धनि - rmd गटग @ पुणे

Submitted by ऋतुराज. on 3 January, 2026 - 00:35

सर्वप्रथम सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा !!
सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.
लवकरच आमचे येथे, पुण्यभूमीत धनि आणि rmd यांचे आगमन होणार आहे.
त्यानिमित्त समस्त मायबोलीकरांसाठी एक महा गटग आयोजित करण्यात आले आहे.
तरी आपण सर्वांनी अगत्याचे येणे करावे

दिनांक: १ फेब्रुवारी २०२६, रविवार
वेळ: दुपारी ११ ते २
स्थळ: हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना, पुणे

Location:
https://share.google/30Zonm2PZdzKhPAFK

या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारी जेवणाचा बेत ठरवला आहे.
तुम्ही जेवणार असल्यास शाकाहार किंवा मांसाहार असा प्रेफरन्स दिल्यास त्यानुसार तयारी करायला मदत होईल.
चला, इथे पटपट नावनोंदणी करा.

गटगला उपस्थित असलेले उत्साही मायबोलीकर
पियू , मल्लिनाथ, आयडू , मेधा२००२, रिना अभि, रेशम डोर, यक्ष, कृष्णा, मुग्धा साठे, हर्पेन, सई, धनुडी, घारुअण्णा, सामी, भाग्यश्री देशमुख, आबा, अतुल, कविन, योडी, धनवन्ती, योकु, तिता, रुद्रसेन, सान्वी, वर्षू., रमड, धनि, ऋतुराज., प्रज्ञा९, पशुपत, मध्यलोक, अश्विनी ११, अश्विनी९९९, हेमंतकुमार, किल्ली, साजिरा, रॉबिनहूड, माझेमन, दक्षिणा, अजय चव्हाण, अनया, इंद्रधनुष्य

Screenshot_20260201_200034_WhatsApp.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by प्राजक्ता on 4 February, 2026 - 00:04 >>> असाच माझ्या ऑफिसमधील एक अमरावतीचा मुंबईत स्थायिक असलेला मित्र, अमरावतीतल्या उड्डाणपुलांची, तिथल्या रस्त्यांची वारेमाप तारीफ करत होता, तेव्हा मी अचानक मधेच त्याचं बोलणं तोडत बोललेलो "तारीफ तो ऐसे कर रहा है, जैसे अमरावती ना हुआ ॲम्स्ट्रडॅम हो गया!!" ....आणि ग्रूप मधे एकच हशा पिकला. Biggrin

मला ते "अब प्यार प्यार ना हुआ तुम्हारा, युपीएससी का एक्झॅम हो गया. दस साल से क्लियर हि नही हो रहा..'' आठवलं उगाच

तेव्हा मी अचानक मधेच त्याचं बोलणं तोडत बोललेलो "तारीफ तो ऐसे कर रहा है, जैसे अमरावती ना हुआ ॲम्स्ट्रडॅम हो गया!!">>> smiley36_0.gif
अमरावती, नागपुरचे काहि का .ना. मामा मावशी लोक आहेत..smiley2.gif

अमित Lol वेस्टबद्दल माझ्याही सेम भावना होत्या आधी Lol सासर इस्टच न मिळता वेस्टचं मिळाल्यावर "ये लोग अलग ही दुनिया मे रहते है" फिलिंग्ज होते. पण इस्टचा विसा होता म्हणून सोपं झालं Lol

साजिऱ्या तुझे ते जड शब्द बिब्द कळत नाहीत पण होतं असं की खिशालाही डोंबिवली परवडते. ठाण्याला पार दूर जाण्यापेक्षा स्टेशन जवळ घर ही चैन जास्त गुदगुल्या करते Lol काहीवेळा मेडीकल फॅसोलिटीज साठीही डोंबिवली परवडते (खिसा, known specialists, पोळीभाजी केंद्रांसारखी सोय सगळ्या बाबतीत मी आत्ता जिथे रहातेय त्यापेक्षा डोंबिवली उजवी ठरते. काही बाबतीत आत्ताच रहाण्याचं ठिकाण उजवं आहे याबद्दल शंका नाही म्हणा)

पण bottom line डोंबिवली बद्दल ममत्व वाटतं यात नॉस्टॅल्जिया बरोबर अजूनही उपयोग मुल्य टिकून आहे हे ही असावं Proud कदाचित अजून काही वर्षांनी फक्त नॉस्टॅल्जिया राहीलही

किती मस्त! मोठ्या प्रमाणात मायबोलीकरांची हजेरी लागलेली बघून आनंद झाला. फोटो छान. अभिप्राय + स्वाक्षरी + आठवणी सांभाळणारी चित्रमय गटगवही करण्याची संकल्पना भारी आहे. यासाठी यक्ष यांकरता एजोटाझापा.

