नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
वाङ्निश्चय एक आठवला.
वाङ्निश्चय एक आठवला.
"वांगं" ह्या भाजीसाठी "वाङ"
"वांगं" ह्या भाजीसाठी "वाङ" वापरला तर चालेल काय?
<< हा विचार करता ‘ङ’ हे
<< हा विचार करता ‘ङ’ हे अनुनासिक मराठी भाषेतून काढून टाकावे. अभ्यासकांनी ते संस्कृत भाषेतच अभ्यासावे >>
चांगली सूचना. वांग्मय असे लिहावे.
लिखित स्वरूपात तरी नसावा. पण
लिखित स्वरूपात तरी नसावा. पण क-वर्गाच्या वर्णांपूर्वी येणारा अनुस्वार हा नेहमी ङ उच्चारला जातो (उदा. पंकज, पंखा, पंगू, पांघरूण). त्यामुळे त्याचं उच्चारी अस्तित्व नाकारता येणार नाही. ङ मराठी भाषेतून काढून टाकला तर ह्या अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा ते दाखवता येणार नाही. तो पञ्कज, पञ्खा असा नाही (जो पंजा, पंचवीस - पञ्जा, पञ्चवीस मध्ये आहे), पण्कज, पण्खा असा नाही, (जो पँट, पांडू - पॅण्ट, पाण्डू मध्ये आहे), पन्कज, पन्खा असा नाही (जो पंत, पंथ - पन्त, पन्थ मध्ये आहे), पम्कज, पम्खा नाही, (जो पिंपळ, प्लंबर - पिम्पळ, प्लम्बर मध्ये आहे).
आता हल्ली पञ्चवीस , पञ्जा असे उच्चारही अपभ्रष्ट होऊन पन्चवीस, पन्जा असे झाले आहेत. मग ञ ही काढून टाका. अनेकांना र्हस्व-दीर्घही आवडत नाहीत. ते ही काढून टाकण्याची सूचना अनेकदा डोकं वर काढते. ह्या अशा सूचना करण्यामागे सर्वांगीण विचार केला आहे का याबाबतीत शंकाच असते. भाषेची सुलभता महत्त्वाची आहेच, पण त्याबरोबर व्याकरण, अर्थ/अनर्थांची असंदिग्धता, व्युत्पत्तीशास्त्र ह्यांचाही विचार होणं भाषेच्या प्रगतीसाठी गरजेचं आहे. लिपीमध्ये तर जितकी अचूकता असेल तितका उलट फायदाच आहे. प्रमाण नसलेल्या मराठीच्या अनेक बोली केवळ अचूक लिपीतून योग्य प्रकारे जतन केल्या जाऊ शकतात. उलट त्यातले जे उच्चार लिहिता येत नाहीत, त्यांसाठी लिपीत भरच टाकली गेली पाहिजे. कोंकणातील विशिष्ट सानुनासिक उच्चार लिहिण्यासाठी अनुस्वाराचा उपयोग केला जातो. इंग्रजी लिखाणाकरिता अॅ-ऑ चिन्हांचा स्वीकार मराठीने केला तो स्तुत्यच आहे. त्यामुळे डॅम्बीस सारखे मराठी शब्दही लिहिण्याची सोय झाली. तसे मराठीत अन्य कुठल्या बोलीतल्या उच्चारांसाठी काही विशिष्ट चिन्हे हवी असल्यास त्यांवर विचार होणं जास्त महत्त्वाचं वाटतं.
ङ काढून टाकल्याने भाषेच्या प्रगतीतला कुठला अडसर दूर होणार आहे असं वाटत नाही.
हपा, ङ काढल्यास वाङ्मय च्या
हपा, ङ काढल्यास वाङ्मय च्या उच्चाराच्या अगदी जाणारा शब्द कसा लिहिता येईल?
वाङ्मय शब्द आवडतो.
हरचंद पालव >>>+११११
हरचंद पालव >>>+११११
मी हे शब्द म्हणजे पंकज,पंखा आणि त्यांचा ङ शी संबंध हे पूर्वी कधीतरी ऐकले होते. हपा फारच छान पोस्ट.
भाषा समृद्ध करण्या ऐवजी तोड फोड करण्याकडे काही लोकांचे जास्त लक्ष!
