मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत तर लग्न म्हणजे मज्जाच असते.
एका लग्नात आम्ही सर्व हॉलमधे बसलो होतो. स्टेजवर धार्मिक विधी चालले होते. इकडे मंडळी मोठमोठ्या आवाजात गप्पा मारत बसली होती. त्याचा भटजींना त्रास व्हायला लागला तेंव्हा भटजी म्हणाले ज्यांना यात इन्टरेस्ट नसेल त्यांनी कृपया बाहेर जावे. हॉल रिकामा झाला की हो एक मिनिटात!

दुसर्‍या लग्नात, हॉल फक्त तीन तासापुरता मिळाला होता. भटजी म्हणाले लग्नाचे विधी करायला एक तास लागेल. पण मंडळी जमता जमता उशीर होऊ लागला, तेंव्हा यजमान म्हणाले विधी चाळीस मिनिटात नाही का संपणार? आम्ही डी़जे वगैरे बोलावले आहेत. नंतर जरा वेळाने यजमान परत भटजींना विचारतात, अहो दहा मिनिटात नाही का विधी करता येणार? थोडक्यात लग्नात धार्मिक विधी हे नावापुरतेच, नुसते जेवण नि धांगडधिंगा.

कसले मराठी नि कसले पंजाबी!!

मान्य आहे, वधू वरांसाठी तो दिवस आनंदाचा असतो व आपल्या सर्व आप्तेष्टांबरोबर तो साजरा करावा असे वाटत असते. मग रजिस्टर लग्न करावे नि नुसती पार्टी ठेवावी. आजकाल कित्येक लग्ने डेस्टिनेशन वेडिंग म्हणून बहामा, ग्रँड केमन सारख्या दूरदूरच्या बेटांवर जाऊन करतात. हज्जारो डॉलर नुसते एअर्लाईन नि हॉटेलच्या बोडक्यावर आणि मिळते काय ते पनीर!!

ऑनेस्टली, लग्नांचं वय बरंच पुढे गेलं आहे आता. मुलंमुली करिअरमध्ये सेटल झाल्यावर लग्न करतात - मग खर्च स्वतःच का करत नाहीत? आईवडिलांची मदत घेणं निराळं आणि तो बोजा त्यांच्याच डोक्यावर टाकणं निराळं, नाही का?
बदल मुळात तिथे व्हायला हवा, मग अनावश्यक विधी आणि बडेजावाला आपोआप आळा बसेल.>>अगदी अगदी.
बाकी चर्चा छान सुरू आहे..

मुलामुलांनी स्वत:चा खर्च करावा हे हरवत चाललेले मराठीपण या धाग्याच्या उद्देशाला हरताळ फासणारे असले तरी धाग्यापेक्षा ते रॅशनल असल्याने स्विकारार्ह आहे.

'यू मे किस द ब्राइड'पेक्षा विडा तोडणे म्हणजे अगदी 'तोडलंस!' क्याटेगरी नाही का? >> Lol

धोंडो भिकाजी जोश्यांच्या लग्नात लवंगा तोडण्याचा उल्लेख आहे ना? की विडा? बहुतेक लवंगाच.

हाहा कुछ तो लोग कहेंगे. जेव्हा मी लिहितो तेव्हा तुम्ही म्हणता हा धागा वर काढतो. आणि नाही लिहित तेव्हा म्हणता धागाकर्ता पसार झाला Happy
असो, आठवडाभर बिजी असल्याने फार लिहीत नव्हतो. पण यावर ईथे चर्चा नको..

लिहीत नसलो तरी वाचल्या सर्व पोस्ट. छान चर्चा झाल्याने आवडलेही.

नाचगाणे संगीत याला विरोध कधीच नव्हता. नाच करायला आणि त्याहून जास्त बघायला आवडते. किंबहुना लग्नाच्या वरातीत नाही नाचणार तर कुठे नाचणार याच मताचा आहे.

त्याचप्रमाणे बदलत्या काळानुसार बदलणे, युवा जनरेशनला आवडेल असे फॅड करणे, वा हल्ली जग जवळ येत चाललेय त्यामुळे ईतर प्रांतातील आवडत्या गोष्टी कॉपी करून आपल्या लग्नसमारंभात आणने यालाही एका मर्यादेपर्यंत विरोध नाहीयेच.