ऋतुराजला भली मोठ्ठी शाब्बासकी द्यायलाच हवी या गटगच्या आयोजनासाठी.

हम (पुणेकर) आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम
वो (डोम्बिवलीकर चर्चा कर कर के ) क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता Proud

क्या बात है, अजय चव्हाण! एकदम खुसखुशीत स्टायलीत.. (बायदवे अजय चव्हाण नावाचा माझा एक बालमित्र आहे)

धन्यवाद साजिरा सर.. माझं नावं आडनाव खूपच काॅमन आहे सेम नाव आडनावाचे भरपूर आहेत.. पण माझ्या परिचयाचं असं कुणी नाहीये..‌फेबू इंस्टावर भरपुर दिसतात म्हणून तिथे आयडी वेगळा ठेवलाय..

बाय दिवे डोंबिवलीचे काही पल्स पाॅईंट पण आहेत..जसे की, इथे शिक्षण स्वस्त आहे आणि शाळा पण एक से एक आहेत..
मी जिथे राहतो तिथली लोकं चांगली आहेत आणि माझा एरिया खूप शांत आहे...उन्हाळ्यात सुद्धा घरी फार उकडत नाही...मोकळं ढाकळं आहे.. खिशाला परवडणारं शहर आहे.. काही गैरसौयी आहेत पण चलता है..

आणि एक जगावेगळी गोष्ट आहे इथे ती म्हणजे सिगारेट चाय पिण्यासाठी मोठ्या टपर्या आहेत.. तिथे ग्रुप होतात लोकांचे..

हे मी कुठचं बघितलं नाही पण डोंबिवली मध्ये आहे ही फॅसिलिटी‌‌.. भाजीपाला स्वस्त आहे ठाणे मुंबईपेक्षा..

"अप्पम" नावाचा टेस्टी खादय प्रकार डोंबिवलीत चाखायला मिळतो.. इतर फार ठिकाणी मिळत ही नाही आणखी एक वेगळेपण मी अनुभवलं आहे आणि ते म्हणजे इथे नुस्ता वडापाव‌ नाही मिळत तर त्याबरोबर मक्याचा चिवडा पण मिळतो..

तू घे डु आयडी चार चार आणि आम्ही तुला एकच आयडी द्यायचा होय? >>>
हाहाहा.. कविन का सिक्सर
सर्वांचे आणि कविन चा क्रमशः डीटेल्ड वृत्तांत वाचून गटग चा माहोल पुनःपुनः एंजॉय करतेय

हम (पुणेकर) आह भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम
वो (डोम्बिवलीकर चर्चा कर कर के ) क़त्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता Proud>> Lol

