मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरवत चाललेय नाही... ऑलरेडी हरवलंच आहे. दु:ख वाटतं पण पर्याय नाही. जग असंच होत चाललं आहे शोबाजीला महत्व देणारं.

मला स्वतःला मुलाची मुंज पारंपारिक पद्धतीने पुण्यातल्या पेठी कार्यालयात शुद्ध ब्राह्मणी पद्धतीने व्हावी असं खूप वाटत होतं. पण घरच्या कोणालाच नको होतं ते. अगदी नवर्‍यालाही नाही. शेवटी वादविवाद नको म्हणून घरच्यांचच मान्य करावं लागलं पण बिलकुल पटल्या नाहीत बर्‍याच गोष्टी.
मुंजीतही हल्ली डान्स बिन्स, पालखीचे पॅकेज सुरू झालंय.

बाकी लग्नांतलं सध्याचं काही माहित नाही. कित्येक वर्षात अटेंड केली नाहीयेत. पण जे काही फोटो विडीओ दिसतात त्यावरुन तरी सगळा भपकाच वाटतो सगळीकडे.

हरवलं आहेच. बर्‍याच वर्षात भारतात लग्नं अटेंड केलेली नाहीत पण आता मराठी लग्नांत पण संगीत, मेहंदी, कपल्सचे डान्स परफॉमन्स वगैरे पंजाबी/नॉर्थ लग्नांसारखंच सुरु झालेलं दिसतं. विचार करता असं वाटतं की मराठी लग्नं बरीच बोअर असतात म्हणजे फक्त विधी एके विधीच असतात. बाकी विशेष असं काही नाही त्यात. नॉर्थ स्टाईल समारंभ कॉपी करायची गरज नाही पण आपले विधी वगैरे तसेच ठेवून त्यात सगळ्यांना सामावून घेऊन काहीतरी वेगळी मजा घालता आली तर बरं होईल असं वाटतं. जेवण वगैरेही आपलं पारंपारिक असावं असं वाटतं.

विचार करता असं वाटतं की मराठी लग्नं बरीच बोअर असतात म्हणजे फक्त विधी एके विधीच असतात. बाकी विशेष असं काही नाही त्यात.>>> सहमत आहे त्यामुळे मेहदी, सन्गित, कपल डान्स वैगरेही ठिक आहे पण जेवण मात्र आपल मराठीच हव.

नाही, मला ते संगीत आणि कपल्स डान्स वगैरे बोअर वाटतात पण सगळ्यांनाच मजा यावी असं काहीतरी असायला हवं ज्यात काही मराठीपण असेल. मला एकूणच सगळ्यांनी नॉर्थी लोकं जे करतील ते कॉपी करणं नको होतं. जे बॉलिवूडमध्ये उदो उदो करुन दाखवतात ते.

डोंबिवलीत विशेषत: सर्वेश हॉलमध्ये टिपिकल मराठी जेवण असतं आणि पंगत असते. मुंज, लग्न दोन्ही attend केलेल्या. तेव्हातरी होतं.

आमच्या सोसायटीतल्या एका मुलाचे लग्न होतं तेव्हा हे टिपिकल मराठी जेवण साऊथ इंडियन लोकानाही आवडलेले.

मला मराठी लग्नातला साधेपणा जास्त भावतो. हल्ली कमी होतात अशी लग्नं हे मात्र खरं.

पारंपारिक लग्न हाच विषय असल्याने
एका पारंपारिक लग्नाचा विषय सध्या गाजतो आहे. दोन जुळ्या बहीणींनी एकाच नवरदेवाशी लग्न केले. त्या दोघींची तशी अटच होती. दोघी डॉक्टर आहेत. दिसायला हुबेहूब सारख्या आहेत. त्या दोघींशी लग्न करायला एक रिक्षावाला तयार झाला. हे लग्न थाटात आणि पारंपारिक पद्धतीने पार पडले. जर लग्न पारंपारिक पद्धतीने झालेय तर त्याच्यावर टीका का ?
दोघी सुशिक्षित असल्याने त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहेच की.

