स्त्रियांच्या लग्नाचे वय १८ असावे की २१? कायदा येण्या पुर्वी चर्चा

Submitted by अश्विनीमामी on 20 December, 2021 - 05:37

सरकार मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठरा वरून एकवीस वर नेण्यासाठी कायदा आणायच्या विचारात आहे.

ह्यामुळे बालविवाहांचे प्रमाण कमी होईल. मुलींच्या आरोग्या कडे जास्त लक्ष राहील तरूण वयात बाळंतपणे अंगावर पडणार् नाहीत. त्यांना शिक्ष ण पूर्ण कर ता येइल व रोजगाराच्या सन्माननीय संधी शोधून आर्थिक स्वा तंत्र्याकडे वा टचाल करणे सोपे जाईल. अशी विचार धारा आहे.

अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.

आपणास काय वाट्ते.?

https://indianexpress.com/article/explained/raising-legal-age-for-marria...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ वर्षे लिव इन नंतर लग्न असा तोडगा निघू शकतो.
एक शंका आहे. २१ वय झाले आणि लग्न केले नाही तर पोलीस पकडून नेणार का?

मुलींचे लग्नासाठी अधिकृत वय अठराच असावे.
तसेही बर्‍याच मुलींची लग्ने वयाच्या १५-१६ मधेही होत आहेत.ही गावाकडील गोष्ट नाही तर शहरातील आहे.
जे लोक शिक्षणाचे महत्व जाणतात, त्यांच्यासाठी कशाला कायदा ?

अनुसूचित जाती जमाती, आदिवासी ह्यांचे ह्या कायद्याचा वापर करून शोषण होईल. असाही एक विचार प्रवाह आहे.
>>>>
नेमके कसे शोषण होईल?

'व्यावहारिकदृष्ट्या' मुलींचे लग्नाचे वय अठराच योग्य आहे. २१ वर्ष वय करण्यामागे हेतू चांगला असला तरी जमिनीवरचे वास्तव बरेच कटु आहे. शहरी आणि ग्रामीण भागात सगळे नाही तरी बरेच गरीब पालक मुली वयात आल्यावर लवकर कटवण्याच्या चिंतेत असतात. यामागे बरेच सोशिओ-इकॉनॉमिक अँगल आहेत जे इथे मी रोखठोक मांडू नाही शकत. ज्यांनी हा निर्णय घेतला त्या लोकांना जमिनीवरचे वास्तव एकतर माहित नसावे किंवा ते ## आहेत. ही मंडळी एकतर मुलगी १५/१६ वयाची झाल्यावरच लग्न उरकून द्यायला घाईवर असतात पण तरी बरेच जण १८ पर्यंत दम धरतात. आता अजून तीन वर्षांनी वय वाढवल्यावर ते १८ पर्यन्तपण धीर धरतील का ही शन्का आहे. भारतातील गरीब कुटुंबांची संख्या लक्षात घेता या निर्णयाने असे किती असंख्य पालक चिंतेत आले असतील आणि बरेच जण बिचाऱ्या मुलींवर ते फ्रस्ट्रेशन काढत असतील देव जाणो.

यामागे बरेच सोशिओ-इकॉनॉमिक अँगल आहेत जे इथे मी रोखठोक मांडू नाही शकत. >> लिहा की मी जज नाही करत.
करोना काळात पण बरेच बालविवाह उरकून घेतले आहेत लोकांनी.

मला वाट्टॅ ह्या मुळे मुलींना कॉलेज बेसिक शिक्षण पूर्ण करणे काही एक नोकरी पकडणे इतके जमले तरी खूप आहे की. फोकस लग्न करवून घरातून काढोन टाकण्या ऐवजी शिक्षण पूर्ण करून नोक्री उद्यो ग सुरू करणॅ ह्यावर असावा. इतके झाले तरी खूप आहे. मुलींना पण फार लवकर लग्न नको असते.

