वेबसिरीज - ४

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2025 - 16:26

हिंदी-मराठी-इंग्लिश-कोरियन भाषेतील आवडत्या-नावडत्या कुठल्याही वेबसिरीजबद्दल चर्चा करायला हा धागा.

आधीचा धागा इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/83680

त्या धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंदिश Bandits -- प्राईम

बरेच दिवस ऐकून होतो छान आहे म्हणून, पण शास्त्रीय संगीतावर आधारित असल्याने आपल्या अभिरुचीला काही झेपणार नाही म्हणून टाळत होतो.

पण जसे विनाशकाले विपरीत बुद्धी होते तसे कधीतरी चांगला काळ येता सुबुद्धी सुद्धा होते. गेला आठवडा असाच काळ होता. सीजन एक आणि दोन दोन्ही जिथे जसा वेळ मिळेल तसे बघून संपवले.

आधी प्लॉट अतर्क्य वाटला, आपल्या आयुष्याशी रिलेट न होणारा एखाद्या परीकथेसारखा वाटला. पण तरीही जे काही होते ते भन्नाट वाटत असल्याने बघत राहिलो. हळूहळू एकेक पात्रांसोबत जोडले जाऊ लागलो तसे त्यांच्या भावभावना सगळे काही कळू लागले. जो यातला सगळ्यात बेस्ट पार्ट असावा. प्रत्येक कॅरेक्टर जे काही अतरंगी वागत होता त्याच्या त्या प्रत्येक वागण्याचे कारण स्पष्टीकरण संदर्भ दिले होते, कालांतराने लागत होते. मला वैयक्तिकरित्या एक सवय आहे की प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले वाईट जे काही वागते ते का वागते त्यामागचे कारण जाणून त्या व्यक्तीला समजून घ्यायला आवडते. या मालिकेत तर बुद्धीला बरेच खाद्य मिळाले आणि नात्यांबाबत बरेच काही शिकलो असे झाले.

आणि शास्त्रीय संगीत म्हणा किंवा एकूणच संगीत म्हणा, जे काही होते ते इतके भन्नाट होते की मलाच लाज वाटली मी या कारणासाठी हे बघायला टाळत होतो. शास्त्रीय संगीताच्या अगदी प्रेमात पडलो या सिरीजनंतर Happy

मी आजवर फार वेबसिरीज पाहिल्या नाहीत. पंचायत, फॅमिली मॅन, कोटा फॅक्टरी, स्क्विड गेम अश्या मोजक्याच पाहिल्या आहेत आणि त्यासुद्धा बरेच उशीरा जेव्हा त्याची बरीच चर्चा कानावर पडली आहे. पण कुठलीच वेब सिरीज दोन वेळा पाहिली नाही. तरी ही वर्ष दोन वर्षभराने नक्की बघेन. आणि तोपर्यंत यातल्या गाण्यांची पारायणे होतील. कारण आज दुपारी शेवटचा भाग बघून संपल्यावर आता पुढे काय हा प्रश्न पडला. सुदैवाने इंडिया इंग्लंड टेस्ट मॅच शेवटचा दिवस असल्याने प्रश्न सुटला अन्यथा अवघड होते.

या मालिकेवर आधीही चर्चा झाली असेलच, शोधायला हवी. खरे तर स्वतंत्र धागा असायला हवा इतके लिहिण्यासारखे आहे.

Dept Q :
ईन्टाग्राम वरचे रेको वाचून ही मालिका बघायला सुरुवात केली . २-३ एपि बघून झालेत . मस्त interesting आहे . एक्दम धडाकेबाज धक्कातन्त्र , खूप सस्पेन्स वगैरे काही वाटत नाहीये . स्लो-कूक कथा आहे .

एक पोलिस अधिकारी कार्ल , एका घरात कोणीतरी मरून पडलय म्हणून तपास करायला जातो . तिथे एका हल्ल्यात त्याला गोळी लागते , त्याचा सहकारी जखमी होतो आणि लोकल ज्यु पोलिस ऑफिसर मारला जातो . अर्थातच या सगळ्या गोष्टींचा त्याच्या मनावर परिणाम होतो . त्या ज्यु च्या मृत्युला आणि पॅरालिसिस होउन हॉस्पिटल्मध्ये पडलेल्या सहकार्याच्या परिस्थितीला तो स्वःताला जबाबदार मानतोय . त्याचे मानसोपचार चालू आहेत . घरी नेहमीप्रमाणे टीनेजर मुलगा , विभक्त बायको यामुळे तो त्रासलेला आहे .
बजेट मिळणार म्हणून त्याची अधिकारी एक नविन डिपार्ट्मेन्त सुरु करते - कोल्ड केसेस तपासासाठी. कार्ल ला ते सांभाळायला बोलावते. फार तक्रार करतो म्हणून एक असिस्तन्ट पण देते .
या गोष्टीच्या समांतर मेरिएट ची कथा चालू आहे . ती public prosecutorआहे , special needs असलेला तरूण भाउ आणि त्याची केअर्गिव्हर्/हाउसकीपर त्यांच्यासोबत राहतेय . मेरीएटला सतत धमक्याचे मेसेजेस येतायेत ., कोणीतरी पाठलाग करतय. एक महत्वाची केस ती हरते काही घटना घडतात आणि मग या सर्व गोष्टींनी थकलेली मेरिअट बदल म्हणून भावाला घेउन शिपवर जाते .
ईथे कार्ल चा असिस्टंट अक्रम जुन्या केसेसच्या ढिगार्यातून एक कोल्ड केस शोधतो जी आपण तपासाला घेतली पाहिजे असं त्याला वाटत.
पहिल्या भागात ,पहिला पाउण तास नक्की काय चालू आहे हे समजायला वेळ लागला . मेरिएट ची कोर्ट केस , कार्लवरचा हल्ला , त्याची डॉ ची भेट , त्या हल्ल्याच्या तपासात मध्येमध्ये जाउन त्याची ढवळाढवळ , मेरिअट चा भाउ आणि हाउस्कीपर. शेवटच्या ७-८ मिनिटात आपल्याला कळतं या दोन समांतर चालेल्या कथा नक्की कुठे एकमेकांना भेटतात . मग सुरु होतो एका तपासाचा खेळ .

काय आवडलं -
कथा scotland - london मध्ये घडते . अमेरिकन अ‍ॅक्सेन्ट एकून कंटाळ्लेले Happy
कार्ल म्हणजे आपला डाउन्टन अ‍ॅबे मधला हेन्री टेल्बॉट ( मेरीचा दूसरा नवरा )
खुसखुशीत , उपरोधिक विनोद .
पारंपारिक whodunit नाहीये .
एका सीनम्ध्ये समोरचा कार्ल ला विचारतो , "honestly do you think the person is still alive?"
तर तो म्हणतो "Honestly , I donno . But atleast we will know what exactly had happened "
तो कार्ल् वर झालेला पहिला हल्याच पुढे काय होत? हे नविन डिपार्ट्मेन्ट का सुरु केलं जातय? ही तपासाची कथा आहे .
सध्यातरी आवडतेय .

Dept Q मलाही आवडली होती.

लोणच्यासारखी आहे. मुरायला थोडा वेळ लागतो. सर्वसाधारण मालिका दुसर्‍या भागापासून पकड घ्यायला लागतात - फारफार तर तिसर्‍या. यात मात्र तिसर्‍या भागाच्या शेवटपर्यंत फारशी पकड घेतली नव्हती. Dept Q चे ऑफीस आणि मेरीएट जिथे असते ती जागा यांच्यामुळे काहीशी डिप्रेसिंग वाटायला लागली होती. पण चौथ्या भागापासून मस्त पकड घेते मालिका.

सगळ्यात जास्त आवडली ती पात्रनिर्मिती. प्रत्येक पात्र, त्याचा स्वभाव इतका ठाशीवपणे रंगवला आहे की बघायला मजा आली.

अत्यंत सवंग मालिका आहे...... सेक्स व नॉनसेन्स सेल्स!!!
>>>>

बंदिश Bandits का?
च्यायला मला कुठले वर्जन दाखवले मग? किस पलीकडे काहीच दाखवले नाही.

तुला सात्विक व्हर्जन होते ऋ , दोन व्हर्जन आहेत. सात्विक आणि ष्टिमी (steamy) Proud

बाय द वे, सॅन्डमॅन सिरीजचा दुसरा सिझन आला आहे. दोन एपिसोड पाहिले. पहिला अत्यंत आवडला होता. ग्रीक पुराणातील व्यक्तिरेखा आणि संपूर्ण फॅंटसी आहे. पण अत्यंत दर्जेदार संवाद, उत्तम अभिनय, जबरदस्त आणि प्रेक्षकांना आव्हान देणारी कथा आहे. डेथ, डेस्टिनी, डिझायर, ड्रीम अशी मानवी भावनांची नावं असलेली सात भावंडं व त्याभोवती गुंफलेली वेगळ्या प्रतलातील कथा आहे. पहिल्या सिझनचा फुल रेको.

हायला मी सिरीयसली गूगल केले मला हे सापडले.

No, Bandish Bandits does not have a sexual version. It is a musical drama series about the love story between a popstar and a classical music prodigy. While the series explores themes of love and relationships, it does not contain explicit sexual content. The series has a "mild" sex and nudity rating, but this refers to kissing and romantic scenes, not sexually explicit content according to IMDb's parental guide.

बाकी ज्याचे त्याचे निकष आणि बेंचमार्क.
मला नाही त्यात फार काही विशेष वाटले. उलट छान मॉडर्न वाटला रोमान्स. खरे तर यावर एक वेगळा लेख यायला हवा. येत्या पिढीला अशी नाती हॅण्डल करणे एक चॅलेंज राहणार आहे.

बाकी त्यातले एक दोन कॅरेक्टर शिव्या अती देत होते किंवा त्याचे काही डायलॉग चीप होते म्हणत असाल तर ते वेगळे.. आणि ते मान्य. कारण ते मित्रांमध्येच नाही तर कुठेही देताना दाखवले होते.

अरे ष्टीमी, सवंग इ. इ. वाचुन माझ्या डोळ्यांनी टोटल दगा दिला.
' musical drama series about the love story between a popstar and a classical music prodigy. ' इथे माझ्या डोळ्यांनी पॉपस्टारच्या जागी भलतंच वाचलं. Lol

इथे माझ्या डोळ्यांनी पॉपस्टारच्या जागी भलतंच वाचलं >>> Lol

"शेमलेस" पाहा लोखो. नेटफ्लिक्स. मस्त आहे. सवंग भरपूर आहे. पण ष्टीमी म्हणता येतील असे फार सीन्स नाहीत. म्हणजे अ‍ॅडल्ट सीन्स भरपूर आहेत पण ते ष्टीमी नाहीत. सिरीजच्या नावाप्रमाणे वागणारी बरीच कॅरेक्टर्स आहेत.

पण मला ग्रिपिंग वाटली. थोडी कॉमिक, थोडी सिरीयस. त्यातल्या कसलाही विधिनिषेध नसलेल्या, पण रिसोर्सफुल आणि फॅमिलीकरता काहीही करणार्‍या व्यक्तिरेखा अफलातून आहेत. त्यांचा अतरंगीपणा हाच मुख्य भाग आहे आणि तो जबरी आहे. अनेक अशा गोष्टी ज्या इतर सिरीजमधे वाईट, सॅड अशा दाखवल्या जातील त्या यात अगदी कॅज्युअली दाखवून सिरीज पुढे निघून जाते. मी दहाव्या सीझनवर आहे. सुरूवातीला ३-४ भाग पाहून सोडली होती. नंतर पुन्हा सहज सुरू केली आणि एकदम एंगेज झालो.

सध्या नेटफ्लिक्सवर गॅलिलीओ नावाची जॅपनीज मालिका पाहतेय. डिटेक्टिव्ह सिरीज आहे. त्यातली डिटेक्टिव्ह बाई चमत्कारिक केसेस सोडवण्यासाठी एका फिजिक्सच्या प्रोफेसरची मदत घेते आणि तो चमत्कारांमागचं रहस्य उलगडून तिला खरा गुन्हेगार पकडायला मदत करतो. साधी मालिका आहे. मला आवडली.

Brilliant minds बघतेय सध्या. मस्त आहे.
भारतात हॉटस्टारवर बघायला मिळेल.
काइंड ऑफ मेडिकल ड्रामा आहे.

Dept Q >>> नोटेड.

बंदिश बँडिट्स - पहिला सीझन अजिबात आवडला नव्हता. त्यामुळे दुसरा बघणार नाही.

फेक प्रोफाइलचा (नेट्फ्लिक्स) दुसरा सीझन काल बिंज वॉच करून संपवला. उत्सुकताच तशी निर्माण झाली होती.
दुसर्‍या सीझनमध्ये खुनावर खून पडू लागले. पोलिसांना कोणी संशयित वाटले तरी त्यांना डिटेन करून ठेवता येत नाही, पॉश, प्रशस्त बंगल्यात काय चाललंय हे रस्त्यावरून पण लोकांना दिसतं. बाकी सगळ्यांवर संशय घेतला तरी प्रत्यक्ष खून करणार्‍या व्यक्तीवर पोलिस कधीच संशय घेत नाहीत. कोण खुनी असेल याचा अंदाज शेवटच्या दोन तीन भागांत दिला होता. खून करण्याचं कारण विकृती हेच म्हणावं लागेल. ज्या कारणावरून ती व्यक्ती खून करत सुटते, ते कारण ज्याने दिलं त्याच्या मात्र खुनाचा विचार सुद्धा ती करत नाही, याचं कारण एका वाक्याच्या संवादात आलं आहे.
एखाद्या व्यक्तीबद्दल सेक्स्युअल ऑब्सेशन असणं आणि त्यासाठी थेरपी घेणं हा प्रकार अनेक वेब सिरीजमध्ये दिसला.
यातलं इंटिचं पात्र आवडलं. मागेपुढे कोणी आहे, जगण्यासाठी काय काय करावं लागलं, की तीही विकृती, तरीही मान ताठ ठेवून जगतो तो.

शेवट ओपन ठेवून तिसर्‍या सीझनची सोय केली आहे. हे ताणल्यासारखं होईल, असं आता तरी वाटतंय.

बंदिश बँडीट्स मी सिजन १ पाहिला..विशेष आवडली नाही पण बघत गेले. अ तुल कु. खूप आवडतो. नसिरुद्दीन चा २ बायका मोड कायम असतो अगदि जिकडे तिकडे Lol
पण ह्यात मला हीरोईन पार डोक्यात जात होती.. इतकी अघळ पघळ आणि ओपन कपडे घालून ती तिच्या गावी फिरत असते की ती शहरातली आहे आणि काही दिवसांसाठी तिथे आलिये, पण ती तिथलीच असते. त्यात तिचं उठ सूठ से* साठीचं खुलेपण, बुजरा मुलगा, त्याला अगदी नको नको करणं चार चौघांत, आवडलं नाही ते कॅरॅक्टर.
राधे & अ तुल मस्त कॅरॅक्टर्स. शिबाचे कॅ खुलवले नाही.. डायरेक्ट २४ वर्षांनी सरळ संगीत सम्राट साठी कोच करते मुलाला..काहीही.

डायरेक्ट २४ वर्षांनी सरळ संगीत सम्राट साठी कोच करते मुलाला..काहीही.
>>>>>>

बाथरूम मध्ये लपून छपून गात असेल Happy
बाकी कथा अतर्क्यच आहे. त्यात लॉजिक शोधत फार घुसू नये हे मला सुरुवातीलाच समजले.

मला ते हिरोइन कॅरेक्टर दुसऱ्या भागात आवडले फार..
माझी एक मैत्रीण आहे तशी, योगायोगाने दिसते सुद्धा तशी... मी तिला मेसेज सुद्धा टाकला ही सिरीज बघितल्यावर.
मला त्या मैत्रिणीचे सुद्धा नेहमी कौतुक वाटायचे. म्हणून कदाचित यातील हिरोईनचे कॅरेक्टर आवडले असावे.
तिच्यात आणि माझ्यात केमिस्ट्री फार भारी जुळायची. आमच्या कॉमन फ्रेंड्स ना वाटायचे आमच्यात काही आहे किंवा होऊ शकते. पण तिचे विचार माझ्यापेक्षा मॉडर्न होते. त्यामुळे मला किंवा आम्हा दोघांनाही जाणवले की आपण एकमेकांच्या टाईपचे नाही आहोत. आज मागे वळून पाहताना वाटते की ती दरी मिटली आहे. पण मार्ग वेगळे झाले आहेत Happy

वेब सिरीज नाही पण प्राईमवर करन जोहरचा traitors कोणी पाहिला का ? खूप addictive आहे. १ ० च एपिसोड आहेत . शेवट थोडा गंडला आहे पण एकूण मस्त टाईमपास. बिग बॉस मध्ये जशा शिव्या/ भांडाभांडी असते तसे यात नाही म्हणजे मधून मधून फची भाषा आहे पण आजकाल मला वाटते त्याशिवाय नवीन पिढी बोलतच नसावी . पण त्यामुळे मला एकूण शो आवडला.
करण होस्ट आहे त्याशिवाय महीप कपूर, राज कुंद्रा, उर्फी जावेद , जन्नत झुबेर, आशिष विद्यार्थी, इ. याशिवाय माझ्यासाठी काही नवीन चेहरे होते . बिअर बायसेप्स बरोबर बदनाम झालेली अपूर्वा रिबेल किड पण आहे.

. पण चौथ्या भागापासून मस्त पकड घेते मालिका.
सगळ्यात जास्त आवडली ती पात्रनिर्मिती. प्रत्येक पात्र, त्याचा स्वभाव इतका ठाशीवपणे रंगवला आहे की बघायला मजा आली. >>> माधव , अगदी बरोब्बर. मी सातव्या भागापर्यंत पोहचलेय.
पाचव्या भागात कार्ल आणि ती care center मधली डॉक्टर यांचा सीन प्रचंड आवडला. "काय स्टाईल , काय attitude , काय arguments " मस्तच.
नंतर एका भागात कार्ल , रोझ आणि अक्रम त्या मॉयरा समोर उभे असतात . रोझ सांगत असते , "he fell from the stairs " . कार्ल आणि अक्रमचे expressions बघण्यासारखे होतात एकदम.
छान सीरीज आहे.

ट्रेटर्स नॉट बॅड. फार अपेक्षा नव्हत्या पण बर्‍यापैकी एन्टरटेनिंग झाली. ती अपूर्वा आवडली होती मला. ते टास्क्स देतात त्याचे लॉजिक मला जरा गंडलेले वाटले अधे मधे. जरा कॉन्फ्लि़क्ट हवे होते त्यात. नुसते प्राइज मनी मधे अ‍ॅड करणे हे मोनोटोनस वाटले.

पाताल लोक (२) - पहिल्यापेक्षा जास्त आवडला. हाथीराम आणि अन्सारीची केमिस्ट्री भारी आहे.

क्रिमिनल जस्टिस (४) - आधीच्या तीनापेक्षा जास्त आवडला. आधीच्या सीझन्सना तुरुंगातला ड्रामा दाखवला तो बोअर झाला. त्यामुळे तिसरा सीझन मी पाहिलाच नाही. चौथ्या सीझनला तो ड्रामा नाही असं कळलं म्हणून पाहिला.

मीट्टी - एक नयी पहचान (Prime / MXPlayer)

मालिकेचा हिरो आहे इश्वाक सिंग. अजूनही डोक्यात प्रकाश पडला नसेल तर - पाताललोक मधला अन्सारी! तो होता म्हणूनच मालिका बघायला सुरू केली आणि पूर्णपणे गुंतत गेलो मालिकेत. राजश्रीचे सिनेमे जसे साधे पण सुंदर असायचे काहीशी तशीच मालिका आहे ही. पण निर्मितीमूल्य मात्र अगदी उत्तम आहेत - आजच्या जमान्यातली.

मिट्टी , जमीन - नावातच सर्व काही आहे. आपल्यापैकी अनेक जण शेती, शेतकर्‍यांचे जीवन याबद्दल बरेच अनभिज्ञ असतो. आपले शहरी जीवन आणि ते गावाकडचे जीवन असे दोन समांतर ट्रॅक चालूच असतात. अनेक पिढ्यांपासून गावाकडून शहरात माणसे येतच आहेत पण उलट होताना फारसे दिसत नाहीत. मालिकेचा नायक - राघव - पण असाच एक गावातून शहरात आलेला आणि आता शहरात पूर्णपणे रमलेला, उज्ज्वल भविष्य असलेला तरुण. जेंव्हा गावातून शहरात येतो तेंव्हा १०-१२ वर्षाचा मुलगा असतो, आणि त्याला शहरात जायचे पण नसते. "फल शहर जाते है, पेड तो गांव मे ही रेहते है" असे सांगून आजोबा त्याची समजूत घालतात त्या वेळेला. आणि आता त्या आजोबांच्या अंत्यविधीला राघव गावात येतो. तेंव्हा त्याला कळते की आजोबांनी आधुनीक शेतीचा प्रयोग करायला कर्ज घेतले होते आणि ते न फेडल्यामुळे त्यांना बरीच मानहानी सोसावी लागली होती. आजीचा विरोध असतानाही राघव ते कर्ज फेडायला बँकेत जातो, चेक देतोही. पण तेंव्हाच त्याला कळते की ते कर्ज फेडणे आजोबांनाही शक्य होते, पण त्यांचा हट्ट होता ज्या मातीवर भरवसा ठेऊन त्यांनी ते पाऊल उचलले होते, त्याच मातीतून घेतलेल्या पिकातून ते कर्ज फेडायचे. म्हटलं तर मूर्ख हट्ट आणि म्हटलं तर खूप रास्तही. आजोबा राघवचे सर्वस्व असतात, आणि त्यांचा हट्ट पूर्ण करायला राघव गावात रहायचे ठरवतो.

शेती का नोकरी, वडिल आणि मुलामधले मतभेद, गाव का शहर अशा मुद्द्यांना स्पर्श करत मालिका पुढे सरकते - पण कुठेही उपदेशी होत नाही. गावात आल्यामुळे नोकरी जाते आणि शेतीही धड जमत नाही त्या वेळेस होणारी अवस्था, गावातले राजकारण, निसर्गाचा कोप, तुटलेली रिलेशनशीप अशा एक ना अनेक संकटांना तोंड देत नायक कसा यशस्वी होतो ते बघताना खूप मस्त वाटले.

इतर कलाकारही मस्त आहेत, त्यामुळे बघताना अजून मजा आली. फक्त एकच त्रास होता - MXPlayer वर प्रत्येक एपिसोडकरता ४ अ‍ॅड ब्रेक्स होते. पण एका एपिसोडमागे ४ मिनीटांच्या जाहिराती माझ्या दूरदर्शनच्या तालमीत तयार झालेल्या मनाने अगदी सहज पचवल्या.

मिट्टी प्रोमो बघितला. इश्वाक दिसला म्हणूनच बघितला. प्राईमवर असेल तर आहे आमच्याकडे. माधव तुम्ही छान परीचय करुन दिलात.

आधी पंचायत बघायचा विचार आहे. मग मिट्टी आणि स्पेशल ऑप्स दोन सिझन बघेन. वाळवी पिक्चर पण बघायचा आहे. राहून जातंय सर्वच.

स्पेशल ऑप्स नवा सीझन पहिला भाग बघितला. फार अ. आणि अ. वाटत आहे यावेळी. कुठेही सर्बिया , बुडापेस्ट सारख्या ठिकाणी एजन्ट असणे, ते
सगळेच एकजात भारी , त्यांना शस्त्रे, लाख -दोन लाख डॉलर्स वगैरे मनमानी हवाला ने जगात कुठेही पाठवण्याची ऑथॉरिटी. तसंच ते सुरुवातीचं ए आय चं भाषण पण बोर होतं. ए आय वर काम करणारा सायन्टिस्ट गल्लीत पण सापडेल . इतका इन्टरनॅशनल किडनॅपिंग प्लॉट कशाला.

स्पे ऑप चे नवीन सीझन इतक्या उशिरा येतात कि नेमकी कोणती सिरीज ? असा प्रश्न पडतो.
आता पुन्हा मागे जाऊन पळवत एखाद दुसरा भाग बघितला तर पुढचा सीझन समजेल. एव्हढं कोण करणार !

मलाही काल स्पेशल ऑप्स सीजन एक बघायला घेतल्यावर आठवू लागले की मी हे पाहिले आहे.
मग पळवत पाहिले तसे सारे आठवले.
मग सीजन दोन बघायला घेतला. मलाही अतर्क्य वाटले. फारच इंटरनॅशनल लेव्हलवर दाखवलेले हे खरेच असे चालते, शक्य आहे का, असा अविश्वास वाटू लागल्याने मजा आली नाही आणि पहिला एपिसोड पूर्ण व्हायच्या आधीच थांबलो. आता हे असेच असणार आहे अशी मनाची तयारी करून पुढच्यावेळी बघेन.

मैत्रेयी हेरकथा किंवा असे थ्रिलर्स डोकं बाजूला ठेवून पहायचे.
>>>>>
माझी तर हेरकथांनी डोक्याला माफक खाद्य पुरवावे अशी अपेक्षा असते. जर त्यात अक्षय कुमार नसून केके मेनन असेल तर नक्कीच..

स्पेशल ऑप्स नवा सीझन बघायला सुरुवात केली. हिम्मत सिंग आणि फारूख केवळ या दोघांसाठीच बघायचा प्रयत्न केला. पळवत पळवत पण बघावी अशीही वाटली नाही. पकडच घेत नाही. S1 आणि S1.5 दोन्ही प्रचंड engaging होते. इथे काहीच आवडत नाहीये.

Pages