दुसरा प्रश्न असा आहे कि दाक्षिणात्य प्रथांचा विषय निघालाच आहे तर इडली हा भारतीय पदार्थ नाही असे ऐकण्यात आले. असे असेल तर मग इडली पारंपारिक पदार्थ कसा काय झाला ?

उत्तर भारतीय लग्नांशी तुलना केली तर मराठी लग्नं कंटाळवाणी असतात हे खरं आहे. दक्षिण भारतीय पारंपरिक लग्नं त्याहून कंटाळवाणी असतात. पहाटे लवकरचे मुहूर्त, मोठ्या प्रमाणावर विधी आणि टिपिकल जेवण. जेवण अतिशय चविष्ट असलं, तरी प्रत्येक लग्नात तेच तेच जेवण असलं की कंटाळा येतो! रिसेप्शनला मात्र रोटी-पनीर वगैरे पंजाबी जेवणच ठेवतात. आपल्याकडे कुणी लग्नाला जाऊन आंल की 'मेनू काय होता?' हा महत्त्वाचा प्रश्न असतो. Proud इथे तो प्रश्न नाही.

पुण्यात माझ्या एका ओळखीच्या घरच्या मुलीच्या लग्नाच्या वेळी त्यांनी मेंदीच्या वेळी संगीताचाही कार्यक्रम ठेवला होता, पण भपकेबाज नव्हे, तर त्यांच्या नातेवाईक-मित्रपरिवारातलेच जे कुणी गाणारे-वाजवणारे होते, त्यांचीच एक अनौपचारिक मैफिल. पेटी-तबला आणि गाणं. छान झाला होता तो कार्यक्रम. हे असं काही केलं तर लग्न बोअरिंग वाटणार नाही आणि आपली संस्कृतीही सोडायची गरज नाही.

टोटली हरवत चालले आहे. आपल्या लोकांना आपल्याच पद्धतींचा विलक्षण न्यूनगंड आहे. जे पंजाबी, नॉर्थी वगैरे आहे ते सगळे कूल आहे असा एक बकवास समज आहे. भयानक भपकेदार लग्ने, ते नॉर्थ वरून आलेले संगीत बिंगीत विधी महाबोअर प्रकार आहे. खरे लग्न म्हणजे अस्सल मराठी - सुटसुटीत, साधे, खर्च दोन्ही बाजूंकडून समान केलेले. आदल्या दिवशी शंभरएक लोक, दुसर्‍या दिवशी ५०० ते १००० पर्यंत, टोटल केऑटिक. पण उगाच फालतू मानापमान वगैरे नाही. एरव्ही कुत्रे विचारत नसलेले लोक त्या दिवशी केवळ मुलाकडचे अमुक म्हणून भलताच भाव खात फिरतात आणि एरवी दारात उभे करणार नाही अशा लोकांपुढे मुलीकडचे कर्तबगार लोक अनावश्यक आर्जवी व केविलवाणे चेहरे घेउन उभे राहतात असले प्रकार नाहीत.

तो साधेपणा मला अजिबात बोअर वाटत नाही. असली अनेक लग्ने पूर्वी आदल्या दिवशीपासून उपस्थित राहून अनुभवलेली आहेत आणि काहीही डान्स वगैरे न करता भरपूर धमाल आलेली आठवते. अगदी संध्याकाळी पाच-सहा वाजता कार्यालय सोडायच्या वेळेपर्यंत चहा घेत न संपणार्‍या गप्पा मारत बसलेले नातेवाईक्/मित्रमंडळी - याच्यापुढे इतर "सेलिब्रेशन्स" काही विशेष नाहीत. मुळात पार्ट्यांमधे नाचणार्‍यांनाही आपण डान्स करतोय म्हणजे खूप एन्जॉय करतोय आणि जे लांबवर उभे आहेत ते केवळ लाजण्यामुळे येउन सामील होत नाहीत असा एक बळंच गैरसमज असतो. सॉरी. नाचणे हा महाबोअर प्रकार आहे आणि मला तो अजिबात आवडत नाही. बघायलाही आणि करायला तर त्याहून. म्हणजे नुसते खुर्चीवर बसून राहायचे असे नाही. घरचे कार्य असेल तर वाट्टेल ती मदत करायची, अगदी "नारायण"गिरी सुद्धा. पण नो डान्स.

ज्या ज्या ठिकाणी हे सध्या प्रचलित आहे तेथे त्यांनी करायला माझी कसलीही हरकत नाही. पण मराठी लग्नात हे अजिबात कूल वगैरे नाही. उपरेच वाटते. इव्हन मुंजीतही त्यानंतर तो मुलगा गुरूगृही शिकायला जाणार असतो, तर त्यात इतरांनी नाचायचा काय संबंध आहे माहीत नाही.

या परंपरा, भपकेबाजी ही सगळी मुलीकडच्यांच्या जीवावर आणि पैशावर असेल तर आणखी वाईट.

मला तर लहानपणी अनुभवलेली बिनकंत्राटी लग्ने सुद्धा मस्त वाटत. खूप लोक सामील होत कामांमधे मदत करत. अगदी ३-४ दिवस आधीपासून कामे सुरू होत.

आता होउन जाउ द्यात Happy आगामी समजंस पोस्टवाल्यांकरता - मराठी "प्रचलित" पद्धतही दर काही वर्षांनी इव्हॉल्व्ह होत राहते वगैरे माहीत आहे. पण माझ्या डोक्यात आणि नॉस्टॅल्जियामधे जशी लग्ने पाहिली आहेत ती फार बदलू नयेत असेच वाटते Happy

फा, पूर्ण पोस्टला कानामात्रावेलांटीसकट अनुमोदन. आपल्या पद्धती सोडू नयेत पण त्यातही ह्या पद्धती धरुन काही नवीन अ‍ॅड करता आलं तर बरं असं मात्र वाटतं.

दोन दिवस लग्न हा प्रकार ज्या लग्नात सीमांतपूजन असते तिथेच असतो. सीमांतपूजन ही परंपरा नसलेल्या महाराष्ट्रीय लग्नात सकाळपासून हळदी दुपारी लग्न, नंतर जेवणं आणि नंतर पांगापांग हा कार्यक्रम असतो. काही ठिकाणी आदल्या दिवशीच्या लग्नासाठीचा हॉल सांध्याकाळपर्यंत असेल तर संध्याकाळनंतर हॉल ताब्यात मिळतो. लांबून येणार्‍यांची राहण्याची सोय होते. काही काही ठिकाणी संध्याकाळी हळदी असते.

फोटोग्राफर्सच्या भिंतीमुळे लग्न दिसतच नाही. ते नंतर फोटो अल्बम आणि लग्नाची व्हिडीओ कॅसेट यातून दिसतं. शिवाय लग्नात सत्कार समारंभ आणि नेत्यांची भाषणे होतात. संपूर्ण भारतात मराठी लोकांनी हा वेगळेपणा जपला आहे.

दहा बारा वर्षांपूर्वीपर्यंत लग्नात ऑर्केस्ट्रा कंपल्सरी झालेला होता. एकापेक्षा एक चढ्या दराने महागडा ऑर्केस्ट्रा आणण्याची स्पर्धा लागलेली असायची. लग्नातल्या भपक्यापायी बरबाद झालेली कुटुंबे आहेत. ही स्पर्धा काही जाणत्या लोकांनी पुढाकार घेऊन थांबवली आणि कुणी ऑर्केस्ट्रा आणला तर दंडाची रक्कम ठरवली. शिवाय बहीष्कृत करण्याची धमकी आहेच. तरीही ऑर्केस्ट्रा अजून काही भागात आहे. त्याचे कमीत कमी लाखभर ते दहा पंधरा लाख रूपये चार्जेस होतात. जर फिल्मी कलाकार बोलावले तर ते तासाच्या हिशेबाने चार्जेस आकारतात. एका लग्नाला सन्नी लिऑनीला बोलावले होते. जॅकी श्रॉफ पासून मराठीतले बरेच कलाकार असतात.

अशाच एका लग्नात मिलिटरी बँड होता. फक्त १४ हजारात मिळाल्याने वधूपिता खूष होता. कुठल्या तरी नात्यातल्या फौजीच्या नावावर बुक केला होता. लग्नात सगळी देशभक्तीपर गाणी वाजवली गेली. सगळीच इंस्ट्रुमेंटल होती. ए मेरे वतन के लोगों, कर चले हम फिदा, है प्रीत जहां कि रीत सदा, मेरे देश की धरती सारखी गाणी सतत वाजत होती. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला आल्यासारखा फील होता. आता झेंडावंदन झालं कि लिमलेटच्या गोळ्या मिळतील असं राहून राहून वाटत होतं.

