भाषा : अपभ्रंश, बदल, मतांतरे इ.

Submitted by कुमार१ on 14 March, 2021 - 10:39

नुकताच मराठी म्हणींच्या धाग्यावर ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला गेला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.

या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :

१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.

म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.

माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.

१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : पूर्ण दारिद्र्य

आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :

अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = १८/ २०
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%...)

ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A...

आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !

२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).

आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :

यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myth...

३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्‍याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8

इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?

४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :

“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95%...)
. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:

तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.

पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.

मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%...

......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोखली म्हणजे एका टोकाला आडवी फांदी फुटलेली अथवा बांधलेली काठी.>>>>

आमच्या गावी याला बोकली/ बोकलाय म्हणतात, अपभ्रंश असावा. अशा बोकल्या घेऊन पावसानंतर जम्गलात जातात आणि पावसाळ्यात तुटलेली व आता सुकलेली मोठी झाडे, फांद्या खेचुन खाली पाडुन सरपण गोळा करतात.

https://youtu.be/RznMpF4UZQs

Happy

सारांश :

गोखला, गोखली गोखलान (>> गोखले) हे स्वतंत्र शब्द आहेत.

गोखला म्हणजे कोनाडा आणि गोखली म्हणजे एका टोकाशी दुसरी लहान काठी जोडून कोन साधलेली एक मोठी काठी. (angular stick?)
किंवा एक लहान आणि दुसरी मोठी अशा काठ्या एकमेकांना साधारण ४५ अंशात जोडून केलेली एक संयुक्त काठी. कोणकाठी

छान तुलना.
............................
कंबर चा उगम फारसी असून मूळ शब्द कमर असा आहे. याच्याशी संबंधित दोन छान शब्द वाचनात आले :

१. कमरकस
= पळसाचा डिंक. हा औषधोपयोगी आहे. बाळंतिणीस देतात, हा शक्तिवर्धक आहे.
(दाते शब्दकोश)

२. कमरकसा
= कंबरेस बांधण्याची पिशवी.
(मोल्सवर्थ शब्दकोश)

हा कमरकस शब्द लोकसत्तेतल्या शब्दकोड्यात वारंवार येत असे.

आज शब्दकोशात आजेगुरू असा एक शब्द दिसला. गुरूचा गुरू.

मराठीत कधी कधी गडबड असते.
तें गूळ तो गूळ
ती लसूण तो लसूण
ते अळू तो अळू
ते कूट तो कूट
ती पितळ तो पितळ ते पितळ

'नोकिया होणे' हा एक आधुनिक वाक्प्रचार रूढ होऊ शकतो .
हे पाहा :
https://www.loksatta.com/explained/what-is-the-future-of-news-channels-t...

माध्यमं कोणतीही असोत, जर तंत्रज्ञानाच्या साथीने त्यांनी बदल स्वीकारले नाहीत तर त्या सगळ्या माध्यमांचा ‘नोकिया’ होईल अशी शक्यता नितीनजी यांनी वर्तवली आहे.

'नोकिया होणे' हा एक आधुनिक वाक्प्रचार रूढ होऊ शकतो >>> आज दुपारी मीही लोकसत्तामधली श्री. नितीन वैद्य ह्यांची मुलाखत(वजा लेख) वाचली. मलाही 'नोकिया होणे' हा वाक्प्रचार एकदम click करून गेला, जाम आवडला. त्यातच तुमचा प्रतिसादही दिसला.

रच्याकने, मना(वर)त click होणे मराठीत समानार्थी शब्द सुचवू शकाल का?

मनात नाही पण कानात घंटा किणकिणली. मनातसुद्धा चालेल म्हणा.
दिल में बजी घंटियां
डोक्यात प्रकाश पडणे, वीज चमकणे वगैरे प्रसंगानुसार.

‘तुळस’ ला समानार्थी बरीच स्त्रीलिंगी विशेषनामे आहेत.
वैजयंती, नंदिनी, वृंदा व वृंदावनी ही परिचित आहेत.

काल शब्दखेळातून ‘सुलभा’ हे देखील एक नाव सापडले. त्याचा संदर्भ मात्र कुठे मिळू शकला नाही

एकाक्षरी शब्द यावरील एक लेख :
https://maharashtratimes.com/editorial/samwad/main-features-of-marathi-i...

