भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पायली = धान्य मोजण्याचें चार शेराचे एक माप.
त्यावरून आलेले विविध वाक्प्रचार व भिन्नता : (विपुलता)
* पायलीचे पंधरा
* (गोवा) : पायलेस /पायलेड पन्नास

* पायलीचे पंधरा, अधोलीचे सोळा
* पायलीचे पंधरा, अधोलीचे छप्पन

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%...

https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A...

बैलगाडीच्या चाकांवर लोखंडी पट्ट्या बसवलेल्या असतात. त्या एका पट्टीला धाव आणि अनेक पट्ट्यांना धावा म्हणतात. ती बसवणारा तो धावडी. किंबहुना नंतर नंतर धावडी म्हणजे लोखंडी.
स्थपति म्हणजे स्थापत्यकार, ( आर्किटेक्ट) शिल्पकार, पुढे सुतार, धातुकाम करणारा ,सारथी,मुख्य. श्रेष्ठ.
स्थविर/ स्थवीर ( पाली थेर, थेरो) कुठलाही आदरणीय वृद्ध, बौद्ध धर्मातील जुनी तत्त्वे मानणारा कर्मठ पंथ, बौद्धांतले जुने जाणते धर्मज्ञ. स्थिर. स्थिर( जैसे थे) स्थिती आवडणारे लोक.
थवी आडनावाचे लोक पूर्वी लोहारकाम करीत. खूप पूर्वी धातूकामाचे
ज्ञान असणारा अतिशय आदरणीय असे.
तवी, तवा ही लोखंडी स्वयंपाक साधने शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत.

तवी, तवा ही लोखंडी स्वयंपाक साधने शेकडो वर्षे अस्तित्वात आहेत. >>> +११

तसेच...
चाक हा अत्यंत मूलभूत शोध आहे. काळानुसार त्यात कितीही आधुनिक फेरफार झालेले असले तरी मूळ संकल्पना कायम राहिलेली आहे

"चाक हा अत्यंत मूलभूत शोध आहे. काळानुसार त्यात कितीही आधुनिक फेरफार झालेले असले तरी मूळ संकल्पना कायम राहिलेली आहे."
अर्थातच. Iron age हे जास्तीत जास्त पूर्व कॉमन एरा १४०० इतकेच मागे खेचता येते. पण चाक निर्मिती (आणि त्याआधी कितीतरी वर्षे अग्नी निर्मिती) हे मानव संस्कृतीच्या इतिहासातले दोन अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत.

त्याआधी कितीतरी वर्षे अग्नी निर्मिती)>>> अ ग दी च !
...
उंबर्तो इको या लेखकांनी तर चाक व पुस्तक यांची सुंदर तुलना केली आहे.
ते म्हणतात,
"पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी आहे.
पुस्तकाचं स्वरूप बदलेल ( हस्तलिखित >> छापील >>>> इ.) पण त्यातली 'वाचन करणे' ही गोष्ट कायम राहील !"

"पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवजातीच्या इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी आहे."
अगदी. आणि हीच कल्पना पुढे नेत मी म्हणेन की हस्तलिखित पुस्तके, पत्रे हे तर होतेच. यापुढे छपाईचा शोध हा तर सर्वत्रच, विशेषत: भारतीय उपखंडात अतिशय महत्त्वाचा होता. कारण त्यामुळे ज्ञान आणि माहिती सर्वसामान्यांच्या आणि प्रतिबंधितांच्या आवाक्यात आली.

काही लावण्यामध्ये पिरती / पिर्ती हा शब्द येतो.
जसे की,

“ ही नजर उधळीते काळजातली पिरती”

पिरती चा अर्थ नाही सापडला कुठे.
? बेचैनी , हुरहुर

"आमला" या शब्दाची विविध भाषिक गंमत पहा:

आमला (मराठी) = कारकून, अमलदार.
(अरबी अमलावरून उगम)

आमला (हिंदी) = आवळा
(संस्कृत आमलक >>>प्राकृत आमल)

https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE

सूट या मराठी शब्दाचा नेहमीचा अर्थ सर्वांना माहित आहेच परंतु अन्य अर्थही चाकित करणारे आहेत:
सूट=
१ (कर्ज इ॰ तून) माफ केलेली, सोडलेली रकम.
२ (गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता; सुटका; सोडवणूक.
३ रांगेंत मध्यें पडणारा खंड; दोन पदार्थांतील अंतर; फट.
४ (ना.) वीर्यस्खलन.
५ (व.) वाळलेली मिरची

* गुलाम, बंदी इ॰ स) बंधनांतून मुक्तता यासाठीचा manumission हा जुना इंग्लिश शब्दही मजेदार आहे.

*वीर्यस्खलन हा अर्थ वाचताना प्रथम दचकायला झाले. आता त्याचा आतील अर्थ लक्षात येतोय:

" साठलेल्या गोष्टीची एक प्रकारे झालेली सुटका"

पण चौथ्या व पाचव्या अर्थाच्या आधीच्या कंसातील ( ना, व) अक्षरांचा अर्थ नाही समजला.

एक अपरिचित शब्द : मंदुरुस्त

तंदुरुस्तच्या जोडीने वापरला गेलेला हा शब्द प्रथमच नंदा खरे यांच्या लिखाणात वाचनात आला.
बृहदकोशात तरी हा शब्द मला मिळालेला नाही. इथे: https://www.aksharnama.com/client/article_detail/6194
जो सुबोध जावडेकरांचा खरे यांच्या पुस्तकावर लेख आहे त्यात अशी टिप्पणी केली आहे:

"हीच वृत्ती तंदुरुस्त, मंदुरुस्त आहे (मनदुरुस्त’ या नव्या शब्दाची नोंद घ्यावी) "

स्नेहालय ही वंचित मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. त्यांच्या कारभारात ते 'झोपडपट्टी ' हा शब्द वापरत नाहीत. त्याऐवजी ते सेवावस्ती असे म्हणतात.
शब्द आवडला.

याला Political Correctness (PC) म्हणतात.
Political correctness (PC) refers to language that avoids offending persons although in reality it does not change underlying condition or situation.
म्हणजे एखाद्याला भिकारी म्हणण्याऐवजी "आर्थिकदृष्ट्या उपेक्षित/दुर्बळ" म्हणायचं.

पॅकबंद अन्नपदार्थांमध्ये ती टिकवण्यासाठी जी रसायने घालतात त्यांच्यासाठी परिरक्षक असा शब्द एका मराठी लेखात वाचण्यात आला.
याहून वेगळा शब्द कोणाला सुचतोय का ?

.. म्हणजे एखाद्याला भिकारी म्हणण्याऐवजी "आर्थिकदृष्ट्या उपेक्षित/दुर्बळ" म्हणायचं....

आणि पुरत्या येड्याला 'intellectually challenged ' म्हणावे Happy

अन्नातील काही रसायने स्टॅबिलायझर्स असतात. त्यांना 'स्थिरक'/'स्थैर्यक' इ काही म्हणता येईल.

गोखला
१ कोनाडा. २ गवाक्ष; खिडकी; वातायन; जाळी; झरोका. गोख, गोखडा पहा. [सं. गवाक्ष, गोअक्ष- गोख + ल]
दाते शब्दकोश

गोखले हे आडनाव कसे आले असावे ?

गोखली म्हणजे एका टोकाला आडवी फांदी फुटलेली अथवा बांधलेली काठी. ह्यामुळे. टोकाशी एक कोन तयार होतो आणि त्या कोनामध्ये अडकवून उंचावरील फुले फळे वगैरे तोडता येतात.

गोखले हे आडनाव कसे आले असावे ? <<< गोखलान नामक प्रांत इजिप्त मधे आहे असे पूर्वी वाचनात आले होते. तिथुन हे नाव (आणि लोक) आले असावेत असा तर्क आहे. (कोकणस्थ कुठून आले यावर बरीच रंजक माहिती नेटवर मिळते)...
(जातीवादावर ही पोस्ट नाही, संशोधनाबद्दल बोलतोय मी)...

Pages