अवांतर
अवांतर
मायबोलीची तारीख केव्हा बदलते ? अजून १५ 15 November, 2022 चालू आहे.
.....
भाषा जोडो!
क ख ग घ साठी अनुस्वार ङ
क ख ग घ साठी अनुस्वार ङ
च छ ज झ साठी अनुस्वार ञ
ट ठ ड ढ साठी अनुस्वार ण
त थ द ध साठी अनुस्वार न
प फ ब भ साठी अनुस्वार म
विशेष - 'ङ'; आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणेच नासिक्य होतो. 'ङ' हा 'ड' नाही. तसेच 'ञ' हे 'त्र' नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जुषा=मंजुषा.
संदर्भ
'ङ'; आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणे केल्यास भाषा सोपी होईल. पण शक्यता कमीच.
तज्ज्ञ की तज्ञ याच्यावर काथ्याकूट करणारे आपण, सरळ सोपी भाषा सहजासहजी होऊ देऊ का?
"वांगं" ह्या भाजीसाठी "वाङ"
"वांगं" ह्या भाजीसाठी "वाङ" वापरला तर चालेल काय?
>>> नाही. याची चर्चा याच धाग्यावर पूर्वी झाली आहे ( पान 5 पहावे)
वांगे चा उगम (सं) वृंताक वरुन आहे.
उपाशी बोका>>+१
उपाशी बोका>>+१
हे शिकलो होतो पण विसरलो होतो.
आभार!
भाषा सरळ सोपी करायला पाहिजे यात संशय नाही, पण ते माझ्यासारख्या सामान्य जना साठी.
पण इथे सगळे शब्दसाधक आहेत. त्यांच्यासाठी नाही.
मायबोलीची तारीख केव्हा बदलते
मायबोलीची तारीख केव्हा बदलते ? अजून १५ 15 November, 2022 चालू आहे.
हे व्यक्तिगत सेटिंगनुसार ठरते. तुमच्या सदस्य खात्यात जाऊन
आशिया >> कोलकाता असे करून घ्या .
ओह.आभार.
ओह.आभार.
'ङ'; आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण'
'ङ'; आणि 'ञ'चा उच्चार हा, 'ण' किंवा 'न' प्रमाणे केल्यास भाषा सोपी होईल >> असहमत. उलट ते उच्चाराच्या दृष्टीने जास्त क्लिष्ट होईल. आपण अनुस्वाराच्या पुढचं व्यंजन म्हणताना तोंडाच्या ज्या ठिकाणी जिभेने आघात करतो, तिथलेच सानुनासिक व्यंजन अनुस्वारात म्हणणे सोपे आहे. अनुस्वारासाठी जिभेला वेगळीकडे वळवायला गेलो तर उलट बोबडी वळेल.
इंग्रजी भाषेत काही इंग्रजी लोक धिस यिअर म्हणताना स (दंतव्य) पुढे यि (तालव्य) आल्यामुळे सोयीसाठी स ऐवजी श (तालव्य) उच्चारून धिश यिअर असा उच्चार करतात. जिभेच्या हालचालीतल्या गोंधळामुळे आता जणू हा प्रघात पडत गेला आहे. मराठीत निदान अनुस्वरांच्या बाबतीत तसा गोंधळ नसताना तो निर्माण होईल असे बदल शक्यतो नको.
ङ काढल्यास वाङ्मय च्या
ङ काढल्यास वाङ्मय च्या उच्चाराच्या अगदी जाणारा शब्द कसा लिहिता येईल? >> नाही येणार. कारण इथे अनुस्वार नाहीच आहे. मच्या आधी आलेल्या व्यंजनाचं सानुनासिक व्यंजन होतं अशी ती संधी आहे (नाव विसरलो; बहुधा संस्कृतात ञम्त्व संधी म्हणतात, मराठीत सानुनासिक संधी असेल). वाक् + मय - इथे 'क'चा सानुनासिक वर्ण 'ङ' आहे. चित् + मय इथे 'त'चा सानुनासिक 'न' असल्यामुळे चिन्मय होतं, तसंच हे आहे.