त्यातील हे कुतूहलजनक :
"‘किमान शब्दांत कमाल आशय’ पोहोचवण्याचे काम करणारे असे एकाक्षरी शब्द विपुल प्रमाणात असणे, हेही एक प्रकारचे भाषावैभवच. हे वैभव जतन करण्याचे काम केले ते प्रा. भा. म. गोरे यांनी. सन १९९२मध्ये वयाच्या ८३व्या वर्षी ‘मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश’ तयार करून गोरे सरांनी मराठीच्या कोशसंपदेत मोलाची भर टाकली आहे. "

संदर्भ सापडला. Happy

तुलसी सुरसा ग्राम्या सुलभा बहुमंजरी।
अपेतराक्षसी महागौरी शूलघ्‍नी देवदुन्दुभि:

तुलसी कटुका तिक्ता हुध उष्णाहाहपित्तकृत् ।
मरुदनिप्रदो हध तीक्षणाष्ण: पित्तलो लघु:।

(The Bhavprakash nighantu edition of 1998: verse 62-63, page no 509-510)

'सुलभा' चा महाभारतात पण काहीतरी संदर्भ आहे ना? यक्षकथा किंवा युधिष्ठीर कथा सांगतो त्यात कुठेतरी आहे मला वाटतं. ती कुठल्यातरी ऋषींची शिष्या असते.. गोष्ट आठवत नाही. Sad शोधली पाहिजे.

संदर्भ माहीत नाही. रिव्हर्स अभियांत्रिकीने अर्थ लावायचा झाला तर तुळस घरोघरी असल्यामुळे चटकन कुठेही मिळू शकते (सु-लभ). त्यामुळे ते नाव आलं असावं.

अस्मिता, श्लोक छान आहे. तुम्ही दिलेल्या लिंकवर तो श्लोक अनुष्टुप छंदात जास्त बरोबर बसेल असा दिला आहे. त्यात तुळशीला चक्क गावठी (ग्राम्या) म्हटलं आहे हे पाहून गंमत वाटली. Happy

हर्पा, खरंच की... इथे राईट क्लिक/कॉपी करता येत नव्हतं म्हणून मी दुसरीकडे शोधले. पण हे अतीच धार्मिक वाटले म्हणून लिंक ती डकवली. दोन्हीकडे थोडा फरक आहे. तुमचे निरिक्षण आवडले. Happy

गोष्ट आठवत नाही.  शोधली पाहिजे.>>>मला 'सुलभा' शब्दाचा उल्लेखही आठवत नाहीये.
थँक्स कुमारसर.

हे एक जर्नल आर्टिकल सापडलं.
शांती पर्वात युधिष्ठीर शरपंजरीवरील भीष्माला भेटायला गेला असताना त्याला जे प्रश्न विचारतो की राज्य कसे करावे, राज्य करताना ही मुक्ती मिळण्याचा मार्ग काय इ. इ. त्यात ही सुलभा आणि जनक राजाची गोष्ट भीष्म सांगतो.
पुसट आठवत होती पण इथे लेखिकेने गोष्ट आणि तिचे इंटरप्रिटेशन दिलं आहे. चांगलं लिहिलं आहे. वेळ असेल तर जरुर वाचा. सुलभा सिंगल वुमन... कुठल्या ऋषीची पत्नी वगैरे नाही, क्षत्रिय, शिकलेली, स्वत:ची तल्लख बुद्धी असलेली, रुपाने सुंदर असते. ती जनक राजाकडे राज्यकारभार - मुक्ती इ. विषयाचे मंथक करण्यासाठी जाते. जनक (हा सीतेचा जनक नसावा) कितीही भारी आणि सर्वसंगपरित्याग केलेला असला तरी वर्ण/ लिंग श्रेष्ठत्त्वाच्या कल्पनांतच मग्न, मिसॅजनिस्ट असा आहे. अगदी आजच्या काळातल्या फुटपट्टीने मोजलं तरी सुलभा त्याल जी उत्तरं देते ते लेव्हल हेडेड आणि स्त्री मुक्तीचा परिपाठ अशी आहेत. त्या मनूच्या कुप्रसिद्ध वचनाच्या अगदी विपरीत.
Google साईन अप केलं तर आर्टिकल फुकट वाचायला मिळेल.

सुलभा
सुंदर सुलभ चर्चा. सर्वांना धन्यवाद !

‘लट’ चे विभिन्न अर्थ स्तिमित करतात.
१. गुह्येंद्रियावरील केंस
२. साठ कागदांचा संच
३. लाट
४. गुंतागुंत ( केसांची , लोकरीच्या सुतांची , तंतूंची )
(https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B2%E0%A4%9F/word)
….
कागद मोजण्याची दस्ता, रीम आणि quire ही परिमाणे माहिती होती.
लट हे नवे समजले.
दोन लटांची एक जोडी , चार जोड्यांची एक गड्डी होते .

ते 'बत्तीस कळ्यांचा एक लाडू' परिमाण कुठून आलं बघायला पाहिजे (वख्खई वगैरे... पत्ते कुटणार्‍यांना ठाऊक असेल हा प्रकार)

Pages