सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे
दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे
Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK
या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.
गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

ग्रूप मोठा होता त्यामुळे मोठे
ग्रूप मोठा होता त्यामुळे मोठे कार्य अनुभवायला मिळाले. पण वैयक्तिक ओळखी कमी झाल्या. बोलण्याच्या ओघात फोटो फारसे घेतले गेले नाहीत असे वाटले. >>
तिता, आपली ओझरती भेट झाली पण गप्पा राहील्या. तुम्ही लवकर निघून गेलात का? का? मी शोधत होतो नंतर तुम्हाला.
बऱ्याच लोकांनी स्वतःची ओळख करून देताना "मी मायबोली गेल्या काही वर्षात उघडलेले नाही" हे नमूद केले.
खरंतर या अनुषंगाने एक वेगळा धागा काढावासा वाटला पण सध्या इतर गोष्टींमध्ये व्यग्र असल्यामुळे परत कधीतरी लिहिन.
पशुपत - सवड मिळताच जरूर लिहा.
हर्पेन तुमासमि >>>
कविन , कोई शक! साजिर्याची भेट देखील फक्त आपल्या दोघांकडेच एकसारखी आहे.
ऋतुराजा तुझ्या आणि हर्पेन ह्यांच्या 'संयोजकांच्या नजरेतून' वृत्तांतांची आणि 'धनी आणि rmd' ह्या उत्सव मुर्तिंच्या' नजरेतून लिहिलेल्या वृत्तांतांची विशेष प्रतीक्षा आहे...
>>>
संभा - मला संयोजकाच्या नजरेतून असे काही लिहायला जमेलच असे नाही. मी संयोजक अत्यल्प होतो, जास्त करून सहभागी सदस्य होतो.
आते हुए लक्ष्मी को ना नही कहते म्हणतात तसं आती हुई प्रशंसा को ना नही कहते हर्पेन. >>>
मानव - लोकांचे प्रेम आणि देवाची कृपादृष्टी अशीच राहू दे!
हर्पेनचे फोटो पाहिले असल्याने ओळखायला वेळ लागला नाही.
माझेमन - वाचून एकदम सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटलं ! सविस्तर वृत्तांत मस्त.
रुद्रसेन - छान लिहिलंय.
रुद्रसेन - छान लिहिलंय.
मंग हर्पेन भेटले बगा.. आदी माहय वाटलं ह्ये मिलिटरी रिटायर आसतील पर मिश्कील स्वभावावरून त्ये नसतीलच ह्याची खात्री पटली..
अजय -मिलीटरी वाचून उन्हाळ्यात गार मलम लावल्यागत बरं वाटतंय न वाटतंय तोवर रिटायर्ड शब्द वाचून एकदम काळजात खच्च्याक झालं की राव. पण जिकलंस भावा, समदा वृत्तांत एक्दम जंक्शन ल्हिलास बघ !
प्रज्ञा९ - मस्त गोष्टीवेल्हाळ लिहीलंयस
कृष्णा - सुंदर आढावा. पण थोडक्यात का आटोपतं घेतलंस लिखाण
सामी - पहिल्यांदा गट्ग मधे सहभागी झालेल्या लोकांनी अजून सविस्तर लिहायचे अस्ते.
मुळात मी rmd आणि धनुडी यांचं गटग समजत होते. ते धनी होतं हे मला नंतर समजलं. मी तर धागा वाचला नाही , whatsapp चा गृप सुद्धा मी बघितला नव्हता.
दक्षे - अशक्य आहेस तू पण आहेस तशीच रहा आणि गटगला येत रहा.
अजून कोणीतरी आणखी कुठून तरी लांबून ड्राइव करून काही मंडळी या गटग साठी आली होते हे पाहून थक्क झाले. आणि मी मात्र याच शहरात राहायला असून प्लॅन कॅन्सल करणार होते. तो केला नाही हे खूप बरं झालं. >>>
सान्वी - खरंच बरं केलं आणि छान लिहिलंय
ऋतुराज कविन पुढचे भाग लिहा लवकर
गटग ला पहिल्यांदाच आलेल्या सगळ्यांनी लिहून झालं का?
मी आपली आठवेल तसतशी भर घालेन म्हणतो.
