मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्न हा समारंभ/ विवाह समारंभ हा शब्द पण तसा चुकीचाच आहे.
हा शब्द कधी आला माहीत पडले नाही.
लग्न हा समारंभ नाही तो एक विधी आहे.
लोकांना त्या विधीला बोलवले जाते कारण ह्या दोघांचे लग्न झाले आहे.
दोघे नवरा बायको आहेत .
हे समाजाला माहीत पडावे .
हा हेतू आहे.

It is an event with many sub events. Needs high level planning and project management. To deliver happiness to the couple. Mera des badal gaya hai dears.

लहानपणी परिस्थिती सामान्य अतीसामान्य होती. तर गावाकडे गरीबीची असे. ( ती दीर्घ का ? या शंकेला उत्तर असे कि फंक्शन फंक्शन चालते का तुम्हाला ?)
आमच्या घरातले दोघे शहरात आले. चार पाच जण मुंबईला मिल मधे गेले. बाकी गाव शेतीवर अवलंबून. जे श्रीमंत घर होते ते गडगंजच होते. तेच सरकार होते. बाकीचे त्यांच्याकडे राबायला. तर लग्नात कधीच पंचपक्वान्नं नसे. अगदी सुखवस्तू असतील तरी पण. पंचक्रोशीत आणि त्याच्या आजूबाजूला लागून जेव्हढ्या क्रोशी असतील त्या संपूर्ण गॅलेक्सीत लग्न म्हटले की लाप्शी आणि मिक्स वांगं बटाटा ही भाजी. जरा परिस्थिती बरी असेल तो मसालेभात ठेवायचा. पांढरा भातही ठेवला जायचा. भातावर वरण वगैरे गावाकडे लक्झरी आजही नसते. रस्सा सुद्धा म्हणत नाहीत. कोरड्यास. आमटी गेल्या काही वर्षात रूढ झालाय शब्द.

त्यामुळं लग्नं रूक्ष वाटत. शहरात आलं कि झगमगाटी लग्न असत. तरी मेन्यू असे नव्हतेच. खूप दिवसांनी गावाकडे पण लाप्शी नाही आढळली. मग लाप्शीला मिस करू लागलो. शेवटी गावच्या लाप्शी आणि मिक्स भाजीची रेसिपी महाराजाकडून आणली. त्याला पैसे दिले.
इथे बनवली आणि काय सांगू दोस्तांनो !
स्वर्गसुख म्हणजे काय ते कळालं. आता नेहमी बनते लाप्शी. इतक्यात कुणाकुणाला मधूमेहासाठी लाप्शी सुचवलीय डॉक्टरांनी.
गावाकडचे हेल्दी खात होते की मग. ते सगळं मिस करतो.
लापशी असाही उच्चार आहे. आमच्याकडे सण , लग्नसमारंभ आणि अशाच मोठ्या कार्यक्रमात गव्हाची लापशी बनते. एरव्ही बाजरीची लापशी बनते (घरगुती कार्यक्रमात). बाजरी आणि नाचणीची भाकरी असते. ज्वारीची भाकरी ही विशेष. चपाती माहिती नसायची. चपातीला नावे ठेवत.

नाश्त्याला रात्रीची चतकोर भाकरी आणि कोरड्यास. नसेल तर शेंगदाणा भाजून किंवा कोरड्यास !
हे सगळंच मिस होतंय.

बाकी मराठी लग्नं बोरिंग झाली ती जोडीने अंघोळी, विडा तोडणे वगैरे विधी थांबल्यावर असा एक मतप्रवाह आहे. 'यू मे किस द ब्राइड'पेक्षा विडा तोडणे म्हणजे अगदी 'तोडलंस!' क्याटेगरी नाही का?
>>>> पॉईंट टू बी नोटेड. लवन्ग तोडणेही ऐकले आहे

तो बायकांनी फेटे बांधायचा ट्रेंड गेला का? आजकाल कोणी फेटे घालून गॅागल लाऊन फोटो टाकताना दिसत नाही
@म्हाळसा >>> तो ट्रेंड गुढी पाडव्याच्या मिरवणुकीचा होता. नंतर 'तेनुं काला चष्मा जच दा वे' वर ब्रायडल एन्ट्री करण्यासाठी गॉगलचा ट्रेंड पंजाबी लग्नात होता. मुळात गुल पनागने तिच्या लग्नात केला होता. तिच्या पर्सनॅलिटीला शोभलाहि होता. मराठी लग्नात तरी नव्हता पाहिला.

आजकाल वरमाला घालून झाली की नवरा नवरी मिठी मारतात एकमेकांना.
>>>> एखाद्या जोडप्याने खूप आनंदात सहज मारली मिठी तर काही वाटणार नाही. पण हा ट्रेंड आहे म्हणून सगळ्यांनी तशी मिठी मारणे कित्ती बोअर. आपापली पहिली उस्फुर्त मिठी आठवा.