ग्रामीण गरीब पालकांना तरण्याताठया मुली फार काळ सांभाळणे धोक्याचे वाटते. ते खर्चिकसुद्धा पडते. ( पण हा मुख्य मुद्दा नाही.) मुलींचेही लक्ष इथे तिथे वळणे ही मोठीच बेअब्रू असते. ग्रामीण भागात अर्धशिक्षित मुलींसाठी फारशा नोकऱ्या नसतात. त्यामुळे मुलीकडून पालकांना आर्थिक मदत होईल असेही नसते.
मुंबई सारख्या शहरात मराठी आर्थिक निम्न वर्गात आता अशी परिस्थिती नाही. पण मराठीतर समाजांत अशी जागृती अद्याप झालेली नाही. त्यामुळे त्यांच्यात मुलीचे लग्न लवकरात लवकर करून द्यावे अशीच मानसिकता असते.

मुलीचे वय २१ असावे पण त्यासोबत मुलीच्या कुटुंबाला अनेक पातळींवर आधार हवा. नुसता कायद्याचा बडगा असेल तर त्यातून पुन्हा वेगळे शोषण-भ्रष्टाचार होणार. आईवडीलांना मुलगी आर्थिक ओझे वाटतेच, पण त्याहीपेक्षा वयात आलेल्या मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक भेडसावतो. केवळ मुलीचे वय २१ करुन प्रश्न सुटणार नाही तर एकंदरीतच समाज - यात सो कॉल्ड उचभ्रू समाजही आला- मुलाला कसे वाढवतो , मुलीकडे / स्त्री कडे कशाप्रकारे बघायला शिकवतो त्याकडेही प्रामाणिकपणे लक्ष देणे गरज आहे. तिथे प्रचंड सुधारणा गरजेची आहे.
वयात आलेल्या मुलीचे शोषण होवू नये म्हणून तिच्यासाठी सुरक्षित वातावरण हवे, मुलीच्या कुटुंबाचे समुपदेशन व्हायला हवे आणि मुलगी आपणहून फसून पिडीता होवू नये म्हणून तिलाही वेळोवेळी समुपदेशन हवे. अर्थार्जनाच्या दृष्टीने गृहउद्योग-व्यवसाय किंवा नोकरीसाठी पुरक असे शिक्षण मिळण्याची अप्रेंटिस ( शिकावू कामगार) अशी काही तरी सोय हवी. शिकताना अर्थार्जन आणि जोडीला पुढे स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची संधी असे असेल , सुरक्षित चांगल्या आयुष्याची आशा असेल तर पालक मुलीचे लग्न घाईने उरकणार नाहीत.