गटग वृतांत - भाग २
गटग वृतांत - भाग २
तर मंडळी अशा रीतीने मी अंदाजे साडे दहाच्या आसपास पोचलो. उतरून हॉटेलमध्ये जाताना लागूनच पानाचे एक दुकान आहे. सकाळी सकाळी (पुण्याच्या) तो पानवाला मसाला पान लावत होता. ते पाहून फारएण्ड ने सांगितलेला किस्सा आठवला आणि ते हेच पानाचे दुकान असावे असा अंदाज बांधला. हॉटेलात गेल्यावर मी बोर्ड पाहत होतो. कारण त्यांना मी "रूपा धनी" असे लिहायला लावले होते. खरं तर मी "rmd धनि" असं सांगितलं होतं पण फोनवर त्याला ते rmd नीट कळेना आणि धनि च तो सारखं धानी करत होता. शेवटी म्हटलं रोमन लिपीत "रूपा धनी/धानी" लिही. रिसेप्शन काउंटरवर एक आजी फुलदाणीत फुलं लावत होत्या. काउंटरवर हॉटेलवाला एक जणाचे चेक आऊट पाहत होता. त्या आज्जींनी मला स्मितहास्य दिले त्यामुळे मला त्या मायबोलीकर आहेत की काय अशी शंका आली. मग मीच माझा परिचय करून दिला. त्यांनी पण मग मला त्यांचा परिचय करून दिला. या फडके आजी गेल्या ३० वर्षापासून कागदी फुलांच्या आणि खऱ्या पानांच्या पुष्परचना करत आहेत. त्यांना मायबोलीची माहिती दिली. रविराजमध्ये जवळ जवळ २५ वर्षे त्या या पुष्परचना करत आहेत. त्यांना मी नक्की मायबोलीचे सभासत्व घ्या म्हणून सांगितले. मग तो "रूपा धनी" च्या बोर्डचा फोटो काढला आणि ग्रुपवर पाठवला. तिसरा माळा, सम्राट टेरेस. वर जाऊन पाहिले तर ते सांद्र का मंद्र संगीत लावले होते. खुर्च्या टेबले व्यवस्थित लावून ठेवली होती. पताका लावल्या होत्या. फॅन लावला होता, फक्त त्यातून अत्तराचा फवारा येत नव्हता. नाहीतर बाकी सगळे एखाद्या मंगल कार्यालयासारखे वातावरण होते. आजूबाजूला कुंडीत फुलझाडे लावली होती. लिली, बोगनवेली फुलल्या होत्या त्यांचे फोटो काढले आणि वऱ्हाडी लोकांची वाट बघत बसलो. सर्वप्रथम रुद्रसेन आले. यांना पहिल्यांदाच भेटत होतो. त्याचं पहिलं गटग होतं. त्यामुळे गटगला सरावलेलो मी त्यांना "अस काही नाही हो, सगळी माणसं इथूनतिथून सारखीच" असा उगीचच जुजा सल्ला दिला. मग योकु आला, पाठोपाठ मुग्धा आली. पशुपत, तिता असे एकेक जण येत गेले. तेवढ्यात उत्सवमूर्ती आले. त्यांच्याची आभासी भेटी, बोलणे खूप झाले असले तरी प्रत्यक्ष भेट पहिल्यांदा होत होती. त्यामुळे "उराऊरी भेट, आज झाली थेट". भेटून आनंद झाला. बाकीची मंडळी येतच होती. सगळे अगदी एखाद्या मंगल कार्याला आल्यासारखे नटून थटून आले होते. आल्याआल्या ओळखीच्या लोकांशी मिठ्या मारून कडकडून भेटत होती. काही जण बऱ्याच वर्षांनी मायबोली गटगला, तर काहीजण पहिल्यांदा गटग ला आले होते. त्यामुळे आनंदाला उधाण आले होते. मग आमच्या मुंबईची गँग आली. त्यांनी आणलेला, बाकीच्यांनी आणलेला खाऊ, मिठाईचा रुखवत मग सगळ्या माबोकरनींनी मधल्या टेबलवर नीट मांडला. जमेल तसे लोक जागा धरून गप्पा मारत होते. आता गर्दी वाढली. आता ओळख परेड करून घेण्यासाठी गोलाकार बसावे म्हणून खुर्च्या लावायला सुरुवात केली आणि लोकांना बसून घ्यायला सांगितले. पण संयोजकांचे ऐकतील ते मायबोलीकर कसले. यक्ष यांनी दूरदृष्टी ठेऊन माईक स्पीकर आणला होता त्याचा खूप उपयोग झाला. सगळ्या उत्साही लोकांना जागेवर बसवण्यात १५-२० मिनिटे गेली. मग ओळख परेड चालू झाली. आपले नाव, मायबोली आयडी, मायबोली वर किती वर्षे आहात, मायबोलीबद्दल काय वाटते अशी ओळख करून द्यायची होती. ओळख चालू झाली आणि प्रत्येकाची ओळख झाल्यावर त्यांच्या आयडीचे किस्से, विनोद धमाल चालू झाली. हे सगळं इतकं रंगात आलं होतं की सगळे नुसते गुंग झाले. एका तासात अर्ध्या जणांची सुद्धा ओळख झाली नव्हती. या ओळख परेड मधील सगळ्या किस्यांची धमाल, मस्ती लिहिल्यास तो एक स्वतंत्र धागा होऊ शकतो. बरं हे सगळं