मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही समंजस म्हणजे 'नवऱ्यामुलाकडची मंडळी समंजस आहेत हो चांगली!" तशी आहेत का?

हो Lol

दही, बुंदी विषय मागे गेला.
आज नाश्त्याला बुंदी आणि दही होतं डब्यात. काल बुंदी रायता होता पण धागा आठवला नाही ( पिंपळाला 21 फेऱ्या मारून येईन).
20221224_104725.jpg

इथे मराठी पण टिकवणे ह्याचा अर्थ वेगळा आहे.
लगेच नवं वारी,धोतर, सती ची प्रथा हा त्याचा अर्थ नाही.
आता फक्त अंध अनुकरण केल्या मुळे लग्नातील जेवण जेवण्याच्या लयकीचीच च नसतात.
त्या पेक्षा न जेवता फक्त लग्न लावून घरी जेवायला येणे हाच मार्ग लोक निवडतात.
हे अनुकरण करणार नाहीत आवडत नाही ते फॅशन म्हणून पण करणार नाही.
अशा विचाराची लोक.
कुमार पार्टी,लग्न अगोदर फोटो शूट, नाच गाणे .
ह्या मुळे उगाचच पैसे वाया जातात .
आणि लग्न लागल्या शिवाय कसे जायचे म्हणून लोक नको ते प्रकार सहन करत असतात.
लग्न lava..
आणि जे काही नाच गाणे किंवा बाकी प्रकार करायचे आहेत .
ते नंतर करा.
ज्यांना आवड असेल ते थांबतील.

इथे मराठी पण टिकवणे ह्याचा अर्थ वेगळा आहे.
लगेच नवं वारी,धोतर, सती ची प्रथा हा त्याचा अर्थ नाही. >>>> हो ना. हिरा इतर प्र त्ये क विषयात "शहाणे करून सोडा, सकलजन" मोडात असतात. पण इथे लग्नाच्या चर्चेत सतीची प्रथा कसे काय घेऊन आले काळात नाही!

आता फक्त अंध अनुकरण केल्या मुळे लग्नातील जेवण जेवण्याच्या लयकीचीच च नसतात.
त्या पेक्षा न जेवता फक्त लग्न लावून घरी जेवायला येणे हाच मार्ग लोक निवडतात.>>>
ही विधाने आपण संशोधन करूनच केली आहेत ना, की नेहमीप्रमाणे ..

आता फक्त अंध अनुकरण केल्या मुळे लग्नातील जेवण जेवण्याच्या लयकीचीच च नसतात.
त्या पेक्षा न जेवता फक्त लग्न लावून घरी जेवायला येणे हाच मार्ग लोक निवडतात.>>>
ही विधाने आपण संशोधन करूनच केली आहेत ना, की नेहमीप्रमाणे ..

लहानपणी मला पंगतीचे जेवण आवडायचे. लोकांच्या श्राद्धालाही मिटक्या मारत जेवून यायचो. हे फेमस असल्याने मला याच्यात्याच्या घरून आमंत्रणही यायचे. कारण ते जेवण रोजच्या घरच्या जेवणापेक्षा स्पेशल असल्याने ती क्रेझ होती.
आताच्या पिढीतील लहान मुले जे वरचेवर बाहेरचे खातात त्यांना लग्नाच्या जेवणाचे ईतके अप्रूप नसावे असे वाटते. कारण तिथेही तेच त्याच चवीचे मिळते. विशेष असे काही नाही.

आपण ज्याला अस्सल मराठी जेवण किंवा रीतीरिवाज म्हणतो ते शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी अस्सल नव्हते, फॅशन, लाट, क्रेझ ह्या प्रकारातले होते. पूर्वी पंक्तीत गोड म्हणून बुंदीचे लाडू असत. शरद उपाध्ये आपल्या ' राशीचक्र ' ह्या प्रयोगात वृश्चिक किंवा मेष राशीची बाई लाडू पानात कशी वाढते किंवा वाढेल त्याचे वर्णन करीत. ती खाली न वाकता उभ्या उभ्या पंक्तीत लाडू टाकत जाई. मग ते टणाटण उड्या मारीत इतरांच्या ताटात जाऊन बसत वगैरे. पंक्तीत लाडू ' उठविण्याच्या ' पैजा लागत. 'जलेबी ' हा पदार्थ लोकांना माहीत नव्हता. नारायणराव, राघवदास हे लाडवांचे प्रकार तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी नव्हते. जग बदलत असते. नाव पूर्वीचे लेऊन संस्कृती, भाषा आतून बदलत असतात. आपणही बदलतोच की पेहरावात, बोलण्या - चालण्यात, खाण्यापिण्यात! उसासे टाकत बदलण्याऐवजी हसत हसत सामोरे जावे त्या बदलांना इतकेच म्हणणे.
ता. क. : तो सती,मुंडासेवाला प्रतिसाद विनोदी उपहासाने लिहिला होता. काहींना त्यातला विनोद आणि उपहास कळला, काहींना नाही. फसला वाटते तो उपहासी विनोद !