नंतर समजलं की वधूपित्याचा गैस झाला होता. मिलिटरीचा ऑफिशिअल बॅण्ड असाच असतो. त्यांचा एक कल्चरल क्लब आहे. त्यांचा एक बॅण्ड आहे. तो ऑफिशिअल नाही. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मधल्या हौशी कलाकारांचा सांस्कृतिक क्लब आहे. त्यांचा हा डेमी ऑफिशिअल ऑर्केस्ट्रा आहे. वधूपित्याने अर्धवट माहितीवर नातेवाईकाला अधि़कृत बॅण्ड आणायला सांगितला होता. नातेवाईक पण हुषारच निघाला.

पारंपारीक लग्न म्हणजे आठ, दहा , बारा दिवस चालायचं ते. खूप लहान असताना गावी गेल्यावर आठ दिवस चाललेल्या लग्नांची चर्चा ऐकली आहे.

फा +१
मला ते संगीत वगैरे अतिशय बोर होतात. स्टेजवर नाच चाललेला असतो बाकी सगळेजण बसून बघतात. ते तर आपण अगदी गणेशोत्सवातही बघतो Wink .

मला तर नाचताच येत नाही. आणि कोणाला ते खरंच वाटत नाही. ते म्हणतात की आम्हाला पण येत नाही, पण त्यात काय, नुसता गणपती डान्स तर करायचा! पण माझं अंग इतकं कडक राहतं की मला बल्ले बल्ले किंवा पतंग मांजा स्टेप करायला पण श्यामक दावरची मदत लागेल. मला आधी ओढून ओढून नाचायला घेऊन गेलेले लोक माझं अवघडून केलेलं रोबोटिक नाचणं बघून मी होतो तिथे मला परत आणून सोडतात. साधं गणपतीत मी मराठी संस्कृती पाळू शकत नाही, तर लग्नात काय डोंबल!

हपा, माझी पुढची पोस्ट तुम्ही आताच लिहून टाकली कि ओ
आता मी काय लिहू ?
या तुफानाला आता हवे आहेत काही शब्द
जे तुम्ही आधीच खर्च केलेत

सायो, अंजली, र्म्द - थँक्स. मला वाटले डान्स वरून, आणि संगीत बोअर वाटण्यावरून इथे सडकून फटके पडतात की काय Happy

फोटोग्राफर्सच्या भिंतीमुळे लग्न दिसतच नाही. ते नंतर फोटो अल्बम आणि लग्नाची व्हिडीओ कॅसेट यातून दिसतं. शिवाय लग्नात सत्कार समारंभ आणि नेत्यांची भाषणे होतात. संपूर्ण भारतात मराठी लोकांनी हा वेगळेपणा जपला आहे. >>> Lol हे भारी आहे. आणि खरेही Happy

जेवणाचे किती तरी प्रकार पण व्यवस्थित पोट भरेल आणि काही पचनाचा त्रास पण होणार नाही असे अन्नपदार्थ जेवणात नसतात.
खूप लग्न attend केली हल्लीच पण फक्त पुण्यात एका मित्राच्या मुलीच्या लग्नात च खूप जेवलो.
अगदी सुंदर जेवण होते.
बाकी तर मी लग्नात जेवणे हा प्रकार च टाळतो
खूप सोडा,किंवा अतिशय spicy पदार्थ च असतात..