सगळ्या रथी महारथींचे रिव्यू लिहून झाल्यावर म्या पामराने काय लिहावे. पण तरीही लिहिते .
माझा माबोचा सदस्य कालावधी १५ वर्षे पण तरीही हे पहिले महागटग मी अटेंड केलेले . यापूर्वी अनेक वेळा व्हाट्सअप यायच्या आधीपासून इकडे गटग चे धागे उघडायचे , मी येणार म्हणून नाव लिहायचे आणि काही ना काही कारणाने आयत्या वेळी जाणे रद्द व्हायचे .
खूप खूप वर्षांपूर्वी वर्षूताई इंडिया मध्ये येणार होती (एकेरी च उल्लेख करते हा कारण न भेटता पण तू जवळची वाटतेस :-)) . मी पूर्ण तयारी करून निघणार आणि आयत्यावेळी कैन्सल करावे लागले, अश्याच प्रकारे खूपशी निसर्गायण गटग पण मिस झाली एक्ससेप्ट एक जे वाशी ला सेंटर वन मध्ये झाले होते .
एवढे लिहायचे कारण हे कि यावेळी चान्स घ्यायचा न्हवता , म्हणून आदल्या दिवशीच सकाळी सही ची शिवनेरी पकडून वाकड ला भाची कडे आले. गटग मिस होणार नाही याची खात्री पक्की झाली आणि यथावकाश रविराज ला सगळ्या माबोकरांना भेटता आले.
RMD आणि धनी भारतात येणार हे कारण आणि ऋतुराज च्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आणि सगळ्या उपस्थित मायबोलीकरांना भेटता आले.
मायबोलीकर भेटतात तेव्हा ओळखीची गरज लागत नाही हे पुन्हा एकदा पटले .
ID मागचे मायबोलीकर भेटले तेव्हा खूप मस्त वाटले , वर्षूदी , दक्षिणा , माझेमन , अश्विनी * आणि बहुतेकांना मी पहिल्यांदा भेटले पण मोकळेपणाने गप्पा झाल्या .
खूप जणांनी सांगितले कि माबोवर जिवाभावाचे मैत्र मिळाले, माझे तसे झाले नाही पण तरीही प्रत्येक जण आपलाच वाटतो. हर्पेन सोबत पहिल्यांदाच बोलले आणि त्याच्यामुळे मी किती भाव खाल्ला हे हि सांगून टाकले.
माझेमन आणि मी एकत्र निघालो आणि गप्पा मारत असताना आम्ही एक्स-collegue होतो हे लक्षात आले. कदाचित आम्ही एकमेकांसमोर आलो हि असू पण तेव्हा ओळख न्हवती .
यक्ष यांनी आणलेल्या रांगोळ्या खूप छान होत्या , कुठली घ्यावी हेच ठरवता येत न्हवते कारण सगळेच कलर कॉम्बिनेशन्स मस्त होते . साजिरा यांनी आणलेले पेन्टिंग्ज पण खूप सुरेख होते आणि मी जे घेतले ते तर अल्टिमेट आहे , थँक्स साजिरा आणि यक्ष . ऋतुराज ने दिलेल्या धूप कॅंडीज आणि सगळ्यांनी आणलेले खाऊ औसम . कृष्णा यांनी आणलेले लाडू अल्टिमेट होते , पुढच्या गटग ला पण हे लाडू च घेऊन या हि प्रेमळ धमकी. यापुढील गटग पूर्ण दिवसभराचे करावे अशी सूचना मी येथे करू इच्छिते Happy कारण खूप जणांशी बोलायचे होते आणि खूप काही राहून गेले..
संध्याकाळी ट्राफिक च्या भीतीने मी सोमवारी पहाटे मुंबईला जायचे ठरवले अश्याप्रकारे चार तासाच्या गटग साठी दोन दिवस पुण्यात मुक्काम ठोकला.
कुमार सरांशी बोलायचे होते पण ते कधी गेले कळलेच नाही. रॉबिनहूड टोटल सरप्राईज पॅकेज ...त्यांना त्यांचा ID परत द्यावा अशी वेमांना विनंती ....
सो पुन्हा पुन्हा भेटत राहू आणि हा वसा असाच कायम ठेवू .....

साजिऱ्या तुझे ते जड शब्द बिब्द कळत नाहीत
>>>
अगं मलाही ठाणे-डोंबोली काही कळत नाही. ते फार्सने लिहिलेलं 'जैसे अमरावती ना हुआ ॲम्स्ट्रडॅम हो गया' वाचून मला तो रांझणा मधला झिशान अय्युबच डॉयलॉग आठवला इतकंच

अजय चव्हाण सर कृपया सर मत कहो कळावे लोभ असावा शुभेच्छा धन्यवाद

अगं मलाही ठाणे-डोंबोली काही कळत नाही. ते फार्सने लिहिलेलं 'जैसे अमरावती ना हुआ ॲम्स्ट्रडॅम हो गया' वाचून मला तो रांझणा मधला झिशान अय्युबच डॉयलॉग आठवला इतकंच>> Lol

जाऊदे तू तुझा दादाचा वादा पुर्ण कर की आता Proud

सामी, तुलाही भेटून खूप छान वाटलं. मायबोलीवर इतकी वर्ष आपण एकदुसर्यांच्या पोस्ट्स वाचतोय की ऑलमोस्ट ओळख असल्याचा फील येतो आणि जेंव्हा प्रत्यक्ष भेट होते तेंव्हा एखादी जुनी मैत्रीणच भेटल्यासारखा आनंद होतो. जीव लावणारा ,मराठीत बोलणारा माझा मित्र परिवार मला केवळ मायबोलीमुळेच मिळाला आहे. या गटगमुळे जुनेजाणते (pun intended haha) माबोकर इथे पुन्हा येऊन बागडायला लागलेले पाहून अत्यानंद झालाय. असेच भेटत राहूच..

मी जवळ जवळ दहा वर्षांनी मायबोलीच्या कोणत्यातरी इव्हेन्ट ला गेली असेन. जाण्याचा कोणताच इरादा नव्हता खरंतर.
सई कडून ऐकून होते की ती rmd च्या गटग ला जाणार आहे . मी म्हटलं ज्यांच्या गटगला जाणारेस त्यांना ओळखतेस तरी का ? तर मला म्हणे "हर्पेन" ने मला सांगितले आहे कि कोणी का असेना आपण जायचं आणि सगळ्यांना भेटून यायचं. म्हटलं हे म्हणजे "बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना " Lol कारण सई सुद्धा काही फार ऍक्टिव्ह वगैरे नसते इथे आजकाल .

आदल्या दिवशी वर्षुचा फोन आला आणि मी शेवटच्या क्षणाला ठरवलं की आपण सुद्धा जायचं. जेवणाच्या लिस्ट मध्ये नाव नसलं तरी जाऊन फक्त भेटून यायचं. सकाळपर्यंत सईला सुद्धा मी सांगितलं नव्हतं. अगदी एक तास आधी फोन करून मी पण येतेय आपण दोघी एकत्र जाऊ असं सांगितलं.

हॉल वर पोहोचल्यावर जे जुजा माबोकर भेटले त्यांना बघून आणि भेटून आनंदाला पारावर राहिला नाही. मेधा , पियू , योडी , कवीन आणि माझी लाडकी मैत्रीण मुगु. वर्षू सुद्धा मला अनेको महिन्यांनी भेटली . तश्या सगळ्याच लाडक्या आहेत कारण दोडक्यांना मी भेटायला जातच नाही Proud

भरपूर खादाडी , भेटवस्तू , नव्याने भेटलेले जुने लोक, खुशखुशीत ओळख परेड, हास्य विनोद हा तर मायबोलीचा यूएसपी आहे तो कसा मिस होणार?

मुळात मी rmd आणि धनुडी यांचं गटग समजत होते. ते धनी होतं हे मला नंतर समजलं. मी तर धागा वाचला नाही , whatsapp चा गृप सुद्धा मी बघितला नव्हता. मल्ली योकु दोघांनीही विचारल्यावर मी येऊ शकणार नाहीये असं सांगितलं होतं , पण शेवटच्या क्षणी निर्णय बदलला त्याचा अतिशय मनापासून आनंद झाला.

इतकी वर्ष मायबोलीवर असून कित्येक आयडी फक्त माहिती होते , ऑनलाईन बोलणं झालं होतं पण चेहरे माहिती नव्हते. जुनी मैत्री पुन्हा नव्याने बहरून आली. थोडक्यात हे गटग म्हणजे रियुनियन झाले जुन्या पुराण्यांचे . मध्यंतरी अनेक नवीन लोक आल्याने आपली फळी आता बाहेर अशा समजुतीत मी होते , पण त्याची काही गरज नाही हे जाणवलं .

खूप लिहायला शब्द नाहीत. पण सोशल मीडिया मधलं मायबोली हे माझं पहिलं प्रेम आहे आणि कायम राहील .

दक्षे , तू तर माझ्यापेक्षा जुजा आहेस. कुठल्याही माबो गटग ला बिंधास्त जायचं असतं हे तुला माहिती नाही यावर माझा तरी विश्वास नाही Happy

नमस्कार, माझा पहिला गटग त्यामुळे पहिलाच वृत्तांत (तरी मज सांभाळून घ्यावे ). खरंतर असं काही लिहिल असं वाटलं नव्हतं पण बाकी लोकांचे वृ वाचले आणि थोडी भीड चेपली. आणि आपल्या आयोजकांनी खास आग्रह केला की पहिल्यांदा येणाऱ्यांनी जरूर लिहा, म्हणून थोडा प्रयत्न करते.
आता नमनाला घडाभर तेल घातल्यावर...
गटग रविवारी असल्यामुळे सहजी येता येईल असे वाटले होते पर ये जालीम जिंदगी.. नवऱ्याला रविवारी कामाला जावे लागणार असे कळले आणि मग मुलाला घरी कोण बघेल त्यामुळे माझं येणं बोंबलणार असं वाटत असताना नवऱ्याने त्याला घेऊन जायचा पर्याय सुचवला. इथे मीच पहिल्यांदा जाणार त्यात ह्याला पण कसे आणायचे असा विचार आला. एक किल्ली सोडल्यास मी कुणाला प्रत्यक्ष भेटलेही नव्हते. पण या वेळी निर्धार पक्का होता ( मागे एकदा सगळं ठरलेलं असताना ऐनवेळी वाविला येणं कॅन्सल झालं होतं त्यामुळे) तर अशा प्रकारे आम्ही दोघे दोन मेट्रो बदलून आणि एक ऑटो करून तिकडे पोचलो. उशीर तर होणारच होता. आम्ही पोचलो तेव्हा मुलाने त्याला फोटोत दाखवलेलं हॉटेल आलं म्हणून बरोबर ओळखलं. ओळख परेड जोरात चालू होती. मी गुपचूप जरा मागच्या सीटवर बसले. नंतर किल्ली दिसल्यावर तिच्या शेजारी जाऊन थोड्या गप्पा झाल्या. मग माझी ओळख झाली. दरम्यान माझ्या ओळखीची एकुलती एक किल्ली लवकर निघून गेली. पण तोपर्यंत माझा नवखेपणा निघून गेला होता. अजून एक असे की सगळ्यांनी आपापल्या आयडी मागची कल्पना सांगितली, अमुक एक आयडी असा ka त्या मागचे कारण कळले. उदा. धनी, हर्पेन ई. सगळ्या जुजा माबोकरांना प्रत्यक्ष भेटून खूप भारी वाटले. नंतर श्री व सौ मल्ली आले आणि ईशान la त्यांच्या मुलीची कंपनी मिळाल्यावर मी सुटकेचा निःश्वास सोडला.
मग बऱ्याच लोकांनी प्रेमाने आणलेले निरनिराळे खाऊ खाल्ले, सगळ्या माबोकरणी अगदी झक्कास दिसत होत्या. ओळख परेड एकदम मस्त झाली. कुमार सरांचे लेख नियमित वाचते त्यांना बघायला मिळाले. सामी, धन्वंती, योडी, रिया, पीयू, कविन, माझेमन यांच्याशी ओळख झाली. मग ग्रुप फोटो वगैरे झाल्यावर यक्ष यांची भन्नाट आयडिया असलेल्या वहीवर काही लिहायचे होते, ते लिहिले (त्याबद्दल वर कोणीतरी माझं अक्षर छान म्हटल्यामुळे मूठभर मांस वाढले). मग यक्ष आणि ऋतुराज यांनी सुंदर गिफ्ट दिल्या. ईशानला पण सामी मावशीने छान गिफ्ट दिले. साजिरा यांची गिफ्ट मला मिळाली नाही ती पुढच्या वेळी घेईन. बा द वे साजिरा खरंच अक्षय खन्ना सारखे दिसतात थोडेसे! उत्सवमूर्ती धनी आणि rmd एकदम मस्त उत्साही वाटले. दक्षिणा ताई तर मला एखाद्या सेलिब्रिटी सारख्या वाटल्या त्यांच्याशी बोलायचे होते पण भीती वाटली. कवीन, रिया, सामी एकदम मस्त दिलखुलास... हर्पेन यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. मग छान जेवणं झाली. ईशानला त्याची फेवरेट पनीरची भाजी मिळाल्यामुळे गडी खुश होता. सगळे जेवण सुंदर होते आणि गाजर हलवा तर अतिशय सुरेख. मग सगळे माबोकर ग्रुप मध्ये पांगले व मी कुठल्या ग्रुप मध्ये जाऊ काही कळत नसल्यामुळे आणि पुन्हा ईशान ला घेऊन परत जायचे असल्यामुळे मग मी निघाले. तर अशा प्रकारे माझा गटग चा पहिला अनुभव संस्मरणीय ठरला. आता जेव्हा शक्य होईल तेव्हा येण्याचा मी प्रयत्न करेन. मुंबईहून आणि अजून कोणीतरी आणखी कुठून तरी लांबून ड्राइव करून काही मंडळी या गटग साठी आली होते हे पाहून थक्क झाले. आणि मी मात्र याच शहरात राहायला असून प्लॅन कॅन्सल करणार होते. तो केला नाही हे खूप बरं झालं.
त टी - ऋतुराज यांनी मुंबईत राहून सुद्धा गटग चे सुंदर आयोजन केले होते, त्यांचे विशेष कौतुक. आपापले सगळे व्याप व्यवधाने सांभाळून इतक्या लोकांना एकत्र आणणे सोपं काम नाही.
हुश्श.. जमतंय की!

गटग वृत्तांत - भाग १
डिसेंबर २०२४ मध्ये जेव्हा धनि - rmd भारतात आले होते तेव्हा एक गटग झाले होते. मी देखील या गटगला जाणार होतो पण माझ्या शत्रुपक्षाच्या आईवडिलांनी नेमका हा प्लॅन हाणून पाडला. नेमकं त्याच वेळी, त्याच दिवशी आमच्याकडे अगत्याचे येणें केले. आता सटीसामाशी येणाऱ्या सासूसासऱ्यांच्या "सेवेची ठाई तत्पर" असे जावईबापू सरबराईत गर्क झाले आणि मला काही गटगला जाता आले नाही. त्यानंतरच्या बऱ्याच गटगंना मी हजेरी लावली. त्यामुळे "तुला फक्त आमच्या गटगला यायला वेळ मिळाला नाही" हा कल्पांतापर्यंत पुरेल असा टोमणा मारायचा चान्स मात्र rmd ला मिळाला. "पुढच्या वेळी मीच सगळ्यात पहिल्यांदा गटग साठी नाव नोंदवीन" अशी प्रायश्चित्ताची कबुली दिली. आता या वेळी rmd ने भारतभेटीची तारीख कळवली त्यात कोणत्या रविवारी गटग जमेल याची तारीख पण ठरली. सगळ्यात आधी घरात सगळ्यांना सांगून ठेवले, विशेषतः (हं कळलं असेलच). आता ठिकाण ठरवायचे होते. प्राथमिक चाचपणी नंतर वीसेक जण तरी नक्की येतील या हिशोबाने चांगली जागा पुण्यात rmd ला शोधायला सांगितली. तिने एक दोन पर्याय शोधले. मग आपल्या माबोचे मिसो उर्फ हर्पेन यांना एकदा याबद्दल विचारले असता त्यांनी झट पट पटा पट रविराजचे नाव सांगून टाकले. हि जागा मायबोली गटगच्या सर्व निकषात सर्वानुमते पास झाली. (मायबोली गटग साठी जागा ठरवायचे निकष: १. जागा ऐसपैस असावी. जास्त जण असले तर समोरासमोर टेबलवर बसून सगळ्यांशी फार वेळ बोलता येत नाही. २. हॉटेलच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत किंवा व्हरांड्यासारख्या जागेत किंवा टेरेस सारखा सेपरेट सेटअप असल्यास उत्तम. याचे कारण मायबोलीकर एकत्र आल्यावर तार सप्तकातच बोलतात, आजूबाजूच्या इहलोकाचा त्यांना विसर पडतो.हसत खिदळत, निवांत गप्पा मारता याव्यात अशी जागा हवी. हॉटेल मालकाला याची पूर्वकल्पना द्यावी. ३. हि जागा मेट्रो स्टेशनच्या जवळ असावी कारण आमच्यासारख्या मुंबईकरांना आणि त्याहून अधिक लांबून येणाऱ्या पिंचिंकरांना ते सोयीचे पडते. ४. पार्किंगची व्यवस्था जवळपास असावी. ५. खाण्यापिण्याचा दर्जा चांगला असावा. हा मुद्दा शेवटचा आहे कारण मायबोलीकर एकत्र भेटल्यावर खाणेपिणे दुय्यम असते.)
आता या गटग साठी काही मायबोलीकर मुंबईहून येणार असल्याने दुपारचे लंच गटग करायचे ठरले. त्याहिशोबाने मेनू ठरला. आता तारीख, वार, ठिकाण ठरल्यावर प्रथेप्रमाणे धागा काढला. मुंबईच्या गॅंगचे नेतृत्व कविन यांनी स्वीकारले आणि सगळ्यांची ट्रेनची तिकिटे बुक केली. पुण्याच्या गटगला जायचे आणि वाटेत चिंचवडला नाही जायचे म्हणजे नंदीला नमस्कार न करता महादेवाचे दर्शन केल्यासारखे झाले. त्यामुळे मला श्वशुरगृही आधी जाणे भाग होते. आता धनि rmd येणार, गटग होणार म्हटल्यावर जणू काय लग्नकार्यच आहे अशी आमच्या व्हाट्स अप ग्रुपवर तयारीची नुसती लगबग चालू झाली. महिला मंडळाचे तर कोणती साडी नेसू? फुलाफुलाची नेसू, कि मोठ्या काठाची नेसू? साडी नेसू की ड्रेस? त्यात मी म्हटलं की मी कुर्ता घालीन जरीचा. तर त्यावर "नुसता कुर्ता नको पायजमा पण घालहो" असा सल्ला मिळाला. त्या कुडत्याची चर्चा पार अनारकली (सलीमची नव्हे) पर्यंत गेली. तर असो. गटग साठी वेगळा व्हाट्स अप ग्रुप काढला त्यात काही मंडळी हळूहळू जॉईन होत होती. मनात धाकधूक पण होती कि २५ जण येतील का म्हणून. कारण टेरेस २५ जण असले तरच मिळणार होते. दररोज धागा पाहणे, स्पॅम मेल चेक करणे, व्हाट्स अँप ग्रुपची लिंक पाठवणे हे चालूच होते. त्यात बरीच मंडळी कुंपणावर होती. हळूहळू २५ जण येतील अशी खात्री झाली आणि जीव भांड्यात पडला. ऍडव्हान्स भरला आणि लग्नासाठी गटगसाठी हॉटेल बुक झाले. शनिवारी पहाटे ट्रँका भरल्या, वळकट्या, बोचकी घेऊन सहकुटुंब चिंचवडला निघालो. लवकर पोचलो. तिथून मग एका कार्यक्रमासाठी कात्रजला गेलो आणि रात्री उशीरा चिंचवडला परत आलो. आणि अश्या प्रकारे तो गटग चा ऐतिहासिक दिवस उजाडला. माझ्या सोबत सुरंगीची रोपे असल्यामुळे मेट्रोतून जाता येणार नव्हते त्यामुळे सरळ रिक्षा केली आणि अवघ्या अर्ध्याच तासात हॉटेल रविराज, भांडारकर रोड, डेक्कन, पुणे येथे पोचलो.
क्रमश:

कुठल्या ग्रुप मध्ये जाऊ काही कळत नसल्यामुळे
>>>
याच ग्रुपमध्ये, आणि कुठे.
गोड इनोसंट लिहिलंय तुम्ही. तुमच्या लेकालाही बघितलं मी. पुढच्या वेळी एक सुंदर मोठ्ठ्ं पेंटिंग देईन मी तुम्हाला.

ऋतुराज यांनी मुंबईत राहून सुद्धा गटग चे सुंदर आयोजन
>>>
ऋतुराज, नुसती कौतुकं ऐकून घेणारेस की लिहिणार पण आहेस?

सेलिब्रिटी सारख्या वाटल्या त्यांच्याशी बोलायचे होते पण भीती वाटली
>>>
पहिला भाग बरोबरे, पण दुसरा चुकीचा. दक्षी सिलेब्रिटी म्हणूनच जन्माला आलीय. पण ती भितीदायक नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. Proud

Pages