कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध

Submitted by कुमार१ on 29 March, 2021 - 01:19

या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण (https://www.maayboli.com/node/77437)
...........
( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797)
....................................................................................................................................

31 डिसेंबर 2019 रोजी जागतिक बारसे झालेल्या कोविड१९ या आजाराने अद्यापही आपला पिच्छा सोडलेला नाही. मध्यंतरी काही काळ आपण त्याच्यावर कुरघोडी केल्यासारखे वाटत होते. परंतु आता तर तो विषाणू विविध अवतार बदलून आलाय. या बदललेल्या अवतारांची काही रुपे जरा जास्तच त्रासदायक होत आहेत. दरम्यान जागतिक पातळीवर लसीकरण व्यापक स्वरूपात होत आहे. औषधोपचारांच्या दृष्टीनेही संशोधन चालू आहे पण अद्याप रामबाण असा उपाय सापडलेला नाही. एकंदरीत पाहता भारतात या आजाराची दुसरी लाट आली आहे असे म्हटले जाते. काही युरोपीय देशांनी तर त्यांच्याकडे ‘तिसरी लाट’ आली असे म्हटले आहे.

या लेखमालेच्या मागच्या भागामध्ये एका वाचक महोदयांनी अशी सूचना केली, की इथे चर्चेदरम्यान दिली जाणारी महत्त्वाची माहिती ही प्रतिसादांच्या रूपाने असल्याने ती विस्कळीत स्वरूपात राहते. तेव्हा अशी माहिती एकसंध वाचायला मिळाल्यास बरे होईल. त्यावर अन्य काही वाचकांशीही विचारविनिमय झाला. . तसेही असा माहितीपर धागा सुमारे तीन महिने जुना झाला की त्याच्या चर्चेची पृष्ठसंख्या बऱ्यापैकी फुगलेली असते. त्यामुळे मागच्या पानांवर जाऊन काही बघायचे झाल्यास ते बऱ्यापैकी कष्टप्रद होते. यावर विचार करून मी असा एक पर्याय काढला आहे. मागच्या धाग्यातील चर्चेदरम्यान आलेली महत्त्वाची उपयुक्त माहिती संपादित करून इथे एकसंध स्वरूपात लिहीत आहे. त्यानेच या धाग्याची सुरुवात करतो.

ही महासाथ आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला तीन आघाड्यांवर लढायचे आहे :
१. लसीकरणाच्या माध्यमातून प्रतिबंध
२. औषधोपचार आणि
३. सामूहिक आरोग्यशिस्त आणि प्रशासकीय उपाय.

गेल्यावर्षीच्या अखेरीस विविध उत्पादकांच्या लसी बाजारात उपलब्ध होऊ लागल्या. त्यातील काहींना संबंधित देशांच्या औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर लोकांचे लसीकरण सुरू झाले. भारतातील लसीकरण साधारण जानेवारीमध्ये सुरू झाले. भारतात सध्या दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत या दोन्ही स्नायूमध्ये इंजेक्शनद्वारा घ्यायच्या आहेत :
१. कोविशिल्ड : ही ‘सिरम’ने तयार केलेली असून त्यात व्हेक्टर विषाणू आणि प्रथिन-कोड हे तंत्रज्ञान वापरले आहे.
२. कोवाक्सिन : हे भारत बायोटेकने तयार केलेले असून त्यात निष्प्रभ विषाणूशी संबंधित तंत्रज्ञान वापरलेले आहे.

दोन्ही लसींचे दोन डोस घ्यावयाचे आहेत. कोवाक्सिनच्या बाबतीत ते एक ते दीड महिन्याच्या अंतराने, तर कोविशिल्डच्या बाबतीत पहिल्या डोस नंतर दीड ते दोन ( जास्तीत जास्त तीन) महिन्यांपर्यंत दुसरा डोस घेतलेला चालेल, असे संबंधितांनी जाहीर केले आहे.

अमेरिकेत मुख्यतः फायझर आणि मॉडरना या दोन कंपन्यांच्या लसी वापरल्या जात आहेत. त्या दोन्ही अत्याधुनिक अशा एम-आरएनए तंत्रज्ञानावर आधारित बनवल्या आहेत. त्याही इंजेक्शनद्वारच घ्यायच्या आहेत.

कुठलीही लस परिपूर्ण नसते. त्यामुळे स्वतः लसवंत झाले तरीही संबंधित रोगजंतूचा संसर्ग होऊ शकतो. परंतु त्या परिस्थितीत लसीकरण झाल्याचे स्वतःला प्रत्यक्ष व इतरांना अप्रत्यक्ष फायदे असे मिळतात :
१. लस घेतलेल्या व्यक्तीस तो संसर्ग जर झालाच तरी त्याचा परिणाम अगदी सौम्य असतो. तिच्या शरीरात विषाणूची घनता व आक्रमकता खूप कमी राहते.
२. वरील व्यक्तीद्वारा ते विषाणू पसरवण्याची शक्यता राहते, पण तिचे प्रमाण खूप कमी असते.

अर्थात इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे इतरांना होणारा रोगप्रसार थांबेल की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
या संदर्भात अमेरिकेत एक महत्त्वाचे संशोधन चालू झाले आहे. त्यामध्ये बारा हजार महाविद्यालयीन तरुणांचा समावेश केलाय. दोन टप्प्यांत त्यांना मॉडर्नाची लस दिली जाईल. त्या प्रत्येकाजवळ एक ‘इ-डायरी ऍप’ असेल. यातील प्रत्येकजण स्वतःच्या नाकातून रोज स्वाब घेईल. तसेच ठराविक काळाने त्यांचे रक्तनमुनेही तपासणी जातील.
पुढच्या टप्प्यात या तरुणांचे कुटुंबीय आणि जवळचे लोक यांचीही संबंधित तपासणी केली जाईल. सुमारे पाच महिन्यानंतर या अभ्यासाचे निष्कर्ष हाती येतील.

लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर लोकांच्या वैयक्तिक अनुभवांची देवाणघेवाण होत आहे. त्यातील एक महत्वाचा मुद्दा असा:
लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).
यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

लसीमुळे शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती ही प्रतिपिंडे (Ab) आणि T संरक्षक पेशी या दुहेरी स्वरूपाची असते. ती व्यक्तीनुसार कमीअधिक प्रमाणात निर्माण होते. आपले शरीर आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अनेक घटकांवर ती अवलंबून असते.

करोना-2 च्या जनुकीय बदलाने सुमारे १६ नवे विषाणू-अवतार अस्तित्वात आले आहेत. त्यापैकी हे पूर्वीच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य आहेत. त्यापैकी चौघे सद्य लसींना मध्यम प्रमाणात विरोध करणारे (evaders) आहेत, तर एक अल्प विरोध करणारा आहे.
सद्य लसी या अजूनही विषाणूला भारी आहेत असे तज्ञ म्हणताहेत. पण बहुतेक मोठ्या कंपन्यांनी विषाणूच्या बदलानुसार लसीमधील तांत्रिक बदल सुरू केलेले दिसतात.
शेवटी सतत बदल करत राहण्याऐवजी एकच सर्वसमावेशक (युनिव्हर्सल) लस करता येईल का, यावरही उहापोह चालू आहे.

इंजेक्शनद्वारा दिलेल्या लसीमुळे शरीरात केंद्रीय प्रतिकारशक्ती चांगली निर्माण होते. परंतु श्वसनमार्गात स्थानिक प्रतिकारशक्ती फारशी निर्माण होत नाही. ही शक्ती देखील महत्वाची असते कारण मुख्यत्वे तिच्यामुळे एका व्यक्तीकडून दुसरीस होणारा रोगप्रसार आटोक्यात येतो. त्यादृष्टीने अशा काही लसींचे संशोधन सुरु आहे. भारतातील परिस्थिती अशी आहे:

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.
२. प्रेमास बायोटेकने तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लसींच्या जोडीने उपचारांवरही संशोधन सातत्याने चालू आहे. त्यापैकी नवीन घडामोडी :
१. १० फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या औषध प्रशासनाने bamlanivimab and etesevimab (Antibodies) या औषधांच्या संयुक्त वापराला आपत्कालीन वापराची परवानगी दिली.
सौम्य ते मध्यम आजार असलेल्या रुग्णांना हे दिल्यास आजार रोखला जातो.

२. Monlupiravir : हे औषध तोंडाने घ्यायची गोळी असून त्याचे सध्या दुसऱ्या टप्प्यातील रुग्णप्रयोग काही ठिकाणी चालू आहेत. ते औषध शरीरात गेल्यानंतर करोना विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. अधिक अभ्यासांती चित्र स्पष्ट होईल. तोंडाने घ्यायची गोळी हा तिचा महत्त्वाचा फायदा राहील.

३. Favipiravir (गोळी) या औषधाला भारतात ‘आपत्कालीन वापराची परवानगी’ या आधीच मिळालेली आहे. काही रुग्णांना त्याचा चांगला उपयोग होत आहे. तरीसुद्धा त्याच्या उपयोगितेचा पुरेसा विदा अजून उपलब्ध नाही. त्याच्या वापराबाबत तज्ञांत मतांतरे आहेत. रुग्णास जर मूत्रपिंडाची सहव्याधी असेल तर हे औषध काळजीपूर्वक द्यावे लागते.

४. Ivermectin : हे पूर्वापार जंतावरील औषध कोविड रुग्णांसाठी भारत आणि दक्षिण आशियात बर्‍यापैकी वापरलं जातं आणि त्याचे अनुभव चांगले आहेत. मात्र WHOने त्याचा सरसकट वापर करू नये असे म्हटले आहे; सध्या ते फक्त शास्त्रीय रुग्णप्रयोगादरम्यान वापरले जावे असे सुचविले आहे.

वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींमध्ये यासंबंधी काही संशोधन पुढे गेलेले असल्यास संबंधित जाणकारांनी जरूर भर घालावी.

महासाथ नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण आणि उपचारांच्या जोडीने मूलभूत त्रिसूत्री आणि गर्दी टाळण्याची शिस्त दीर्घकाळ ठेवावी लागेल.

....
तर असा आहे हा गेल्या महिन्याभरातील घडामोडींचा परामर्श. खरं म्हणजे ही महासाथ जर या वर्षाच्या प्रारंभीच बरीचशी आटोक्यात आली असती तर या विषयावरील वाढत्या चर्चेचे काही कारण नव्हते. परंतु निसर्गाला अजून तरी हे मंजूर नाही असे दिसते. त्यामुळे सध्या तरी वैज्ञानिक व संबंधित सामाजिक घटनांचा आढावा घेणे एवढे आपण करूया. नेहमीप्रमाणेच प्रश्न, शंका-कुशंका, पूरक माहिती आणि व्यक्तिगत अनुभव अशा विविधांगी चर्चेचे स्वागत आहे.
…………………………………………………
चर्चेच्या अनुषंगाने घातलेली भर :
३०/३/२१ :
या विषाणूचे टोकदार प्रथिन हे त्याचे घातक शस्त्र आहे. म्हणून कोविशिल्ड लस या प्रथिन-तत्त्वावरच बनवलेली आहे. या लसीद्वारा जो व्हेक्टर शरीरात शिरतो, तो या टोकदार प्रथिनासम antigen आत सोडतो. पुढे शरीर त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करते.
आता जर का अशा व्यक्तीस खऱ्या विषाणूने संसर्ग केला तर त्या अँटीबॉडीज त्याच्या घातक टोकदार प्रथिनाचा नाश करतात.
..................................
३१/३/२१
बालदमा आणि कोविड

या विषयावर सुमारे 67 अभ्यास प्रसिद्ध झालेले दिसतात. त्यातील फक्त एकात “बालदमा असल्यास कोविड गंभीर होण्याचा धोका वाढतो”, असे म्हटले आहे. एकंदरीत या विषयावर पुरेसा विदा उपलब्ध नसल्याने कुठलाही ठाम निष्कर्ष सध्या काढता येत नाही. दीर्घकालीन व्यापक अभ्यासानंतरच त्यावर काही बोलता येईल.
मुलांमध्ये कोविड कमी असण्यामागे, श्वसनमार्गातील विशिष्ट प्रथिने कमी असणे, वगैरे थिअरीज मांडल्या गेल्या आहेत. परंतु पुरेशा अभ्यासानंतरच त्यावर अधिक बोलणे योग्य होईल.
....................................
१/४/२०२१
कोविड निदान : सीटी स्कॅन आणि प्रयोगशाळा चाचणी

