माझ्या आठवणीतली मायबोली- निरु

Submitted by अ'निरु'द्ध on 13 September, 2021 - 07:05

माझ्या आठवणीतली मायबोली- निरु

आया है मुझे फिर याद वो जालीम..
गुजरा जमाना बचपन का...

मायबोलीला 25 वर्ष झाली म्हणताना असं काहीसं मनात यायला हवं होतं.
पण नाही आलं. कारण मी तर अजून नवतरुण, खरं तर बाल्यावस्थेत. त्या सुरुवातीच्या गुजऱ्या जमान्यामधला नाहीच.
कारण माझं मायबोली वय : सहा वर्ष चार महिने.

थोडक्यात मी मायबोलीचं एकोणीसावं वर्ष म्हणजे तिचं टीनएजरपण संपता संपता या परिवारात सामील झालो.

हां, आधी वर्ष, दीड वर्ष वाचनमात्र होतो. सुरुवातीला क्रमशः कादंबऱ्या वाचल्या. नंतर कथांकडे वळलो.

निसर्गाची, छायाचित्रणाची आवड आधीपासूनच असल्यामुळे "निसर्गाच्या गप्पा" हा धागा विशेष इंटरेस्टिंग वाटला. त्यावर प्रचि टाकता यावेत, प्रतिसाद देता यावेत म्हणून निरु या आयडीने मायबोली सदस्यत्व घेतले.
प्रतिसाद देता घेता काही आयडी ओळखीचे होत गेले.

मी मायबोली एप्रिल २०१५ मध्ये जॉईन केलं असलं आणि माझी पहिली पोस्ट २५ जून २०१५ ला टाकली असली तरी पहिला लेख लिहायला मात्र ०७ फेब्रुवारी २०१६ ही तारीख उजाडावी लागली.

तुमचं कुठलं लेखन गाजलं.

माझं लिखाण गाजलं असं म्हणता येणार नाही. पण जे लिखाण लोकांना आवडलं असेल असं मला वाटतं आणि विशेषतः जे लेख मला स्वतःला लिहून बरं वाटलं त्याबद्दल लिहितोय.

माझा पहिला लेख खरं तर चार भागांची लेखमाला होती.
वाइल्डलाइफ ऑफ मसाईमारा या माझ्या एका आवडत्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर. (मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान)
पहिल्या दोन भागांवर खूप छान प्रतिसाद मिळाले. मसाई मारा ट्रीपबद्दल बऱ्याच जणानी वैयक्तीक संपर्क साधून माहिती विचारली. तिसरा लेख (चौथा भाग) मात्र प्रतिसाद न मिळाल्याने ढेपाळला.
एकाच विषयाचं अजीर्ण झालं असेल असं मानून तिसरा भाग अजूनही द्यायचा बाकी आहे.

माझी लाडकी जागा आरण्यक यावर लेख लिहिल्यावर मलाच खूप बरं वाटलं. आताही हे लेख आणि त्याखालचे प्रतिसाद वेळ असताना वाचणं ही माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. इथे आपल्या काही मायबोलीकरांनीही पायधूळ झाडली आहे. (आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती)

घरच्या बाल्कनीतल्या पावडर पफच्या कळीचे उमलणं (एक कळी उमलताना...) आणि बाल्कनीमधेच बुलबुल कुटुंबांची घरबांधणी, पिल्लांचं संगोपन, पिल्लांना उडायला शिकवणं टप्प्याटप्प्याने प्रकाशचित्रणाच्या माध्यमातून इथे मांडलं आणि लोकांनाही ते आवडलं. (बुलबुल येती आमच्या घरा..)

"आरण्यकेश्वर" सारखी गंभीर, थोडीशी अध्यात्मिक (आरण्यकेश्वर..) आणि "सुस्नात तू गं ओलेती" यासारखी नर्म शृंगारिक (सुस्नात तू गं ओलेती..) अशा भिन्न शैलीमधल्या कविता लिहिण्याची प्रेरणा इथेच मिळाली आणि त्यांचही स्वागतच झालं.

