पछाडलेल्या वास्तूत येणारे अनुभव.

Submitted by अनिळजी on 25 September, 2020 - 12:16

नमस्कार, मी काही दिवसांपूर्वी एक घर घेतलं. साधारण महिना झाला असेल आम्ही म्हणजे मी, पत्नी, आणि दोन वर्षांचा मुलगा या घरात शिफ्ट झालो. जेव्हा पहिल्यांदा हे घर पाहायला आलो तेव्हा मी आणि हिने इथे प्रचंड अस्वस्थता अनुभवली. पण स्वस्त मिळत असल्याने हे घर फायनल केलं. इथे राहायला आल्यापासून आठवड्यात वाईट अनुभव यायला लागले आहेत. आमच्या तिघांशीवाय इतरही कोणीतरी इथे वावरत असल्याचा भास होतो. वारा नसताना दरवाजे जोरात उघडझाप होणे. कोणीतरी हाक मारल्याचा भास होणे, मध्यरात्री भांडी जोरात वाजणे असले प्रकार सर्रास घडत आहेत. पाच दिवसांपूर्वी बाथरूममधला नळ अचानक सुरू झाला होता. मुलाचं वागणही बदलायला लागलंय एकटाच कोणीतरी समोर असल्यासारखा बडबडत असतो. ही या प्रकाराने खूपच घाबरली त्यामुळे सासु सासऱ्यांना काही दिवस बोलावून घेतलं होतं. काही दिवस आधार वाटला पण आता पुन्हा आम्ही एकटे आहोत. सासू सासऱ्यांनाही ईथे विचित्र अनुभव आले. त्यांनी हे घर विकून दुसरं घेण्याचा सल्ला दिलाय. ज्याच्याकडून हे घर घेतलं होतं तो आता हे सगळे आमचे भास आहेत म्हणून हात वर करतोय. सध्यातरी लगेच दुसरीकडे शिफ्ट होणं कठीण वाटतंय.अजून हानी पोहचेल असं तरी काही घडलं नाही. पण सारखे भीतीत वावरत असतो. हा प्रकार कोणी अनुभवला आहे का? आणि अनुभवला असेल तर यातून काय मार्ग काढलात?

Group content visibility: 
Use group defaults

काळा कुत्रा पाळण्यानं बरकत येती म्हणतात.
मांजर आडवी गेलेली असताना मैत्रिणीला केलेला प्रपोज फेल जाऊन होती ती मैत्री तुटल्याचा स्वानुभव आहे. पुढच्यावेळी काळजी घेतली होती. Proud

मांजर आडवी गेलेली असताना>> त्या मांजराला पण किती परिणामांना तोंड द्यावे लागले असेल कुणास ठाऊक Proud

Submitted by हाडळीचा आशिक on 3 October, 2020 - 13:35 >>>>>
हडळीने आधीच तुम्हाला पसंत करून क्लेम लावला असणर ' ह्यो माझाच आशिक ' त्याचे परिणाम सगळे नि मांजर उगीच बदनाम.....

@ अनिळजी ---
१. एखाद्या विश्वास नसणार्‍या व्यक्तीला कसलीही पूर्वकल्पना न देता रात्री रहायला न्या. तो काय अनुभव घेतो पहा.
२. लोकांनी सुचवलेय तसे एकाला दोघे / सोबत असताना शहानिशा करा, कसले आवाज आहेत / कशामुळे हालचाल जाणवते.
३. करोना असला तरी दारात उभे राहून शेजारी / वर-खालच्या घरात चौकशी करता येईल... वॉचमन, मोलकरीण अशा व्यक्ती नक्की बेसिक क्ल्यू देतील. पुढे तुम्ही खात्री करा त्यात तथ्य किती आणि कल्पित किती.
४. जागा विकणे शक्य नसेल तर दिवसा जिथे काम होते आणि रात्री बंद रहाते अशा संस्था / कार्यालय / क्लास / अभ्यासिका यांना भाड्याने देता येईल. तुमचे उत्पन्न चालू राहील आणि त्यांनाही त्रास नाही रात्री वावरत नसल्याने.

