चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Wife (Amazon Prime)
ग्लेन क्लोज, जोनाथन प्राइस

सत्तरी पार केलेल्या एका लेखकाला नोबेल प्राइझ मिळतं. ते स्वीकारण्यासाठी तो, बायको आणि तरुण मुलगा स्टॉकहोमला जातात. तिथे पोचल्यापासून ते नोबेल पुरस्कार प्रदान करण्यापर्यंतचा हा सिनेमा आहे.

बायको नवर्‍याच्या जेवणाखाणाच्या वेळा, औषधांच्या वेळा पाळणारी, थोडक्यात त्याची काळजी घेणारी असते. स्टॉकहोममध्ये पुरस्कारपूर्व भेटीगाठींमध्ये त्याच्या बरोबर असते. पण नोबेलविजेत्याची बायको म्हणून जराही पुढेपुढे करत नाही, कुठेही मिरवत नाही.
मात्र बारीकसारीक प्रसंगांतून, एखाद-दुसर्‍या संवादातून 'समथिंग इज नॉट राइट' हे आपल्याला जाणवायला लागतं.
त्यांचा तरुण मुलगाही होतकरू लेखक असतो. त्याने आपलं काहीएक लेखन वडिलांना वाचायला दिलेलं असतं. त्याला वडिलांकडून त्यावरच्या चर्चेची, अभिप्रायाची अपेक्षा असते. पण वडील ते टाळत असतात, आत्ता नोबेलच्या ऑर्बिटमध्ये आहे, नीट वाचू शकणार नाही म्हणत असतात. त्यामुळे मुलगा वडिलांशी काहीसा फटकूनच वागत असतो.

आणखी एक मध्यमवयीन चरित्रलेखक यांच्या मागावर असतो. नोबेलविजेत्याचं चरित्र लिहिण्याची ऑफर त्याला एका प्रकाशन संस्थेकडून मिळालेली असते. पण नोबेलविजेता त्याला दाद देत नसतो. नवरा दाद देत नाही म्हणून बायकोही त्याच्यापासून चार हात लांब असते.

लेखक आणि बायको यांचा कौटुंबिक प्रवास अधूनमधून फ्लॅशबॅकमध्ये येतो. त्यात मुख्य फोकस लेखनावरच आहे. सुरुवातीला टिपिकल नवरा-बायकोचं पिकलेलं नातं वगैरे वाटतं. पण त्याचं गूढ नकळत वाढायला लागतं.
'गूढ' म्हणजे हिंसा, अब्यूज वगैरे काहीही नाही. ते काय आहे हे बघण्यासारखं आहे. काहीजणांना त्याचा आधीच अंदाजही येईल.
मला जरा जरा अंदाज येत गेला. पूर्णपणे नाही आला. पण त्यात मी जास्त डोकं खपवलं नाही, कारण 'ग्लेन क्लोज'! तिने या भूमिकेत क-मा-ल केली आहे! देहबोली, डोळ्यातले भाव, कपाळावरची एखादी अठी, भुवयांची जराशी हालचाल, सिंगल शॉटचे दीर्घ सीन्स, दीर्घ क्लोज-अप्स...
ही बाई पूरी छा गयी है!
या भूमिकेसाठी तिला गोल्डन ग्लोब मिळालं होतं. ऑस्कर नॉमिनेशनही मिळालं होतं.

नोबेल पुरस्कार वितरणानंतर जंगी मेजवानी असते. तिथे विजेता लेखक छोटेखानी भाषण करतो. भाषणात आवर्जून बायकोचा उल्लेख करतो. माझ्या आयुष्यात तिची साथ अपूर्व आहे, ती नसती तर आज मी इथवर पोचू शकलो नसतो, हा पुरस्कार माझ्याइतकाच तिचाही आहे - कोणताही पुरस्कारविजेता बोलेल त्या प्रकारचंच हे भाषण. त्या दृश्यात जोनाथन प्राइसपेक्षा ग्लेन क्लोजवर कॅमेराचा जास्त फोकस आहे. जमलेले सगळे कौतुकाने टाळ्या वाजवत असतात आणि तिच्या चेहर्‍यावरचे भाव जे काही बदलत जातात, तो सीन ग्लेन क्लोजने जबरदस्त केला आहे.
त्या सीननंतर त्यांच्यातलं गूढ प्रेक्षकांसमोर येतं. त्यांच्या मुलालाही त्याबद्दल पहिल्यांदाच समजतं. त्याला धक्का बसतो. पण बायको ते नाकारते.
पुढे स्टोरीत एक ट्विस्ट येतो. अगदी सहजगत्या येतो. पण त्याला कारणीभूत असतं ते गूढच.
आणि अगदी शेवटचा शॉट आणि शॉटमधली ग्लेन क्लोज! त्याबद्दल सांगत नाही. प्रत्यक्षच बघायला हवं.