वेळेत लग्न करून मार्गी लागणे वेगळे अन नोकरी धंदा लागून मार्गी लागणे वेगळे. हे दोन्ही मार्ग वेगळे आहेत असे वरवर वाटत असलं तरी शेवटी दोघांचं डेस्टिनेशन सेमच आहे. पण खालील मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे.
१. पहिला मार्ग चोखाळणार्‍यांना वेळेत लग्न करून पुर्ण करणार्‍यांना नंतर नोकरी-धंदा लागू शकतो तसेच दुसरा मार्ग स्वीकारून निकरी-धंदा लागल्यावर लग्न होऊ शकतेच.
२. पहिला मार्ग चोखाळणार्‍यांना नंतर नोकरी-धंदा लागू शकत नाही ही एक शक्यता जशी असते तशीच दुसरा मार्ग चोखाळणार्‍यांना चांगली नोकरी-धंदा असुनही लग्न ठरू न शकण्याचीही शक्यता असते.
३. नोकरी-धंदाला लागण्याआधीच अल्पवयीन मुलीचं लग्नं होऊन पोरंबाळं होताना मातेचा मृत्यु होण्याचं प्रमाण आताशा नगण्य दिसतं (कदाचित अल्पवयीन मुलांची लग्नं आर होत नसावीत तसेच वैद्यकीय सेवा चांगल्या प्रमाणात मिळत असाव्यात) परंतू अल्पवयीन बापाचा मृत्यु झालेलं फार काही समोर येत नाही.. कदाचित अल्पवयीन बाप मृत्यु होत नसावेत.
४. नोकरी-धंद्याला लागून भरताचं वांगं होण्याच्या वयापर्यंत थांबलेल्या मुला-मुलींचे लग्न जुळवताना आई-बापांची ससेहोलपट होताना मात्र सर्वत्र दिसते. तसेच भरताचं निबराट वांगं झालेल्या मुला-मुलींची जरी लग्नं झालीच तरी वाढत्या वयोमानानुसार गर्भारपणात बाळ अन बाळंतिणीचा मृत्यु होण्याचे प्रमाण देखील विचारात घेण्याजोगे आहे.. अन ह्या टेंशनमुळे बापाचाही हृदयविकारामुळे मृत्यु होण्याचा धोका जास्त असावा असे वाटते.
५. कोवळ्या वयात नोकरी-धंद्याला लागण्या आधीच लग्न झालेल्या मुला-मुलींचे वैवाहिक जीवन अन त्यांना होणारी संतती यासाठी कुठल्या बाह्य वैद्यकीय खर्चाची गरज पडत नसावी याउलट नोकरी-धंद्याला लागून जुनाट-निबराट भरताचं वांगं बनलेल्या स्त्री-पुरुषांना मात्र लग्नानंतरच्या वैवाहिक जीवन क्रियेपासुन ते स्पर्म काऊंट इन्क्रिमेंट थेरपी, फॅलोपियन ट्युब वाईडनिंग, टेस्ट ट्युब बेबी, सिझेरियन पर्यंत सर्वत्र कमावलेल्या पैशांचा डंपर ओतावा लागतो.
६. नोकरी धंद्याला न लागता कोवळ्या वयात लग्नं करून आई बाप बनलेल्या मुला-मुलींना भलेही नंतर चांगला जम बसवता येऊन भरभराट झालेली पहायला मिळू शकते तसेच नोकरी-धंद्यासाठी तरुणपणावर पाणी सोडून उतारवयात लग्नं झालेल्यांनाही मुलं-बाळं होऊन आनंदी आनंद झालेला बघायला मिळातो.
७. वरील सर्व मुद्दे आपापल्या ठिकाणी, आपल्या आजुबाजुला घडलेल्या घटनांचा विचार करून बघितल्यावर खालील मुद्दा वाचावा.
८. नोकरी धंद्याला न लागता वेळेत पोरंबाळं झालेली मुलंमुली २०-२२ वर्षांनंतर कधीतरी त्यांच्या मुला-मुलींची लग्नपत्रिका, नोकरीचे पेढे, उद्योगाचे आमंत्रण द्यायला जेव्हा आधी नोकरी-धंद्याचं बघून जुनाट-निबराट वांग्याचं भरीत झालेल्या मुला-मुलींच्या घरी जात असतील तेव्हा ते लोक्स कदाचित त्यांच्या घरी नवसायास्/उपास-तपास्/गंडे-दोरे/डॉ़क्टरी उपाय करून झालेल्या अन आता चौथी-पाचवीत असणार्‍या मुलांचा आभ्यास घेताना दिसत असावेत.
९. आता वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर असं लक्षात येते की सरकारला निरोगी अन सुदृढ समाज निर्माण करायचा आहे की फक्त कर देणारा यंत्रवत समाज हवा आहे? या प्रश्नाचं उत्तर ज्याच्या त्याच्या घरची परिस्थिती, सामाजिक स्थिती, सांपत्तिक स्थिती अन वैचारिक शक्ती यावर अवलंबुन आहे.

मुलीचं लग्न २१ वर्षं करावं की नको यावर वर सांगितलेल्या मुद्द्यांचा विचार केला असता हे लक्षात येईल की समजा एखाद्या एसटी स्थानकात गेल्यावर आपणाला ज्या इच्छित स्थळी जायचं आहे त्या गावच्या फलाटावर उभ्या असलेल्या सर्वसाधारण एस.टी.त बसून प्रत्येक थांब्यावर थांबत प्रवासास सुरुवात करून इच्छितस्थळी निघालेले पॅसेंजर अन तासभर लाईनित थांबून अधेमधे न थांबणार्‍य शिवनेरी व्हॉल्वोत बसून प्रवास करणारे पॅसेंजर यांत जेवढा फरक आहे तेवढाच या प्रकरणात आहे असं मला वाटतं. आणि हो, इच्छित स्थळी जाण्यासाठी विनावाहक थेट परंतू साध्या बस, निम-आराम बस, शिवशाही बस या सेवा उपलब्ध आहेत याचीही प्रवाशांनी नोंद घ्यावी Wink

मी वाचलेली काही मतं, निरीक्षणं -
कुपोषणामुळे न शारीरिक दृष्ट्या कमकुवत माता हा प्रश्न वय वाढल्याने सुटणार नाही.