चालू असताना काही चाणाक्ष मायबोलीकरांचे लक्ष मधल्या रुखवताच्या टेबलवर होते हे मी हेरले. साजिरा आणि त्यांनी गाडीत घालून आणलेले पार्सल म्हणजे रॉबिनहूड. हे दोघे रिंगणाच्या अगदी मधोमध बसले होते. ह्यांनी इतके किस्से सांगितले आणि इतक्या जुन्या मायबोलीवरच्या धम्माल गोष्टी गोष्टी सांगितल्या की मंडळी अगदी तल्लीन झाली. मला वाटते रॉबिनहूड यांच्याकडील किस्से ऐकायला एक निवासी गटग करावे लागेल. (अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार पुढील निवासी गटग ठरवण्याच्या हालचालींना वेग आला आहे). साजिरा आणि रॉबिनहूड माईक सोडायलाच तयार नव्हते. अजून अर्ध्या जनतेची ओळख व्हायची होती. मी चेहऱ्यावर अष्टसात्त्विक भाव आणून त्या दोघांना खाणाखुणा करत होतो की आवरा लवकर पण मी पडलो बाळ नेणते. अचानक काहीतरी चुळबूळ झाली आणि वर्गातल्या वांड पोरांनी एकदम कल्ला करावा तसे काहीजणांनी उठून खाऊच्या टेबलाजवळ गर्दी केली. ती पांगवत असताना काही वाट चुकलेली नवीन मंडळी येतच होती. प्रथेप्रमाणे जुनी मायबोली, लाल शाई, पांढरी शाई, हिरवी शाई, ट्री व्ह्यू अशा अनेक आठवणी तर निघाल्याच पण त्याबरोबर जुन्या मायबोली आयडिंच्या पण भरपूर आठवणी निघाल्या. पहिला ववि, जुनी गटगं, जूने धागे, कट्टे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. बाकीच्यांच्या ओळखी झाल्यावर शिस्तीत बसलेल्या मंडळींनी वर्गशिक्षक वर्गातून निघाल्यावर विद्यार्थी जसा दंगा करतात तसा दंगा करायला सुरुवात केली. काही मंडळींना लगेच निघायचे होते त्यामुळे त्यांची चुळबूळ चालू झाली. मग सगळ्यांना "फोटो काढल्याशिवाय कोणीही जाऊ नये" अशी घोषणा केली. ग्रुप फोटोसाठी पुन्हा एवढ्या जणांची आवराआवर करून कसातरी फोटो काढला. त्यानंतर आमच्या रीळसम्राज्ञी रिनाने सगळ्यांकडून somo करून घेतला. त्यानंतर साजिरा यांनी उत्सवमूर्तींसाठी आणलेल्या दोन चित्रांच्या फ्रेम दिल्या. मागच्या वेळी अमितवला पण व्हॅन गॉगची फ्रेम दिली होती. त्यामुळे ही देखील त्याचीच असतील म्हणून मी अगदी छातीठोकपणे "अरे व्वा व्हॅन गॉग" असे ज्ञान पाजळले. जे सपशेल चुकीचे होते. साजिरा यांनी बाकी सगळ्या मायबोलीकरांसाठी लहान लहान चित्रे आणली होती. ती घ्यायला अगदी मुंबईत "लॉट है सेल है" ला गर्दी उसळते तशी झुंबड उडाली. मी जे चित्र उचलत होतो ते कुणीतरी हातातून घेत होते. कोण घेतय ते बघायलाही उसंत नव्हती. शेवटी मला एक बाईचे चित्र मिळाले. "आपके जीवन मे एक सुंदर स्त्री आयेगी" हेच आपले नशीब असावे असे समजून त्या गर्दीतून बाहेर पडलो. त्या नंतर दुसरीकडे गर्दी दिसली तिथे यक्ष यांनी त्यांच्या सुनबाईंनी केलेल्या कापडी रांगोळ्या भेट म्हणून आणल्या होत्या. मी मेधाला विचारून त्यातील एक रांगोळी घेतली. यक्ष यांनी माझ्यासाठी एक सवत्स धेनूची छोटी फ्रेम आणली होती. कुमार सरांनी माझ्यासाठी रत्नाकर मतकरींचे पुस्तक आणले होते इंद्रा ने आठवणीने पळसाची फुले आणली होती. या प्रेमळ भेटीसाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
आता सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या. खादाडी सुरू झाली. रव्याचे लाडू, चकल्या, मावा केक, चॉकलेट, चिंच गोळ्या, पेढे, काजू कतली ...आणि बरच काही. गोड गोड फार होतं (पुढच्या वेळी तिखट काहीतरी आणत जा रे.) आता मंडळीचे मुंबईचा ग्रुप, वाड्यावरचा ग्रुप असे कंपुगिरी फोटोसेशन चालू झाले. काही मैतरणी त्याचं हितगुज एकमेकींना सांगू लागल्या तर काही मंडळी आपापले गट करून बोलू लागले. यातील काही मंडळी जेवणासाठी थांबणार नव्हती आणि बरच वेळ झाल्यामुळे त्यांनी निरोप घेतला. त्यांचा पण पाय निघता निघत नव्हता.