आक्षेप असलाच तर त्या नादात आपण आपले वेगळेपण हरवत तर नाही ना , आपले मूळ जपायचे तर विसरत नाही ना, याला आहे. आपण एखाद्या दाक्षिणात्य, नॉर्थच्या, वा गुजराती, मारवाडी, बंगाली लग्नात जाऊन आलो हे कोणाला सांगितले तर समोरचा लगेच म्हणतो अरे त्या लोकांच्या लग्नात अमुकतमुक असे असे असते ना.. हे असे ईतरांनी आपल्या लग्नाबाबत बोलणे लोप तर पावणार नाही ना असा विचार मनात आला म्हणून हा धागा होता.

ते चामट नान, आणि लाल मसाल्याचा रंग असलेलं पनीर, छोले पाहून जेवणं नकोशी होतात.

पनीर तर अगदी घुसलेच आहे सगळीकडे.

लग्नाचं आणि जेवणाचं मराठीपण जर कुठे व्यवस्थित अनुभवायचं असेल तर सांगली मधे खास करुन खरे मंगल कार्यालयातलं लग्न अनुभवावं.
आदल्या दिवशी सीमंतपुजन होतं. त्यात व्याही भेट असतेच असते. मग वधु वर दोघांना ओवाळणे, हार गुच्छ देणे, आहेर, विहिणीचा मान ई ई चालते. रात्री खिचडी-कढी,भजी, अननस शीरा किंवा दाटसर काजु बिजु घातलेली खीर-पुरी, खास कृष्णाकाठचं भरलं वांग, पोळ्या,पापड, कोशिंबीर, दाण्याची चटणी असा मस्त मेनु असतो.
आपण जेवण हॉल मधुन विडा चघळत येइपर्यंत मुख्य हॉल मधे ओळीने स्वच्छ गाद्या, उशा आणि चादरी घातलेल्या असतात.मग कपडे वगैरे बदलुन आरामात हातपाय पसरुन या गाद्यांवर खुप दिवसांनी भेटलेल्या आप्तेष्टांच्या गप्पा, हौशी गायकांची गाणी रात्री १२- १ पर्यंत रंगतात.
सकाळी बरोबर सहा ला चहा तयार असल्याची वर्दी येते.
चहा घेउन सकाळी लवकर घाणा हळदी होतात. नाष्टा म्हणुन बरेचदा मौसुत असा वरुन शेव खोबरं घातलेला उपमा असतो किंवा मग सांगली चं खास इडली-वडा सांबार. मग बाकी विधी म्हणजे कन्यादान, सप्तपदी, लाजाहोम ई होतात. रुखवताचं जेवण, घोडा किंवा गाडी बँड सह मारुतीच्या देवळात जाउन दर्शन आणि मग ठरलेल्या मुहुर्ताला लग्नं लागतं. मुला मुलीला हार घालताना उचलायचं नाही अशी धमकी मंगलाष्टका सुरु व्हायच्या आधीच गुरुजी स्वत:च देतात.
जेवताना व्यवस्थित पंगती असतात. सर्व वाढुन झाल्यावर वाढपी एका लाईन मधे समोर उभे राहातात. मुख्य व्यवस्थापक वाढप्यांसह "वदनी कवळ घेता" खणखणीत आवाजात म्हणतो आणि पंगत सुरु होते. वरण-भात, चिंच गुळ आमटी,मसालेभात, पुर्‍या-बासुंदी ( कधी कधी हौशी लोक असले तर उकडीचे मोदक सुद्धा ), कुर्मा, मटकी उसळ, कांदा-बटाटा-पालक भजी, पापड मिरगुंड, चटणी, लोणचे, कोशिंबीर, शेवटी सुंदर दहीबुत्ती, विडा असा साग्रसंगीत आणि सुग्रास स्वयंपाक असतो.
सांगली कोल्हापुर भागात बर्‍याच ब्राम्हणी कार्यालयात अजुनही बर्‍यापैकी अशी पारंपारीक लग्ने जोवर होत आहेत तोवर तरी लग्नातलं मराठीपण हरवायची भिती नाही.

