भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अनाथ' का ''स्वनाथ'" ?

पालक गमावलेल्या मुलांसाठी 'अनाथ' (Orphan) या शब्दाऐवजी 'स्वनाथ' या शब्दाचा वापर करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळून लावली.
अनाथ हा शब्द निव्वळ मराठीतच नव्हे तर हिंदी आणि बंगाली या अन्य महत्त्वाच्या भांषामध्येही समानार्थी प्रचलित आहे. त्यामुळे तो बदलण्याची गरज नाही असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं याचिककर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांची याचिका फेटाळून लावली.

https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...

स्वनाथ योग्य नाहीच कारण ही मुले आधाराशिवाय वाढु शकत नाहीत. नाथ शब्दावर जी मालकीहक्काची छाप आहे त्यावर कदाचीत याचिकाकर्त्यांचा आक्शेप असावा…

जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली हे अतिशय उत्तम झाले. हल्ली political correctness चे खूळ बोकाळले आहे.

Artificial intelligence साठी सध्या काही ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता असं भाषांतर वाचतो आहे. पण नुकतीच संदीप वासलेकर यांची एक मुलाखत बघत असताना त्यांनी 'कृत्रिम प्रज्ञा' असा शब्द वापरलेला पाहिला. तो जास्त चपखल वाटतो.

कृत्रिम प्रज्ञा चांगला आहे.
'नव'प्रज्ञा संगणक अभियंत्यांकडून आल्यासारखा आहे. त्यांना नेक्स्ट जनरेश, मग त्याच्या पुढे काही आलं की अनदर नेक्स्ट जनरेशन. मग त्याच्याही पुढे काही आलं की यट अनदर नेक्स्ट जनरेशन अशी नावं द्यायला फार आवडतं. Proud अनेकोनेक उदाहरणं सापडतील.

आयाराम, गयाराम’ चा उगम माहीत नव्हता. तो इथून समजला :

https://www.loksatta.com/navneet/bhashasutra-languages-phrase-language-m...

"१९६७मध्ये हरियाणातील आमदार गया लाल यांनी एका पंधरवडय़ात तीन वेळा पक्षांतर केले. त्यांच्या नावावरून ‘आयाराम, गयाराम’ हा वाक्प्रचार रूढ झाला".

सुंदर. मला पाहिजे असलेला दशमग्रहाचा संदर्भ यात मिळाला. धन्यवाद. एका त्या संदर्भातल्या धाग्यावरही टाकतो हे.

मतिमंद" हा अगदी रूढ शब्द आहे. परंतु,

पूर्वी मी एका भाषेच्या चर्चेत असे वाचले होते की योग्य शब्द मंदमती असा हवा आहे. याला त्यांनी दुसरे उदाहरण मंदगती, जलदगती (गोलंदाज) असे दिले होते.

मंदगती गोलंदाजाला आपण गतिमंद असे उलटे म्हणू शकणार नाही. त्याच धर्तीवर मंदमती योग्य असे त्यांचे म्हणणे होते.

सध्या लोकसत्ता मध्ये जे भाषा सूत्र सदर चालू आहे त्यातील एका लेखकांशी मी या विषयावर संपर्क साधला. त्यांचे उत्तर आले की मतिमंद हे रूढ व अधिक योग्य वाटते.
….
आता यावर माझा अजून एक विचार.

मती, गती याप्रमाणे आपण बुद्धी शब्द घेऊ. आता बुद्धीला जर ते विशेषण लावायचे असेल तर मंदबुद्धी असे होईल, नाही का ?
बुद्धिमंद असे रूढ नाही.
मग हाच नियम मतीच्या वेळेला का लावता येत नाही ?

..
पण....
बृहदकोश तसा शब्द देतोय खरा !

बुद्धिमंद-वि. ज्याची बुद्धि जड आहे असा; जडबुद्धि.
पण त्याचा एक अर्थ देताना पुन्हा जडबुद्धि .
https://bruhadkosh.org/words?shodh=+%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D...