पुष्परचना:


क्रमश:
.
सगळ्यांनी आणलेला खाऊ:
हर्पेन, हो मी लवकर (म्हणजे
हर्पेन, हो मी लवकर (म्हणजे नियोजित २च्या सुमारास) निघालो. तसेही मी जेवणार नव्हतो. तुम्ही नंतर मला शोधत होतात ह्याची आता रुखरुख राहिली आहे. लवकरच भेटीचा योग यावा ही इच्छा.
सर्वांचे वृतांत छान आहेत. एकच कार्यक्रमाची किती वेगवेगळी निरीक्षणे आणि किती वेगवेगळे अनुभव!!! ह्यामुळेच गटगला परत परत यावेसे वाटत असणार. माझा पहिला अनुभव नक्कीच शेवटचा नाही. बघू किती जमतात ते.
दोन उत्सुकता -
१) कोणी जास्तीत गटग आणि ववि ला हजेरी लावली आहे
२) कोणी जास्तीत जास्त गावात गटग attend केले आहे - भारतात आणि भारताबाहेर
लॉट है सेल है
लॉट है सेल है
ऋतुराज अमितला मी पिकासोचं पेंटिंग दिलेलं. आता तुला व्हॅन गॉगचं देतो थांब.
लवकर भेट
मी नाही काही, रॉहू माईक सोडत नव्हते. (अनेक दिवस मिळाला नसावा). मी तर 'मी साजिरा' याव्यतिरिक्त माझ्याबद्दल काहीच बोललो नाही. रॉहूबद्दल बोललो, आणि कविने माझ्या डुआयडीजचा विषय काढला म्हणून त्यावर एक किस्सा-कम-कंफेशन केलं. एकदा काहीतरी स्प्ष्टीकरण द्यायचं होतं म्हणून पुन्हा माईक घेतला.
तक्रार : मला काहीही खायला मिळालं नाही
ते मिळत नसतंय
ते मिळत नसतंय
आपण जाऊन घ्यायचं लक्ष ठेवायचं आधी
Food टेबल जवळ असेल असं बघून जागा पकडायची
पुढच्या वेळी मी घेईन तेव्हा तुम्हालाही देईन खाऊ
फार चांगले असतात माबोकर कित्ती डबे आणतात खाऊ चे
'कच्चं' हा शब्द अध्याहृत आहे
'कच्चं' हा शब्द अध्याहृत आहे हे संयोजकांना वेगळं सांगायला हवं का?
अमित
अमित
अरे कोणीतरी फोटो मधली नावे
अरे कोणीतरी फोटो मधली नावे व्यवस्थित लिहा की!
छान बखर लिवतोयस. एकदम
छान बखर लिवतोयस. एकदम कार्याध्यक्ष स्टाईल. बकप!
फोटोतली नावं कन्फ्युज न होता / रांग न मोडता / गल्लत न करता बिनचुक लिहायला एखादा बनचुका कार्यकर्ताच पाहिजे. अर्थात कार्याची जबाबदारी घेतलेले सारे. ऋतुराज, हर्पेन, आणि मंडळी इकडे लक्ष द्या
अमितला मी पिकासोचं पेंटिंग
अमितला मी पिकासोचं पेंटिंग दिलेलं.>>>>>> अरे देवा.
म्हणजे मी फारच माती खाल्ली. जास्त ज्ञान पाजळले
तक्रार : मला काहीही खायला मिळालं नाही>>>> एक डाव माफी सरदार.
राॅहूंना काय बोलू काय नको
राॅहूंना काय बोलू काय नको झालेलं. हा बघा पुरावा
"आपके जीवन मे एक सुंदर स्त्री
"आपके जीवन मे एक सुंदर स्त्री आयेगी" हेच आपले नशीब असावे असे समजून त्या गर्दीतून बाहेर पडलो >>>
सांद्र पासून इथपर्यंत ते सगळे पुलं-संदर्भ पोहोचले 
ऋतुराज - RMD बोर्ड लावला नाही हे चांगलेच झाले. भांडारकर रोडवरच्या एखाद्या सजग ज्येष्ठ नागरिकाने तुलाच अहो तुम्हीच का ते गुटखा कंपनीवाले असा जाब विचारला असता
एका संस्कृत वचनात फेरफार करून - रमड व धनिने एकेरी चालेल सांगेपर्यंत तेथील माबोकर त्यांना "अहो रूपा अहो धनि" करत असतील ना?
