चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेफिवर "Thrash" पाहिला. बरा आहे. मधे साधारण अशाच विषयावर "क्रॉल" नावाचा एक पिक्चर आला होता. तो ही बरा आहे. डिझास्टर मूव्हीज आवडत असतील तर बघा.

तू या मै थोडा पाहिला. अस्मिताने लिहीलेल्या "नेपो किड व्हाइब" बद्दल टोटली सहमत.

(रेखाच्या डोक्यावर अननस >>> Lol )

शनाया नावावरूनच कोणाचीतरी मुलगी वाटली होती. म्हणजे सगळीच मुले कोणाचीतरी मुले असतात पण ही नेपो किड आहे असे नावावरूनच समजले. तिचा पहिला सीन आहे त्यात काही सेकंद ती छान वाटली. हसते तेव्हा थोडी नीलमची झाक वाटली. मात्र तेवढ्यापुरतीच. ना ती दिसायला काही खास आहे ना सीन्स मधले कॅमेरा अ‍ॅंगल्स तिला लुक/प्रेझेन्स बद्दल काही मदत करतात. केवळ गोरी व पॉश राहणी यामुळे सुंदर समजल्या जाणार्‍या मुली असतात तशीच ती वाटते. अभिनय वगैरे ठीकठाक आहे. पण अशा नेपो लोकांना रोलही त्यांना फार त्रास न देणारे असतात. फॅशन डिझायनर, मार्केटिंग वगैरे. सीन्समधेही पार्टी, डान्स, क्रश, ब्रेक अप. म्हणजे एरव्ही जे करतात तेच हावभाव करायचे असतात.

दुसरा लीड आदित्य गौरव चांगले काम करतो. त्याला व्हाइट टायगर आणि आणखी कोणत्यातरी पिक्चर मधे पाहिला आहे. पण एकूण आणखी चांगले कलाकार असते तर भारी वाटला असता पिक्चर. मी पाहिला तोपर्यंत बघणेबल वाटला. अजून मगरीचा ड्रामा सुरू व्हायचा आहे. याला पैसे देऊन फितवायचा प्रयत्न करतात तिथपर्यंतच पाहिला आहे. बराच मोठा आहे पिक्चर.

आदित्यच्या घरचे वातावरण चांगले आहे. क्षिती जोगचे कामही. फिल्म इण्डस्ट्रीमधले सगळे लोक वेस्टर्न लाइन वर राहतात का? पिक्चर्स मधे मुंबईच्या उपनगरांची नावे नेहमी वेस्टर्न लाइनवरची असतात. अंधेरी, "बॅण्ड्रा" वगैरे. यातही नालासोपारा आहे. रा.वन मधली लोकल सुद्धा बांद्र्याला आहे असे सीनवर येते, जरी ती सीनमधे नंतर भायखळ्यावरून जाताना दाखवली होती. त्यातही भायखळ्याचा उल्लेख संवादांत किंवा स्क्रीनवर नाही असेच आठवते. मध्य रेल्वेची ही उपेक्षा मराठी माणसाचीच उपेक्षा आहे असे समजून आंदोलन करायला हवे. लोकल्स चालताना बर्‍यापैकी हलतात त्यामुळे आंदोलक लोकलमधे बसले तरी आपोआप आंदोलन होईल.

पिक्चर्स मधे मुंबईच्या उपनगरांची नावे नेहमी वेस्टर्न लाइनवरची असतात.>>

मरे ची सतत उपेक्षा होत आलेली आहे. आणि हे हिंदी मध्येच नाही तर मराठी मध्ये पण. एक वेळ बोरिवली म्हणतील पण भांडुप वगैरे नाही.

त्यात मराठीत त्या हांडेंचे एक गाणे होते बहुतेक सायन आया सायन आया. त्यात मरे स्टेशनची नावे होती.

लोकल्स चालताना बर्‍यापैकी हलतात त्यामुळे आंदोलक लोकलमधे बसले तरी आपोआप आंदोलन होईल.”
>>>
Lol Lol

केवळ गोरी व पॉश राहणी यामुळे सुंदर समजल्या जाणार्‍या मुली असतात तशीच ती वाटते.>>>> अगदी. ग्लॅमरस आहेत, मुळात सुंदर नाहीत.