पुण्यात होणारी लग्न पण अजुन बर्‍यापैकी मराठीपण टीकवुन आहेत पण जेवणात बरेच्दा तेच ते अळुचं फद्फदं, मटकी उसळ आणी श्रीखंड पुरी बोअर वाटते. आजकाल पुण्यात एकदोन लग्नाला जायचा योग आला तेव्हा चक्क पुरणपोळी खायला मिळाली. पण ती बुफे टेबल वर बाकी मेनु सोबत होती आणि त्याच्या जोडीला नेहेमिचे पुरी-पनीर होतेच त्यामुळे प्लॅस्टीक च्या प्लेट मधे लाईन मधे उभं राहुन पुपो खायला बरं नाही वाटलं. उलट दया आली त्या पुरणपोळीची. असो.

काल च बाहेर जेवायला गेलो .
खास मांसाहारी हॉटेल होते.
मी मांसाहारी बायको शाकाहारी म्हणून माझ्या साठी तिथे गेलो.

पण दोघेच असल्या मुळे बायकोचा मान ठेवण्याचा विचार करून veg मागवायचे ठरवले.
पनीर सोडून सर्व शाकाहारी. मेनू सांग असे वेटर लं सांगितले तर .
त्याच्या कडे मोजून तीन च मेनू होते.
कोल्हापुरी, amritsari आणि काश्मिरी.
सर्व मिक्स भाज्या.
त्या मध्ये amritsari dish देण्यास त्यांनी
असमर्थता दाखवली .
दोन च पर्याय राहिले
Veg म्हणजे पनीर हे बकवास सूत्र निर्माण झाले आहे
मला पण पनीर चे नाव घेतले तरी डोकं दुखत.
अगणित veg अन्न पदार्थ आहेत
अतिशय उत्तम ..पनीर चे लोढणे कशाला गळ्यात अडकून घेतले आहे

पनीरबद्दाल +१! समारंभाच्या जेवणात अगदीच घुसलं आहे पनीर. वेगळं करण्याचा प्रय्त्येकाचा प्रयत्न असतो आणि त्यात पनीर येऊनच जातं. आता ते वेगळं न राहता टिपिकल झालं आहे!

कुठलाही कार्यक्रम फारसा रेजिमेंटेड न ठेवता लोकांना मोकळं सोडलं म्हणजे गप्पांमध्ये जास्त मजा येते. हल्ली वाढदिवस, नवीन वर्ष पार्टी, किंवा अगदी सीमांतीच्या रात्री होणारं संगीत असं काहीही "ऑर्गनाईझ्ड" असलं, की लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो. बळच कुठलेतरी गेम्स खेळणे ह्यात तर अशक्यच कंटाळा येतो. लग्न-कार्यातली मुख्य मजा म्हणजे खूप दिवसांनी भेटणारे नातेवाईक. कितीही गेट-टुगेदर ठरवली, तरी त्याला लोक येत नाहीत. पण लग्न-कार्याला येतात. त्यामुळे रेजिमेंटेड काही नसावं असं वाटतं. नाहीतर ते ऑफिसच्या आईस-ब्रेकर इव्हेंट्स सारखे वाटतात. शिवाय हॉटेल्स मधली प्रत्येकाला वेगळी-वेगळी रूम हा एक महा बोरिंग ट्रेंड आहे. सगळे लोक एकाच हॉल मध्ये किंवा फार तर बायकांचा आणि पुरुषांचा असे दोन वेगळ्या हॉल मध्ये ह्यात एकमेकांसोबत जास्त वेळ घालवता येतो. रात्र-रात्र गप्पा रंगतात. पण तेही हल्ली कुणाला आवडत नाही.

स्मिता श्रीपाद , अगदी अगदी झालं पूर्ण प्रतिसाद वाचताना. आता जी नवीन कार्यालयं झालीत ती , लॉन वाली वगेरे पनीर आणि खाद्यपदार्थ स्टॉल असणारी झालीत. आणि मोठ्या थाटमाट वाली पण.
गावभागातलं हरिभाऊंच कार्यालय, खरे, दांडेकर हॉल इथं अजूनही पंगत आणि टिपिकल जेवणच असतं. उमो आणि गूळ पोळी सुद्धा खाल्लीय. ते ही स्टील च्या मोठ्या ताटात. लॉन मध्ये भपका फार आणि जेवायला प्लास्टिक प्लेट्स. आम्ही तर छोट्या गटग ना हरीभाऊंकडून खास मसालेभात आमटी ची ऑर्डर देतो. अळू ची भाजी इकडं कधी कार्यालयात लग्नाच्या जेवणाला नाही बघितली.

