बुलबुल येती आमच्या घरा...

Submitted by अ'निरु'द्ध on 17 May, 2017 - 06:11

बुलबुल येती आमच्या घरा...
(The Bulbul Babies At Our Balcony)

(Red Vented Bulbul)
मुखपृष्ठ :

मलबेरीच्या सिझनला आमच्या ऑफिसच्या कंपाऊंडमध्ये मागच्या बाजूला गाडी पार्क केली कि सिझन नुसार तांबड्या, लाल किंवा काळ्या रंगाच्या मलबेरीनी गच्च भरलेली झाड बघून तोंड आंबट/ गोड करायचा मोह आवरायचा नाही.
ही फळ आपल्याही घरी असावीत म्हणून मलबेरी कुंडीत जगतील का यासाठी इंटरनेटवर थोडं संशोधन केलं .
पावसाळ्यात फांद्या रूजवूनही ही झाडं सहज येतात आणि पहिल्या हिवाळ्यापासून फळही देतात हे कळल्यावर लगेच पावसाळ्यात दोन कुंड्यात त्यांची लागवड केली. दोन कुंड्यात अशासाठी कि एका झाडाची फळं आमच्यासाठी तर दुसऱ्याची पक्षांसाठी. कारण लहान आणि मध्यम आकाराच्या पक्षांसाठी ही मलबेरीची फळं म्हणजे मोठेच आकर्षण.
आणि खरं तर तशी आमची बाल्कनीतली बाग आम्ही जास्त करून लावलीय ती पक्षी , कीटक, मधमाश्या , फुलपाखरं, गोगलगाय यांनी यावं अशाच उद्देशांनी. (संदर्भ : एक कळी उमलताना... )

झालं . ऑफिसमधल्या मुलाला सांगून अंगठ्या एवढ्या जाडीच्या मलबेरीच्या फांद्या घरी नेऊन कुंडीत लावल्या. पावसाळ्यात रुजवलेल्या ह्या फांद्यांना लगालगा पानं फुलली, छोट्या छोट्या फांद्या फुटल्या, झाडं वाढायला लागली आणि हिवाळ्यात त्यांनी छान मलबेरीज ही दिल्या. बुलबुल हे या झाडाचं मोठं गिऱ्हाईक.

प्रचि १ : हिरव्या, कच्च्या बेरींनी लगडलेलं झाड

प्रचि : २ पिकलेल्या बेरीज -०१

प्रचि : ३ पिकलेल्या बेरीज -०२

प्रचि : ४ टप्पोरी बेरी -०१

प्रचि : ५ टप्पोरी बेरी -०२

पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर कबुतरांचा त्रास सहन न होऊन आम्ही आमच्या बाल्कनीला जाळी लावली.
(पक्षी प्रिय असलो तरी बाल्कनीतली कबुतरं हा मात्र एक सन्मानीय अपवाद) .
मात्र जाळी लावताना नेहमीच्या एकदम छोट्या जाळीऐवजी माशांचे जाळे (Nylon Fishing Net ) लावले जेणेकरून लहान आणि लहान + (मध्यम) आकाराचे पक्षी आत येऊ शकतील.
कावळ्या कबुतरांचा धोका कमी झाल्यामुळे हे पक्षी निवांत झाले.
पहिल्यांदा निवांत झाल्या त्या चिमण्या. भर दुपारी झाडांच्या झिरमिळत्या सावलीत त्या ४/ ६/ ८ च्या ग्रुपने निवांत झोप काढू लागल्या.

प्रचि ६ : चिमणी -०१

प्रचि ७ : चिमणी -०२

सकाळी झाडांना पाणी घातल्यावर त्याच्या पानांवरच्या निथळत्या थेंबात आंघोळ करणारे शिंजिर पक्षी (Sun Birds) अधिकच रेंगाळून आंघोळ करायला लागले. अगदी हिंदी चित्रपटातील हिरॉईनच्या निवांत आंघोळीसारखे आणि बेरी पिकून काळ्या झाल्यावर बुलबुलही चिवचिवाट करत जोडी जोडीने यायला लागले. त्यांच्यासाठी कुंडीत ठेवलेल्या मातीच्या पसरट भांड्यात अंग बुडवून आंघोळही करायला लागले.

