धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे वृ मस्त
माझेमन, एक image मनात तयार झाली होती तशी तू दिसत नाहीस, पण छान दिसतेस. एकदम जुनी मैत्रीण असल्यासारखी भेटलीस.
अजय फेबु account delete करून बरेच महिने झाले, आता माबो वगळता कुठल्याच सोमी वर नाहीये मी. यंग दिसते म्हणालात म्हणून थँक्यू बरं का.
कवीन, साजिरा, कुमार सर मस्त posts आणि वृ.
खरंच मजा आली.
छोटासा वृ लिहीन म्हणते. तेव्हा डिटेल्स लिहिते

मी घाईत होते ह्यावेळी, ह्यावेळी गप्पा राहून गेल्या, सगळ्यांशीच.
पण जेवढा वेळ होते समेट रही थी सारे पल वो दोस्ती के चांदनी के....

तर आता क्रमश: पुढे नेत पुढचा भाग लिहीते.

आम्ही रिक्षातून उतरत असतानाच योकुचा फोन आला "आहात कुठे?"
म्हंटल हे काय गेटपाशी आहोत येतोच दोन मिनिटात

तर म्हणे रोप सोडू का खाली

म्हंटल रॅपलिंग इज हॅपनिंग करायच असेल गटगला ... ॲडव्हेंचर कमी पडलं असावं. येऊदे म्हंटल रोप

कसलं काय पाच मिनिटे वाट बघितली रोपाची पण रोप काही आलाच नाही खाली, पण रोपा ऐवजी रुपा धनीच्या नावाचा कागद मात्र डकवकेला दिसला. लग्नी हॉलबाहेर नवरा नवरीचे नाव लिहीलेले असते त्याची आठवण झाली. इतके दिवस मस्करीत त्यांना लग्न लावतो परत म्हणत होतो ते इतकं मनावर घेतलं की काय असं वाटून गेलं. आता काय वर गेल्यावर कुर्ता पायजम्यातला धनी आणि शालु नेसलेली रुपा बघायला मिळते की काय वाटलं होतं पण तसं काही झालं नाही. नवरा नवरी informal dress code मधे आणि दोन करवल्या तेव्हढ्या साडी नेसून आल्या होत्या.

मुग्धा आणि रश्मी तुमच्या साड्या आणि साड्यातल्या तुम्ही एकदम बदाम बदाम बदाम

बरीच मंडळी ऑलरेडी आली होती. काही ओळखीचे काही अनोळखी चेहरे समोर दिसत होते. अनोळखी पैकीही कुमार सरांचा चेहरा ओळखीचा होता यापुर्वीच्या गटग फोटोंमुळे. पशुपत, तिता आणि कुमार सरांचा वैचारिक कोपऱ्याचा त्रिकोण मी दुरून बघत होते. उत्सुकता होती तिथल्या गप्पांची पण भिड मधे आली Proud पुढल्यावेळी भीडेला (विनय भिडे नव्हे) घरी ठेवून येईन आणि भिडेन जाऊन

रुपाशी 1:1 level ला पण गप्पा झालेल्या असल्याने तिला भेटायची उत्सुकता होतीच. मांजर प्रेम या कॉमन धाग्यामुळे धनवंतीशी पण न भेटताच घट्ट मैत्र जमले होते त्यामुळे तिलाही भेटायची इच्छा होती. भेटीची इच्छा पुर्ण झाली पण गप्पांची हौस पुर्ण नाही झाली. या दोघींशी फार गप्पा नाही झाल्या. इतरही बऱ्याच जणांशी हाय बाय टाईप अगदी थोड्या गप्पा झाल्या. तरी मी मुंबई सर्कल पासून अधून मधून वेगळं होत इतर गृप मधे जाऊन किंवा एकेका आयडीला पकडून गप्पा मारायचा प्रयत्न केला, पण गटगच महा गटग असल्याने प्रयत्न जरा जरा तोकडा पडला. पण हे ही नसे थोडके, आता होपफुली गप्पा भेटी होत रहातीलच, इथेही आणि व्हॉट्स ॲपवरही.

आता वळते ओळख परेड कडे. विशालने माईक स्पिकर अशी सगळी चोख व्यवस्था केली होती. प्रत्येकाने पुढे येऊन ओळख करुन द्यायची आणि टाळ्या वाजल्या की जागेवर जायचं या नियमाने माझ्या पोटात उगाचच पाकपुक होत होती. ८० डोळे मी काय बोलते याकडे लागलेले असणार या कल्पनेनेच "हे धरणी माते मला पोटात घे" वाले फिलिंग्ज आले होते. बरं मी कविता माझा आयडी कविन इतकच सांगायचय मला तर त्यासाठी समोर कशाला जायला हवय. मी आहे त्याच जागेवर उभी रहणार असा हट्टच धरला. धनवंतीला तो मोडायचा होता पण अनया धनुडी असे दिग्गज माझ्या बाजुने असल्याने तिचा नाईलाज झाला Proud
मी कविन अशी ओळख देऊन माईक देत होते सामीकडे तर दक्षीला आठवलं "तू याबायका चॅनल आणि अंकाबद्दल सांगून टाक ना"
हायला! हो की लगे हाथ मार्केटिंग करुन टाकायचे कसे सुचले नाही आधी म्हणत दक्षीला लब्यु म्हणत मी मार्केटिंग करुन घेतले आणि समस्त पब्लिकला लाईक सबस्र्काईब करायला सांगितले. तुम्हीही केले नसेल तर लगे हाथ करुन टाका बरं आधी Wink

साजिराच्या ओळखीबद्दल लिहीलेच आहे. एक साजिरा अनेक आयडींना खिशात घेऊन आला होता म्हणे. त्यातल्या दोन डु आयना त्याने उदार मनाने समोर आणलं. रॉबिनहूड यांना साजिरा गाडीत घालून घेऊन आला म्हणून हा ऐतिहासिक आयडी मला याची डोळा बघायला मिळाला त्याबद्दल मंडळ आभारी आहे Lol रॉबीनहूड सारखे सारखे साजिराला माझा आयडी मला परत दे, माझी सिनिऑरिटी जाते म्हणत होते ते पाहून मला "राजा ..... माझी टोपी घेतली ..." वाली एक ओळ उगाचच आठवत होती. रॉहू आता भेटलोय तुम्हाला तर सिनियर आहात हे आम्ही मान्य केले आहेच, जाऊद्या की काय त्या जुन्या आयडीच एव्हढ लावून घेताय मनाला. और भी गम है जमानेमे Lol

अनया, प्रज्ञा आणि धनुडीला मी आयडी म्हणून ओळखत होते पण पैचान कौन म्हंटल्यावर फेल झाले. सई, माझेमन, अश्विनी९९९ आणि अश्विनी११ यांनाही पहिल्यांदाच भेटले. फार गप्पा नाही झाल्या त्यांच्याशी पण ज्या झाल्या त्यावरुन गप्पा मैफील छान जमेल आमची असे वाटले.

किल्लीने "मी युनायटेड स्टेट्स ऑफ आळंदीहून" आलेय सांगून एकदम तिच्या स्टाईल ओळख करुन दिली. एक ही दिल है कितनी बार जितेगी बच्ची तू

अजय चव्हाणने तिच्या पावलावर पाऊल ठेवत तो युनायटेड स्टेट्स ऑफ डोंबिवलीहून आल्याचे सांगितले आणि माझा ॲंटिना आपोआप ट्युन झाला Lol
नंतर त्याच्याशी बोलताना त्याने dmart जवळ रहातो सांगितले आणि मग मला माझ्या मनाला नव्याने उगी उगी करावे लागले ... "hey mind! pls accept that midc is also Dombivali, Dmart is Dombivali, palava is Dombivali, Lodha is Dombivali" भ्या भ्या भ्या
मन आतल्या आत रडून घेऊन तयारच झालं होतं त्याला डोंबिवलीकर म्हणायला तर त्याने बॉंबच टाकला म्हणे डोंबिवली नाही आवडत. खळ्ळ खट्याक हुर्र हुर्र ... अपुनका तो पहला प्यार है डोंबिवली (पाणी का नसेना, वीज का जाईना, गर्दी का असेना, रस्ते का खोदेनात Wink ) भाई तू ठाण्याशी कंपेअर करणं सोड आणि डिमार्टच्या आजुबाजूला चांगल्या बदामी आठवणी जमव आणि मग बोलू आपण नेक्स्ट गटगला डोंबिवली बद्दल. गुलाबी दिसत नसेल तर चष्मा बदल पण डोंबिवली को कुछ बोल मत Proud अंजुताई तू प्रेमाने सांग बरं त्याला डोंबिवली इजे लव्ह म्हणून Proud

तर आता हे क्रमश: डोंबिवली इजे लव्ह नोटवरच थांबवते. मी परत येईन मी परत येईन मी परत येईन Proud

क्रमश:

किल्ली 'छान दिसतेस' म्हटल्याबद्दल थँक्यू बरं का. पण लगे हाथ कशी इमेज होती डोक्यात तेही सांगून टाक.

कविन चांगला चाललाय वृत्तांत. मजा येतेय वाचायला.

अजय चव्हाण लय भारी.

>>>"अजय मस्त खुसखुशीत वृ. हा मातीचा पाण्याचा गूण म्हणावा का डोंबिवलीच्या">>>
असेच म्हणतो... 👍

>>>"अपुनका तो पहला प्यार है डोंबिवली"
+१०००
साधारण दशकभरापूर्वी मी बिलकुल सहमत नसतो झालो, पण आता अजय ह्यांच्या "तर त्याने बॉंबच टाकला म्हणे डोंबिवली नाही आवडत." ह्या मताशी बऱ्यापैकी सहमत होऊ शकतो 😀

BTW इथे बरेच डोंबिवलीकर दिसत आहेत तेव्हा एखादे गटग करायचे घ्याच मनावर...

अजय दादा भारीच लिवलाव की. डोंबिवली गटग होऊनच जाऊदे कर्मभूमी सध्या तिथेच आमची>>>

हो करूया.. बरेच आहेत डोंबिवलीला राहणारे..

अजय चव्हाण कसलं खुसखुशीत लिहिलंय. लय भारी. तुम्ही डोंबिवलीत राहता का. माझं नाव वाचून एकदम छान वाटलं. सईने आठवण काढली का, ती दोनदा येऊन गेलीय माझ्याकडे, आवाज फार गोड आहे तिचा. भेटूया आपण.>>>

हो..मी डोंबिवलीलाच राहतो..हो सई मॅडमनी तुमची आठवण काढली, त्या म्हणाल्या अन्जुला मायबोलिकर कुणी भेटलं तर फार आनंद‌ होतो..तुम्ही एकाच शहरात राहता तर भेटा एकदा..

अजय मस्त खुसखुशीत वृ. हा मातीचा पाण्याचा गूण म्हणावा का डोंबिवलीच्या >>>

काय माहीत? तुमचा जो अल्पकाळ सहवास लाभला त्याचा असावा कदाचित..

अजय चव्हाणने तिच्या पावलावर पाऊल ठेवत तो युनायटेड स्टेट्स ऑफ डोंबिवलीहून आल्याचे सांगितले आणि माझा ॲंटिना आपोआप ट्युन झाला>>>

नाही..मी Republic of Dombivli म्हणालेलो आणि हे आपलचं पहिलं पेटंट आहे.. बीयुनीक ने आधीच फेमस केलयं हे..

डोंबिवलीकर म्हणायला तर त्याने बॉंबच टाकला म्हणे डोंबिवली नाही आवडत. खळ्ळ खट्याक हुर्र हुर्र .>>>

इतकही वाईट नाही पण संध्याकाळी स्टेशनवर शेअरिंग ऑटोसाठी जी कसरत करावी लागते ती एकदा अनुभवा.. म्हणजे कळेल आमच्या सारख्या नोकरदाराच दु:ख..
सकाळी ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही..संध्याकाळी उतरायला मिळत नाही आणि उतरलो कसंबसं तरी घरी जायला रिक्षा भेटत नाही.. गाडी घेऊन गेलो तर गाडीला पार्कींग भेटत नाही.. भेटलीच तर कुठयं नक्की आज पार्कींग डावीकडे की उजवीकडे? हया ट्रेजर हंट साठी क्लू भेटत नाही..जाऊ द्या बर्याच गोष्टी आहेत..

आता मी माझं पुराण सुरू करते:
रविवार म्हणजे एकतर सुटीचा दिवस, त्यात झोप पूर्ण करून घ्यायचा आटापिटा असतो माझा. पण कडकडीत सकाळी १ आणि कडकडीत तिन्हीसांजेला १ अशा लेकीच्या २ मॅचेस डेक्कन जिमखान्यावर होत्या आणि त्या दोन्हीसाठी मीच सपोर्ट-ट्रान्सपोर्ट स्टाफ असणार होते. त्यात कडकडीत दुपारची वेळ गटगसाठी होती. ट्रॅफिक, मॅच उशीरा सुरू झाली/ संपली तर काय... घरातली कामं.. कशाचं काय ठरेना! पण सकाळची मॅच लवकर संपली, मी ९:३० ला घरी आले. "कारल्याचा वेल लाव गं सुनबाई मग जा अपुल्या माहेरा..."च्या चालीवर साबा म्हणतील ती सगळी कामं उरकून ( Proud ) १२:३० ला अनयाला फोन केला. ती जाणार की नाही नक्की ठरलं नसेल; घरीच आहे का.. काय ते माहिती नव्हतं म्हणून
"कुठे आहेस" असं विचारलं तर तिने "इथेच आहे.. गच्चीवर..." म्हटलं. पुढे "रविराजच्या गच्चीवर" असं म्हणून क्लिअर केलं ते एक बरं झालं!
"किती जण आहेत? मी खायला काय खाऊ आणू?" असं म्हटल्यावर तिने लगबगीने "काही नको आणू. खूप लोक जमलेत आणि खूप खाऊ आहे. ये तशीच. उगीच वेळ नको घालवू" असं म्हटल्यावर मी पडत्या फळाची आज्ञा मानून गाडी हाणली. वाटेत फक्त गाडीला पेट्रोल पाजलं नाहीतर रविराजपर्यंत पोहोचलेच नसते! अनयाच्या लगबगीवरून, जर उशीर झाला तर रिकामी गच्ची आणि "तबकात राहिल्या देठ, लवंगा, साली..." असं दृश्य बघायला लागेल ही भिती होती!
मी रस्ता चुकण्यात माहीर आहे. दुचाकीवरून गूगल मॅप बघणं मला मुळीच पसंत नाही आणि चारचाकी मी चालवत नाही! खरेदी/ व्यायाम म्हणून नसेल तर कामासाठी चालत जाणं हे शक्यतो पुणेकरांना शोभत नाही. (नोंद घ्या.) त्यामुळे रविराजच्या कोपर्‍यावर उभं राहून "वळू की नको वळू" विचार करत गाडी थांबवून मॅप बघितला. मग एका टपरीवाल्याला पत्ता विचारला तर "हे काय समोर!" असं त्याने नीटच सांगितलं. रोमातला मायबोलीकर निघेल तो नक्कीच, त्याशिवाय अस्सल तुक तो देऊच शकत नाही!
तर, मी लोकेशनला पोहोचले. ऋतूराजनी अस्सल मुंबईकर पद्धतीने "तिसरा माळा" असं मेसेजमधे लिहिलं होतं. मी लिफ्टमधे जाऊन "तिसरा मजला" बटण दाबलं Proud गच्चीत गेले तर २ स्टाफ खुर्ची टाकून बसले होते. त्यांनी युनिफॉर्म घातला होता हे एक बरं झालं होतं, नाहीतर... जाऊद्या! मी इच्छित गच्चीत गेले तेव्हा संयोजक ऋतूराज पुढे आले. दक्षिणा स्वतःची ओळख करून देत होती. एका क्षणात मला काय चाललंय ते समजलं आणि मी शिताफीने मागच्या खुर्चीत जाऊन बसले कारण तिथली ओळख परेड होऊन गेली असावी असा माझा अंदाज होता. मी बसल्या बसल्या किती आयडी ओळखू येतात ते बघत होते. कुमार सर, पियू आणि अ'तुल (सॉरी बग येतोय म्हणून असं लिहिलंय) यांना ओळखलं. पियूनेही अगत्याने "आपण भेटलो होतो.." म्हणून आठवण करून दिली. कविन, धनूडी, किल्ली यांना झटकन ओळखलं. किल्ली तर आपण होऊन आली आणि भेट झाली. साजिरा होताच. शेजारी बसलेलं महान, जु-जा व्यक्तिमत्त्व काही केल्या ओळखू येईना. ते रॉबिनहूड होते हे मला फार फार उशीरा समजलं! काय हा माझा करंटेपणा! एके काळी पुपुवर ओळख नसूनही थोड्याफार गप्पा झालेल्या रॉहूंना मी ओळखलंच नाही!

तर मग मधेच कोणीतरी माईक इकडे द्या... सुरू केलं. मी म्हटलं कशाला जोखीम घेताय... मी सुरू केलं तर १ तास लेक्चर द्यायची सवय आहे मला... सुदैवाने मी त्यातून सुटले! Wink

तर, रमड, धनि, सई, हर्पेन, आयडू, अजय चव्हाण अशा सगळ्यांच्या ओळखी चालू होत्या. मग फोटोसाठी सगळे गोळा होत असताना माझेमन आली. इतकी अगदी रत्नागिरीची ओळख असून भेट झाली कुठे, तर पुण्यात गटगला! योग म्हणतात ते हे असे! इतका गोड नाजुक आवाज आहे तिचा, पोस्टी टाकताना गरजेनुसार एकदम ठाम भूमिका घेणारी ती हीच का असा प्रश्न पडला मला!
मग फोटोच्या निमित्ताने पुन्हा टवाळक्या करून झाल्या. गटागटात माबोकर गप्पा करत होते, ओळखी करून घेत होते. धनवन्तीने आपण होऊन माझ्या माउची चौकशी केली.
हर्पेननी "आपण भेटलोय ना आधी? संभाजी पार्क गटगला वेमा आले होते.. भेळ खाल्ली होती.." यातले संभाजी पार्क आणि भेळ हे परवलीचे शब्द ऐकून पुढे निघालेली धनवन्ती माघारी आली आणि "मग आम्हाला नव्हतं का तुम्ही बोलावलं तेव्हा? हे बरं नाही... " असं सांगून गेली. रेशमडोर खूप गोड दिसत होती, घरचं कार्य असावं तशी छान साडी नेसून आली होती. तिचं आणि माझं दुपारच्या झोपेवर झटक्यात एकमत झालं! तुमाखमै गं! Proud

एव्हाना लवकर जाणार्‍यांनी निरोप घेऊन निघायला सुरूवात केली होती. कुमार सरांशी बोलता नाही आलं, अनयाला हाय-बाय केलं, किल्ली लवकर गेली. अजूनही काही जण लवकर गेले. काही आयडींची ओळखही होऊ शकली नाही, यासाठी वाईट वाटलं.

जेवू की नको समजत नव्हतं कारण लेकीच्या मॅचेसपायी मला उपास घडेल या भितीने मी सकाळपासून इतकं खात होते की भूकच नव्हती! पण मग थोडंसं वाढून घेतलं. माम आणि मी एकमेकींशी गप्पा मारत, आग्रह करत जेवत होतो. वर्षूताईने (तिच्या सोप्प्या कॅरॅमल पुडिंगच्या आधी) समोश्याची रेसिपी टाकली होती, य वर्षांपूर्वी. मी ते करूनही बघितले होते आणि अमेझिंग झाले होते. या निमित्ताने ते मी तिला प्रत्यक्ष भेटून सांगितलं! मस्त उत्साहाने गप्पा मारत होती तीही.
योकू भेटल्यावर "तुम्ही सणसणीत तापलेली कढई आणून त्यातच स्वयंपाक करायला लावाल असं वाटलं होतं मला" असं मी म्ह्टल्यावर "हल्ली वेळच होत नाही मलाच स्वयंपाक करायला..." असं म्हणून कढईवर... आपलं उत्साहावर जरा पाणी ओतलं. पण बाकी विषय खूप होते म्हणून मीही तो विषय अजून तापवला नाही.

बाकी एका गृपात वाडेकर अखंड दंगा करत होतेच. भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. मधेच कोणीतरी (मीपण) मधल्या टेबलावर ठेवलेल्या खाऊकडे जात होतं. मलई पेढे, कलाकंद, बाकरवडी, चकली, रवा लाडू (हे मी खाल्लेच नाहीत Uhoh ), चिंच कॅण्डी, काजूकतली असं बरंच काहीबाही मांडलेलं होतं. माबोकर बोलायला आणि खायला कोणाला हरत नाहीत हे बघून आनंद झाला!

जेवणाच्या आधी आणि नंतरही, मला दुपारची झोप किती आवडते हे मी प्रत्येकाला सांगत होते. "काय करू... लेकीसाठी एकदा सकाळी येऊन गेले. ही एक फेरी आणि संध्याकाळी परत यायचंच आहे.. " करत मला आता झोप येतेय हे सांगत होते. दुपारची झोप = पेशवाई. ती बुडली तर माझं (आणि त्यापेक्षा ती बुडवणार्यांचं) काही खरं नाही हे सगळ्यांना पटवण्यात मला यश आलं.
तितक्यात कुणीतरी पुन्हा "का गं, लवकर का निघालीस?" विचारलं. पियू तिथेच होती. ती पण बिबवेवाडीकर. माझ्या २ बसस्टॉप पुढे रहाते. तिने "अगं झोपायचंय तिला... नको उगीच काहीतरी विचारत बसू." म्हणून प्रश्नकर्तीला गप्प केलं. हे म्हणजे तिने माझी बाजू घेतली, की टोपी पाडली ते अजूनही मला समजलं नाहिये, तिला भेटून खुलासा विचारला पाहिजे!
गोड खाऊ की नको (हे उगीच. चांगले २ पेढे आणि एक काजूकतली पोटात ढकलून झाल्यावर झालेली उपरती!) असा प्रश्न निकालात काढून मी शेवटी तो गाजरहलवा खाल्लाच एकदाचा! एका माबोकरणीला "मी उगीच खा-प्यायचे नखरे नाही करत. तसं मी समाजात माझं वजन राखून आहे." असं सांगितलं.
मध्यलोक मायबोलीचा टीशर्ट घालून आले होते. अनेक शब्दांचे फुलफॉर्म्स त्यांना समजले. त्यातल्या "सुडोमि" ची जन्मदात्री मी आहे हे तेवढ्यात मी जाहीर केलं! कोतबो च्या चालीवर कोतभा (भांडण करायला!) पाहिजे अशी सूचना बहुतेक अजय यांनी माडली. नवीन शब्द नव्या आवृत्तीत घालावेत असं ठरलं.

अ'तुल यांच्याशी ए आय वर २ मिनिटं बोलणं झालं. घारुअण्णांनी वविला यायला सांगितलं. "दुपारची झोप बुडते" असं मी आणि आयडूने म्हटल्यावर "असं काही नाही. सांस्कृतिक कार्यक्रम चालू व्हायच्या आधी तुम्ही झोप घेऊ शकता" असं सांगितलं. कविनला मी पुढची लव स्टोरी लिहायला सांगितलं आहे. बघू तिला कधी वेळ मिळतो ते.
साजिराने जाताना आवर्जून हाक मारून बाय केलं. बिबवेवाडीच्या अजून एका माबोकर मैत्रिणीशी बोलायचं होतं, राहून गेलं. अडीच वाजले तशी धनूडीपण निघायच्या तयारीने निरोप घ्यायला आली. तिला स्वारगेटला जायचं होतं. मी सोडू का विचारलं तर कसलेही आढेवेढे न घेता ती सहज तयार झाली. आम्ही निघालो. स्वारगेटला गाडी लागायला १ तास होता तर मी तिला घरी चल म्हणत होते. गप्पा मारू, फ्रेश हो मग जा, मी सोडते परत असं म्हटलं पण बहुधा माझ्या झोपेच्या भितीने ती नाही म्हणाली असावी. शिवाय गर्दीकडे बोट दाखवून "रांगेत थांबते म्हणजे जागा मिळेल" असं ती म्हणाली. झोप-बिप जाऊदे गं, ती गंमत असते, पण काहीही वाटलं तर फोन करायला सांगून मी निघाले.

कसले असतात हे ऋणानुबंध? मी अमेरिकेत २ आणि पुण्यात ४ गटग केली, पण "एतानि जननान्तरसौहृदाणि" यापलिकडे मला आजवर काही उत्तर मिळालेलं नाही. कधीकाळच्या गटग मधे झालेल्या भेटीवर साजिरा अगत्याने गप्पा मारतो, हर्पेन लक्षात ठेवून बोलायला येतात, अनयाला मी हक्काने फोन करते, धनूडीला गाडीवरून घेऊन जाते, धनवन्तीशी आपुलकीच्या गप्पा होतात, माझेमन- रेशमडोर माझी गळाभेट घेतात , धनि-रमड भेटतात आणि त्यांना काहीतरी घरगुती खाऊ मी देते... मला भेटवस्तू मिळतात आणि त्याहीपलिकडे, माणसं जोडली जातात! अचानक आपण श्रीमंत झालो आहोत ही भावना सुखावून जाते!

संध्याकाळी पुन्हा तिथेच मी तिसर्‍यांदा गाडी हाकत येताना मागे बसलेली लेक विचारते, "इथेच आली होतीस ना दुपारी?" आणि मी भरल्या मनाने "हो" म्हणते तेव्हा मीपण मॅच न खेळताच बरेच पॉईंट्स गाठीशी बांधले आहेत या विचाराने कॉलर ताठ होते!

(कार्य झाल्यावर थकवा आला तर त्याला "मांडवदळ लागलं" म्हणतात. मला ते फार काही न करताच लागलं आणि आज मंगळवार उजाडला मला लिहायला! Wink अजून काही आठवलं तर लिहीन पुन्हा.)

प्लम्बर यायच्या आधी क्रमशः पुर्ण करुन घेते

टेरेसवर एका टेबलावर खादाडी रुखवतच मांडलं होतं - सगळ्यांच्या खाऊने टेबल भरुन गेलं होतं चकली, बाकरवडी पासून लिकर चॉकलेट्स पर्यंत व्हरायटी होती. जेवणाबद्दलही वर उल्लेख केले आहेतच बाकीच्यांनी. जेवणं झाली तरी गप्पा संपेनात. धनवंती, ऋतुराज वगैरे कामसु लोकांनी उरलेल्या रुखवताचे वाटप करुन आवरा आवरी केली तरी लोकं निघेनात, फोटो निघाले, काहींनी रिळा (रिल्स) केल्या, कंपुबाजीचे पुरावे क्लिकुन झाले तरी पब्लिक काही टेरेसवरुन उतरायचे नाव घेत नव्हती. मला नचि पजोला भेटायला बोलवायचं होतं कारण ते गटगला नव्हते. डु आयच्या सल्ल्याने मग सगळे गुडलकला चालत गेलो आणि मी नचिला तिथेच बोलावलं. घारुअण्णांनी लगेच आमच्या परतीच्या प्रवासाची सोय म्हणन बन मस्का, बन मस्का ऑमलेट वगैरे पार्सल घेऊन टाकले. इराण्याकडे जाऊन हुशार लोकांनी चहा आणि गोंधळीकरांनी कॉफी घेतली. आमच्या सारख्या न्युट्रल लोकांनी लाईम सोडा घेतला. तिथून मेट्रोने पुणे स्टेशनला जायचे ठरले. मेट्रोचा अनुभव सकाळीच घेणार होतो पण ट्र्रेन लेट झाल्यामुळे सकाळी कॅन्सल केलेला प्लॅन परत जाताना तरी पुर्ण झाला. धनवंती आणि रश्मी आमच्या सोबत आम्हाला बाय बाय करायला मेट्रोने सोबतच आल्या. गुडलकच्या समोरच्या फुटपाथवर सुंदर टॉप्स, कुर्ती लक्श वेधून घेत होत्या पण एकदा शॉपिंगचा श उच्चारला तरी मोह महागात पडला असता. सकाळी तू उशीर केलास आता आम्ही फिट्टूस करतो असे ऐकवता येत नाही ना मोटरमनला, काय करणार आपल्याला वेळेत जावेच लागते. (खरं सांगू का! रानडे रोड दादरलाही असाच बाजार भरतो. पण तरी दिसला बाजार की खरेदी करावी वाटते मनाला त्या मनाचे काय करणार Wink ) असो, धनवंती आणि रश्मीने प्रस्ताव मांडल्याप्रमाणे मुम्बईकर त्यांच्या बरोबर दुर्गा टेकडी+ शॉपिंग गटग करणार आहेत (एकदा कधीतरी) आणि आम्ही प्रस्ताव दिल्याप्रमाणे त्या दोघीही मुंबईत गटगला येणार आहेत (एकदा कधीतरी) कोणत्या संवत्सरात हा "एकदा कधीतरी" योग येतो हे बघूया आता.

गेल्यावेळी अमित आला असताना ठाण्यात गटग ठेवूनही जमलं नव्हतं भेटायला त्याची चुटपूट लागली होती. यावेळीही गटग अटेंड करायला जमलं नसतं तर त्या चुटपुटीत व्याज अ‍ॅड झालं असतं चक्रवाढ पद्धतीने. आता फुलस्टॉप घ्या. प्लंबरला वायसर Wink नीट करुद्या. धन्यवाद. कळावे लोभ असावा ही विनंती वगैरे वगैरे

प्रज्ञा , मस्त लिहिले आहेस. मलाही अजून एक बिबवेवाडी कर भेटली , छान वाटले. त्याच दिवशी तुझी आणि माझी ओळख असणारे माझे नातेवाईक भेटले.

अंजुताई, नोकरी आहे ग डोंबिवलीत नांदिवली रोड सुनीलनगर भागात माऊली हॉटेल ची बिल्डिंग.

