‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !

Submitted by कुमार१ on 13 January, 2019 - 22:14

जीवनसत्वे लेखमाला : भाग ४
( भाग ३ : https://www.maayboli.com/node/68623)
*******************************
सामान्यजनांना ‘क’(C) या एकाक्षरी नावाने परिचित असलेल्या या जीवनसत्वाचे अधिकृत नाव Ascorbic acid असे आहे. त्याच्या नावाप्रमाणे ते आम्लधर्मीय असून ते आंबट फळांमध्ये विपुल प्रमाणात असते. आवळा, लिंबू व संत्रे हे त्याचे सहज उपलब्ध असणारे स्त्रोत. त्यातून लिंबू हे बारमाही फळ असल्याने आपण त्याचा रोजच्या आहारात समावेश करतो. शरीराच्या बळकटीसाठी आवश्यक असणाऱ्या ‘क’चा शोध १९३०मध्ये लागला. तो आधुनिक वैद्यकातील एक मूलभूत आणि महत्वाचा शोध असल्याने त्याच्या संशोधकाला त्याबद्दल नोबेल परितोषिक बहाल केले गेले.
या लेखात आपण ‘क’ चा शोध, त्याचे आहारातील स्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाचे परिणाम यांची माहिती घेऊ. शेवटी नवीन संशोधन, समज-गैरसमज आणि काही वादग्रस्त मुद्द्यांचा आढावा घेईन.

आहारातील स्त्रोत:

vitc foods.jpg

Citrus गटातील फळे म्हणजेच आवळा, लिंबू, संत्रे इ. याचे मुख्य स्त्रोत. त्यापैकी आवळा हा सर्वोत्तम म्हणता येईल. पण लिंबू हे स्वस्त आणि नेहमी उपलब्ध असल्याने ते सहज आणि सर्वांना मिळू शकते. पेरू हे सुद्धा ‘क’ ने समृद्ध आणि बहुतेकांचे आवडते फळ. या फळांतून ‘क’ व्यवस्थित मिळण्यासाठी ती ताज्या व कच्च्या स्वरूपात खाल्ली पाहिजेत. 'क' हे उष्णतेने लगेच नाश पावते. म्हणून शिजवलेल्या अन्नातून ते मिळणार नाही. आपला भात,वरण, तूप, मीठ व लिंबू हा पारंपरिक आहार परिपूर्ण आहे. फक्त त्यात लिंबू पिळताना पानातील भात व वरण हे कोमट झालेले असावेत. लिंबाचे लोणचे हा प्रकार त्यातील ‘क’ छान टिकवून ठेवतो.

‘क’ च्या शोधाचा इतिहास:
आपल्याला ‘क’ मिळण्यासाठी ताज्या फळांचे सेवन किती महत्वाचे आहे हे आपण जाणतो. १-२ शतकांपूर्वी सैनिकांना जहाजातून दीर्घ युद्धमोहिमांवर पाठवले जाई. तेव्हा आहारातील फळांच्या अभावाने ते सर्व खूप आजारी पडत. तेव्हा या समूह-आजाराला “Sailor’s scurvy” असे म्हटले गेले. पुढे संशोधनातून ‘क’च्या गोळ्या तयार झाल्या आणि त्या नौसैनिकांना मोहीमेवर नियमित द्याव्यात असा विचार पुढे आला. नेपोलियन व नेल्सनचे प्रसिद्ध युद्ध झाले त्यात नेल्सनच्या सैनिकांना ‘क’ नियमित दिलेले होते तर नेपोलियनच्या नाही. त्यामुळे नेल्सनने जो ऐतिहासिक विजय मिळवला त्यात त्याच्या डावपेचांच्या बरोबरीने ‘क’ चा वाटाही महत्वाचा होता !
त्यानंतर ‘क’ च्या गोळ्या अशा मोहिमांवरील सैनिकांना नियमित दिल्या जाण्याची पद्धत पडली.

शरीरातील कार्य:

१. ‘क’ चे सर्वात महत्वाचे कार्य हे शरीर-सांगाड्याच्या बळकटी संबंधी आहे. ही बळकटी Collagen या प्रथिनामुळे येते. हे प्रथिन शरीरात सर्वत्र आहे पण मुख्यतः ते हाडे व रक्तवाहिन्यांमध्ये असते. ‘क’ त्याला बळकट करते.
२. आहारातील लोहाचे व्यवस्थित शोषण होण्यातही ‘क’ची भूमिका महत्वाची आहे. विशेषतः शाकाहारातील लोहाच्या शोषणात ती अधिक महत्वाची आहे.

३. त्याचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे ते antioxidant आहे. पेशींमधील रासायनिक क्रियांतून free radicals प्रकारची अस्थिर रसायने तयार होतात. ती जर जास्त प्रमाणात साठू लागली तर त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. त्यातून कर्करोगादिंचा धोका संभवतो. पेशीतले antioxidant पदार्थ या घातक अस्थिर रसायनांचा नायनाट करतात. या कामी ‘क’ आणि त्याच्या जोडीने ‘इ’ व ’अ’ या जीवनसत्वांचे योगदान मोलाचे आहे.

