नारळीभात (जुन्या मायबोलीवरुन)

Submitted by स्वाती_आंबोळे on 30 July, 2009 - 09:47
naralibhat
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ वाट्या तांदूळ
२ वाट्या गूळ
१ वाटी नारळाचा चव
४ वाट्या पाणी
तीन चार लवंगा
वेलचीपूड, केशर
आवडीनुसार बेदाणे, बदाम काप, काजू तुकडे

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. कडेने थोडे तूप सोडा. वेलचीपूड, केशर घाला. प्रेशरपॅनचे झाकण लावून दोनतीन शिट्ट्या आणा. झाकण निघाले की वरून बदाम काप, बेदाणे, आवडत असल्यास काजूचे तुकडे इत्यादी घाला.

या प्रकारात भात नीट खुटखुटीत शिजवणे, शिजल्यावर ढवळताना शीत मोडू न देणे इ. टेन्शन्स न राहता उत्तम मऊ, मोकळा आणि अखंड शितांचा भात तयार होतो.

वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ही प्रमाणं तुम्ही वापरत असलेला तांदूळ आणि तुमची गोडाची आवड यानुसार बदलावी लागतील. मी इथे टिल्डा बासमती तांदूळ वापरते.

जुन्या मायबोलीवरील माहितीचा दुवा
नारळी भात

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केला. मस्तच झालाय. मला आणखी गोड चालला असता.

हा फोटू - (१. माझ्याकडे रसायनविरहीत गूळ आहे, जो खूपच डार्क आहे, त्यामुळे भाताला ब्राऊनीश रंग आलाय. २. मुली फडफडीत भात खातच नाहीत म्हणून पाणी जरा जास्त घालून मऊ केला होता. )

DSC03680.JPG

स्वाती, धन्यवाद, कूकर रेसिपीबद्दल.

नारळी भात आणि बरोबर काय करावे? इथे रहाणार्‍या ३ कुटुंबांनी एकत्र येऊन नारळी पौर्णिमा साजरी करायची ठरवतोय. लहान मुले, आमची पीढी नि आमचे आई बाबा असे सगळे आहोत.

छोले पुरी नि नारळी भात म्हणजे टू मच होईल ना?

मवा,
छान दिसतोय भात :).
स्वाती,
रेसिपी छान आहे (आणि सोपी वाटतेय..) तू केलेल्या भाताचा पण एक फोटो टाक .

आज रात्री नारळीभात करावा या विचारात आहे.पण थोडं कन्फ्युजन झालंय. ज्यांनी आधी करून बघितलाय त्यांनी सांगितलंत तरी चालेल कारण स्वाती झोपेत असेल आत्ता.

तांदूळ धुवून निथळून ठेवा. मग प्रेशरपॅनमध्ये तुपावर लवंगांची फोडणी करुन त्यावर तांदूळ परतून घ्या. त्यात खोबरे घालून पुन्हा दोन मिनिटे परता, मग पाणी (आधणाचे घातल्यास उत्तम) आणि गूळ घालून ढवळा. >>>>आधणाचं पाणी कुठून आलं की दुसर्‍या गॅसवर पाणी ठेवायचंय?

प्रेशरपॅनमध्ये न शिजवता साध्या पॅनमध्ये वाफेवर शिजवलेला चालतो कां? जसा पुलाव वै करतो तसं?

आडो, अगं दुसर्‍या एखाद्या पातेल्यात पाणी तापव आणि मग ते तांदूळामधे घाल. कधीही भात करताना असे पाणी घातले की भात लवकर होतो.

(मी इथे ही कृती लिहून घ्यायलाच आले होते.) आज मिशन नारळीभात.

नारळीभाताबरोबर हिरवीगार झणझणीत मटार उसळ सह्ही लागते अन ताटात ते कलर कॉम्बिनेशन पण मस्त दिसतं! - मागे मी हा फोटो एक दोन वेळा टाकला होता Happy
nb.jpg