इतकही वाईट नाही पण संध्याकाळी स्टेशनवर शेअरिंग ऑटोसाठी जी कसरत करावी लागते ती एकदा अनुभवा.. म्हणजे कळेल आमच्या सारख्या नोकरदाराच दु:ख..
सकाळी ट्रेनमध्ये चढायला मिळत नाही..संध्याकाळी उतरायला मिळत नाही आणि उतरलो कसंबसं तरी घरी जायला रिक्षा भेटत नाही.. गाडी घेऊन गेलो तर गाडीला पार्कींग भेटत नाही.. भेटलीच तर कुठयं नक्की आज पार्कींग डावीकडे की उजवीकडे? हया ट्रेजर हंट साठी क्लू भेटत नाही..जाऊ द्या बर्याच गोष्टी आहेत..>> अगदीच सहमत. स्ट्रगल की बात करोगें तो किस्से बहोत है हमारे पास भी Proud माझ्या पाऊलखुणात जाऊन बघितलेत तर लोकल झलक दिसेल बघा Wink (शेअर रिक्षा मिळत नाही पण लेखन रिक्षा सहज मिळेल Wink ) पाच नंबरवरुन प्रवास केलाय २०१९ पर्यंत ओ मी सकाळी ८-९ च्या दरम्यान तो ही. आणि परतीच्या प्रवासात जंप केल्याशिवाय सीट नाही मिळालेय कधी Lol पण तरीही डोंबिवली आवडते मला (नावं ठेवेन रस्त्याला/रिक्षावाल्याला/वीज मंडळाला....पण तरी Dombivli is love Proud ) जन्मापासून ४०+ वर्ष इथे काढल्यावर छोट्या छोट्या आठवणी जमा होतात पोतडीत. लहानपणीच्या अगणीत आठवणी तर नॉस्टाल्जिया म्हणून सोडून देऊ पण ट्रेनमधेही आठवणीने गजरा घेऊन येणार्‍या काकु असतात एखाद्या, डोहाळे पुरवणार्‍या मैत्रिणी आठवतात ट्रेनमधल्या, काही अनोळखी आपल्याला मदत करुन जातात काहींसाठी अशी मदत करणार्‍या अनाम लोकांमधले आपण एक आठवण असतो. शहर न आवडायला व्यवस्था कारणीभूत असेलही पण ते आवडायला असे छोटे छोटे क्षण पण पुरेसे असतात. म्हणून मला डोंबिवली आवडतं Proud

क्या बात है, अजय चव्हाण! एकदम खुसखुशीत स्टायलीत.. (बायदवे अजय चव्हाण नावाचा माझा एक बालमित्र आहे)

र्म्ड, कवे, रहमान डकैत की सागर कारंडे- येकपे रहना Proud

किल्ली, पुन्हापुन्हा विचार करूनही मागच्या गटगची तू आणि या गटगची तू मला अजिबात सारखी वाटत नाहीस. कुछ तो गडबड है दया. मागच्या गटगला तुझा वावर फारच कॉन्फिडंट, स्टायलीत आणि सतत भिरभिरता असा होता. कदाचित तू मागच्या वेळची कार्याध्यक्ष होतीस म्हणून असेल. असो. आता पुन्हा कार्याध्यक्ष होशील तेव्हा बघायला पायजे. आता दोन्ही वेळची तू विसरायच्या आत लवकर हो Proud काय आहे की वार्धक्यामुळे आताशा..

र्म्ड, कवे, रहमान डकैत की सागर कारंडे- येकपे रहना Proud>>> तू घे डु आयडी चार चार आणि आम्ही तुला एकच आयडी द्यायचा होय? Lol तसं तर तू आल्या आल्या मी सामी आणि मेधाला म्हंटलं होतं की सावरकरांवर आता सिनेमा निघाला परत तर साजिरा त्यात सावरकरांच्या भुमिकेत शोभून दिसेल Proud

मजा येतेय वाचायला. अजून येऊ द्या.
वृत्तांत लिहिणे पण कला आहे. बहुतेक जण पारंगत आहेत यात.
साजिरा फार पॉलिश्ड लिहितात. मजा मस्ती पण असते. पण उच्च दर्जाचे.

गटग झकास उत्साहात झालं पण गटग उत्साही झकास आला नाही.
मलाही वृत्तान्त लिहायची खुमखुमी आली होती पण सर्वांचे वृतान्त इतके सर्वसमावेशक आणि सुरेल आहेत की मी काही लिहणं म्हणजे. भरजरी शालूला केकताडाची टीप मारल्यासारखे होईल. बरेच पुर्वी ववि,गटग, बुधवार व्रत अश्या अनेक प्रसंगी भेटलेल्या मायबोलीकरांव्यतिरिक्त जुणे जाणते पुर्वी न भेटलेले काही, तर नव्याने मायबोलीवर आलेले पण खूप दिवसांची ओळख असल्यासारखे वाटणारे पहिल्यांदाच भेटले.
खूप धमाल झाला गटग. मुंबईत राहून पुण्यात गटग प्लान करणार्‍या वसंत आगमनाच्या आधी पंधरा दिवस वसंताची चालू देणार्‍या 'ऋतुराज' चे जेवढे कौतुक करावे आणि आभार मानावे तेवढे कमीच.
काय ती रविराजची गच्च्ची, काय ती व्यवस्था, काय ते चकल्यांचे पॅकेटस, काय ते चॉकलेटचे पुडे, काय ते पेढे -काजू कतलीचे खोके एकदम ओके!! एकदम ४० चा आकडा पार केला की गटग उपस्थितीने. अर्थात ह्याचे श्रेय धनि-रमड थेट अम्रिकेतून आले, मुंबईकर, ठाणेकर, नमुंकर सक्काळीच उठून सुटीच्या दिवशीही आगगाडीची धावपळ केली ह्यांनाही. पुण्यात राहूनही एकदाही पिंचीच्या टेकडी गटगला काही न काही कारणाने न जमलेला मी आता पुढच्या टेकडी गटगला सर्व अडचणींवर मात करून नक्क्की येईन.
साजिर्‍याने दिलेल्या कॅन्व्हासच्या गोजिर्‍या भेटींचा उल्लेख करायलाच हवा. देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे... घेता घेत एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे. ऋतुराजने सुगंध वाटला, यक्षने सर्वांच्या भावना प्रत्येकाच्या हस्ताक्षरांच्या कायमस्वरुपी मिळविल्या.
कल्पक मायबोलीकरांचे कल्पनाऐश्वर्य किती पराकोटीचे आहे ह्या अश्या गटगमध्येच लक्षात येते.
सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि असे महा-गटग होत राहो. आणि यंदा पाऊस चांगला होऊन महा-ववि पार पडो!!
अतरंगीने आखातातून तर मृणाली ने कर्नाटकातून गटगला हजेरी लावलेली.

