टारझन द वंडर कॅट भाग ०१ - घरामधल्या आठवणी

Submitted by अ'निरु'द्ध on 14 April, 2020 - 10:13

टारझन द वंडर कॅट भाग ०१ - घरामधल्या आठवणी…

Tarzan The Wonder Cat : Part 01 : Inside The House

मुखपृष्ठ :

माझ्या लहानपणी आम्ही खूप प्राणी पक्षी पाळले.
मी पहिलीत वगैरे असताना एकदा वडिलांच्या फॅक्टरी मधून एक वर्कर आमच्याकडे एक खारीचं पिल्लू घेऊन आला होता. त्या पिल्लाला आम्ही आमच्याकडे वेताच्या बास्केटमध्ये ठेवून घेतलं. सुरुवातीला त्याला बोळ्याने दूध पाजायचो.
चार-आठ दिवसांनी बास्केटचं झाकण उघडं ठेवलं तरी बास्केटला घर मानून आणि आमच्या घराला अंगण मानून ते घरभर फिरायला लागलं . जरा मोठं झाल्यावर गॅलरीतून झाडावर जायचं आणि दिवसभर झाडावरच असायचं. अधून मधून खायला प्यायला घरी यायचं आणि झोपायला रात्री मात्र घरीच असायचं.
घरी पाहुणे आले आणि त्यांना दाखवायला त्याला बोलवायचं असलं तर, एक तर गॅलरीत जाऊन खोबरं खवत बसायचं किंवा कडक बुंदीचा लाडू हातात धरून दाखवायचा की सुर्रकन झाडावरून पळत पळत यायचं.
मी थोडा मोठा झाल्यावर डालडा आणि उमदाच्या डब्यात खेकडे पकडून पाळायला सुरुवात केली, नांगीसकट (नाहीतर ते जेवणार खाणार कसे ?)
मासे तर कायम असायचेच आणि एकदा कासवही होतं.
त्यानंतर आम्ही कबूतरं पाळायला सुरुवात केली आणि एका कबुतराच्या जोडी वरून हळूहळू ७५ जोड्यांपर्यंत पोहोचलो. नंतर तो व्याप एवढा प्रचंड वाढला की मग ते बंद करायला लागलं.
यानंतर धाकट्या बंधुराजांनी एकदा शॅमेलिऑन सरडा पाळायला आणला होता. त्याला रिकाम्या फिश टॅंक मध्येच ठेवलं होतं.
आणि यानंतरचा शेवटचा प्राणी म्हणजे अजगराचे पिल्लू. दोन महिने त्याला बेडूक वगैरे खायला घालून शेवटी जवळच्या जंगलात सोडलं. त्यानंतर मात्र आम्ही कोणताच प्राणी पाळला नाही.
नंतर लग्न झालं.. बायकोला प्राण्यांची आवड नव्हती म्हणा किंवा पूर्वानुभव नसल्यामुळे सवय नव्हती म्हणा पण काहीच पाळलं गेलं नाही.
अपवाद फक्त दोन; घरी एक लिली पॉन्ड केलं होतं त्यात सोडलेले आणि भराभर प्रसवणारे गप्पी आणि स्वोर्डटेल मासे आणि नंतर भराभर अंडी घालणारे आणि ती उबवून पिल्लांना जन्म देणारे रंगीत लवबर्ड्स.

पण नंतर मात्र माझ्या मुलीला मांजरांच वेड निर्माण झालं.

सारखे आपले मोबाईलवर मांजरांचे युट्युब व्हिडीओज किंवा इंस्टाग्राम पिक्चर्स किंवा इंस्टाग्राम व्हिडिओज बघणं सुरु झालं
शेवटी तिच्यासाठी मांजराचं पिल्लू आणायचं ठरवलं. एखादं चांगल्या ब्रीडचं आणायचं की कसं याच्यावर संशोधन सुरू झालं आणि शेवटी हा निर्णय झाला की रफ अँड टफ आणि आपल्याकडचं वातावरण सगळ्यात जास्त सहन करू शकणारं म्हणून आपलं देशी मांजरच आणूया.

मग शेवटी तिच्या नकळत आमच्या कामवाल्या मावशीना त्यांच्या घराच्या आजूबाजूला एखादं छानसं मांजराचं पिल्लू मिळते का ते बघायला सांगितलं.
शक्यतो भाटी किंवा मनी नको, बोका असला तर जास्त चांगलं. म्हणजे मग घरात सारखी सारखी बाळंतपण नकोत असं तिला बजावलं आणि मग 12 ऑगस्टला तिला सरप्राईज म्हणून आमचा टारझन घरात आला.
आला त्यावेळेला जेमतेम एक महिना पूर्ण झाला होता निदान तीन महिने तरी त्याला त्याच्या आईकडे वाढू दे म्हणून आम्ही मावशींना विनंती केली पण त्या म्हणाल्या तोपर्यंत त्या भागात ते पिल्लू टिकायचं नाही. कोणीतरी मारेल तरी नाहीतर घेउन जातील म्हणून मग शेवटी ते छोटे बाळंच आमच्याकडे ठेवून घेतलं.

त्या बाळाची, टारझन ची वयानुसार ही प्रकाश चित्रे आणि व्हिडिओज :

सुरुवातीला हे बाळ बावरलेलं होतं.
दोन चार दिवस पहिल्या रुळण्यात गेले.
सुरवाती सुरवातीला जास्त करून आडोशाला असायचा किंवा सोफ्याखाली जाऊन बसायचा. (आता एवढा मोठा झालाय कि तो स्वतःही सोफ्याखाली जायचा विचार करत नसेल.)
दुसरं आकर्षण म्हणजे टोपलीत किंवा एखाद्या खोक्यात जाऊन बसायचं.
अगदी सुरुवातीपासूनच तो स्वतःहून बाथरूमच्या नहाणी ट्रॅपवर जाऊन सू करायला लागला.
दोन दिवसातच त्याच्या शी सू साठी एक प्लास्टिकचा ट्रे आणला आणि त्यात Cat Litter पसरले. अधून मधून त्याला त्या ट्रे मध्ये सवयीसाठी बसवायचो.
मग शी सू आली कि तो स्वतःहूनच त्यात जाऊन देहधर्म उरकायला लागला.
सुरुवातीला त्याला थोडं पाणी घातलेलं दूध देत होतो. आणि चपाती दूधात बुडवून. पण तो चपाती न खाता नुसतं तीला लागलेलं दूध चाटून प्यायचा. आणि या प्रकारामुळे तो पाणीच पित नव्हता. नंतर मात्र त्याला मासे द्यायला सुरुवात केली. ते त्याने आवडीने खाल्ले. आणि आजही त्याची ती आवड टिकून आहे. आता दूधही पित नाही. आणि बाकीही काही खात नाही. फक्त मासे आणि थोडंसं Cat Food.

मग ह्या बाळाला रमवायला खेळणी आणायची सुरुवात झाली. पण त्याचं आवडणारं खेळणं म्हणजे चॉकलेटच्या चांदीचा बॉल .
त्याला उंदीर किंवा तत्सम सजीव समजून त्यावर डावली मारणं , त्याला पंजाने अलगद किंवा जोरात ढकलणं आणि मग फुटबॉल सारखं खेळणं यात खूप रमून जायचा. पण त्या चेंडूचा पाठलाग करताना कितीही जोरात पळाला तरी कधीही कुठेही भिंतीवर जाऊन आदळला / आपटला नाही.

प्रची 01. अगदी आला तेव्हाचा एकदम बाळ असलेला टारझन…

प्रचि 02. अजून एक त्याच वेळेचा फोटो..
टोपलीत छान बसलेला..
थोडासा साशंक पण असेल कदाचित...

प्रचि 03. त्याच टोपलीत मग तो खेळण्यांना कुशीत घेऊन निवांत झोपायला शिकला..
आणि तेही अगदी अंग असं वेडवाकडं ताणून..

प्रची 04. माझ्या मांडीवर आणि पोटावर विसावून झोप काढताना...

प्रचि 05. लहान असल्यापासून तो झोपायचा तो एकदम घोडे बेच के आणि मग कधीकधी अशी गुलाबी जिभली बाहेर यायची...

प्रचि 06. याची अजून एक सवय म्हणजे कुठल्याही गोष्टीचा बॉक्स, खोका असं काही घरात आलं की स्वारीला सगळ्यात आधी त्याच्यामध्ये जाऊन बसायचं असायचं...