४. आपली सर्वसाधारण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यातही त्याचा मोठा वाटा आहे.

अभावाने होणारा आजार(Scurvy) :

आहारात ताजी फळे व भाज्यांचे सेवन नियमित असल्यास सहसा ‘क’ चा अभाव होत नाही. हा भाग एकट्या रहाणाऱ्या व्यक्ती, वसतीगृहातील मुले इ. च्या बाबतीत दुर्लक्षिला जातो. अशा कमतरतेतून होणाऱ्या अभावाला ‘bachelor’s scurvy’ असे म्हणतात.
या व्यतिरिक्त कुपोषण वा आतड्यांचा दीर्घकालीन आजार असणाऱ्या व्यक्ती ,गरोदर स्त्रिया आणि फक्त गाईच्या दुधावर पोसलेली तान्ही बालके यांत हा अभाव होण्याची शक्यता जास्त असते.
अभावाचे परिणाम असे असतात:

gums_in_scurvy.jpg

१. हिरड्यांचा दाह होणे, सुजणे वा त्यातून रक्तस्त्राव होणे
२. त्वचेखाली व अन्यत्रही रक्तस्त्राव होणे
३. जखमा लवकर न भरणे
४. सांधेदुखी
५. अशक्तपणा व थकवा.

औषधरूपातील ‘क’ आणि आजार प्रतिबंध :
‘क’ हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते औषधरुपात जरी गरजेपेक्षा जास्त घेतले तरी बिघडत नाही. शरीराला गरज नसलेला जास्तीचा भाग लघवीतून बाहेर पडतो. त्याच्या या गुणधर्माचा गैरफायदा वैद्यकात बऱ्याचदा घेतला गेला आहे. आयुष्यात अनेक दीर्घकालीन कटकटीचे आजार आपल्याला सतावतात. त्यांच्यावर उपचार म्हणून विविध उपचारपद्धतींची औषधे आपण घेतो. तरीसुद्धा बऱ्याचदा रुग्णाचे पुरेसे समाधान होत नाही. तो कमीअधिक प्रमाणात पिडलेलाच असतो. मग अशा आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून ‘क’ चा वापर केला जातो. त्याला फारसा शास्रीय पाया नसतो. पण, ‘क’चा एखादा गुणधर्म त्या आजारात “उपयोगी पडू शकेल” अशा आशेने ते मोठ्या डोसमध्ये दिले जाते. कधी आजार-प्रतिबंध म्हणून तर कधी ‘रामभरोसे’ उपचार म्हणून. त्यातूनच पुढे समाजात त्याबद्दलचे गैरसमज पसरतात. मग त्याचा उठसूठ गैरवापर होऊ लागतो.

आता अशा आजारांची यादी बघूया:
१. सर्दी-पडसे
२. कर्करोग
३. हृदयविकार
४. मोतीबिंदू व दृष्टीपटलाचे काही आजार
५. उच्च रक्तदाब .
यातील सर्दी वगळता बाकीच्या यादीकडे पाहिल्यास वाचकांच्या भुवया लगेचच उंचावतील ! तेव्हा त्यातील दोन आजारांचे वास्तव समजून घेऊ.

१. सर्दी : वरवर ‘साधा’ दिसणारा पण रुग्णास अगदी सतावणारा हा आजार. ऋतुबदलातील सर्दी तर बहुतेक सर्वांना होणारी. त्यावर नक्की उपाय काय हा अगदी पेचात टाकणारा प्रश्न. ‘क’ आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो.

. कर्करोग : हा तर गंभीर आजार. त्याचे विविध उपचारही अंगावर काटा आणणारे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर संशोधनाचे लक्ष्य केंद्रित होणे स्वाभाविक आहे. गेल्या शतकापासून अनेकांनी त्यासाठी ‘क’ चा वापर करून पाहिला आहे. अलीकडे या रोगाच्या केमोथेरपी बरोबर ‘क’ चे पूरक उपचार करण्याचेही प्रयोग झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष अद्याप तरी दखलपात्र नाहीत.

वरच्या यादीतील अन्य आजारांबाबतही यासंदर्भात कोणतेही ठाम विधान करता येत नाही. अनेक उलटसुलट दावे आणि अपुरे संशोधन यामुळे ‘क’ आणि गंभीर आजारांचा प्रतिबंध हा विषय सध्या वादग्रस्त आहे.
......
तर असे हे Ascorbic acid उर्फ ‘क’. स्वतः ‘तब्बेतीने’ नाजूक आहे खरे, पण आपल्याला कसे बळकट करून जाते !
*********************************************
चित्रे जालावरुन साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.
अस्थिभंगामधेही क जीवनसत्वाच्या गोळ्या का देतात हे आता कळले.

