मराठी गझल

सोड चिंता मीच माझे (तरही)

Submitted by प्राजु on 13 December, 2011 - 10:16

टाकुनी कुबड्या तुझ्या, मी चालते आता
सोड चिंता मीच माझे पाहते आता

चालते मी एकटी, ना तू हवा संगे
बघ तुझीही साथ मजला दाहते आता

पाखडूनी मी मनाला स्वच्छही केले
धाडसाचे ऊन थोडे दावते आता

पाश सारे तोडले रीतीरिवाजाचे
सोड!! मनमानी तुझी ना साहते आता

जाळले आहेच जर हृदयास माझ्या मी
आठवे तीलांजलीतुन वाहते आता

बोलकी आहे पुरेशी एक कविताही
बाड शब्दांचे मला ना भावते आता

एकटे जगणे बरे 'प्राजू' असो ध्यानी
मुफ़्त येथे कोण सोबत राहते आता?!

-प्राजु

गुलमोहर: 

धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे

Submitted by बेफ़िकीर on 13 December, 2011 - 04:04

धाड वार्‍यातून थोडी मखमली सळसळ इथे
लावली आहे स्मृतींची बोचरी हिरवळ इथे

तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे

जर तुझे नि:श्वास परक्याच्या मिठीने गंधती
का मला भंडावतो मग हा तुझा दरवळ इथे

मी कधी आलेच नाही ना तुला भेटायला
व्यक्त कर केव्हातरी येऊन ही हळहळ इथे

वाट मदिरेची स्मशानालाच जाते शेवटी
ते वळण येईल आपोआप सध्या वळ इथे

मी मनांची ओल शोधत पुटपुटत रेंगाळतो
'याइथे पाणी असावे... ऐकली खळखळ इथे'

फक्त तेव्हा शेर होतो शेर म्हणण्यासारखा
आपले आयुष्य जेव्हा वाटते निष्फळ इथे

हुंदका आला तरी जाणीव ना होवो मला
आसवे येतात तेव्हा पावसा कोसळ इथे

गुलमोहर: 

हा कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ? (तरही)

Submitted by इस्रो on 12 December, 2011 - 07:36

कोणत्या दिशेचा आहे प्रवास अजुनी ?

शोधावयास वाटा, करतो प्रयास अजुनी
हा कोणत्या दिशेचा, आहे प्रवास अजुनी ?

गगनास भाव भिडले, चर्चाच फक्त होते
थाटात खर्च करती, सारे सणास अजुनी

साथी कुणीच नाही, चिंता मला न त्याची
गातो मजेत माझ्या, गझला झकास अजुनी

नशिबास दोष सारा, देण्यात अर्थ नाही
"घामात ध्येय" हे का, कळले कुणास अजुनी ?

झालो वयस्क आता, असले खरे तरी पण
का बालपण हवेसे, वाटे मनास अजुनी ?

जेथून साथ सुटली, सखये तुझी नि माझी
वळणावरी तुझा त्या, होतो अभास अजुनी

गुलमोहर: 

थोडी पिऊन घेतो...

Submitted by प्राजु on 10 December, 2011 - 23:38

झरताच वेदना ही, डोळ्यात गोठलेली
थोडी पिऊन घेतो, ग्लासात ओतलेली

मदिरालयात जो तो, हसतो असा तसाही
डोकावते व्यथाही, हसण्यात झाकलेली!

बेहोश होउनी मी, पडलो कधी न कोठे
म्हणतात बेवडा पण, रस्त्यात भेटलेली!

का गंध आठवेना, आता मला तुझाही
बस्स, वारूणीच वसते, श्वासात, घेतलेली!!

होताच दाट छाया, घेते कुशीत मजला
देते जरा उबारा, नुकत्यात 'घेतलेली'

मदिरालयात कोणी, ना राव-रंक असतो
असते व्यथाच तेथे, हृदयात पेटलेली

असतो अधुन मधुन मी, शुद्धीतही जरासा
स्मरते पुन्हा कहाणी, अर्ध्यात फ़ाटलेली..