लग्न सुटसुटीत बेस्ट. मुंबईत तर आदल्या दिवशी हॉल वगैरे प्रकारही नसतो. सकाळी लग्न, दुपारचं जेवण गप्पा करून चहाला मंडळी घरी.
ज्यांना ऑफिसला जायचं असेल त्यांच्यासाठी १० ला एक वेगळी पंगत. मग लग्नाचा मुहूर्त आधी असेल किंवा नंतर. Happy

बाकी पनीर ला नावं का ठेवताहेत समजलं नाही. जनरली बाहेर जेवायला गेलो आणि व्हेज मागवलं तर किती वेळा पनीर शिवाय जेवण होतं? अमेरिकेत बटर चिकन आणि भारतात पनीर खाल्ल्या शिवाय एक तरी लहान मुलामुलींचे जेवण होतं का? कालाय तस्मै नमः.
मला स्वतःला भरली वांगी, मटकी, बटाट्याची पिवळी भाजी, फ्लॉवर बटाटा, अळू, मसाले भात आणि श्रीखंड आणि मठ्ठा याशिवाय लग्नाचं जेवण वाटतच नाही. छोले आणि पनीर नकोच... पण माझीच मुलं यातलं किती खातील विचार करून पनीर ठेवेनच. शेवटी वावे च्या जेवण कसं होतं प्रश्नाला त्यांना पण उत्तर देता आलं पाहिजे ना! Happy

आत्ता पोस्ट लिहिताना संगीत वगैरे बोर वाटलं तरी मामे भावाच्या लग्नात त्यातही भरपूर मजा केलेली आहे. कंफर्टेबल ग्रुप मिळाला की गप्पा काय आणि संगीत काय एकत्र (गोंधळ) वेळ घालवण्यात मजाच येते. त्यात पुशी पब्लिक असेल तर मग बेरंग होतो. #समंजसशिक्कामारलातरीबेहत्तर Lol

मला वाटले डान्स वरून, आणि संगीत बोअर वाटण्यावरून इथे सडकून फटके पडतात की काय >>> छे छे अजिबात नाही. शिवाय आमच्या लग्नात छान मराठी जेवण होते. आमचा तसा आग्रहच होता. खास नवर्‍यामुलाला आवडतात म्हणून रूखवताच्या जेवणात उकडीचे मोदकही होते Happy

पुर्वी लग्नात (जेंव्हा संपूर्ण कंत्राटी पद्धतीने लग्ने सुरु झाली नव्हती) प्रत्येक नातेवाईकाचा एक रोल असायचा, प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी असायची, लोकांची किम्मत होती आणि पाहुण्यारावळ्यांची आधी आठवडाभर गजबज असायची आणि लग्नानंतरही अगदी पुजा, गोंधळ होईपर्यंत लग्नघराला उसंत नसायची.... लोकांकडे वेळ होता आणि मोकळेपणाही..... आता दोन्हीही राहिले नाही त्यामुळे एक दोन दिवसाची सुटसुटीत लग्ने होतात; रिसेप्शनला आल्यासारखे लोक लग्नाला येतात..... मंडपातल्या विधीमध्ये चार अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर कोणालाही इंटरेस्ट नसतो, सगळे आपापला कंफर्ट ग्रूप शोधून खुर्च्यांचे गोल करुन बसतात आणि आपण आलो होतो याचा पुरावा हवाच म्हणून फोटोपुरते स्टेजवर जाऊन येतात!!
सध्या एक ट्रेंड बघितलाय आणि तो मला त्यातल्या त्यात आवडला तो म्हणजे अगदी घरातल्या आणि खुप जवळच्या सख्ख्या नातेवाईकांना घेऊन, दोन चार जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींना घेऊन अगदी पारंपरिक पद्धतीने "ढेपेवाडा" किंवा तत्सम ठिकाणी जाऊन पारंपरिक पद्धतीने लग्न केले जाते आणि मग इतर नातेवाईक, मित्रमंडळी, ऑफिसमधल्यांसाठी वगैरे मस्त वीकेंडला संध्याकाळी एखाद्या लॉनवर रिसेप्शन ठेवले जाते Happy

टीव्हीवर मराठी मॅट्रिमनीच्या जाहिराती दाखवतात. त्यातली एकही जोडी मराठी नाही. इतर भाषकांच्या मॅट्रिमनीच्या जाहिराती मराठीत डब केल्या आहेत. हीच मराठीची आणि मराठी माणसाची किंमत.
यावरून कोणी अस्मिता दुखावली असं विव्हळतही नाहीए.

