मराठी लग्न आणि समारंभातील मराठीपण हरवत चाललेय का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 December, 2022 - 15:15

काल आमच्या बिल्डींगमध्ये एका दाक्षिणात्य कुटुंबाकडे एक कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे नाव हाफसारी. म्हणजे अर्धी सारी. मुलगी अकरा वर्षे वयाची होण्याआधी हा कार्यक्रम त्यांच्याकडे साजरा केला जातो. तर त्यानंतर वयात आल्यावर अजून एक कार्यक्रम होतो. त्याचे नाव बहुधा फुल्लसारी. आपल्याच मुंज, बोरन्हाण सारखे काहीतरी असावे. पण हे काय हाफ फुल ईंग्लिश नाव ठेवले म्हणून मी आधी हसलो. पण नंतर खजीलही झालो. कारण कार्यक्रम पाहिला तर पुर्ण पारंपारीक पद्धतीने साजरा होत होता. तो हाफसारीचा जो ठराविक पारंपारीक पोषाख त्या मुलीला घातला होता त्याची किंमत तब्बल पस्तीस हजार रुपये होती. हे ऐकून मी चक्राऊन गेलो. पुन्हा मनातल्या मनात म्हटले यापेक्षा जेवणावरच खर्च केला असता. पण पुढे जाऊन पाहिले तर जेवणही होते. आणि ते देखील तितकेच पारंपारीक होते. मुख्य आकर्षण डोसा, सांबार, खोबर्‍याची चटणी, रस्सम, दाल, नारळीभात, पुलाव, पनीरला डावलून मिक्स भाजी, मिरचीच्या भज्या, ताक, पापड, सलाड बासुंदी वगैरे.. माझ्यासारखी मराठी माणसे खात होती आणि हे आपल्या घरी बनवले तर अशी चव येत नाही म्हणून नेहमीची चर्चा करत होते.

निघताना प्रत्येकाला जे रिटर्न गिफ्ट दिले होते त्यातही तिकडच्या मिठाया, दागिने, भांडीकुंडी असाच ऐवज होता. खर्चा बराच केला होता. पण आमच्याघरी चर्चा होती ती या निमित्ताने त्यांच्या समजलेल्या प्रथांची. एका समारंभातून आपली संस्कृती त्यांनी व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि यावरूनच मग घरी विषय निघाला की हे आजकाल आपल्या लग्नसमारंभात का दिसत नाही?

वाढदिवसाप्रमाणे केक कापून साखरपुडा साजरा करणे, प्रीवेडींग फोटोशूट करणे, रील्स बनवावे तसे डान्स आयटम सादर करणे, नवरा नवरीने अमराठी वा अपारंपारीक पोशाख घालणे, रुखवताला बॅकफूटवर टाकत तिथे सेल्फी पॉईंट बनवणे, सनई चौघडे तर दूरच, तिथे शॉपिंग मॉलसारखी गाणी लावणे, जेवणात वेलकम ड्रिंक म्हणून फसफसणारी पेये आणि सोबत स्टार्टर फिरवणे, लहान मुलांसाठी पिझ्झा ठेवणे, पनीर चायनीजचा मारा करणे ते पाणीपुरीचे स्टॉल लावणे, या सगळ्यात मराठी लग्नसमारंभातील मराठीपण हरवत चालले आहे असे वाटत नाही का?

एखादी अमराठी व्यक्ती जर आपल्या लग्नात येत असेल तर तिला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असे आपण काहीच करत नाही. अमराठी व्यक्ती सोडा, आपल्या पोरांना तरी एखादे महाराष्ट्रीय लग्न आणि एखादी ग्रँड बड्डे पार्टी यात फरक जाणवत असावा का ही शंका वाटते.