द्या कितीही आयडी. मेलेलं कोंबडं..

एक लेखक, बघा हा, डुआयडीच्या गप्पा सुरू आहेत. तुम्हाला माझा आयडी समजतील हे दुष्ट लोक Proud असो, थँक्स म्हणतो..

अरेरे आमचं डोंबिवली आवडत नाही अजय तुम्हाला. सगळ्या गैरसोयींसहही मस्त आहे हो आमची सांस्कृतिक नगरी. बाकी सर्व वाचते निवांत. डोंबिवली मनात आहे, त्यामुळे आवडतेच. असो इथे फार अवांतर होईल म्हणून एवढंच.

सगळे जण मस्त लिहितायत.
मुंबई आवडण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो असं कोणीतरी म्हटलेलं आहे त्यात डोंबोली पण ॲड करा.

मी जन्माने प्रॉपर माहीम, मुंबईकर आहे. दिड वर्षाची असल्यापासून डोंबिवलीकर. लग्नानंतर चौदा वर्ष ना सो, श्रीरामपुर करुन परत डोंबिवलीत.

विद्रोही !!! काहीही काय @rmd ! "आम्हाला ती पावर नाय" (पु लं च्या "म्हैस" मधल्या हवालदाराच्या भाषेत !)

साजिरा Lol
फोटोत ड्युआयडी येत नाहीत काय ? ते भिंतीवर लटकलेले, छताला उलटे लोंबकळलेले ?

किल्ली रूप बदलायचा मंत्र आणि विधी सांगितला तर बरं होईल.

कविन मजा आली वाचुन. Happy
डोंबिवली बद्दलच्या सगळ्याच पोस्टना अर्थातच +१. आम्ही डोंबिवली(वेस्ट) म्हटलं तरी तुझ्या पोस्ट मधल्या एमआयडी, पलावा इ. सारख्या नजरेने बघत असू. Lol पण कालाय वगैरे!
डोंबिवलीची वाट लावलेली आहे आणि परिस्थिती भयाण आहे बद्दल दुमत अजिबातच नाही. आणि डोंबिवलीला नावं ठेवायची असतील तर मी भरपूर माल पुरवू शकतो.
तरी कोणी विचारलं 'तू कुठचा?' तर 'आई बाबा ठाण्याला रहातात, पण मी डोंबिवलीचा' असंच पटकन म्हणतो. आता २५ वर्षे झाली असतील ठाण्याला येऊन. पण माझ्या तोंडातून कायम 'डोंबिवलीच' येतं. बर्‍याच ठिकाणी राहिलो, सगळ्या जागा आवडतात पण डोंबिवलीशी नॉस्टॅलजिक प्रेम आहे. बाकी त्यात आवडण्यासारखं काहीही नाही बद्दल ही सहमतच. Lol म्हणजे शाळा आवडत नाही, शिक्षक आवडत नाहीत, डोंबिवलीच्या लोकांची (जनरल) घेट्टो मेंटॅलिटी आवडत नाही, सोयीसुविधांचा अभाव, गचाळ, गर्दी काही आवडत नाही. पण उसाचा रस प्यायचा तर शिवमार्केट किंवा केळकर रोडच्या कोपर्‍यावरचे, किंवा फडके रोड- पोस्ट ऑफिसचे दुकानच आठवते असा गोंधळ आहे.

अमित, तुझ सेम माझ्या नवर्‍यासारख आहे.. तो भुसावळचा...११ वी पासुन ते पीएचडी पर्यत शिकायला पुण्याला..
भुसावळला त्यान्च आता काहिही नाही..सासरे रिटायर झाल्यावर गेले २५-३० वर्ष पुर्ण फॅमिली नाशिकला ..तरीही त्याच बालपण भुसावळला गेल्याने (त्या टिचकभर गावात एक रेल्वे जक्शन सोडल तर काहिच नाही) त्याला त्या गावाविषयी नॉस्टॅलजिक प्रेम आहे.

अमित सेम हियर. मला 'सोलॅस्टॅल्जिया' किंवा 'रिफ्लेक्टिव्ह नॉस्टल्जिया' हे आठवलं. पण बर्‍याच वेळा सिच्युएशन या दोघांतही गणता येणार नाही अशी असते, हे माहितीय..

Pages