अगदी धीम्या, शांत pace चा सिनेमा आहे. भूमिका छान लिहिल्या आहेत.
लेखनकार्य, लेखनव्यवसाय, त्यातले भेदाभेद यावर subtly मस्त भाष्य केलं आहे.

मला सिनेमा खूप आवडला.

रोझेस : ऑलिव्हिया कोलमन, बेनडिक्ट कंबरबॅच

काल रोझेस बघुन आलो. ट्रेलर बघुन जसा असेल वाटलेला तसा अजिबातच नाही. चक्क रोम-कॉम वाटेल असा आहे. खटकेबाज संवाद ट्रेलर मध्ये आहेत तितकेच आहेत. ब्रिटिश कुटुंब अमेरिकेत रहायला आल्यावर होतील ते सटल जोक आहेत. बरेच लांब लांब संवाद आहेत.
कंबरबॅच आर्किटेक्ट आणि कोलमन शेफ असते आणि ते रेस्टॉ. किचन मध्ये भेटतात आणि १० सेकंदात या कोलाहलातून वाचण्यासाठी एकत्र अमेरिकेला जाऊ ठरवतात. पण एक मोठा इश्यु जाणवतो. आपण तर अजुन सेक्स केलेलच नाही! मग २० सेकंदांनी कार्यभाग उरकायला किचन मधल्या फ्रिजर मध्ये जातत. Lol तर थिओ आर्किटेक्ट म्हणून काम करत असतो आणि आयव्ही स्टे अ‍ॅट होम आई. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले. मुलं १० वर्षांची झाल्यावर थिओ अचानक एक दिवस तू तुझं साउथ कॅल मध्ये रेस्टॉरंट का उघडत नाहीस असं कॅज्युअली विचारतो. मग ती चालू करते. इकडे याचं ड्रीम प्रोजेक्ट वगैरे असतं ते वादळात शब्दशः पाण्यात जातं. मग रोल चेंज, घरकाम करणारा बाबा आणि सिच्वेशनल कॉमेडी. मग डिव्होर्स, मग एकमेकांच्या जिवावर उठलेले दोघे, अशी वळण घेत तुम्हाला जो वाटतोय त्यात थोडासा मसाला घालून शेवट. फ्लॉड, बोलभांड, परस्पर विरोधी विचार करणारं कुटुंब. त्यातली एकच बाजू १० वर्षांनंतरची आपल्याला दिसते. पहिली १० वर्षे आयव्हीने काय केलं असेल त्याबद्दल चकार शब्द नाही. इतकी सगळी भट्टी असून प्रॉडक्ट काही जमलं नाही असं वाटलं.

खुसखुशीत संवाद, अभिनय, व्हिज्युअल्स, म्युझिक, सगळं छान आहे. पण कथाबीज यथातथा असल्याने असेल, अपेक्षा फार उंचावल्याने असेल फार मजा आली नाही. पिक्चर संपल्यावर काहीही चर्चा न करता शांतपणे गाडीतून घरी आलो. Happy

Thursday Murder Club - Netflix
आवडला. कलाकार मस्त आहेत.