आम्ही दोन्ही आयांनी ठरवून टाकलं... आमच्याकडे असतील तेव्हा आमची पद्धत आणी त्यांच्याकडे गेल्यावर त्यांची पध्दत.
@शर्मिला >>> मस्त अभिनंदन

अनुकरण कारणे हा मानवी स्वभाव आहे. आपल्याला मागास तर समजणार नाहीत ना.आपण पण तसेच वागले पाहिजे. ह्या भावनेतून सूट होत नसताना ,परवडत नसताना पण लोक विचित्र प्रकार करतात.
>>>> एकदम पटले

>>>>>>पण हा ट्रेंड आहे म्हणून सगळ्यांनी तशी मिठी मारणे कित्ती बोअर.
तीव्र आक्षेप. लाड, मीठी या गोष्टी एव्हरग्रीन आहेत. कधीही कंटाळा न येणार्‍या Wink

भावनेतून सूट होत नसताना ,परवडत नसताना पण लोक विचित्र प्रकार करतात.>>>>>+++११ प्री वेडींग फोटो शूट त्यातलाच प्रकार.
विशेषतः मराठी जोडपी या प्रकारात फार अवघडलेली दिसतात. /बघितली आहेत.

मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?
हो, मी सध्या बरीच लग्ने पाहिली. त्यात जोडप्यातील एक जण तरी अमराठी होता. इथेच ५० टक्के मराठीपण हरवले. काही जोडपी आडनावाने मराठी होती पण ते हिंदि, इंग्रजीमधेच बोलत होती. मराठी तोंडी लावण्यापुरतं बोलायचे.

सांगलीच्या कार्यालयाचं वर्णन वाचून आता तिथे कोणाचा तरी वशिला लावून एकतरी लग्न अटेंड करावंच असं वाटलं. फारच सुंदर.

मध्यंतरी एका २६-२७ वयाच्या Gen Z तरुणाशी बोलणं झालं. त्याने त्याच्या लग्नाबद्दल पुढील गोष्टी सांगितल्या- 1. तो लग्नासाठी खास डाएट वर जाणार आहे कारण लग्नात त्याला ढेरपोट्या व बेढब दिसायचं नाहीये. 2. प्री वेडिंग शूट साठी दोन तीन लोकेशन्स डोक्यात फिक्स आहेत. एक मित्रच ही शूट्स करतो त्यामुळे त्यालाच हे काम देणार. लोकेशन पण आधी बुक करून त्याचं रेंट द्यावं लागेल. थीम ठरवावी लागेल. 3. लग्नाचं लोकेशन बहुधा डेस्टिनेशन वेडिंग असं डोक्यात आहे. अशी फार्महाऊस वगैरे लोकेशन्स आता मुंबई पुणे परिसरात खूप आहेत. इथं मेन इव्हेंट, सोबत संगीत आणि हळदी हे मिनिमम करावंच लागेल.इथंही थीम निवडावी लागेल. 4. लग्न शक्यतो जून महिन्यात करणार कारण त्याची मोठी बहीण परदेशात असते आणि तिला जून मध्ये सोयीचं पडेल.

मी हे सगळं ऐकून कौतुकाने विचारलं - "काय करते मुलगी? काय नाव-गाव तिचं?"
तर म्हणाला-"मुलगी शोधायची आहे अजुन. या सिझनला मॅट्रीमोनिसाठी रजिस्टर करणार."

एकूण या नवीन लग्नाळू पिढीला फार पिअर प्रेशर येत असणार.

Lol

म्हणजे शोले मधे अमिताभ "शादी के लिए कमसे कम एक लडकी की जरूरत होती है" म्हणतो ते अगदीच कॅप्टन ऑब्व्हियस नव्हते Happy

एका अमेरिकास्थित लग्नाळू मुलाच्या आईने आधी कार्यालय बुक करून नंतर वधूसंशोधन करायला घेतल्याचा किस्सा काही वर्षांपूर्वी ऐकला होता. तो आठवला. तेव्हा अतिशयोक्ती वाटली होती, पण खरा असेलही.

भारतात अजून बॅचलर्स नाईट नि ब्राईड'स नाईत करत नाहीत का? लग्नाच्या आदल्या दिवशी वराला भारपूर ढोसायची नि दुसर्‍या दिवशी त्याची गंमत बघायची. नाच्या बायका बोलवायच्या वगैरे.
एक विनोद वाचला - एक लहान मुलगा आपल्या आईवडीलांच्या लग्नाचा विडीओ बघून म्हणाला, बाबा, माझ्या लग्नात पण अश्या नाचणार्‍या हॉट बायका बोलवा. बाबा म्हणाले गधड्या, त्या तुझ्या आत्या, मावश्या आहेत!