आंदोलन Lol

फिल्म इण्डस्ट्रीमधले सगळे लोक वेस्टर्न लाइन वर राहतात का? पिक्चर्स मधे मुंबईच्या उपनगरांची नावे नेहमी वेस्टर्न लाइनवरची असतात.
>>>>

पहिल्या प्रश्नाचे उत्तर हो, कारण गोरेगाव फिल्मसिटी असल्याने बांद्रा ते अंधेरी जुहू या पट्ट्यात राहतात. आमच्या जुन्या बिल्डिंगमधील एक फिल्म लाईनमध्ये स्ट्रगल करणारे कपल सुद्धा इथे राहून काय होणार नाही म्हणत तिथे राहायला गेले होते.

पण त्यामुळे वेस्टर्न लाईन स्टेशनचे उल्लेख जास्त असतात हा विचार कधी केला नव्हता.

नवी मुंबईतील स्टेशन नवीन असताना, चकाचक आणि रिकामे असताना तिथे बरेच चित्रपटांचे शूटिंग व्हायचे.

ती शनाया ेकपूर ‘आती नही’ फेम संजय कपूरची मुलगी. पंजाबी जीन्स, उत्तम राहणीमान, ॲक्सेस टू बेस्ट डिझायनर्स, मेकप आर्टिस्ट, जिम ट्रेनर्स, लहानपणापासून चेहरा व फिगर हे कीकार्ड मानणाऱ्या सृष्टीतील मुली ऐन तारुण्यात जेवढ्या ग्लॅमरस दिसतील तेवढी ती दिसते. पण तिचा चेहरा मला अंतर्वक्र वाटतो.

चेहऱ्याची ठेवण चांगली नाही, मग कितीही कॉस्मेटिक सर्जरीज करा काही होत नाही. हल्ली सेम फेस सिंड्रोम आला आहे, काहीबाही करून सगळे शो बिझनेस मधले स्त्री- पुरुष सारखेच दिसतात. त्यामुळे काहीही डिस्टिंक्ट नसलेले व मुळात ब्लॅन्ड असणारे लक्षात राहात नाहीत. मला तर नेपो किड्सची दयाच येते, खरंच त्यांना या क्षेत्रात यायचं असतं की सोपं आहे, ग्लॅमरस आहे, प्रसिद्धी- पैसा आहे, आईवडीलांची इच्छा आहे म्हणून येतात त्यांनाही कळत नाही बहुतेक. अभिनय यायला ज्या जगाची कल्पना लागते त्यापासून हे कायम दूर राहिलेले असतात. त्यामुळे बॉडी लँग्वेज अक्षरशः परदेशी लोकांसारखी असते. उच्चार येत नाहीत, हिंदी येत नाही. माहिती नसलेले पटापट शिकायला जी हुशारी, आकलनशक्ती लागते तीही नसते. त्यामुळे एक डम्ब वाईब पण येते सोबत.

सेम फेस सिंड्रोम आला आहे >>> खरंय. पूर्वी हिरॉईन्स वेगवेगळ्या फिचर्समुळे उठून दिसायच्या. अलीकडे कपकेकसारख्या एकाच साच्यातून काढल्यासारख्या वाटतात. फारफार तर नाकी डोळी नीटस कॅटेगरीत मोडणाऱ्या मुलींना घासून पुसून ठराविक कॅमेरा ॲंगल्स लावून अप्रतिम सुंदऱ्या म्हणून पेश केलं जातं.

सायन आया, सायन आया
दादर माटुंगा सायन आया
कुर्ला, घाटकोपर और मुलुंड के बाद
ठाणा, कळवा, मुंब्रा, दिवा, कल्याण आया

काय सांगू तुम्हाला या मुंबईची कथा
रोज येथे पाकीट जाते उठताबसता

असं तुटक आठवतंय....
असंच होतं ना? अवांतरासाठी सॉरी पण रहावले नाही, Happy
मस्त होता तो प्रोग्रॅम, मंगलगाणी, दंगलगाणी...
चौरंग प्रस्तुत...

अलीकडे कपकेकसारख्या एकाच साच्यातून काढल्यासारख्या वाटतात. >>> अगदी अगदी
शनाया,अन्यन्या, सारा, शाखाची पोरगी, बोनि कपुरची तिनही रत्न अत्यत अ‍ॅव्हरेज अभिनय आणी लुक्स..सगळेच एकाच साच्यातले
त्यातही आलिया वैगरे सारख्या अतिसामान्य चेहरा, अन्गकाठी आणी अभिनय ही जेमतेम येणार्‍या वैगरे असणार्‍या सुद्धा पण नशिब थोर त्यामुळे "किती ग बाई ही हुशार, किति ग बाई ही सुन्दर" वैगरे सारख बोलुन बोलुन त्याना चढवणारे केजो सारखे डायरेक्टर बाकिच्यानाही तेच बोलायला भाग पाडतात.

आलियाचं काम मला राझी आणि हायवे मध्ये आवडलेलं, चांगला अभिनय केलेला. बाकी फार कुठले तिचे चित्रपट बघितले नाहीत.

मध्यंतरी कुठल्या award function मध्ये तिने केलेल्या anchoring चे शॉट्स बघितले, तिथे नाही आवडली.

Male ऍक्टर्स हल्ली जी विचित्र fashion करतात.
स्वच्छ clean shaven फ्रेश लुक हद्दपार झालाय जणू.
सगळे दहा बारा दिवस अंघोळ न केलेला तेलकट केसाळ लूक घेऊन फिरत असतात

अरे! डोंबिवली फास्ट, बदलापूर अशी अनुक्रमे मराठी आणि हिंदी चित्रपटांची नावे आहेत. Proud बदलापूर मध्ये पन इंटेंडेड असले तरी एकदा स्टेशनची पाटी आलेली आठवते. डोंबिवली फास्ट म्हणजे घरचेच कार्य!

त्या हांडेनी मात्र ठाणा कळवा मुंब्रा दिवा स्टॉपिंग ॲट ऑल स्टेशन्स गाडी अचानक डोंबिवली फास्ट केलेले मात्र आम्हाला अजिबात आवडले न्हवते!!! ते एक इथेच सांगून ठेवतो! Lol

कोपरखैरणे, सीबीडी, सानपाडा, वाशी ही सिनेमात आठवतात. ते ऋन्मेश म्हणतोय तशी हार्बर लाईनची नवी कोरी स्टेशन्स आणि गर्दी नाही ह्या कारणाने होती.

पंखा फेल... Xxxxxx
चौथ्या सीटसाठी चाले मारामारी !

असही एका कडव्यात होतं.

आलियाचं काम मला राझी आणि हायवे मध्ये आवडलेलं, चांगला अभिनय केलेला >>>> १००++

आणि कलंकमधे तिचा लूक (आणि कपडेपट) गाणी पाहून आवडला होता.

तीच गाणी पाहून पिक्चर काय असेल असा अंदाज आल्याने पिक्चर अर्थातच पाहिला नव्हता.
कलंक हे अत्यंत पिसं काढणेबल मटेरीअल असणार यात वाद नाही. अस्मिता, फारेण्ड, श्रद्धा, पायस जरा मनावर घ्या.

आलियाचा अभिनय ओळखायला राझी हायवे इथवर जायची सुद्धा गरज नाही. ते वरून धवन सोबतचे हम्प्टी शर्मा की आणि बद्रीनाथ की दुल्हनियाँ मध्ये सुद्धा छान अभिनय आहे. चित्रपट एंटरटेनिंग असले की अभिनय झाकोळले जातात. पण त्यामुळेच चित्रपटाला रिपीट व्हॅल्यू येते.

आणि डियर जिंदगी विसरायला नको. मी हा पहिल्यांदा थिएटरमध्ये पाहिला होता. आवडला होता, पण फार नाही.. तरीही मी त्यानंतर घरी तो अजून तीन वेळा पाहिला आहे. आधी मला वाटले की हा शाहरुखमुळे पुन्हा पुन्हा बघतोय. पण नंतर जाणवले हा आलियाच्या कॅरेक्टरसाठी बघतोय.

