझी ऐकून
आई ओरडे पाठीमागून

"हा काय मेला फाजीलपणा
जेवण नको नी खाऊ आणा"

आवाज बिल्कुल न करता
खाऊ तेवढा कसा शोधता

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हट्ट गणेशबाळाचा..

Submitted by पुरंदरे शशांक on 7 September, 2011 - 01:43

हट्ट गणेशबाळाचा....

गणेशबाळाचा आईकडे एकच हट्ट
"मलाही सेलफोन" धरला पदर घट्ट

"चारी हातात तुझ्या काही ना काही
कसा धरणार सेल, काही कळतच नाही"

"पितांबराला ना खिसा, मग कुठे ठेवणार ?
एक हरवल्यावर लगेच दुसरा मागणार"

"सोंड आहेना ही, अशी कानाशीही नेईल
सेल धरायची माझी बघशीलंच स्टाईल..."

बर्थ डे च्या आधीच मिळाला की सेल
गणेशबाप्पांना आता नवीनच खेळ

"हॅलो कार्तिक, गणेश कॉलिंग.."
बाप्पांचे एकदम फुल शायनिंग

(ऐटीत कार्तिकला कॉल लावला
"टचस्क्रीन भारीच आणलाय मला" )

"सुखकर्ता दु:खहर्ता"...ची वाजली धून
चमकून बघतात तर आपल्याच सेलमधून

गुलमोहर: 

सखा श्रावण निघाला.......

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2011 - 08:00

सखा श्रावण निघाला....

रोम रोम आतुरला किती दिसा संग झाला
झरे मनात श्रावण सप्तरंग कमानीला

जाई-जुई फुललेली प्राजक्ताचा दारी सडा
दूर रानात घालती रानफुले पायघड्या

थेंब मोतीयांचे पानी आगळीच गळामिठी
उन्हे कोवळी कोवळी लोलकात तळपती

भक्तिभाव आरतीचा मंदिरात झंकारला
असा सुखावून जीव सखा श्रावण निघाला.......

गुलमोहर: 

नाते जन्मांतरीचे....(जन्माष्टमीनिमित्त )

Submitted by पुरंदरे शशांक on 21 August, 2011 - 12:35

नाते जन्मांतरीचे....

रात्रंदिन ध्यास तुझा अंतरीच्या अंतरी
श्वास परि रुंधतसे होय मी बावरी

आज स्वस्थता जीवास लाभे तरि निश्चित
दावूनी गेला प्रभाती काक शकून सांगत

ह्रदयीच्या दर्पणी पाहतसे नित तरी
दाटे का अंतरी एक गोड हुरहुरी

रे सख्या शुभघडी समीप ये क्षणोक्षणी
सगुणरुप दाविसी कृपावंत होऊनी

होऊनी राधासखी भेटणार मी तुला
दिठीभरूनी निरखणार निराकार वत्सला

जन्म जन्म रे हरि तू जिथे मी तिथे
अतूट बंध लाभता अद्वयत्व जन्मते

गुलमोहर: 

माझे काही भाग्ययोग - पक्षीभेट

Submitted by पुरंदरे शशांक on 17 August, 2011 - 01:49

माझे काही भाग्ययोग - पक्षीभेट

आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे तसं जुनं बालगीत नक्कीच आठवत असेल .......
"माझ्या या ओटीवर कोण कोण येतं, कोण येतं..........
चिमणी येते नी चिमणा येतो ...टिप टिप दाणे टिपून जातो".
यात पुढे बर्‍याच पक्ष्यांच्या जोड्यांचे - राघू - मैना, मोर - लांडोर असे वर्णन होते.
या गाण्यात वर्णन केलेल्या चिमण्या, कावळे, मोर, पोपट अशा नेहेमीच्या पक्ष्यांशी आपला बर्‍यापैकी परिचय असतो.
मी ही लहानपणापासून हे पक्षी पहात आलो आहे.

गुलमोहर: 

वेडा पाऊस..

Submitted by पुरंदरे शशांक on 14 August, 2011 - 11:24

वेडा पाऊस..

वेडा वेडा पाऊस
वेड्या वेड्या मनात
सुकलेलं रान
आशेची रुजवात

आसावले मन
कुणाच्या शोधात
थेंबभर ओल
दिसे आभाळात

जोर वादळाचा
मेघ गर्जतात
येणार साजण
धक्धक उरात

थेंबांची ओंजळ
पृथ्वी पदरात
दोन काळे मेघ
भरु वहातात

हिरवी नव्हाळी
धरा दिमाखात
वेडे वेडे मन
चिंब गाणे गात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मी शब्दांतून...

Submitted by पुरंदरे शशांक on 12 August, 2011 - 06:11

मी शब्दांतून...

लिहिण्याला कारण काही
न उमजे मला कधीही
जडला हा वेडा छंद
मी मलाच शोधत राही

त्या रानफुलाची साद
शब्दामधुनी का येई
बरसात कृष्णमेघांची
धारांत अक्षरे वाही

चिंबसा होऊनी जात
ग्रीष्मी का उन्हे वहात
न्हातात शब्द सुरात
संगीत नसानसात

मी माझा नुरतो काही
व्यापुनी दहा दिशात
मी चराचरी या मुक्त
शब्द ते मात्र निमित्त

मी भेदून जातो आता
हे दहा दिशांचे नाते
तरी साद घालते हिरवे
शब्दांचे ईवले पाते

"शाम"ने मूळ रचनेवर सुंदर संस्कार केले व
शेवटचे कडवे - साक्षात श्री. उमेश कोठीकरांनी प्रेमपूर्वक धाडलेले....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - नवीन