Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधना, मी ब्रोकबॅक माउंटेन
साधना, मी ब्रोकबॅक माउंटेन खूप वर्षांपूर्वी टॉरेंटच्या घबाडात सापडला होता तेव्हा पहिला होता. तुझ्या लोकेशनला, आता तो कुठे पाहायला मिळेल ते जस्टवॉच वर कळेल. यूट्यूबवर देखील काहीजण असे चित्रपट अपलोड करून ठेवतात. तिथेही सर्च करून बघ.
" जैत रे जैत " चित्रपट बऱ्याच
" जैत रे जैत " चित्रपट बऱ्याच वर्षापासून पाहायचा राहिला होता. मागच्या आठवड्यात पाहिला. बऱ्याच जणांनी आधी पाहिला असेलच.. अतिशय सुंदर, संगीतमय चित्रपट.. कलाकारांचा अभिनय, निसर्गरम्य भागातलं चित्रीकरण, चित्रपटातली गीते अप्रतिम..!
स्मिता पाटील, डॉ. मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे अश्या मातब्बर कलाकारांचा अस्सल अभिनय .. त्यांचा तो अभिनय न वाटता त्यांचं त्या - त्या भुमिकेतलं अस्सल जगणं वाटते. चिंधी आणि नाग्याची प्रेमकथा मनाला भुरळ घालते.
माझ्या तालुक्यात आदिवासी बांधवांची संख्या जास्त असल्याने आणि त्यांचं जीवन बऱ्यापैकी जवळून पाहिल्याने चित्रपट खूप आवडला.
समाजाने ठरवून दिलेल्या पारंपारिक चौकटी, रितीरिवाज मोडून काढणारी, स्वतंत्र विचारांची , स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणारी, दुर्बळ नवऱ्याला स्वतःहून काडीमोड देणारी, नाग्यावर मनापासून प्रेम करणारी आणि बेधडक त्याच्यासमोर ते प्रेम व्यक्त करणारी, नाग्याशी लग्न झाल्यावर त्याच्या प्रत्येक सुख - दुःखात साथ देणारी ' चिंधी' , ती भूमिका स्मिता पाटील अक्षरशः जगली आहे.
कुर्ला ते वेंगुर्ला पाहिला.
कुर्ला ते वेंगुर्ला पाहिला. मस्त खुसखुशीत सिनेमा आहे. पहिल्या अर्ध्यात तर खूप हसले. संपूर्ण सिनेमा मालवणी भाषेत आहे पण कळतो. नावाजलेले कलाकार उत्तम पण माहित नसलेले त्याहूनही भारी आहेत. छोटे प्रसंगदेखिल छान खुलवले आहेत. नेत्रसुखद चित्रीकरण आहे. सहज, म्हणता म्हणता एका खऱ्या प्रश्नाला हात घातला आहे. पेच आहे खरा.
कुर्ला ते वेंगुर्ला पाहिला.
कुर्ला ते वेंगुर्ला पाहिला. >>> मी नाही पण आई-बाबांनी पाहिला. त्यांना खूप आवडला. दशावतारापेक्षा चांगला आहे म्हणाले.
दशावतारापेक्षा चांगला आहे
दशावतारापेक्षा चांगला आहे म्हणाले. .>>> हे लिटरली अंतु बर्व्याच्या उलटे झाले
("यापेक्षा दशावतारी बरे")
फा :).
फा
.
BTW, त्यांनी तुलना 2-3 आठवड्यात 2 मालवणी , गावची पार्श्वभूमी असलेले चित्रपट पाहिले , म्हणून केली. त्यांना दशावतारही फार आवडला.
कुठे बघत आहेत लोकं कुर्ला ते
कुठे बघत आहेत लोकं कुर्ला ते वेंगुर्ला.. मी गेले दोन आठवडे शोधतोय इथे नवी मुंबईत माझ्या झोन मध्ये कुठेच दिसत नाही. एकेक शो होते म्हणा पण ते चुकीच्या वेळी..