अमितला मी पिकासोचं पेंटिंग दिलेलं.>>>>>> अरे देवा. >>> अरे ते चित्राच्या डावीकडून बघताय की उजवीकडून यावर वेगवेगळे दिसणारे पेंटिंग असेल. इकडून व्हॅन गॉग/गो तिकडून पिकासो
पूर्वी पट्ट्या असायच्या तशा.
रॉहू बर्याच दिवसांनी दिसले. २००९ मधल्या त्या जगप्रसिद्ध वैशाली गटगनंतर भेटल्याचे लक्षात नाही.
नुसत्या ओळख परेडवरही एखादा वृ येऊ शकेल माबो गटगच्या. उदा:
माझ्या अंदाजाने रॉहूंनी अशी स्वतःची ओळख दिली असेल.
https://www.youtube.com/watch?v=b15-P12gIf0&t=85s
तर किमान एखाद्या आयडीने केलेल्या इण्ट्रो वर उपस्थित माबोकरांची प्रतिक्रिया अशी होत असेल
https://www.youtube.com/watch?v=9htKCRq751M&t=81s
https://www.youtube.com/watch
.
अहो रूपा अहो धनि >> हे महान
अहो रूपा अहो धनि >> हे महान आहे फारएण्ड! _/\_
लिंक्स बघितल्या नाहीत अजून.
सगळ्यांचे वृत्तांत मस्त आहेत. मजा येतेय वाचायला.
ऋतुराज, धमाल वृत्तांत! फोटोत
ऋतुराज, धमाल वृत्तांत! फोटोत हिरव्या नेलपॉलिश सारखं दिसतं आहे ते चॉकलेट आहे का ? खाऊ जबरदस्त आहे.
अहो रूपा अहो धनि >>>>
जबरदस्त! ह्यासाठी तुला दहा गावं इनाम. 
अहो रूपा अहो धनि>>> कही
अहो रूपा अहो धनि>>>
कही तुम्हारा डु आयडी तो नही ऊस गृप में
माझ्या अंदाजाने रॉहूंनी अशी स्वतःची ओळख दिली असेल.
https://www.youtube.com/watch?v=b15-P12gIf0&t=85s
तर किमान एखाद्या आयडीने केलेल्या इण्ट्रो वर उपस्थित माबोकरांची प्रतिक्रिया अशी होत असेल
https://www.youtube.com/watch?v=9htKCRq751M&t=81s>> परफेक्ट. कही तुम्हारा डु आयडी तो नही था गटग में
ते चित्राच्या डावीकडून बघताय की उजवीकडून यावर वेगवेगळे दिसणारे पेंटिंग असेल. इकडून व्हॅन गॉग/गो तिकडून पिकासो Happy पूर्वी पट्ट्या असायच्या तशा.>>
अस्मिता ते हिरवं लिकर चॉकलेट आहे
फा
फा
ह्या गटग ला मला लाडू नाही आणता आले
पुढच्या वेळी माझ्याकडून पण खाऊ नक्की
अहो रूपा अहो धनि >>> महान…
अहो रूपा अहो धनि >>> महान…
बाय द वे, मी पोचेपर्यंत ते सांद्र का कायससं म्युझिक बंद केल्याचा जाहिर णिषेद.
फा
फा
दोन्ही लिंक अगदी चपखल.
अहो रूपा अहो धनि >>>> Lol जबरदस्त! ह्यासाठी तुला दहा गावं इनाम.>>>>>>> अगदी अगदी. जबरी.
सांद्र का कायससं म्युझिक बंद
सांद्र का कायससं म्युझिक बंद केल्याचा जाहिर णिषेद.>>>
पण तुला स्वर टिपेचा ऐकायला आला असेल ना
अहो रूपा अहो धनि>> फा खूप
अहो रूपा अहो धनि>>
फा खूप दिवसांनी मायबोलीवर आल्यासारखं वाटलं यू ट्यूब लिंक्स 
ऋतुराज , मस्त लिहीतोयस.
२००९ मधल्या त्या जगप्रसिद्ध
२००९ मधल्या त्या जगप्रसिद्ध वैशाली गटगनंतर
>>>
गंमत म्हणजे त्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक गटगच्या दोन्ही तथाकथित सिलेब्रिटींचे आयडी उडालेत
लिंब्याही होता गटगला, त्याचाही उडालाय. त्याने वाकड्या नावाने यायला हरकत नाही, पण माबोवर रुसलाय बहुतेक
ऋतुराज , एकदम सविस्तर वृतांत
ऋतुराज , एकदम सविस्तर वृतांत लिहिला आहे . बाकीच्यांनी पण सुरेख लिहिले आहे. फडके आजींनी केलेली फुले ही मस्त !! मधुमालती एकदम खरी वाटतेय.