@ रुन्मेष - वालचंद साण्गली ला , तो पोरगा रॅगिंग नंतर रेल्वे खाली सुसाइड केला होत ते आठवते आहे का ?
त्याचा हात साप्डला नव्ह्ता ,

नंतर खुप दिवस होस्तेल रिकामे होते

मांजर आडवी गेलेली असताना मैत्रिणीला केलेला प्रपोज फेल जाऊन होती ती मैत्री तुटल्याचा स्वानुभव आहे. पुढच्यावेळी काळजी घेतली होती.

पुढच्या वेळी अजून चांगली हडळ मिळाली ना ?
मांजरामुळे जास्त चांगले झाले

अनिलजी पुढे काय झाले ? तुम्ही घरी परत आलात काय , नवीन काहि अनुभव? सगळे ठीक आहे ना?

परवा सगळे इकडे आलोय. पूजा घालायचा विचार होता परंतु आई बाबांना खूपच त्रास व्हायला लागला. त्यामुळे भावासोबत ते आज घरी निघून गेले. बाबांना सारखं कोणीतरी आजूबाजूला फिरताना जाणवायचं. आईला रात्री कोणीतरी बाई दरवाजात उभी दिसली. आई उठली तशी ती गायब झाली असं आईचं म्हणणं आहे. आता मी ही आणि मुलगा तिघेच इथे आहोत. भीती वाटायला लागले.

तुम्ही इतक्या वेळा घरात ये जा केलीय पण मानसिक तणावाखेरीज इतर कुठलाही त्रास तुम्हाला झाला नाही. जे काही तुम्हाला दिसतेय त्याने तुम्हाला अपाय केला नाही, तुम्हाला जाण्यापासून रोखले नाही किंवा येण्यापासूनही रोखले नाही. तुमच्या मुलालाही म्हटलं तर त्रास नाहीये, नाहीतर घरातून गेल्यावर त्याची काहीतरी प्रतिक्रिया झाली असती.

अशा वेळी शांतपणे दुर्लक्ष करणे जमते का पहा बघून. अर्थात हे बोलणे सोपे आहे पण तुम्ही या घरात राहिला आहात आणि कुठलाही शारीरिक त्रास झालेला नाही हा खूप मोठा आश्वासक भाग आहे असे मला वाटते. जे कोणी आहे त्याचे तुमच्याशी अजिबात वैर नाहीय. त्याची काय इच्छा शिल्लक आहे ज्यामुळे त्याच्या वाट्याला हे टांगते आयुष्य आलेय देव जाणे. ती पुरी होवो व त्याने घर मोकळे करो ह्या शुभेच्छा!!

मनात जे असते ते नजरेला दिसते. तुम्ही रात्री घरात ज्या भागात फिरता, जसे टॉयलेटसाठी वगैरे तिथे छोटा दिवा लावून ठेवा. बेडरूममध्ये झोपत असाल तर आतून कडी लावून झोपा. रात्रीच्या अर्धवट अंधारात आपल्याला खूप काही वेगवेगळे आकार दिसतात, मुद्दाम रोखून पाहिले की गायब होतात. तुम्ही सगळे आधीच घाबरलेले असल्याने तुम्हाला कुठेही काहीही दिसू शकेल.

सध्याच्या तुमच्या परिस्थितीत आपण कोणाचे वाईट केले नाही, आपलयाला कोणी मुद्दाम त्रास देऊ शकणार नाही यावर ठाम विश्वास ठेवून निश्चिन्त राहावे.

