मराठा इतिहास दिनविशेष ... मे महिना.. भाग १..

Submitted by सेनापती... on 12 May, 2011 - 09:42

१ मे १६६५ - पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. वज्रगडापाठोपाठ माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात गेल्याने आता मराठे पुरंदरच्या बालेकिल्ला कसोशीने लढवू लागले. दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एकच एल्गार सुरू झाला.

१ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात १ मे रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला.
३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.

४ मे १७३९ - वसई विजयोत्सव दिन.. वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.

५ मे १६६३ - गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले. १६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

६ मे १६५६ - रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले. रायरी हा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

९ मे १६६० - शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे - सासवड ताब्यात घेतले.

१० मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात प्रचंड तोफांचा मारा करून मेजर प्रोथेरने रायगड किल्ला उध्वस्त केला. ४-१० मे असे ६ दिवस ही कारवाई सुरु होती. अखेर १० मे रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

११ मे १७३९ - मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

१२ मे १६६६ - शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब आणि शिवाजी महाराज यांची ही पहिली आणि अखेरची अशी एतिहासिक भेट. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.

१३ मे १८१८ - दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.

१४ मे १६५७ - संभाजी राजांचा पुरंदर गडावर जन्म. (ज्येष्ठ शुक्ल द्वादशी)

१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

तळटीप: सदर तारखा, प्रसंग मी विविध संदर्भ पुस्तकांमधून मिळवलेले आहेत...

पुढील भाग - मराठा इतिहास दिनविशेष ... मे महिना.. भाग २.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान माहिती ..
अवांतर
आता आजुन २०० वर्षांनी आजुन कोणीतरी लिहील का? मे महिन्या मधे लादेन ची क्रुर हत्या Happy

अप्रतिम !!

४ मे १७३९ - वसई विजयोत्सव दिन.. वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला. खुद्द चिमाजीआप्पा किल्ल्यासमोर उभे राहिले ह्यानंतर मराठ्यान्नी एकच एल्गार केला आणि ४ वर्षे सुरु असलेला पोर्तुगीजांविरुद्धचा लढा वसईकिल्ला जिंकून संपवला.

वसईचा स्ट्रॅटेजीक लोकेशन असलेला किल्ला अन पोर्तुगिजाचें तत्कालीन युध्दबळ पाहता वसईचा विजय हा एक चमत्कारच म्हणावा लागेल !
(बाजीरावांच्या अफाट पराक्रमा मुळे नेहमी चिमाजी अप्पांच्या कर्त्रुत्वाकडे दुर्लक्ष झाले असे वाटते !!)

१५ मे १७३१ - छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

दाभाडे ( जे की, माझ्या माहीती नुसार , स्वराज्याचे सेनापती होते ) त्यांच्या विरुध्द स्वराज्याच्याच पेशव्यांची लढाई का बरे झाली असावी ? आणि चक्क पेशव्यांचा विजय होतो हेही आश्चर्यच !!

पंत - दाभाडे स्वराज्याचे सेनापती होते, त्यांची काही वतने काढुन शाहुमहाराजांनी चिमाजी अप्पाना दिली,
त्याच वेळी निजामाने त्याना कोल्ह्यापुकरमहाराजांची तळी उचलण्यासाठी वतनाचे अमिष दाखवुन शाहुमहाराजांना संपवण्याचा घाट घातला,
त्यावेळी बाजीरावांशी झालेल्या लढाईत दाभाडे मारले गेले.