'सॉग्ज्स ऑफ पॅरडाइस'
काश्मिर खोर्‍यातील पहिल्या पार्श्वगायिकेचा हा प्रवास आहे. तिचं नाव होतं राज बेगम. सिनेमात ते बदलून झेबा उर्फ नूर बेगम केलं आहे.
नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ आहे हा. काश्मिर खोर्‍यातील मुसलमान घरातील झेबा. अब्बू शिवणकाम करुन संसाराचा गाडा हाकत आहेत, मौजी (आई) घरकाम करुन. झेबा नाकीडोळी नीटस आहे. आईच्या सांगण्याखातर झेबा बाहेर जाताना कश्मिरी घालतात तसा हिजाब घालते पण ओठाला लिपस्टिक लावायची विसरत नाही. ती काहीशी रेबेल आहे, पण मौजी आणि अब्बूला त्रास देऊन क्रांती वगैरे करणं तिच्या रक्तात नाही. घरखर्चाला हातभार म्हणून ती एका गायनमास्तराकडे वरकामाला तासभर जाते.
एक दिवशी झेबाच्या मैत्रिणीच्या निकाह मध्ये झेबा तिच्या कोवळ्या सुरेल आणि काहीश्या दर्दभर्‍या आवाजात एक जोरकस गाणं म्हणते आणि मास्टरजी ते ऐकतात. त्यांना हिरा गवसलेला आहे हे समजतं. त्याला पैलू पाडायचे का? असं ते झेबा दुसर्‍या दिवशी घरी आल्यावर विचारतात. झेबा वरवर नकार देत असली तरी आतुन तिला ही गाण्याची समज आणि आवड आहे हे जाणवतच आहे. मास्टरजी झेबाला वरकामाचा एकतास जास्त पाठवा असा घरी निरोप धाडतात. घरी अब्बूंशी बोलल्यावर ते गाण्याचा अभ्यास लगेच चालू करायला सांगतात, वर आईला सांगायची काही गरज नाही हे ही मिश्किलपणे सांगतात.
आणि मग झेबाची तालिम चालू होते. रेडीओ कश्मिरवर एक स्पर्धा असते त्यात झेबा 'नूर' नावाने भाग घेते आणि जिंकते. मग कॉन्ट्रॅक्ट नुसार रेडिओवर गाणी गाऊ लागते. पुढे यथावकाश बिंग फुटते आणि कथा पुढे सरकत रहाते.

ही सगळी कथा आपल्याला फ्लॅशबॅक मध्ये उलगडत जाते. बर्कली मध्ये शिकणारा 'रुमी', नूर बेगमची मुलाखत घ्यायला, त्यांना जाणून घ्यायला येतो. नूरला, तिच्या गाण्यांना, आवाजाला जाणून घेता घेता तो स्वतःलाच सापडत जातो आणि त्याला त्याच्या जीवनाचे ध्येयच सापडते. तो ती गाणी त्याचय गिटार आणि नूरच्या नाती बरोबर पुनरु:जिवीत करण्याचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतो.

कश्मिर मधील राज बेगम यांच्या सत्यकथेवर बेतलेला चित्रपट आहे. त्यांनी रेडिओवर जवळ जवळ दोन एक हजार गाणी ध्वनिमुद्रित केली होती. पण एका आगीत, अपघाताने लागलेल्या किंवा कदाचित असुयेपोटी लावलेल्या, पण वणव्यात तो सगळा खजिना भस्मसात झाला. चित्रपटातील गाणी गोड, हुरहुर लावणारी, दमदार काश्मिरी काहीशी सुफी, काहीशी अरेबिक .. अशा पोताची आहेत. काहीशी रिपिटेटिव्ह आहेत हे ही जाणवलं. मी राज बेगम बद्दल अनभिज्ञ होतो, त्यांची ओळख झाली, आता आणखी शोध घेईन.

चित्रपट बराच सरळसोट, काहीसा बाळबोधही वाटेल असा आहे. पण या साध्या साध्या तुकड्यात मनाला एक सुकुन वाटणारं असं काही आहे. तरुण नूर सबा आझादने आणि मोठेपणची सोनी राझदानने साकारली आहे. बाकी शिबा चढढा, लोलित दुबे, शिशिर शर्मा हे ओळखिचे चेहरे दिसतात. दानिश रेंझू ने दिग्दर्शित केला आहे.

काल 'कोडा' परत तिसर्‍यांदा पाहीला. मूक बधीर जोडप्याची नॉर्मल मुलगी आहे. तिला ऐकू येते, बोलता येते. ती आई वडीलांना मदत करते. ते कोळी आहेत. मासे गोळा करुन दलालांना विकतात. या मुलीला शाळेतही टवाळीला, दादागिरीला तोंड द्यावे लागते पण एक मिस्टर व्ही गायनकलेचे शिक्षक आहेत. त्यांना या मुलीत स्पार्क दिसतो व ते तिला खूप मदत करतात. बर्कली कॉलेजमध्ये स्कॉलरशिप प्रोग्रॅम आहे. सरांना वाटत असते की तिने त्या कॉलेजमध्ये दाखल व्हावे पण मग तिच्या कुटुंबाने निर्वाह कसा करायचा. तिच्यापुढे हे द्वंद्व आहे.
.
जरुर बघा फार सुरेख सिनेमा आहे. माबोवर कोणीतरी कोडा बद्दल लिहीलेले.