नियम पाळला न जाण्याचं प्रमाण लक्षणीय असेल. या मुलींना पुढे बाळंतपणासाठी मिळणाऱ्या सरकारी सोयी मिळणं कठीण होईल किंवा त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागेल.

अस्थिर वातावरणात लवकर लग्न लावून देण्याकडे कल असतो का?
लॉकडाउनमध्ये १८ खालील मुलींच्या लग्नाचं प्रमाण वाढलं होतं.

निसर्गाच्या दृष्टीने 18 व्या वर्षी पुनरुत्पादन करण्यास योग्य झालेले असतात

25 पूर्वी स्थैर्य नाही
आणि 30 नंतर पोर झालं तर मेडिकल प्रॉब्लेम
शिवाय उशिरा जन्मलेले मूल उशिरा स्वयंपूर्ण होणार, म्हणजे तोवर मागच्याने नोकरी करतच बसायचे

जे आहे ते बरे होते असे वाटते, ज्यांना पुढचे शिक्षण नको , ते तरी मार्गी लागले असते

लग्न म्हणजे शरीरसंबंधांना कायदेशीर व सामाजिक मान्यता. जबाबदार नागरिक या नात्याने मतदानाचे वय 18 पण लग्नासाठी मात्र 21 पर्यंत तिष्ठत बसावे हे काहीतरी विचित्र वाटते. केवळ 21 वयामुळे कायदेशीर लग्न करु नोंद्वू शकत नसल्याने सो कॉल्ड लग्नाचे आमिष चे रुपांतर जे पुर्वी लग्नात होउ शकत असत आता ते वय पुढे ढकलल्याने अशा प्रकरणांना अन्य फाटे फुटून त्याच्या नोंदी बलात्कार म्हणून होउ शकतील. लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार हेच तांत्रिक दृष्ट्या चुकीचे आहे हे जरी खरे असले तरीही बलात्कार हा शब्द इतक सैल केला आहे की त्यात अनेक प्रकरणे गोवता येतात अस मला म्हणायच आहे.माध्यमांनी बलात्कार शब्द वापरताना सजग असायला हवं. त्यावेळी बलात्कार न वाटलेली बाब ही नातेसंबंध फिसकटल्या मुळे वा अन्य वर्चस्ववादी खेळीमुळे नंतर बलात्कार म्हणून पुर्वलक्षी प्रभावात नोंदवता येतात. समांतर उदाहरण म्हणून मी टू पहा ना! त्यामुळे अशा गोष्टींचाही विचार इथे केला पाहिजे

अवांतर- आमचे आजोबा म्हणत इंदिरा गांधी ने स्वत उशिरा लग्न केले म्हणून मुलीचे लग्नाचे वय 18वर्षे केले.( मुलीचे 18वर्ष आणि मुलाचे 21 वर्ष लग्नाचे वय 1978साली इंदिरा गांधी पं प्र असताना झाले होते.त्याला माझे आजोबा विरोध करीत. त्यांचा बालविवाह झाला होता 1947साली)

कृपया राजकारण आणू नका इथे.

1978नंतर मुलींची शिक्षण प्रगती पाहावी( त्यापूर्वी मुलीचे 14वर्ष आणि मुलाचे 18वर्ष लग्नाचे वय होते)

इंदिराजीना विरोध झाला होता पण त्या निर्णयाचा दूरदर्शीपणा त्यावेळी कळाला नाही. आज आपली पिढी त्याचे फायदे उपभोगते आहे.

21वर्ष वयाचा निर्णय आपल्या पिढीतील काही लोकांना चुकीचा वाटू शकतो पण अजून 30/40वर्षानी येणारी पिढीला काय फायदा होईल हे महत्त्वाचे.

मोदींच्या राजवटीत महिलांचे अतोनात सबलीकरण झाले आहे. शिक्षण, नोकर्‍या यांत महिलांने प्रमाण ७० वर्षांत झाले नसेल एवढे वाढले आहे त्यामुळे या सरकारने स्त्रियांच्या वयाची अट ३५ केली तरी चालेल म्हणजे आम्ही पण आमच्या नातवांना मोदी सरकारचे कोडकौतुक सांगू.. (अर्थात शिव्या घालून एकेरी नाही बोलणार..!! Wink )

पण अजून 30/40वर्षानी येणारी पिढीला काय फायदा होईल हे महत्त्वाचे.>>> शक्य आहे कारण तोपर्यंत विवाह्पुर्व शरीर संबंधाला सामाजिक मान्यता आताच्या तुलनेने वाढलेली असेल. त्याच बरोबर विवाह संस्थेचा डोलारा कोसळण्यास आताच सुरवात झाली आहे हा मुद्दाही विचारात येईल.