सीकेपी नारळीभात
जिन्नस, त्यांचे प्रमाण सर्व सेमच. फक्त करताना पद्धत थोडी वेगळी .
नारळाचा चव २ वाट्या पाणी घालून मिक्सरमधून काढावा. बारीक तारेच्या गाळणीतून गाळून दूध काढावे. पुन्हा तो चव आणि २ वाट्या पाणी घालून दुसरे दूध काढावे. मग हा चोथा झालेला बाजूला ठेवावा. ( यात फारसे सत्व राहिलेले नसते. मग ते आम्ही थोड्या पाण्यात पुन्हा वाटून केसांना लावतो, नाहण्या आधी १ तास Happy )
तुपात लवंग आणि दालचिनीचा मोठा तुकडा टाकून भिजवलेले तांदूळ आणि भिजवलेल्या बदामाचे काप चांगले परतून घेतले की आधी दुसरे काढलेले ( त्यामानाने पातळ ) नारळाचे दूध घालायचे. हे आटायला लागले की पहिले दूध घालायचे. मग भात आळत आला की झाकण ठेवायचे. पाच मिनिटांनी झाकण काढून भात शिजला ना हे पाहून मग त्यात गूळ ( किसलेला) टाकून उलथण्याच्या मागच्या बाजूने हलकेच ढवळायचे. पुन्हा झाकण ठेऊन दोन मिनिटं झाकण ठेवायचे. आता त्यात बेदाणे घालून पुन्हा एकदा हलकेच हलवून गूळ नीट मिक्स झालाय ना हे पाहून झाकण ठेऊन गॅस बंद करायचा.
नारळाचे असे दुहेरी दूध घातल्यामुळे भात मस्त सुरमट होतो. थोडी खटखट वाटेल पण एकदा हा भात करून बघाच. खाताना नारळाचा चव तोंडात येत नसल्याने, मस्त तोंडात विरघळत जातो. अर्थात न्युट्रिशिअस व्हॅल्यू कमी होते, हे खरेच. पण एखाद दिवशी चालेल ना ? Happy

माझापण आजचा मेनू हाच! पहिल्यांदा करणार आहे, कृती बघून तरी जमेल असं वाटतंय. केला की फोटू टाकते इथे.

कालच ह्या कृतीने भात केला, २ वाट्या तांदळाला २ वाट्या गूळ घालूनपण खूप फिक्का झाला, या आधी केला होता तेव्हा एकदम छान झाला होता. गुळात कमी जास्त गोडवा असतो का? आता काय करता येईल, थोडा गूळ/साखर घालून परत वाफवले तर चालेल का?

मी ही ह्या पद्धतीने केला परवा. २ वाट्या तांदळाला २ वाट्या गूळ घालून खूप अगोड वाटला. मग अजून अर्धी वाटी गूळ अ‍ॅड केला, तेव्हा थोडा गोडाच्या आसपास पोचला. काल खाताना अजून थोडा गूळ घातला, मग बरा झाला.

नारळीभात, मटकी उसळ, पोळी. दह्याची कवडी. Happy

मी तिप्पट पाणी घालून नॉन्स्टिकच्या भांड्यात केला. प्रेशर पॅन नाहिये. बासमती तांदूळ.

स्वाती अप्रतिम झाला या पद्धतीने नारळीभात. रंगही छान आला. मैत्रेयीवरुन प्रेरणा घेऊन मी सुद्धा मटारची हिरव्या ग्रेव्हीची उसळ केली. झकास जमला मेनू. धन्यवाद!

स्वाती, धन्यवाद. तुझ्या कृतीने मसालेभात माझा कायम चांगला होतो. नारळीभाताची मलाच थोडी धाकधूक होती, पण या कृतीने झटकन आणि मस्त झाला. नवर्‍याला फारच आवडला. (माझ्या आईचा इतका लवकर भात करून होत नाही, अशी कमेंट आली.) लेकीने पण थोड्या मिटक्या मारल्या.

मैत्रेयी, तुलाही धन्यावाद. मीपण मटार उसळ केली होती. तुझी टीप आवडली. मेनू मस्तच झाला होता.

मी आताच ही कृती वाचली. नारळाचे दूध न घालता डायरेक्ट किसलेला नारळ भातात घालून चालते का? माझी आई नारळाचे दूध घालते ?

मला पण खूप आवड्तो ... उद्या करायचा आहे... मी भात वेगळा शिजवते खर.... आणि मग नारळ , गुळ थोडे गरम करुन सगळे एकत्र करते... असा करुन बघेन ह्यावेळि

कमी कटकटीची मस्त पद्धत आहे. यंदा ह्या पद्धतीने केला. थोडा अगोड झाला आहे. पुढल्या वेळी गूळ जरा जास्त घालेन. बाकी प्रमाण पर्फेक्ट! धन्यवाद.

अरे वा! छान सोपी कृती वाटते आहे. आज करुन पाहते. धन्यवाद स्वाती

नारळ नाही मिळत इथे (म्हणजे अजून सापडले नाही).
कोकोनट मिल्क + डेसिकेटेड कोकोनट घालू का? मग पाणी कमी घालावे लागेल ना?

Pages