प्रचि ८ : पक्षांसाठी ठेवलेलं पाणी - कम – बर्डबाथ

एका सुट्टीच्या दिवशी बाल्कनी लगतच्या सोफ्यावर बसल्या बसल्या पाहिलं तर एक बुलबुल दंपती सकाळी अकरा सव्वा अकराच्या सुमारास बेरी खाऊन तृप्त झाल्यावर त्याच झाडावर निवांत डुलक्या काढताना दिसली. जास्त करून हे Red Vented बुलबुल असायचे ज्याला आपण मराठीत लालबुड्या बुलबुल म्हणतो.
आपल्या घरी त्यांच्यासाठी एवढं सुरक्षित आणि निवांत वातावरण आहे हे पाहिल्यावर खरंच आतून खुप बरं वाटलं.
असंच काही दिवसांनी बाल्कनीत गेल्यावर रानजाईचा सुगंध आला. फुल पाहण्यासाठी वेलीजवळ गेलो तर फडफड आवाज झाला. दचकून मागे झालो आणि बघितलं तर कुठल्यातरी पक्षाची घर बांधायची तयारी चालू झालेली दिसली. नंतर कळलं बुलबुल दंपतीने घर बांधायचं घेतल आहे.

प्रचि ९ : घरट्याची सुरुवात

मग त्यांना निवांतपणा देण्यासाठी बाल्कनीत जाणं कमी केलं आणि लिविंग रूम मधून मात्र वेळोवेळी नजर ठेवायला सुरुवात केली.

प्रचि १० : हे घरटं कठड्यापासून जवळही होतं आणि कमी उंचीवरही.

प्रचि ११ : घरट्यात बसून त्यांला गोलाकार देताना -०१

प्रचि १२: घरट्यात बसून त्यांला गोलाकार देताना -०२

दिसामाजी घरट्याच्या बांधकामात प्रगती होत गेली, घरटं पूर्ण झालं आणि बुलबुलीण बाईंनी घरट्यात बसायला सुरुवात केली.
हे जोडपं धीट होतं. पहिला दचकून उडण्याचा encounter सोडला तर गॅलरीत आपण गेलं तरी घरट्यात बसून असायचं. पाहिजे तेव्हा उडून जाणार, बसायचं असलं तर बसून रहाणार. आमची फार काही तमा बाळगत नव्हते.

प्रचि १३ : पूर्ण झालेलं घर

त्यानंतर दररोज सकाळी घरट्याची एकेका अंड्याने प्रगती होत गेली.

प्रचि १४ : पहिले अंडे

प्रचि १५ : दुसरे अंडे

प्रचि १६ : तिसरे अंडे

ही अंडी फिकट गुलाबी रंगाची होती आणि त्यावर जांभळट रंगाचे ठिपके होते.
चौथ्या दिवशी बुलबुल आई जवळजवळ संपूर्ण दिवस घरट्यातच बसली होती.
पाचव्या दिवशी मात्र घरटं पूर्ण रिकामं होतं . ना आत अंड्याची टरफल ना बाहेर. आणि बुलबुल दंपतीही दिसेनाशी झालेली.
घरातले सगळेच जण उदास झाले. सगळ्यांनाच त्या एका अनोख्या अनुभवाची आस लागली होती. पण त्यावर निराशेच पाणी पडलं .
पण एक दहा पंधरा दिवसातच बाल्कनीतल्या विरुद्ध कोपऱ्यात आणि जरा उंच वाढलेल्या शेवग्याच्या झाडाच्या वरच्या फांदीवर छपरालगत आणि पानाच्या सावलीआड बहुतेक एका वेगळ्या बुलबुल दंपतीने घरटे बांधायला घेतले.

प्रचि १७ :

दोघांपैकी कोणीतरी एक चोचीत गवत/काडी काहीतरी घेऊन यायचं आणि चोच आणि पायाच्या सहाय्याने फांद्यांच्या बेचक्याभोवती गोलाकारात विणायाचं . त्यावेळी दुसरा जोडीदार मात्र आमच्या बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या गुलमोहोरावर बसून घरट्याच्या कामावर आणि जोडीदारावर लक्ष ठेवून असायचा.

