भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरच्या शब्दाशी साधर्म्य दाखवणारा अजून एक शब्द म्हणजे
द्वैमातृक.
याचा अर्थ : असा प्रदेश जिथे नदी आणि पावसाचे पाणी अशा दोन्हींवर आधारित शेती केली जाते.

'द्वै ' या मालिकेतला अजून एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द म्हणजे 'द्वैपायन '.
हे व्यासांचे नाव आहे. त्यांचा जन्म एका द्वीपावर झाल्यामुळे.
काही ठिकाणी कृष्ण द्वैपायन असाही उल्लेख आढळतो. कृष्ण नाव आधी लावण्यामागे काय कारण असावे ?

कृष्ण - काळे ह्या अर्थाने आहे ते. ते काळे/सावळे होते म्हणे. द्रौपदीदेखील सावळी असल्यामुळे तिला 'कृष्णा' असेही म्हणत असत.

‘शब्दांची रोजनिशी’ : मानवी संस्कृतीच्या ऱ्हासाच्या मूलभूत स्त्रोतांचा परिचय करून देणारे नाटक :
https://www.aksharnama.com/client/article_detail/6383

त्या लेखातील काही निवडक :
• या नाटकात एका स्थानिक भाषेचा उल्लेख होतो. ‘चहा’ या एकाच पदार्थासाठी त्या भाषेत ३६४ शब्द आहेत.
• इंग्लंडमधील उत्तर भागात इग्लू नावाची इंग्रजी भाषेतील एक अ-प्रमाण व्हरायटी आहे. या भाषेत ‘बर्फ’ या शब्दाला बारा शब्द आहेत.

महर्षी व्यासांनी कृष्णाची इतकी भक्ती केली की ते कृष्णमयच होउन गेले, म्हनून त्यांचे नाव कृष्ण द्वैपायन पडले अशी एक उत्पत्ती विनोबा भावेंच्या गीताई मध्ये वाचली होती.

सर्व भाषाप्रेमींना व त्यांना एकत्र आणणाऱ्या कुमार सरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy
उबोंनाही दिवाळीच्या शुभेच्छा Wink Happy

वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भाषेला (व सर्वच विषयांना) बघणाऱ्या व आपले मत प्रामाणिकपणे सांगणाऱ्या लोकांमुळेच मायबोली खमंग व खुसखुशीत चकलीसारखी राहते Happy . (नाही तर दुसरीकडे राजकारण सोडले तर 'ऐश्वर्याने झटकला सासूचा हात, बघा मलैकाचा नवा कुत्रा आणि गुरूंच्या खडिसाखरेने झाले अडलेले प्रमोशन' हे आहे. )

सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी ॥ ज्ञा अ १५ - १२॥

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा Happy

सर्वांना धन्यवाद देतो पण आभार मानत नाही Happy कारण ..... हे शिकायला मिळाले :
आभार / धन्यवाद यांतील फरक
https://maharashtratimes.com/editorial/samwad/time-to-look-in-mirror-how...

मातृभाषेतले किती तरी शब्द आपण एकमेकांना पर्याय म्हणून वापरतो खरे. अशाने त्यातले सूक्ष्म फरक नजरेआड होतात; त्यामुळे भाषिक गोंधळाला आमंत्रण दिल्यासारखे होते.

उदा. आभार ‘मानणे’ आणि धन्यवाद ‘देणे’ यात झालेली गल्लत. आभार शब्द संस्कृतमधून (आ + भृ) वरून आलेला आहे. भृ म्हणजे भार. म्हणजेच, या शब्दाच्या मुळाशी ‘भार धारण करायला लावणे’ अशी कल्पना आहे. एखाद्याला ओझे, आवरण धारण करायला लावणे, म्हणजे आभारणे.
..............आभार मानणे यात उपकाराच्या ओझ्याने वाकणे, त्याची जाणीव असणे, त्या दृष्टीने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे..

