लष्कराच्या भाकऱ्या(२) : जागरूक वाचक मंच

Submitted by कुमार१ on 1 January, 2023 - 20:22

भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.

नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.

शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चूक नाही, पण
चक्रीवादळ उत्पन्न झालं, असे मला अधिक बरं वाटतं.
(यात व्यक्तीसापेक्षता आहे हे खरे).

अजून विचार करतो आहे. विश्वाची निर्मिती झाली - असंही म्हणतात. केली असं म्हणायचं असेल तर तिथे अज्ञात शक्ती वगैरे कर्ता किंवा कर्त्री गृहीत धरावे लागतात. झाली म्हणताना नाही. तसंच वादळ निर्माण झालं म्हणताना कर्त्याची गरज नाही. मी माझ्याच आधीच्या विधानाशी विसंगत विचार करतो आहे.

परस्परविरोधी विचार आपल्याच मनात होणे अगदी साहजिक आहे.
परंतु,
चक्रीवादळाची निर्मिती सुरू झाली "हे बातमीतले वाक्य म्हणजे..

"गुरगावच्या कारखान्यात मोटारींची निर्मिती सुरू झाली " या प्रकारचं वाटलं !

अजून एक विचार.
निसर्गात आपोआप किंवा काही घडामोडींमुळे एखादी गोष्ट तयार झाली, तर उत्पत्ती
आणि
मानवाने एखादी गोष्ट तयार केली, तर निर्मिती असे म्हटले तर ?

काही वेळा हे वाक्यावर अवलंबून आहे. एखादवेळी आपण कारक शक्तींना (इथे देव किंवा अज्ञात शक्ती म्हणत नाहीये मी) वाक्यात कर्त्याचं महत्त्व देतो, तिथे निर्मिती म्हणू शकतो असं मला वाटतं आहे. उदा. वाक्य कर्मणि जरी असेल, तरी -

- बंगालच्या उपसागरात अचानक कमी दाब उत्पन्न झाल्यामुळे त्या भागात चक्रीवादळे निर्माण झाली.
- पाण्याची वाफ आकाशात गेल्यानंतर तिला थंड हवा लागल्यास जे बाष्पकण तयार होतात, ते एकत्र आल्यास ढगांची निर्मिती होते (इथे ढग उत्पन्न होतात - हे बरोबर वाटणार नाही).

वरती कमी दाब, बाष्प कण - ह्या कारक शक्ती आहेत.

वाक्यात कर्ता किंवा कुठल्याच अकारक शक्ती अभिप्रेत नसतील तर उत्पत्ती वापरता येऊ शकेल. हे मा वै म

निर्मिती सुरू झाली म्हणजे निर्मिती हे प्लॅन केलेलं प्रॉडक्शन(उत्पादन) आणि कंपनी चा भोंगा वाजून त्या उत्पादनाची असेंम्बली लाईन चालू झाली असं वाटतं.

या बातमीतले सगळेच मराठी कसे भारी आहे ते बघा:

रेल्वेने पु्न्हा केला मराठीचा अपमान, ‘तेजस एक्स्प्रेस’मधली घटना
https://marathi.hindusthanpost.com/social/tejas-express-disrespects-mara...

"तेजस एक्स्प्रेसमधील मराठीचा अपमान हे तर प्रकाशझोतात आलेले एक उदाहरण आहे. भारतीय रेल्वेचा कारभार पाहिला असता वेगवेगळ्या पातळ्यांवर मराठी भाषेची गळचेपी होत असल्याचे वारंवार समोर आले आहे"

या पहा सूचना:
“तुमचा प्रवास सुखाचा आणि सोयीचा हो ही भारतीय रेल्वेची शुभेच्छा”
“कृपया आपल्या जोडीदारावर लक्ष ठेवावे”
“तुमची आपली वस्तू एका बाजूला ठेवू नये”

या दिशाभूल करणाऱ्या आणि अशुद्ध भाषेत लिहिलेल्या सूचना वाचल्यावर रेल्वे प्रशासनाला नेमके काय सांगायचे आहे ते कळत नाही.

त्यामुळे रेंगाळलेल्या नैरूक्त मान्सूनचे आगमनही नेटाने होवून महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात भाकीत तारखेच्या तसेच गुजराथ राज्यात त्याच्या नियोजित सरासरी तारखेला म्हणजे १५ ते १७ जुन दरम्यानही होवु शकते असे वाटते.

https://indiadarpanlive.com/biperjoy-cyclone-direction-change-alert/
..
नशीब, त्यांनी मॉन्सूनला निवृत्त केले नाही !

