दंश

Submitted by आनंदयात्री on 5 December, 2011 - 01:22

त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!

**********************

पावसावर आज माझा जीव जडला
भावना समजून माझ्या तोच रडला

पटकथा एकाच नात्याची बदलली
आज अंकाचा नव्या पडदा उघडला

लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला

चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला

मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला

स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

सुटे मिसरे आवडले नचिकेत.

पटकथा एकाच नात्याची बदलली>> मस्त!
चार घटका लाज सैलावून निजली>> फारच आवडलं..
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला>> सोप्पं, साधं!

भाबडा विश्वास माझा फार नडला>> क ह र...

अत्यंत सुरेख, आणि अर्थपुर्ण... Happy
मुख्य म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजेल अशी आहे. Happy

सुंदर गझल, नचिकेत !
लाघवी हास्याचा शेर फार आवडला.

"चार घटका लाज सैलावून निजली" या ओळीने ज्या अपेक्षा वाढतात, त्यांना सानी मिसरा न्याय देत नाही असे मला वाटले.

स्पर्श कवितेने कधी केलाच नाही
ढीग शब्दांचा ­­मनामध्येच सडला

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला

सु रे ख !

(मतल्याआधीच एक शेर वेगळा लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.)

सर्वांचे आभार! Happy
दक्षिणा, बागेश्री, Happy

"चार घटका लाज सैलावून निजली" या ओळीने ज्या अपेक्षा वाढतात, त्यांना सानी मिसरा न्याय देत नाही असे मला वाटले.

हम्म्म... आत्ता वाचताना मलाही तसं वाटतंय..

मतल्याआधीच एक शेर वेगळा लिहिण्याचे प्रयोजन कळले नाही.

प्रयोजन असं नाही काही, डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं, त्यातून तो शेर सेपरेट वर आला..

अप्रतिम!!

लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला

चार घटका लाज सैलावून निजली
दंश चारित्र्यास ओघानेच घडला

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला

हे शेर म्हणजे कहर आहेत!

सावलीही शेवटी सोडून गेली
भाबडा विश्वास माझा फार नडला>>>>>
जीवघेणा....... असे तुम्हीच लिहू शकता!

मुख्य म्हणजे आमच्या सारख्या सामान्य माणसांना सहज समजेल अशी आहे.
चला, गझल जमायला लागली म्हणायची! Happy

सर्वांचे आभार! Happy

मस्त गझल नचिकेत..

लाघवी हास्यास मी उत्तर समजलो
प्रश्न मग ओठांवरी कायम रखडला >>> मस्तच

सडला नडला ही आवडले...

लाज शेराबाबत ज्ञानेशशी सहमत

क्या बात है.... सगळेच शेर आवडले ...

त्याच पात्रांचे तमाशे रोज येथे...
एक होता, त्यात हा दुसरा उघडला!----------------!!! Happy !!!

मी जरी पत्रामध्ये नव्हतो कुठेही
अक्षरावरती तुझ्या हा जीव जडला

---- क्या बात है! जनाब शायर, सलाम कुबूल हो!
-- जयन्ता५२