"हे लिटरली अंतु बर्व्याच्या
"हे लिटरली अंतु बर्व्याच्या उलटे झाले Happy ("यापेक्षा दशावतारी बरे")" -
फा!!
हे लिटरली अंतु बर्व्याच्या
हे लिटरली अंतु बर्व्याच्या उलटे झाले >>

कोणाकडे पुरेशी (हिंमत ) असेल
कोणाकडे पुरेशी (हिंमत ) असेल तर प्राईमवर पार्थ भालेराव चा पिल्लू बॅचलर नावाचा सिनेमा आला आहे .
मला जरा गोषवारा द्या कोणती पाहिला असेल तर , आणि त्यात श्रीयुत मोहन आगाशे यांनी भूमिका का केली असावी ? याबद्दलचा तुमचा अंदाज पण सांगावा . मी सुरु केला आणि काही मिनिटात बंद केला . (या कृ नों घ्या . )
आरपार बघितला. काही
आरपार बघितला. काही कन्विंसिगंच नाही वाटली स्टोरी.
ललित प्रभाकरला थोडं सायको दाखवायचंच आहे तर बळंच काहीतरी हिचं फ्लर्टिंग वगैरे. शमिकबरोबर अचानक घरी जाणं काय किंवा मैत्री वाढवणं काही झेपलंच नाही आणि माहित आहे त्याचं डोकं फिरतं तरी कशाला सांगायचं शमिक पुस्तक द्यायला घरी येऊन गेला. विचित्रच स्टोरीलाईन आहे. अजिबात नाही आवडला.
ऋन्मेष, मी माहीमला
ऋन्मेष, मी माहीमला Citylightला पाहिला मागच्या आठवड्यात.
मी आयपी टिव्हीवर गेल्या
मी आयपी टिव्हीवर गेल्या आठवड्यात कुर्ला टू वेंगुर्ला बघायचा प्रयत्न केला. एकतर कॅमेरा क्वालिटी आणि त्यात स्क्रिनवर अर्धा भाग कसलीतरी जाहिरात बघून कंटाळा आला. आणि मग आम्ही बंदच केला. का ते काही केल्या आठवत नाहीये.
"जैत रे जैत " मी काही
"जैत रे जैत " मी काही महिन्यांपूर्वी पहिला.
अत्यंत लोकप्रिय झालेली गाणी, दिग्गज कलाकार, उत्कृष्ट दिग्दर्शन ह्याविषयी माहिती होतीच. परंतु गोनीदां ची पुस्तके वाचत असताना कळले की त्यांची कथा आहे म्हणून मुद्दाम बघितला. “जैत रे जैत” पुस्तक वाचून/ ऐकून मगच ह्या चित्रपटाविषयी लिहायचे ठरवले होते.. पण इतक्या महिन्यांत तो मुहूर्त न मिळाल्याने आता पुढेही तो मिळेल ह्याची खात्री नाही म्हणून आज हा प्रपंच!
आदिवासी ठाकरांची वस्ती, त्यात राहणारा नाग्या, भगताचा लेक. लहानपणापासून त्याला लिंगोबाला भेटायचंय. लिंगोबा म्हणजे एक सुळका ( पहाड) ज्याला ते पाडावासी देव/ महादेव मानतात. त्याच्यावर भाळलेली चिंधी आवडत नसलेल्या पहिल्या नवऱ्याला काडीमोड देऊन नाग्याकडे आलेली आणि त्याला समर्थपणे साथ देणारी. लिंगोबाकडे जाण्यातील मुख्य अडथळा म्हणजे राणी माशी, तिची पोळी. नाग्या आणि चिंधी लिंगोबाच दर्शन घेण्यासाठी एक क्लृप्ती आखतात, पण तो सफल होतो का?
गोनीदानी आदिवासी / ठाकर जीवन जवळून बघितलं होतं. त्यांच्या बरोबर दिवस घालवले होते ( स्मरणगाथा) त्यामुळे ते इतके उत्कृष्ट पद्धतीने बारकाव्यांसहित दाखविलेले आहे.