रोचक आहे. (रोचक शब्दाला पर्याय हवाय मला Happy )
मती, मेधा व प्रज्ञा हे बुद्धीचे तीन घटक वाटतात मला. (माहिती नाही का) . त्यात मतीचा अर्थ आकलनशक्तीच्या जवळ जाणारा वाटतो. मेधाचा स्मरणशक्तीच्या(+व्यासंग ई) जवळ जाणारा आणि 'प्रज्ञा' प्रतिभेसारखा, ज्याने आपल्याला नवीन गोष्टी सुचतात.
त्यामुळे मतीमंद म्हणजे स्लो लर्नर किंवा आकलनशक्ती कमी , पण मेधा व प्रज्ञा कमी असतीलच असे नाही. त्यामुळे स्लो लर्नरलाही काही तरी अफाट सुचू शकते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
बुद्धिमंद म्हणजे सगळ्याच प्रकाराचा अभाव गृहीत धरलाय, तो शब्दच तितका चपखल नाही. अजून फाईन ट्यून हवे. त्यामुळे ते गोलगोल लिहिले असेल.
मलाही 'मतिमंद' योग्य वाटतोय. मंदमतीही चूक वाटत नाही.
काय उपयोग आहे ह्या प्रतिसादाचा Proud

छान विवेचन.
रोचक>>>
खरं म्हणजे रुचकर वापरायला काय हरकत आहे.?
आंतरजालावर येण्यापूर्वी मी रोचक हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता !
....
अस्मिता
चूक दोन्हीही नाहीत
अधिक योग्य कोणता एवढाच मुद्दा आहे...

अजून एक उदाहरण.

गाडी हा मूळ शब्द. त्याचे विविध प्रकार दाखवताना प्रत्यय लागलेले शब्द त्या अगोदर लिहितो ना ?
घोडागाडी/ बैलगाडी/ हातगाडी.

तसेच मती जर मूळ शब्द धरायचा असेल तर मग विविध प्रत्यय आधी लागले पाहिजेत.
अर्थात अपवाद हे करता येतीलच.

अधिक योग्य कोणता एवढाच मुद्दा आहे...
तसेच मती जर मूळ शब्द धरायचा असेल तर मग विविध प्रत्यय आधी लागले पाहिजेत.
>>>>हम्म , सगळं उलटं व्हायचं मगं Happy

कूट प्रश्न = हुमाणा असे शब्दखेळात समजले.
याचा व्युत्पत्तीप्रवास रंजक आहे.

सं.आहनस्या >> (प्राकृत) आहाण >>आहाणा >> उमाणा >> उखाणा.

हे घ्या ..
यंदाच्या ( पावसाळी) दिवाळीतला हा नवा संयोगशब्द

chandil.jpg

संस्कृतमध्ये समासविग्रह करताना पुमान् किंवा स्त्री निर्देशित करण्याची पद्धत आहे. शाळेत असताना शिकलो होतो. आत्ता पटकन उदाहरण आठवेना म्हणून गुगल केले तर खालील उदा सापडले.

द्वैमातुरः = द्वयोः मात्रोः अपत्यम् पुमान्

आता इथे अपत्यम् हे नपुंसकलिंगी आहे. पण सामासिक शब्द पुल्लिंगी असल्यामुळे शेवटी पुमान् लिहून लिंगनिदान केले आहे. द्वैमातुरा असतं तर स्त्री लिहिलं असतं.

आणखी उदाहरणे आठवली -

जानकी - जनकस्य अपत्यम् स्त्री
राधेयः - राधाया: अपत्यम् पुमान्

असंच पांडव, कौरव, दत्तात्रेय, दाशरथ, कौन्तेय, भार्गव वगैरे नावांचं वर्णन कर्ता येईल. वरती मुद्दामून वडिलांची मुलगी आणि आईचा मुलगा अशी उदाहरणे निवडली आहेत. Happy

बाकी ठिकाणी कुठे मी पुमान् वापरल्याचं आठवत नाही. ह्या असल्या तद्धितांमध्येच मी वापरले आहे कदाचित. जुन्या संस्कृत श्लोक आणि सूक्तांत पुमान् दिसते आहे, वरती निकु ह्यांनी म्हटल्याप्रमाणे.

हरचंद पालव, _/\_ घ्या.
द्वैमातुरः म्हणजे मला कृष्ण आठवला. पण हे गणपतीचं नाव आहे, असं दिसतं. कर्णालाही लागू होईल का हे? आणखी कोण आहेत असे?

हुमान नावाचं संगीता उत्तम धायगुडे यांचं पुस्तक (आत्मचरित्रच) आहे. त्यात त्यांनी या शब्दाचा अर्थ 'उखाणा' किंवा 'कोडं' असाच दिलाय. (आयुष्याचं कोडं या अर्थाने वापरलाय)
वरची चर्चा खूप आवडली.

Pages