शो ऑफ करायला हरकत नाही. तो तर मी कालच्या बिल्डींगमधील समारंभातही खूप पाहिला. तरीही सांबार डोसे आणि नारळीभात खाऊनच तृप्त झालो. जर आपल्याही लग्नात पुरणपोळीचा घाट घातला, रोटी आणि नान ऐवजी फुलके आणि भाकर्‍या खाऊ घातल्या, जीरा राईस आणि दाल फ्राय ऐवजी गरमगरम वरणभातावर तुपाची धार सोडली, भाज्यांमध्ये पनीरशी काडीमोड घेत चवळी, वांगे, बटाटा यांना स्थान दिले. वेज नगेट्सच्या ऐवजी अळूवड्या ठेवल्या, तर आपली लग्ने डाऊनमार्केट वाटतील का हो?
वाटेनात, पण हा ट्रेंड पुन्हा सुरू व्हायला हवे असे मला वाटते.
तुम्हाला काय वाटते?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धाग्याच्या विषयाला धरुन हरवत चाललेल्या/ न चाललेल्या मराठीपणा बद्दल:
मराठी लग्नातले खास मराठीपण म्हणजे त्यातले विधी (केळवणे, मुहुर्त करणे, सोडमुंज, ग्रहमख, बांगड्या भरणे, सीमांत पूजन, सकाळचे घाणे भरणे, हळद, व्याहीभेट, रुखवत, गौरीहार पूजन, रुखवताचे जेवण, कंकण बांधणे, मंगळसूत्र घालणे, मंगलाष्टके, कन्यादान, सप्तपदी, सुनमुख, वरात, उखाणे घेऊन घास भरवणे, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश, पूजा, गोंधळ. वगैरे) हे अजुनही बहुतांश लग्नात बघितले आहेत.... त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही.
प्री-वेडिंग फोटोशूट, मेहंदी-संगीत, साखरपुड्याला केक कापणे, गुडघ्यावर बसून रिंग देणे, चपलांची पळवापळवी, वधू वराला हार घालण्याआधी उचलून घेणे वगैरे काही गोष्टी नव्याने सुरु झाल्या आणि तश्या त्यातली क्रेझ संपल्यावर काही बंदही पडल्या पण तेव्हढे चालायचेच!!
मेन्यू ठरवणे वगैरे यजमानांच्या हातात असते..... जोशी-गोखले आणि इतरही पुण्यातले केटरर अतिशय उत्तम मराठी मेन्यू देतात (आदल्या दिवशीच्या कढी-खिचडी, अळूची भाजी, शिऱ्यापासून अगदी पुरणपोळी-मोदक जिलेबीपर्यंत बहुतांश मराठीच मेनू असतो)
मुंबईचे माहित नाही पण पुण्यातल्या लग्नात अजुन तरी बऱ्यापैकी टिपिकल मराठी जेवण मिळते
राहिता राहिला प्रश्न पोशाखाचा तर तो फॅशनप्रमाणे बदलत असतो.... ८०च्या दशकातल्या सफारीने ९० च्या दशकात सूट चढवला नंतर सलवार कुर्ता, शेरवानी करताकरता सध्या हौसेने सोवळे नेसणारे, (शिवलेले का असेना) पुजा विधीला धोतर उपरणे घालून बसलेले नवरदेव बरेच दिसतात!!
फेटे- पगड्या असतात!!
पैठणी, शालू वगैरे तर ऑल टाईम हिट आहेत.

आधी म्हण्टलेय तसे काही गोष्टी नव्याने मिसळल्या आहेत पण वर उल्लेखलेल्या (आणि इतरही अनेक) जुन्या गोष्टी जपल्या, पाळल्या आणि मिरवल्या जातायत तोपर्यंत लग्नातले मराठीपण हरवत चाललेय असे वाटायचे कारण नाही
सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीयांची-उच्च मध्यमवर्गीयांची लग्ने कालानुरुप छोटी, सोपी, सुटसुटीत झालीयत पण अजुनही ती 'मराठी'च आहेत!!

तळटीप: हा अनुभव माझ्यापुरता आणि माझ्या सामाजिक, भौगोलिक परीघातल्या निरिक्षणातुन आलेला आहे.... इतरांचे अनुभव वेगळे असूच शकतात!!