मला खूप आवडला 'सॉग्ज्स ऑफ पॅरडाइस'. त्यातली ती काश्मिरी भाषा, काश्मिरी गाणी आणि हिंदी बोलतानाचा काश्मिरी अ‍ॅक्सेंट, सगळंच खूप आवडलं. ती गाणी परत परत ऐकतेय मी.

मारिसन बघितला, आवडला. पण मला डब केलेला बघायला मिळाला. डब केलेले चित्रपट बघताना थोडं इरिटेशन होते डबिंग्च्या आवाजामुळे. त्यापेक्षा मुळ भाषेत बघून खाली सबटायटल्स बघायला जास्त छान वाटतं.

ललीने सुचवलेला The Wife बघितला. खूप आवडला.

काय झाले असणार याची कल्पना यायला लागते. पण "if I was a piece of sh*t why did you marry me?" हा प्रश्न सगळा सिनेमा फिरवतो. प्रश्नाचे उत्तरही सिनेमात आधी आलेले आहे पण तो प्रसंग बघताना जाणवत नाही.

थँक्यू ललिता द वाईफ सिनेमा सुचवल्याबद्द्ल. मलाही आवडला.
मारिसन पण चांगला आहे. वेगळ्याच काहीतरी थिम असतात साऊथ सिनेमाच्या.

हिंदी डब धाग्यावरची पोस्ट इथे सुद्धा टाकतो.

Maareesan / मारिसन
Hindi dubbed
ओरिजिनल भाषा – तामीळ
वर्ष – २०२५
कुठे बघाल – नेटफ्लिक्स
जॉनर – Comedy, drama, thriller
IMDB रेटिंग - ७.५

कथेचा पहिला नायक एक छोटी मोठी चोरी करणारा चोर.
जो एका घरात चोरी करायला शिरतो. जिथे त्याला कथेचा दुसरा नायक भेटतो. आणि त्याला अल्झायमर झाला असतो.
हा त्याला थोडेफार पैशांना लुटतो आणि लुटत असतानाच त्याच्या लक्षात येते अरे ही तर सोन्याची कोंबडी आहे. याला आपण त्याच्या आजाराचा फायदा उचलत आणखीही बरेच लुटू शकतो.
त्यामुळे हा त्याला उलट्यासुलट्या भूलथापा मारून आपल्यासोबत एका रोड ट्रिपला घेऊन जातो. या ट्रिपमध्ये काही प्रासंगिक विनोद घडतात.

हल्ली या अल्झायमर आजाराचे अचानक खूप सारे चित्रपट का बनवू लागले आहेत कल्पना नाही पण इथला आजार वाटतो तितका साधा सरळ नसतो.
यात कधीतरी कुठेतरी एक हलकासा ट्विस्ट येतो आणि हलक्या फुलक्या पद्धतीने पुढे सरकणाऱ्या कथेला आणि आधीच्या सर्वच प्रसंगांना एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. जणू चित्रपट डोक्यावर फिरतो.

कोणाला कमी आवडेल कोणाला जास्त. पण वेगळ्या धाटणीचा चित्रपट आणि प्रमुख पात्रांच्या अभिनयातील सहजता म्हणून एकदा पूर्ण जरूर बघाल.

गेल्या आठवड्यात तो 'मेट्रो इन दिनों' सिनेमा नेटफ्लिक्सवर आलेला दिसला आणि नटमंडळी चांगली दिसली म्हणून पाहिला. अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही!
पंकज त्रिपाठी मेजर मिस्कास्ट! ती सारा अली खान इतकी ठोकळा असेल असं वाटलं नव्हतं! महापथेटिक आहे!
आणि नक्की काय दाखवायचंय तेच कळेनासं व्हावं इतका ताण ताण ताणला आहे! महाकंटाळवाणा आणि रिपिटिटिव! तेच तेच तेच दळण बराच काळ सुरू राहातं!
लग्न ही संकल्पना बकवास आहे, पण कराच आणि निभवाच बै - हा मेसेज?!

Each story explores different aspects of modern relationships, including intimacy, conflict, and self-discovery.
घ्या आणि पैसे देऊन मज्जा करा.
ही मेट्रो म्हणजे त्या मेट्रोची जुळी बहिण दिसतीय.