तसेही अमेरिकेत दोन चार लग्नं करून ८-१० नातवंडे झाल्यावर जमलं तर लग्न करण्याची प्रथा बर्‍याच वर्षांपासून आहे.. इथेही तसेच होईल. व्हायलाच हवे. प्रगतिशिवाय तरणोपाय नाहीच. विवाहसंस्था जवळ जवळ उतरणीला लागली आहे हे खरेच आहे. कॉलेजगोईंग मुलं मुली देखील लग्नापेक्षा लिव इन सोप्पं अन सुटसुटीत आहे यावर चर्चा करताना दिसतात. शिक्षण-नोकरी निमित्त आई-वडिलांचं रहाण्याचं ठिकाण सोडून दूर शहरात किंवा परदेशात रहाणारे कित्येक जण-जणी तर लिव इन मधे राहुन एकमेकांचे पटत असेल तर लग्न करतात किंवा लग्नासाठी योग्य जोडीदार शोधतात हे आजही समाजात दिसतं आहे.

तत्वज्ञानात रिऍलिस्ट(ऐरिस्टोटेलियन) आणि आयडीलीस्ट( प्लेटॉनिस्ट) अशी दोन मते आहेत. ते इथेपण १८ vs २१ला लागू पडते.

स्त्रियांची वये 35 केली तर पोरंच होण्याची शक्यता कमी

नातवंडे कशी होणार ?

आणि ही स्त्री 35 ची , तिला लग्नाच्या पहिल्या वर्षीच मुलगी झाली.

मग ती पस्तिशीची होईल , तेंव्हा तिलाही लगेच मूल झाले तर तर आजी 70 ची व नातवंड 1 वर्षाचे
नातवंड बोलायला शिकेल तोवर आजी स्वर्गवासी

अशा परिस्थितीत एकच मार्ग आहे

तो म्हणजे वाजपेयी मार्ग

म्हणजे ज्यांना करियरच करायचे ते करियर करत रहातील. ज्यांना संसार करायचे ते दोन मुले उत्पन्न करतील, मग म्हातारपणी ब्रह्मचारी करियरवाले मुल म्हणजे 40 चे पोर दत्तक घेतील

प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे समाजात विषमता खूप आहे. त्यामुळे एका वर्गाच्या भल्यासाठी कायदा केला की दुसर्‍या वर्गाला फारसा फायदा होत नाही तर तिसर्‍या वर्गाची बँड वाजते.. वगैरे वगैरे

मागे मी आर्थिक आणि शैक्षणिक स्तरानुसार कोणी किती अपत्यांना जन्म द्यावा याचे लिमिट ठरवावे असे म्हटले होते. तसाच वेगवेगळा कायदा ईथेही गरजेचा आहे. पण आपल्याला समानता हवी असते. मग हे झेलावे लागणारच.

लहानपणी मला जेव्हा समजले की मुलीचे लग्न १८ व्या वर्षीही करता येते तेव्हा मला आश्चर्यच वाटले होते. कारण मी ज्या घराण्यात लहानाचा मोठा झालोय तिथे मुलगी चोवीस होण्याआधी कोणी तिच्यासाठी स्थळ घेऊन आले तरी त्याला दारातूनच हाकलून लावायचे.
पण हिच परीस्थिती सर्व घरात नसावी याचीही कल्पना आहे. या वयात मुलगी घरात अजून आहे म्हणून आईवडिलांची निंदा करणारा समाजही आमच्या घराच्या आसपासच असावा..

स्त्रियांची वये 35 केली तर पोरंच होण्याची शक्यता कमी
नातवंडे कशी होणार ?
>>>

कदाचित ३५ वय सुचवणार्‍यांनी ती वयोमर्यादा फक्त लग्नासाठी ठेवली असावी, मूल जन्माला घालण्याबाबत नाही.