चांगला विषय आणी त्या वरची चर्चा. आणी सध्या माझ्या जिव्हाळ्याचा विषय.

माझ्याकडे नुकताच असा समारंभ येऊ घातलाय. लग्नाला अजून बराच अवकाश आहे पण साखरपुड्यावर वायफळ खर्च करून त्याचं रूपांतर ‘मिनी लग्नात’ करण्यावर मुलगा आणी येणारी मुलगी ह्या दोघांचाही ठाम विरोध आहे. तसंच त्यांना खूप गाजावाजा.. ब्युटीशीयन कडून मेकअप वैगेरे पण नकोय. त्यांचा विरोध मान्य करून, आम्ही दोन्ही कडच्या आईबाबांनी आपापल्या गावात अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी छोटेसे ओळख समारंभ ठेवलेत.
एका छोट्याशा लॉन वर, अगदी एका गोलात बसून गप्पा मारता येतील एवढेच मोजके नातेवाईक.. डेकोरेशनला फाटा देऊन भाचीची फुलांची रांगोळी.. यूट्यूब च्या मदतीने सनई चौघडा.. भटजी नं बोलावता साखरपुड्याची ओटी भरणे.. औक्षण करणे.. आणी टिपकल मराठी जेवण असा बेत ठरवलाय.
आमच्या समारंभात होणारी सून आणी तिचे आई बाबा सोडून बाकी सगळं मराठी आहे. आम्ही दोन्ही आयांनी ठरवून टाकलं... आमच्याकडे असतील तेव्हा आमची पद्धत आणी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची पध्दत.
आपल्याला जे आवडतं ते दुसऱ्यांना खायला घालावं असं वाटतच. म्हणून ते आमच्याकडे असतांना त्यांच्या प्रत्येक जेवणात आम्हाला आवडणारे टिपकल महाराष्ट्रियन पदार्थ ठेवलेत.
नंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार.. ‘गुजराथी कल्चर’ अनुभवायला.. तेव्हा त्यांची पद्धत. ‘नो ओटी.. अँड नो औक्षण..’ त्यांच्यात मुलाला फक्त ‘नारियल और सव्वा रुपया’ देतात..
मज्जानु लाइफ!!!

अरे वाह शर्मिला ग्रेट.. एखाद्या आदर्शवादी मराठी मालिकेतील चित्र डोळ्यासमोर ऊभे राहिले.. प्रत्यक्षातही असे गोडगोड घडते तर Happy

मी लहान असताना महाराष्ट्र मधील लग्न.

लग्न ठरले की सर्व तयारी घरातील लोक आणि शेजारी मिळून करत.
सुरुवात अगदी लग्नातील जेवण बनवायला लागणाऱ्या लाकडा पासून होत असे.
झाडा ची मोठी फांदी तोडून त्याच्या dhaplya पाडून त्या सुकवल्या जात.
तांदूळ ,रवा सर्व मिळून निवडून ठेवत.
ही लगबग खूप अगोदर चालू होत असे.
पत्रिका वाटल्या जात च पण घरोघरी जावून आग्रह चे आमंत्रण दिले जायचे.
वऱ्हाड ट्रॅक मधून जात असे.
लग्न तेव्हा दारात होत
हॉल मध्ये क्वावचीत.
दारासमोर मंडप.
असे .
सर्व विधी अगदी रीतसर होत.
वऱ्हाड उतरण्याचे ठिकाण आजू बाजूच्या घरात असे.
. हळदी पासून सर्व विधी लग्नाच्या दिवशीच.
.
लग्नाची वेळ ही सायंकाळ चीच असे पाच ते सहा दरम्यान ...
मुळ जेवणाचा कार्यक्रम हा लग्न लागल्या नंतर च ..
आमटी,भात,शिरा आणि वांग्या बटाट्याची भाजी हा मेनू.
लग्न लागले की शेतात किंवा मंडपात पंगती बसत.
वाढण्याचे काम सर्व मिळून स्व खुशी नी करत.
आपल्या श्रीमंती ची झुल सर्व घरी ठेवून येत.
कोणाला वेगळी खास वागणूक नाही.
आणि लोक पण मनापासून सहभागी होत.
किती ही मोठा वैरी असेल तरी त्याच्या मुलामुलींच्या लग्नाला जायचे अशी निती असे.
लग्नाला आणि maitala लोक किती ही मतभेद,भांडण असतील तरी जात असतं.