स्विस रुळावरून पाहिलेला निसर्ग, टुमदार छोटीशी घर इथे देता आली. (स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...)

आणि मनाला भिडलेला जर्मनीचा वेडा राजा लुडविग आणि मनावर गारुड करणारा त्याचा किल्ला नॉईश्वानस्टाईन कॅसल यावर मनापासून लिहिता आलं. (जर्मनी : एका वेड्या राजाचे स्वप्न - नॉईश्वानस्टाईन कॅसल..)
या लेखाबद्दल खंत एकच की अगदी मनापासून लिहूनही माझ्या अपेक्षेएवढे प्रतिसाद यावर मिळाले नाहीत.
पण वेमांनी कधीतरी सांगितलेलं "नो कॉमेंट इज ऑल्सो अ कॉमेंट" हे मान्य करून पुढे जाणं हेही यामुळेच घडलं.

मायबोली गणेशोत्सव 2019 मध्ये मधली सोळा आण्याच्या
गोष्टी प्रकारामधली "दाह" ही शशक लिहिण्याचा माझा पहिला प्रयत्न, तो प्रयत्न म्हणूनही आवडला आणि शेवट थोडा यक्क असूनही लोकांना आवडल्याचं त्यांनी आवर्जून कळवलं. ("दाह")

मायबोली च्या निमित्ताने आमच्या टारझनचाही इथे परिचय करून देता आला. आणि Fringe Benefits म्हणजे इथेच त्याला अनेक मावश्याही मिळाल्या. (टारझन द वंडर कॅट..)

खड्ड्यातल्या कोंबडी सारखी अनवट आणि Outdoor पाककृतीही इथे सचित्र देता आली. त्यानिमित्ताने अन्य मायबोलीकरांच्या पाककृतीही प्रतिसादात वाचायला मिळाल्या. (खड्ड्यातील कोंबडी अथवा डब्ब्यातील कोंबडी..)

श्रीलंकेमधील आर्किटेक्ट जेफ्री बावांच्या लुनूगंगा इस्टेटवर लिहिलेला लेख मला स्वतःला खूप आवडतो आणि जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद देतो. (श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर..)

आता अर्थाअर्थी च्या निमित्ताने गुंतवणुकीबाबत प्राथमिक स्तरावरची माहिती कथेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न चालू आहे. (
अर्थाअर्थी -(भाग-०१) - टिंडर भेट..
)

रिक्षा फिरवणे शक्यतो मी करत नाही पण वेमांचा आदेशच आहे म्हटल्यावर तो पाळायलाच हवा ना ?
त्यामुळे पडत्या फळाची आज्ञा घेऊन माझ्या लेखांच्या लिंक इथे दिलेल्या आहेत.

आता मायबोली नसती किंवा मी तिचा सदस्य नसतो तर हे कधी लिहिलंच नसतं का..?
तर नक्कीच कुठेतरी आणि कधीतरी लिहिलं असतं.
पण लिहिण्यासाठी प्रवृत्त करण्याचं Catalyst म्हणून श्रेय मात्र मायबोलीचंच.

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं.

वर म्हटल्याप्रमाणे मायबोलीचं सदस्यत्व घेतलं सव्वा सहा वर्षापूर्वी..
पण २५ वर्षापासूनचं लिखाण, चर्चा, वाद, गटग वृतांत हे तर आजही उपलब्ध आहे आणि आधीचं बरंच लिखाण वाचलेलंही आहे. त्यामुळे हे अप्रत्यक्ष नातं अगदी २५ वर्ष नाही पण १७, १८ वर्ष मागेपर्यंत नक्कीच जातं.

अनेक अपरिचित व्यक्ती ज्यांच्याशी कधी दुरान्वयानेही संबंध येण्याची शक्यता नव्हती त्या परिचितांमध्ये समाविष्ट झाल्या. सुह्रुद झाल्या.
त्यातल्या काही जणांशी मैत्र जुळलं ते केवळ मायबोलीच्या ओळखीतून.