तुम्ही नंतर मला शोधत होतात
तुम्ही नंतर मला शोधत होतात ह्याची आता रुखरुख राहिली आहे. लवकरच भेटीचा योग यावा ही इच्छा. >>
तिता - भेटूया की. पुण्यातच तर आहोत आपण
फोटोतली नावं कन्फ्युज न होता / रांग न मोडता / गल्लत न करता बिनचुक लिहायला एखादा बनचुका कार्यकर्ताच पाहिजे. अर्थात कार्याची जबाबदारी घेतलेले सारे. ऋतुराज, हर्पेन, आणि मंडळी इकडे लक्ष द्या >>
असं खिंडीत नाही गाठायचं
कही तुम्हारा डु आयडी तो नही ऊस गृप में >>
कविन - तो मी नव्हे पण तो आणी मी एकाच शाळेतले मात्र आहोत.
ऋतुराज सुंदर लिहिलायंस
ऋतुराज सुंदर लिहिलायंस वृत्तांत .
गटग वृतांत - भाग ३ (अंतिम)
गटग वृतांत - भाग ३ (अंतिम)
तर मंडळी आता बराच वेळ झाला होता सगळेजण गप्पा आणि जेवण्यात मग्न होते. काही जण जेवणासाठी थांबले नव्हते पण त्यांचा पाय काही निघत नव्हता.
अजूनही हौशी लोकांचे फोटोसेशन चालूच होते. यक्ष यांनी आणलेल्या अभिप्राय वहीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आलेल्या सर्वांचे अभिप्राय लिहून ठेवणे ही कल्पनाच भारी आहे. एक विशेष उल्लेख करायचा राहून गेला तो म्हणजे शरद जी यांचा. व्हाट्सअप ग्रुप चालू केल्यावर सगळ्यात आधी शरदजी त्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सांगलीहून येणार असे सांगितले. पण सोबत कोणीतरी असल्यास त्यांना जमणार होते. पण कोणी बरोबर नसल्यामुळे आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना येणं जमलं नाही. परंतु व्हाट्सअप ग्रुप वर सतत आणि आदल्या दिवशी सुद्धा फोन करून सर्वांना गटग साठी शुभेच्छा दिल्या. कोणीतरी मुख्य धाग्यावर गटग फेसबुक लाईव्ह करणार का? असं विचारलं त्यामुळे शरद जी यांचा गटग दिवशी सुद्धा फेसबुक लिंक मिळेल का यासाठी फोन आला. शरदजी, तिथे सगळ्यांशी बोलून बोलून तोंडाला एवढा फेस येत होता की फेसबुक लाईव्ह कोणाला सुचलंच नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी फेसबुक वरती नाही. त्याबद्दल दिलगिरी. आता जेवण आटपल्यावर आवरा आवर सुरू झाली. सगळ्यांनी खाऊचे वाटप केले ज्याला जो पाहिजे होता तो खाऊ भरून घेतला. भरपूर गोडाचे असल्यामुळे मी तरी काही घेतलं नाही. तिखट काहीतरी आणत जा रे. रमड धनि यांना मिळालेल्या चित्राच्या फ्रेम्स अमेरिकेला कशा न्यायच्या याबद्दल अनेक पुणेरी सूचना मिळाल्या त्या त्यांनी कितपत पाळल्या हे देव जाणे. आता निघताना कविनला तिच्या एका मित्राला भेटायचं होतं त्यामुळे त्याला भेटायला आम्ही पण सगळेजण गुडलक मध्ये जायला निघालो. खाली उतरल्यावर इथल्या पानाच्या दुकानाची परत सगळ्यांना आठवण झाली. पान खायचे की गुडलक मध्ये कॉफी प्यायची असे पर्याय समोर ठेवता शेवटी कॉफीला बहुमत मिळाले. सगळी वरात गुडलकच्या दिशेने निघाली गुडलक मध्ये गेल्यावरती कविनने तिच्या मित्राबरोबर गप्पा टप्पा गेल्या आम्ही मात्र आत जाऊन एवढ्या माणसांसाठी टेबल मिळेल का याची चौकशी केली शेवटी आत आत आत असे करता करता एकदम शेवटच्या कोपऱ्यात एक टेबल मिळाले. तिथे बसून तिथली पुण्यवान कॉफी प्यायलो. "पहिल्यासारखी मजा नाही कॉफीत" असे अगदी वर्षानुवर्षे तिथे कॉफी पीत असल्यासारखे बोलून दाखवले. त्यानंतर सगळेजण मेट्रोच्या दिशेने निघालो. मुंबईची अर्धी जनता पुणे स्टेशनला उतरणार होती तर बाकीचे पिंपरी चिंचवडला उतरणार होते. पिंपरी चिंचवडच्या भावी उमेदवार म्हणून निवडून येणाऱ्या धनवंती त्यांना बरोबर घेऊन येत होत्या. येताना बायका बायकांची पुढच्या वेळी कुठे कुठे काय काय खरेदी करायची यावर चर्चा झाली. मी आणि आबा, पुढे निघालो बाकीची जनता रेशमडोर आणि धनवंती या भूमिकन्यांबरोबर सुखरूप पुणे स्टेशनवर उतरल्या आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाली. अशा रीतीने एका आनंदसोहळ्याच्या हृद्य आठवणी घेऊन मी घरी पोचलो.