प्रची 07. आणि नंतर कधीकधी त्या लहानशा खोक्यातही हा अंगाची निवांतपणे गुंडाळी करून गाढ झोपी जायचा...

प्रची 08. ह्याचा दुसरा आवडता छंद म्हणजे कुठलाही ड्रॉवर/खण उघडला, कपाटाचं दार उघडलं की आधी आत घुसून कपडे, फडकं अशी कुठली मऊ गोष्ट असेल तर त्याच्यावर जाऊन बसायचं...

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि 11. वत्सलभाव...

प्रचि 12. माळ्यावरच्या सामान काढायच्या शिडीच्या पायऱ्या चढणं आणि उतरणं हा त्याचा मोठा खेळ.
एक अजगर त्याचा मोठा शत्रू होता…
तो शिडीच्या वरच्या पायरीवर दिसतोय तोच..
लहानपणी त्याच्याशी मारामारी करून, त्याच्या मानेला धरुन खाली उतरायचा आणि मग कृतकृत्य नजरेने आमच्याकडे बघायचा…
एकदम शाबासकीच्या अपेक्षेने...

प्रचि 13 : पुढे घरात अजून रुळल्यानंतर घरातलं कोणी शिडीवर काही काम करत असेल तरीसुद्धा हा कम्फर्टेबल असायचा आणि पायऱ्यांवर बसून उरलेल्या माणसांकडे टकमक बघत बसायचा...

प्रचि 14. त्याचा अजून एक चाळा म्हणजे घरात प्लास्टिकच्या पिशव्या आल्या की त्याच्यामध्ये डोकं घालून शिरायचं आणि मग आतून उलटं फिरून डोकं बाहेर काढायचं आणि पिशवीतच बसून राहायचं... मग होता होता कधीकधी पिशवीतच झोपही लागायची...

प्रचि 15
कुठेही बाहेर जायला सामान भरण्यासाठी बॅग काढली की त्या बॅगेत जाऊन बसणं हा त्याचा हक्क..
बॅग मोकळी असली तरी बसायला चालेल आणि कपडे, टॉवेल, चादरी असं काही भरलं असेल मग तर सुखाची परमावधी...

प्रचि 16. दोन उशा किंवा तक्के एकमेकांवर तिरके टेकवून गुहा तयार केली की मग हा त्या गुहेतून लपून आपल्याकडे पाहणार, बोट पुढे केलं तर डावली मारणार, इकडून तिकडे, तिकडून इकडे आरपार पळापळ करणार….
कारण हे सगळं भयंकर आवडीचं...

प्रचि 17. दोन बाजूंनी पायपुसणं जवळ घेतलं आणि मध्ये अशी गॅप झाली की लगेच असा आत शिरून बसायचा.

प्रची 18 चादरींची तीच तऱ्हा..

प्रचि 19 बेसिन ह्या गोष्टीबद्दल त्याला भयंकर कुतूहल…
लहान असताना पुढचे दोन पाय बेसिन वर ठेवून आमच्याकडे टकमक बघत बसायचा..
छोटीशी पाण्याची धार सोडली कि त्या धारेकडे, त्या धारेचं बेसिनमध्ये पडणारे पाणी जरावेळ बघायचा आणि मग प्यायला सुरुवात करायचा…

प्रचि 20
हा त्याचा एक बेसिन वरचा क्लोजप...

प्रचि 21
थोडा मोठा झाल्यावर बेसिनमध्येही बसायला लागला.. काचेमुळे थंड वाटत असेल कदाचित आणि छान गुळगुळीतही..

प्रचि 22
मधेच बेसिनच्या नळाला तोंड लावून पाणी येतंय का ते तपासून बघतोय...

प्रचि 23 आणि हा रितसर बेसिन मधून पाणी पिताना…
कारण नंतर नंतर ताटलीत काढून ठेवलेल्या पाण्यापेक्षा वाहतं पाणीच प्यायला त्याला आवडायला लागलं..

प्रची 24. बराचसा माझ्या अंगावर पसरुन एक पाय शेजारी ठेवून माझ्याकडे बघताना...

प्रचि 25.
मधेच वर उचललेली मान आणि भेदक नजर...

प्रचि 26. घरातल्या फर्निचरच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात लीलया पोहोचणे आणि तिथेच बसणं, झोपणं, पहारा करणं…
हे ही आवडायचं त्याला..

प्रचि 27
बाल्कनीला लागून असलेल्या फ्लॉवरबेड मधे जाण्यासाठी कठड्यावरून उतरताना...

प्रचि 28 : फ्लॉवर बेडच्या कट्ट्यावर..

प्रचि 29 : एकूणच मांजरांना आंघोळ घालणं हे प्रचंड मोठं काम..
आंघोळीनंतर टॉवेलमध्ये गुंडाळलेला टारझन...

प्रचि 30. ड्रेसिंग मिरर समोर :
खुदसे खुदको खुन्नस….?
स्वतःच स्वतःचा रुबाब निरखणं…?
की आपुलाची संवाद आपणासी…?

प्रचि 31

चाहूल लागल्यावर वळून आमच्याकडे बघताना…..

वरची 32. ड्रेसिंग टेबलवर...

प्रची 33
हा प्राणी कुठल्याही खोक्यात शिरायला भयंकर उत्सुक असायचा… म्हणून पार्सल्स आल्यावर त्यातला एक मोठा खोका घेऊन मी आणि मुलांनी त्याच्यासाठी त्या खोक्याचं घर बनवलं..
आत जायला दरवाजा, बाहेर डोकावण्यासाठी गोल खिडकी, मागच्या बाजूने आतून टेरेस वरती (खोक्याचा टाॅप) येण्याजाण्या साठी एक कट आउट, टेरेसवर मागच्या बाजूला एक बुटांचा खोका (अजून एक वरचा मजला म्हणून), बसण्यासाठी आत मध्ये एक छान जुनी चादर आणि काय न काय…

हा त्याच्या खोके घराचा फोटो क्लोजअप.
त्यात मागच्या बाजूने खोक्याच्या टेरेसवर यायचा कट आउटही दिसतोय..
आणि अजून एक वरचा मजला बुटांच्या खोक्याचा..

प्रची 34

हे साहेब या घरात एकदाच घुसले... एकदाच खिडकीतून डोकावले... एकदाच गच्चीवरची बसले...
आणि नंतर या खोक्या कडे ढुंकूनही बघितलं नाही..
आमची सगळी मेहनत वाया...

प्रची 35. : टीव्ही युनिटच्या ग्रे रंगसंगतीशी मर्ज झालेला टारझन...

प्रची 36 : बाल्कनी जवळच्या कट्ट्यावर हिवाळ्यामध्ये...

प्रचि 37 :
पितळी थाळ्यामध्ये झोप...
थाळ्याच्या गोलाप्रमाणे अंगाचा गोल करून झोपलेला टारझन...

प्रचि 38 :

पुन्हा एकदा कॅबिनेटच्या वर..

प्रची 39 :
कधी कधी शेल्फ वरच्या सगळ्या पसाऱ्यात गुपचूप जाऊन बसला की Camouflaged होऊन जायचा आणि खोलीत असलो/गेलो तरी पटकन लक्षातही यायचं नाही की हा प्राणि याच खोलीत आहे म्हणून..

प्रचि 40 :
हा प्रसंग खूप छान लक्षात राहिलाय..
बाहेर मोठा पाऊस पडून गेला होता.
आता पावसाची टिपटिप चालू होती..
लेक एक पेंटींग अर्धवट टाकून चहा प्यायला उठली होती.
आणि ती जागा सोडून उठल्या उठल्या ह्याने त्या जागेचा कब्जा घेतला होता.
आणि जसं आपण घरात खिडकीजवळ बसून पाऊस एंजाॅय करतो तसं हा त्या पेंटिंग साहित्याच्या पसार्यात बसून खिडकीबाहेर पाऊस बघत, बाहेरच्या पिंपळाच्या झाडाकडे बघत निवांत बसला होता..

प्रची 41
मगाच्या मधल्या टप्प्यावरुन आता मात्र कॅबिनेटच्या सगळ्यात वरच्या भागावर जाऊन मस्त झोप काढताना...

प्रची 42. फ्लॉवरबेड वरून घुमणाऱ्या कबूतराकडे डोळे मोठे करून पाहताना...

प्रची 43 :
बाल्कनीतल्या चिमण्यांकडे लक्ष ठेवून.. पण तुम्ही तुमच्या आणि मी माझा हा आविर्भाव..

प्रची 44 :
लादीवरची ऐटबाज पोज…

प्रची 45 : खुन्नस की नजर...

प्रची 46

याची अजून एक सवय म्हणजे घरातलं कोणीही कुठलंही कार्यालयीन सदृश्य काम करायला बसलं म्हणजे लॅपटॉप वर काम करणं, ड्रॉइंगवर किंवा प्रिंटवर काम करणं किंवा पेपर वाचन….
जरा का या गोष्टी पसरल्या किंवा उघडल्या की हा असेल तिथून येऊन बरोबर त्याच्यावर बसणार आणि निरिच्छ आव आणून माझा काय संबंध असं दर्शवत त्यावरच येऊन पहुडणार…
सध्या ह्याची नजर आणि विश्रांती लॅपटॉपवर..
त्या लॅपटॉपचा मालक तोच हे बहुतेक म्हणणं..

प्रची 47

ड्रॉइंग वर काम करायला घेतलं की ड्रॉइंग वर येऊन बसणं… खरतर पसरणं हा हे पाचवीला पुजलेलं….

प्रची 48
हा खिडकी बाहेरच्या डक्ट मधल्या चिमण्यांवर ओरडतानाचा फोटो...

प्रची 49

थंडीमध्ये स्वेटरमध्ये गुंडाळलेला टारझन...

प्रचि 50
पांघरुणात घुसून उब घेताना आणि डोकावताना..

प्रची 51 पर्सच्या बंदां मध्ये स्वतःच स्वतःला गुरफटून घेऊन उशी मागे चाललेले संशोधन...

प्रची 52

खिडकीतून चाललेली रहदारीची उच्च स्तरावरुन पहाणी...

प्रची 53
लहान असल्यापासून लोळणं हा अजून एक जन्मसिद्ध हक्क..

प्रची 54

झोपताना घोडे विकून झोपणं हे कायम..
अर्थात हे घरामधे.. ज्यात त्याला खूप सुरक्षित वाटतं..(घराबाहेर मात्र सावध झोप)
घरात पाहुणे आले तर बेडखालच्या गॅपमध्ये जायचं आणि तिथेच ताणून द्यायची..

प्रची 55

पाय माझे अंतराळी…
निज माझ्या डोळ्यांवरी...

प्रचीन 56

एवढं फ्लेक्झिबल बनण्यासाठी अशी योगासनं रोज करतो आम्ही...

प्रची 57 :
आणि उशीवर माणसांसारखं पण डोकं ठेवून झोपता येतं की आम्हाला...

प्राणि पाळले की त्याचे बरेचसे त्रासही असतात आणि बरचसं सुखही..
पण हे ज्यावेळी प्रत्यक्ष करु त्याचवेळी पुर्णांशाने कळतं…

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच फोटो. टारझन खूपच गोड आहे. फोटोजेनिक तर आहेच पण त्याला स्वतःचे फोटो घेतलेले आवडतात असं दिसत .. camera loving.

ओहो काय मस्त आहे टारझन.
यातल्या बहुतेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत.
खोके आणि मांजरांचं काय नातं आहे कुणास ठाऊक. त्यांच्यासाठी बंगले बांधा, पण ते खोक्यातच जाऊन बसणार. 'लास्ट बॉक्स ऑफ द वर्ल्ड' फोटोची आठवण झाली.
मोठं झाल्यावर डोळ्यांचा रंग बदललेला वाटतोय.

आईग्ग कस्लं गोड बाळ आहे!!!! :बदामडोळ्यांची बाहुली: एवढा मायाळू डोळ्यांचा बोका मी पहिल्यांदाच पाहतेय. लाडवलेला गोंडू वाटतो नुस्ता! माझ्याकडून एक सुका मासा द्या त्याला. Happy
आमचा ओरीही उशीवर डोकं ठेऊन झोपायचा, पण फाडली त्याने Lol

VB, पाथफाईंडर प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

@ हीरा : नाही हो. लहान असताना सर्व मांजराप्रमाणे अतिशय अवखळ, गडबड्या आणि Over Enthusiastic होता. त्यामुळे मौका मिळाला, दमून स्वस्थ बसला किंवा झोपला तरंच फोटो काढता यायचे.
मोठा झाल्यावर पुन्हा इतर सर्व बोक्यांप्रमाणे अलिप्त, आत्ममग्न आणि Least Bothered about Anybody ह्यामुळे बऱ्यापैकी फोटो काढता आले..
पण कॅमेरा कडे बघण्यासाठी हाका मारणं, चुटक्या वाजवणं वगैरे सर्व प्रयत्न ठार फेल..
त्यामुळे नशीब हा एकमेव Factor..

@ वर्षा : हो. लहानपणी स्लेट ग्रे रंगाचे होते डोळे.. प्रेमळ, सात्त्विक.. आता पिंगट आहेत, ब्राँझ कलर.. बनेल, भेदक.. काही मागायचं असेल तर आत्ताही प्रेमळ होतात. Happy
Last Box of the World फोटो छानच..

@ द्वादशांगुला : गोड तर आहेच.. आणि तो फक्त कच्चे मासेच खातो.. सुके मासे खारवलेले असतात नं म्हणून नाही खात..
आणि याची एक विशेष गोष्ट म्हणजे याने आत्तापर्यंत एकही गोष्ट फाडलेली नाहीये की पाडलेली नाहीये.. Touch Wood.
लहानपणी घरी असताना सोफा वगैरे Scratch मात्र करायचा.
आता खाली जायला लागल्यावर झाडांवर स्क्रॅचिंग करतो आणि जिने उतरताना प्रत्येक मजल्यावरच्या काथ्याच्या पायपुसण्यांवर..

@ मऊमाऊ : हो. तो मुखपृष्ठवाला फोटो मलाही खूप आवडतो..

वा! मस्तच.. गोड आहे बोकोबा... मांजर आणि बोक्यांच्या करामती खुपच स्ट्रेसबेस्टर असतात..मलाही पाळायचा होता. "कऊ" ह्यांनी मागे पोस्ट केलं होतं..त्यांना पिल्ले द्यावयाची होती... तेव्हा मी विचार केला होता..घेऊया एखादं दत्तक पण आमच्या मॅडम म्हणाल्या.. घरात तुझ्यासारखा बोका असताना अजुन एक कशाला.. Wink

बाय दे वे.. तुमचं घर खुप छान आहे..आय मिन छान डेकोरेट केलयं..

>>>आमच्या मॅडम म्हणाल्या.. घरात तुझ्यासारखा बोका असताना अजुन एक कशाला.. Wink<<<
Lol Lol

अजय चव्हाण, प्रतिसादाबद्दल आभार..

केवढा handsome आहे टारझन. माझ्या कडून एक पप्पी. मी आधी कसा नाही बघितला हा धागा असं वाटतंय, आता रोज येउन टारझन ला बघणार. मला माझ्या चिंग्याची आठवण झाली. त्याला मी एका पावसाळी दिवसात घरी आणलं होतं. केवढुसा होता तो. आणल्या नंतर काही दिवसांनी आजारी पडला कारण खुप वेळ भिजत होता ताप आला त्याला. बरा झाला आणि मग तुमच्या टारझन सारखाच खुप देखणा झाला. मी खुप गप्पा मारायचे त्याच्याशी. मी पोळ्या करताना बाजूच्या कोनाड्यात बसायचा कधी कधी पाठीवर चढून खांद्यावर पण बसायचा. बिल्डिंग बाहेर च्या झाडांमध्ये माझ्याबरोबर खेळायचा. माझ्या लेकाला जेलसी वाटावी इतकं प्रेम त्याचं माझ्या वर आणि माझं त्याच्या वर. अर्थात आमच्या सगळ्यांचाच लाडका होता तो. थँक्यू निरू मला परत चिंग्याला भेटल्यासारखे वाटलं

DSC01134.JPG

आणि आणला तेव्हा असा होता
DSC00980_0.JPG

मन्याऽ, मनीमोहोर, देवकी प्रतिसादाबद्दल आभार..

@ धनुडी, तुमचा चिंग्या पण मस्तच आहे..
मांजरप्रेमी भेटले, प्रतिसाद दिला, मांजरांच्या जुन्या-नव्या आठवणी /फोटो शेअर केले की खरंच खूप बरं वाटतं.
कधीही येऊन धागा वाचला की आपल्या आणि इतरांच्या आठवणी वाचून, वेगवेगळी मांजरं बघून छान वाटतं..

>>> मी खुप गप्पा मारायचे त्याच्याशी. मी पोळ्या करताना बाजूच्या कोनाड्यात बसायचा कधी कधी पाठीवर चढून खांद्यावर पण बसायचा. <<<

ह्याच्यावरुन एक जुनी आठवण जागी झाली त्यासाठी माझ्याकडचा एक फोटो देतो.
हा थोडा जुना फोटो आहे.
टारझन यायच्या आधीचा..
हा सिंबा. सात दिवस उसन्या पालकत्वासाठी आला होता. त्याच्या घरचे बाहेरगावी जाणार होते म्हणून..
तिसऱ्या दिवसापासून मी पेपर वाचायला बसलो आणि मान खाली घातली की असा खांद्यावर येऊन मानेभोवती वेटोळं घालून बसायचा..
हलकं सुखद ओझं.

20181013_003436.jpg

अरे वा मस्तच, मी माझ्या चिंग्याला ये अशा अर्थाने नुसती मान हलवली तरी कळायचं, तो लगेच धावत येउन माझ्या खांद्यावर बसायचा. अर्थात लहान असे पर्यंतच. नंतर खांद्यावर मावेनासा झाला आणि त्याला मी बाहेरून आले कि दार उघडण्या आधीच कळायचं. मी किल्लीने दार उघडायला बाहेर थांबले कि हा घरात जिथे असेल तिथून दाराशी यायचा. बाकिच्यांसाठी नाही, पण मी आले कि, हे माझ्या लेकाने मला सांगितलं.

किशोर मुंढे..... प्रतिसादाबद्दल आभार...
धनुडी, वर्षा ..... छान आठवणी

निरू तुम्ही अनुभवी दिसताय . धागा वर आणल्याबद्धल आभारी आहे . माझ्या धाग्यावर या . खूप लोकांना मांजरी पाळायच्या आहेत तुमच्या अनुभवाचा फायदा होईल .

धन्यवाद Sparkle...
कटप्पा, आपलेही आभार..
तुमचा धागा मी वाचतोय पण तो अमेरिकेत कुत्रा किंवा मांजर पाळण्याबद्दल विचारणा करण्यासाठी आहे आणि तिथले नियम, प्राणीपालनाचे कायदे याबाबत मला काहीच कल्पना नाही.
त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेल्या निकषांमधे माझे अनुभव उपयोगी नसावेत असं वाटून मी प्रतिसाद दिला नव्हता..

मी पासवर्ड विसरून गेले होते. . म्हणून इइइइइइइइइतका उशीर झाला प्रतिसाद द्यायला.
धमाल आहे टारझन.. He is lucky to be in such a caring family of Neeru ji.
मीही सुपर मांजर फॅन. आईच्या घरी कायम मांजरे असायची. खूप खूप लाडाकोडाची. खूप आठवणी आहेत. एक बोका माझ्या पपांची दिवसभर वाट बघायचा. ते घरी आले की मगच घरात यायचा. दुसरे एक पिलू आई काॅलेजला गेली की तिच्या घरी नेसलेल्या साडीवरच बसून राहायचे.
माझ्या मुलाच्यात अथर्वमधे ही आवड आलीय. कुठेही गेला तरी मांजर शोधून खेळत बसतो. चार महिन्यापूर्वी त्याने रस्त्यावरुन एक निराधार पिलू उचलून आणलेय. पूर्ण पांढरे. डोळे निळे आहेत. ब्रीड माहिती नाही. दोन महिन्यांचे असेल तेंव्हा. स्नोई नाव. एकदम गुणी आहे. मांजर असूनही non-demanding आहे. हा लाॅक डाउन Snowee मुळे खूपच सुसह्य झालाय. Enjoying every moment with my three kids.. third one is youngest - स्नोई Happy

Pages