भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पथ ' चे वाट झाले तसेच असेल कदाचित. वापीची बाव झाली. इथे तर प चा व आणि व चा ब झाला!
प्रतिपदा पासून पाडवा होताना व मध्येच का आणि कसा घुसला?
भाद्रपद चा भादवा कसा झाला? पात्री ची वाटी कशी झाली?
पेरणे चे वैरणे का व्हावे? बीज रोवले म्हणजे मातीत खुपसले. पेरले म्हणजे हाताने वर वर फेकून पसरले. तांदूळ वैरायचे म्हणजे पाण्यात सोडायचे. वेलु गेला गगनावेरी म्हणजे वेल गेला गगनापर्यंत .....
वगैरे.
पणि चे वणिक आणि वाणी , कांचीपुरम चे कांजीवरम वगैरे

आमंत्रण व निमंत्रण यातील फरकाविषयी चर्चा मायबोलीवर बरेचदा झालेली आहे.

सध्या लोकसत्तामध्ये आठवड्यातील पाच दिवस भाषासूत्र सदर चालू असते. त्यातील एका लेखकांना मी या विषयाचा संदर्भ मिळेल का अशी विचारणा केली होती. त्यांचे मला आलेले उत्तर त्यांच्याच शब्दात असे:

"दातेकर्वे कोशात आमंत्रण व निमंत्रण या दोहोंचा अर्थ बोलावणे , असा दिला आहे.

<strong>व्युत्पत्ती कोशात आमंत्रण याचा मूळ संस्कृतमधील अर्थ निरोप घेणे असा दिला आहे.

त्यामुळे आपल्याकडे फरक केला जात असावा . वैयक्तिक पातळीवर अगत्यपूर्वक बोलावणे याला निमंत्रण असे म्हणणे रूढ झाले आहे".

एखाद्याने आपल्या परसात किंवा शेतात पिकवलेल्या भाजीचा नमुना आपल्याला प्रेमाने भेट दिल्यास आपण त्याला वानवळा म्हणतो हे माहीत होते. परंतु मुळात तो 'कर' असून त्याचा अर्थ :

देशमुख, देशपांडे यांनीं प्रथम तयार होणाऱ्या फळें, भाज्या वगैरे पदार्थांवरील वाणगी म्हणून घ्यावयाचा अंश. (कर)

असा आहे हे आज समजले.

वाणगी >> वानगी >>वानवळा >> वानोळा.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%...

मिळून साऱ्याजणी मध्ये विद्या बाळ आणि पुष्पा भावे यांच्या नावाआधी स्मृतिशेष हे विशेषण वाचलं.
ज्यांना स्वर्गीय , कैलासवासी, इ. वापरायचं नसेल त्यांच्यासाठी किंवा तसाही चांगला पर्याय.
माथाडी सुस्मृत हाही शब्द पाहिला आहे.

बर्‍याच दिवसांनी हा धागा वाचला, इथे नेहमीच उद्बोधक आणि रंजक माहिती मिळते. Happy

>>> मेध म्हणजे यज्ञ, sacrifice. वेद काळी आणि नंतरही दीर्घकाळपर्यंत यज्ञाची आणि बळीची प्रथा अस्तित्वात होती. कुठल्याही मंगल कार्याच्या प्रारंभी यज्ञ करीत असत. ( नंतर नंतर त्याची सक्ती होऊ लागली.) यज्ञ पशू आधी आणून ठेवलेला असे. त्यासाठी एक बळकट मेख मारून ठेवलेली असे. मेख हा शब्ददेखील मेध आणि बली प्रथेतूनच आला आहे. मेधात वापरायची काठी म्हणून मेधकाठी आणि पुढे नुसतीच मेध किंवा मेख किंवा मेढ असे बदल झाले.

एखाद्या गोष्टीची मेख समजणे यात मेख म्हणजे 'इंगित' (essence) असा अर्थ मी समजत आले होते, पण वरील महितीनंतर त्याचा अर्थ 'नेमकी सुरुवात/नेमका उगम' असा असावा असं वाटतंय.

मेख असणे किंवा मेख ठेवणे हे मेख म्हणजे की पिन अश्या अर्थाने आहे. एखादे यंत्र चालू करायच्या अगोदर ती खुंटी नसेल तर ते चालत नाही. उदाहरणार्थ बैलगाडीच्या चाकाला एक मेख असते ती नसेल तर चाक आसातून बाहेर येते. मग कोणाला तरी ते यंत्र देताना ती मेख द्यायची नाही सो त्याला ते वापरता येत नाही.

मेख मारणे इथे मेख खिळा अर्थाने येते. पण थोडाफार अर्थ सारखाच आहे. यंत्राला मेख म्हणजे खिळा असा मारून ठेवायचा की तो कोणाला समजू नये मग त्याने मारला त्यालाच तो काढता यावा.

पुढे जाऊन मेख चा अर्थ एखाद्या गोष्टीचे रहस्य किंवा कोणाला माहीत नसलेले ज्ञान असा झाला.