उंदीर , कावळे खाणं, त्यांची निसर्गाशी असणारी जवळीक, निसर्गातच देव पाहणं/ शोधणं, त्यासंदर्भातही रोख ठोक पण तरी थोडफार असलेलं भोळेपण, त्यांच्या श्रद्धा/ अंधश्रद्धा, त्यांची केली जाणारी फसवणूक/ पिळवणूक, बेभान होऊन ढोल वाजवणं.. अर्थात त्यात दिग्दर्शकाचीही महत्वाची भूमिका आहेच
गाणी अतिशय आवडतात. अर्थपूर्ण, कधी गोष्ट पुढे नेणारी त्यामुळे चित्रपटाचा अविभाज्य भागच वाटतात.
भोळासांब पण हट्टी नाग्या, चतुर आणि बिनधास्त चिंधी दोघंही खूपच आवडले.
मोहन आगाशे, स्मिता पाटील, निळू फुले आणि सुलभा देशपांडे ह्यांच्या विषयी काय बोलणार?
हा चित्रपट मास्टरपीस आहे. नवीन कलाकारांनी/ सिनेमा करणाऱ्यांनी बघावेत अशा कॅटेगरीत मोडणारा वाटला.
मामी धन्यवाद
मामी धन्यवाद
आता ओटीटी वरच बघेन.
माझ्या नेहमीच्या जवळच्या चार मल्टीप्लेक्समध्ये आता कांतारा (हिंदी) चेक केले तर चौघात मिळून १४,१७,११,१० तब्बल ५२ शो दाखवत आहेत. ज्याची मायबोलीवर अजून एकाने साधी पोस्ट लिहिली नाही
यात त्याच चार मल्टीप्लेक्समध्ये कन्नड ११ आणि तेलगू २ जोडा.
काहीतरी चुकतेय हे नक्की
मलाही आरपार नाही आवडला. उगाच
मलाही आरपार नाही आवडला. उगाच मी माझ्या टीव्हीवर मॅनिफेस्ट केला असं वाटलं!
मी माझ्या टीव्हीवर मॅनिफेस्ट
मी माझ्या टीव्हीवर मॅनिफेस्ट केला >>
जैत रे जैत साधारण दहा
जैत रे जैत साधारण दहा वर्षांपूर्वी स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी पाहिलाय. फारसा लक्षात नाही.
पण सिनेमा संपल्यानंतरच्या चर्चा लक्षात आहेत. विशाल कुलकर्णी यांचा लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला या लेखावर ही चर्चा नेली आहे.
https://www.maayboli.com/node/37475?page=2
स्वातीताई
स्वातीताई
ब्रेकपनंतरचं बदलणं, हलून जाणं, कशात रस नाही हे परफेक्टली करीनाने दाखवलं होतं जब वी मेट मधे.. इथे दोघांनी माती खाल्ली आहे अॅक्टींगमधे.
पुण्यात चित्रपटगृहाच्या बाहेर
पुण्यात चित्रपटगृहाच्या बाहेर लाइव्ह चित्रपट
https://www.facebook.com/reel/2023374338423503
चित्रपटाच्या फक्त नावाला आक्षेप आहे.
सेन्सॉर बोर्ड , नावं नोंदवणारी संस्था यांच्यावर याच लोकांना बसवून टाका एकदा. उद्या मुलांच्या नावांना पण आक्षेप घ्यायला लागले की भरून पावलं.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यनगरी सध्या अगदी झळाळून उठली आहे.
मायबोलीवर सुद्धा वादविवादात कोणी रचून काही सांगत असलं की या चित्रपटाचं जे नाव आहे, ते तुम्ही रचताय का असं विचारलं जायचं. यापुढे कोणी तसं विचारू नका. मायबोलीवर सुद्धा मोर्चा येईल. यांची आम्रविकेत शाखा (म्हणजे शाहरुख नाही - शाखा म्हणजे फांदी , पारंबी ) असेलच.
उनाड - मराठी – जियो हॉटस्टार
उनाड - मराठी – जियो हॉटस्टार
चांगला होता.