प्रचि १८ : घरट्याला आकार देणारा आणि लालबुड्या नाव सार्थ करणारा बुलबुल Lol

ही जोडी एकतर जास्त सावध किंवा लाजरी किंवा दोन्हीही होती कारण कोणीही बाल्कनीत गेल्यावर लगेच उडून जायची आणि गुलमोहोरावर बसून सर्व काही आलबेल असल्याची खात्री पटली की सावकाशीने परतायची. उडून जातानाही ऑलीम्पिकमध्ये एखादा जलतरणपटू सूर मारताना जस हात शरीराजवळ घेतो तस हे बुलबुल जाळीतून बाहेर जाताना पंख अंगासरशी करून अलगद, जाळीला धक्काही न लावता बाहेर जायचे आणि बाहेर गेल्यावरच पंख उघडायचे.

प्रचि १९ : घरट्याची प्रगती

प्रचि २० : बांधकामाची प्रगती पहाणारा सुपरवायझर

प्रचि २१ : जाळीवर बसलेला बुलबुल (पुन्हा लालबुड्या हे नाव सार्थ... Lol )

प्रचि २२ : घरट्याची आणखी प्रगती

प्रचि २३ : शेवटचा हात (चोच) फिरवताना (Finishing Touch)

प्रचि २४ : बांधून झालेले घरटे

(हे सर्व प्रचि मात्र हॉल मधून अथवा बाल्कनीतून काढल्यामुळे AGAINST THE LIGHT आहेत आणि त्याच्या मर्यादा ह्या फोटोंमध्ये उमटलेल्या आहेत).

प्रचि २५ : पण म्हणूनच संधीप्रकाशातला बुलबुलाचा हा Silhouette

हेही घरटे दिसामासाने पूर्ण झाले. आई बराच वेळ घरट्यात बसायला लागली. पण ह्या वेळी मात्र आम्ही ठरवलं होते कि त्यांच घर पूर्ण होणं आणि बालसंगोपन महत्त्वाचे. फोटोग्राफी एकतर दुय्यम किंवा बिन महत्त्वाची.
काही दिवसांनी पिल्लांचे अगदी कान देऊन ऐकलं तरच ऐकायला येणारे बारीक बारीक आवाज यायला लागले..
मग आवाज हळूहळू अजून स्पष्ट झाले. बुलबुल जोडीच्या चोचीत काहीतरी घेऊन फेऱ्या वाढल्या. पण आम्ही मात्र जरा लांब-लांबच राह्यलो. पण एके दिवशी मात्र पिल्लाचं डोकं असावं असं भासणारा भाग घरट्यात दिसला.

प्रचि २६ :

प्रचि २७ : आणि मग ते पिल्लू वळल्यावर अजूनच स्पष्ट दिसलं.

प्रचि २८ : पिल्लावर लक्ष ठेवणारा बुलबुल.

आवाज आता अधिकच स्पष्ट होत गेले. आणि मग एके दिवशी फक्त एक वासलेली लाल गुलाबी चोच घरट्यातून आकाशाच्या दिशेला बाहेर आलेली दिसली. जोडीने दुसरीही. आईबाबांपैकी कोणीतरी जवळ आल्याचं येत असल्याचं त्यांना नक्कीचं कळलं असावं..

प्रचि २९ :

आणि कळलं होतंही कारण एक बुलबुल चोचीत खाऊ घेऊन दुसऱ्या सेकंदाला घरट्याजवळ हजर झाला.
आणि मग सहोदराच्या अगोदर मला हवंय हे इवलीशी चोच वासून आकांडतांडव आणि आकांत करण्याचे आदिम नाट्य इथेही सुरु झाले.

प्रचि ३० :

पण ह्या “आधी मला,आधी मला” ह्यातच त्यांच्या पुढील आयुष्यातला संघर्षाचा पाय पक्का होत होता. सृष्टीच्या नियमानुसारच .

प्रचि ३१ : घास भरवताना -०१

प्रचि ३२ : घास भरवताना -०२

मग जसा जसा त्यांचा शरीराचा आकार, त्यांच्या चोचीचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला तस तस पिल्लाचं दर्शन जास्त सुलभ होत गेलं आणि भरवणंही टिपता आलं.

प्रचि ३३ : No Demand….? ह्या अधाशी बाळांच पण पोट भरलं तर....

अशातच मग एका शनिवारी बुलबुल आई बाबा बाल्कनीतल्या पावडर पफच्या झाडावर बसून लांबूनच ओरडायला लागले. हे नेहमीपेक्षा वेगळं होतं (कारण ते कायम घरट्याजवळच असायचे).
असेल काहीतरी कारण असं म्हणून मी ऑफिसला गेलो आणि जरा वेळातच माझ्या मुलाचा ऑफिसमध्ये घाबऱ्या घाबऱ्या फोन आला ..... "बाबा, बाबा एक पिल्लू घरट्यातून खाली पडलंय , आपल्या फ्लॉवर बेडमध्ये”.
त्याला नीट लक्ष ठेवायला सांगून मी घरी आलो. तर तोपर्यंत हे पिल्लू एका कुंडीच्या काठावर बसलं होत आणि त्याच्या मागे त्याच कुंडीत खुपसून ठेवलेल्या विटेवर दुसरं पिल्लू.

एक मात्र होतं ... कि त्यांचे आई बाबा तिथेही त्यांना अधूनमधून सोबत करत होते, आणि त्यांची पिल्लांना भरवा भरवी चालूच होती.
रात्री पिल्लांच काय होईल, त्यांना थंडी सहन होईल का? या विचारात रात्र गेली. सकाळी पाहिलं तर कुंडीच्या काठावरून आणि विटेवरून दोन्ही भावंडं कुंडीतल्या मातीत उतरून एकमेकांना चिकटून एकमेकांच्या उबेत पहुडलेली आणि त्यांच्या आईबाबांचा मात्र Piegeon Net वर बसुन आख्या गॅल्लरीत जागता पहारा.

प्रचि ३४ :

साधारण दहा नंतर त्यातल मोठ पिल्लू सोनचाफ्याच्या झाडावर जाऊन बसलं. अधूनमधून जागा बदलत होतं कधी वरच्या फांदीवर, कधी खालच्या फांदीवर जात होतं.

प्रचि ३५ :

प्रचि ३६ :

प्रचि ३७:

प्रचि ३८:

प्रचि ३९:

हे पिल्लू तसं छान पिसं फुटलेलं होतं. अगदी हुबेहूब नाही पण बरचसं त्याच्या आईबाबांसारखं दिसणार फक्त त्याला बिचार्‍याला अजून शेपूटच फुटली नव्हती Lol आणि मानेला, डोक्याला, गळ्याला कमी पिसं होती.
एरवी कळायचं नाही पण मान ताणली कि मान आणि गळा उघडा पडायचा आणि आतली लालसर त्वचा दिसायची. आणि वारा आला कि डोक्याची पिसं उलटी होऊन आतल छानसं टक्कल दिसायचं.

प्रचि ४०:

आई किंवा बाबा जाळीतून आले कि मात्र हे पिल्लू तोंड त्यांच्याकडे करून डोक / मान ताणून, चोच वासून भरवण्याची डिमांड करायचं.

प्रचि ४१ :

आणि त्याची ही YouTube Link : https://youtu.be/Yj8nEkOhFTs

दोन तास हा सिलसिला जारी राहीला.
आणि मग त्याने आमच्या हृदयात धडकी भरवणारी गोष्ट केली....
ते सरळ जाळीवर जाऊन बसलं. तोंडही बाहेरच्या बाजूला. पिल्लाचे आईबाबा त्याच्या दोन्ही बाजुला होते आणि आम्ही मात्र अस्वस्थ पिल्लाला आत आणायच कि नाही, त्याला हात लावलेला चालतो कि नाही, कि हात लावला तर त्याला इतर जण टोचून मारतात यावर ऊहापोह करत असताना, इंटरनेटवर शोधाशोधी चालली असताना त्या बाळाने बाहेर झेप घेतली.
आई बाबा बाणासारखे त्याच्या मागोमाग गेले. पिलाच उडणं काही पाहता आल नाही. कुठल्यातरी झाडामध्ये / झुडपामागे गेला असावा. पण आईबाबा मागे गेले म्हणजे ते पिल्लू घरट्यातून बाहेर फ्लॉवर बेडवर पडल्यावर त्याची जशी काळजी घेत होते, भरवत होते तसंच इथेही करतील असा आशावाद आम्ही व्यक्त केला.
मग दुसरा अध्याय सुरु झाला. दुसरं पिल्लू जे थोडस लहान होतं, ते दिवसभर कुंडीत बसून होत.
“एकट बिचारं” की आता बिना स्पर्धेचा “खूष आणि अनभिषिक्त युवराज”....?

दिवसभर अधूनमधून आईबाबा होतेच सोबत. आता त्यांना बहुतेक डबल डयुटी लागली होती. मोठ्या पिल्लाकडे आणि धाकट्या पिल्लाकडे. संध्याकाळी मात्र हेही पिल्लू खाली उतरलं फ्लॉवर बेडच्या स्लॅब वर. आता ते कुंडया कुंडयाच्या मधल्या जागेतून फिरत होत आणि कुंडयाच्या मागच्या बाजूच्या अंधारात विसावत होत. (आमचा Flower Bed बाल्कनीच्या स्लॅबपेक्षा खाली (Sunken) आहे आणि त्याची बाहेरची बाजू परत उभ्या स्लॅब/ बीमच्या स्वरूपात वर आलीय. चॅनेलच्या आकाराचा म्हणा नां ‍ l_l )
बऱ्याच वेळेला ते दिसायचही नाही. पण ज्या झाडावर, जाळीवर आम्हाला त्याचे आईबाबा दिसायचे तिकडे कुठेतरी जवळ कुंडीमागे लपलं असावं. दुसरा दिवसही त्याने असाच काढला. तिसऱ्या दिवशी मात्र ते Flower Bed च्या मोकळ्या स्लॅबवरच होत. छोटया छोटया उड्या मारत इथे तिथे जात. नंतर ते गायब झाल आणि शोधलं तर आमच्या Royal Palm च्या एका झावळी खाली सावलीत बसलेलं दिसल.

प्रचि ४२ :

नंतर त्याने आपली फक्त मान बाहेर काढली त्या पामच्या पानांमधून आणि उत्सुक नजरेने इथे तिथे डोकवायला लागलं.

प्रचि ४३:

त्याचा पुढचा प्रवासही मग मोठया भावंडा सारखाच ह्या फांदीवरून त्या फांदीवर झाला.

प्रचि ४४:

दीड दोन तास हा आनंद त्याने आम्हाला दिला. नंतर ते फ्लॉवर बेडच्या कठड्यावर जाऊन बसल. आणि नंतर कार्टून फिल्म मधली पक्ष्यांची पिल्लं जशा टाण टाण उडया मारतात तशा टणा टण उडया अगदी जोषात मारत ते कठडयाच्या कट्यावरून पुढे गेलं.
आता वाढलेल्या झाडांमुळे ते आम्हाला दिसत नव्हतं. मग आम्ही आमच्या बेडरूमच्या खिडकीकडे धावलो जिथून फ्लॉवर बेडचा पिल्लू असलेला कोपरा दिसत होता. त्याचे आई वडिल समोरच्या गुलमोहोरच्या झाडावर येऊन बसले होते आणि त्याला साद घालत होते. पिल्लूही मजेने प्रतिसाद देत होतं.
हळू हळू ते कठडयाच्या टोकाला गेलं. जाळीतून अंग बाहेर काढल आणि दोन मिनिट त्या चौथ्या मजल्याच्या उंचीवरून बाहेरची दुनिया बघून, तिचा अंदाज घेत बाहेर भरारी मारली. उडणं ग्रेसफुल नव्हतं, पण आश्वासक होतं. थोडस अडखळतं पण पडणार नक्कीच नाही हा आपल्याला विश्वास देणारं. आई बाबा त्याच्या आजूबाजूने बाणासारखे सुसाटले. पिल्लू विसावल ते आमच्या कंपाऊंड मधे लावलेल्या पिवळ्या बांबूवर (Golden Bamboo). ह्या बेडरूमच्या खिडकीलाही जाळी होती. बाल्कनीच्या जाळीपेक्षा जास्त बारिक. पण त्यातूनही कॅमेऱ्याने पिल्लू टिपण्याचा प्रयत्न केलाय.

प्रचि ४५ :

प्रचि ४६ :

प्रचि ४७ :

एक बुलबुल बांबूच्या पुढच्या झाडावर बसून लक्ष ठेवू लागला तर एक गुलमोहोराच्या झाडावर परत आला आणि तिथून लक्ष ठेवू लागला.

प्रचि ४८ :

ऑफिसला जायची वेळ होईपर्यंत जवळ जवळ पाऊण तास पिल्लू त्याच ठिकाणी होतं. नंतर परत कधी तिथे दिसलं नाही पण पुढचे तीन चार दिवस नजर मात्र रोज सकाळी आशेने तिथेच जात होती, पिल्लाला शोधण्यासाठी.
हे बुलबुलांचं एक बाळंतपण (खरं तर दुसरं) आणि पहिलं बालसंगोपन दिसामाजी आणि सुटीच्या दिवशी तर सारखं जरा जरा वेळाने पाहिलं.
पिंजऱ्यामध्ये पक्षी पाळणं आणि आपल्या कलाने त्यांना पाहणं यात आणि आपल्या सभोवती पक्षाने स्वतः बांधलेल्या घरट्यातून त्यांचे सर्व जीवनव्यापार त्यांच्या सोयीने, त्यांच्या कलाने, त्यांना disturb न करता आणि संपूर्ण निसर्गतया पहाणं यांत जमीन अस्मानाचा फरक आहे.
काडी काडी जमवून त्या पक्षांच्या जोडीने चोच आणि पाय ह्या मर्यादित साधनांच्या मदतीने बांधलेलं घरटं , त्यात अंडी घालणं , उबवणं , पिल्लं बाहेर आल्यावर आळीपाळीने उब देणे, त्यांना चारापाणी देणं, घरट्यामध्ये नसलं तरी कायम आजूबाजूच्या झाडावरून त्यांच्यावर लक्ष ठेवणं, विशिष्ट आवाजांनी त्यांना आल्याची जाणीव करून देणं, त्यांच्या सादेला प्रतिसाद देणं, पिलं पुरेशी मोठी झाल्यावर त्यांना घरट्या बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करणं आणि पहिल्यांदा मोठी भरारी घेतल्यावर तिथेही सोबत करणं हे सारं सारं पाहिलं, अनुभवलं.
एवढासा जीव ,चिमुकला मेंदू , मर्यादित बुद्धी पण कुठेही माता पित्याच्या कर्तव्यात कुचराई नाही.
खरंच , निसर्गाचा महिमा अगाध आहे.
हे सर्व समरसून पाहिल्यावर कुठे तरी पसायदान आठवतं आणि संत ज्ञानेश्वरांची
"जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||"
ही चराचराला सुखी करावं, चराचराने सुखी असावं ही भावना जास्त आकळते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर चित्रण. पक्षी, हिरवीगार झाडे, पाहून अतिशय प्रसन्न वाटले.
बुलबुल हा पक्षी खूप निरिक्षण केल्याशिवाय घरटे बांधण्याची जागा ठरवत नाही.
या दांपत्याने नक्कीच तुमचे कसून परिक्षण केले असणार आणि ते पण अनेक महिने Happy
एकदा विश्वास बसला की मग काही नाही, कारण माझ्या मैत्रिणीच्या घरी पण पहिल्या मजल्यावर, सप्तपर्णीच्या मोठ्या कुंडीत लावलेल्या झाडावर, अगदी हाताला येइल इतपत उंचीच्या फांदिवर बुलबुल ने घर केले आहे.
ती बोलली की रोज सकाळी ती आणि तिची बहिण चहाला बाल्कनीत बसायच्या तर हे दोन पक्षी तिथे येत असत, ठरलेली वेळ होती. अनेक महिने त्यांनी पारखल्यावर घर बांधले यांच्या बाल्कनीत Happy

सुंदर आणि ओघवत लिखाण आणि तेवढेच सुंदर फोटो .

फार मजा आली वाचताना .

आमच्या बाल्कनीतल्या रिकाम्या कुंडीत एकदा कावळ्यांनी घरटं करून त्यात तीन पिल्लं ही झाली होती. तेव्हा हे सगळं
फार जवळून अनुभवलंय. चोचीत अन्न भरवणे, उन्ह आली की पिल्लांना पंखाखाली घेणं, त्यांचं सतत रक्षण करणे , थोडं थोडं चालायला आणि उडायला शिकवणं आणि शिकणं आणि पंखात बळ आलं की उडून जाऊन घरटं रिकामं करणं .... कावळ्याची पिल्लं ही काळी असली तरी फार गोड दिसत असत .

सुंदर फोटो!
घरट्याचा गोलाकार पण काय व्यवस्थित आहे अगदी! Happy

खूप सुरेख लिहिलंय, मी सुद्धा पिल्लाच्या मागून धावायला लागलेले। Happy

तुमच्याकडे मांजरे नाहीत काय? आमच्याकडे मध्यंतरी मांजरांची वेकॅनसी होती तेव्हा एक पिटुकला फुकचुखया झोपायला यायचा गॅलरीत. आता आमचा एडगर कोणालाही पंख विसावायला देत नाही.

पिल्ले उडताना तुम्ही हस्तक्षेप केला नाही ते बरे केलेत, उगीच पिल्लाला काही झाले असते तर रुखरुख लागली असती.

अतिशय सुंदर निरु
तुमच्या फोटोग्राफिला सलाम. पुर्वि कोणत्यातरि चैनेलवर फोटोग्राफिवरुन फिल्म तयार केलेलि पाहिलि ति आठवलि
अश्याप्रकारचि फोटोग्राफि करन्यासाठि खुप पेशन्स लागतात.
पिल्लांना भरवतानाचा फोटो अगदि अप्रतिम आलाय.

लालबुड्या बुलबुलचे घरटे याआधी पण बघितले अनुभवले असल्याने काही कौतुक नाही. Happy

तुतीचे एवढे सुंदर फोटो टाकल्याबद्दल निषेध))))) +101

कुंडीत तुतीची लागवड होते व त्याला फळेही येतात ही आल्हाददायी बातमी दिल्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद Happy

स्निग्धा, कृष्णा, रीया, उमेशप, मॅगी, आरती., शोभा१, मनीमोहोर, वैद्यबुवा, mr. pandit, कांदापोहे ....
सर्वांना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद....

सुंदर फोटो आणि मस्त वर्णन ! ते अंड एका घरट्यातुन दुसर्‍या घरट्यात घेऊन जाणं मोठं जिकीरीचं काम असेल.
खरच मजा आली वाचताना.

Wow!! Amazing experience!! Very well written and photographed!!
आआई व पिल्लाची शिकवणी observe करणं हा पण खुप मस्त विरंगुळा आहे.. सर्व photos अप्रतिम...
thank you for sharing such a wonderful experience!!! Happy

@ दक्षिणा.....
पहिल्या घरट्याच्या वेळची जोडी धीट होती..
आम्हीही रोज सकाळी बाल्कनीत चहा प्यायचो पण त्यांना काही फरक पडत नव्हता...
दुसर्‍या लाजर्‍या जोडप्याच्या वेळी मात्र ही प्रथा बंद झाली... (सवयीने आणि त्याहुनही ते परत येईल ह्या आशेनी ती अजूनही बंद आहे.)
प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद..

@ साधना,
पूर्वी फक्त एकदाच मांजराचे एक पिल्लू 7 दिवसांसाठी दत्तक घेतल होतं, त्याचे मूळ पालक बाहेरगांवी गेले होते म्हणून..
तिसर्‍याच दिवशी ते फ्लॉवर बेडच्या बाहेरच्या कट्ट्यावर गेल होतं.. जाळीही नव्हती तेव्हा बाल्कनीला..

खर तर आमची _ _ __. Uhoh

एकतर लहान पिल्लू आणि तेही दुसर्‍याचं..
पण काय रुबाब आणि दरारा होता त्याचा.
नेहमी आमच्याकडे खाणं मागायला येणारा कावळा गायब.. आणि कबुतरं तर बेपत्ता....
जमलं तर फोटो देतो इथे....
आणि निषेधाची नम्र नोंद घेण्यात आली आहे... Wink

श्री, Piku....
धन्यवाद...
आणि श्री, साधना बरोबर म्हणतायत...
पहिल्या घरट्यातली अंडी गायबच झाली...
शेवटपर्यंत पत्ताच लागला नाही..
(ह्या विषयावर मला वाटत अवल यांचाही धागा आहे...)

आमच्या अंगणात एका झुडपात बुलबुलाचे घरटे आहे. त्या घरट्यातली ही अंडी आणि जस्ट बाहेर आलेली पिल्ले.

Pages