इथे प्रश्न उच्चाराचा नाही,
इथे प्रश्न उच्चाराचा नाही, लिपीचा आहे. जगात अनेक भाषा आहेत, ज्यांना लिपीच नाही किंवा त्यातील शब्द जसे लिहिले जातात, तसे उच्चारले जात नाहीत. अर्थात प्रत्येक उच्चारासाठी स्वतंत्र स्वर/व्यंजन देऊन भाषा अजून
क्लिष्टसमृद्ध करायची असेल तरी ठीक आहे. तुमच्या मताचा आदर आहे.वांग्मय असे लिहिल्याने शब्द समजण्यात असा काय मोठा फरक पडणार आहे? असे माझे मत आहे. क्लृप्ती, वाङमय सारखे शब्द तसेही मी वापरण्याची शक्यता शून्य आहे. मला व्याकरणात फारशी रुची नाही, मला फक्त साधी सोपी सरळ भाषा आवडते जी दुसऱ्याला सहज समजेल.
वांग्मय असे लिहिल्याने आपण एक
वांग्मय असे लिहिल्याने आपण एक व्यंजन एक्ष्ट्रा वाढवलं आहे. त्यात ग च्या आधी अनुस्वार आल्यामुळे त्याचा उच्चार ङ आहेच, शिवाय ग आला, म्हणजे उच्चाराची फोड वा + ङ् + ग् + म + य अशी झाली. ङ कधी पाहिला नसल्यामुळे कदाचित वाचायला तो सोयीचा वाटतो आहे, ह्याबाबतीत मी सहमत. पण त्याची व्युत्पत्ती सांगायला आधी वाङ्मयचा अपभ्रंश वांग्मय आणि वाक् + मय ची संधी वांङ्मय - असा द्राविडी प्राणायाम करायला लागेल. सर्वांनी व्युत्पत्तीचा अभ्यास करावा असं माझं म्हणणं नाही. पण जी गोष्ट फारसा अभ्यास न करता आपोआप शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते आहे, तिला कमी शास्त्रीय का बनवायचं, ते पण केवळ एका शब्दाच्या वाचनसोयीकरिता? सहज सोपी भाषा वापरणारे वाङ्मय शब्द वापरतही नसावेत. त्यामुळे त्यांच्या सोयीचा प्रश्न येत नाही.
सामान्यांसाठी बोलीभाषेचे
सामान्यांसाठी बोलीभाषेचे सुलभीकरण होत रहावे हे बरोबर. परंतु एखादी समिती जेव्हा प्रमाणभाषा ठरवते तेव्हा तिला सांगोपांग विचार करावा लागतो; मनमानी करून चालत नाही.
एक वैद्यकीय विज्ञानातले उदाहरण देतो.
मधुमेही रुग्णांच्या बाबतीत आपण HbA1c याची मोजणी नियमित करीत असतो. मध्यंतरी आमच्या एका परिषदेत एका जेष्ठ डॉक्टरांनी सुचवले, की रुग्णांशी बोलताना तुम्ही HbA1c ऐवजी नुसते A1c हे सुलभ रूप वापरा म्हणजे त्यांना ते पटकन समजते.
जर डॉक्टर HbA1c असे पूर्ण बोलत राहिले तर रुग्ण म्हणतात, की आमचे Hb करून झालेले आहे. मग पुन्हा डॉक्टरांना सांगावे लागते, “अहो, ते नुसते Hb; आणि HbA1c हे वेगळे असते”.
परंतु हेच रसायन जेव्हा पाठ्यपुस्तकात किंवा अन्यत्र प्रमाणभाषेत लिहावे लागेल तेव्हा HbA1c असे पूर्ण रूपच लिहावे लागेल. नुसते अर्धवट A1c असे लिहिल्यास ते अर्थहीन होईल ( कारण ते एक Hb चाच प्रकार आहे).
सारांश :
सारांश :
बोलीभाषा समाजात हवी तशी 'सोपी' होत राहील आणि जरूर व्हावी.
परंतु प्रमाणभाषेतील बदल अधिकृत करताना ते विचारपूर्वक करावे लागतील .
पहिल्यांदा HbA1c ऐकले तेव्हा
पहिल्यांदा HbA1c ऐकले तेव्हा व्हीस्याचा प्रकार वाटलेला.
मराठीत जसे लिहिले तसे
मराठीत जसे लिहिले तसे उच्चाराणे आणि जसे उच्चारतो तसे लिहिणे हा नियम आहे किंवा भाषेचा गुण आहे म्हणून.
वा़ग्मयचा उच्चारही तसाच होऊ लागेल.