जेव्हां पृथ्वी थंड होत होती आणि अमीबाच्या आधी हवेत सूक्ष्म जीवपूर्व function at() { [native code] }इस्त्वांची निर्मिती झालेली होती तेव्हां...

हीरा, एकदम स्पॉट ऑन.
त्या काळी एखादी बाई पाचवारी साडी नेसून लग्नाला उभं राहणं 'आगाऊपणा, नसती थेरं' असतील.
मेनू काय ठेवणे हाही प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय.कदाचित मराठी पदार्थ जे आपल्याला आवडतात ते आधी मोठ्या संख्येत करून ठेवणं(सुरळी वडी, मोकळा नसलेला आंबेमोहोर चा मसालेभात) आणि त्याचं आकर्षक रूप 3-4 तास कायम ठेवणं केटरर्स ना कठीण जात असेल.बजेट हा प्रश्न आहेच.जोशी गोखले केटरर्स चा उत्तम मराठी मेनू आवडतेच.पण सर्व केटरर्स ना जमते असे नाही.
मला पंजाबी डान्स (लोकांसमोर) करायला न लावणं आणि ड्रेसिंग थीम साठी नवी खरेदी करायला न लागणं या 2 गोष्टी पूर्ण झाल्या तर कोणताही मेनू कोणतेही नाच असलेल्या लग्नाला जाऊ शकते Happy

हीरा, योग्य मुद्दा. त्यामुळे पूर्वीची संस्कृती राहिली नाही हे वाक्य कुठल्याही शतकात, पिढीत म्हटलं जाऊ शकतं.

पन्नास वर्षापूर्वी पण हीच स्थिती होती नवीन येत होते जुने नष्ट होत होते.
जुने म्हणजे मागास आणि नवीन म्हणजे मॉडर्न अशा भावना नव्हत्या .विविधता म्हणून त्याच्या कडे बघितले जाई.
शर्ट पँट आणि धोतर, फेटा वेष असणाऱ्या मध्ये .
हा जुनाट हा नवीन मॉडर्न .
असल्या भावना नव्हत्या.
धोतर वापरणाऱ्या लोकांनी शेवट पर्यंत पँट वापरली नाही.
नव वारी नसणाऱ्या स्त्रिया नी सहा वारी किंवा पंजाबी ड्रेस कधीच स्वीकारला नाही.
पण आता सहा वारी साडी नेसणाऱ्या स्त्री नी मिडी, स्कर्ट,पंजाबी स्वीकारला आहे.
आता बदल लोक स्वीकारत आहेत.
काही मनाने काही मना विरुद्ध आपण मागास वाटू ह्या भीती नी.
आपण मागास वाटू ही भावनाच निर्माण का झाली?
पहिले पन बदल झाले होते पण ही भावना तेव्हा निर्माण होत नव्हती

शंभर वर्षांपुर्वीच्या प्रथा परंपरा आणि पंचवीस तीस वर्षांपूर्वीच्या प्रथा परंपरा यात फरक असणारच. मग तो फरक मराठीच नाही तर प्रत्येक प्रांत प्रदेश जाती धर्मात असणार आणि असायलाच हवा नाहीतर त्या समाजाचे डबके होईल.

पण शंभर वर्षापूर्वी असो वा पंचवीस तीस वर्षांपूर्वी असो, मराठी लग्ने आपले वेगळेपण जपत होते. नुसते चार धार्मिक विधी करण्यापुरतेच नव्हते. तर जेवनापासून डेकोरेशनपर्यंत, लग्नात वाजणारे संगीत असो, ते पाहुण्यांचे स्वागत करायची पद्धत असो, ओवरऑलच जो एक माहौल तयार व्हायचा ते मराठी लग्नात आलो आहोत हे कळण्यास पुरेसा होता. आपल्यालाच नाही तर अमराठी लोकांनाही ते मराठी लग्नाचे वेगळेपण त्या त्या काळानुसार जाणवत होते. ते आता होत नाहीये असे वाटतेय.