Lol
धन्यवाद स्वाती, मी थोडा वेळ पाहून सोडून दिला होता. हॉटेलच्या लॉबीत कोंकनाने घेतला पंत्रिचा बदला व सारा आणि आदित्य फेक स्टोरी तयार करतात ते, त्यात तिचे केस वाईट का अभिनय हेही कळेना. Happy ती गाणी चपखल आलेली न वाटता असह्य झाली, मला हुकलेले म्युझिकल्स एक टॉर्चर वाटते. Happy

पण फा आणि अमित फारच कौतुक करू लागले. आजकाल कुणावर विश्वास ठेवावा काही कळत नाही. Proud

मेट्रो केकूंनी पाहिलाही नाही, तरी धडकली आहे. Proud

मेट्रो मीही ( कसातरी नेटाने) पाहिला. भयाण आहे! संपता संपेना. एकही स्टोरी कन्विन्सिंग नाही. सारा अली खान ला अशी काय हेअर स्टाइल दिली आहे Uhoh पंकज त्रिपाठीवाली स्टोरी विअर्ड आणि अ. आणि अ. होती. व्हॉट्स द पॉइन्ट? सारा अली खान ची अति प्रेडिक्टेबल. नीना गुप्ताचीही चांगली नव्हेच पण त्यातल्या त्यात सहणेबल.

>>> ती गाणी चपखल आलेली न वाटता असह्य झाली
हो हो! पहिल्या भागातली गाणी मस्त होती आणि त्यांनी स्टोरीटेलिंग एन्हॅन्स केलं होतं!
यातली भयाण कर्कश्श होती! एक कॅरेक्टर म्यूझिशियन असून!!

>>> फा आणि अमित फारच कौतुक करू लागले
देअर इज युवर रेड फ्लॅग! Proud

मला उन दिनोंका मेट्रो पण फारसा झेपला नव्हता त्यामुळे इन दिनोच्या वाट्याला गेलोच नाही.

पंकज त्रिपाठीचा अभिनय आता साचेबद्ध वाटायला लागला आहे. तसा सगळ्यांचाच वाटायला लागतो म्हणा एकदा तो नट्/नटी रुळल्यावर. हिट झालेल्या भूमिकेचा साचा वापरून पुढची वाटचाल सुरू होते आणि मग चाकोरीत अडकत जातात. चाकोरीत न अडकणारे बच्चनसारखे विरळाच.

मी या आठवड्यात दोन्ही मेट्रो एकत्र पाहिले आणि आता वरची चर्चा वाचून माझे मत मांडायचे ठरवले तर नक्की कश्यातले काय हे आठवायला तयार नाही Sad स्टारकास्ट गूगल करावी लागली Happy

पण ते महत्वाचे नाही. कारण मला आताचा सुद्धा बरेच गोष्टी नावडून ओव्हरऑल आवडला.

सारा अली खान आवडतेच.
अर्थात कृती, कियारा, यामी या तिच्या सोबतीने तितक्याच आवडतात.
त्यामुळे असेल कदाचित पण मला तिची स्टोरी सर्वात जास्त आवडली.

आदित्य रॉय कपूर मला आवडत नसला तरी सुसह्य वाटतो. स्पेशली रणबीर सोबत जवानी दिवानी चित्रपटात चांगला वाटला होता. पण या चित्रपटात मात्र चक्क आवडला. त्या दोघांची स्टोरी जास्त वेळ असावी असे वाटले.

कोंकणा सेन आणि पंकज त्रिपाठी बोअर प्रकरण होते. त्यामानाने आपल्या आयुष्याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे असे वाटले. इरफान नाही तर त्याला रिप्लेस करायला त्रिपाठीला आणले असे वाटले.

अली फझल आणि फातिमा आता गूगल केल्यावर आठवले. आता वाटते नसते तरी चालले असते.

या सगळ्यात गाणी मात्र मजेशीर वाटली. बॅकग्राऊंड म्युझिक वर गायलेली बडबडगीते ऐकायला छान वाटली. आधीच्या भागापेक्षा वेगळा प्रयोग करायला धाडस लागते.

या पिक्चरमधून काही शिकायची मला फार गरज वाटली नाही त्यामुळे कोणाचा शेवट काय दाखवला आणि तो चूक की बरोबर यावर मी फार विचार करत बसलो नाही Happy

अरे हो त्या विधवा बाईची एक स्टोरी होती. ती यातच ना. नाव सुद्धा तिचे झिनुक ठेवले होते. आता गूगल करून समजले. आयुष्यात लक्षात राहणार नाही. ती स्टोरी सुद्धा नसती तरी चालले असते म्हणा. अच्छा पण त्यात पुढे नीना गुप्ता होती तिची स्टोरी आवडली. टिपिकल होती म्हणा. पण तिची अदाकारी आवडतेच.

Pages