अनेक इंग्रजी शब्दांच्या स्पेलिंगमधली काही अक्षरे सायलेंट असतात.
मराठीत बदल करायचे तर च्, त, ज इ., ड यांचे दोन वेगवेगळे उच्चार दर्शवण्यासाठी हिंदीसारखा नुक्ता आणायला हवा.
(No subject)
Hb A1c : visa

जडभारी चर्चेमध्ये अधूनमधून असे विनोद आवश्यक आहेत !
त, ड आणि इ यांचे कुठले दोन
त, ड आणि इ यांचे कुठले दोन उच्चार आहेत? झ, ज, च यांचे दोन-दोन आहेत.
वाङ्मयचा उच्चार शाळेत असताना एका मुलाने वाडमय असा केला होता!
ह पा, अगदी अगदी सहमत.
ह पा, अगदी अगदी सहमत. उच्चाराच्या उगम स्थानानुसार वर्णमालेची आतून बाहेर अशी अगदी शास्त्रशुद्ध मांडणी आपल्याला वारसा म्हणून मिळालेली आहे. ती जतन करावी.
वाड्.मय हा शब्द कम्प्यूटर वर लिहिता येत नाही केवळ म्हणून तो बाराखडीतून बाद करू नये.
संधी न करता वाक् मय असाही तो लिहिता येईल. पण वर्णमालेचा पाया समजण्यासाठी अनुनासिकांचे अस्तित्व आवश्यक आहे.
"ब्रिटिश इंग्लिश स्पेलिंगचे
"ब्रिटिश इंग्लिश स्पेलिंगचे अमेरिकी सुलभीकरण" या विषयावर माझी एकदा हैदराबादच्या एका इंग्लिशच्या प्राध्यापकांशी चर्चा झाली होती. त्यांनी मला सांगितले की मूळ स्पेलिंग मधले जे काही बदल अमेरिकेने केले आहेत ते वरवरचे आहेत हे लक्षात घ्या.
( ae>>e, tre >>>ter इ).
काही शब्दांच्या बाबतीत उच्चार आणि स्पेलिंग यांचा संबंध नसल्यासारखे आहे. परंतु त्या शब्दांची व्युत्पत्ती पाहून त्यांच्या स्पेलिंगला अमेरिकी इंग्लिशमध्ये धक्का लावण्यात आलेला नाही.
च ज झ यांचे दोन्ही वेगळे जे
च ज झ यांचे दोन्ही वेगळे जे उच्चार आहे त्यासाठी मोडीत वेगवेगळी व्यंजने आहेत का?
त नाही. Autocorrect चे
त नाही. Autocorrect चे उपद्व्याप.
च, छ, ज, झ, ड.
इ. म्हणजे इत्यादि
छ चा छत्री, छडी, छाती या
छ चा छत्री, छडी, छाती या मध्ये जसा पूर्ण तालव्य उच्चार आहे त्या शिवाय दंतव्य जवळ येणारा (जसा चकतीतला च) उच्चार असणारे शब्द उदाहरण आहेत का?
तसेच ड चा डमरू मधला आहे त्या पेक्षा वेगळा उच्चार कोणता?
पण ड आणि छ चे तरी कुठले दोन
पण ड आणि छ चे तरी कुठले दोन उच्चार?
आपले प्रतिसाद एकाच वेळी आले मानव.
>>>>पण वर्णमालेचा पाया
>>>>पण वर्णमालेचा पाया समजण्यासाठी अनुनासिकांचे अस्तित्व आवश्यक आहे.>>>+99
>>>>पण जी गोष्ट फारसा अभ्यास न करता आपोआप शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाते आहे, तिला कमी शास्त्रीय का बनवायचं, >>>>>+99
मराठीत ड चा उच्चार विशिष्टच
मराठीत ड चा उच्चार विशिष्टच केला पाहिजे असं नाही. हिंदीत त्याबाबत संकेत आहेत. नक्की आठवत नाही. पण शब्दांच्या सुरुवातीचा ड आणि मधला ड यांचे उच्चार वेगळे असतात.
मराठीतही पहिल्या स्थानी असलेल्या ड चार उच्चार दोन प्रकारे होऊ शकतो. डबा / झाड.
नि:शेष जाड्या पहा आणि जाड्याभरड्या यात हे दोन वेगळे उच्चार कळतात.
Pages