खूप छान विषया वर धागा काढलास Happy अभिनंदन!
होय हरवत चाल्लेय मराठीपण असे वाटते खरे, पण ईथे आम्ही भारता बाहेर दिवाळी पार्टी पुरणपोळी, अळूवड्या, मटकी, सांभारवडी रस्सा अशा पारंपारीक मेनू ठेवून च साजरे करतो, नथ घालतो, नऊवारी नेसतो. एंजॉय करतो मराठी सण! Happy

लग्नात काय कसे करावे हा खरं तर त्या त्या फॅमिली आणि लग्न होणार्‍या जोडप्याचा प्रश्न झाला. तरी नऊवारी, धोतर नेसलेले वधू, वर, मेनूत बटाटा पुरी, श्रिखण्ड असे जेवण मी खाल्लेले असल्याने अगदीच संस्कृती लोप पावली असे म्हणवत नाही Wink

1) पाहिले लग्नात सर्व मनापासून सहभागी हीत असतं कारण प्रत्येकावर काही तर जबाबदारी असे
कॉन्ट्रॅक्ट पद्धत नव्हती त्या मुळे व्यापारी करणं लग्नाचे झाले नव्हते
लग्न म्हणजे एक मंगल सोहळा आहे इव्हेंट नाही ह्याचे भान होते.
२)तीळाच्या चटणी पासून घेवढ्याची आमटी,
शिरा भात आमटी,
रव्याची बर्फी, कळ्या बुंदी चे लाडू. असे लग्नातील अन्न बदलत जाताना बघितले आहे .इतपर्यंत ठीक होते
२) contract पद्धत आली आणि लग्नाचा इव्हेंट झाला .त्याचे पावित्र्य नष्ट होवून फक्त दिखावा ह्या वर भर लोक देवू लागली
३)बॉलिवूड ,हिंदी मालिका ह्यांचा जबरदस्त प्रभाव मराठी लोकांवर आहे.
आणि स्वतःला कमी समजण्याची वृत्ती पण मराठी लोकात जास्त आहे.(दक्षिण भारतीय office मध्ये इडली , सांभर आणतात पण मराठी लोकांना ज्वारी ची भाकरी ऑफिस मध्ये tipin मध्ये घेवून जाण्यास लाज वाटते.हा फरक आहे)
नवऱ्याचे बुट चोरण्या पासून आज जे काही प्रकार चालू आहेत त्या मागे तूच मानसिकता आहे.
दक्षिण भारतात आज पण नवऱ्याचे बुट कोणी चोरत नसणार.
त्यांनी त्यांच्या परंपरा जिवंत ठेवल्या आहेत.

Bollywood सिनेमा मध्ये हिंदी मालिका मध्ये बायकोचं चोरायची पद्धत दाखवू लागले तर आपली लोक ती पण प्रथा पाळतील

चायनीज प्रकार,रुमनी रोटी,पाणी पुरी,असे अनेक पदार्थ आहेत .
ते लग्नात मेनू मध्ये ठेवण्यात काय लॉजिक आहे ते ठेवणारे च जाणो.
बासुंदी,पुऱ्या किंवा चपाती,उत्तम दर्जा चा भात, उत्तम दर्जा ची डाळ,खूप च हौस असेल तर त्या वर जावं तितके तूप, एक गोड पदार्थ,मसाले भात,पापड,लोणचे,एक दोन अजून उत्तम भाज्या.
असेच जेवण असावे.
ज्या जेवणाने पोट पण भरेल आणि दुसऱ्या दिवशी डॉक्टर कडे पण जावं लागणार नाही.
इतकी नाटक करतात .
कोणाच्या लग्नात फ्रेश फळांचा रस कोणी ठेवत नाही.
नको त्या unhealthy पदार्थ मध्ये पैसे उडवतील पण जो योग्य आहे तो मेनू ठेवणार नाहीत.
दुसऱ्याचे बघून फक्त त्यांची नक्कल करतील.

मी माझ्या मुलाच्या लग्नात योग्य तोच जेवणाचा मेनू ठेवणार असे ठरवले आहे.
त्या मध्येवफळांचा ज्यूस नी रसना किंवा बाकी पेय replace नक्कीच करणार आहे.

सकारात्मकता अंगी बाणवावी.
आपले नाही तर नाही,
पण इतक्या लोकांची मने
जुळताहेत हे थोर नाही का ?
कि सर्वांनी सलमान खान व्हावे ?
उडवले थोडे जेवणावर पैसे तर उडवले.
बिनालग्नाची माणसे रस्त्याने जाताना
माणसे उडवतात, दंगली घडवतात.

मराठी लोकांना ज्वारी ची भाकरी ऑफिस मध्ये tipin मध्ये घेवून जाण्यास लाज वाटते.हा फरक आहे) >>> हे असे मराठी लोक नेमके कोणत्या ऑफिसात जातात जिथे त्यांना खाण्यापिण्याच्या लाजा वाटू लागल्यात।
आतापर्यंत दोन मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसात काम केलय मी, मराठी पदार्थातील व्हेज - नॉन व्हेज पासून ते अगदी रात्रीचा उरलेल्या शिळ्या भाताला फोडणी / तडका लावून लोकांनी टिफिन मध्ये आणलेले पहिले आहे . ओव्हन वर ओन्ली व्हेज लावले गेले म्हणून नॉन व्हेज वाल्यांसाठी नवीन ओव्हन ऍडमिनला सांगून मागवला आहे .

Ajnabi
आहेत मी जसे वर्णन केले आहे तशी लोक.
त्यांना कमी पना वाटतो मराठी मेनू tipin मध्ये ऑफिस मध्ये घेवून जाण्यास.
तुम्ही अभिमानी,स्वाभिमानी आहात.
पण बरेच तसे नाहीत.

आमचं लग्न अगदी मराठी पद्धतीने झालं
मेहेंदी ,संगीत , डी जे असल काही नव्हतं
फक्त सनई होती
कासार बोलावून बांगड्या भरल्या , जात्यावर हळद
छान कौटुंबिक सोहळा झाला
जेवण पारंपरिक महाराष्ट्रीयन होत
आदल्या दिवशी कढी खिचडी शिरा
दुसऱ्या दिवशी नाश्त्याला पोहे ,खिचडी ,उपमा
जेवणात लिंबू , बटाट्याची भाजी , श्रीखंड ,पुरी , वरण भात , ओल्या नारळाची चटणी , पापड, काकडीची कोशिंबीर, मसालेभात ,अळूची भाजी , मटकीची उसळ , मठ्ठा , कोथिंबीर वडी शेवटी विडा
लग्नात मी नऊवारी साडी नेसली होती , नवऱ्याने पुणेरी पगडी , धोतर , उपरण असा वेश केला होता
इतर विधिंना मी साडीच नेसली होती
लेहेंगा वगैरे प्रकार अजिबात नव्हता

<<मराठी लोकांना ज्वारी ची भाकरी ऑफिस मध्ये tipin मध्ये घेवून जाण्यास लाज वाटते.हा फरक आहे>>

अस काही नाही माझा नवरा नेतो डब्यात भाकरी , चटणी ,ठेचा असे पदार्थ

प्री wedding शूट करा .
हौस म्हणून पण लग्ना chya दिवशी स्क्रीन वर दाखवू नका...त्या तुमच्या दोघांच्या आठवणी आहेत.
पब्लिक साठी नाही.
मराठी परंपरे नी सर्व विधी करा.
डान्स,करून नवरी आणणे हे बंद करावे.
पंडित जी ना सर्व विधी व्यवस्थित करून द्यावेत.
Photography करणाऱ्या लोकांनी डायरेक्टर बनू नये
जेवणात असे पदार्थ असावेत जे उत्तम पोषक दर्जा असणारे असतील.
उगाच काही पण नको..
समारंभास उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांची दखल घेतली जावी.
त्या लोकांची विचारपूस झाली पाहिजे.
जेवण हे पंगतीत च असावे , बसून व्यवस्थित टेबल वर.
Photography करणाऱ्या अर्धवट लोकांना फक्त नैसर्गिक फोटो च घेण्यास सांगावें

उगाच सिनेमा सारखे सेट लावण्याची गरज नाही

फा पूर्ण पोस्ट आवडली

मोजक्याच लोकांना लग्नाला बोलवून बाकीच्यांना रिसेप्शनला बोलावले तर लग्न बोअर होणार नाही.

सगळ्यांनी जबरदस्तीने कोरिओग्राफ केलेले डान्स करणे वगैरे मला हास्यास्पद वाटते. ज्या लोकांना आवड किंवा थोडेफार नाचाचे अंग असते त्यांनी केले डान्स तर छान असतात. नॉर्थमधेही पूर्वी फक्त लेडीज संगीत असायचे. काही परंपरागत लेडीज संगीत अटेंड केली आहेत. त्यात हौशी बायका/मुली डान्स करायच्या. थोडी फार सूचक गाणी/थट्टा मस्करी वगैरे असायची. ते मला जास्त रिलेवंट वाटले.

एका व्हिडिओत पाहिले कि मराठी लग्नात 'या गो दांड्यावरना नवरा कुणाचा येतो' गाणे लावून त्यानुसार नाचत नातेवाईकांची ओळख करून दिली होती तो प्रकार खूप आवडला

पूर्ण मराठी मेनूवाली लग्ने जास्त आवडतात. पंजाबी, चायनीज या गोष्टीचा आग्रह केटरर धरतात असा अनुभव आहे. आपण ठाम राहिलो तर मिळतो मनासारखा मेनू.

दहा-एक वर्षांपूर्वी हे हि नोट केले कि ज्या घरातील लोक फार हॉटेलिंग करायची नाहीत, जनरली ५०-५५ च्या बायका ज्या मैत्रिणीसोबत हॉटेलिंग करणे वगैरे प्रकार करायच्या नाहीत, ते लोक लग्नात वगैरे चायनीज, पनीर खायचे. आता कदाचित हे चित्र दिसणार नाही कारण ओव्हर ऑल सर्व थरात आणि वयोगटात हॉटेलिंग वाढले आहे.

ह्याचे सामाजिक दुष्परिणाम आहेत.
बरं वाईट खूप कमी लोक समजतात.
छान छोकी आणि प्रदर्शन करण्याची रीत आहे.
सामान्य घरातील ,आणि अगदी माध्यम वर्गातील सुद्धा .
लोकांची आर्थिक स्थिती बेताची असते आणि फुकटचे दोन नंबर चे पैसे ह्यांच्या कडे नसतात.
पण समाजात चालणारे प्रकार बघून .
काही विचार न करता अनेक मुलो आणि मुल नको तो हट्ट करतात .
पालकांचा नाईलाज होतो.
पण मुली च्या बाजू नीच सर्व खर्च झाला पाहिजे हा विचार मात्र बदलत नाही.
नालायक लोक किती स्वार्थी असतील.
बॉलिवूड style लग्न पण खर्च मुलीचा.
अक्षरशः मुलीचे पालक बरबाद होतात ह्या स्पर्धेत उतरून आणि आश्चर्य म्हणजे मुली पण ह्या बावळट विचाराच्या बाजू नी असतात
वाईट वाटतें

सुदैवाने माझं आणि माझ्या बहिणीच लग्न अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं कसलाही बडेजाव भपका न करता
आणि दोघींच्याही लग्नात मुलाकडच्या लोकांनी निम्मा खर्च केला

वरचे सगळे प्रतिसाद वाचून जाणवलं की गेल्या ११ वर्षात मी एकही लग्न अटेंड केलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींना मुकलेय.
बरं, तो बायकांनी फेटे बांधायचा ट्रेंड गेला का? आजकाल कोणी फेटे घालून गॅागल लाऊन फोटो टाकताना दिसत नाही.

फारएन्ड + १
वधूवर आणि त्यांचे आईवडील सगळ्यांची नावं, शिक्षणं, पदं वगैरे ओवून लाउडस्पीकरवरून शक्य तितक्या बेसूर पद्धतीने मंगलाष्टकं गातात का अजून? (पटवरऽऽधनऽऽ राजूस खास शोऽभेऽ गोख्ल्यांची हीऽ दूऽ(!)हिताऽऽ) ती गात असतील तोवर मराठीपणा कुठ्ठे जात नाही! Proud

बाकी मराठी लग्नं बोरिंग झाली ती जोडीने अंघोळी, विडा तोडणे वगैरे विधी थांबल्यावर असा एक मतप्रवाह आहे. 'यू मे किस द ब्राइड'पेक्षा विडा तोडणे म्हणजे अगदी 'तोडलंस!' क्याटेगरी नाही का? Proud

नवरा नवरी एकमेकांना मिठी नाही मारणार तर मग कोणाला मारणार? Proud
का इतकं पण पीडीए नकोय? आमच्या लहानपणी एका ग्लासातून तासंतास गोल्डस्पॉट सिपत बसायचे आणि function at() { [native code] }यंत ऑकवर्ड पोझिशन मध्ये नवर्‍याच्या खांद्यावर हात ठेवून साईड व्हू मध्ये उभे रहायचे. मराठी लग्न म्हटलं की मला एका ग्लासात दोन स्ट्रो घालून गोल्ड स्पॉट पिणे हे आठवतं. ती परंपरा मोडली मात्र हल्ली. Proud

स्वाती, हल्ली लग्नांमधे चांगली मंगलाष्टकं पण ऐकली. मीटर मधे ठोकून ठाकून कोंबलेली नव्हती.

>>बाकी मराठी लग्नं बोरिंग झाली ती जोडीने अंघोळी, विडा तोडणे वगैरे विधी थांबल्यावर असा एक मतप्रवाह आहे.>> हे फार कॉमन असल्याचं पाहिलेलं नाही. निदान आमच्या घरात तरी नाही.

आपल्या पिढीने नाहीच पाहिलेलं, सायो. आपण 'अमुक आणि तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असं लिहिलेल्या आमंत्रणपत्रिकाही पाहिलेल्या नाहीत. ही सगळी आपल्या आधीच्या पिढ्यांची थेरं मौज. Proud

हे फार कॉमन असल्याचं पाहिलेलं नाही>> थोडक्यात बदल हे होतच असतात. परंपरा, संस्कृती हे डबकं नाही.
चार दिवस यमक्यांचे, चार दिवस ठुमक्यांचे.
लग्नात एकत्र जमुन जोवर मजा येते आहे तोवर ठीक चालू आहे. मग राबण्यातील मजा असेल, गप्पांतली असेल, वधूला उचलण्याची असेल, चप्पल चोरीची असेल नाही तर शेवटच्या पंगतीत वधूची आई ते काय गाणं म्हणते (काय नाव त्याचं? पाठवणी?) त्याची असेल. आनंदाच्या सोहोळ्याला आमच्या काळी सूर function at() { [native code] }यंत बेसूर वाटतो.

>> आपण 'अमुक आणि तमुक यांचा शरीरसंबंध करण्याचे योजिले आहे' असं लिहिलेल्या आमंत्रणपत्रिकाही पाहिलेल्या नाहीत. ही सगळी आपल्या आधीच्या पिढ्यांची थेरं मौज. >> सिरियसली?

>>> विडा की लवंग??
मी विड्याबद्दल ऐकून होते. लवंग साउन्ड्स ईव्हन स्पायसीयर! Lol

Pages