.......मात्र ‘धन्यवाद देणे’, म्हणजे स्तुती करून कृतज्ञता व्यक्त करणे. आभार म्हणजे ‘ऑब्लिगेशन’, तर धन्यवाद म्हणजे फेलिसिटेशन ऑर बीइंग ब्लेस्ड टु अटेन ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ (दुवा देणे) असे मराठी भाषेसाठीच्या विख्यात मोल्सवर्थ-कँडी यांच्या शब्दकोशात म्हटले आहे.

<< सर्वांना धन्यवाद देतो पण आभार मानत नाही >>

Thank you for your wishes हे सरळपणे सांगण्याऐवजी, उगीच अट्टाहास करून भाषा क्लिष्ट करण्याचा प्रकार. "शुभेच्छांबद्दल आभारी आहे" आणि "शुभेच्छांबद्दल धन्यवाद" यापैकी काहीही म्हटले, तरी समोरच्याला बरोबर कळतं की तुम्ही काय म्हणताय ते.

भाषा साधी, सरळ सोपी असली की जास्त सोयीचे पडते आणि अतिचिकित्सा करायची गरज नसते.

ज्यांना भाषेतील बारकावे जाणून घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी ही चर्चा आहे.
ज्यांना आवड नसेल त्यांना ते न वाचण्याचे स्वातंत्र्य आहे.

अट्टाहास >>> अट्टहास असा योग्य शब्द आहे
(https://www.loksatta.com/navneet/the-spelling-of-the-word-should-be-simi...).

बरोबर, न वाचण्याचे स्वातंत्र्य आहे, तसेच विरोधी मत मांडण्याचे स्वातंत्र्यसुद्धा आहे.

अट्टहास (की अट्टाहास) तळटीप १:

तळटीप २: अट्टाहास शब्द बरोबर आहे.

माझे म्हणणे (की बोलणे) समोरच्या व्यक्तीला कळणे (की समजणे), माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे, त्यासाठी मी शब्दकोश घेऊन बसत नाही.

भाषा साधी, सरळ सोपी असली की जास्त सोयीचे पडते आणि अतिचिकित्सा करायची गरज नसते.>>>
इन फुल अग्रीमेंट!
भाषेचे बारकावे समजण्यासाठी अशा चर्चा आवश्यक पण शेवटी भाषा ही लोकव्यवहारातील असावी. भाजीवाल्याला सीम कार्ड म्हणजे काय हे जर समाजात असेल तर तोच शब्द आपण आपल्या भाषेत का दत्तक घेऊ नये?
मला वाटतंय की ह्यासाठी वेगळा धागा काढायला पाहिजे.
सिग्नल
अग्निरथगमनागमनदर्शकताम्रलोहपट्टीका!
हे कुठे वाचले बर मी?

पाऊसवाऱयापासुन अंग झाकण्यासाठी एक फडका, पोटाची भुक शमवण्यासाठी सगळे कच्चे पदार्थ एकत्र करुन खिचडी आणि ऊन पावसापासुन सुटका म्हणुन डोक्यावर आधार ईतकीच
गरज असताना मानवाने ईतका भयंकर मोठा डोलारा ऊभारला त्याची अनंत कारणे आहेत. संवाद व भाषा हाही त्याचाच भाग आहे.

आभार व धन्यवाद - फरक माहित नव्हता… धन्यवाद.

महर्षी व्यासांनी कृष्णाची इतकी भक्ती केली की ते कृष्णमयच होउन गेले, म्हनून त्यांचे नाव कृष्ण द्वैपायन पडले >>>>

हे दोघेही समकालीन असावेत किंवा व्यास कृष्णापेक्शआ मोठे असावेत. महाभारतात कृष्णाची एंट्री बरीच नंतर आहे. त्या दोघांचा एकत्रीत असा एकही प्रसंग आठवत नाही. कृष्णप्रवेशानंतर महाभारतात व्यास फारसे नाहीतच. त्यामुळे भक्ती वगैरे पटले नाही.

हुमान शब्द माहीत नव्हता>>>
हा शब्द मालवणी भाषेत नित्य वापरातला आहे. कोडे म्हटले तर चटकन कोणाला कळणार नाही.

Pages