भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संडास
या शब्दाबद्दल सकाळी हा विनोद वाचला :

संडास शब्दाची उत्पत्ती कशी झाली? फार फार वर्षांपूर्वी जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हाची ही गोष्ट आहे.
तेव्हा गोऱ्या साहेबाला सकाळी सकाळी सूर्य उगवायच्या वेळी अनेक लोक हातात कसलं तरी भांडं घेऊन अतिशय वेगाने कोणत्या ना कोणत्या गुप्त
जागी जाताना दिसायचे.
त्याला ही कसली तरी प्रथा वाटली आणि ह्या प्रथेचा सं बंध सूर्य उगवण्याशी असल्यामुळे आणि ह्या प्रथेत लगबगीने डुलत चालण्यामुळे त्याने ह्याला ‘सन डान्स’ असे नाव दिले.
काही दिवसांनी त्याला ह्या प्रथेची सत्यता समजली तरी त्याला त्या कामाला दिलेले सन डान्स हे नाव फार आवडले होते त्यामुळे तेच नाव पुढे सुद्धा वापरले जाऊ लागले..

हळूहळू त्या ‘सनडान्स’ चा अपभ्रंश होऊन आता आपण वापरत असलेला संडास हा शब्द तयार झाला असे तज्ञांचे ठाम मत आहे. Happy

हे वाचून करमणूक झाली ! नंतर म्हटलं आता याची खरी व्युत्पत्ती पाहू.
बृहदकोशात एवढीच नोंद सापडली :
[सं. शुच् = शुद्ध करणें

मग जालावर एका प्राध्यापकांचा लेख वाचला. त्यात त्यांनी कुलकर्णी यांच्या व्युत्पत्ती कोशाचा संदर्भ देऊन असे म्हटले आहे :

स्थंडिल, षंडिल = शौच जवा योग्य भूमी. गुजरातीतून हा शब्द आलेला दिसतो

https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://philarchive...

गुगलनं भाषांतर करण्यासंदर्भात एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृत आणि भोजपुरीमध्ये भाषांतर करू शकता.
https://www.loksatta.com/tech/google-translate-added-eight-indian-langua...

मला एका लेखाच्या शीर्षकात तऱ्हा हा शब्द वापरायचा आहे.
याचे पद्धत, चाल, रीत असे अर्थ आहेत. पण मला तिथे त्यापैकी शब्द नको आहेत.

'तऱ्हा ' शब्दातून नेहमी नकारात्मक सूरच जाणवतो का ?
सकारात्मक अर्थाने पद्धत असेही म्हणता येईल ना ?
कुणी सांगावे.

ना ना तऱ्हेचे पदार्थ असे जेव्हा म्हणतो तेव्हा प्रकार असाही एक अर्थ निघतो. तो नकारात्मक नाही.

धन्यवाद.
पण एखाद्याच्या वागण्याच्या संदर्भात वापरायचा असल्यास ?

वागण्याच्या बाबतीत सहसा तो नकारात्मक भासतो. बटाट्याच्या चाळीतल्या संगीतिकेतलं उदाहरण पहा -

नळाजवळच्या राहुन खोलित पाही झुळुझुळु झरा,
कवीची असली न्यारी तर्‍हा!

मला हर्पांसारखंच वाटलं, एखादी व्यक्ती 'तऱ्हेवाईक' आहे असे वाचले की डोक्यात विक्षिप्तही आपसूकच येते.

तर्‍हा म्हणजे पद्धत म्हणुनही चालतो.+१
शैली, ढब म्हणूनही चालतो.

छानच लेख!

मी प्रतिसादांची सगळी पाने वाचली नाहीयेत.. परत असेल तर इग्नोर करा

ताकास तूर लावणे याविषयी मागे पेपरमधे वाचल्याचे आठवले. ताका व तूर हे हातमागाचे पार्ट आहेत व त्यांची जुळणी करुनच हातमाग सुरु करतात. म्हणजे ताका व तुर हे खायचे पदार्थ नाहीत.
ही एक अजून लिंक मिळाली :
https://www.facebook.com/109812584010895/posts/109886337336853/

म्हणजे मीही चुकीचाच वाचत , म्हणत असे. कधी लिहिला नसावा.

तसंच नैरृत्य असा शब्द आहे. नैऋत्य नाही. उच्चार सारखाच असावा.