मेख ह्या शब्दाचे शब्दकोशात अनेक ( भरपूर) अर्थ दिले आहेत. त्या सर्वांत खुंट किंवा खुंटी हा अर्थ प्रमुख आहे.
इतर अनेक अर्थ ह्या खुंटाला कसे चिकटले असतील ह्याचा शोध घेणेही मनोरंजक आणि मनोज्ञ ठरेल. विशेषतः: ग्यानबाची मेख ह्या वाक्प्रचारात.
मेख म्हणजे जनावराला बांधून ठेवण्यासाठी मजबूतपणे रोवलेला खुंटा, खुंट, लाकूड. बैलगाडीचे बैल सोडले की ते खुंटीला किंवा खुंट्याला बांधतात.
शिवाय मेख म्हणजे मेषसुद्धा. मेष म्हणजे सर्वसाधारणपणे रेडा. पुन्हा बळीशी संबंध.
हालचाल मर्यादित करणे, थांबवणे, सुरळीत चाललेली प्रक्रिया(प्रोसेस) अडकवून ठेवणे हे अर्थ मेख शब्दाशी जोडता येतात. आणखी म्हणजे विरंगुळा म्हणून खीळ घालणे/ पडणे, खीळ, खिळा, चूक, खिटी असे बुद्धीचे चाळे किंवा तर्क करता येण्याजोगे आहेत.
ती मेख जर (जमिनीतून) निघाली नाही तर हालचाल सुरू होणार नाही. गाडं का / कुठे अडलंय, कुठे ' खीळ ' बसलीय , कुठे मेख आहे ते कळणं , त्यातलं रहस्य कळणं, हे इतर रूढ झालेले अर्थ.
कठीण असं अध्यात्म आपल्याला का समजत नाहीये, आचरणात का आणता येत नाहीय ते कळणं म्हणजे ग्यानबाची ( ज्ञानेश्वरांची) मेख कुठे आहे त्याचा उलगडा होणं.

चांगली नवी माहिती. उत्तम चर्चा.
सर्वांना धन्यवाद.
..
निका या शब्दाचे भिन्न अर्थ रंजक आहेत :
1. प्राकृतमधून जो मराठीत आला आहे त्या विशेषणाचे अर्थ :
शुद्ध, चांगला, योग्य.

तर
2. अरबीतून ( निकाह) मराठीत आलेल्या नामाचा अर्थ आहे :
मुसलमानांतील हलक्या प्रतीचें लग्न.

(https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE+)

... मेख असणे किंवा मेख ठेवणे ...

'पाचर' हा 'मेख'सारखाच शब्द. 'पाचर मारून ठेवली आहे' - म्हणजे मुद्दाम काहीतरी अडचण करून ठेवली अशा अर्थाने वापरलेला बघितलाय.

सुतार करवतीने एखादे मोठे लाकूड कापत असतील तर जेवढा भाग कापून झालाय तो परत बंद होऊ.नये म्हणून तिथे 'पाचर' मारून ठेवतात. म्हणजे खुंटीच एक प्रकारची.
ती माकडाची गोष्ट आहे ना..ते ती पाचर काढतं आणि त्याची शेपटी लाकडात चिमटते.

ही घ्या माकडाची गोष्ट...

काही सुतार एक मोठे लाकूड कापत होते व ती मौज पाहात एक वानर झाडावर बसले होते. दुपारी घरी जाण्याची वेळ होताच कापलेल्या लाकडात एक पाचर ठोकून सुतार आपल्या घरी गेले. इकडे ते वानर झाडावरून खाली उतरून त्या लाकडापाशी गेले व सुतारांनी मारून ठेवलेली पाचर उपटून काढली. त्याबरोबर ते लाकूड मिटले जाऊन त्या उपद्‌व्यापी वानराचे दोन्ही पाय त्यात अडकले. अशा प्रकारे तो तेथे अडकून पडला असता काही वेळाने सुतार आपल्या कामावर आले व त्यांनी त्या नसत्या उठाठेवी करणार्‍या वानरास ताबडतोब ठार मारून टाकले.

तात्पर्य - कोणत्याही गोष्टीचा परिणाम काय होईल याचा विचार न करता ती गोष्ट करायला जो एकाएकी प्रवृत्त होतो, तो बहुधा पश्चात्ताप पावतो.

https://www.transliteral.org/pages/z70730084544/view

हो. क्षमस्व.
रेडा नव्हे मेंढाच. मेंढयाला बळी दिले जात असे.
' अजापुत्रम् बलीं दद्यात् , देवो दुर्बलघातक: '

पाचर म्हणजे मेख नव्हे. मेख ही एखादी हालचाल किंवा प्रोसेस restrict करण्यासाठी, सुरळीतपणा थांबवण्यासाठी अथवा मर्यादित करण्यासाठी असते. ती मुळात बळकट आणि मजबूत असे. पाचर त्यामानाने लाकडाचा एखाद फूट लांबीचा पातळ तुकडा. पाचरीचा उपयोग वेगळ्या करण्यासाठी होत असे. कोणतेही दोन अवजड अथवा कसेही अर्धवट विलग केलेले भाग ( ओंडके)पुन्हा जवळ येऊ नयेत म्हणून त्यांच्यामध्ये एखादे बारकेसे लाकूड अर्धवट सरकवून ठेवीत जेणेकरून त्यात पुन्हा करवतीचे पाते शिरकवताना अडचण येणार नाही.