भूत बंगला पाहिला काल

टिपिकल प्रियदर्शन सिनेमा
त्यात जुन्या सिनेमांमधले हिट पंचेस परत वापरलेत
जुनी गाणी रीमिक्स होऊन येत होती, जुन्या सिनेमांचे रिमेक झाले आता जुने डायलॉग पण रीसायकल होतायत

पहिला हाफ मुख्यत्वे अक्षय, परेश, राजपाल अन् असराणी ची कॉमेडी अन् दुसऱ्या हाफ मध्ये हॉरर
तब्बू ला काही स्कोप च नाहीये, वामिका चं कॅरॅक्टर पण अजून फुलवता आलं असतं, पण ऑलरेडी पावणे तीन तासाची लांबी झाल्यानी एडिटर नी कात्री चालवली असण्याचीही शक्यता आहे...

नेटफ्लिक्स वर येईल काही दिवसांनी...

डोंबिवली फास्टवरून आठवलं - मायकल डग्लसचा एक सिनेमा आहे (फॉलिंग डाऊन) त्याची स्टोरी सिमिलर आहे. पाहिलाय का कुणी?

मध्यंतरी 'मॉन्स्टर्स बॉल' बघितला.
हॅले बेरीला ऑस्कर मिळालं होतं.

तिच्या नवर्‍याला एका गुन्ह्यात फाशीची शिक्षा झालेली असते. शिक्षा अंमलात येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष पुरवणारा प्रिझन गार्ड - बिली बॉब थ्रॉन्टन. त्याच्या टीममध्ये त्याचा तरुण मुलगाही असतो - हीथ लेजर.
फाशी अंमलात येते, ती साहजिकच उद्ध्वस्त होते. आर्थिक चणचण, एकटेपणा.

प्रिझन गार्डचा बाप वर्णद्वेषी असतो, प्रिझन गार्डचा मुलगा त्याच्या बरोबर उलट असतो. दोघांच्या मध्ये विधुर प्रिझन गार्ड अडकलेला.
कैद्याची बायको आणि प्रिझन गार्ड यांची योगायोगाने ओळख होते, मैत्री होते, आपलेपणा वाढतो. एकटेपणातून आलेला एक मोठा ढळढळीत सेक्स-सीन! ती कोण आहे हे त्याला माहिती असतं, तो कोण आहे हे तिला आधी माहिती नसतं. जेव्हा माहिती मिळते तेव्हाही ती स्वत:ला समजावते आणि त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेते.

टायटलचा अर्थ एका डायलॉगमध्ये सांगितलाय - कैद्याला फाशी देण्याच्या आदल्या दिवशी प्रिझन गार्डसनी पार्टी करायची पद्धत असते. म्हणजे त्या प्रसंगाला तोंड देणं सोपं होईल. त्या पार्टीला मॉन्स्टर्स बॉल म्हणतात.

सिनेमातल्या बहुतेक घटना फाशीनंतर घडतात, तरी त्याला हे टायटल का दिलंय असा प्रश्न पडला.

विषय चांगलाय, पण सिनेमा फार काही ग्रेट वाटला नाही. हॅले बेरीचा अभिनय काही ठिकाणी अति वाटण्याजोगाही झालाय. (पण कदाचित त्यावर्षीच्या ऑस्कर शर्यतीतल्या अभिनेत्रींमध्ये तिचा अभिनय चांगला ठरला असावा.)
हीथ लेजरला वाया घालवलाय असंही वाटलं.

किल्ली +१

इतके कळकट का दिसतात काय माहिती. दाढी वाढवल्याने आपण चांगले दिसतो असा गैरसमज कोणी करून दिलेला आहे ते समजेल का?

मटका किंग पाहिला
आवडला.
सई ताम्हणकर गृहिणीच्या भूमिकेत तितकी नाही आवडली.
कपडेपट आवडला.
भरत जाधव, जिमी लिव्हर यांच्या छोट्या भूमिका आवडल्या.
गिरीश कुलकर्णी तर ओळखू येत नाही.
सैराट टीम मधील दोन चार जण दिसले.

Pages