काही ठिकाणी नैऋत्य लिहिताना ऋ वर रफार दिलेला आढळतो. ऋ हे व्यंजन नसून स्वर असल्यामुळे त्याच्या डोक्यावर रफार यायचं काही कारण नाहीये. जर र् + ऋ असा कुठल्या शब्दात आलाच, तर त्याचा रृ होईल.

ता. क.
जरा शोध घेतल्यावर लक्षात आलं - नैरृत्य हा शब्द बरोबर आहे. मला फोनवरून तो र ला खाली ऋकार काढल्यासारखा दिसतो आहे, पण संगणकावरून पाहिल्यास ऋ वर रफार दिसतो. तो का बरोबर आहे ह्याचं कारण खाली लिहितो.

अच्छा. हो की! विसरलोच होतो. त्यातही मी तोच प्रश्न विचारला होता आणि अजून काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. भरत यांना विचारायला हवं.

मुख्य म्हणजे त्या मुद्द्यावर बृहदकोश आणि विकिपीडिया यात फरक दाखवलेला आहे.
मराठी शुद्धलेखनाची पाठ्यपुस्तके पाहायला लागतील.

(पूर्वसूचना - खाली मी नैरृत्य/निरृति शब्दांत ऋ वर रफार दिला आहे. परंतु काही ब्राउजर/ऑपरेटिंग सिस्टिम्सवरती वाचताना तो र ला खाली ऋकार काढल्यासारखा दिसण्याची शक्यता आहे. तो तुम्हाला तसा दिसला तर कृपया तिथे ऋ वर रफार दिला आहे अशी कल्पना करा.)

थोडा शोध घेतला. मूळ शब्द आहे निर्ऋति = निस्/निर् + ॠति. तिची दिशा म्हणजे नैरृत्य.
निरृति - अर्थ - निर्गता ऋति: यस्मात् . आता ऋतीचे बरेच अर्थ विकीवर आहेत - गती, स्पर्धा, निंदा, मंगल/कल्याण इ.
निरृति = अलक्ष्मी अश्या अर्थाने ऋग्वेदात हा शब्द आला आहे. ऋग्वेदनिर्मितीचा काळ आणि त्यातली भाषा पाहता हे आर्षरूप (शब्दशः आर्ष म्हणजे ऋषींनी केलेलं) असणार. आर्ष संस्कृत हे पाणिनी/पतंजली यांच्याही पूर्वीचं आहे. त्याकाळी व्याकरणाचे नियम एवढे पक्के झालेले नव्हते. मूळ शब्द निरृतिमध्येच ऋ वर रफार असल्याने त्यापासून बनलेल्या नैरृत्य शब्दातही तो रफार तसाच्या तसा ठेवला जातो.

नवीन नियमांत स्वरांवर रफार येत नाही. (ऋ हा 'अ आ इ ई ..' प्रमाणे एक स्वर आहे)

‘मेहेंदी रची’ हिंदीत म्हणतात, मराठीत नाही हे खरं आहे. पण मला तो शब्दप्रयोग आवडतो - कारण त्यातून डिझाइन/कलात्मकता ध्वनित होतात.
‘लावली’ हे ‘थापली’पेक्षा बरं असलं तरी काडीने चार ठिपके दिल्यासारखंच वाटतं. Proud Happy

हो, खरं आहे. Happy
पण 'चित्र काढलं'पेक्षा 'चित्र रेखाटलं' छान वाटतं की नाही? 'मेंदी रेखली' म्हणता येईल. Happy

आय नो आय नो, हे जरा 'वादासाठी वाद' क्याटेगरीत चाललंय. Happy

रेखली>>>
छान व सौंदर्यपूर्ण !
रच्याकने..
मराठीत गीत किंवा कविता रचली तर मात्र चालते
Happy

त्यावरून सहज आठवलं - इंग्रजीत I wrote music असं म्हणताना ऐकलं तेव्हा विचित्र वाटलं होतं. 'Composed' तरी म्हणावं नाही का?
पण ते खरंच सुरावट लिहून काढतात.
तसंच गझल किंवा शेर 'लिहिला' म्हणत नाहीत - शेर कहना, गजल कहना/सुनाना असं म्हणतात, कारण ती मुळात उत्स्फूर्त सादरीकरणाचीच कला होती. Happy

Pages