गुलमोहर: 

माझी गझल

Submitted by वैवकु on 10 December, 2011 - 10:38

माझी गझल मजसारखी हळुवार ती माझी गझल
या जीवनीच्या संचीतांचे सार ती माझी गझल

माझी गझल मम प्रेरणा मज स्फूर्तीची संवेदना
अन प्राण माझा छेडणारी तार ती माझी गझल

मोकळ्या केसांत "ती" च्या मी जसा गुंतून गेलो
आत माझ्या गुंतणारी नार ती माझी गझल

माझिया मोहात वेडा मी मला शोधीत होतो
लाभला जो आज तुमचा प्यार ती माझी गझल

देवता जी एक माझी आणि बंदा मी जिचा
त्याच माझ्या भारताची आरती माझी गझल

झेलला आहे जिने अन आजही झेलीत आहे
विठ्ठलाच्या पाउलांचा भार ती माझी गझल

गुलमोहर: 

वसा

Submitted by क्रांति on 8 December, 2011 - 03:02

कुणा माहिती काल होतो कसा?
मला मीच ना आठवे फारसा !

प्रवाहातल्या ओंडक्यासारखा,
किती दूर वाहून आलो असा

दगा देतसे सावलीही मला,
भरोसा करावा कुणाचा कसा?

खुळ्या पावसाच्या वृथा वल्गना
इथे कोरडा मी जसाच्या तसा !

खरा चेहरा दाखवू पाहता,
चरे पाडले, फेकला आरसा

नकोसा जरी वाटला जन्म हा,
पुसावा कसा मीच माझा ठसा?

उतूही नये जीव, मातू नये
फुलावा, फळावा असा दे वसा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

'मौनास' बोलण्याला शिकवायचे जरासे..

Submitted by प्राजु on 7 December, 2011 - 17:50

'मौनास' बोलण्याला शिकवायचे जरासे
रूचते न जे मनाला, ठुकरायचे जरासे

आता अलिप्त राहुन, चालायचे न काही
घडता जरा चुकीचे, अडवायचे जरासे

दाबून सर्व इच्छा, मनही मरून गेले
त्याचेहि लाड आता, पुरवायचे जरासे

पाहून वाट येथे काहीच ना मिळाले
मिळवायला जरासे.. झगडायचे जरासे

नाहीच आस मजला, लहरी तुझ्या ऋतूंची
आता स्वत: स्वत:चे , बहरायचे जरासे

झाले म्हणून सुंदर, कित्येक चेहर्‍यांना
आता स्वत:स लाजुन, निरखायचे जरासे

जन्मावरीच सार्‍या, उठले चरे हजारो
अलवार ते पुसूनी मिटवायचे जरासे

गुलमोहर: 

मीच माझे पाहतो आता. ( तरही )

Submitted by निशिकांत on 6 December, 2011 - 23:45

प्रेम केल्याची सजा मी भोगतो आता
सोड चिंता मीच माझे पाह्तो आता

मी जसा आहे तसा रुचलो न कोणाला
चेहर्‍यावरती मुखवटे लावतो आता

सुरकुत्यांचे राज्य आले सांजही झाली
आरशातिल मी मला ना भावतो आता

गाठले ध्येयास, थोडे शांत जगण्याला
काय पुढती? उत्तरे मी शोधतो आता

अंतरी डोकावसी का? मी रिता प्याला
धुंद मी होण्यास गझला वाचतो आता

मानले सर्वास अपुले चूक मी केली
घेत शिक्षा मी मला फटकारतो आता

झोपड्या सार्‍या जळाल्या दंगलीमध्ये
शांततेची बात करतो गाव तो आता

शामची आई विसरलो, पावाणार्‍या त्या
मी भवानीचाच गोंधळ मांडतो आता

संपली दु:खे, प्रभूची कास धरल्याने
किर्तनी रंगून थोडा नाचतो आता.

गुलमोहर: 

सोड चिंता मीच माझे पाहते आता.

Submitted by कमलेश पाटील on 5 December, 2011 - 23:48

काय तु(तू) होतास माझा शोधते आता
सोड चिंता मीच माझे पाहते आता.

गुंतणे टाळावया मी चालले जेव्हा
पाय का वाटेत तव घोटाळले आता

प्रीत होता भावना डोळ्यात जपली मी
सांगण्या तव शब्द हे थोडे जुळवते आता

काय गेले काय आले मोजण्या जाता
हाय बाकी आज शून्य राहते आता

ठाव ना लागे सुखाचा शोधला जेव्हा
गाव तव माझ्या जगात नांदते आता

गुलमोहर: 

दंश

Submitted by आनंदयात्री on 5 December, 2011 - 01:22

त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!

**********************

पावसावर आज माझा जीव जडला
भावना समजून माझ्या तोच रडला

पटकथा एकाच नात्याची बदलली
आज अंकाचा नव्या पडदा उघडला

लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला

चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला

मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला

स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल