अमानवीय...? - ३

Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44
halloween bates hotel

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.

या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.

अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295

अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229

अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एका गावात एक जुना वाडा होता. लोक म्हणायचे की तिथे भूत आहे, म्हणून कोणीही रात्री तिकडे जात नसे.

एकदा गावातला एक माणूस धाडस करून रात्री त्या वाड्यात गेला. आत पूर्ण अंधार होता. अचानक त्याला वरच्या मजल्यावर पावलांचा आवाज ऐकू आला… टक… टक… टक…

तो घाबरत घाबरत वर गेला. आवाज जिथून येत होता तिथे पोहोचला… पण तिथे कोणीच नव्हतं.

तो परत खाली आला, तेवढ्यात मागून पुन्हा आवाज आला.
तो वळून पाहतो तर… खिडकी हलत होती.

सकाळी कळलं —
रात्री जोराचा वारा होता, त्यामुळे खिडकी आपटत होती.

तेव्हापासून गावात एकच म्हण झाली —
“कधी कधी भूत नसतं… भीतीच भूत बनते.”

चपखल हो लेखकजी Happy
आता जर का अनामिका हा आयडी परत येऊन ईथे त्याच्या स्टोऱ्या सांगायला लागला तर मी इकडे लिहायचा बंद होईन. ते शक्य नसेल तर ज्यांनी त्या आयडीची त्यावेळी चेष्टा उडवली होती त्यांनी माफी मागावी.

तर मी आज तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे. ही घटना माझ्या मित्रासोबत घडली. तर माझा मित्र एका शहरात जॉबसाठी गेला. तो जिथे राहायचा ती सात मजली बिल्डिंग होती. त्याचा शेजारी एक हॉटेल मालक होता. हॉटेलवाला आणि त्याची चांगली मैत्री जमली. हॉटेलवाला त्याला रोज काही ना काही घेऊन यायचा. पुलाव, बिर्याणी, रोटी भाजी असे पदार्थ आणायचा. मित्र खुश होता. एकदा मला भेटला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा खूपच अशक्त झाला आहे. मी विचारलं काय रे जेवण वैगरे मिळत नाही का? तर त्याने मला हॉटेलवाल्याची गोष्ट सांगितली. मला संशय आला बोललो हॉटेलचं खाऊन हा एव्हडा बारीक कसा झाला. सहज कुतूहल म्हणून मी त्याच्या रूमवर गेलो. रात्र झाली होती आणि हॉटेलवाला अजून आला नव्हता. थोड्या वेळाने दारावर थाप पडली. दरवाजा उघडला तर बाहेर हॉटेलवाला. त्याने मला रूमवर येताना पाहिलं आणि त्या हुशार मालकाने मस्त फिश फ्राय आणि मटनाचा बेत आखला होता. सगळ्या गोष्टी येताना घेऊन आला होता. त्या जेवणाची चव खूपच अप्रतिम होती. मालकाचं कौतुक करत विषय काढला की हे असं भारी जेवण जेऊन माझा मित्र बारीक कसा झाला तर तो बोलला की अरे हा इथे जेवतो पण दिवसभर कंपनीत बॉसला घाबरून राहतो त्यामुळे खातो ते अंगाला लागत नाही. तेव्हा कुठे खरी गोष्ट समजली. मी बोललो असं आहे होय मला वाटलं तुम्ही भूत बित आहात आणि याला राख नाहीतर माती खायला देताय म्हणून हा बारीक झाला. तर अचानक तो सीरियस झाला लाईट गेली जोरजोरात हसायला लागला आणि भेसूर आवाजात बोलला पाय बघ माझे. आम्ही दोघे घाबरलो ईतक्यात लाईट आली बघतोय तर पाय सरळच होते. तो म्हणाला चेष्टा केली रे. मग काय एकच हाशा पिकला आणि परत एकमेकांना टाळ्या देत पार्टी सुरू झाली.

आमच्या शेजारी एका प्रसिद्ध ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करणारे एक डॉक्टर रहायचे. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एक दुसऱ्या शहरातला माणुस आला. त्याने सांगितले की लहानपणी एका अपघातात त्याचे पाय उलट झाले पण गरिबीमुळे तेव्हा ऑपरेशन करता आले नाही. आता शहरात त्याचे स्वतःचे हॉटेल आहे आणि पैसा भरपूर आहे पाय सरळ करायचे आहेत.
त्याने कॅश भरली आणि त्याचे ऑपरेशन करण्यात आले.
जसे ऑपरेशन संपले, तसे तो जोरजोरात विचित्र हसायला लागला आणि अदृश्यच झाला. डॉक्टर बेशुद्धच पडले. शुद्धीवर आल्यावर त्यांना कळले की त्या माणसाने कॅश भरली होती तिच्या मधमाशा झाल्या आणि सगळ्यांना चावत उडुन गेल्या.
तेव्हा सावध रहा बोकलत कदाचित ते हेच भूत असेल ते.

😑

मानवमामा हो असू शकतं कारण त्या मित्राच्या घरी cctv कॅमेरा होता. दुसऱ्या दिवशी सहज रेकॉर्डिंग बघायला घेतली तर आम्ही दोघेच होतो हॉटेल मालक दिसतच नव्हता. त्यातला एक प्रसंग तर खूपच भयानक होता, आम्हाला तो मालक कालथा घेऊन बिर्याणी वाढत होता तर त्या व्हिडिओत फक्त कालथाच दिसत होता तो माणूस दिसतच नव्हता आणि बिर्याणीच्या जागी दगड गोटे. तो व्हिडिओ बघून मित्राला घाम फुटला. सगळं सामान तिथेच टाकून तो पळत सुटला. खाली येऊन मागे बघतो तर मालक बाथरूमच्या पायपावरून उलटा उतरत त्याच्याच दिशेने येत होता. तो प्रसंग बघून त्याची बोबडीच वळली. त्या अवस्थेत पण तो पळत सुटला मागे मालक ‘अरे जाऊ नको रे मला तुझा लळा लागलाय’ असं ओरडत पाठलाग करत होता. मित्र अजून त्या धक्क्यातून सावरला नाही.

अरे अरे अरे !
आतापर्यंत मला बोकलतचा ड्युआय समजत होते तेव्हां जनरल बोकलतचा लेफ्टनंट जनरल असं स्टेटस होतं. आता बोकलतच ड्युआयडी झाले तर त्यांचं डिमोशन झाल्याने माझंही मेजर जनरल म्हणून डिमोशन होणार. उद्या म्हणाल ऋन्मेषजीच कुणाचे तरी ड्युआयडी आहेत. मग ब्रिगेडिअर !

असं करता करता सोजीर नका बनवू ओ.

सध्या मी astrophotography शिकायला भुजमध्ये आलोय त्यामुळे पाच सहा दिवस टाईम मिळाला मिळाला नाही. रात्री जंगलात जाऊन जागतोय आणि दिवसा झोपतोय त्यामुळे मीच स्वतः एक भूताची लाईफ जगतोय. जरा थोडे दिवस जातील नार्मल व्हायला. उद्या शेवटचा दिवस आहे.

स्टीफन किंग हा माझा आवडता लेखक आहे. काल रात्री जागून त्याची "1408" दीर्घकथा वाचून संपवली.
"1408" हा डॉल्फिन हॉटेल मधल्या १४व्या मजल्यावरील खोलीचा क्रमाक आहे. ह्या हॉटेलला १३वा मजला नाही. तसेच 1408 आकड्यांची बेरिज १३ येते. हे लेखक जेव्हा सांगतो तेव्हाच डोक्यात शिरते.
माईक एन्स्लीन हा कथेचा नायक व्यवसायाने लेखक आहे. त्याचे वैशिष्ट्य हे कि तो पछादलेल्या जागी एक रात्र काढायची आणि आलेल्या अनुभवांची नोंद करून मग पुस्तकरूपाने प्रकाशित करायचे. रूम "1408" ही भुताळी रूम आहे, त्या रूम मध्ये एक रात्र त्याला काढायची आहे.
पण हॉटेलचा मॅनेजर त्याला परावृत्त करायचा आटोकाट प्रयत्न करतो. त्य खोलीत गेस्टना आलेले अनुभव त्याला सांगतो, पण नायकही आता हट्टाला पेटलेला असतो. शेवटी हॉटेलच्या मॅनेजरला त्या खोलीची किल्ली त्याच्या हवाली करावी लागते.
पुढे काय होते? मूळातूनच वाचावे.

ह्याच नावाचा कथेवर आधारित सिनेमाही तुम्ही बघू शकता. नेटफ्लिक्स वर आहे.

माझा एक मित्र पडक्या पछाडलेल्या घरी गेला होता. तिथे त्याला अमानवीय अनुभव आले. कोणाच्या तरी असण्याचा भास होत होता. तो घाबरून घरी आला पण चुकून मोबाईल तिथेच विसरला. रात्री त्याची जायची हिम्मत झाली नाही. सकाळी उठून त्याने तो मोबाईल आणला तर त्याला त्यात गाणं रेकॉर्ड केलेलं मिळालं. ते तिथल्या चेटकिणीने गायलं होतं. सुरवातीला ती चांगल्या सुरेल आवाजात गाते पण नंतर ती तिच्या ओरिजिनल आवाजात गाते. तुम्ही पण ती रेकॉर्डिंग ऐका.
https://voca.ro/172gt283IbUP

माझ्या मित्राची गोष्ट आहे.
तो त्याच्या गावी घर बांधायला गेला होता. ती जागा पछाडलेली होती. गावकरी त्याला म्हणाले, “घर बांधू नको. ही जागा बरोबर नाही. तुला त्रास होईल,” वगैरे वगैरे. त्याला वाटलं, या गावकऱ्यांचा या जागेवर डोळा आहे. त्याने त्यांना न जुमानता घर बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याने एका भटजीला बोलावलं. भटजीने पूजा सुरू केली. काही वेळ सगळं सुरळीत सुरू होतं, पण नंतर भटजीला काहीतरी जळल्याचा वास आला. भटजीने तिथले दोन-चार नारळ फोडले, तर ते आतून जळलेले होते. भटजी म्हणाले, “हा अपशकून आहे. ही जागा काही बरोबर नाही. इथे घर बांधू नका.” पण मित्र काही ऐकला नाही. हट्टाने त्याने भटजीला पूजा पूर्ण करायला सांगितली आणि दोन-चार दिवसांत बाहेरचे कामगार बोलवून घर बांधणी सुरू केली. घर बांधणी सुरू असताना अनेक अडथळे यायला लागले. कधी JCB बंद पडायचा, तर कधी सामान हरवायचं, तर कधी कामगारच आजारी पडायचे. मित्राला वाटलं, हा एक योगायोग असेल आणि त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. शेवटी काही महिन्यांत ते घर पूर्ण झालं. वास्तुशांती करायला त्याने दुसरा एक भटजी बोलावला. तो भटजी जरा चांगला होता. त्याने आल्याआल्या लगेच ओळखलं की या जागेत काहीतरी गडबड आहे. तो एका जागी ध्यान लावून बसला. थोड्या वेळाने तो उठला आणि मित्राला म्हणाला, “नैऋत्य दिशेला पाच-दहा फूट खोल खण. तिथे तुला एक कलश दिसेल. त्यावर एक मानवी कवटी आणि धोतर गुंडाळलेलं आहे. ते तू काढ आणि जाळून नष्ट कर.” मित्राला ही गोष्ट जरा पटली. त्याने नैऋत्य दिशेला खणायला सुरुवात केली. थोडं खणल्यावर त्याला खरंच तो कलश आणि कवटी मिळाली. आता त्याने एक चूक अशी केली की ते न जाळता सुमारे २०० मीटर अंतरावर झुडपात फेकून आला. थोडे दिवस बरे गेले. काही दिवसांनी रात्री दीडच्या आसपास त्याला जाग आली. त्याच्या तोंडावर एक फडकं पडलं होतं. अचानक काय पडलं म्हणून त्याने मोबाईलच्या टॉर्चमध्ये पाहिलं, तर ते जमीन खणल्यावर मिळालेलं तेच धोतर होतं आणि वरती माळ्यावरून एक म्हातारा टक लावून त्याच्याकडे पाहत होता. ते सगळं पाहून त्याने जोरात ओरडायला सुरुवात केली. सगळे जागे झाले. घडलेला प्रसंग त्याने सगळ्यांना सांगितला. त्याने ती रात्र कशीतरी काढली. दुसऱ्या दिवशी परत त्याने त्या भटजीला बोलावलं. भटजी देवघरात गेले, तर तिथे तो कलश, धोतर आणि कवटी होती. ते पाहून सगळेच हादरले. ते तिथे कसं आलं, याचं कोणाकडेही उत्तर नव्हतं. भटजी म्हणाले, “ही वास्तू आताच्या आत्ता सोडा.” शेवटी त्यांनी ते घर सोडलं. आता ते घर पडीक आहे. आजूबाजूला झाडं-झुडपं उगवली आहेत.

ही गोष्ट जुनी आहे. ३०-४० वर्षांपूर्वीची. आमच्यासमोर काका राहतात. त्यांची ही गोष्ट आहे. ते आता म्हातारे झालेत. त्यांच्या तरुणपणी ते एक बंगला विकत घ्यायचा विचार करत होते. त्यांनी एक एजंट गाठला आणि बंगले बघायला सुरुवात केली. त्यांच्या घरी ते, त्यांची बायको आणि ५ वर्षांची लहान मुलगी होती. सगळे बंगले बघितले, पण त्यांना काहीच पसंत पडले नाही. एकतर बजेट जास्त होतं किंवा ते मोक्याच्या ठिकाणी नव्हते. शेवटी तो एजंट म्हणाला, “एक बंगला आहे. तो कमी बजेटमध्ये आहे आणि मोक्याच्या ठिकाणीही आहे.” ते सगळे तो बंगला बघायला गेले. तो ग्राउंड आणि वर एक मजला असा दुमजली बंगला होता. वरती ओपन टेरेस होतं. एकंदरीत मस्त बंगला होता. काका-काकूंना तो बंगला आवडला. काकी जेव्हा टेरेस पाहायला गेल्या, तेव्हा तो एजंट त्यांना जास्त वेळ टेरेसवर राहू देत नव्हता. घाई करत होता आणि त्यांना खाली आणायला बघत होता. काकूंना ती गोष्ट जरा खटकली. निघता-निघता काकूंचं लक्ष टेरेसच्या कडीकडे गेलं. ती कडी एकदम चेचलेली होती. काकू म्हणाल्या, “ही कडी अशी का आहे?” एजंटने वेळ मारून नेण्यासाठी थातूरमातूर उत्तरं दिली आणि म्हणाला, “तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी करून देतो व्यवस्थित.” सगळे बाहेर आले आणि पुढच्या आठवड्यात सगळा व्यवहार पूर्ण झाला. ते तिघे तिथे राहायला गेले. चार-पाच दिवस व्यवस्थित गेले. एका रात्री साधारण दोन-तीनच्या दरम्यान त्यांना टेरेसचं दार जोरात ठोठावण्याचा आवाज आला. ते दोघे जागे झाले. मुलगी गाढ झोपेत होती. काका म्हणाले, “मी जरा वर जाऊन येतो.” काकूंनी त्यांना अडवलं. त्या म्हणाल्या, “कोणीतरी चोर असू शकतो. नका जाऊ.” पण काका धाडस करून वर गेले, तर वर कोणीही नव्हतं. टेरेसच्या दाराजवळ गेले, तर दार बंद होतं, पण ती कडी बेंड झाली होती. काकांना वाटलं, कोणीतरी चोर आत घुसण्याचा प्रयत्न करत असेल. त्यांची चाहूल लागली म्हणून पळाला असेल. खाली येऊन ते परत झोपी गेले. त्यानंतर दोन-चार दिवस व्यवस्थित गेले. नंतर परत सेम तसाच प्रकार घडला. दरवाजा जोरजोरात वाजायचा आणि वर जाऊन बघतात, तर कडी बेंड झालेली असायची. दोन-तीन वेळा हा प्रकार घडला. अजूनही त्यांच्या डोक्यात हे भुताचं प्रकरण वगैरे असेल असं काही आलं नव्हतं. त्यांच्या मते हा कोणीतरी चोरच आहे, असंच त्यांना वाटत होतं. ते आता वरच्या टेरेसच्या कडीला लॉक लावायला लागले. एक दिवस काय झालं, त्यांची छोटी मुलगी घरात कुठेच दिसत नव्हती. म्हणून काकू तिला शोधायला लागल्या. खाली कुठे मिळत नव्हती म्हणून त्या टेरेसवर गेल्या. बघतात, तर टेरेसच्या कडीचा लॉक उघडला होता आणि त्यांची मुलगी त्या उंबरठ्यावर अर्धी टेरेसवर आणि अर्धी आत झोपली होती. त्या एकदम काळजीपोटी तिला उचलायला गेल्या. जसं त्यांनी तिला उचललं, तसं पलीकडच्या बाजूनेही कोणीतरी त्या मुलीला खेचलं. हा प्रकार काकूंसाठी शॉकिंग होता. त्यांनी मुलीला लगेच जवळ खेचलं आणि खाली घेऊन आल्या. सगळा प्रकार त्यांनी काकांना सांगितला. मुलीला विचारलं, तर मुलगी म्हणाली तिला माहीत नाही ती वर कशी गेली. लॉक कसा उघडला, कोणी उघडला, काहीच माहीत नाही. आता काकूंनी आजूबाजूला चौकशी करायला सुरुवात केली, तर त्यांना समजलं की या बंगल्यात जास्त कोणी टिकत नाही. अमानवीय अनुभव लोकांना येतात. त्यांनी निर्णय घेतला की आता इथे राहण्यात काही अर्थ नाही. आपण उद्या सकाळीच एका नातेवाईकांकडे जाऊ आणि तिथून दुसरीकडे राहण्याची जागा शोधू. त्या रात्री एक भयानक प्रकार घडला. मध्यरात्र उलटून गेली होती आणि सेम तो दरवाजा जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. काका-काकू दोघे जागे झाले. दरवाजा जोरजोरात कोणीतरी ठोठावत होतं. काका म्हणाले, “थांब, मी जरा बघून येतो.” काकी म्हणाल्या, “नका जाऊ.” पण काकांनी त्यांची समजूत काढली आणि वरती गेले. काका वरती जायला लागले, तसा दरवाजा वाजायचा बंद झाला. काकांनी वर जाऊन बघितलं, तर टेरेसचा दरवाजा उघडला होता. त्याला लावलेलं कुलूप तुटून जमिनीवर पडलं होतं. काका ते कुलूप उचलायला वाकले, तसा टेरेसच्या बाजूने एका बाईचा आवाज आला. “मी बोलले होते ना… दरवाजा बंद नका करू.” काकांना दरदरून घाम फुटला. समोर कोणीच नव्हतं. कसेबसे ते खाली आले आणि त्या रात्रीच त्यांनी ते घर सोडलं. अजूनही तो बंगला पडीक आहे.

भुताला काय हवं आहे हे विचारून घ्यायचं धाडस कोण करणार?

पहिल्या भागात हरिश्चंद्रगडावरची गोष्ट आहे. त्यावरून आठवलं. मी ट्रेकिंगला जातो तेव्हा अमावस्येच्या पुढेमागे जातो कारण आकाशदर्शन चांगले होते. तसा एकदा हरिश्चंद्रगडावर गेलो. तिथल्या वरच्या ( तारामती डोंगरातल्या) एका गुहेत पथारी टाकली. अजून अंधार व्हायला अवकाश होता. एक गाववाला येऊन माझ्याशी गप्पा मारत बसला. तो म्हणाला इकडे अमावास्येला आकाशात प्रकाशाचा झोत फिरतो.[ पलिकडे माळशेज घाटात रात्री क्वचितच वाहने जातात. म्हणजे दूधाच्या गाड्या खाली जातात पण वर येणारी कमी असतात. वर येणाऱ्यांचाच उजेड दिसत असणार.] मी बोललो "अमावस्या आहे म्हणूनच आलोय." तर तो गाववाला घाइघाईने उठून गेला.

ही गोष्ट माझ्या एका मित्राच्या मामाची आहे. ही घटना साधारण २५ वर्षांपूर्वीची. त्यांचं गाव डोंगराच्या पायथ्याशी होतं. गावापासून थोडं लांब त्यांची शेती होती. शेतीच्या मधोमध एक जुनी विहीर आणि बाजूलाच पिकांची राखण करण्यासाठी एक लहानसं मचाण होतं. गावातल्या म्हाताऱ्या लोकांचा एकच इशारा असायचा… “संध्याकाळनंतर त्या विहिरीजवळ थांबू नका.” पण मामांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. एके दिवशी पिकं तयार झाली होती, म्हणून त्यांनी ठरवलं की आज रात्रभर मचाणावरच थांबायचं. रात्री अकरापर्यंत सगळं व्यवस्थित होतं. साधारण बारा वाजता त्यांना विहिरीजवळ कंदिलाचा प्रकाश दिसला. त्यांना वाटलं, एखादा चोर असेल. ते खाली उतरले आणि विहिरीकडे चालत गेले. जसं ते जवळ गेले, तसा कंदील हळूहळू मागे सरकायला लागला. त्यांनी मोठ्याने आवाज दिला… “कोण आहे तिकडे?” पण काहीच उत्तर आलं नाही. काही वेळाने तो प्रकाश अचानक गायब झाला. त्यांनी पूर्ण परिसर पाहिला, पण तिथे कोणीच नव्हतं. त्यांना वाटलं, कदाचित डोळ्यांचा भ्रम असेल. ते परत मचाणावर आले. साधारण दोनच्या सुमारास त्यांना पुन्हा आवाज आला. यावेळी कोणीतरी विहिरीतून बादली काढत असल्यासारखा आवाज येत होता. पण त्या विहिरीत अनेक वर्षांपासून पाणीच नव्हतं. ते पुन्हा खाली उतरले. विहिरीजवळ गेले, तर आवाज बंद झाला. ते विहिरीत डोकावून पाहू लागले. तेवढ्यात खाली अंधारातून एक बाईचा आवाज आला… “इतका वेळ का लावलास?” मामांच्या अंगावर काटा आला. ते घाबरून मागे सरकले. तेवढ्यात त्यांच्या पायाखालील माती सरकली आणि ते कसाबसा तोल सावरून मागे झाले. जर एक पाऊल पुढे गेला असता, तर ते थेट विहिरीत पडले असते. ते धावत मचाणावर आले. सकाळ होईपर्यंत त्यांनी खाली उतरण्याची हिंमत केली नाही. दुसऱ्या दिवशी गावातल्या एका वृद्ध माणसाने त्यांना सांगितलं… “त्या विहिरीत अनेक वर्षांपूर्वी एका नवविवाहित बाईने उडी मारून जीव दिला होता. रात्री ती लोकांना नावाने हाक मारते आणि विहिरीजवळ बोलावते.” त्या दिवसानंतर मामांनी कधीच रात्री त्या शेतात एकटं जाण्याची हिंमत केली नाही.आजही ती विहीर तशीच आहे. दिवसा तिथे सगळे जातात…पण सूर्य मावळला की त्या विहिरीच्या दिशेने गावातला एकही माणूस फिरकत नाही.