पुढे व्हाट्सॲपच्या माध्यमातून ऋणानुबंध वाढत गेले. अनेक छोटी मोठी गटग झाली.
खादाडीच्या अनेक चविष्ट आणि हटके जागांवर लोकांना आग्रहाने नेऊन खाऊपिऊ घालता आलं.
त्यांच्या घरच्या कोंबडी-वड्यांच्या, चिंबोरीच्या, माशांच्या पदार्थांच्या अधिकारवाणीने आणि हक्काने मागण्या करता आल्या.
आसपासच्याच भागात असलेला मित्रांचा परिघ अनेक शहरांमध्ये, खरंतर विदेशातही विस्तारला.

एका मनोगतामध्ये मायबोली सुरू झाली तेव्हा तिच्या सदस्यांचं सरासरी वय हे लग्नाळू वय होतं असं कळलं.
म्हणजे तेव्हा जर ते सदस्य बाविशी तेविशीचे असतील तर मायबोलीच्या पंचविशीमध्येही ते अजून पन्नाशीच्या आतले तरुण तुर्कच आहेत.

पण मी मात्र मायबोलीचं टीनेजरपण संपताना, खरं तर ती जवानीच्या ऐन भरात असताना इथे दाखल झालो, आणि तेही माझ्या प्रौढ वयात.
पण 'उमर पचपन की और दिल बचपन का' असल्यामुळे माझा इथला प्रवास, वावर मजेत चालू आहे

मी इथे जेव्हा आलो तेव्हा माझ्या वयामुळे विचार तसे पक्के झाले होते. व्यवसायामुळे नाना तऱ्हेच्या स्वभावाच्या लोकांशी संपर्क आला होता, येत होता. त्यामुळे माझ्या विचारात मायबोली मुळे विशेष काही फरक पडला असं म्हणता येणार नाही.
पण एक मात्र झाले मायबोलीमुळे इतर विचार, त्यांचा एक मोठा आवाका, त्यातील तीव्रता या गोष्टी मात्र अनुभवता आल्या.

विविध वयोगटातले, शहरी, निमशहरी, ग्रामीण, परदेशातले,
वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीमधले, वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामधले आणि अनेक विविध आवडीनिवडीचे असे सर्व लोकं इथे व्यक्त होत असल्यामुळे मायबोलीची सामाजिक विण सर्वसमावेशक झाली आहे. आणि त्यामुळे नेहेमीच्या आजूबाजूच्या लोकांमधून एरवी ज्या परिघातले विचार सुचतात, सुचविले जातात त्यापेक्षा विचारांचा, पर्यायांचा एक खूप व्यापक परीघ इथे उपलब्ध असतो.

चर्चा कशा कराव्यात, कशा करू नयेत..
वाद कसे घालावेत, कसे घालू नयेत..
याची तर उत्तम उदाहरणं सार्वकालिक स्तरावर इथे आहेतच.
त्यामुळे काय करायचं, काय नाही करायचं हे ही कुठेतरी मनात स्पष्ट होत जातं.

एरवी मला पटणारं माझं म्हणणं दुसऱ्या पुढे ते पुरेपूर जोशात मांडणारा मी इथे मात्र तसं करत नाही. कारण न दिसत्या आयडी पुढे ते का आणि कशाला इतक्या पोटतिडकीने मांडायचं असं मला वाटतं. मला ते अरण्यरुदन वाटतं.

आणि हे सगळं करून, बोलून, त्यामुळे बदल होत आहेत की नाही याची कुठे अकाउंटेबिलिटी मिळत नसेल तर हे का करावं असा विचार करून मी ते सोडून देतो.
तेव्हा सहजपणे सोडून देणं, निर्लेपपणे सोडून देणं हा कदाचित वयाच्या उशिराच्या टप्प्यात येणारा भाग मात्र मायबोली मुळे आयुष्यात थोडा लवकर आला.
याचा पुढे त्या विशिष्ट वयात कदाचित फायदाच होईल.

माझ्या लेखात बर्‍याचदा बरेच फोटो असल्यामुळे आणि मायबोलीवर फोटो टाकायची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्यामुळे माझे कित्येक शनिवार-रविवार त्यात बरबाद झालेले आहेत.
पण त्या बरबादीच्या क्षणांचा कैफ काही औरच असतो.
आणि याला कारणीभूत फक्त मायबोली आहे.

सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे मायबोलीने मला चाहते दिले.
माझ्या चाहत्यांची संख्या मी बघितली तर मला असं वाटतं की ती अपेक्षेपेक्षा जास्तच आहे.
आणि मग नंतर परत असं वाटतं की अजून असायला काय हरकत आहे..?

- कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं..?

गांजण्यासारखे कुठलंच लेखन कधी केलं नाही.. (हा आपला माझा समज.)
पण माझ्या लिखाणामुळे कोणी मायबोलीकर गांजले गेले असतील तर इथे जरूर सांगावं. (म्हणजे तसेच लेख अजून वाढवता येतील Wink )
(कारण गांजल्याने प्रतिसाद वाढतात असं एक निरीक्षण.)

मायबोलीवरील कुठली सोय आवडली..

तसा तर मी फार सोईस्कर काळात इथे आल्यामुळे इथे सर्व सोयी होत्याच. तरीही उडवलेल्या आयडीचे लेखन पुढे /created टाकून वाचता येते ते आवडते.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती

हुशार मायबोलीकर प्रतिसादांचा काउंटर कसा मोजतात ही साधी सोपी गोष्ट कित्येक दिवस मला माहिती नव्हती. आणि लोकं हे कसे मोजतात याचा मी आश्चर्याने विचार करायचो.

तुम्ही मायबोलीला काय दिलं.

तसं तर काहीच दिलं नाही. ना कधी संयोजनात भाग घेतला, ना कधी फार माहितीपर किंवा उपयोगी लेखन केलं.
फारात फार मायबोलीची सदस्य संख्या एकाने वाढवली असं मात्र निश्चित म्हणता येईल.

आता पुढे काय..?

अजून काय..? आता मायबोली पन्नास वर्षांची व्हायची वाट बघायची आणि आपलं लिहिण्याचं, वाचण्याचं, प्रतिसादांचं, व्यक्त होण्याचं कार्य पार पाडत रहायचं.. जेणेकरुन अमृताते पैजा जिंकणाऱ्या आपल्या 'मायबोली मराठीचा' डंका विश्वभर दुमदुमत राहिल.

मायबोलीने रौप्यमहोत्सव पूर्ण केल्याबद्दल तिचे, वेबमास्तरांचे आणि सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन..
आणि तिच्या सुवर्णमहोत्सवासाठी मनापासून शुभेच्छा..!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मनोगत..आवडलं.

वाद-चर्चांच्या बाबतीत तुम्ही जे लिहिलंय ना, तसंच काहीसं मलापण वाटतं. पण याबाबतीत एका मित्राचं म्हणणं मला खरंतर बरोबर वाटतं, की जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये वाद घालतो/चर्चा करतो, तेव्हा आपलं मत काही फक्त समोरची वाद घालणारी व्यक्ती ऐकत नसते, तर वादात भाग न घेणारे वाचनमात्र लोकही असतात, ज्यांच्या मतावर परिणाम होत असू शकतो. (जसा माझ्यावरही झालेला आहे काही वेळा)
पण तरी मला कंटाळाच आहे याचा. Happy

मनोगत मस्त लिहिलंय.आरण्यरुदन वाला मुद्दा तर अगदी अगदी,
तुमचे सगळे लेख जबरदस्त असतात.मसाईमारा चवीने वाचला.प्रत्येक फोटो विशेष असतो.
नॉईशवेनस्टाइन नंतर वाचू म्हणून बाजूला ठेवलेला नंतर हरवला.मला जायचं होतं इथे.लोकांनी खूप वर्णन केले होते.पण तेव्हा आमचा दिवशी अलावन्स 25 युरो होता त्यात ग्रोसरी, कपडे खरेदी, आठवड्याला जवळ शहरात जाणे, घरी फोन करायला कॉलिंग कार्ड वगैरे खर्च बसवायचा असायचा.होमलोन साठी बरेच पैसे वाचवून नेण्याचं टारगेट पण होतं.त्यामुळे काहीही फिरणं झालं नाही.हा किल्ला तेव्हापासून मनात आहे.बघू आता कधी जमतं.

निरू तुमचे फोटो आणि लुनुगंगा इ. लेखन आवडलेच आहे. पण तुमचा आयडी दिसला की पहिले डोळ्यासमोर काय येत असेल तर तो मस्त भाजलेला खरपुस पापलेट. तो तसा जमावा अशी फार इच्छा आहे. Happy
त्यात तुम्ही ठाण्याला रहाता असं वाचलंय. पुढच्या भेटीत दाराची बेल वाजली तर पापलेट तयार ठेवा Happy

छान मनोगत. आवडलं.

माझ्या चाहत्यांची संख्या मी बघितली तर मला असं वाटतं की ती अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. अजून वाढली एकाने बघा. Happy

खुप सुन्दर लिहिलेय, तुमच्या इतर लेखनासारखेच मुद्देसुद.
राहिलेले लेख पुर्ण करायचे मनावर घ्या क्रुपया.

कुमार१, मंजूताई, जागू, सामो, धनुडी, वीरु, sonalisl, किशोर मुंढे, वर्षू., mrunali.samad, अश्विनी११

प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..

@ वावे, तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार..
<<<वाद-चर्चांच्या बाबतीत तुम्ही जे लिहिलंय ना, तसंच काहीसं मलापण वाटतं. पण याबाबतीत एका मित्राचं म्हणणं मला खरंतर बरोबर वाटतं, की जेव्हा आपण एखाद्या ग्रुपमध्ये वाद घालतो/चर्चा करतो, तेव्हा आपलं मत काही फक्त समोरची वाद घालणारी व्यक्ती ऐकत नसते, तर वादात भाग न घेणारे वाचनमात्र लोकही असतात, ज्यांच्या मतावर परिणाम होत असू शकतो. (जसा माझ्यावरही झालेला आहे काही वेळा)>>>

तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण ही गोष्ट मी परिचित व्यक्ती असलेला परिचित ग्रुप असेल तर जरुर करतो. तिथेही बरेच वाचनमात्र लोकं असतात, पण माहितीचे. सर्व व्यक्ति एकमेकांना जाणत असल्यामुळे कुठल्याही चर्चेचे मुद्दे स्वतःच्या Unknown/Unidentified व्यक्तीत्वाचा फायदा घेऊन अकारण ताणले जात नाहीत. त्यामुळे चर्चा कितीही टोकदार झाली, वाढली तरी तिचा परिघ व्यावहारिक मर्यादेतच रहातो.. त्यातली सुसत्रता ढळली तरी एका प्रमाणाच्या बाहेर जात नाही, Derail होत नाही.
(आणि असं झालं तरी त्यांना शांत करता येतं, माॅडरेशन करता येतं.)
पण अशी स्थिती नसेल तर फक्त वाचनमात्र असलेल्यांचा विचार करणं मला जरा अवघड जातं.

@ mi_anu,
<<<नॉईशवेनस्टाइन नंतर वाचू म्हणून बाजूला ठेवलेला नंतर हरवला.मला जायचं होतं इथे.लोकांनी खूप वर्णन केले होते.पण तेव्हा आमचा दिवशी अलावन्स 25 युरो होता त्यात ग्रोसरी, कपडे खरेदी, आठवड्याला जवळ शहरात जाणे, घरी फोन करायला कॉलिंग कार्ड वगैरे खर्च बसवायचा असायचा.होमलोन साठी बरेच पैसे वाचवून नेण्याचं टारगेट पण होतं.त्यामुळे काहीही फिरणं झालं नाही.हा किल्ला तेव्हापासून मनात आहे.बघू आता कधी जमतं.>>>

आता धाग्याची लिंक लेखात आहेच. जरुर वाचा..
आणि मुख्य म्हणजे हा किल्ला नक्की पहा..
लेखाच्या शेवटी तर मी माणसं गोळा करतोय, मला पुन्हा जायचंय म्हणून..
अभिप्रायासाठी आभार.

@ धनवन्ती..... Lol

<<माझ्या चाहत्यांची संख्या मी बघितली तर मला असं वाटतं की ती अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. अजून वाढली एकाने बघा. Happy>>
@ मानव पृथ्वीकर, आपल्याला तर दुप्पट धन्यवाद.. Happy
प्रतिसादासाठीही आणि चाहत्यांच्या संख्येत भर घातल्याबद्दलही.

@ साधना... हो. लेख लिहायचं नक्की मनावर घेतो.

<<<तुमचा आयडी दिसला की पहिले डोळ्यासमोर काय येत असेल तर तो मस्त भाजलेला खरपुस पापलेट. तो तसा जमावा अशी फार इच्छा आहे. Happy
त्यात तुम्ही ठाण्याला रहाता असं वाचलंय. पुढच्या भेटीत दाराची बेल वाजली तर पापलेट तयार ठेवा Happy>>>

@ अमितव, तुम्हीही ठाणेकर हे माहिती नव्हतं. कधीही या. पण खरपूस पापलेटच्या तयारीसाठी एक दिवस आधी दिलात तर लई भारी बेत आखता येईल.

प्रतिसादाबद्दल अर्थातच आभार..

छान लिहिलंय
एक creative व्यक्ती म्हणून कौतुक वाटते तुमचे
वेड्या राजाचा किल्ला मला खूप आवडला होता
तो लेख मी घरी सगळ्यांना वाचून ही दाखवला
प्रतिसाद दिला की नाही ते आठवत नाही पण Happy

@निरू, परिचित/ अपरिचित हा एक महत्त्वाचा घटक मुद्दा आहेच.
एखाद्या ग्रुपमध्ये जर एखादी व्यक्ती केवळ स्वतःच्या वयाचा/अनुभवाचा (गैर)फायदा घेऊन आपलंच म्हणणं पुढे रेटत असेल आणि बाकीचे (खरं तर ज्यांना दुसरी बाजू माहिती आहे) लोक एक तर त्या व्यक्तीच्या स्थानाचा विचार करून किंवा 'कशाला त्यांच्या तोंडाला लागा?' असा विचार करून गप्प बसणं निवडत असतील तर उरलेल्या (अजाण बालक कॅटेगरी) लोकांच्या प्रबोधनासाठी दुसरी बाजू कुणी तरी मांडली पाहिजे.
(हे खूप व्हेग होतंय याची कल्पना आहे आणि हे मी मायबोलीबद्दलच केवळ म्हणत नाहीये)

मस्त लिहिलत निरु !
लेखांच्या लिंक्स दिल्यात हे उत्तम केलत। आता वाचते एक एक

निरू तुम्ही मस्त लिहिता.. मुळात तुमचे रिफाईंड लिहिणे फार आवडते..
तुमचा टारझन खूप आवडला आणि डब्यातली कोंबडी तर प्रचंड आवडली..
तुमची एक कथा खूप गोड होती .. नुकतेच लग्न झालेल्या एका जोडप्याची होती.. ( तो आणि ती असे काहीतरी नाव होते.) तेव्हा मला पटकन रोजामधले मधू आणि अरविंदस्वामी डोळ्यसमोर आले होते..

उपाशी बोका, किल्ली, अवल : प्रतिसादाबद्दल आभार... _/\_

@ श्रवु, टारझन आणि डब्यातली कोंबडी आवडली हे ऐकून खूप बरं वाटलं. हो, ती गोष्ट "तो आणि ती" च होती. मी_अनु यांनी Casting करायला सुरुवात केली आणि सगळ्याच प्रतिसादकांनी त्यात उत्साहाने भाग घेतला होता. मजा आली होती त्या कास्टींग्जच्या प्रकारात. ती कथा जरा जास्तच गोड होती आणि तसं लिहायचा माझा फारसा पिंड नाही (नसावा), म्हणून वरच्या यादीत लिंक दिली नाही.
अभिप्रायाबद्दल मनापासून आभार..

एकदम मनापासून लिहिलंय. लेखावर प्रतिसाद, त्याला तुमच्या प्रतिक्रिया वगैरे. स्पर्शून गेलं सगळंच लिखाण आत कुठेतरी.

Pages