लग्नाला आणि maitala लोक किती ही मतभेद,भांडण असतील तरी जात असतं
>>>
मैताबाबत हे पाहिलेय. आमच्याकडेही पाळले जाते.
लग्नाला मतभेद सोडून जाणे नवीन आहे.

मग हेवेदावे, मानापमान, हुंडा, आहेर, अपेक्षा हे नक्की कधी अ‍ॅड झालं.
मला वाटायचं हुंडा, मानापमान ही परंपरा आहे, आणि ते न करणे हा (योग्य) बदल. आपल्याकडे सगळं आदर्शच होतं म्हणजे! हेमंत मोठे झाल्यावरच्या पिढीने सगळ्या आदर्श लग्नांत बिब्बा घातला असं दिसतंय.

त्या संदर्भात मी पोस्ट मध्ये लीहालेच नाही.
आज च्या पेक्षा त्या वेळी मुलीच्या बाजू नी जास्त खर्च करावा लागे.
हुंडा ही लागलेली कीड तेव्हा जास्त होती.
मुलीशी लग्न करत आहे म्हणजे उपकार च करत आहे अशी भावना मुलाकडची असायची.
पण लग्न अगोदर सर्वा समक्ष त्या वर बोलणी होवून एकमत होत असे..
सर्व अगोदर च ठरवले जाई.
तरी लग्नात मानपान वरून भांडण होत.
आज एक गोष्ट खूप छान झाली आहे
हुंडा ही प्रथा बरीच कमी झाली आहे.
मुलीची बाजू पण आज बरोबरी ची आहे असे समजले जाते.
हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे.

फा ची नाचण्याविषयीची पोस्ट आवडली. Happy (बहुदा मला नाचता येत नसल्यामुळे जास्त रिलेट झाली असावी).

बाकी, बरेचसे बदल हे अपरिहार्य आहेत. ज्या गोष्टींच नॉस्टेल्जियातून कौतुक केलं जातंय, त्या सुद्धा एके नव्या असताना 'फॅड'च होत्या. मुळात लग्न हा समारंभ आहे, समाजापुढे साजरं करणं आहे. त्यामुळे त्या सादरीकरणात नवनवीन गोष्टी अ‍ॅड होत जाणं ह्यात काहीच गैर नाही. त्याचप्रमाणे ते बदल न स्विकारण्यातही काही मागसलेपण नाही. प्रत्येकाची सेलिब्रेशनची पद्धत वेगळी असते. घरी आचार्याने पाडलेल्या बुंदीच्या ढिगाचे लाडू वळणारी एके काळची एकत्र फॅमिली (त्यातही मान-अपमान, रुसवे-फुगवे कमी नव्हते) आणि आत्ता काँट्रॅक्टरवर सगळं सोपवून आपण फोटोज काढून घेणारी फॅमिली ह्यात काही फरक नाही. दोन्हीकडे समारंभ साजरा करण्याचा तोच उत्साह आहे.

पनीर ला बरीच नावं ठेवली गेली आहेत. पण 'पूर्वीच्या' लग्नातले जे नावाजलेले पदार्थ आहेत, ते त्या काळी स्पेशल च होते. पिठलं भाकरीच्या लग्नाच्या पंगतीचं कुणी कौतुक सांगितलं नाहीये. (तसंही पूर्णपणे व्हेजिटेरियन जेवणात पनीर हाच त्यातला त्यात एक प्रोटीन्स चा घसघशीत सोर्स आहे.). पनीर आवडत नसेलही, पण अगदी 'डोकं उठण्या'इतका वाईट नसावा.

स्वातीताईंचा लग्नाचा खरच मुला-मुलींनी करण्याचा मुद्दा पटला.