तीन मित्र. त्यांची उनाड मैत्री. तिघात जो लीड दाखवला आहे तो प्रेम–आकर्षणाच्या नादात एक कांड करतो. आधी पॉगंडावस्थेतील प्रेमकथा आहे वाटत असताना चित्रपट त्या कांड नंतर वेगळ्या वाटेने जातो. तिघे प्रगल्भ होतात. त्यांना जबाबदारीची जाणीव होते. कुठे ना कुठे आपल्या सर्वांशी हे रिलेट होते असे वाटते.
उत्तरार्धात बोटीवरचे काही सीन आहेत. बंदरावरचे सीन प्रत्यक्ष आयुष्यात खूप अनुभवले आहेत. पण बोटीवरचे मच्छीमारांचे जीवन बघून थोडी नवी माहिती मिळाली, थोडी ज्ञानात भर पडली.
अरे हो, हा देखील कोकणात घडणारा चित्रपट. कोकणात चित्रित झालेले मराठी चित्रपट असा नवीन धागा काढायला हरकत नाही
मनाचे श्लोक ची काय
मनाचे श्लोक ची काय कॉन्ट्रोवर्सी आहे मला माहित नाही म्हणजे मी त्याच्या खोलात शिरले नाहीये.
तूर्तास राजकीय/ धार्मिक/ जातीय भावना, त्या दुखावलेली माणसे किंवा त्या दुखावण्याचे (?) निमित्त ठरलेले ह्या बाजूला ठेवू या.
या आधी सुद्धा अनेक वेळा जाणवलं होतं, पण काल बघितलेलं शिकायला गेलो एक
नाटक किंवा मनाचे श्लोक नावाचा चित्रपट, ह्या लागोपाठ आलेल्या दोन गोष्टींमुळे ही पोस्ट लिहायची ठरवली.
कॉपी राईट - एखाद्या कलाकृतीवर/ साहित्यावर ते या जगात आणणाऱ्या / निर्माण केलेल्या व्यक्तीचा / संस्थेचा त्यावर असलेला अधिकार. त्याचा वापर करायचा असेल ( ह्यात शीर्षक, ओळी सर्व आले) तर त्या मूळ लेखकाची/ निर्मात्याची अनुमती घ्यावी लागते.
ही व्यावसायिक मंडळी जे स्वतः च्या कॉपी राईट बद्दल जागरूक असतात त्यांना आधीच्या थोर, लोकप्रिय , रूढ ( त्या तशा आहेत म्हणूनच ह्यांना वापरायच्या असतात ) कलाकृती/ साहित्यातील अंश व्यावसायिक गोष्टींसाठी वापरताना त्यांच्या कॉपी राईट चा जराही विचार मनात येत नाही ?
बरं ते आहे तसे न वापरता त्याचा अपभ्रंश करून/विपर्यास करून easy punches (आणि त्यातून होणारा आर्थिक लाभ) मिळवितात.
का? तर आज ती मूळ मंडळी जिवंत नाहीत म्हणून?
असे सोपे मार्ग अवलंबिण्यापरीस स्वतःची कल्पकता वाढवा, जास्त अभ्यास करा आणि अशा कुठल्याही कुबड्या न वापरता स्वतःचा (ओरिजनल ) कंटेंट तसा तयार करा.
असे सोपे मार्ग अवलंबिण्यापरीस
असे सोपे मार्ग अवलंबिण्यापरीस स्वतःची कल्पकता वाढवा, जास्त अभ्यास करा आणि अशा कुठल्याही कुबड्या न वापरता स्वतःचा (ओरिजनल ) कंटेंट तसा तयार करा.>>> +१
मनाचे श्लोक ची काय
मनाचे श्लोक ची काय कॉन्ट्रोवर्सी आहे मला माहित नाही म्हणजे मी त्याच्या खोलात शिरले नाहीये.
>>>>>
चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे अश्या अर्थाने मनाचे श्लोक केले आहे.
चित्रपट लिव्ह इन रिलेशनशिपवर असून मूळ मनाचे श्लोक सोबत चित्रपटाचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. निव्वळ आपल्या फायद्यासाठी "मनाचे श्लोक" हे नाव वापरले आहे.
असे मी एके ठिकाणी वाचले.
हे जर खरे असेल तर .. हे करायची गरज नव्हती, उगाचच खोडसाळपणा केला आहे असे प्रथमदर्शनी वाटते. संबंधितांनी आक्षेप घेतला असेल तर आपला पाणचटपणा कबूल करत नाव बदलायला हरकत नाही. तसेही जो मूळ हेतू होता तो साध्य झाला आहे. वाद निर्माण होऊन मार्केटिंग झाली आहे. कदाचित निर्मात्यांनीच वाद पेटेल हे बघितले असेल अशीही शक्यता आहेच.
बाकी माझ्या पर्सनली काही भावना वगैरे दुखावत नाहीत..पण तटस्थपणे विचार करता जे वाटले ते वर लिहिले. कारण हल्ली अभिव्यक्तिस्वातंत्र्य नावावर खोडसाळपणा करणारे सुद्धा बरेच झाले आहेत. आणि त्याचा फटका जेन्युइन लोकांना बसतो.
चित्रपटात हिरोईनचे नाव मना
चित्रपटात हिरोईनचे नाव मना (की मनवा?) आहे आणि हिरोचे नाव श्लोक आहे अश्या अर्थाने मनाचे श्लोक केले आहे. >> व्याकरण चुकलंच आहे.
भन्नाट क्रिएटिव्हिटी (?)
इतका टुकार/ पाणचट विचार शीर्षकामागे असेल तर चित्रपट कसा असेल... वरवरचा असेल.
व्याकरण चुकलं हे बरोबर
व्याकरण चुकलं हे बरोबर लिहिलंत छंदीफंदी. मनवाचा श्लोक किंवा तिला मना म्हणत असतील तर मनाचा श्लोक असं हवं होतं, हे मी वाचलं असंच कुठेतरी. पोस्ट दोन तीन वाचल्या, सिनेमा काढलेल्यानीही एक पोस्ट टाकलीय त्यापैकी नक्की कुठल्या पोस्टखाली ही कमेंट वाचली आठवत नाहीये.
सेन्सॉर बोर्डाने पास करताना हा मुद्दा लक्षात न घेता पास केला असेल तर कायदेशीर मार्गाने जायला हवं, तोडफोड करण्याला विरोध, चुकीचा मार्ग.
मनाचे श्लोक वाचल्यावर रामदासस्वामी आणि ते श्लोकच आठवतात.
एक टुकार चित्रपट आणि त्याला
एक टुकार चित्रपट आणि त्या चित्रपटाला असली प्रतिक्रिया देणारी तितकीच टुकार माणसे.
म्हणजे कशाला तरी क्वालिटी असावी की.
दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे एकूण.
आधीच रामदास बदनाम आहे. म्हणजे बोहल्यावरून पळून गेला म्हणून नाही. तर शिवबाचा न-गुरु असल्याबद्दल. तिकडे तर विचारूच नका. वेगळ्याच प्रतलावर लोक भांडत असतात.
नशीब इथे कुणी एकेरी उल्लेख करू नका अशी हिन्दी संवेदना घेऊन पिडणारे लोक नाहीत.
गावोगावी मारुतीच्या देवळांसमोर हा चित्रपट फुकट दाखवला तरी लोक बघणार नाहीत. नाव मग मनाचे श्लोक असले काय किंवा मनसमझावन असले काय.
जेव्हा
जेव्हा अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न येतो तेव्हा त्या पिक्चरचा दर्जा, कॉपीराइट हे मुद्दे दुय्यम होतात. मुळात इथे कॉपीराटचा काही संबंध नाही. रामदासस्वामींनी मनाचे श्लोक लिहीले त्याला तीनशेहून अधिक वर्षे झाली. या पिक्चरचे नाव ते दिले म्हणून उद्या मृण्मयी देशपांडेने मनाचे श्लोक लिहीलेत असे कोणी समजणार नाही. इतक्या जुन्या आणि इतक्या प्रचलित गोष्टीचे नाव वापरणे ही एक प्रकारे ते नाव लोकप्रिय असण्याला दिलेली दाद असते. दुसरा मुद्दा पिक्चर बंडल असेल हा. असेल. बंडल पिक्चर काढणे कधीपासून शो बंद पाडण्याइतके सिरीयस झाले?