उपसंहार
मायबोलीचे हे गटग खरोखर एक संस्मरणीय गटग म्हणायला हवे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांचे एकत्रितपणे असे महागटग. यासाठी मी गटग ला आलेल्या सर्वांचे आभार मानतो. बऱ्याच जणांना मी पहिल्यांदा भेटलो.
आयडू , यक्ष, सई, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, साजिरा, रॉबिनहूड, अश्विनी९९९, तिता, रुद्रसेन, सान्वी, अजय चव्हाण तुम्हा सगळ्यांना पहिल्यांदा भेटून खूप छान वाटले. फार गप्पा झाल्या नाहीत पण ओळख झाली, तुमच्या मायबोली आयडिला एक चेहरा मिळाला हे महत्त्वाचे.
वर्षूदी, रमड, धनि, धनुडी, प्रज्ञा९, दक्षिणा, अनया तुमच्याशी बऱ्याच आभासी गप्पा झाल्या पण भेटलो पहिल्यांदाच. त्यामुळे तो आनंद मी शब्दात वर्णन करूच शकत नाही. खूप छान वाटतेय.
बाकी सगळ्यांना बरेचदा भेटलो आहे. त्यामुळे आपला जो काही लोभ आहे तो असाच वृद्धिंगत व्हावा.
उत्तरोत्तर अशीच गटग होत राहोत. आणि त्यांना अशीच प्रचंड संख्येने उपस्थिती लाभो.
काही निरीक्षणे/ प्रश्न:
या गटग चा वृत्तांत लिहिताना कोणीही "लाघवी" शब्दाचा वापर केला नाही. शास्त्र असतं ते.
साजिरा हे नक्की अक्षय खन्ना की सागर कारंडे सारखे दिसतात यावर अजूनही एकमत झाले नाही.
येणार येणार म्हणून न आलेल्या मायबोलीकरांना काय शिक्षा द्यावी हे अजून ठरले नाही.
गटग ला येणार म्हणून शरदजी यांनी सगळ्यांसाठी सांगलीची वांगी आणून ठेवली होती. एवढ्या वांग्याचे अखेर काय केले याबद्दल उत्सुकता. (युक्ती सांगा युक्ती सुचवा, बेत काय करावा? या धाग्यावर याबद्दल काहीही दिसले नाही)
वेमांनी रॉबिनहूड यांना त्यांचा मायबोली आयडी परत द्यावा अशी विनंती.
समाप्त
मस्त वृत्तांत ऋतुराज
मस्त वृत्तांत ऋतुराज
सागर कारंडे च आहेत ते
साजिरा आयडी घेऊन गटग ला येतात.
खुप छान वृत्तांत सगळ्यांचेच.
खुप छान वृत्तांत सगळ्यांचेच.
तर माझेही दोन आणे...
आदल्या दिवशी व्हॉट्सअँप ग्रुपवर झालेल्या चर्चेनुसार
पिंचीहून गटगला मेट्रो ने जायचं हे फिक्स होतं पण वेळ ठरवली नव्हती. मी ग्रुपवर विचारलही पण काही ठरलं नाही.
मग गटगच्या दिवशी झकासला फोन केला तर त्याचं येणं कॅन्सल झालं होतं. तेवढ्यात मल्लीचा मेसेज आला की तू ये स्टेशनला, तिथून जाऊ सोबत. मल्ली सहकुटुंब आला होता मग आम्ही सगळे निघालो.
व्हॉट्सअँप ग्रुपवर मुंबईकर सकाळी निघाल्यापासून अपडेट, सेल्फी देत होते.
मेट्रोत असतांना पिंचिकर कोण कुठं पोहोचलं आहे, त्याची चर्चा, सेल्फी असं सगळं चालू होतं.
आम्ही जरा उशीराच पोहोचलो तर मुंबईकरांपैकी कुणी तरी पिंची मुंबईपेक्षा लांब आहे वाटतं असा शाळजोडीतील दिला.
आम्ही गेलो तर निम्म्या लोकांची (उजवीकडील बाजू) ओळख परेड झालेली. आणि साजिरा - रॉबिनहुड यांच्याकडे माईक ताबा होता त्याचं वर्णन अगोदर आलेलं आहेच.