बाकी जिथून ह्या धाग्याची सुरूवात झाली, त्या साऊथे इंडियन प्रोग्रॅम्सविषयी: त्यांचं जेवण हा युएसपी असतो. मी तर तेव्हढ्यासाठी साऊथ इंडियन प्रोग्रॅम्स ना जातो. पण सामाजिक रूढींतले बदल स्विकारण्यात मराठी समाज खूप जास्त प्रगत आहे. त्यामुळे साऊथ इंडियन्सनी स्वतःची रिजिडीटी सोडून प्रगत कसं व्हावं हा चर्चेचा मुद्दा (असलाच तर) होऊ शकतो. Happy

इंग्रजीत मंगलाष्टके म्हणणाऱ्या भटजींचा व्हिडीओ फिरतोय नेटवर… तो पाहून हा धागा आठवला.

ज्यांचे ल ग्न व्हायचे ती तरुणाईशी कनेक्ट नाही झाला का? आपण मुले ग्लोबल एक्स्पोजर देउन वाढवली आहेत. मग त्यांना जगातले सर्व इन्फ्लुअन्स करुन बघावे असे वाटणार नाही का? पूर्वी स्थळे गावातली नाहीतर जवळच्या गावातली असायची . आता जगातली कोण त्याही जागे वरुन असू शकतात. मराठी पद्धतीने लग्न, मग जपानी पद्धतीने लग्न / चर्च वेडिन्ग व रजिस्ट्रेशन वेगळे असे ही काही कपल्स करतात. पाव्हणे सुद्धा जगभरातून येतात. उद्या आमच्या नात्यात एक लग्न आहे ते वर वधु डेन्मार्क मध्ये भेटले व ल ग्ना परेन्त बाबी आल्या आता पुण्यात रिसॉर्ट मध्ये लग्न आहे . काही पाव्हणे डेन्मार्क मधले आहेत. त्यांना सामावून घ्यायचे व विधी समजावयाचे प्लान आहेत. हे अगदी उदाहरणा र्थ

अशी परिस्थिती कमी अधिक सर्वत्र असते आजकाल. म्हणून रुचेलसा मेन्यु ठरवावा लागतो. मला व्यक्तिशः तरुणा ई साठी बॅचलर पार्टी, गर्ल्स नाइट, हे आधी, एक संगीत व पुढे सर्व रिती रिवाज असे लग्न आव डते मग एक लॉन रिसेप्शन इथे ग्लोबल मेन्यू. व ल ग्नात ट्रेडिशनल पंगत मेन्यु इथे श्म्भर लोक

वेडिंग प्लानर्स आले रिटर्न गिफ्ट बनवून देणारे आले. कोरिओ ग्राफर्स आले. ड्रेस डिझायन् र्स आले. साडी ड्रेपर्स आल्या. देशात आजकाल ह्या सर्व एस्टाब्लिश्ड सर्विसेस झाल्या आहेत. इन्स्ता आत तरुणाईच्या जीवनाचा भाग आहे. तेच त्यांचे सोशल लाइफ. न्युक्लीअर फॅमिलीतल्या एक अन दोन मुलांचे लग्न करायचे तर मनुष्य बळ नसते. वयस्कर नातेवाइकांची फळी पुण्यात कुठेतरी बसून जज करत असते. काँट्रॅक्टला पर्याय नाही.

खरे तर नौवारी शालू शेले पण आता खूप क्लिशेड झाले आहे. पण ब्राइडचा चॉइस त्या दिवशी.

मला नाचायला येते व आव्डते पण सो नो इशु. मी तर प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. वेगळा धागा काढून लिहिते. Wink

आमच्या वेळी भारतात असे नव्हते हा माबोवर एक ग्रुप हवा. विनम्र मत.