यावर आउटरेज दाखवणार्या पब्लिकला मुळात कॉपीराइट, दर्जा ई मुळे राग आलेला नाही. त्यांना आपली पॉवर दाखवायची संधी मिळाली, ती ते दाखवत आहेत. मनाचे श्लोक, आनंदवनभुवनी सारखी गाणी आणि मारूती स्तोत्र हे सगळे भारी आहे. मला रामदासस्वामींबद्दल आदरच आहे. पण हे नाव पिक्चरकरता वापरल्याने त्यांचा अपमान कसा होतो मला समजत नाही. आणि झाला, तर सेन्सॉर आहे, कायदा आहे. तो वापरा. ज्या लोकांनी, गटाने याला विरोध केला आहे त्यांना अनुकूल सरकार आहे. मग रस्त्यावर येण्याची गरज काय आहे?
That said, या बंदीच्या मागणीवर टीका करणार्या अनेकांनी पूर्वी अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बहुताश सोयीस्कर भूमिकाच घेतलेली आहे. "अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण..." असे वाक्य जर तुमच्याकडून यापूर्वी इतर कोणत्याही "अपमान" केस मधे आले असेल तर तुमचा सध्याचा पुळका तात्कालिक आहे.
. इतक्या जुन्या आणि इतक्या
. इतक्या जुन्या आणि इतक्या प्रचलित गोष्टीचे नाव वापरणे ही एक प्रकारे ते नाव लोकप्रिय असण्याला दिलेली दाद असते >>
किंवा सहज सोपा मार्ग ज्यामुळे आपला फायदा होईल. म्हणूनच ना ! म्हणजे ह्यात त्या लेखकाची मर्यादा उघडी पडतेच ना!
तीनशे वर्षांपूर्वीचे आहेत, copyright कक्षेच्या बाहेरील म्हणून आपल्या फायद्यासाठी काहीही कसंही वापरा...
बरं, पाश्चात्य संस्कृतीला अंगिकारून त्याला प्रमोट करणारे चित्रपट बनवायचे आणि त्याकडे प्रेक्षकांचे लक्ष वळावे म्हणून तीनशे वर्ष जुन्या(?) श्लोकांचा आधार घ्यायचा .. height of hypocrisy आहे.
साने गुरुजींच्या प्रार्थनेच काय?
या नुकत्याच दोन (सलग) समोर आलेल्या गोष्टी होत्या म्हणून त्यांचा उल्लेख केला पण बरेच वेळा असे होत असते.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मुद्दा महत्वाचा आहेच पण आता वरच्या माझ्या मूळ पोस्टशी त्याचा संबंध नाही .
माझा मुद्दा लेखक/ दिग्दर्शक/ निर्माते काढत असलेल्या पळवाटांविषयी/ शॉर्ट कट विषयी आहे. तसेच ते ज्या मूळ कंटेंट चा ( स्वतःच्या व्यवहारिक फायद्यासाठी ) वापर करून घेतात / प्रसंगी त्याचा विपर्यास करतात त्या मूळ लेखकाप्रती साधी कृतज्ञता ही न दाखवण्याचा आहे.
मनाचे श्लोक – चित्रपटावरून
मनाचे श्लोक – चित्रपटावरून चालू असलेला वाद
https://www.maayboli.com/node/87331
वरच्या लिंकवर नवीन धागा काढला आहे.
या धाग्यावर चर्चा न करता तिथे स्वतंत्र धाग्यात करता आली तर इथे अवांतर पोस्ट टाळून मराठी चित्रपट कसे वाटले यावरच बोलता येईल.
Pages