म्हणजे मूल आधी जन्माला घालायचे , लग्न सावकाश करायचे. यावर शाखाचा चित्रपट नाही का आलेला ?

@ मूळ पोस्ट
३ वर्षे कळ काढणे गायपट्ट्यातल्या विवाहेच्छुक प्रेमप्रकरणातल्या टीन एजर्सना जड जाईल. एकदा १८ वय झाले आणि मुलीने पळून जाऊन लग्न केले की काही करता येत नव्हते. आता तीन वर्षे मतपरिवर्तनसाठी मिळतील. घरच्यांना त्यांच्या पसंतीनुसार बिरादरीमधे लग्न लावून देण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल. गायपट्ट्यात या कायद्याची मागणी बरीच वर्षे होत होती.

एक तर सरकार बिनडोक आहे हे bjp सरकार अशिक्षित अडाणी लोकांचे आहे आता पर्यंत सर्व बाजू नी विचार करून एक पण निर्णय ह्यांनी घेतला नाही
अर्धवट ज्ञान वर आधारित ह्यांचे सर्व निर्णय चुकले आहेत.
तसा हा निर्णय पण त्याच लायकीचा आहे.
१) १८ वर्ष पूर्ण झाल्या नंतर मुलगा मुलगी स्वतःचे सर्व निर्णय घेण्यास सक्षम होतात.
अगदी लग्नाचा पण .
त्या साठी कायद्याची गरज नाही.
२) लग्न करून शिक्षण पूर्ण करणे हे काही अवघड नाही खूप जोडपी लग्न करून नंतर स्थिर झाली आहेत.(लग्न केल्यावर कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो तिथे बंदी नाही)
३) योग्य वयात मुल होणे हे खूप खूप गरजेचे आहे.
नाही तर मागच्या पिढीवर खूप आर्थिक आणि मानसिक दबाव निर्माण होतो.
४) किती ही झाले तरी ५० वर्ष नंतर शरीर कमजोर होते.कोणतीच जबाबदारी नको स्वतः साठी च जगायला हवं ही भावना तीव्र होते.
तेव्हा मुल दहा पंधरा वर्षांची असतील तर आई वडील ना वर मानसिक ताण येतो.
५) कुटुंब व्यवस्था ही मुलांचे संगोपन नीट व्हावे म्हणून असलीच पाहिजे.
कुटुंब व्यवस्था नष्ट होणे म्हणजे बेवारस मुलांचे प्रमाण वाढणे हे समीकरण नक्की.

व्हाट्सप आले

*मुलींचे विवाहयोग्य वय आणि डॉ रखमाबाई राऊत -:*

काल केंद्रशासनाने मुलींचे विवाहाचे कायदेशीर वय 18 वरून 21 करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून सध्या देशात उलटसुलट चर्चा वादविवाद सुरु आहेत. पण मुलींचे विवाहयोग्य वय कायदयाने ठरवावं यासाठी 130 वर्षांपूर्वी एका मराठी मुलीने प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला होता, न्यायालयात लढाई हरल्यावर अगदी ब्रिटनच्या राणीपर्यंत हा मुद्दा नेऊन तत्कालीन ब्रिटिश सरकारला त्यावर कायदा करायला भाग पाडले होते, हे आपल्याला माहित आहे का ?

रखमाबाई राऊत हे त्या मुलीचे नाव. त्यांच्या प्रदीर्घ लढयांती 1891 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने पारित केलेला कायदा म्हणजे " संमतीवय विधेयक "

रखमाबाई राऊत या मुंबईच्या रहिवासी. त्यांचा जन्म 1864 साली झाला. त्या लहान म्हणजे 11 वर्षाच्या असतानाच त्यांचे लग्न दादाजी भिकाजी यांचेशी परंपरेनुसार लावून देण्यात आले. लग्नानंतर तत्कालीन प्रथेनुसार त्या काही काळ माहेरी राहून नंतर वयात आल्यावर सासरी जाणे अपेक्षित होते तथापि त्या वयाची 20 वर्षे पूर्ण होईपर्यंत सासरी गेल्या नाहीत.