समजा श्वसन लक्षणे आहेत. आणि,
१. नॉर्मल CT आला : याचा अर्थ रुग्णास कोविड नाही असे नाही.
२. CT मध्ये बिघाड दिसला : याचा अर्थ फुफ्फुसइजा आहे, इतकाच. हे कोविड्चे पक्के निदान होत नाही. ते करण्यासाठी RTPCR आवश्यकच.
............................................
२/४/२१
कोविड व चव संवेदना
या आजारात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.
विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.
बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
........................................
५/४/२१
विविध रुग्णालयांमध्ये गेली दीड वर्ष डॉक्टर्स आणि त्यांचे सहकारी प्रत्यक्ष कोविडचे रुग्ण हाताळत आहेत. ते करत असताना स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांना पीपीइ तत्त्वावरील संपूर्ण पोशाख घालावा लागतो. हा पोशाख घालून काम करणे हे अजिबात सुखावह नाही हे आपण जाणतो.

एव्हाना यासंदर्भात अशा पोशाखाने आरोग्य सेवकांवर होणाऱ्या परिणामांचा देखील पुरेसा अभ्यास झालेला आहे. अशा पोशाखाचे व्यक्तीवर आणि त्याच्या कामावर होणारे दुष्परिणाम आता उजेडात आले आहेत.
आरोग्य सेवकांना अजूनही बराच काळ असा पोशाख घालून वावरावे लागणार आहे. त्यादृष्टीने त्याचे दुष्परिणाम कमी करण्याचे प्रयत्नही विविध पातळ्यांवर चालू आहेत त्यापैकी काही उपाय असे :
१. उष्णतादाह होणार नाही व बाष्प कमीतकमी साठेल अशी पोशाखांची रचना
२. संबंधितांनी डोळ्यांचे, मानेचे व हाताचे विशिष्ट व्यायाम काम करता करता अधूनमधून करणे.

३. हा पोशाख घातल्यामुळे एरवीपेक्षा त्याच कामास जास्तच वेळ लागणार आहे याची सर्वांनीच दखल घेणे.
४. अशा पोशाख उत्पादनाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील हे पाहणे.
..........................................
६/४/२१
ACE2 चे कार्य :
हे एक एन्झाइम आहे. ते शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये असते. त्याचे रक्तदाब नियंत्रणात काही कार्य असते. श्वसनमार्गातील ACE2 देखील फुप्फुसांचे संरक्षक असते. परंतु, सार्स -दोन विषाणूच्या बाबतीत ते त्याचे ‘प्रवेशद्वार’ ठरते.त्यातून अशी थिअरी मांडली गेली, की जितके या एन्झाइमचे प्रमाण इथे कमी असेल, तितकी या विषाणूसाठी प्रवेशद्वारे बंद होतील.
आता दम्याबाबत. याचे अनेक प्रकार असतात. फक्त ऍलर्जिक दम्याचे बाबतीत ह्याचा संदर्भ येतो. अशा रुग्णांमध्ये जनुकीय कारणांमुळे मुळातच श्वसनमार्गात हे एन्झाइम कमी प्रमाणात असते. त्यातून हे रुग्ण दीर्घकालीन स्टिरॉइड्सचे फवारे औषध म्हणून घेत असतात. त्या औषधाने ते प्रमाण अजूनच कमी होते. एक प्रकारे अशा लोकांमध्ये विषाणूची प्रवेशद्वारे बरीच कमी झालेली असतात.
.......................................................
८/४/२१
क्षयरोग आणि कोविड
या संदर्भात जे मर्यादित अभ्यास झालेत ते फुफ्फुसांच्या क्षयरोगासंबंधी आहेत. त्यातून फक्त काही शक्यता व्यक्त केल्या आहेत; विदा पुरेसा नसल्याने ठोस निष्कर्ष नाहीत.
महत्त्वाचे मुद्दे

१.समजा क्षयरोग्याला कोविड झाला तरी मूळ क्षयाचे उपचार पहिल्याप्रमाणे चालू ठेवावेत.

२. एकाच वेळी हे दोन रोग शरीरात असतात तेव्हा दोन्ही एकमेकांची परिस्थिती अधिक बिघडवू शकतात.

३.कोविडच्या उपचारांदरम्यान जर स्टिरॉइड्स आणि अन्य प्रतिकारशक्ती दाबणारी औषधे दिली गेली, तर कदाचित भविष्यात जुन्या क्षयरोगाचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
.......................
९/४/२१
“लसीचा पहिला डोस झाला. त्यानंतर कोविड झाला, तर आता दुसऱ्या डोसचे काय करायचे ?”
जर अशा परिस्थितीत कोविड झाला तर प्रथम दहा दिवस विलगीकरण सक्तीचे. नंतर रुग्णाची सर्व लक्षणे थांबली पाहिजेत. त्या अर्थाने ‘बरे’ वाटल्यानंतरच दुसरा डोस घ्यायचा – तो अपेक्षितपेक्षा लांबला तरी काही हरकत नाही.
..........................
१०/४/२१
गेल्या काही दिवसांत आपण तरुण आणि निरोगी लोकांना कोविड झाल्याच्या बातम्या ऐकतो आणि इथे सुद्धा अशांचे अनुभव वाचतोय. तरुणपणी प्रतिकारशक्ती उत्तम असते हे बरोबर. यासंदर्भात काही तरुण लोकांना सौम्य कोविड झाल्यानंतर त्यांचा पुढे आठ महिने अभ्यास करण्यात आला.
अशांना झालेला कोविड जरी सौम्य होता तरी अशा बऱ्याच जणांचे बाबतीत पुढे चव आणि वास यांची संवेदना गेलेली असणे, थोडाफार दम लागणे आणि थकवा यापैकी काही लक्षणे अगदी आठ महिन्यांपर्यंत सुद्धा टिकून असलेली आढळली. याच्या कारणांचा शोध घेण्याचा आता प्रयत्न होतो आहे. कालांतराने अधिक समजेल.
...................................
१२ /४/२१
आपल्यातील काहींचे आप्तस्वकीय या आजाराने रुग्णालयात दाखल आहेत. आजाराची तीव्रता म्हणजे काय, ही माहिती त्या दृष्टीने उपयुक्त ठरावी. महाराष्ट्र कोविड कृती दलाच्या पुस्तिकेतून ही देत आहे :

सौम्य : ताप, खोकला, उलटी, जुलाब इत्यादीपैकी लक्षणे असणे पण प्रकृती स्थिर.
मध्यम : वारंवार ताप व खोकला, न्युमोनिया, सिटीस्कॅनमध्ये दोष दिसणे, ऑक्सिजन पातळी सुयोग्य.
तीव्र : न्युमोनिया वाढणे आणि ऑक्सिजन पातळी (SpO2) कमी होणे.
गंभीर : श्वसनअवरोध, मेंदू हृदय अथवा मूत्रपिंडावर परिणाम, रक्तगुठळ्या निर्मिती.
...........................................................................
१६/४/२१
Remdesivir हे औषध कधी आणि कसे वापरायचे यांची डॉक्टरांसाठी मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र कोविड दलाने दिलेलीच आहेत. त्यातील सामान्यांना समजेल असे फक्त थोडक्यात इथे सांगतो :
* मध्यम आजार ( स्टेज 2 बी आणि त्यानंतर पुढे) अशा रुग्णास न्युमोनिया होऊन श्वसनदौर्बल्य झालेले असते
* आणि तो बहुतांश वेळा अतिदक्षता विभागामध्ये दाखल केलेला असतो.
...............................................
१७/४/२१
भारतातील सध्याच्या लाटेची वैशिष्ट्ये म्हणजे तरुण वर्गात आजार वाढतो आहे तसेच मुलांमध्ये मोठा ताप यायचे प्रमाण वाढलेय.
या लाटेचा व विषाणूच्या नव्या प्रकाराचा संबंध आहे काय ?
या प्रश्नावर एम्स, जेएनयु आणि एनआयई या संस्थांतील तज्ञांची मते वाचली. ती अशी :

१. सध्याच्या प्रकाराने बाधित झालेला एक रुग्ण ९ जणांना प्रसार करतो ( गतवर्षी हे प्रमाण एकापासून ४ असे होते).
२. पंजाब मधील 80% संसर्ग नव्या प्रकाराने झाल्याचे विषाणूच्या जनुकीय अभ्यासावरून समजले.
३. नव्या प्रकाराची घातकता या मुद्द्यावर अजून पुरेसा पुरावा मिळालेला नाही; अधिक अभ्यासाची गरज आहे.
..............................
१९/४/२१
सुधारित अभ्यासानुसार सद्य विषाणूचा प्रसार खालील मार्गांनी होतो :
१. बाधित व निरोगी व्यक्ती एक मीटर अंतराच्या आत जवळ आल्यास श्वसनाद्वारा
२. ज्या पृष्ठभागांवर दूषित थेंब पडले आहेत त्या स्पर्शाने
३. क्रमांक १ मधील अंतर १ मीटरहून अधिक असल्यासही शक्यता
वरील पैकी क्रमांक १ चा मुद्दा रोजच्या व्यवहारात सर्वात महत्त्वाचा ठरतो.
..............................................
२०/४/२१
गरोदर , स्तनपान करवणाऱ्या स्त्रिया लस घेऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर देणे तसे सोपे नाही. मुळात जेव्हा या सर्व लसींच्या प्रयोगचाचण्या झाल्या त्यात मुद्दामहून गर्भवती किंवा स्तनदा मातांना समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे संबंधित विदा काही नाही. आता अमेरिकेतील विविध वैद्यक मंडळे आहेत त्यांनी अशा स्थितीतील स्त्रियांना लसीकरण करायला हरकत नाही असे म्हटलेले आहे.
भारतातील कोविशिल्डची माहिती जर आपण वाचली तर त्यात, “तुमच्या संबंधित डॉक्टरांशी सल्लामसलत करा”, असे मोघम उत्तर दिलेले आहे.
...................................................................................................................
२२/४/२१
जेव्हा आपली फुफ्फुसे निरोगी असतात तेव्हा नेहमीच्या हवेतील जो ऑक्सिजन आत घेतलेला असतो तो व्यवस्थित रक्तप्रवाहात पोचतो. परंतु जेव्हा श्वसनमार्ग किंवा फुफ्फुसांच्या विविध आजारांनी हे नेहमीचे कार्य नीट होत नाही, तेव्हा हवेतील ऑक्सिजन आपल्या रक्तप्रवाहापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचूच शकत नाही आणि तो पुरेसा नसतो (हवेत इतर वायू पण असतात).
अशा परिस्थितीत विशिष्ट दाबाने आपल्याला पूरक ऑक्सिजन रुग्णास द्यावा लागतो. काहीही करून रक्तप्रवाहातील ऑक्सिजनचे प्रमाण आपल्याला विशिष्ट मर्यादेत राखावे लागते.
.........................................................................
२४/४/२१
डी-डायमर
हे एक प्रथिन आहे. शरीरात जेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते निर्माण होते. निरोगी अवस्थेत त्याचे प्रमाण खूप कमी असते. जेव्हा रक्तगुठळ्या अधिक प्रमाणात होतात तेव्हा त्याचे प्रमाण बरेच वाढते.
सध्याच्या आजारात ही प्रक्रिया काही रुग्णांत दिसून येत आहे. अशा एखाद्या रुग्णात जर या प्रथिनाची पातळी खूप वाढली असेल तर रक्तगुठळी विरघळवणारे औषध देण्याचा निर्णय घेतला जातो.
मात्र या प्रथिनाच्या रक्तातील मोजणीला मर्यादा आहेत. कोविडशी संबंध नसलेल्या खालील प्रसंगीही ते वाढू शकते :
• दीर्घकाळ रुग्णालय वास्तव्य
• मोठ्या शल्यक्रियेनंतर
• शरीरातील कुठलीही दाहप्रक्रिया
• कर्करोग
• यकृत आणि हृदयविकार
.......................................................................
२५/४/२१
विराफिन या औषधाच्या निमीत्ताने interferons बद्दल माहिती :
जेव्हा एखादा विषाणू आपल्या शरीरात घुसतो तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून आपल्या पेशी interferons ही प्रथिने निर्माण करतात. यांच्या नावातच त्यांचे कार्य दडलेले आहे. ही प्रथिने विषाणूचे आपल्या शरीरातील पुनरुत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करतात (interfere with). यानंतर हळूहळू विषाणूसुद्धा या शरीरातील प्रथिनांना निष्प्रभ करायला शिकतो. जर त्यात तो यशस्वी झाला तर मग आजार फोफावतो.
हेच तत्व वापरून प्रयोगशाळेत तयार केलेली interferons ही औषधरूपात दिली जातात. असे औषध आजाराच्या लवकरच्या स्थितीत वापरल्यास विषाणूचे पुनरुत्पादन कमी होते. त्याच बरोबर आपली प्रतिकारशक्तीही वाढते.
.........................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक अर्जंट मदत हवी आहे. कुठे विचारू नक्की कळेना. हा धागा आपण सगळेच वाचत आहोत म्हणून इथे लिहिते. माफ करा.
मैत्रिणीच्या भावाला मुंबईत कुठे बेड मिळाले नाहीत म्हणुन म्युन्सिपाल्टी दवाखान्यात अ‍ॅड्मिट केले आहे. तिथे काय अडचण आहे नक्की मला माहिती नाही पण ती अजून कुठे, जिथे चांगली सोय, काळजी घेतली जात आहे तिथे कुठे बेड मिळेल काय याचा शोध घेत आहे. त्याच्या घरी तीन वृद्ध आहेत , त्याची मिसेस एकटी धावाधाव करत आहे व मैत्रीण एकटी इथे या देशात आहे त्यामुळे जास्त माहिती नाही शोधाशोध कुठे करावी.

प्लीज कोणाला काही माहिती असल्यास लगेच सांगा. किंवा काही सुचना असतील तर सांगा. तो ‘बीएमसी कांदिवली’ मधे आहे आत्ता.

सुनिधी, ७ हिल्स हॉस्पिटल (इथे काही फ्री बेड्स आहेत. फोन नंबर ९३२१३२९२१२)
फोर्टीस - प्रायव्हेट आहे. पेड आहे. (इथला नंबर माझ्याकडे नाही)

सध्या जिथे अ‍ॅडमिट आहेत तिथे काय समस्या आहे? आणि त्यांना त्रास कितपत आहे? हे माहिती नाही त्यामुळे त्याबद्दल फारसे काही लिहीता येत नाही पण सर्वसाधारणपणे रुग्णांच्या (घरचे रुग्ण आणि रुग्ण मित्र मैत्रिणी वगैरे यांचे प्रत्यक्ष अनुभव यातून नमुद झालेल्या तक्रारी) ज्या तक्रारी दिसल्या त्या अशा:
१) जेवणाची चव आवडत नाही
२) पत्रा असल्याने सध्या खुप उकडते
३) कॉमन बाथरुम टॉयलेट असल्याने जरा अडचण होते. घरच्या इतकी स्वच्छता दिवसभर राखली जात नाही. सकाळी लवकर गेले तर मात्र स्वच्छ असते.
४) करमणूकीसाठी टिव्ही स्क्रिन लावलेत त्यावर संध्याकाळच्यावेळी बरेचदा ढ णा णा आवाजातले सिनेमे लावतात. कान किटतात

यापैकी काही गोष्टी जर तिथल्या तिथे पेशन्ट्सनी सांगितल्या (रिक्वेस्ट टोनमधे) तर थोडे बदल होतातही. पण मुळात ८-१० दिवस तिथे काढायचे आहेत. जेवणाबाबत म्हणशील तर अगदी घरच्या चवीचे मिळेलच असे नाही. हेल्दी आहे ना इतपत बघावे आणि काही गोष्टींना/आवडींना मुरड घालावी. मन रमवावे जे करणे शक्य आहे ते करुन. आपण बरे व्हायला तिथे आलो आहोत आणि बरे होऊनच परत येणार आहोत. हा ही एक अनुभव आहे आणि हे दिवसही बघता बघता सरतील. असे काहीसे मनाशी घोकून काही वेळा गोष्टी स्विकारुन पुढे जावे लागते. पहिले एक दोन दिवस जरा अ‍ॅडजस्ट होण्यात जातात. त्या दोन दिवसात तक्रारी जास्त जाणवतात असे मला आलेल्या घरच्यांच्या अनुभवावरुन सांगतेय.

अर्थात तू वर ज्यांच्याबद्दल लिहीले आहेस तिथे त्यांना हॉस्पिटल बदलून घेणे अत्यंत गरजेचे असू शकते, त्यांची कारणे वर दिल्येत तीच असतील असे नाही आणि तीच असली तरी त्यांना ते बदलावे इतके महत्वाचे वाटूच शकते. पण बरेचदा एका ठिकाणाहून दुसरीकडे शिफ्ट करताना अडचणी येतात असा काहींचा अनुभव आहे.

पोस्ट अयोग्य वाटल्यास सांग मी एडीट करेन.

कविन, ब्लॅककॅट, भरत मनापासुन धन्यवाद. तिला कळवते. ती मराठी नाही, नाहीतर तिलाच लिही म्हटले असते.
कविन, भाऊ ऑक्सिजनवर आहे.

त्यांना लवकर बरे वाटो अशी प्रार्थना >> +१११ . शुभेच्छा
......................
एखाद्याला कोविड झाल्यानंतर त्याच्या शरीरात जी प्रतिकारशक्ती निर्माण होते (म्हणजे अँटीबॉडीज आणि T पेशी) ती किती काळपर्यंत टिकेल, हा सध्याचा महत्त्वाचा आणि कुतूहलाचा विषय आहे. जसजसे अधिक रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण होईल तसे त्याचे वाढते उत्तर मिळत जाईल.

सध्याच्या अभ्यासानुसार या प्रतिकारशक्तीमध्ये बरीच व्यक्तिसापेक्षता दिसून येत आहे. ही शक्ती मोजताना अँटीबॉडीजचा अभ्यास तुलनेने सोपा असतो आणि त्याचे निष्कर्ष लवकर मिळतात. म्हणून बहुतेक वेळा तोच केला जातो. विविध रुग्णांचे बरे झाल्यानंतर निरीक्षण केले असता, आजाराच्या संसर्ग दिनापासून किती काळ अँटीबॉडीज टिकतात याचे उत्तर चाळीस दिवस ते सुमारे सात महिने इथपर्यंत वेगवेगळे मिळते.

आता या मुद्द्याचा भविष्यकालीन अंदाज करायचा असल्यास काही संख्याशास्त्रीय प्रारूपे मदतीला येतात. असाच एक अल्गोरिदम वैज्ञानिकांनी अलीकडे बनविला आहे. त्यामध्ये चाळीस दिवस ते अनेक दशके इथपर्यंत व्याप्ती ठेवलेली असते. विविध रुग्णांची माहिती त्यात हळूहळू साठवली जाते. कालांतराने आपल्याला यावरून दीर्घ भविष्यकालीन सामाजिक अंदाज घेता येतो.

या ज्ञानाचा उपयोग लसीकरणाच्या संदर्भातही पुढे होणार आहे. म्हणजे, सध्या दिलेले एखाद्या लसीचे दोन डोस हे किती काळ पुरतील, कालांतराने बलवर्धक डोस लागेल किंवा नाही, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे प्रारूप उपयुक्त ठरेल.

सध्याच्या अभ्यासानुसार या प्रतिकारशक्तीमध्ये बरीच व्यक्तिसापेक्षता दिसून येत आहे. >>>

हे, तसंच वाटतं आहे.
मी नुकतंच क्वारंटीन संपवून पुन्हा रूटीन सुरू केलं आहे. मला 'वास न येणे' हे एकच लक्षण होतं. बाकी कोणताही त्रास झाला नाही.
आमच्या फॅमिली डॉक्टरनी सांगितलं की आता ३.५ महिने प्रतिकारशक्ती असेल. त्यामुळे ३ महिन्यांनी लस घेतलीत तरी चालेल.

Covaxin च्या दुसऱ्या डोस संदर्भात इथे आणि अन्य काही इंग्लिश वृत्तपत्रात ही बातमी वाचण्यात आली :

कोवॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुढील डोस हा चार ते सहा आठवड्यांमध्ये देता येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
https://www.loksatta.com/explained-news/covid-19-vaccination-for-all-abo...

हा निर्णय बहुदा एक एप्रिल पासून लस घेणाऱ्यांसाठी केलेला दिसतो.

30 मार्च रोजी आपल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोवॅक्सीनचा स्वतःसाठी दुसरा डोस बरोबर 28 दिवसांनी घेतला होता अशीही बातमी वाचली :
https://www.indiatvnews.com/news/india/health-minister-harsh-vardhan-tak...

कुमार सर ..
मला १.५ महिन्यापूर्वी कोविड झाला होता लक्षण फक्त वास आणि चव गेलेली बाकी काहीच त्रास नाही
डॉ. नी फॅबिकाईन्ड गोळ्या दिलेल्या.. चव आणि वास आठवड्यात परत आलेत पण
चव अजूनही १०० % नाही जेवणाची पूर्ण चव लागत नाही सोबतीला भुकेची जाणीव नसणे थोडी मळमळ आणि शरीरात त्राण
नसल्यासारखे जाणवते... असे का होत असावे ? टेस्ट बड्स पूर्ण कधीपर्यंत येऊ शकतात ?
कोविड दरम्यान गरज नसताना वाफ हि १० दिवस घेतली गेली त्याचा काही टेस्ट बड्स वर दुष्परिणाम होतो का ?

पॅपीलॉन,
सर्वप्रथम तुम्हाला तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा !
तुमच्यासारख्या बहुतेक रुग्णांच्या बाबतीत ( सुमारे 80 टक्के) गेलेली चव आणि वास सुमारे महिनाभरानंतर पूर्ववत होतात.
पण एक लक्षात घ्यावे की कोविड हा जरा रेंगाळणारा आजार आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार पूर्ण तंदुरुस्ती ही व्यक्तिसापेक्ष राहील.

वाफ घेण्याने श्वसनमार्ग मोकळे होणे हा फायदाच होतो. त्याचा जिभेच्या रुचिकलिकावर काही परिणाम होत नाही.

काळजी घ्यावी. आपल्या डॉच्या सल्ल्याचे पालन करावे.

कुमार सर ..
त्वरित उत्तरासाठी आणि शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे ..

एक विचारतो रुचिकलिका कायम स्वरूपी नष्ट होतात का ?

आणि ह्या सारख्या कोविड समस्येवर सविस्तर लिहावे हि विनंती

कोवॅक्सिन ही थिओरिटिकली उजवी आहे का कोविशील्ड पेक्षा ? कोवॅक्सिन ही व्होल व्हायरस लस असल्याने नवीन म्युटंट विषाणूंवर जास्त प्रभावी असेल का कॉविशिल्डेक्षा ? कॉविशील्ड ही टोकदार प्रथिनांवर काम करते पण नवीन म्युटंटवर किती प्रभावी असेल ? कोवॅक्सिनचा कव्हरेज जास्त असल्याने थिओरिटिकली ती जास्त प्रभावी असावी म्युटंन्टवर पण योग्य विदा यायला बराच वेळ लागेल बहुतेक. सरकारने कोवॅक्सिनसम्बंधी आधी तसा जुगारच खेळला होता लोकांबरोबर पण थोडाफार डेटा आलाय तो आशादायक वाटतो आहे . मी मॉडर्ना-फायजरला सरकारच्या परवानगीची वाट पाहत होतो पण ते काही होणार नाही सध्यातरी. आमच्या हापिसात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लसीकरणाची फेरी झाली पण मी नाही घेतली तेव्हा. सध्या घरच्यांनी माझ्या सांगण्यावरून कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे , मी सुद्धा पुढच्या आठवड्यात घेईल.

रुचिकलिका कायम स्वरूपी नष्ट होतात का ?
>>>
नाही. तसे काही अभ्यास किंवा विदा सध्यातरी पुरेसा उपलब्ध नाही.
वास आणि चव याबद्दल जरा ‘रोचक’ काही पाहू :

१.या विषाणूने रुग्णाची वास संवेदना जाणे यावरील संशोधन जास्त झाले आहे. यात नाकातील चेतातंतूना अल्पकालीन इजा होते, इतपत समजले आहे.

२. चव का जाते ?
यात रुचिकलिकाना विषाणूमुळे थेट इजा होते का, हे अद्याप स्पष्ट नाही. बऱ्याच शक्यता आहेत.
एक थिअरी अशी आहे.

विषाणू लाळग्रथींना इजा करतो. मग लाळ स्त्रवणे कमी होते. त्याचा चवीवर अप्रत्यक्ष परिणाम होतो. रुचिकलिकांच्या निरोगी अवस्थेत त्यांच्या चांगल्या कार्यासाठी ‘जस्त’ उपयुक्त असते. म्हणून बऱ्याच कोविड रुग्णांना जस्ताची गोळी देतात. त्याचा चव आणि वास हे दोन्ही पूर्ववत होण्यास फायदा होत असावा.

अर्थात हे सध्याचे प्राथमिक अभ्यास आहेत. या मुद्द्यावर सध्या अधिक संशोधन व्हायची शक्यता कमी आहे.
कालांतराने काही वाचनात आल्यास पाहू.

जिद्दु ,
कोवॅक्सिन ही थिओरिटिकली उजवी आहे का कोविशील्ड पेक्षा ? >>>

>>>
या प्रश्नाचे उत्तर असे सहज नाही देता येणार ! बरेच वाचन करावे लागेल आणि थोडीफार तज्ञांशी चर्चादेखील. कसे आहे बघा.
सध्या चार ते पाच वेगवेगळी तंत्रज्ञाने असलेल्या लसी देश-विदेशात उपलब्ध आहेत. बहुतेकांमध्ये आता जनुकीय अभियांत्रिकीचा वापर केलेला आहे. त्यामुळे या लसींमध्ये फरकच करायचं झाल्यास आधुनिक आणि अत्याधुनिक (१९/२०) इतकाच काय तो आहे.

त्यामुळे अमुक एक तंत्रज्ञानच श्रेष्ठ आहे असे आत्ता तरी नाही म्हणता येणार. या सगळ्याला प्रत्यक्ष लसीकरणानंतर काही वर्षांनी पुरेसा विदा मिळणार आणि मग तेव्हा परिणामकारकतेबद्दल ( इफेक्टिवनेस) बोलता येईल.

या सगळ्याला प्रत्यक्ष लसीकरणानंतर काही वर्षांनी पुरेसा विदा मिळणार आणि मग तेव्हा परिणामकारकतेबद्दल ( इफेक्टिवनेस) बोलता येईल > हो ते आहेच आणि दोन्ही लसी गम्भीर धोक्यापासून संरक्षण देत असल्याने दोन्हींपैकी एक घ्यायचीच आहे तर काहीतरी लॉजिक वापरून घेऊ असा विचार केला मी Happy
धन्यवाद

उत्परीवर्तन(mutation) आणि उत्क्रांती( evolution) सर्व च जीवात होत असते .त्या मुळे व्हायरस मध्ये पण होणारच.
स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ती प्रतेक जीवाची गरज आहे.
पण हे उत्परिवर्तन विषाणू चे नैसर्गिक रित्या होण्या अगोदर आपण कृत्रिम रीत्या आपल्याला हवं तसे उत्परीवर्तान घडवून आणू शकतो का?
म्हणजे कमी रोगकारक असलेले विषाणू चे strain निर्माण करता येतील आणि हळू हळू व्हायरस रोग कारक राहणार नाही.
किंवा दुसऱ्या कोणत्या व्हायरस च वापर करून रोग कारक विषाणू च्या घातक मुटेशन वर आपण नियंत्रण ठेवू शकतो का?
म्हणजे काट्यांनी काटा काढणे.

हेमंत,
तुमचा प्रश्न पूर्णपणे जीवशास्त्राच्या अखत्यारित येतो.
मूलभूत विज्ञान शाखेतील तज्ञ त्याबद्दल काही बोलण्यास योग्य ठरतील .
असे येथे कोणी असल्यास त्यांनी जरूर सांगावे.
मलाही वाचायला आवडेल.

>>पण हे उत्परिवर्तन विषाणू चे नैसर्गिक रित्या होण्या अगोदर आपण कृत्रिम रीत्या आपल्याला हवं तसे उत्परीवर्तान घडवून आणू शकतो का?<<
भविष्यात उत्परिवर्तन नक्कि कसं आणि कुठल्या मार्गाने होणार आहे हे कसं ठरवणार? शिवाय तुम्ही कृत्रिमरित्या घडवुन आणलेलं उत्परिचर्तन पुढे प्रत्यक्षात अवतरेलच याची गॅरंटि काय? म्युटेशन होण्यातंच अगणित पर्म्युटेशन्स/कॉंबिनेशन्स असतील तर अशी किती कृत्रिमरित्या घडवुन आणणार? एक कल्पनाविलास म्हणुन ठिक आहे पण प्रत्यक्षात ते फिजीबल आहे का?

डिस्क्लेमरः मी कुठल्याच शाखेचा तज्ञ नाहि, पण असल्या प्रकाराला आमच्या भाषेत "बॉयलिंग द एफिंग ओशन" म्हणतात... Wink

हा हा, डॉक्टरसाहेब ती सार्कॅस्टिक कामेंट आहे. थोडक्यात त्याचा अर्थ असा - विनाकारण अशक्यप्राय गोष्ट करायला जाउ नये, वास्तवतेला धरुन रहावे... Happy

हे एका ठिकाणी वाचायला मिळाले हे जर खरे असेल तर. मी वर लिहलेले सत्यात येवू शकत.
The common cold is caused by different viruses. One of them is the rhinovirus, which causes benign upper respiratory tract infections. Both the seasonal flu and the common cold strike at roughly the same time every year. And during the 2009 H1N1 influenza pandemic, data from several European countries suggested that the rhinovirus infections could have slowed the spread of the influenza virus.

So the scientists at Yale University attempted to determine if the rhinovirus and the influenza virus interacted in any particular way. They examined over 13,700 respiratory samples obtained from patients between 2-16 and 2019. They found that in the months when both the rhinovirus and the influenza virus were active, the influenza virus was absent if the rhinovirus was present

कुमार १व कामा आपण दोघही खुप छान माहिती देत आहात तीही एकदम सोप्या भाषेत खुप खुप धन्यवाद...माझं प्रश्न असा आहे की लस घेतल्या नंतर किती दिवसांनी मध्यप्राशन करावं ? व जर कुणी लस घेतल्यावर चुकून मध्यप्राशन केलं तर त्याचा लस व परीणाम होऊ शकतो का??

राज, Bw

हेमंत, तुम्ही म्हणताय ते एक प्रकारे दोन विषाणूमधली स्पर्धा आणि त्याचा परिणाम असं काहीतरी दिसतंय. यासंदर्भात जरा सवडीने काही वाचून बघतो. अन्य काही रोचक मुद्दे पण त्यासंदर्भात आहेत. जरा सवडीने.
…………..

महेश,
खरं सांगायचं तर लस घेणे आणि मद्यपान या संदर्भात तसे काही शास्त्रीय अभ्यास वगैरे झालेले नाहीयेत.
सर्वसाधारणपणे असं म्हणता येईल की अतिरिक्त मद्यपान नकळत तुमच्या प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण करत असतं. शक्यतो लसीकरणाच्या महिन्यात ते अत्यंत माफक ठेवावं. काही काळ संयम म्हणून थांबवायचे असेल तर थांबवा. त्यात तर काही नुकसान नाही !

म्हणजे कमी रोगकारक असलेले विषाणू चे strain निर्माण करता येतील आणि हळू हळू व्हायरस रोग कारक राहणार नाही.

हा प्रयोग ऑलरेडी यशस्वी झालेला आहे

पोलिओ ड्रॉप म्हणजे पोलिओचेचविषाणू पण रोग न करणारी व्हरायटी आहे , मोठ्या संख्यने मुलांना डोस दिल्याने हे जन्तु सर्वत्र वाढतात व पोलिओच्या रोगकारक विषाणूंना जागा न मिळाल्याने ते निसर्गातून वाईप आउट होतात,

हे ड्रॉप घेणाऱ्याला अँटिबॉडी देतात , तोही एक फायदा वेगळाच

असे डबल काम असल्याने आपण पोलिओ समूळ निर्मूलनाकडे जात आहोत

Humans have been hosts for both rhinovirus and influenza virus for a while now. Since both viruses compete for the same route for access (nasal), infection by one reduces the chance of infection by the other. थोडक्यात संगीतखुर्ची सारखं होतं.
In general if you have good microbiome the chances of opportunistic infections are low. त्यामुळे आपला स्वतःच्या शरीराचा सुक्ष्मजीवांचा साठा जितका सशक्त आणि वैविध्यपूर्ण असेल तितकी आपली प्रतिकारशक्ती चांगली असते. ती कशामुळे चांगली बनते तर विषमुक्त अन्न, पाणी, हवा, हानिकारक रसायनांचा कमीत कमी वापर आणि काही प्रमाणात निसर्गाच्या सान्निध्यात राहणे.
तुलनेने कोव्हिडचा विषाणू हा नवीन आहे आपल्यासाठी. We can't predict the probable mutations or their effects on our bodies. आहे त्या विषाणूचा पूर्ण mechanism of action माहिती नसताना असे प्रयोग म्हणजे कल्पनारंजनाच्या पलीकडे काहीही नाही.

ब्लॅककॅट, +१ लस हा एक उत्तम मार्ग आहे! बेस्ट कॉमेंट आहे तुमची! मी असा बिलकुल विचार केला नसता लशीबद्दल!
पण नैसर्गिक स्पर्धा करवणं ही कल्पना फारशी व्यवहार्य नाही.

चांगली चर्चा. सर्वांना धन्यवाद.
.......
कुठलाही विषाणू निसर्गानुसार जनुकबदल करतच राहणार आणि त्याचे नवे अवतार येणार. यासंदर्भात वैज्ञानिक Daniel Reeves यांनी एक गणिती प्रारुप समोर ठेवले आहे. ते असे :

समजा, विषाणूच्या नव्या प्रकाराने एका व्यक्तीस बाधित केलंय. नवा प्रकार तसा ‘बच्चा’ असतो. आता ही व्यक्ती समाजात त्रिसूत्रीचे पालन न करता वावरते आहे.

१. जर का तिचा संपर्क एका वेळेस अन्य एकाच व्यक्तीशी आला, तर विषाणूचा नवा प्रकार दुसऱ्यात जातो पण ‘बाय चान्स’ (संख्याशास्त्रानुसार) तो मरण्याचीही शक्यता बरीच असते.

२. पण जर ही बाधित व्यक्ती एका वेळेस पाच जणांच्या संपर्कात आली आणि त्या सर्वांना बाधित केले, तर आता नवा विषाणू जगण्याची व फोफावण्याची शक्यता बरीच वाढते.

३. त्याही पुढे जाऊन ही व्यक्ती एका वेळेस 20 जणांच्या संपर्कात आली तर प्रसारित झालेला विषाणू पुढे जगतो तर जगतोच, आणि कालांतराने निसर्गात बलाढ्य होतो.

सारांश
: त्रिसूत्री आणि विशेषतः समूह नियंत्रण सध्या महत्त्वाचेच. जनुक बदललेल्या विषाणूवर नियंत्रण आणण्याचा तो पण एक मार्ग असतो.

कोवॅकिस्नच्या क्लिनिकल ट्रायल खाली तिसरा डोस देण्यात येणार आहे. तिसर्‍या डोसामुळे मिळालेली इम्यु निटी अनेक वर्षे टिकू शकेल का याची चाचपणी.
https://indianexpress.com/article/india/third-dose-of-covaxin-gets-nod-f...

Pages