हिरा खीळ म्हणजे बैलगाडी थांबल्यावर चाकात एक लाकूड घालतात त्याने गाडी उतारावर मागे पुढे होत नाही. त्यावरून चालत्या गाड्याला खीळ असा आलाय.

हो. खीळ, खिळा हे वेगवेगळे शब्द आहेत, शिवाय खिळणे, खिळवून ठेवणे हे देखील आहेत. पण मूळचा अर्थ एकच आहे. दृष्टी एकाच जागी खिळून राहाते, दुसरीकडे हलत नाही. नाटकातला एखादा सुंदर सीन प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
चालत्या गाड्याला खीळ घालणे म्हणजे त्याची हालचाल रोखणे.
मराठी शब्दकोशात भरपूर वहिवाटी, परंपरेने असलेले अर्थ सांगितले आहेत.
एका ठिकाणी माणसाला खिळे ठोकणे म्हणजे एका लाकडी क्रूसावर जखडून ठेवणे असाही अर्थ आहे.

कासार याचा मूळ अर्थ
सरोवर; तलाव; डोह
असा आहे.

परंतु बहुतेकांना माहीत असलेला अर्थ
बांगड्यांचा (किंवा भांड्यांचा) व्यापारी
हा आहे.

तो मात्र अपभ्रंश होऊन आलेला आहे :
(सं.) काचकार >>>> कांचार >>>कासार.

ओह कासार म्हणजे सरोवर! आत्ता मला बोरकरांच्या कवितेतल्या ओळीचा अर्थ लागला.
'जलदाची पिचकारी बसली निळ्या निळ्या कासारी गं'

अरे वा !
छान दिसते आहे कविता.
ते कडवे असे :

थरारली बघ कमळे सगळी
मकरंदाला फुटली उकळी
जलदाची पिचकारी बसली निळ्या निळ्या कासारी गं

संगीतक्षेत्रातील एक छान शब्द इथे (https://www.loksatta.com/lokrang/brief-passage-from-gaan-gungaan-book-au...) वाचायला मिळाला :

तनयत = केवळ तानक्रियेला वाहून घेऊन त्यात नैपुण्य मिळवणारा विशेषज्ञ.

तनयत हा नवीन शब्द कळला.
पहिल्याच वाक्यात असणारा शब्द "गानविद" म्हणजे काय ते मात्र लेखात कुठेच सांगितलं नाहीये.

'सव्यसाची व्यक्तिमत्त्व' हा प्रकारपण माझ्यासाठी नवीनच आहे. सव्यसाची म्हणजे अर्जुन म्हणजे डावा/उजवा हात सारख्याच क्षमतेने वापरणारी व्यक्ती ( ambidextrous) इतपत माहीत होते, पण म्हणून एखादा गायक 'सव्यसाची व्यक्तिमत्त्व' आहे म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडला. बहुधा तो गायक दोन्ही हाताने ताना घेत असेल, असे चित्र डोळ्यासमोर आले.

'तनयत' आणि गानविद हे दोन्ही शब्दपण मला तरी कुठल्याच शब्दकोशात किंवा आंतरजालावर सापडले नाहीत. पण हरकत नाही. असे काहीतरी क्लिष्ट, अगम्य शब्द लिहिले की लिखाणाला उगीचच भारदस्तपणा येतो, ते दिसून आले. बहुधा लेखक संगीताप्रमाणे लेखनातही खूप पारंगत असावेत.

विद (p. 2830) विद—पु. जाणता, ज्ञाता, ज्ञानी पुरुष. -वि. ज्ञानी
ज्योतिर्विद हा शब्द ऐकला असेल.

असे काहीतरी क्लिष्ट, अगम्य शब्द लिहिले की लिखाणाला उगीचच भारदस्तपणा येतो, ते दिसून आले>>>
हे अगदी खर आहे.

कांस्य : हा धातू ज्यांना सोनेचांदी परवडत नसे ते लोक पूर्वी अलंकारांसाठी वापरीत.
कासार --- कांस्यकार ---१) कन्सारा ( गुजराती).
२) कांसार - कासार मराठी

छान.
कन्सारा ( गुजराती). >>> एक लेख इथे आहे :
https://maharashtratimes.com/maharashtra/nashik/social-connect-kansas-ta...

संस्कृतमध्ये 'कांस्याकार' या शब्दावरुन 'कन्सारा' हे नाव रुढ झाले. तांब्याची भांडी तयार करणाऱ्यास संस्कृतमध्ये 'तांब्रकार' असे संबोधले जाते. यावरून महाराष्ट्रात कन्सारा समाजाचे 'तांबट' हे नाव प्रचलित झाले.

Pages