नैरृत्य >>> छान.
या दिशेकडून भारतात (पर्जन्य)ऋतू येतो, म्हणून हिला नैर्ऋत्य म्हणतात. वैदिक संदर्भानुसार ही निऋत नावाच्या देवतेची दिशा आहे, म्हणूनही हिचे नाव नैर्ऋत्य. (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4...). इथे नैरृत्य शुद्ध लिहिला आहे.
पण....
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%8B%E0%A4%A4%... इथे बृहदकोशात मात्र नैऋत्य
आहे !

नैर्ऋत्य >> मी हाच बरोबर समजत आलो आहे. तरीही आता प्रश्न पडतो की स्वरावर रफार कसा काय? कुठल्याही स्वराच्या आधी अर्धा र आला त्याला तो स्वर जोडला जायला हवा. मग ऋ ह्या स्वरावर रफार येण्याचं काय कारण? थोडा शोध घेतला असता निर्ऋति ह्या देवतेपासून त्या दिशेचं नाव आल्याचं कळलं (ज्याप्रमाणे अग्नी, वायू इत्यादींपासून आग्नेय, वायव्य इ). पण मुळात निर्ऋति ह्या शब्दात किंवा निर+ऋ ह्यात र पासून रफार का झाला ह्याचं समाधानकारक उत्तर सापडलं नाही. बहुधा ते (पाणिनीपूर्व) आर्ष रूप असावं, ज्यावेळी व्याकरणाचे नियम अगदी फार पक्के झाले नव्हते.

छान चर्चा. धन्यवाद

निर् =
एक अव्यव आणि उपसर्ग. याचे कांहीं अर्थ. १ खातरी; हमी; आश्वासन. २ नकार; अभाव. [सं.]

'नि ' याचाही अर्थ तोच आहे.

नि + वृत्ती = निरपेक्ष वृत्ती, किंवा कसे ?

नि: असा असेल ना उपसर्ग? संधी होऊन निर् होतो. नि:स्वार्थी, निःस्पृह मध्ये निः च राहतो.
निवृत्तीमध्ये वृत्ती हा शब्द कदाचित व्यवसाय किंवा काम याअर्थी असावा. पौरोहित्य करण्याचं काम या अर्थाने वृत्ती वाचल्याचं आठवतंय.
निवृत्तीच्या विरुद्ध प्रवृत्ती?

निवृत्ती म्हणजे निरपेक्ष (अपेक्षा विरहीत) नसुन येथे वृत्ती म्हणजे योजुन दिलेले काम असे असुन त्या कामातुन मुक्ती असे असावे असे मला वाटते. हे काम काहीही असेल, नोकरी असेल किंवा घरकामही असेल.

निवृत्ती च्या विरुद्ध प्रवृत्ती बरोबर वाटत नाही. मानसिक निवृत्ती ही एखाद्याची प्रवृत्ती असु शकते.

निवृत्तीच्या विरुद्ध प्रवृत्ती? >>
असं दिसतयं....

प्रवृत्ति-त्ती
स्त्री. १ प्रस्थापना; व्याप्ति; परिपाठ; प्रघात; रूढी. जसें:-कर्म-काल-देश-धर्म-आचार-प्रवृत्ति. २ चाल; गति; गमन; आरंभ; सुरवात. ३ निमग्नता; चळवळ; हालचाल; एखाद्या कामांत गुंतलेलें असणें. ४ संसार; प्रपंच; संसारांतील आसक्तता; आत्मस्वरूपाचा विसर पडून प्रापंचिक व्यवहारोन्मुखतारूप जीवाची विशेषवृत्ति; बर्हिमुखवृत्ति. याच्या उलट निवृत्ति.

https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5...

'वेश्या' चे हे समानार्थी परिचित आहेत :
रांड, कसबीण, बाजारबसवी, वारांगना,, नाटकशाळा, गणिका, कसबीण, बाजारी माल, वारयोषिता, मुरळी, भोगदासी, सर्वांची इच्छाराणी, अखंड सौभाग्यवती...इ.
एक नवा शब्द काल वाचला :
पण्यांगना .
व्युत्पत्तीच्या शोधात आहे.
...
तसेच
वारांगना मध्ये वार म्हणजे दिवस याशीं संबंध नाहीं. [सं. वार = समूह) हेही समजले.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%...

Pages