जलदुर्ग २ - कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..
२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती.