लहानपणीचे नसते उद्योग

Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28

'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालच्या काही आचरट उद्योगांमध्ये माझी मक्तेदारी होती :

बकुळीच्या फुलाचा एवढ्या जोरात वास घेणे की ते फूल थेट नाकपुडीत आत खोलवर रुतून बसणे, कानात घातलेला कापसाचा बोळा कानाच्या आत खुपसणे - दोन्ही प्रसंगांत डॉक्टरकडे खेप अपरिहार्य! ह्या स्टाईलचे उद्योग मला विनासायास जमायचे!

गॅलरीच्या नक्षीदार जाळीच्या कठड्यातून डोके बाहेर काढणे आणि डोके त्या जाळीत अडकून बसणे.... हे पुरे पडले नाही म्हणून की काय, दुसर्‍या खेपेस आपल्या भावंडास किंवा मित्रास आव्हान देणे व दोघांनीही त्याच भोकातून डोकी बाहेर काढणे आणि नंतर डोकी अडकल्यावर भोक्काड पसरणे.... त्यानंतर साधारण अर्धा-पाऊण तास शर्थीचे प्रयत्न, कसरती, अंगचोरीने सुटका व नंतर धपाटे.... हा देखील आवडता उद्योग होता!!!

भिंतींवरचे रंगांचे पोपडे उडाले असतील तर प्रामाणिकपणे ते पोपडे अजून कुरतडणे, जेणेकरून रंग लवकरात लवकर देता येईल. आणि हे प्रताप फक्त आपल्याच घरी नव्हे तर समाजसेवेच्या भावनेतून इतरांच्या घरीही करणे! एवढेच नव्हे, तर कोणाच्या कोपराला, ढोपराला, पाठीला असे भिंतीचे पोपडे चिकटले असतील तर भूतदयेने तेही कुरतडायला जाणे व बदल्यात चापटी खाणे असे अनंत उद्योग केले!!

एकदा एका एकदम जवळच्या मित्राच्या घरी गेलेलो.
त्याचे भाचा आणी भाची(२ आणी ३ वर्षांचे) खेळत होते.. मी पण त्यांच्या बरोबर खेळलो बराच वेळ..

नंतर परत जायला निघालो.. तेंव्हा त्या दोघांनी पण अडवले.. आणी एकदम म्हणाले..
"मामा पैसे"... मला काहीच कळेना..
नंतर भाची म्हणाली "आमच्याकडे पाहुने येऊन गेले की पैसे देतात ... "
माझी जाम गोची झाली.. पाकीटात ५०रु. ची एकच नोट ... ती दिली तिला.. तर दुसरा(भाचा) लागला भोकाड पसरायला.. मी म्हणालो.. माझ्याकडे येवढेच आहेत.. तर भाची ला बंधु प्रेम जाग्रुत झाले...
तीने ५० रु. ची नोट फाडली .. माझ्यासमोर Sad
आणी त्याला अर्धी दिली आणी स्वता:ला अर्धी ठेवली
पण ती नोट मिळाल्या वर त्या दोघांना जो आनंद झालेला(आणी ती फाटकी नोट घेऊन म्हणत होते "आता आम्ही पालले जी खाणाल" Happy ) तो ५० रु. पेक्षा कितीतरी पटीने जास्त मौलाचा होता Happy

अर्थात हे सगळी कहाणी त्याच्या आईला कळाली मग त्यांना मस्त प्रसाद मिळाला ..

मला ३-४ वर्शान्ची असताना आइ बाबा ऐतिहासिक नाटकाला घेउन गेले होते. त्यात शिवाजी महाराजान्ची एन्ट्रि झालि रे झाली कि आइच्या मान्डीवरुन लगबगीने खाली उतरुन मी जोरजोरात "शिवाजी महाराज की जय" म्हणुन ओरडायचे.
पहिल्या पहिल्यान्दी प्रेक्शकाकडुन कौतुक.
पण दर एन्ट्रीलाच असा जयघोश व्ह्यायला लागल्यावर त्यान्ना नाटक सोडुन घरी यावे लागले.

मी पाचवीत असेन बहुदा ही कथा झाली तेव्हा. मम्मी आणि तिची मैत्रिण मला आणि तिच्या मुलिला आमच्या घरी ठेवुन कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. अगदी २०-२५ मिनीटाचेच काम होते तर आमची वरात नको असे करुन गेल्या होत्या. आम्हाला जायचे होते बरोबर पण नेले नाही म्हणुन आम्ही त्या दोघिंची मज्जा करायचे ठरवले. आमच्या घराला खोल्या दोन पण मागे पुढे दरवाजे होते. पुढच्या दरवाजाला बाहेरुन कुलुप घातले मागच्या दाराने आत आलो आणि दार लावुन कॉटखाली जाउन बसलो. खिडकीचा पडदा वगैरे बंद केलेला, मागच्या खोलीच्या खिडक्या बंद असा सगळा जामानिमा केला.
त्या दोघी आल्या की २०-२५ मिनीटात त्यांचे काम झाल्यावर. आणि बाहेर कुलुप बघुन दोघींचे बोलणे सुरु झाले. कुठे गेल्या असतील, अशा कशा गेल्या टाईप. आम्ही आतमधे बसुन अवाज दाबुन खुदुखुदु हसतोय. ५-७ मिनिटे गेली. मम्मीने मागचे दार उघडायचा प्रयत्न केला पण अर्थात उघडला नाही. मग समोरच्या काकवांना विचारले कुठे दिसल्या का? तर नाही. शेजारी इकडे तिकडे शोधले. त्या मैत्रिणीच्या घरी गेल्यात का ते पाहुन आल्या. मग त्यांचे धाबे दणाणले. मम्मीचा आवाज रडवेला यायला लागल्यावर आम्ही हळुच दरवाजा उघडून बाहेर आलो. मम्मीला सांगितले कशी मज्जा केली म्हणुन. आणि जो काही ओरडा खाल्लाय - न भुतो न भविष्यती. आयुष्यात असले उद्योग मम्मीसोबत अज्जीबात केले नाहीत.

मी तिसरीत आणि माझा भाऊ सहावीत होता. लहानपणी रामायण बघताना आम्ही बेट लावायचो की कोणाचा बाण पडेल आणि कोणाचा जिंकेल. हळूहळू आपण पण बाण्-युद्ध खेळावे असं वाटायला लागलं. मग आम्ही कुंच्याच्या काड्यांना पुढे टाचणी लावून बाण तयार केले आणि रबरबँड हे धनुष्य. हे असे प्राणघातक बाण आम्ही एकमेकांच्या अंगावर सोडायचो.
आईनी पाहिल्यावर ती इतकी ओरडली की डोळ्याला वगैरे ईजा झाली तर काय होईल माहिती आहे का, पुन्हा हा खेळ खेळताना दिसलात तर खबरदार अशी सक्त ताकिद दिली. पण ऐकतो ते आम्ही कसले Happy
आम्ही बाणाच्या पुढच्या फक्त टाचण्या (आईचा मान राखायला) काढल्या. आणि अंगणात मागच्या बाजुला आईला दिसणार नाही असं आमचं बाणयुद्ध चालू ठेवलं.
पण त्या दिवशी नेमका भावानी मारलेला बाण मला डोळ्याला लागला. टाचणी नव्हती म्हणुन डोळा वाचला, पण ईजा मात्र झाली. नेमकी वार्षिक परीक्षा पण जवळ आली होती. मला तर लागलं होतं, पण माझ्या भावाची घरी आई-बाबांनी आणि शाळेत बाईंनी मस्त पूजा बांधली Happy
एक मात्र चांगलं झालं, तसाच दुखर्‍या डोळ्यानी, डोळयात ड्रॉप घालत, बर्फानी शेकत अभ्यास केला आणि तरी चांगले मार्क मिळाले म्हणुन एक मस्त बाहुली मिळाली रिझल्ट नंतर Happy आणि हो, असे खेळ न खेळण्याचा धडा पण मिळाला Happy
ता. क. : डोळा वोक्के आहे आणि हा माझा भाऊ माबोकर आहे, तो वाचतच असेल हे सगळं Happy काय रे सांगु का तुझं नाव Proud

माझ्या एका माझ्याहून वयाने लहान असणार्‍या चुलतभावाच्या गट्टाण्या गट्टाण्या डोळ्यांविषयी मला फार कुतूहल वाटे. एरवी मी सरळ त्याच्या डोळ्यात बोट घालायचे! (माझे वय अंदाजे पाच वर्षे व त्याचे तीन वर्षे) पण आईने त्याच्या डोळ्यात बोट घालायचे नाही अशी सक्त ताकीद दिलेली!!!
मग एक दिवस अस्मादिकांनी उपद्व्याप केला. त्याच्या डोळ्यात खराट्याची काडी घातली आणि त्याच्या डोळ्याची हालचाल कुतुहलाने पाहत बसले! त्याने जो काही टाळा वासला, रडून रडून सारे घरदार असे काही डोक्यावर घेतले की बास!
मला चांगले दोन - तीन दणके व कोपर्‍यात भिंतीकडे तोंड करून बसायची शिक्षा मिळाली. पण मला शेवटपर्यंत कळले नाही की आईने सांगितल्याप्रमाणे मी त्याच्या डोळ्यात बोट न घालता खराट्याची काडी घातली तरी मला शिक्षा का मिळाली? Proud

majya shejari 2 dada rahtat. lahanpani khup masti karayche manun kakunni tyanna kitchenmadhye kondla ani dar ughdat navtya tar tya doghanni sakhar ani meeth mix karun takla.

माझ्या लहानपणचे भरपूर किस्से आहेत ते परत कधीतरी. हा माझ्या आजोबांच्या लहानपणचा किस्सा सांगते.
आजोबा लहान असताना एकदा कुठूनतरी रेल्वेने घरी यायला निघाले होते. स्टेशनवर सोडायला त्यांचा मामेभाऊ आला होता. गाडी सुटायला अगदी कमी वेळ उरलेला होता. अशावेळी माझ्या आजोबांनी ( वय वर्ष चार-पाच ) डब्याच्या खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि त्यांना ते अलगद परत आतही घेता आलं. एवढ्यावर शांत बसायचं ना ! ते नाही ते नाही. त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या मामेभावाला दमात घेतले की माझं डोकं गेलं तर तुझं कसं नाही. तू ही घालून दाखव. त्याने डब्याच्या बाहेरुन डोके आत घातले आणि ते अडकून बसले. मग अगदी सिनेमात दाखवतात तशी गाडी सुटू नये म्हणून मोठ्यांची धावपळ झाली. शेवटी निघाले ते डोके कसेबसे !
आजोबा आता एक्याण्णव वर्षांचे आहेत Proud

>>>
कोणाच्या कोपराला, ढोपराला, पाठीला असे भिंतीचे पोपडे चिकटले असतील तर भूतदयेने तेही कुरतडायला जाणे
<<
Rofl

अजून काही उद्योगः

१) आजी (बाबांची आई) च्या नऊवारी लुगड्याच्या काष्ट्याला कपड्यांचे चिमटे लावणे
२) तळ मजल्यावरच्या घराची कडी वाजवून पळून जाणे
३) "आंबेवाला" असे ओरडत जाणार्‍या भैयाला जोरात हाक मारून अंदाधुंदपणे कुठच्याही माळ्यावर ये म्हणून सांगणे (त्या माळ्यावर जाऊन तो बिचारा कुणी बोलावले म्हणून शोधत बसे Wink )
४) आईचे लांबसडक केस विंचरणे आणि हवी ती हेअर-इष्टाईल try करणे
५) दीवाळी मध्ये फटाके उडवून झाल्यावर उरलेला plastic चा कचरा जाळणे आणि शेंबूड शेंबूड म्हणून जोरात ओरडणे (plastic वितळलं की त्याचं शेंबडात रुपांतर होतं असं अगाध ज्ञान आम्हांला कुणीतरी दिलं होतं) Lol
६) building च्या आवारात मेलेले उंदीर किंवा मांजर वगैरे दिसल्यास त्याला मातीत खड्डा वगैरे खणून , त्याच्या प्रेतावर रुमाल वगैरे टाकून त्याला यथासांग पुरणे (या साठी एकदा मी बाबांचा चांगला नवा कोरा रुमाल आईकडून मागून आणला होता. अर्थातच आईला माहीत नव्ह्ते की मी त्या रुमालाचा उपयोग काय करणार आहे ते Wink )
७) flat च्या दारांना असलेल्या letterbox च्या फटींमधून वाट्टेल ते लिहिलेली पत्रे आत ढकलून देणे
८) रिक्षा किंवा ट्रक च्या नंबर plate वर MCT पासून start होणारा नंबर असेल तर त्याला हात लावल्यास २ तास चांगले जातात असे कुणीतरी सांगितल्यामुळे तशा नंबरच्या रिक्षा आणि ट्रक शोधत फिरणे
९) नवीन नावीन अनोळखी गल्ली बोळात शिरून ते रस्ते eventually कुठे पोचतात ते शोधून काढणे
१० ) संपलेल्या पेनांच्या रिफिलींच्या टोकावर दगड किंवा फरशीच्या तुकड्याचे घाव घालून ball bearings वेगळे करणे आणि छोट्याशा डबीत ते ball bearings जमा करणे
११) सोमण म्हणून एक सर शाळेत संस्कृत आणि मराठी शिकवीत. त्यांना जांभया भारी येत असत. त्यांनी प्रत्येक तासाला किती जांभया दिल्या ते तास चालू असताना मोजणे आणि तास संपला रे संपला की तो आकडा जोरजोरात ओरडत सुटणे
१२) off period ला वर्गात सर आणि मुले काय काय करत आहेत याचे निरिक्षण नोंदवणे

अजूनही बरंच आहे........आठवेल तसं सांगीन........... बादवे, मोदक आणि मी एकाच वर्गात होतो...त्यामुळे त्यालाही अजून काही गंमती आठवत असतील तर पोस्टायला सांगते.........
सोमण सरांच्या lecture ला आम्ही दोघेही एकेमेकांकडे बघून आंख मटक्का करत असू Blush

आमचा एक मित्र आहे.... त्याला आम्ही एका ठराविक दुकानात जाऊन त्या दुकानदार आजोबांना असे विचार असे सांगायचो..... की " आजोबा... उपासाची अंडी आहेत का ? " ... हेहेहेहे Happy

आणि मग ते आजोबा त्याला मारयला धावायचे..... Wink

कॉलेजला जायच्या यायच्या वाटेवर, एका एस्टी थांब्यावर एक दुकान होते. तिथे एक माणूस दिवसभर विड्या वळत बसलेला असायचा... त्याला का कोण जाणे, 'बटर' म्हटल्यास राग येत असे आणि मग तो, त्याची बायको, आणि मुलं सगळे मिळून शिव्या देत सुटत आणि सगळी एस्टी हसत सुटे...दर १०/१२ मिनिटानी कॉलेजकडे जाणारी येणारी मुलं घेऊन एस्ट्या येत. एस्टीने डबलबेल दिली, की जोरात 'बटर' म्हणून ओरडणे हा पोरांचा आवडता उद्योग.. आमच्या आधीच्या मुलांनी केला, आम्ही केला, आणि नंतरच्यानी पण केला..

आता आठवलं तर वाईट वाटतं.
(त्याने शिव्या देणे बंद केलं असतं तर हा त्रास पुढच्या दोन/तीन दिवसात थांबला असता..पण.... )

परदेसाई, कै च्या कै.........:-)

आमच्या घराजवळ एक ''पम्मू हलवाया''चे दुकान होते. त्याचा अगदी तिशीतला मालक दुकानाच्या नावाप्रमाणेच अजस्त्र, अगडबंब आकाराचा ढेरपोट्या होता. तो चालायला लागला तरी जमीन हादरत असे. मला त्याच्या दुकानापाशी उभे राहून त्याच्या मंदावलेल्या हालचाली निरखण्यास फार मजा यायची. त्याच्या अगोदर त्याचे पोट कसे हालते, काऊंटरला त्याचे पोट कसे आधार देते, त्याची हनुवटी कशी छातीत रुतली आहे इ. इ. मग त्याला किती मोठ्या साईझचे कपडे लागत असतील, तो दुकानातील शिडीवर चढला तर शिडी कशी मोडत असेल ह्याविषयी आम्हा भावंडांत खल चालायचा. त्याच्यावर मी एक कविताही केली होती. आणि एका चिठ्ठीवर ती कविता लिहून त्याच्या दुकानासमोर उभे राहून मोठमोठ्याने म्हटलीही होती!! बिच्चारा पम्मू!!!!
पुढे ते दुकान बंद झाले व मालकही खपला असे ऐकले.

आयला वेन्धळेपणाच्या बाफ पेक्षा हा झकास दिसतोयः) सगळे किस्से अफलातून.
नानबा, तुमसे ये उम्मीद नही थी Happy पण खरच वाचताना सॉलिड धमाल आली.

आमच्या गावाकडे आजही हाटाला जाण्याची मोठी हौस असते.
मी ७-८ वर्षाचा असेन तेंव्हाची गोष्ट आहे. मला पेरमिलीच्या हाटाला जायच होते. पण आई परवानगी देत नव्हती. मग आईला न सांगताच निघुन गेलो. परत आल्यावर धपाट खावे लागणार हे पक्क होतं.

रात्री ८-९ च्या सुमारास चोर पावलानी आंगणात येऊन चुपचाप बसुन आईला कशी हाक मारावी म्हणुन विचार करत होतो. दिवसभर काहीच न खाल्यामुळे खुप भुक तर लागलीच होतीच वरुन तहान पण लागली होती. आमच्या गावात बाहेरुन आल्यावर पाय धुण्यासाठी आंगणात पाण्याची बादली भरुन ठेवलेली असते. म्हटलं आईकडुन धपाटे चुकविण्यासाठी त्या बादलीतील पाणि पिऊ आणी आंगणातील मांडवावर जाऊन झोपु म्हणून त्या बादलीतील पाणि घटाघटा पिऊन घेतलं. दोन मिनटात पोटात मळमळ होऊन उल्टया होऊ लागल्या. आई घरातुन धावत बाहेर आली. मला मारण्यासाठी तीने काठी तयार ठेवली होती पण उलटी करतोय बघुन तीने काळजीने घरात घेतलं व खायलाही दिलं.
नंतर कळंल कि त्या बादलीत कपडे धुतलेलं साबणाचं पाणी होतं. मोठ्या ताईनी चुकुन तिथे ठेवलं होतं.

मला लहानपणी प्रश्न पडायचा कि घराला आग लागतेच कशी. आणी सुरुवात कशी काय असते ते बघण्याची खुप ईच्छा होती. मग एके दिवशी मी स्वत:च हा प्रयोग कराचं ठरवलं. मग कुठल्या घराला आग लावायची याची शोधाशोध चालु झाली. आपल्या मोहल्यातील घराला आग लावायची नाही. पकडल्या जाण्याची शक्यता जास्त असते हे ही तितक्या लहान वयात कळायचं. मग दुस-या मोहल्यातील पादगुडा (डुक्कराना साठविण्यासाठी बांधलेला गोठा/घर म्हणा) निवड केली. एका दिवशी मे महिन्याच्या भर दुपारी लोकांची नजर चुकवुन त्या पादगुड्याला आग लावुन मामांकडे जाउन बसलो. १० मिनटात पाडगुडा जळाल्याची खबर गावभर पसरली. मी काहीच माहीत नसल्यासारखं जळतं पादगुडा बघायला गेलो. दुस-या दिवशी माझ्याच एका मित्रावर आरोप ठेवण्यात आले, आणी सगळ्या गावक-यानी मिळून नविन घर बांधुन दिले. मला मात्र मित्रावर आरोप झाल्याचं फार वाईट वाटत होतं.

भन्नाट किस्से आहेत सगळे Biggrin

लहानपणी आम्ही सगळे मूव्ही बघायला गेलो होतो. बहिण असेल ४-५ वर्षांची. बाहेर जायचे म्हणून सारखी रडत होती. आईने समजवायचा प्रयत्न केला. बघ किती छान दाखवत आहेत तिथे म्हणत स्क्रीन दाखवली. नतद्रष्ट हीरो हीरवीण नेमके मिठी मारत होते. बहिण मोठ्याने ओरडली "सार्खे तर गळ्याला पडत आहेत, मला नाही पहायचे". आई बिचारी कावरी बावरी झाली. तत्काळ बाहेर नेवुन पॉपकॉर्न खिलवले तिला.

Pages