त्याकाळी हा अक्षम्य सामाजिक अपराध होता. त्या सासरी नांदायला येत नाहीत म्हणून त्यांचे पती दादाजी भिकाजी, यांनी रखमाबाईंनी नांदायला यावं म्हणून कोर्टात केस दाखल केली. आपली बाजू मांडताना रखमाबाईंनी 'मला हे लग्न मान्य नाही कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते, आणि माझी संमती या लग्नाला नव्हती,' असा युक्तिवाद केला.

कोर्टाने लग्न टिकवावं अशा अर्थाचा निकाल दिला, तो साहजिकच रखमाबाईंना मान्य होण्यासारखा नव्हता. कोर्टाने रखमाबाईंपुढे दोन पर्याय ठेवले, एकतर नवऱ्याकडे नांदायला जाणं किंवा सहा महिन्यांची कैद. रखमाबाईंना तुरुंगवास मंजूर होता पण संमतीशिवाय झालेलं लग्न नाही.

या निकालाविरोधात रखमाबाईंनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी न्यायालयाचा निकाल रद्द केला. या खटल्याच्या आधारे आणि बेहरामजी मलबारी, विष्णुशास्त्री पंडित वगैरे समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे संमतीवाय कायदा 1891 पास करण्यात आला त्यामुळे स्त्रीयांचे लग्नाचे कायदेशीर वय 12 असे निश्चित करण्यात आले.

1884-88 दरम्यान चाललेल्या या खटल्यामुळे त्याकाळी देशातले वातावरण ढवळून निघाले होते. सामाजिक सुधारणांची निकड लक्षात घेऊन झटणारा समाजसुधारकांचा गट समर्थनार्थ विरुद्ध राजकीय सुधारणा प्रथम व सामाजिक सुधारणा या एतद्देशीयांच्या अधिकारात आणि संमतीने तसेच आपल्या धार्मिक बाबीतील गोऱ्यांचा हस्तक्षेप धोकादायक या भूमिकेतून दुसऱ्या गटाचा विरोध ( अगदी लोकमान्य टिळकसुद्धा या खटल्याच्या प्रचंड विरोधात होते. त्यांनी रखमाबाई, हा खटला आणि ते चालविणारे न्यायाधीश यांच्यावरही मराठा या वृत्तपत्रातून कठोर टीका केली होती ) अश्या परस्परविरोधी भूमिकांमधून देशाचे वातावरण ढवळून निघाले होते.

रखमाबाई राऊत खटला आणि त्याआधारे आलेले समतीवाय विधेयक यामुळे निव्वळ स्त्रीयांचे लग्नाचे वय 12 असे निश्चित झाले असे नाही तर स्त्रीयांचे अधिकार, शिक्षण, एकूणच सामाजिक सुधारणा याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण झाली, त्या सुधारणांचा प्रवास अधिक वेगवान झाला. स्वतः रखमाबाईंनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले, त्या डॉ रखमाबाई राऊत, फिजिशियन ( एमडी ) झाल्या. त्यातही त्यांना अनंत अडचणी आल्या, तिथेही त्यांनी यशस्वी लढा दिला. त्या भारतातल्या पहिल्या प्रॅक्टिसिंग महिला डॉक्टर होत्या. 1955 साली त्यांची जीवनयात्रा संपली.

त्याकाळी एका महिलेने अशी भूमिका घेणे अशक्यप्राय होते, पण रखमाबाईंनी घेतलेल्या निग्रही भूमिकेचा फायदा कोट्यवधी महिलांना झाला. भारतीय समाजात मुलींची 8-10-12 वर्ष वय असताना लग्न लावून दिली जात. वयाच्या 15-16 वर्षातच गर्भधारणा आणि संतती होत असे. त्यामुळे स्रियांच्या अनेक समस्या होत्या. अल्प वयात शरीर अपरिपकव असताना प्रजोत्पत्तीचा भर पडल्याने शरीराचा विकास खुंटणे, अनेक व्याधी जडणे व परिणामस्वरूप आयुष्यमान कमी होणे, अल्पवयात संसारात अडकल्याने शिक्षण, उच्यशिक्षणाचा अभाव, परिणामी आर्थिक स्वावलंबन आणि अधिकारांचा अभाव, अश्या एक ना अनेक समस्या होत्या. एका स्त्रीने भूमिका घेतल्याने त्यासंदर्भातल्या परिवर्तनाला सुरुवात झाली, गती मिळाली.

डॉ रखमाबाई राऊत यांनी ज्या काळात हा लढा सुरु केला त्या काळात हि बाब निव्वळ अश्यक्यप्राय होती नव्हे अश्यक्यतेच्याही पलीकडची अशी होती. पण शक्य आणि अश्यक्य हे फक्त आपल्या धारणेत, विचारात असते. ज्याला आपण वस्तुस्थिती समजतो ती वस्तुस्थिती नसून वस्तुस्थितीबद्दलच आपलं मत असतं. मग ते मत आपल्याला एखादी गोष्ट शक्य आहे किंवा नाही हे ठरवत आणि आपण मग त्याप्रमाणे कृती करतो. पण अशक्य असं काहीही नसतं, अश्यक्यता हि फक्त आपल्या वाटण्यात असते आणि म्हणून आपण त्यासंदर्भातल्या कृती करण्यापासून परावृत्त होतो म्हणून आपल्या वाटण्यातली अश्यक्यता आपण स्वतःच याप्रकारे प्रत्यक्षात आणत असतो.

महाराष्ट्र हि नररत्नांची खाण आहे, असे म्हणले जाते. पण हा महाराष्ट्र नारिरत्नांची सुद्धा खाण आहे. या देशाच्या राजकारणाला, समाजकारणाला आणि धर्मकारणाला अभुतपुर्व, अशक्यप्राय ( वाटणाऱ्या ) कलाटण्या देण्याऱ्या स्रिया या राज्यात होऊन गेल्या. राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीआई यांनी अश्यक्य ते शक्य करून दाखवले. या सर्वांनी भूतकाळाच्या बंधनात न अडकता भविष्याचा वेध घेणारा नव्हे आपल्याला हवं ते भविष्य घडविण्यासाठीचा नवा विचार मांडला, आचरणात आणला आणि इतिहास घडवला.

मॉरल :- आपल्याला जे अशक्य वाटते ते अश्यक्य नसून फक्त शक्यतेबाबतचे आपले फक्त मत असते, त्यावर मात करून आपण आपल्याला जे पाहिजे आहे त्यासाठीच्या कृती करत गेलो तर अश्यक्य सुद्धा शक्य होऊन जाते आणि आपण आपले आणि आपल्या भोवतालच्या लोकांचेसुद्धा जीवनात अमुलाग्र आणि अत्यंत ताकदवान बदल घडवून आणतोच !

( आता फक्त याप्रमाणे किंवा हेसुद्धा करणे मला शक्य आहे किंवा कसे या धारणेत अडकून बसू नका )

डॉ प्रशांत भामरे

संडास करायला सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत च जावे असा पण कायदा करा त्या नंतर जो संडास ला जाईल ते कृत्य बेकायदेशीर ठरवून शिक्षा करा.
असे पण कायदे करा.
लोकशाही आहे भंगार शाही.
लोकांनी काय करावे हे लोकांवर सोडून दिले पाहिजे.
प्रत्येक बाबतीत कायदे नकोत .कमीत कमी कायदे आणि नियम असणे खूप गरजेचे आहे.

आपल्या भारतात सुदृढ-गुटगुटीत-बाळसेदार असणारे परंतू लग्नच न करणारे, लग्न ठरले तरी बोहल्यावरून पळून जाणारे, बोहल्यावरून पळता आले नाही तरी लग्नाच्या सुहागरात्रीच बायकोला टाकून पळून जाणारे किंवा सर्व सुख-समृद्धी-सौंदर्यवान पत्नी-तेजस्वी पुत्र असतानाही या सर्वांचा त्याग करून वैराग्य घेणारे बरेच तरूण होऊन गेले आहेत.. त्यांनी त्या त्या वेळी स्त्री जातीला कधीही टाकुन देता येईल अशी रीत पाडली आहे त्यामुळे सरकारने मुलींच्या लग्नाचे वय कितीही वाढवावे परंतु त्या मुलींशी इथल्या मुलांची लग्न करण्याची मानसिकता आहे का याचे हमीपत्र देणारी सरकारी पातळीवर एखादी यंत्रणा हवी. अन्यथा स्त्री वर्गावरील हा अन्याय शतकोन शतके असाच चालू राहील. आग रामेश्वरी अन बंब सोमेश्वरी असा प्रकार नको..!!

Pages