भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधना
बृहदकोश असे देतोय ,:
बहुधा
बहुधा bahudhā ad (S) In many ways or sorts. 2 For the most part; generally speaking.

मोल्सवर्थ शब्दकोश
(सं) क्रि० बहुतेक, बहुतकरून. २ अनेक प्रकारांनीं.

बहुतेक
बहुतेक n Many a one, several. Very probably.

दिवाळीच्या शुभेच्छा. खूप छान माहिती मिळत आहे.
>>>आभार व धन्यवाद - फरक माहित नव्हता… धन्यवाद.>>>+९९९९
महाराष्ट्र टाइम्स मधला तो लेख खूप छान आहे. माहितीसाठी पुन्हा धन्यवाद.

आजच्या पंचमीला अशी नावे आहेत :

कडपंचमी, पांडवपंचमी, लाखेनी पंचमी, लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी.
त्यापैकी ''कड' व लाखेनी यांचा संदर्भ कोणाला माहिती आहे का ?

( कड = शेवट ; महाभारतातील युद्धाचा शेवट ??)

तेलंगी अळिंबी असेल असा वाटत नाही. त्याला एकाच पान असा का म्हणतील. भरत म्हणतात तसे अर्थहीन पण असू शकते. मला वाटतंय की काहीतरी मूळ वेगळा अर्थ असेल जो आता कॉन्टेक्स्ट जाऊन पूर्ण अर्थहीन झालाय.

आपडी थापडी >> तेलंगी माहीत नाही, पण त्यातच पुढे च्याऊ माऊ, पत्रावळीचं पाणी पिऊ - असं माझी आई म्हणत असे. आता मला पत्रावळीचं पाणी कसं पिणार हे काही नीट उमगत नाहीये. पत्रावळ्यांचे द्रोण केले तरी त्यातून पाणी का प्यायचं हे ही नीट कळत नाही. म्हणून मी आपडी थापडी शब्द टाकून शोध घेतला तर त्याच्या शब्दात बरंच वैविध्य दिसलं. काही ठिकाणी 'पखालीचं पाणी पिऊ' असं लिहिलं आहे - आणि ते जास्त सयुक्तिक वाटतं. पखाल म्हणजे एक कातडी पिशवी ज्यातून पाणी वाहून नेत असत. पूर्वी म्हणे पंपिंगची सोय नसताना पाणीपुरवठा पखालींमधून केला जात असे. आता ती वस्तूच कालबाह्य झाल्यामुळे तो शब्दही अपेक्षेप्रमाणे नामशेष होऊ लागला आहे. तरी 'कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ... अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली' ह्यासारख्या गाण्यांमधून पखाल आपल्यापर्यंत वाहून आणली गेली आहे.

इतकी वर्षे त्या आपडी थापडीत 'पत्रावळी' म्हटल्याचे प्रायश्चित्त म्हणून आपले कान पुढील पिढीला ओढायला लावून 'पखालीचं पाणी पिऊ' म्हणत च्याऊ माऊ करायला हरकत नाही. Wink

**पखालीचं पाणी पिऊ' >> छान!
पखालीने पाणी वाहून नेणाऱ्याला भिस्ती असे म्हणतात. हा शब्द शब्दखेळांमध्ये वारंवार येतो. त्यासंबंधीची काही रंजक माहिती बृहद कोशातून :

भिस्ती =
मसक, पखाल यांनीं पाणी वाहणारा, मुसलमान जातीचा पाणक्या. फरक दाखविण्यासाठीं खांद्यावरून पखाल वाहणार्‍यास मसकभिस्ती व बैलावरून पखाल वाहणार्‍यास बैल- भिस्ती म्हणतात. एकटा भिस्ती हा शब्द दोहोंबद्दल सामान्यपणें योजतात. [फा. बेहश्ती = स्वर्गीय]

पखालीचं पाणी पिऊ>>>>
पखाल चा एक अर्थ चामड्या पासून बनवलेली थैली असाही आहे. पूर्वीच्या काळी दूरच्या खास करून वाळवंटातील प्रवासात पखालीत पाणी भरून ते सोबत नेत असत. या थैल्या गुजरात राजस्थान भागात जास्त करून उंटाच्या कातड्याच्या बनत.
(त्या बडबड गीतातील पुढ्च्या ओळी.... बाळाला घेऊन भूर्र उडून जाऊ... यांच्या संदर्भात पखाल हेच योग्य वाटते.)