सई आणि दक्षिणा यांचे अनुभव पण ऐकायला छान वाटलं.
ओळख परेड चालू असताना मध्यभागी ठेवलेल्या खाऊचा समाचार घेणं चालूच होत.
मुंबईकरांशी व्हॉट्सअँप वर बोलणं झालेलं होतच पण आता प्रत्यक्ष पहील्यांदाच भेटतं होतो, अपवाद ऋतुराज.
दुर्गा टेकडी गटगला भेटलो होतो त्यांना.
इंद्रा, मुग्धा, कविन, घारूआण्णा, सामी, रीना, भाग्यश्री, योडी यांना पहिल्यांदा भेटलो.
मग अजय चव्हाण आणि रुद्रसेन यांच्याशी ओळख झाली. रुद्रसेनच्या लिखाणातील व्याकरणाच्या चुका निदर्शनात आणून दिल्या होत्या मी कधीतरी त्यामुळे माझा आयडी कुणा ज्येष्ठ नागरिकाचा असावा असा त्याचा अंदाज होता
वर्षुदी बरोबर आवर्जून बोललो, हर्पेन, rmd आणि धनि , USA वरून आलेली किल्ली यांच्याशी ओळख होतीच त्यांच्याबरोबर थोड बोलणं झालं.
साजिराने आणलेलं गिफ्ट मला मिळालं.
इतक्या ठिकाणी इतक्या गप्पा चालू होत्या की वेळ कसा जात होता कळलच नाही. काहीजण जाण्यासाठी निरोप घेऊ लागले मग संयोजकांनी ग्रुप फोटो काढल्याशिवाय जायचं नाही असा फतवा काढला आणि फोटोसेशन पार पडलं.
जे जेवायला थांबणार नव्हते त्यांनी निरोप घेतला आणि
मग राहिलेल्यानी जेवणाकडे मोर्चा वळवला. जेवण झालं की यक्ष यांनी आणलेल्या अभिप्राय वहीत नोंदी पुर्ण झाल्या की ऋतुराज ने सांगितल्यानुसार त्या सगळ्या पानांचे फोटो मी काढले आणि ग्रुपवर पाठवले.
अरे हो, सांगायचं राहील की माझेमन यांना तुमचं लेखन खूप आवडतं हे सांगितलं आणि वाडेकरांचा एक ग्रुप फोटो पण काढला. वाडेकर धनुडी यांची पण ओळख झाली.
तिथं वाड्याच्या मालकीनबाईंची आठवणं काढली.
तिथून बाहेर आलं की गुडलक आणि मग ऋतुराजबरोबर मेट्रोने पिंची.
मुंबईहून आलेल्यांच खुप कौतुक वाटलं आणि मायबोली माणसांना कस एकत्र आणते याचा प्रत्यय आला. निवांत गप्पा होण्यासाठी निवासी गटग चा प्रस्ताव आलेला आहेच. जेव्हा होईल तेव्हा त्याचा भाग होण्याची ईच्छा आहे.
एकंदरीत छान वाटलं सगळ्यांना भेटून, मजा आली, छान खादाडी झाली
यावेळी ज्यांना इच्छा असून यायला जमलं नाही त्यांनी पुढच्या वेळी नक्की जमवा.
एवढे बोलून मी माझे दोन आणे संपवतो.
हायला ह्यो कोण करांडे कारंडे
हायला ह्यो कोण करांडे कारंडे म्हणून बघितलं तर युट्यूबवर तो नाना पाटेकरची अॅक्टिंग करताना दिसला. म्हणजे कुणाचीही करू शकतो. अगदी माझीही. त्यामुळेच गैरसमज झाला असावा तुमचा
वा ऋतुराज वा. कार्याध्यक्षाचा धर्म पार पाडून नेटाने कार्य पार पाडलंस आणि वृही लिवलास. कार्याध्यक्षाला फळ काहीच मिळत नाही हे गीतेत लिवलं असूनही. खरं म्हणजे तरीही नवनवीन कार्याध्यक्ष उभे राहतात, जबाबदारी घेत असतात हेही गीतेत कुहेतरी खोपच्यात लिहून ठेवलेलं आहेच.
वृचो म्हणजे वृ पासून चोरून पळ काढणार्या लोकांनी आता वरातीमागून घोडं धाडू नका. आम्हाला नको तुमचे वृ
(एवढं ऐकून घेतल्यावर तरी लिवतील का?)
संपादनः आबा, थोडक्यात गोड लिवलंय. एवढ्या भाऊगर्दीत अनेकांच्या जवळ जाऊन बोलता आलं नाही, याची खंत राहिली, त्यात तुम्हीही.
Pages