उत्तरे सापडायची पुर्वी
उत्तरे सापडायची पुर्वी
माणसे उलगडायची पुर्वी
जात होत्या मिठीमधे रात्री
काय थंडी पडायची पुर्वी
हासते ती कसेनुसे आता
चांदणे शिंपडायची पुर्वी
ओळखेनात एकमेकांना
जी मुले हुंदडायची पुर्वी
सासरी लेक जायची तेव्हा
पूर्ण वस्ती रडायची पुर्वी
भेटुनी नाचली जुनी झाडे
काय नाती जडायची पुर्वी
वाट बदलून लाजुनी जाते
पोर जी बागडायची पुर्वी
वाटली जायची घरामध्ये
वेदना परवडायची पुर्वी
त्रासुनी द्यायची शिवी आजी
आणि ओवी झडायची पुर्वी
मी तिला आज भावतो आहे
ती मला आवडायची पुर्वी