मिथुन च्या काळात.
फिट शर्ट घालण्याची फॅशन होती.
फिट पँट आणि फिट शर्ट.
त्या अगोदर बेल bottom,
पहिले hero सूट वापरत,मग शर्ट पँट वर आले नंतर उघडे झाले .
परत आता सर्कल पूर्ण होवून पहिल्या पासून सुरुवात होईल
दुनिया गोल आहे.
सायकल ट्रॅक शहरात आता बनवले जातात.
म्हणजे परत सायकल

ज्वारी ,नाचणी,बाजरी ची भाकरी भाज्या, कड धान्य आहारात परत येत आहे.
घानी चे तेल जावून refined आले.
आता refined जावून परत घाण्याचे तेल येत आहे.
हात सडीचा तांतुळ येत आहे परत.
,

ता. क. : तो सती,मुंडासेवाला प्रतिसाद विनोदी उपहासाने लिहिला होता. काहींना त्यातला विनोद आणि उपहास कळला, काहींना नाही. फसला वाटते तो उपहासी विनोद !

Submitted by हीरा on 24 December, 2022 - 20:36>>>

तो विनोदही वाटला नाही। काहीही वादविवाद झाले कि असे पूर्वीचे दाखले द्यावे व इतक्या सहज सती जा नि हे करा ते करा। उगीच मग आपल्या महिला सुधारक स्त्रियांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे बदल घडवून आणले व आजच्या आधुनिक जीन्स, टीशर्ट, कुर्ती पायजामे, सहावारी साड्या नेसणाऱ्या स्त्रियांनी ती रीत पुन्हा यावी हे विनोदात म्हणावे हे वाचूनच वाईट वाटते। बदल हा निसर्गाचा नियम आहे तो फायद्याचा असेल तर स्वीकारावा नाहीतर आपण तो बदल योग्य नसेल तर त्याविरुद्ध काय पाऊल उचललं ते पाहावं। उगीच लेखन स्वातंत्र आहे म्हणून टाकलं टायपून असे कसे चालायचे। वर त्याला 'विनोद' हे गोंडस नाव देऊन भलावण करायची .

मला पंजाबी डान्स (लोकांसमोर) करायला न लावणं आणि ड्रेसिंग थीम साठी नवी खरेदी करायला न लागणं या 2 गोष्टी पूर्ण झाल्या तर कोणताही मेनू कोणतेही नाच असलेल्या लग्नाला जाऊ शकते
>>>>> Lol Lol

ताटकळत राहिल्या मुळे नवरा,नवरी कंटाळतात.
अनेक कार्यक्रम असले की
मग एनर्जी राहावी म्हणून एनर्जी ड्रिंक,
फोटो चांगले यावे म्हणून लग्न अगोदर खूप भयंकर प्रकारे व्यायाम जेणे करून स्नायू दिसतील पोट आत जाईल.
ह्या असल्या प्रकार मुळे जीव गेलेत अटॅक नी.

म्हणून तर आम्ही सांगत आहे .
दुसऱ्याचे मागे पळू नका.
जे आपल्याला शक्य आहे तेच करा.
किती बदलायच ते स्वतःला समजले पाहिजे.

एक्सेस पैसे असतील तर च डामडौल करा.
नसतील तर काही गरज नाही.
अनुकरण करू नका.
प्रत्येक बदल स्वीकारला च पाहिजे असे काही
नाही.

जेवण हे उत्तम च असावे.
Fast food type चे नको.

शंभर वर्षापूर्वी असो वा पंचवीस तीस वर्षांपूर्वी असो, मराठी घेरे आपले वेगळेपण जपत होते. नुसते मराठी भाषा बोलण्यापासून नव्हे. तर जेवनापासून शिक्षणापर्यंत, घरात वाजणारे संगीत असो पुस्तके असोत, , ते पाहुण्यांचे स्वागत करायची पद्धत असो, ओवरऑलच जो एक माहौल तयार व्हायचा ते मराठी घरात आलो आहोत हे कळण्यास पुरेसा होता. आपल्यालाच नाही तर अमराठी लोकांनाही ते मराठी घराचे वेगळेपण त्या त्या काळानुसार जाणवत होते. ते आता होत नाहीये असे वाटतेय.

Pages