स्वरूप, पूर्वी म्हणजे किती पूर्वी? गेली ४० वर्षे मुंबईत तरी एक दिवसाचे लग्नच बघितलं आहे. पुण्यात दीड. आमचं जग तिथेच संपतं. Wink
गावाकडची लग्न ही आमची परंपरा न्हावतीच. आमच्या पालकांची ही न्हवती. आजी आजोबांची असेल. ती (म्हणजे परंपरा...) मोडीत काढून आता ८० -९०वर्षे झाली.

एका लग्नात कोणतीतरी सध्याची आघाडीची डान्चर आणली होती. सदोष साऊंड सिस्टीममुळे शब्द समजत नव्हते.
ते असे ऐकू येत होते

" अहो राया मला, मुंबईला जॉगिंगला न्या "

ही बया रायाकडे ( फरची टोपी घातलेले राजशेखर डोळ्यापुढे येतात) जॉगिंगचा आग्रह का धरत असेल ?
ते ही मुंबईत जाऊन ? मुंबईचे लोक जॉगिंग करतात का ? करत असतील तर कुठे ?
असे अनेक प्रश्न पडले होते.
नेटवर गाणे चेक केले तेव्हां ती बया गौतमी पाटील आहे आणि गाण्यात जॉगिंग नसून शॉपिंग असल्याचे समजले.
राया तालुका लेव्हलचा विकास पुरूष असावा. जिल्हा लेव्हलचा वि.पु. असता तर मुं च्या जागी दु असायला पाहीजे होतं.

पूर्वी म्हणजे अगदी आम्ही शाळेत बिळेत होतो तेंव्हाचे सांगतोय..... त्याला इतकी वर्षे खचितच झाली नाहियेत Wink
म्हणजे मोठ्या आत्ते/चुलत/मामे/मावस भावाबहिणींच्या लग्नात आधी आठवडा-आठवडाभर जाऊन राहिल्याचे आठवतेय आणि धम्माल मजा केल्याचेही.... आणि अगदी गावकडे वगैरे नाही तर सातारा,सांगली कोल्हापूरसारख्या शहरी-निमशहरी भागात!!
कुणी लाडू करायचे; कुणी चिवडा करायचा, एखादी खमकी काकू सगळ्या स्वयंपाकघराचा ताबा घेऊन बसलेली असायची तर आमच्या सारख्या पोऱाटोऱांकडे फराळाच्या पिशव्या भरायला मदत करण्यापासून मटार वगैरे सोलण्यापर्यंत काही पडेल ती कामे असायची, जरा मोठी कॉलेजातली वगैरे भावंडे फोटोग्राफर ठरव, मंडपवाल्याला बोलाव, लायटींग करुन घे, वर्हाडाच्या गाड्यांचे बघ यात गुंतलेली असायची!!

बाकी ते लग्नाचे वऱ्हाड म्हणजे स्वतंत्र पोस्टचा विषय आहे.... लग्न जितके लांबच्या ठिकाणी तितकी वऱ्हाडाच्या गाडीत गम्मत यायची!!
लिहतो जरा निवांतपणे Happy

पूर्वी म्हणजे अगदी आम्ही शाळेत बिळेत होतो तेंव्हाचे सांगतोय..... त्याला इतकी वर्षे खचितच झाली नाहियेत >>> Lol
भोली भाली लडकी गाणे येण्याआधीची गोष्ट आहे कि नंतरची ? Wink

स्वरूप - मस्त वर्णन आहे. मी अगदी पुण्यातही अशी लग्ने आणि चांगले ८-१० दिवस आधी येणार्‍या आज्या वगैरे पाहिले आहे. माझी आजी आणि पणजी दोघी यायच्या आमच्याकडे Happy ९०ज मधे माझ्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न बिनकंत्राटी पद्धतीने त्यांनी केले. त्यावेळेसही तुमच्या वर्णनासारखेच पाहिले आहे.

#समंजसशिक्कामारलातरीबेहत्तर >>> Lol

धाग्याचा विषय आमच्या वेळचे लग्नसमारंभ नसून लग्न समारंभातले मराठीपण हरवत चालले आहे का असा आहे ना?

बरं ते हाफसारीडेचं कौतुक झालं तर आपल्याक डे न्हाण आल्याचं सेलिब्रेशन करायचे तसं अजून हवंय का? मी फक्त २२ जून १८९७ या चित्रपटात ते पाहिलंय.

लग्न आणि त्यानंतर स्वागत समारंभ यात मराठीपण जपणे आणि नव्या गमती करणे हे दोन्ही साधलेलं एक लग्न नुकतंच पाहिलं.

लग्नाला जाताना मुलाकडचे सगळे पारंपारिक डिझायनर पोशाखात. वरपिता अवघडलेला. बायकांनी शिवलेल्या नऊवारी साड्या नेसलेल्या. घरी सगळ्या गोष्टी पारंपारिक पद्धतीने झाल्या. हॉलवर लग्नही तसंच लागलं असावं. मी स्वागत समारंभाला गेलो होतो.
लग्नाचा मुहूर्त साडे अकराचा. स्वागत समारंभ साडेबारा ते अडीच. मी सव्वाला पोचलो तोवर नवरानवरीचा पत्ता नाही. मंडपाच्या प्रवेशद्वारापासून सेल्फि पॉइंट असल्यासारखे लोक सेल्फि, फोटो काढताहेत. पाहुणे मंडळीही स्टेजवर जाऊन आपले फोटो काढून घेताहेत. आधी जेवून घ्या असं सांगितलं गेलं. पदार्थ पंजाबी - मटर पनीर, जिरा राइस इ. सीताफळ बासुंदी छान होती पण आइसक्रीम नसल्याने लग्नाचं जेवण वाटलं नाही.
हॉलमध्ये परत यायला दोन वाजले तर हॉलच्या डाव्या बाजूला स्टेजवर जायला रांग लागली होती. पण नवरानवरीचा पत्ता नव्हता. ते सव्वादोनला आले. आता नवरा , त्याचे भाऊ सूट घालून . वडील -काका सफारीत. आई काक्या इ. पुन्हा सहावारीत. हेअर स्टाइलिंग केलं आहे हे पहिल्याच नजरेत कळलं पाहिजे. कोणी कोणी मेकअपमुळे ओळखू न येणार्‍या किंवा चेहरा सुजल्यासारख्या वाटणार्‍या. वधूवर येत असताना फोटो आणि व्हिडियो शूट. लहान मुले, वराचे मित्र , वधूच्या मैत्रिणींचे गाण्यांच्या एकेका कडव्यावरच का होईना पण आधी बसवलेले नाच. वधूवर स्टेजवर पोचल्यावर त्यांचा वेस्टर्न डान्स. वेडिंग केक. मग एकदाचं पाहुण्यांना भेटणं. त्यात अगत्य होतं म्हणून उशिराचं आणि रांगेत उभं राहण्याचं एवढं काही वाटलं नाही.

एकदम मनाची तारच छेडलीस ॠ.

इतक्यातच काही लग्नांना गेले होते. सुबत्ता वाढली आहे किंवा दाखवली जाते हे जाणवतं.

तवा स्वीट नावाचा एक अमानुष प्रकार पाहिला. अनेक प्रकारचे हलवे आणि बर्फ्या परत एकदा तव्यावर तुपात परतून देत होते. वरून रबडी आणि सुकामेव्याची पखरण. बघून छान वाटलं आणि मग भिती पण. आमच्या लहानपणी सणासुदीला घरी काजूपाकळीचं पाकीट येई. आई ते सांभाळून वापरे तोवर त्याची किंमत वाटे. आता हे सगळं असं उपलब्ध झालं तर कशाची किंमत तरी वाटेल का असं वाटलं.

परवाच्या लग्नात नवरीचा वेष म्हणजे म्हणजे परकर झंपर ( लेहेंगा चोली) आणि साईड ओढणी असा झालाय. आपली पारंपारीक नवरी पण किती गोड दिसते शालू शेला ल्यायलेली आणि नाकात मोत्याची नथ. परवा नवरीची नथ पण गोल आकाराची आणि लहान होती.

मराठी लोक उठसूठ मिठ्या नाही मारत एकमेकांना, नाही जमत त्यांना नाचायला...असू दे की वेगळेपण. जमत नसेल तर न जमूदे की.

मराठी लोकांना मराठी भाषेप्रमाणे मराठी लग्नांचाही न्पयूनगंड वाटतोय बहुतेक.

Pages