मुका मुलगा होणें =
प्रथम न्हाण येणे अर्थात
प्रथम मासिक पाळीची सुरुवात
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE+)

या वाक्प्रचारात " मुलगा " चा काय संबंध आहे ते नाही समजले

विवाहित मुलीला पहिले न्हाण आले यासाठी तो वाक्प्रचार आहे असे दिसते.
पाळीचा सरळ उल्लेख करणे प्रशस्त मानले जात नसल्याने व यानंतर गर्भाधान विधी करता येणार असल्याने मुका मुलगा झाला हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

इथे लिहिलंय त्या नुसार पाळी आली म्हणजे लौकरच मुलगा होणार या आनंदात आई बाप असत. (तेव्हा लौकर लग्न झालेले असे). लौकरच मुलगा होणार, म्हणजे आता मुका मुलगा झाला असा अर्थ दिसतोय. मुलगाच का तर तेव्हाही पहिला मुलगा व्हावा हीच इच्छा असे हे दिसून येते.

आता समजले.

तिथे पण हे पण वाक्य दिलेले आहे :
मुका नातू होणें

बहुतेकांचा दिवाळीचा फराळ आता संपत आला असावा. ते पदार्थ तयार करताना जे मोहन पिठात घातलेले होते त्या नपुसकलिंगी मोहन ची ही कथा पहा:

https://www.loksatta.com/navneet/article-about-marathi-grammar-article-m...

मोहन’ हा शब्द ‘मोवन’ या शब्दाचा अपभ्रंश.

प्राचीन भाषा संशोधनासंबंधीची एक रंजक बातमी

https://metro-co-uk.cdn.ampproject.org/v/s/metro.co.uk/2022/11/09/myster...

सुमारे 3700 वर्षापूर्वीच्या या भाषेतील पहिल्या वाक्याचा अर्थ लावण्यात आला आहे. ते वाक्य, "केस व दाढीतील उवांपासून सुटका व्हावी"
या आशयाचे आहे !

हाहा! जबरी!! हस्तिदंताची फणी आणि त्यावर त्याची जाहिरात किंवा कशासाठी वापर करायचा त्याची माहिती आवडलीच एकदम. Happy

मोवन आवडले
>>>हस्तिदंताची फणी आणि त्यावर त्याची जाहिरात किंवा कशासाठी >>> भारीच आहे.

राज्य सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समितीतर्फे प्रमाणलेखनासंबंधीचे नवीन नियम नुकतेच जाहीर झाले आहेत.

त्यातील काही महत्त्वाच्या नोंदी
:
१. आणि या अक्षरांची दोन रुपे असतात. त्यातील फक्त देठयुक्त श व पाकळीयुक्त ल याच दृश्यरूपांना मान्यता दिली आहे.

२. अब्ज या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश नाही.

( बातमी: छापील सकाळ 12 नोव्हेंबर 2022, पान ३).

इथे उमटतोय तो श आणि मी लिहितो तो श यांत फरक आहे. इथे शच्या डोक्यावर किंचित रेष दिसतेय आणि त्याखालचं वर्तुळ जोडलेलं नाही. छापील श मात्र मी लिहितो तसाच दिसतोय. नक्की कोणता बरोबर?

संबंधित बातमीत असे आहे:
श हस्ताक्षरात २ प्रकारे लिहिता येतो - देठयुक्त आणि गाठयुक्त .
त्यापैकी फक्त देठयुक्त श याच दृश्यरुपाला मान्यता दिली आहे.

देठयुक्त आणि गाठयुक्त म्हणजे काय ते नक्की कळलं नाही. इथे उमटतोय तो कोणता आहे?
बातमीत चित्रे दिली आहेत का ? तर शोधतो.

Pages