सर्व नवीन प्रतीसादकांचे आभार.
@ डूडायडू,
मी आतापर्यंत इथे काही लेखमाला लिहिल्या आहेत पण निवडक १० अशी नोंद कधीच केलेली नाही. ती आपली आपणच करायची असते का?

तुमची ही सर्व मालिका मी निवडक १० मध्ये घेतलीय कायम संग्रही रहावी म्हणून तसे इतर जणही करत असतील किंवा करावे म्हणून ते लिहिले तसेच इतर वाचकांनी हां मायबोलीने पुरवलेल्या सुविधेचा पर्याय आवर्जून वापरावा अस वाटले म्हणून सांगितले.

आपलेच लेख आपल्या निवडक १० मध्ये ठेवणे सर्वस्वी लेखकाचा निर्णय असेल. सॉर्ट ऑफ़ बुकमार्क सारखे लगेच कोणालाही लिंक पाठवायला सोप्पे म्हणून !

वाचतोय.

व्हिटॅमिन सी कॉम्प्लेक्सचे बरेच फॅड दिसतेय. वेगवेगळ्या कंपनीच्या गोळ्या, पावडर यांचे मार्केटिंग सुरू असते ऑनलाईन.

सर्दीच्या वेळी सेलिनच्या / लाईमसीच्या गोळ्या घेऊन बघितल्या होत्या मागे, जरा लवकर बरी झाली असे वाटले(उगाचही असेल.). पण जास्त प्रमाणात ascorbic acid च्या गोळ्या घेतल्यास धमन्यांची ताठरता वाढते असे कुठेतरी वाचनात आले आणि तो उपद्व्याप बंद केला.

मानव, धन्यवाद.
‘क’च्या गोळ्या अति प्रमाणात खाल्ल्यास शरीरात Oxalate चे उत्पादन वाढते. ज्यांना मूत्रपिंड विकार आहे अशांसाठी ते अनिष्ट आहे.
तसेही कुठल्याच जीवनसत्व-गोळ्या ‘उगाचच’ घेत राहू नयेत.

नेहमीप्रमाणेच उत्तम लेख. मालिका छान चालू आहे. लहानपणी आवळ्याच्या हंगामात घरी मस्तपैकी रोज एक चमचा मोरावळा मिळायचा, त्याची आठवण झाली.
एक शंका.
इडली डोश्यासारख्या आंबवलेल्या पदार्थांतून क मिळते का?

इडली डोश्यासारख्या आंबवलेल्या पदार्थांतून क मिळते का?
Submitted by साद on 14 January, 2019 - 18:11

कदाचित आंबवलेल्या पिठात तयार होत असेल, परंतु डॉ. कुमार यांनी म्हटल्याप्रमाणे 'क जीवनसत्व उष्णतेने नाश पावत असल्याने' इडली वाफवताना किंवा डोसा तयार करताना ते उष्णतेने नाश पावत असेल.

आंबट फळ = नैसर्गिक = क जीवनसत्व
आंबट / आंबवलेले पदार्थ (इडली डोसा वगैरे) = मानव निर्मित = किण्वन प्रक्रिया ( गुड़ बॅक्टेरिया)

@ साद,
नैसर्गिकरीत्या पदार्थ आम्बवल्यावर त्यात विविध ‘ब’ आणि ‘K’ जीवनसत्वे तयार होतात. डू डाय डू यांने म्हटल्याप्रमाणे जे जिवाणू त्यात होतात ते ही जीवनसत्वे तयार करतात.

क हे मात्र ताज्या फळांतून आणि काही भाज्यांतूनच मिळते.
वरील सर्वांचे चर्चेत सहभागासाठी धन्यवाद.

चांगला लेख. माहितीपुर्ण.
पपई अगदी सगळ्या जीवनसत्वांच्या तक्त्यात असतो.
मी सध्या रोज एक पेरु खातेय. मला पेरु खुपच आवडतो आणि आता बाजारात खुप पेरु आलेत.

माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

>> निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही.

हे जरी असले तरी रोज लिंबूपाणी/आवळा प्राशन केल्याने सर्दीचा त्रास पूर्वीपेक्षा खूप म्हणजे खूपच कमी आला आहे हा स्वानुभव. तसेच सर्दी झाल्यानंतर कोमट पाण्यातून लिंबू+मध हा उपाय सुद्धा खूप प्रभावी. अर्थात हे सर्वाना लागू पडेलच असे नाही म्हणून संशोधनाचे निष्कर्ष उलटसुलट आले असावेत.

>> आपलेच लेख आपल्या निवडक १० मध्ये ठेवणे सर्वस्वी लेखकाचा निर्णय असेल

तशी गरज नसते कारण आपले लिहिलेले लेख "लेखन" ह्या टॅब मध्ये दिसतातच. निवडक १० हा इतरांचे लेख पट्कन सापडण्यासाठी आहे.

क हे मात्र ताज्या फळांतून आणि काही भाज्यांतूनच मिळते.>> तसेच उष्णतेने ते नाश पावत असेल तर आवळा सुपारी, आवळा पावडर मधून नाही मिळणार का?

Pages