ज्यांचे ल ग्न व्हायचे ती तरुणाईशी कनेक्ट नाही झाला का? आपण मुले ग्लोबल एक्स्पोजर देउन वाढवली आहेत. मग त्यांना जगातले सर्व इन्फ्लुअन्स करुन बघावे असे वाटणार नाही का? पूर्वी स्थळे गावातली नाहीतर जवळच्या गावातली असायची . आता जगातली कोण त्याही जागे वरुन असू शकतात. मराठी पद्धतीने लग्न, मग जपानी पद्धतीने लग्न / चर्च वेडिन्ग व रजिस्ट्रेशन वेगळे असे ही काही कपल्स करतात. पाव्हणे सुद्धा जगभरातून येतात. उद्या आमच्या नात्यात एक लग्न आहे ते वर वधु डेन्मार्क मध्ये भेटले व ल ग्ना परेन्त बाबी आल्या आता पुण्यात रिसॉर्ट मध्ये लग्न आहे . काही पाव्हणे डेन्मार्क मधले आहेत. त्यांना सामावून घ्यायचे व विधी समजावयाचे प्लान आहेत. हे अगदी उदाहरणा र्थ

अशी परिस्थिती कमी अधिक सर्वत्र असते आजकाल. म्हणून रुचेलसा मेन्यु ठरवावा लागतो. मला व्यक्तिशः तरुणा ई साठी बॅचलर पार्टी, गर्ल्स नाइट, हे आधी, एक संगीत व पुढे सर्व रिती रिवाज असे लग्न आव डते मग एक लॉन रिसेप्शन इथे ग्लोबल मेन्यू. व ल ग्नात ट्रेडिशनल पंगत मेन्यु इथे श्म्भर लोक

वेडिंग प्लानर्स आले रिटर्न गिफ्ट बनवून देणारे आले. कोरिओ ग्राफर्स आले. ड्रेस डिझायन् र्स आले. साडी ड्रेपर्स आल्या. देशात आजकाल ह्या सर्व एस्टाब्लिश्ड सर्विसेस झाल्या आहेत. इन्स्ता आत तरुणाईच्या जीवनाचा भाग आहे. तेच त्यांचे सोशल लाइफ. न्युक्लीअर फॅमिलीतल्या एक अन दोन मुलांचे लग्न करायचे तर मनुष्य बळ नसते. वयस्कर नातेवाइकांची फळी पुण्यात कुठेतरी बसून जज करत असते. काँट्रॅक्टला पर्याय नाही.

खरे तर नौवारी शालू शेले पण आता खूप क्लिशेड झाले आहे. पण ब्राइडचा चॉइस त्या दिवशी.

मला नाचायला येते व आव्डते पण सो नो इशु. मी तर प्लेलिस्ट पण बनवलेली आहे. वेगळा धागा काढून लिहिते. Wink

आमच्या वेळी भारतात असे नव्हते हा माबोवर एक ग्रुप हवा. विनम्र मत.

लग्नाची एक वेबसाइट पण असते आजकाल. डेस्टिनेशन वेडिन्ग असेल तर रोजचे ड्रेस कोड. इवेंट मेन्यु येतो. सर्वात महत्वाचा म्हण्जे हॅश टॅग.
मजा आहे हो पोरांनी लग्न करून खुशीत राहावे ह्या पेक्षा आपली अपेक्षा काय असावी. ते वरचे डेन्मार्कवाले लग्न नवरा नवरीनेच आपल्याला कसे हवे ते ठरिवले आहे. खर्च पण त्यांचाच.

जग जवळ आलेले आहे. त्या मुळे विविध बदल होणार हे मान्य.
पण विरोध त्याला पण नाही कोण करत.
मराठी लोकांनाच इंग्लिश मध्ये निमंत्रण पत्रिका.
हे दुसऱ्याचे फक्त अनुकरण आहे बाकी त्याला काही अर्थ नाही.
ही कोणी ही मान्य करेल.
अनुकरण कारणे हा मानवी स्वभाव आहे.
आपल्याला मागास तर समजणार नाहीत ना .
आपण पण तसेच वागले पाहिजे.
ह्या भावनेतून सूट होत नसताना ,परवडत नसताना पण लोक विचित्र प्रकार करतात.
ते आक्षेप घेण्यासारखे आहे.
जेवण म्हणजे पनीर must ha प्रकार पण अनुकरण करणे डोळे झाकून ह्याचा प्रकार आहे.
पंगती मध्ये जेवण हे उत्तम च पण उभे राहून जेवणाची पद्धत का आली .
हा पण अनुकरण विचार न करता करणे ह्याचाच प्रकार आहे..

Pages