तुम्ही या घरात राहिला आहात आणि कुठलाही शारीरिक त्रास झालेला नाही हा खूप मोठा आश्वासक भाग आहे असे मला वाटते. >> साधनाशी सहमत !!
पूजा घालून बघा. फर्क जाणवेल

एक नविन बिझिनेस आयडिया:
कुठल्या घरात कोण रहाते आहे, राहून गेले, त्यातील कुणाचा केव्हा, कसा मृत्यू झाला, त्यांचे क्रियाविधी कसे केले, कुणाचे छोटे मोठे अपघात झाले, कुणाची नोकरी गेली/बिझिनेस मध्ये नुकसान झाले, कुणाला नोकरीत बढती मिळाली/ बिझिनेस मध्ये मोठा फायदा झाला, कुणाला कसले भास व्हायचे/नाही व्हायचे, रात्री घर रिकामे असताना त्यात येणाऱ्या आवाजांंची ऑडीओ फाईल इत्यादि डेटाबेस तयार करायचा.
चांगले मार्केट दिसते आहे अशा डेटाबेसला.

<<<तुम्ही या घरात राहिला आहात आणि कुठलाही शारीरिक त्रास झालेला नाही हा खूप मोठा आश्वासक भाग आहे असे मला वाटते>>> पण कशावरून ते जे काही आहे ते योग्य वेळेची वाट पाहत नसेल, सांभाळून रहा

मुलगा अजूनही एकटा बोलतो का कुणाशी

काल मध्यरात्रीच्या सुमारास हिला किचनमध्ये कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. मला तो आवाज नाही आला. ही एकटीच किचनमध्ये गेल्यावर आवाज यायचा बंद झाला आणि कोणीतरी किचनच्या खिडकीतून हिच्याकडे बघत असल्याचा भास झाला. आज शेवटी न राहवून हिने आजूबाजूला ओळख काढून चौकशी केल्यावर समजले की पूर्वी जे कोणी इथे राहिलेत त्यांनासुद्धा विचित्र अनुभव येत होते म्हणून त्यांनी हा फ्लॅट सोडला. खालच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यानी सांगितले की अमावस्या पौर्णिमेला फ्लॅट बंद असतो तेव्हा कोणीतरी फ्लॅटमध्ये धावण्याचे आवाज येतात.

एक प्रश्नः
अनुभव फक्त रात्रीच येतात की दिवसा पण येतात? फक्त रात्री येत असतील तर ओफिस स्पेस म्हणून भरपूर स्टाफ सहित जागा वापरायला हरकत नाही.
जागा चांगल्या वस्तीत असेल तर थोडे बदल करुन एखाद्या बँक ला भाड्याने देता येईल का?
जागा भाड्याने देऊन स्वतः वेगळ्या जागी रेंट ने राहता येईल, अश्या निगेटिव्ह विचारात आणि टेन्शन मध्ये किती काळ राहणार तिथे?

यातलं काही कळत नाही पण किमान नित्य देवपूजा वेळेवर करा, सायंकाळी न चुकता कापूर , धूप जाळा
त्याने घरात थोडीफार पॉझिटिव्ह एनर्जी येईल, मनःशांती मिळेल

इथे खरंच कोणी नाहीये का ह्यांना मदत करेल असं? कोणाला अशा प्रकारच काही ज्ञान असेल तर त्यांना मदत करा __/\__

अनिळजी, आमच्या ओळखीच्या एका व्यक्तीला मागच्या आठवड्यात असेच अनूभव आले, पण त्यांना कोणीतरी ( त्यांनी नाव नाही सांगीतले पण ते एक धार्मिक व्यक्ती आहेत ) खालील उपाय सांगीतलेत. तुम्ही करुन बघा, खर्चीक नाहीत.

१) एक छोटा किंवा मिडीयम साईजचा कोहळा आणायचा. तो नवीन पांढर्‍या फडक्यात ठेवायचा, त्याच वेळी त्याच्यात अख्खी पिवळी मोहरी थोडी घालायची. आणी तो कोहळा त्या फडक्यात बांधुन घराच्या मुख्य दाराच्या आतील बाजूच्या वरच्या भिंतीवर खुंटी किंवा खिळा ठोकुन त्यावर टांगायचा. त्या आधी तो कोहळा व एक नारळ जवळच्या शिव मंदिरात ठेवावा व घरातले अरिष्ट टळावे म्हणून प्रार्थना करावी. नारळ तिथेच ठेवावा व कोहळा मात्र घरी आणावा. मंदिर सध्या बंद असल्याने गाभार्‍या बाहेर ठेवला तरी चालेल. हा श्रद्धेचा भाग आहे, उपाय करणे ना करणे तुमच्या हातात आहे.