भारी आहेत किस्से.

वयात येताना मी भुसावळला गेलो असताना तापी नदीच्या कडेकडेने आम्ही ज्या नातेवाईकांकडे गेलतो त्यांची मुलं आणि त्यांचे मित्र चालत चाललो होतो. वस्ती खूप मागं राहिली होती. आम्हाला भानच नव्हतं. आम्हाला आमच्या मागं गावात काय चाललंय खबरच नव्हती. गावात आमचे आई वडील आम्हाला शोधायला निघाले होते कारण कुणीतरी त्यांना सांगितलं होतं कि पोरं तापी नदीच्या कडेनं फिरत आहेत.

जे भुसावळचे असतील त्यांना माहीत आहे कि त्या काळात तापी नदीच्या बद्दल काय काय फेमस होतं. तिथंच मागच्या आळीतल्या आबांनी एक लाल तप्त गोळा नदीच्या बाजून घरंगळत चाललेला पाहिला होता. हा प्रकार त्यांना वेगळा वाटला होता. तसंही ती बाजू जरा विराणच होती. तुरळक झाडी, झुडपं आणि नंतर पुढे जंगलच.

मागे लोकांची चाहूल लागल्यावर माझ्या सोबतची मुलं कुणी दगडाच्या मागं, कुणी झाडाच्या मागं तर कुणी मातीच्या ढिगार्‍यात लपून बसले. कारण कि मोठ्यांचा ओरडा बसला असता. मी पुढे चाललो होतो. मला खबरच नव्हती. असाच नादात चालत चालत गेल्यानंतर मला एक मुलगी दिसली.
ती सेम टू सेम वहिदा रहमान सारखी दिसत होती. तिने मला पाहिलं आणि मधाळ हसली. मला म्हणाली कि माझ्याशी लग्न कर. मला आवडली होती, पण घरी काय सांगणार म्हणून मी मानेनंच नको म्हटलं. तर आता तिनं बीना रॉयचं रूप घेतलं. म्हणाली कि आता तू नाही म्हणूच शकणार नाहीस. मला तिनं रूप बदललं हे विचित्र वाटलं, पण तिच्या रूपानं भानच गेलं होतं. पण आईचा रागावलेला चेहरा डोळ्ञासमोर आला आणि मी वाचलो.

आता ती चिडली. तिनं थेट मर्लिन मन्रोचं रूप घेतलं. आता नका र द्यायला अवघड झालं होतं. पण या वेळी हातात काठी घेतलेले वडील डोळ्यासमोर आले आणि मी वाचलो.

आता मात्र तिचं अवसान सुटलं. ती संतापली. मला शाप देऊ लागली. आणि मला घाबरवण्यासाठी ती तिच्या मूळ रूपात आली. आजही ते तिचं रूप आठवलं कि मी घाबरून उठतो.

कधी कधी टिव्ही लावला कि ती दिसते.
क्वीन पिक्चर लावला त्या वेळी पण ती दिसली. तनू वेड मनू मधे पण तीच दिसत होती. मणिकर्णिका लावला तर त्यात पण ती होती.
मग पिक्चर बंद केले. न्यूज चॅनल लावलं तर तिथं पण ती दिसली. हृत्विक रोशनला शिव्याशाप देत होती.

तिचं नाव कंगना आहे असं समजलं.

१२ नविन बघुन आले. सगळे बोकलतांचे. एकही वाचला नाही. सॉरी बोकलत पण कथा लिहायला वेगळा धागा काढा हो. इथे खरे किस्से येऊद्या.

एस आर डी… भुताची गोष्ट कथा आठवली Happy

Pages