चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्नात काजोल सारख्या सुपरपावर्स मिळाल्या होत्या. उडता येत होतं. किती छान वाटत होतं.
इथे कुणी तरी कमेण्ट केल्याने झोपमोड झाली आणि पावर्स गेल्या. Sad

इथला अमित आणि अल्पनाचा रेको घेऊन प्राईमवर 'सॉन्ग्ज ऑफ पॅराडाईज' पाहिला, खूप आवडला. Happy

खरंच सुकून देणारं काहीतरी आहे यात. कश्मिरी संस्कृतीची थोडीशी जवळून ओळख झाली. गाणी काहीही कळाली नाहीत पण आवडली. काश्मिरच्या काहिशा पहाडी किंवा लोकगीतांचा इसेन्स पुरेपूर उतरला आहे. झेबा अख्तर/ नूर बेगम ही तिथली पहिली स्त्री गायिका, पहिली रेडिओवर गाणारी गायिका - आपल्या हक्कांची जाणीव असणारी पण एरवी साधी कष्टाळू वाटणारी गोड मुलगी. बेताच्या परिस्थितीत वाहवत न जाणारी पण अति बंड करून सगळं न घालवून बसणारी - कुठेतरी वास्तवाचं भान असणारी व्यक्तिरेखा आहे. यातला फेमिनिझम धारदार नाही पण व्यवस्थित पोचावा इतका स्पष्ट आहे. मला फार आवडला सिनेमा. काही तरी वेगळं पाहिल्याचे समाधान मिळाले.

नेहमीसारखा अजिबात नाही, रादर माहितीपट, बायोपिक व गाणी वाटण्याची शक्यता आहे. पण काश्मीर आणि कश्मिरी गाणी, मधेच सुफी संदर्भ, अर्थपूर्ण शायरी व सखोल संवाद आहेत.

इकडे तिकडे पाहण्याच्या सवयीमुळे - पश्मिना वाटावेत असे ब्लॅंकेट, लाकडी कोरीव काम केलेले फर्निचर, भरतकाम केलेले दुप्पटे, कपडे, थंडीतले उबदार उन्हाची येणारी तिरीप, ताणपुरे, नक्षीकाम केलेल्या भिंती, सगळाच कपडेपट, शब्दांवर काही ठिकाणी जोर देऊन केलेले उच्चार, खाली बसून मोठ्या टोपात जेवणं, डोक्यावरून घ्यायच्या ओढण्या व बुरखे - हे सगळेच आवडले. यातला vintage look खोटा वाटला नाही, नैसर्गिक आणि शांतवणारा वाटला. सगळ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत.

झेबाची गाणी रेकॉर्ड व्हावीत व तिला पुरुष गायकांएवढा पगार मिळावा, त्या सगळ्यांची रेकॉर्डींवर नोंद व्हावी याचा तिचा आग्रह व सगळे जळून खाक झाल्यावर ( जे अमितने लिहिले आहे त्याप्रमाणे मलाही असूयेपोटी वाटले) पुन्हा उभे राहणे, त्यामुळे इतर मुलींना गायचे बळ मिळणे हे सगळे उग्रपणे न मांडताही प्रेरणादायी आहे.

अशी छोटी छोटी पावलं या सगळ्या स्त्रियांनी उचलली म्हणून पुढचा पिढीतील स्त्रियांना अजून पुढचा संघर्ष करता आला असं नेहमी वाटतं. आपण नेमकं काय करावं हे मात्र कळत नाही. म्हणजे आधीच्या पिढीने पुढच्या पिढीचे आयुष्य थोडेतरी सोपे करणे ही एक सामाजिक जबाबदारीच असते. त्यासाठी थोडा संघर्ष, थोडे प्रयत्न सर्वांनीच करणं आवश्यक आहे. असंच काहीतरी हळुवारपणे दाखवणारी मृदू कथा आहे.

पण आता ते पाहणे जवळ जवळ ६९ टक्क्यांनी कमी केले आहे.>>>>>

हे कसे काय काढले हो???

मला नुसती काजोलही बघवत नाही, तिचा चित्रपट बघायची कल्पनाही करु शकत नाही. चुकुन एखाद्या रिलमध्ये ती दिसली की मोबाईलच बाजुला ठेऊन देते. पुढच्याही रिलमध्ये तीच असेल या भितीने Happy .

इकडे तिकडे पाहण्याच्या सवयीमुळे - पश्मिना वाटावेत असे ब्लॅंकेट, लाकडी कोरीव काम केलेले फर्निचर, भरतकाम केलेले दुप्पटे, कपडे, थंडीतले उबदार उन्हाची येणारी तिरीप, ताणपुरे, नक्षीकाम केलेल्या भिंती, सगळाच कपडेपट, शब्दांवर काही ठिकाणी जोर देऊन केलेले उच्चार, खाली बसून मोठ्या टोपात जेवणं, डोक्यावरून घ्यायच्या ओढण्या व बुरखे - हे सगळेच आवडले. यातला vintage look खोटा वाटला नाही, नैसर्गिक आणि शांतवणारा वाटला. सगळ्या कलाकारांची कामं उत्तम आहेत>>>>>

काश्मिर आहेच शांतवणारे. काश्मिर भेटीत आम्ही आमच्या काश्मिरी ड्रायवरच्या घरी गेलो तिथे आजुबाजुला झाडे, सफरचंदे, फुले आणि घरात भिंतिंपासुन भिंतीपर्यंत जाड उबदार गालिचे बघुन दिल बाग बाग हो गया था!!!!

गेल्या आठवड्यात खूप दिवसांनी थिएटरला "परमसुंदरी" पाहिला. बिल्कुल उत्साह नसताना एकत्र बसून बघायचा आणि स्त्री वाल्यांचा आहे म्हणून पाहिला.
परम म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि सुंदरी पिल्ले म्हणजे जान्हवी कपूर. पंजाबातून तो केरळात येतो. दोघांच्या लव्हस्टोरीत काय काय अडथळे येतात आणि ते कसे पार पाडतात ही घासून गुळगुळीत झालेली स्टोरी. कथेच अजिबात नावीन्य नाही. सिद्धार्थ मल्होत्राने अभिनयात जराही कष्ट घेतलेले नाहीत. तो तिन्ही खान, हृतिक रोशन यांच्यापेक्षा तरूण असूनही यात अजिबात रोमँटीक वाटत नाही. जान्हवी कपूरने पंजाबी धाटणीचा हिंदी मिश्रित साऊथ इंडीयन लहेजा पकडला आहे तो संपूर्ण सिनेमात खटकतो. दोघांची केमिस्ट्री नावाचा प्रकार अजिबात जमलेला नाही. जान्हवी कपूर नृत्यात चांगली तरबेज आहे हे समजलं. इमोशनल सीन्स मधे तिने छाप सोडली आहे.

सोनू निगमचं पुनरागमन आणि त्याने गायलेलं परदेसिया तसेच केरळचं चित्रण हे क्षण सुखद आहेत.
लाल कलर कि साडी मे तू कुडिये डेंजर लगती है एकदम मस्त झालंय गाणं. हे गाणं बघताना शाहरूख खान डोळ्यापुढं येतो. सिद्धार्थने हे गाणं मात्र झकास केलंय.

तरी देखील पहिला हाफ सुसह्य आहे. तो बघितल्यावर नावीन्य नसले तरी दोन अडीच घटका करमणूक होईल असे आपल्याला वाटते. पण दुसरा हाफ कमालीचा प्रेडीक्टेबल आणि बोअरिंग आहे. इतका कि चक्क झोप लागली. धाकट्या कंपनीला मात्र आवडला. नंतर नंतर दोघांचं जमलं तरी बरं नाही जमलं तरी बरं असा फील येऊ लागला. कारण दोघांनी तसेच दिग्दर्शकानेही दोघांबद्दल प्रेक्षकांना अजिबात आपलेपणा वाटणार नाही याची काळजी घेतली आहे. धडक २ सारखा चांगला सिनेमा आपण इग्नोर केल्यावर मग आता तक्रारी करण्याला अर्थ नाही.

चंमतग म्हणजे यात साऊथ बद्दल हिंदी बेल्टचा स्टिरीओ टाईप दाखवायचा प्रयत्न करून जान्हवी ऑथेंटिक मल्याळी असल्याचा क्लेम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्यामुळंच मल्याळी प्रेक्षक एव्हढे वैतागलेत कि त्यांचा संयम संपून बॉलीवूडच्या स्टिरीओटाईप बद्दल ते व्यक्त होऊ लागलेत. जान्हवीची आई जरी साऊथ इंडीयन असली तरी जान्हवी कुठूनही साऊथ इंडीयन नाही. तिने मल्याळी बोलायचा आणि त्यातूनही मल्याळी लोक जसे हिंदी बोलतील तसं बोलण्याचा प्रयत्न केला आहे तो बॉलीवूडचा अभ्यास करूनच केलाय. मधे मधे तर तिचे संवाद कुणातरी मल्याळी कडून डब केले असावेत असं वाटतं. एखादी साऊथ इंडीयन अ‍ॅक्ट्रेस का घेत नाहीत ?

थेंगा (ठेंगा) अशी शिवी केरळात कुणी देत असेल का ? मल्याळी मुलगी म्हणजे सतत गजरा, नारळ, कोयता हे २०२५ मधे पण खरंच असेल का ? म्हणजे संवाद पण असे आहेत "दिमाग का कोकोनट काली हो गया " हा संवाद बहुतेक दिमाग का दही हो गया ऐवजी असावा. तरीही जान्हवी कपूरचे फॅन असाल तर या रिव्ह्यूवर विश्वास ठेवून फसू नये Lol सिद्धार्थ कपूरचे फॅन्स ( असं कुणी असतं का ? ) असाल तरीही चुकवू नका.
तुम्ही जर (मनाने) टीन एजर असाल आणि आयुष्यात एकही लव्ह स्टोरी पाहिली नसेल तर मग आवडेल कदाचित.

बघणार असाल किंवा नसाल, आवडला किंवा नावडला तरी केरला फॉर डमीज अजिबात चुकवू नका. हे खूप वाईट्ट आहे. एखादं कल्चर असं चुकीच्या पद्धतीने पोर्ट्रेट केल्यावर त्यांना काय वाटत असेल याचा अजिबात विचार एव्हढ्या वर्षात बॉलीवूडला करता आलेला नाही.
https://www.youtube.com/watch?v=ZSR99WcbKVA

( सिनेमा आवडला आणि नंतर रिव्ह्यू लिहीताना विचार करून लिहिला असे वाटले तर कृपया सेकंड हाफ मधे झोप लागल्याने बुडालेली "स्टोरी" सांगावी. )

<ती झोया अख्तरची प्राईम किन नेफी वरती का कुठेतरी एक सिरीज होती, तिचे नाव आठवत नाही. खूप एंगेजिंग पण सगळा affluent क्लास.> मेड इन हेवन. वेडिंग प्लानर , लॅव्हिश वेडिंग्ज म्हटल्यावर तोच क्लास येणार ना! ती पंजाबी मुलगी एक लोवर मिडल क्लासवाली होती.

>>>>>>>तुम्ही जर (मनाने) टीन एजर असाल आणि आयुष्यात एकही लव्ह स्टोरी पाहिली नसेल तर मग आवडेल कदाचित.
लव्ह स्टोरी व्हर्जिन Lol Lol

हॉटेलच्या लॉबीत कोंकनाने घेतला पंत्रिचा बदला व सारा आणि आदित्य फेक स्टोरी तयार करतात ते, त्यात तिचे केस वाईट का अभिनय हेही कळेना. Happy ती गाणी चपखल आलेली न वाटता असह्य झाली>>> अस्मिता च्या मेट्रो बाबत सर्व कॉमेंटींना मम. फार वाईट आणि अजिब्बात आवडला नाही नवा मेट्रो. अनुराग बासू & जुना मेट्रो फार आवडतात म्हणुन बघायला घेतला. त्या गुड्डू चा जोक मी मिस नाही केला पण तेवढंच काय ते जर्रासं विनोदी वाटलं आपलं केविलवाणं. कोंकोना त्या रेसॉर्ट ला जाऊन काय अगाधपणा & किती ती अपरिपक्वता दाखवते, काय झेपलं नाही. पंत्रि ऑफिसातले लोक सर्रास लग्न झालेले असून अमुक साईट वर जाऊन गफ्रे मिळाली, वगैरे इतक्या सहजतेने बोलतात हे दाखवलेय.. कुठे होते असे? एखाद्याशी डेत बद्दल बोलणे ठिकाय, अख्ख्या ग्रूप समोर हे डिस्कशन चालू असते..काहीही.

सारा अजिबात आवडत नाही, केस, अभिनय सर्व विचित्र.. पण झान्वी पेक्षा डायलॉग डिलेव्हरी बरी आहे. ती केदारनाथ मधे बेस्ट दिसली & अभिनय केला होता.
आदित्य कायम प्ले बॉय रोल मधे टाईपकास्ट झालेला आहे आता. अली जफर खूप आवडतो पण ह्यात काही खास स्कोप च नाही स्ट्रगल ठिके, पण मधेच जाणिव होते, पळत जाऊन तिला भेटतो काय अगम्य!
मधेच झिपर्या हलवत प्रितम, पापोन येतात , सतत येतात आणि पकव पकव पकवतात. कायदे से एकच गाणं चांगलंय. सगलं पुढे पळवलं.

मला आवड्ला. आता लोक म्हणत आहेत ते drawbacks थोडे जाणवत आहेत. पण काल २/३ shots सोडुन आवडला. म्हणजे वेळ वाया गेला असे अजिबात नाही वाटले.

पडद्याबाहेर सोमिवर सारा अगदी गोड मुलगी आहे. पडद्यावर तिला पाहताना सुरवातीला अमृता सिंगच आहे असे वाटायचे आणि असिंला आजच्या सेटपमध्ये फिट करताना खुपच गोंधळ व्हायचा. माझ्या मुलीलाही अ सिंगच दिसायची तिच्यात, तिने फारसे चित्रपट पाहिले नसतानाही.

तीचा स्क्रिन प्रेझेन्स छान आहे. अभिनयाचे काय, ते करायला इतर स्ट्रगलर्स आहेत की. एकुणच हिचे मजेमजेत चालले असावे अश्या देहबोलीने चित्रपट करते ती. असो. पोरगी गोड आहे.

इनस्पेक्टर झेंडे बघितला.
टोटल गंडलेला सिनेमा आहे. सिनेमा सिरियस आहे, थ्रिलर आहे, कॉमेडी आहे, कशाची पॅरडी केलेली आहे, याचा पत्ता लागू न देता प्रत्येक दृष्यात आता काय आठवतंय तसे संवाद लिहून सोयिस्कर जॉनराचे झोके बघायचे असा सगळा प्रकार आहे.
मला अजिबात आवडला नाही. शेवटची चाळीस मिनिटं आता हा कॉमेडी आहे समजून बघू म्हणून बसलो तर आणखीनच बोर झालं. सचिन खेडेकरला कॉमेडी अजिबात जमत नाही. बाकी भाऊ कदम, ओंकी इ. हास्यजत्रा पोरं, ती गिरीजा ओक, कुठलंही पात्र उभं रहातंच नाही. स्किट करतोय तसं ट्रॅन्झॅक्शनल सगळं चालू असतं.

यापेक्षा मेट्रो इन दिनो परत बघायला हवा होता! Wink मला त्यातली गाणी, संगीतकार-गायक सीनवर येऊन वाजवणे अशी ट्रीटमेंट हे ही आवडले. गाणी लक्षात रहातील अशी नाहीत, पण कथा सांगणारी-म्युझिकलची आहेत. वेगळा-नवा सिनेमा, नवा लुक-इनक्लुडिंग साराचे केस, इतर अतरंगी प्रकार सगळी एक भट्टी बघताना मजा आली. हे वरचे फ्लॉ आहेत का? तर आहेत. पण थिएटर बाहेर पडताना जी मजा आली पाहिजे ती आली. तर ते असो. फारच निगेटिव्ह प्रतिक्रियांचा माबो पीव्ह बघुन जरा गोड अ‍ॅडजस्ट करावं म्हणून लिहिलं. Proud

अस्मिता, 'साँग ऑफ पॅरडाईज' तुला आवडेल असंच वाटलं होतं Happy

कुठे होते असे? एखाद्याशी डेत बद्दल बोलणे ठिकाय, अख्ख्या ग्रूप समोर हे डिस्कशन चालू असते..काहीही
>>>>>>

होते!
तुम्हाला हे माहीत असणे शक्य नाही कारण ते (विवाहीत) बॉईज ओन्ली ग्रूपवर होते.

अर्थात सेम फ्लोअरवर बायका असताना होत नाही/नसावे. ते चित्रपटाची गरज म्हणून तसा सीन दाखवला.

साराचे सौंदर्य वेगळ्या धाटणीचे आहे. पारंपारीक माधुरी-मधुबाला छाप नाही त्यामुळे ते ज्याला त्याला आपल्या आवडीनुसार कमी अधिक चांगले वाटू शकते.

साराच आवडली नाही तर चित्रपट आवडणे आणखी अवघड कारण त्यांचीच तर स्टोरी त्यात बघण्यासारखी होती.

मला कोणी सारा आणि आदित्य रॉय कपूरची स्टोरी वेगळी काढून दाखवली तर मी ती पुन्हा बघेन. त्यांचे एडिटिंग मध्ये कट झालेले सीन सुद्धा त्यात टाकले तरी चालतील.

गाणी चित्रपटात आवडली होती पण ती पुन्हा मुद्दाम शोधून बघावी वाटली नाही. त्यांची मजा चित्रपटासोबतच अशी होती.

एखादे सर किंवा बाई नेमून मायबोलीकरांचे सौंदर्य / नाट्य / कला / चित्रपट / काव्य अशा ट्यूशन्स सुरू कराव्यात. Lol
सुंदर कुणाला म्हणायचं ? चांगला सिनेमा म्हणजे काय ? हे शिकवून झाल्यावर सिलॅबस प्रमाणे प्रतिसाद देणार्‍यांचा पहिला नंबर.
शेवटच्या नंबरने प्रतिसाद देण्यापूर्वी मी बरोबर आहे का हे प्रश्नार्थक वाक्य जरूर विचारावे.
मज्जा येईल Happy

राभु मस्त कल्पना.

फिल्म अप्रिसियेशन हा कुठल्यातरी अभ्यासक्रमाचा एक भाग आहे असे कुठेतरी वाचल्याचे आठवले.

गणेश मतकरी चित्रपटांबद्दल लिहितात ते खुप मस्त असते. त्यांनी बहुधा केलाय तो कोर्स. त्यांच्याच लेखात वाचले असणार मी.

सुनिल राणे याण्चे (नाव हेच असावे, नक्की आठवत नाही) लोकसत्तात फिल्म अप्रिचियेशनबद्दल काही लेख होते असे आठवतेय.

पुण्यात फिल्म इन्स्टीट्यूटला आहे तो कोर्स. जालावर पण आहे सर्टिफिकेट कोर्स. आधी मोफत होते.
पण ते काहीही असो, आपल्याला माबोसाठी खमंग कोर्स पाहीजे.
सरांना रोज बहुमत घ्यायला लावायचं. आणि ड्युआयड्यांना व्होटिंग अलाऊड.
विश्वसुंदरीसाठी भारती पासून भाऊ कदम पर्यंत सगळे उमेदवार Lol

क्लास नंतर ग्रुप डिस्कशन असं होईल
metro.jpg

थॅंक्यू अनिता - सॉन्ग्ज ऑफ पॅराडाईजसाठी! Happy
थॅंक्यू आशु, मेट्रो ईन दिनो - साठी! Happy

येथे राभुने लिहिलेला 'इन्स्पेक्टर झेंडे'चा रिव्ह्यू वाचून लक्षात आले होते तरीही काहीच पाहायला नाही म्हणून पाहिला. बंडल आहे. शेवटी कशामुळे तरी नेटफ्लिक्स अडकून गोल, गोल बुटिंग करू लागले तर फार धडपड न करता यूट्यूब वर 'तू चीज बडी है मस्त' वगैरे पाहिले, पुन्हा परत तरफडले नाही. Happy त्यामुळे शेवट माहिती नाही.

पण एखाद्या खऱ्या सिरियल किलर वर सिनेमा करून तो "विनोदी का काय" करायला जाणं मला व्यक्तिशः असंवेदनशील वाटलं. तुम्ही संपूर्ण काल्पनिक कथा रचून हवे ते प्रयोग करा की पण नाही, कल्पकता नाही आणि आळस! नवरा बायकोच्या लोअर- ममव कालबाह्य रोमान्सवर फार फोकस होता, कंटाळा आला त्याचाही. मनोज वाजपेयी वजन उतरवून- उतरवून खंगल्यासारखा दिसतोय स्ट्रॉंग आणि फिट वाटत नाही.

एका सीनमधे सगळी पोलिस टीम खोटी नावे ठेवून गोव्यात धडकते, तेव्हा सगळे वेगवेगळ्या दिग्दर्शकांची नावं घेतात पण भाऊ कदम मात्र ऋषी कपूर म्हणतो, कुणीच विश्वास ठेवत नाही मग ऋषी कडू म्हणतो तेथे हसू आले. जोक छान होता म्हणून नाही तर टायमिंग मुळे.

शेवटी एका पार्टीत सगळे ठरलेलं असताना कार्ल्स भोजराजला पकडायला जातात, तेव्हा भोजराज आणि शेंडेचे "विनोदी" आणि इंटिमेटच साल्सा नृत्य दाखवल्याने उठाले रे बाबा फील आलं. फारच गंडला आहे चित्रपट. फक्त जीम सर्भ अगदी शोभराज वाटतो, मिक्स्ड रेस/ फ्रेंच वगैरे दिसतो. पाहू नका, प्रचंड कृत्रिम आहे.

सचिन खेडेकरचा कंटाळा आला आहे आणि त्यात त्याला फार वेळ फक्त चड्डीवर पाहावे लागले. Lol "ढकलून द्या कुणीतरी पूल मधे एकदाचं याला" - वाटले. त्यात तो दोन मजले हळूहळू चढून वर आला आणि झेंडे मागेमागे, नंतर डायव्हिंग बोर्ड वर उभा. डायव्हिंग करणाऱ्यातला काही खेडेकर वाटत नाही, नुसती उडी मारलीस तरी खूप झालं वाटतं. डायव्हिंग बोर्ड वरही झेंडे मागे खेटून उभा, मला वाटलं आता सखेने उडी घेतली तरी त्या हादऱ्याने मागे झेंडे आपोआपच उलथून पडेल. पिक्चर मधे दम नसला की मनात वेगवेगळ्या चिंता येतात. Happy

मेट्रो ईन दिनो -
विकु Lol तुम्ही अजून एक मीम करा बरं!
हे वरचे फ्लॉ आहेत का? तर आहेत >>> नाही, पाप आहे पाप! Lol

फार वेळ फक्त चड्डीवर पाहावे लागले>>>>>>>>>>> हो.. पटकन संपत पण नव्हता तो सीन. लटकती ढेरी... प्रचंड घाण दिसत होतं ते.
मला वाटलं आता सखेने उडी घेतली तरी त्या हादऱ्याने मागे झेंडे आपोआपच उलथून पडेल. >>>>>>>>> लोल्झ वी थॉट सेम. झेंडे ला म्हणूनच तो मागे सरक म्हटला असेल ते बघितलंस का?
त्या सीनमधे दुसरे काहीच विचार करण्यासारखे नव्हत्ते मग अशा चिंता केल्या आपण Wink

बाकी मुव्ही धन्यवादच आहे. नाही बघितला तरी चालेल.

सखे वरुन उडी घ्यायला जातो तर झेंडे मागे मागे बोलत येत असतो. तिथे सखे उडी घेतो, मागोमाग झेंडे उडी घेतो आणि पाण्यात पण बडबड चालूच ठेवतो असं काही करतील वाटलेलं मला. ते जाम फनी वाटलं असतं. पण कमिशनर वगैरे पाचकळ विनोद करुन तो सीन संपवला.
बाकी सखेला बेढब दाखवून काय साधलं कोण जाणे!

Pages