२) संध्याकाळी दिवा उदबत्ती लावुन श्री दुर्गा स्तुती वा कवच वाचावे. गाणगापूर किंवा पंढरपूर अशा ठिकाणी असलेले भस्म घरात फुंकावे. आता नवरात्र जवळ आहे. जेव्हा नवमीचा होम होईल तेव्हा तेथील अंगारा ( होमातील रक्षा ) घरी आणावा. तो सर्वांनी लावावा.

वरील उपाय हे धार्मिक श्रद्धेचे आहेत. विश्वास नसेल तर कृपया टर ऊडवु नका.

कधीही, कोणत्याही क्षणी #भिती किंवा तीव्र #भयाची (#Fear) भावना मनात आली (अशुभ शक्ती, एकांतवास, काळोख किंवा कोणताही फोबिया) की लगेच काळवेळ मुहूर्त न बघता Immediately मारुती स्तोत्र (समर्थ रामदास स्वामीविरचित #भीमरुपी_महारुद्रा हे १५+२=१७ ऋचांचे स्तोत्र) म्हणायला सुरुवात करावी. सोयरसुतक आहे किंवा मांसाहार केलाय कसं म्हणायचं? वगैरे भंकस गोष्टी त्याक्षणी डोक्यातून काढून टाका. याक्षणी भिती कमी होणं महत्त्वाचं आहे. छातीची धडधड, Palpitation वाढणे, तणाव, अशक्तपणा, भूक न लागणे, अपचन अशा मनोशारिरीक त्रासांवरही हे स्तोत्र रामबाण इलाज आहे....

किती वेळा बोलू? कुठल्या दिशेला तोंड करुन म्हणू? मनातल्या मनात म्हणू का मोठ्याने? हे सगळे प्रश्न immaterial आहेत. फक्त बरं वाटेपर्यंत नॉनस्टॉप सुरु ठेवायचं. अनेक ठिकाणी गुढ आणि भयप्रद वास्तुव्हिजीटमधे माझं रक्षण मारुती स्तोत्रानेच केले आहे हे सत्य सांगतो... आत्ताही याक्षणी कोणीतरी प्रचंड भयग्रस्त आहे.... तुझ्यासाठीच ही पोस्ट मला झोपेतून जागं करुन मारुतीरायाने लिहायला लावली आहे असं समज.... सुरु करा...

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

#भीमरुपी_स्तोत्र

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारि अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १॥

महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २॥

दीनानाथा हरीरूपा सुंदरा जगदांतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥ ३॥

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४॥

ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥ ५॥

ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवळे दंतपंगती ।
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा भ्रकुटी तठिल्या बळें ॥ ६॥

पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥ ७॥

ठकारे पर्वताइसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८॥

कोटिच्या कोटि उड्डणें झेपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९॥

आणिला मागुती नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥ १०॥

अणूपासोनि ब्रह्मांडायेवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरुमांदार धाकुटें
॥ ११॥

ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥ १२॥

आरक्त देखिलें डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३॥

धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४॥

भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥ १५॥

हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली भली ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकलागुणें ॥ १६॥

रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७॥

॥ इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम
श्री मारुतिस्तोत्रम् सम्पूर्णम् ॥

वरील स्तोत्र आणि रामरक्षा ह्या गोष्टींचा फायदा होईल.
तसेच
घरात गजानन विजय पोथी आणून ठेवा. ग्रंथाची रोज पूजा करा, शक्य असेल तर पारायण करा.
त्यात लिहिले आहे,
जेथे असेल हा ग्रंथ तेथे कदा न येईल भूत

Pages