बहुतेक पाश्चात्य देशात करतात की बॅचलर्स पार्टी आणि Spinster पार्टी. आता आपल्याकडेही त्याचे अनुकरण व्हायला लागलेय. माझ्या २ मित्रांच्या बॅचलर पार्ट्या आणि एका मैत्रिणीची spinster पार्टी झाली. पण आपल्याकडे त्याचा अर्थ फक्त दारू पिणे आणि धांगडधिंगा करणे एवढाच घेतला जात असावा. As if लग्न झाल्यावर हे सगळं करायला मिळणार नाही.

ठरलेले लग्न bachlor पार्टी मुळे मोडू नये म्हणजे झाले.
नाही तर सर्व खर्च वाया जायचा.
पाश्चिमात्य देशात अगोदर ची लफडी स्वीकारली जातात आपल्या कडे अजून तरी स्वीकारली जात नाहीत.
दारू च्या नशेत नको ते सत्य उघड व्ह्यायचे.

विशेषतः मराठी जोडपी या प्रकारात फार अवघडलेली दिसतात. /बघितली आहेत. >>>>.बहुदा अरेंज मध्ये असेल तसे पण लव्ह मध्ये तर अगदी जंगलात , दऱ्याखोऱ्यात , अगदी कचऱ्याच्या डब्यात उभे राहून फोटो सेशन होते कि। यात मराठी वैग्रे काहीच नसत।

बहुतेक पाश्चात्य देशात करतात की बॅचलर्स पार्टी आणि Spinster पार्टी. आता आपल्याकडेही त्याचे अनुकरण व्हायला लागलेय. >> हिंदी / मराठी सिनेमात ,सिरियल्स मध्ये आता हे फार जुने झाले आहे। त्यामुळे सर्वसामान्य सुद्धा असे काही करत असतील तर त्यात सुद्धा नावीन्य नाही।

A stag party is what Brits call a bachelor party, which is a party thrown in celebration of the man about to get married. A stag night is usually planned by the groom's friend or brother. Similarly, a hen do is a bachelorette party.

नको ती थेर आहेत
दारू पिणे , मिठ्या मारणे ह्या पेक्षा काय असते असल्या पार्टी मध्ये.
डोळे झाकून ,मेंदू बंद करून अनुकरण ह्यालाच म्हणतात

बहुदा अरेंज मध्ये असेल तसे >>> असेल तसंही.
पण माझं निरिक्षण असं की बहुधा मराठी लोकांमधे थोडा संकोच असतोच मिठ्या मारण्यात, फोटो ग्राफर समोर रोमांस करण्यात (जरी आपलीच बायको/नवरा असला तरीही). कदाचित हल्लीची बदललेली पिढी अपवाद असेल.

आमचं लव्ह मॅरेज होतं तरी तो फोटोग्राफर सांगत होता त्या पोज (१७-१८ वर्षापूर्वीच्या काय अशा विचित्र असणार तरीही) काही आम्हाला आवडत नव्हत्या (भयंकर ऑकवर्ड वाटत होतं). शेवटी असे फोटो नको म्हणून साधेच काढा म्हटलं. Wink

भारत देश, भारतातल्या बॉलीवूडच्या परंपरा, बॉलीवूडचा इतिहास, बॉलीवूडच्या नृत्यांचा, गाण्यांचा इतिहास, अशी महत्वाची माहिती हवी असेल तर युट्यूबवर अमेरिकन गोरे, फ्रेंच गोरे. जर्मन गोरे, इटालियन गोरे, कोरिअन पिवळे, चायनीज पिवळे असे बरेच युट्यूबर्स आहेत. त्यांचे व्हिडीओज पाहिले कि भारता या देशाबद्दल खूप माहिती मिळते. मी तर मराठी सुद्धा शिकलो.
पण पाकिस्तानी, बांगला देशी आणि काही काही तर भारतीय लोक पण यांच्यासारखे यूट्यूब चॅनेल्स चालवतात. त्यांच्या वाटेलाही जात नाही. आय हेट इंडीयन सबकॉण्टिनेन्ट. या असल्या लोकांकडून माहिती मिळवायची ? आपल्यासारख्या दिसणार्या ? ये क्या बतायेंगे ? वो तो हमकू बी पैलेसेच मालूम है.

शेवटी असे फोटो नको म्हणून साधेच काढा म्हटलं.
>>>>> आम्ही पण फोटोग्राफरला सांगून टाकलं नीट शेजारी बसलेले किंवा उभे फोटो काढा. बाकी पोझ देणार नाही.

Pages